Tour du Mont Blanc भाग ५ - दुसरा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 14:44

फळे, कॉफी, cereals - भक्कम ब्रेकफास्ट करून ८च्या सुमारास निघालो. सकाळी steep uphill होता, थोडे switchbacks होते. Mount Whitney ला पहाटे ३:३० ते ६ असे एकूण १०० Switchbacks जे एकदाचे पायाने घडले त्यानंतर मी switchbacks साठी (मानसिकदृष्ट्या) कूल असते. आणि आज ठरवून गाणी ऐकत चाल सुरु केली. आज (आणि नेहमीच ) मूड लता. कुछ दिलने कहा, आजा रे परदेसी, पाकिजा आणि काय काय ! इस मोडसे जाते है च्या सुरुवातीचा आलाप, किंवा यार सिली सिली ऐकताना डोंगर हवाच. चढ कधी संपला ते कळलेही नाही. डोंगर चढताना गाणे ऐकू नये, आवाजावर लक्ष हवे असा फ्रेडचा सल्ला होता. पण मी ऐकत असलेले गाणे loud orchestra, music नव्हतेच. शिवाय त्या निसर्गसौन्दर्याला साजेसे आणि त्या तोडीचेच होते. त्यामुळे मी लक्ष दिले नाही, गाणे ऐकलेच. फ्रेडच्या चांगले गाईड असण्याची एक खूण म्हणजे पारू आमच्यात वयाने बरीच मोठी, चढ आला की ती पाठी पडायची. मग आज त्याने पुढे तो, मागे पारू आणि इतर सगळे त्या पाठी हा क्रम ठरवून दिला. चिरंजीवांची त्यामुळे बरीच चिडचिड झाली खरी. पण इतर सर्वांना किंचित संथ गतीत गेल्याने अजिबात दम लागला नाही आणि एकटे पाठी पडण्याची वेळ पारू वर आली नाही.
5_1.jpg5_2.jpg
शामनी valley आता खूप पाठी पडली होती. Mont Blanc च्या north west ला अरुंद वाटेने आम्ही स्वित्झर्लंडकडे कूच करत होतो. वरून Le Tour आणि आजूबाजूचे खोरे दिसत होते. १० -१०:३० नंतर कॅनवास चांगला रुंदावला. एके ठिकाणी अचानक पूर्वेच्या एका शिखराकडे हात करून , इथे इंडियन एअरलाईनचे विमान ६६ साली क्रॅश झालेलं त्याने सांगितलं. कालपासून त्याने अशा अनेक घटना सांगितलेल्या पण ते ऐकल्यावर स्तब्ध झाले. हेच ते शिखर जिथे होमी भाभांचे विमान क्रॅश झालेले. विमानाचे भाग, शासकीय कागदपत्र, आणि अजून काय काय पर्यटकांना मिळायचे, अजूनही मिळते हे ही त्याने सांगितले. २ मिनिटे नकळतपणेच भाभांसाठी मूक होऊन श्रद्धांजली वाहिली गेली. काहीतरी वेगळे feeling आलं जे शब्दांत मांडणे कठीण आहे.
5_3.jpg
नंतर Landscape एकूणच जरा बदलत गेले आणि घंटांचे आवाज सुरु झाले. मग हळूहळू त्याच त्या - स्विसप्रसिद्ध गळ्याला घंटा बांधलेल्या गायी कुठे कुठे दिसायला लागल्या. लहानपणी ‘Heidi’ ची पुस्तके वाचली होती त्यातील चित्रे डोळ्यांसमोर दिसू लागली. दूरवर पसरलेले मऊ हिरवेगार वाऱ्याने हलणारे गवत, त्यावरची विविधरंगी रानफुले, समोर बर्फाच्छादित डोंगररांगा, स्वच्छ प्रकाश आणि कानांत ‘मौसम है अशिकाना‘
5_4.jpg5_11.jpg5_5.jpg
फ्रेडने एके ठिकाणी थांबवले, तिथून पुढे फ्रेंच valley दिसणार नव्हती आणि view खतरनाक होता. फोटो काढले, valley ला अच्छा केले आणि निघालो. मध्ये एकदा ब्रेक घेऊन गवतावर यशराज ‘सिलसिला’ वगैरे style झोपणे लोळणे इत्यादीही प्रकार केले, फक्त शिफॉनच्या एकरंगी साड्या आणि लिपस्टिक नव्हत्या.
१२ - १२:२० ला डोंगरमाथ्याला फ्रांस स्विस बॉर्डरला पोहोचलो आणि लंच घेतला. बॅगपॅक जरा हलकी झाली. पुन्हा कचरा तिथे टाकायचा की डब्यात भरून खाली न्यायचा हे ठरवताना अनिता चटकन काहीतरी लागेलसे बोलली. कदाचित सर्व प्लांनिंगचा stress, एकूण अनुभवाने, थोडे दमल्याने, गाण्यानेही overwhelm झाल्यामुळे असेल पण डोळ्यांना पाणी आले. मग एकटीच काही काळ north facing swiss valley च्या दिशेला बघत बसून राहिले. आपण इथे आपल्या आनंदासाठी आलो. गेल्या २-३ वर्षांत अनेक घरगुती कारणांनी त्रासलेले असताना इथे येण्याच्या कल्पनेने उमेद दिली, आता इथे प्रत्यक्ष असताना फालतू कारणांनी मूड खराब करण्याचे कारण नाही. वगैरे समजूत आपोआप पटली. असे क्षण प्रवासात, निसर्गाच्या सहवासात यावेत - ते सक्षमपणे झेलून पुढे जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं.
5_6.jpg
प्रफुल्ल मनाने descent चालू केला. मी डोंगरात आणि एरवीही किती पावले, किती किमी चाललो या गोष्टींकडे लक्ष देत नाही, म्हणजे ते जातच नाही. ते एक प्रकारे माझे meditation असते आणि किती ते मोजत नाही. पण मंडळींना उत्साह होता, त्यामुळे त्याबद्दल चर्चा, फ्रेडकडून माहिती काढणे चालू होते. आज काहीतरी १७-१८ किमी असणार होते. तसे खडकाळ , भरपूर उतार, मध्येच क्वचित बर्फ नाहीतर पाणी ओलांडले. डावा गुडघा जरा कमजोर झाला आहे, त्याने descent वर त्रास दिला, खरेतर गुडघ्यापेक्षा उतरताना तो त्रास देईल या कल्पनेनेच जास्त त्रास होत आहे, हे नवऱ्याने पटवले, सतत बरोबर राहिला. उतरून खाली valley त आलो तर जवळजवळ एक किमीच्या रस्त्यावर आजूबाजूला फुलांची शेती असावी अशी वाटली, दोन्ही बाजु फुलेच फुले, त्यामधून चालत असे स्वित्झरलँडमध्ये स्वागत झाले.
5_7.jpg5_8.jpg
तिथे मोठे campground होते, मला वाटले इथेच राहणार, पण दिल्ली अभी दूर थी. ३० -४० मिनिटांचा एक अशक्य steep चढ जीवाच्या ओढीने चढत राहिलो. नंतर एक मोठा ब्रिज आला, डोंगरकडेने जाणारा, आणि दुसऱ्या बाजूला खोल valley. त्या view ने सगळा शिणवटा गेलाच. आणि मुक्कामाच्या ठिकाणी Col De La Forclaz ला पोहोचलो !
5_9.jpg
तिथे प्रथमच wifi मिळाल्याने सगळे एकदम busy झाले. लॉजच्या बाहेर बसायला मस्त वाटत होते, पाठी कोणतातरी highway होता आणि समोर डोंगर आणि हवा ही crisp होती. पण आत शिरलो तर राहण्याची जागा epic होती. बिल्डिंग मध्ये अंधाऱ्या अरुंद पॅसेज आणि वेड्यावाकड्या जिन्यांतून वाट काढत दुसऱ्या मजल्यावर १५ किलोचे पोते घेऊन चढलो. एका मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांत कोंबलेले ३५-४० जण आणि पुरुष बायका मिळून १ बाथरूम ( पण स्वच्छ !) आणि एकच इलेक्ट्रिक प्लग असा प्रकार होता. एका प्लग वर ३० एक तरी devices charge केली जात होती. आम्ही attic मध्ये असणार, त्यामुळे खोलीला फार तर १ चौरस फूटाच्या २ खिडक्या होत्या. जेवण - Veggie burger, basil soup आणि strawberry icecream मात्र छान होते पण स्टाफ खडूस. पहिल्या दिवशीच्या मानाने आम्हाला फारच जाणवले. बंक बेडवर डोक्यावर जेमतेम २ फूटांवर पायांकडे उतरत जाणारे छत होते. मी छतालाच पाय लावून झोपले. त्या जागेचे स्वरूप आणि भाव बघता चिरंजीवांनी स्वित्झर्लंडमधली महागाई पासून नाझी concentration camp इत्यादींवर प्रवचन केले. पारू-किरण हसत राहिले. कशी का होईना, स्वित्झर्लंडमधली पहिली रात्र आम्ही आनंदाने साजरी केली.
5_10.jpg
क्रमश: - https://www.maayboli.com/node/83839 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

wow !! मस्त चाललीय ट्रेकभ्रमंती. एका पाठोपाठ एक बरेच भाग टाकले हे बरे केलेत.. लिंक न तुटता एका दमात वाचले ! पु भा प्र !

wow !! मस्त चाललीय ट्रेकभ्रमंती. एका पाठोपाठ एक बरेच भाग टाकले हे बरे केलेत.. लिंक न तुटता एका दमात वाचले ! पु भा प्र ! >> +१ पुभाप्र