Tour du Mont Blanc भाग ३ - Chamonix भटकंती

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 11:04

सकाळी लवकरच निघालो. Chamonix मध्ये येऊन ब्रेकफास्ट घेतला , उत्तम कॉफी, फ्रेंच pastry - croissant अगदी झक्कास होते. Aiguille du midi म्हणजे needle of the day या आल्प्समधल्या peak वर ट्रॉलीने वर जाऊन बघण्यासाठी तिकीट अगोदरच काढले होते. या ठिकाणाचा उच्चार मी काही अनाकलनीय कारणाने आणि मोठ्या आत्मविश्वासाने ‘ऑग दि मिडी’ असाच शेवट पर्यंत करत राहिले पण खरा उच्चार आग्वई दु मीदी च्या आसपास जाणारा आहे. असे यासाठी म्हटले कारण मी १० फ्रेंच लोकांच्याकडून तरी तो शब्द पुनःपुन्हा म्हणून घेतला पण प्रत्येकाच्या उच्चारात किंssचित फरक वाटला.
शामनी मधून ट्रॉली निघते ती एका स्टॉपला मग पुन्हा दुसरी ट्रॉली घेतली की आग्वई दु मीदीला.
3_1.jpg
ही जागा Mont Blanc ( १५७०० फूट) पेक्षा कमी उंचीवर ( सुमारे १२६०० फूट) आहे पण शामनी valley ( ३५०० फूट) आणि सर्व डोंगररांगा स्वच्छ दिसतात.
3_2.jpg3_3.JPG

ही त्या भागातील आणि बहुतेक युरोपातीलाच सर्वात मोठी ट्रॉली \ ट्राम \ गंडोला आहे. खाली valley मधून खरोखर एक सुईसारखी दिसते म्हणून तिचे नाव needle of the day. सकाळी स्वच्छ ऊन होते. वरून valley, अथांग पसरलेला बर्फ, त्यावर ठोकलेले तंबू, बर्फावर सुरीने कापल्यासारख्या दिसाव्यात अशा वाटा मस्त दिवस होत्या. Mont blanc चे ही दर्शन झाले. पर्यटकांच्या गर्दीतही अशा उंचीवर विशेषतः बर्फाच्या सानिध्यात एक विलक्षण शांतता अशा ठिकाणी जाणवते. हा आल्प्स आहे आणि पूर्वेकडे हिमालय आहे. दोघे भाऊ, एकच उंचीवरून एकमेकांकडे पाहत असतील - मध्ये मध्ये कोणीही नाही , पण आपण त्यांच्या मूक संवादाचे साक्षीदार आहोत असे काहीसे विचार डोक्यात येत होते. अशा ठिकाणची magnanimity निःशब्द करते. तिथे सगळीकडून बंद असलेला glass box होता, त्यात उभे राहिले की सर्व बाजूंनी पाठच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिवस होत्या, तिथे फोटो काढले. वर पुष्कळ वारा होता आणि प्रखर ऊन पण. तिथे ढग हलताना बघून उगीचच मेघदूत आणि त्यातल्या मार्गाची आठवण आली.
3_4.jpg3_5.jpg3_6.jpg3_7.jpg

२ एक तासांनी पुन्हा ट्रॉली घेऊन खाली आलो. तोवर उरलेली ३ मंडळी जीनिवात उतरल्याचे कळले. पण आयत्यावेळी त्यांना बस मिळत नव्हती आणि टॅक्सीवाल्याशी हुज्जत घालणे चालू होते. आपण तिथे नाही या कल्पनेने हायसे वाटले. ते कदाचित अजून तास दोन तासात पोहोचतील तोवर आपण हॉटेलला जाऊन त्यांच्या स्वागताला तयार राहू असा विचार केला. Chamonix Sud ला येऊन बस पकडली आणि भलतेच stop दिसायला लागले. आम्ही भलतीच बस चुकून पकडली होती. माझ्या आत्मविश्वासपूर्ण फाडफाड फ्रेंचमध्ये मी बस ड्राईव्हर आणि बाकीचे passenger यांच्याशी “भय्या ये बस काही जाती है, मुझे अमुक जगह जाना है, कहा उतरू?” छाप संवाद चालू केला. मुलाने आपली अडाणी आई अगदीच लाज आणत आहे वगैरे लूक दिला. मुंबईत राहत असताना बाहेरगावहून आलेल्या लोकांशी चुकून उद्धटपणाने वागले असेल, नकळतपणे दुर्लक्ष केले असेल ते सर्व इथेच भोगावे लागते असे म्हणून सोडून दिले. शेवटी एका les pres नावाच्या अतीव सुंदर गावात उतरलो ( लिहीले तरी असेच होते, उच्चार काय होता देव जाणे). तिथे योग्य बस यायला १० मिनिटे होती, तेवढ्यात स्टॉप शेजारच्या दुकानात गेलो, मस्त wrap, sandwich दुपारच्या खाण्यासाठी घेतले. मुलगा आणि किरण कुलकर्णींनी त्यावरून यथेच्छ टिंगल केली पण मी व पारू बधलो नाही. एका मोठ्या पातेल्यात काही आमटीसारखे रटरटत होते ती ‘curry’ आहे असे कळले.
योग्य बस घेऊन हॉटेलला आलो. नवीन आलेल्या ३ मेम्बरना जेवल्यावर जास्त विश्रांतीची संधी न देता पुन्हा बसमध्ये चढवून Chamonix Sud ला आणले आणि Aiguille du midi च्या रांगेत लावून दिले. त्यानंतर आम्ही उद्या ट्रेकचे लोक ज्या Chamonix GARE ( म्हणजे रेल्वे स्टेशन) SNCF ( रेल्वे कंपनी ) इथे भेटणार तिथे कसे जायचे , तिथली टेहळणी केली. Chamonix गावात जरा फिरलो, खरेदी केली. इथे चिक्कार पर्यटक होते, खान पान जोरात चालू होते. कचऱ्यासाठी जमिनीत खोल खड्डे केलेले होते आणि त्यात प्रचंड मोठ्या बॅग्स. मुन्सिपाल्टीच्या गाड्या त्या बॅग्स उचलून गाड्यांत रिकाम्या करताना, गावातले दिवसाचे व्यवहार पाहिले आणि अर्थातच चर्चा. कोणी म्हणेल त्यात काय बघायचे , पण त्यात (सुद्धा) मजा असते - केल्याने देशाटन इ. इ. Chamonix हे मुख्य गाव आणि आजूबाजूची खेडी यांनी बनलेली शामनी Valley आल्प्स मधले touring, trekking, hiking, skiing सगळ्यांसाठीच मध्यवर्ती आहे तरी बजबजपुरी अजिबातच वाटली नाही. देशोदेशीचे पण प्रामुख्याने युरोपिअन , caucacious आणि एकूण साहसी, शारीरिक क्षमतेची कसोटी बघण्याची आवड असलेले, किमान फिटनेस फ्रीक म्हणता येतील असेच लोक दिसत होते. त्यात पुष्कळ फ्रेंच पुरुष असावेत - जरा थोड्या निरीक्षणाने फ्रेंच कोण, जर्मन कोण वगैरे अंदाज बांधायला आवडतं. एका जर्मन कंपनीत काम करत आहे आणि कामाच्या निमित्ताने अनेक कॅनेडियन फ्रेंचांशी संबंध आला आहे, who doesn't like french men (नुसते बघायला) ? तर ते एकगठ्ठा बरेच बघायला मिळाले.
प्रकाश उशीरापर्यंत असायचा पण संध्याकाळ होत आली तसे हॉटेलला परतलो. तेवढ्यात Aiguille du midi ला वर गेलेले आमचे ३ मेम्बर तिथेच अडकून पडल्याचे कळले. ७ ७:३० ८ कधी येऊ याची काही खात्री नाही असेही कळले. कारण असे की प्रखर उन्हामुळे ट्रॉली वाहून नेणाऱ्या केबल्स-तारा तुटल्या होत्या आणि ट्रॉलीचा अपघात होऊ शकतो म्हणून ती बंद केलेली. मग global warming वगैरे चर्चांना आम्हाला अधिक खाद्य मिळाले. ती मंडळी ८ च्या आसपास परत आली तेव्हा जवळजवळ अर्धमेली झालेली होती पण माणूस अधांतरी डोंबाऱ्यासारखा तारांवर चढून ट्रॉली manage करत आहे हे बघण्याचाही अनुभव मिळाला. हा तो फोटो.
3_8.jpg
शेवटी गांधीबाबाचेच जेवण आणून खाल्ले, ते सुंदर होते पण फ्रांस मध्ये येऊन भारतीय जेवण जेवायला लागल्याने अनिताचा पापड अधिकच मोडला. अर्थात दुसरा पर्याय नव्हता. आपल्याला हवे तसेच होईलच , मिळेलच असे नाही व ते मानसिकदृष्ट्या पचवणे हा एक धडा असतो. ट्रेकमध्ये आमचे सामान एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी गाडीने जाणार असल्याने १५ किलोची मुभा होती, त्यामुळे आम्ही रग्गड सामान भरले ( याची गम्मत पुढे), एरवी जुलैनंतर या कामासाठी खेचरे वापरली जातात, तेव्हा ७ किलोच्या वर सामान देता येत नाही. सगळी तयारी करून अतीव दमलेल्या आणि तरीही उद्या सुरु होणाऱ्या ट्रेकच्या उत्सुकतेत झोपलो.

क्रमश: -https://www.maayboli.com/node/83834 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users