सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)

Submitted by मार्गी on 12 May, 2023 - 23:57

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)

✪ तथाकथित मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यामधील श्रीमंती
✪ Incredible India!
✪ रिक्षावाल्यासोबत भावुक करणारी भेट
✪ ध्यानमग्न वने आणि निसर्ग
✪ “मानसिक आरोग्य हा आमचाही प्रश्न आहे, कारण आम्हांलाही खूप तणाव असतो”
✪ नितांत सुंदर रेपणपल्ली गांव

नमस्कार. सध्याच्या कडक उन्हाळ्यामध्येसुद्धा मी गेल्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण केलेल्या सोलो सायकल मोहीमेचे अनुभव लिहीतोय. तो अनुभव व त्या आठवणी इतक्या समृद्ध करणा-या आहेत की, ते शेअर करावंच लागेल. मोहीमेचा १४ वा दिवस, ७ ऑक्टोबर २०२२. काल मी प्राणहिता नदीच्या अगदी बाजूला असलेल्या स्वामी विवेकानंद वस्तीगृहामध्ये थांबलो होतो. किती वेगळा हा प्रदेश आहे! आजसुद्धा एक विलक्षण दिवस असणार आहे. हवामान सुंदर आहे. सिरोंचा! ऐतिहासिक दृष्टीने हे गांव महत्त्वाचं आहे, कारण ब्रिटीशांच्या काळातही हे तालुका मुख्यालय होतं. सिरोंचामध्ये एका दादांनी मला थोडं अस्वस्थपणे सांगितलं की, ते माझ्या मोहीमेसाठी पैसे देऊ इच्छितात. मी त्यांना नाही म्हणालो व सुचवलं की, त्यापेक्षा एखाद्या संस्थेसाठी मदत करा. पण त्यांनी सांगितलं की, त्यांना माझ्या मोहीमेचा हेतूच महत्त्वाचा वाटतोय व त्यासाठीच मदत करायची आहे. त्यामुळे मला त्यांचे पैसे घ्यावे लागले. अशा आठवणी घेऊन सिरोंचा सोडलं...

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/05/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

सिरोंचाच्या पुढे आल्यावर रोमांचक राईड सुरू झाली! आजचा रस्ता जवळ जवळ नसलेला रस्ता आहे. इथून चार चाकी वाहनं व ट्रकही कसे बसे जातात असं मला काल काही‌ जणांनी सांगितलं आहे! आजची राईड ही वेग किंवा वेळेची नसेल. ही एका कसोटी सामन्यातील खेळीसारखी असेल. क्रीजवर उभं राहाणं हे रन्स लवकर काढण्यापेक्षा महत्त्वाचं असेल. आणि शेवटी तरी असा एक आव्हानात्मक रस्ता मिळाला, ह्याचा मला आनंद होतोय! घनदाट वन! मान्सून संपला असला तरी मोठ्या पावसाच्या खुणा दिसत आहेत. सुरूवातीचा रस्ता इतका वाईट वाटत नाहीय. अर्थात् मोठ्या गाड्यांना भयाण धक्के बसत असणार आहेत! कारण हा रस्ता म्हणजे खड्ड्या- खळग्यांमध्ये हरवलेली पायवाट आहे! पण सायकलीसाठी फार काही अडचण नाहीय. कारण सायकलीला जायला तर फक्त २ इंच पट्टी तर लागते.

छोटी गावं लागत आहेत. एका ठिकाणी छोटं हॉटेल दिसलं. गंमत म्हणजे नंतर बोलताना कळालं की, हॉटेलचा मालक मी राहिलो होतो त्या वस्तीगृहात राहून शिकला आहे! मला काल भेटलेल्या अनेक जणांशी त्याची चांगली ओळख आहे. रस्त्याचा जास्त त्रास न होता आरामात पुढे जात राहिलो. रस्त्यामुळे नाही तर अद्भुत दृश्यांमुळे मला सारखं थांबावं लागतंय! इथे माकडं अजिबात दिसली नाहीत. पण अरण्य तितकंच निबीड आणि भव्य आहे. मला अगदी थोडी वाहनं लागत आहेत. आणि ते लोक मला बघून चकीत होत आहेत. माझी चौकशीही करत आहेत! एका ऑटो रिक्षावाल्याने मला थांबायला सांगितलं. मला वाटलं तो सेल्फी घेईल आता. कारण अनेक जण तसंच करत होते. पण त्याने त्या गोष्टी विचारल्याच नाहीत. त्याने फक्त विचारलं माझा नाश्ता झालाय का. मी हो, असं उत्तर दिलं. तर त्याने मला चक्क शंभरची नोट दिली! मी नम्रपणे नाही म्हणून सांगितलं व बोललो की, झालाय माझा नाश्ता. तरी तो बोलला की, भावा, हे ठेव, पुढच्या नाश्त्यासाठी वापर! त्याची आपुलकी बघून मला नकार देता आला नाही. त्याचे पैसे आणि प्रेम मला घ्यावं लागलं. अशा वेळीस आपण काय दुसरं करू शकतो!

गडचिरोली जिल्हा अति मागास म्हणून ओळखला जातो आणि नक्षलवाद्यांमुळेही ओळखला जातो. पण मला हृदयाची समृद्धी आणि शांत जीवन बघायला मिळतंय. अर्थात्, रस्त्यावर काही निमलष्करी वाहनं दिसत आहेतच. आणि काल मी सिरोंचामध्ये पोलिस अधिका-यांना भेटलो तेव्हा तिथेही दक्षता अगदी कडक घेतली जात होती. पण तरीही "ते लोक (नक्षली)” काही कुठे दिसले नाहीत. मला तर स्थानिक लोकही सांगत होते, की वे इतने सालों में हमें भी नही दिखे हैं! सत्य किती वेगळं असतं हे किती सुंदर प्रकारे अनुभवता येतंय!

अगदी आरामात रेपणपल्लीला पोहचलो. ६३ किमी राईड झाली. इथे संघाच्या कार्यकर्त्यांनी एका घरात माझी व्यवस्था केली आहे. माझा एक उत्तम धावपटू मित्र खुशाल कुमार गडचिरोली जिल्ह्यातला आहे. त्याने ह्या परिसरात जॉबसुद्धा केला होता. त्याने रेपणपल्लीतल्या त्याच्या एका मित्रासोबतही- श्रीनिवासजींसोबत- मला जोडून दिलं होतं. आणि मला ज्या घरी राहा असं सांगितलंय, ते त्यांचंच घर निघालं! गावं छोटी आहेत, त्यामुळे सगळेच एकमेकांना ओळखतात! माझ्या मित्राचे मित्र श्रीनिवासजी रेपणपल्लीत नाहीत, पण त्यांचे भाऊ राजू जी आणि त्यांच्या बाबांची आपुलकी मला बघता आली. कुटुंबातल्या एका व्यक्तीसारखं मला त्यांनी घरी घेतलं. ह्या गोष्टी शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे... पण सायकलमुळे मला लोकांशी खूप सहजपणे कनेक्ट होता येतं आहे. आणि मी सतत Incredible India अनुभवतो आहे! अफवांच्या बाजारातला नाही तर खरा भारत!


.

.

.

.

.

.

अजून एक गंमत म्हणजे रेपणपल्लीमध्ये ड्युटीवर असलेले दोन पोलिस अधिकारी माझ्या गावचे- परभणीचे निघाले! काल सिरोंचातल्या अधिका-यांनी मला सांगितलं होतं व त्यांचा नंबरही दिला होता. ते त्यांनाही बोलले होते की, मी अशी राईड करत येतोय! संध्याकाळी मी त्यांनाही भेटलो. जेव्हा मी मानसिक आरोग्य जागरूकता हा विषय घेऊन ही राईड करतोय असं त्यांना सांगितलं, तेव्हा एक जण म्हणाले की, हा तर आमचाही प्रश्न आहे कारण आम्हांलाही खूप मानसिक तणाव असतो. थोडा वेळ त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्यासोबत माझं ध्यानाचं रेकॉर्डिंग शेअर केलं. मी हे करतोय ह्याचा खूप आनंद होतोय!


पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults