सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १९: नागभीड- नागपूर (१०३ किमी)

Submitted by मार्गी on 22 June, 2023 - 12:17

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १७: आष्टी- गडचिरोली (६९ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १८: गडचिरोली- नागभीड (७६ किमी)

✪ तिस-या शतकासह मोहीम पूर्ण
✪ नागपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत
✪ दिघोरीतील शाळेला भेट
✪ दीक्षाभूमीवर मुलाखत
✪ सायकलीने दिलेली अविश्वसनीय साथ
✪ इतकं स्वप्नवत खरं कसं असेल!

सर्वांना नमस्कार. मोहीमेचा १८ वा आणि शेवटचा दिवस, ११ ऑक्टोबर २०२२. काल नागभीडमध्ये छान भेटी झाल्या आणि चांगला आराम झाला. आज मोहीमेचा शेवटचा दिवस! पण सायकलिंगच्या बाबतीत शेवटचा किलोमीटर पूर्ण होईपर्यंत आपण खात्रीने सांगू शकत नाही. अर्थात्, आतून मला स्पष्ट जाणीव आहे की, आजचाच दिवस शेवटचा असेल. इतक्या दिवसांमध्ये सायकलीला किंवा सायकलिस्टला काहीच त्रास झाला नाहीय, त्यामुळे तो आजही होणार नाही! बदल इतका आहे की, आज हवामान पावसाचं आहे. आणि तेही मला चांगलं आहे. अन्यथा नागपूरमधली ऑक्टोबर हीट! आज साधारण १०३ किलोमीटर सायकल चालवेन. म्हणजेच ह्या मोहीमेतलं तिसरं शतक होईल.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/06/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

नेहमीप्रमाणे लवकर राईड सुरू केली. आज हे पूर्ण होणार म्हणून थोडं वाईटही वाटतंय. गेले काही दिवस खूपच वेगाने गेले. राईड करताना ह्या मोहीमेतल्या असंख्य आठवणी मनात येत आहेत.. कधी कधी तर मला नीट आठवतही नाहीय की मी सुरू कुठे केलं होतं आणि कुठपर्यंत मी आलोय. वाटेतल्या मुलांसोबत, लोकांसोबत आणि संस्थांसोबत झालेल्या भेटी आठवत आहेत. आणि नागपूरमध्येही आता अशाच भेटी होतील! नागपूरची मंडळी तर खूप उत्साहित आहेत. नागपूर हे माझं लांबचं होम- टाऊनच आहे. कारण माझे आजोबा नागपूरचे होते आणि बाबाही नागपूरमध्येच शिकले आणि इथे अनेक नातेवाईक राहतात. तसंच माझ्या बालपणीच्याही काही आठवणी नागपूरच्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे हे 'कोई लौट के आया है,’ सारखंच वाटतंय! हायवे अगदी मख्खन आहे. सायकल मला काय साथ देतेय! आणि मी केलेले छोटे टप्पे- साधारण ८५ ते ९० किलोमीटर- माझ्या फिटनेस स्तरासाठी अगदी योग्य ठरले. त्यामुळे मी खूप थकलो असा कुठेच नाही. माझी सर्व प्रक्रिया योग्य होती. त्यामुळे खरं तर कुठेच खडतर अशी कसोटीची वेळ आली नाही! फक्त कधी कधी पाय थोडे कडक झाल्यासारखे वाटतात, पण पेडलिंग सुरू केल्यावर हळु हळु मोकळे होतात.

३० किलोमीटरवर पहिला ब्रेक घेतला. आधी दक्षिण, नंतर पूर्व, नंतर उत्तर- पूर्व आणि मग उत्तर व किंचित उत्तर- पूर्व आणि आता शेवटी पश्चिम दिशेला राईड करतोय! अर्ध्या अंतरापर्यंत हवामान कोरडं व गरम आहे. पण दूरवर ढग दिसत आहेत. नक्कीच पाऊस येणार आणि उमरेड ओलांडल्या ओलांडल्या पाऊस सुरू झाला! छान वाटतंय पावसात. पावसामुळे आता उष्णतेचा प्रश्नच नाही! आता महामार्गही चारपदरी झालाय! हा सर्व प्रवास पावसाळ्याच्या शेवटी करत असल्यामुळे पावसाची तयारी होतीच. सुरूवातीला दोन दिवस पाऊस लागलाही होता. त्यामुळे पावसामुळे काळजीचं काही कारण नाही व थांबायचीही गरज नाही. नागपूर फक्त २८ किलोमीटर आहे! कदाचित मी वेळेच्या आधीच पोहचेन. काल ब्रह्मपुरी आणि नागभीडमधल्या भेटींमधून त्या मंडळींनी नागपूरच्या दिघोरीतल्या शाळेतल्या भोयर सरांना माझ्याबद्दल कळवलं. त्यांनी मला शाळेत बोलावलं आहे, त्यामुळे तिथेही धावती भेट देईन. राईड करतानाच टाईम्सचे पत्रकार- सर्फराज खान ह्यांचा फोन आला. त्यांना माझी मुलाखत घ्यायचीय! मग त्यांना दीक्षाभूमीला भेटेन असं सांगितलं! पण त्यांचा फोन येण्यामागचं कारण म्हणजे नागपूरमधले माझे उत्साही स्नेहीजन.

भर पावसात नागपूरला पोहचलो आणि श्री. भोयर सरांना भेटलो. ते मला दिघोरीतल्या अमित उच्च प्राथमिक विद्यालयात घेऊन गेले. तिथे थोडा वेळ शिक्षक व विद्यार्थ्यांना भेटलो. छोटी पण छान भेट झाली. विद्यार्थी व शाळेसाठी असं काही करता आलं, ह्याचं समाधान वाटतंय. आणि मग ह्या मोहीमेचा परमोच्च बिंदू आला- दीक्षाभूमी! फार पूर्वी हैद्राबादमध्ये सायकल चालवल्यानंतर पहिल्यांदाच शहरातल्या गर्दी व वाहनांमधून वाट शोधताना व सिग्नलला थांबताना मनात असंख्य भावना आहेत. दीक्षाभूमीचा रस्ता विचारत विचारत पोहचलो तिथे. इथे मला आकांक्षाताई देशपांडेंचे पूत्र- अक्षित देशपांडे भेटले. विशेष मुलांच्या शिक्षिका असलेल्या आकांक्षाताईंच्या विशेष मुलांवरील कामामुळेच मानसिक आरोग्य विषयावर सायकलिंग करायची प्रेरणा मिळाली होती! टाइम्सचे श्री. सर्फराज खानसुद्धा दीक्षाभूमीत माझी मुलाखत घ्यायला आले.

खरंच डोळे ओले आहेत. काही सुचत नाहीय. मनामध्ये कृतज्ञता हा एकच शब्द येतोय... हा प्रवास- निसर्ग तीर्थयात्रा व incredible India! केवळ आणि केवळ कृतज्ञता मनात येतेय की, मला हे करायला मिळालं. सर्फराजजींनी मला रिलॅक्स व्हायला मदत केली आणि मग मुलाखत घेतली. खूप भरून येतंय. दीक्षाभूमी मुलाखतीसाठी अगदी योग्य वाटली. एक महत्त्वाचं वारसा ठिकाण असल्याबरोबरच ते मला जिथे थांबायचंय त्या धरम पेठपासून जवळ आहे आणि प्रसिद्ध ठिकाणही आहे. मुलाखतीनंतर अक्षितजींनी मला धरम पेठेपर्यंत सोबत केली. तिथे माझ्या काकांचं घर मी शोधत असतानाच मला माझे मामा भेटले. आणि मग माझे काका- मनिष वेलणकर ह्यांच्या घरी पोहचलो. तिथे सगळ्यांनी उत्साहाने आणि थोड्या अविश्वासाने माझं स्वागत केलं!


.

.

आणि पुढे २-३ दिवस हाच क्रम सुरू राहिला. मी जवळच्या मंडळींना भेटत राहिलो. संध्याकाळी काही विद्यार्थ्यांनाही भेटलो. माझी मुलगी- अदू दुस-या दिवशी नागपूरला पोहचली. ती मला रिसीव्ह करायला येणार होती, पण मला एकही एक्स्ट्रा दिवस लागला नाही, त्यामुळे मीच आधी पोहचलो. मोहीम पूर्ण करताना १८ दिवसांमध्ये साधारण १४५० किलोमीटर झाले आणि आजचे १०३ किलोमीटर! काही दिवस मी रिजर्व ठेवल्यामुळे थोडे दिवस नागपूरला राहीन व अनेक व्यक्ती व संस्थांना भेट देईन. पण त्याबद्दल पुढच्या व ह्या मालिकेतल्या शेवटच्या लेखात बोलेन. त्या दिवशी मनात असलेली भावना मात्र फक्त कृतज्ञता आहे! आणि हे इतकं स्वप्नवत असेल तर खरं कसं असेल, असंही वाटतंय.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २० (अंतिम): कृतज्ञतेसह समारोप!

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults