Tour du Mont Blanc भाग २ - आणि एकदाचे निघालो

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 10:00

२२ जूनला मायामीच्या रस्त्याला लागलो. मायामीजवळ पोहोचल्यावर युरो आणि डॉलरचे पाकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले. ते घेण्याची जबाबदारी नवऱ्याची होती. एरवी काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी पण ट्रेकच्या सुखस्वप्नांत असल्याने मला काहीही वाटले नाही, मी एकदम कूल वगैरे होते. पारू आणि DS कडे युरो होते ते लागतील तसे वापरायचे ठरले.

एअरपोर्टवर आमचे मार्ग वेगळे झाले. check-in च्या रांगेत लागतो न लागतो तो अनिताचा फोन की त्यांचे ब्रिटिश एअरचे विमान रद्द झाले आहे, पुढचे २ दिवसांनी मिळेल, alternative बघत आहोत वगैरे. आपण पुढे जायचे की नाही , यावर असे ठरले की आम्ही पुढे जायचे. रांगेत असताना हे लोक वेळेत पोहोचले नाहीत तर कसे करायचे याचा विचार चालू झाला. काही कपडे आणि ट्रेकसाठी आवश्यक गोष्टी आनंदच्या सामानात होत्या, पण तरी असे लक्षात आले, की जुजबी गोष्टी खरेदी करून मला व मुलाला ट्रेक सुरु करता येईल, हे लोक नंतर join करू शकतील. आमचे विमान निघायच्या अगोदर कळले की यांना वॉशिंग्टन डी सी मार्गे जिनीवाचे विमान कदाचित मिळू शकेल पण layover खूप कमी असल्याने risk आहे. आमचा मायामी लिस्बन प्रवास मस्त झाला. लिस्बनला पारूशी बोलणे झाले, ते लोकही हिथ्रोहून जिनिवाला येण्यास निघत होते. आमचे उरलेले ३ मेम्बर बहुतेक २४ दुपारपर्यंत जिनीवाला पोहोचतील असे कळले. पुढचे पुढे बघू असा विचार करून लिस्बन एअरपोर्टवर जिनिवाच्या विमानाची वाट बघत होतो. इथे एकही देसी माणूस दिसणे शक्य नाही वगैरे बोलत असताना आमच्या समोरून चक्क डॉ. विनय सहस्र्बुद्धे ( भाजप - राज्यसभा खासदार) गेले. ते आमच्याच विमानात होते. जिनीवात उतरल्यावर बॅग्स घेण्याच्या इथे त्यांना हॅलो केले तर गृहस्थ म्हणतो - “sorry हं, मी ओळखलं नाही तुम्हाला.” मी म्हटलं, “तुम्ही मला ओळखत नाहीच, पण मी ओळखते तुम्हाला, तुमचे interview भाषणे वगैरे ऐकली आहेत.” त्यांना धक्काच बसला, “मी काही प्रसिद्ध व्यक्ती वगैरे नाही”. मी म्हटले, जो तो आपल्याला रस आहे अशा गोष्टीच्या शोधात असतो, म्हणून मला तुम्ही माहीत आहात. असो ! जिनीवात भारत सरकारच्या कामासाठी होते आणि युरोपातील देवळांच्या चित्रांचे प्रदर्शन की काहीतरी लिस्बनला होते त्यासाठी १ दिवस गेले होते. त्यांनीही आमची आपुलकीने चौकशी केली. आता यात राजकीय रंग आणायचे काही कारण नाही पण एकूण छान वाटले बोलून त्यांच्याशी. गृहस्थ अगदी साधा, down to earth, पारदर्शी वाटला.

लिस्बनचा अगदीच गरिबडा असला तरी जिनीवा एअरपोर्ट भपकेदार असेल अशी माझी समजूत होती, पण त्यामानाने साधाच निघाला, किमान arrival ला तरी तसाच वाटला. कुलकर्णी तिथे भेटले. जिनिवा शामनी बसची बाहेर वाट बघत बसलो. हवा छान होती. बसायला बेंच वगैरे एकूण कमीच असल्याने मांडा ठोकून फुटपाथवर बसलो होतो. स्वच्छ तर इतके होते की तिथे तसेच आडवे व्हायलाही हरकत नव्हती. शामनीचा प्रवास सुरु झाला आणि अहाहा !
2_5.1.jpg
नितळ आकाश, हिरवे डोंगर, टुमदार रस्ते आणि घरे , डोळे सुखावले होते. पुढचे ७-८ दिवस अशाच, याहून सुंदर वातावरणात आपण असणार आहोत या कल्पनेने प्रसन्न वाटत होते. ७५-८० मिनिटांत बस शामनी गावातल्या मुख्य stand वर पोहोचली, त्या जागेचे नाव chamonix sud. गुगलमध्ये हे ठिकाण १० वेळा तरी पाहिले असल्याने ओळखीचेच वाटत होते.
2_4.JPG
टिपिकल हिलस्टेशन होते. तिथेच १ नंबरच्या बसला थांबलो, बरोबर मोठ्या बॅग. जेटलॅगमुळे आलेले जडत्व वगैरे. बस आली आणि संध्याकाळची चर्चगेट - विरार लोकल बरी म्हणावी अशी गर्दी ( मुंबईबाहेरच्या लोकांनी मुंबईत जाऊन स्वतः अनुभव घ्यायला हरकत नाही). हॉटेलवाल्या बाईने सांगितले होते की तिकीट कोणी विचारत नाही, त्याचे कारण कळले. तरी आम्ही काढले होते. कसेबसे घुसलो. दर २ -४ मिनिटांवर स्टॉप. आम्ही राहणार ते हॉटेल les houches नावाच्या गावात होते. माझ्या अकलेने मी त्याला लेस हचेस किंवा हुचेस म्हणत होते. कुलकर्णी म्हणाले असे नाव नाही पण बरोबर उच्चार त्यांनाही आठवेना. तर बरोबर उच्चार ल / ला/ ली ( यांच्या मधले काहीतरी) हूश असा काहीसा होता, असाच प्रकार प्रत्येक स्टॉपला. पूर्वपुण्याई (गुगलची) जबर म्हणून योग्य ठिकाणी उतरलो आणि १०० पावलांवरच्या हॉटेल रॉकी पॉप मध्ये एकदाचे येऊन पडलो. हाच तो स्टॉप आणि शेजारचे हॉटेल.
2_1.1.jpg
हॉटेल सुरेख होते, सगळ्या सोयी छान, तिथे काम करणारे आणि पाहुणे म्हणून आलेले सुरेख देखणे फ्रेंच पुरुष आणि बायापण. खायला प्यायला उत्तम, खोलीतून आणि बाहेरून मस्त डोंगररांगांचे दर्शन फक्त एकमेकांचे बोलणे एकमेकांना कळेना. आम्ही फ्रेंच भाषेवर अनन्वित अत्याचार केले आणि त्यांचे इंग्लिशही ४ शब्दांपलीकडे जात नव्हते. Google translator वगैरे वापरून जमेल तितके केले पण तितका वेळ नसायचा, पुढचे गिऱ्हाईक तयार. संध्याकाळी गावात फिरायला निघालो. रस्त्याच्या कडेला सुंदर सुवासिक मोठे गुलाब , रानफुले. सगळा landscape केवळ वेड लावेल असाच होता. Love in the air. डोळ्यांत भरलेल्या गोष्टी म्हणजे अशक्य स्वच्छता आणि देखणी फ्रेंच जनता. खरेतर chamonix मध्ये जाऊन फ्रेंच रेस्तरॉमध्ये जेवण्याचा प्लॅन होता पण दमल्याने आणि बस रात्री ८ नंतर तुरळक असल्याने ‘ल हूश’ मधेच आधीच शोधून ठेवलेल्या ‘गांधी’ नावाच्या रेस्तरॉमध्ये जेवायला गेलो. युरोपमध्ये फार महाग आहे असे जो तो सांगत होता, कदाचित हे फार लहान गाव असेल म्हणून पण इतके काही महाग वाटले नाही. छान चहा मिळाला आणि पंजाबी जेवणपण.जेवण अप्रतिम होते. फुलांना वास असतो, भाज्यांना चव असते ही गोष्ट अमेरिकेत राहून विसरायला झालेली तिचा प्रत्यय येत होता. तृप्त होऊन -’ अशी सुखे मी सदना आले, शांतीत अहा झोपी गेले. Bonjour Bonjour Bonjour Bonjour स्वप्नी बोलले बोल कितीकदा’ . आमच्या खिडकीतून.
2_2.1.jpg
कॉमन एरिया
2_6_1.jpg2_3.1.jpg
क्रमश: - https://www.maayboli.com/node/83831 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख वर्णन!
तुमची विनोदबुद्धी मस्त आहे!
सुरुवातीला पाकीट घरी विसरल्याचं वाचल्यावर धस्स झालं!

कुणी प्रतिसाद लिहीत नाही म्हणजे १) ववि वृतांत वाचण्यात गर्क असतील किंवा २)अशाच सहलीचे बुकिंग शोधत असतील.
फांस आवडलं.

चाहता झाल्यामुळे ही लेखमाला माबो उघडल्या उघडल्या दृष्टीस पडली याचा आनंद झाला.. वाचते आहे.
किलिमांजारो इतकीच ही मालिका देखील आवडते आहे.