सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)

Submitted by मार्गी on 12 April, 2023 - 10:36

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)

✪ राईडसाठी नितांत सुंदर वातावरण
✪ राईड करतानाची सजगता
✪ ऐतिहासिक शहर वारंगल
✪ ११ दिवसांमध्ये ९१५ किमी पूर्ण
✪ भूतपूर्व हैद्राबाद संस्थानाचा संदर्भ
✪ वारंगलमधील मंडळींसोबत संवाद
✪ वारंगलच्या मल्लिकंबा मानसिक अक्षम आणि संलग्न अक्षमता संस्थेमध्ये भेट
✪ विशेष मुलांच्या समस्यांसंदर्भात जागरूकतेची गरज
✪ मनामध्ये आलेलं अनिश्चिततेचं मळभ

सर्वांना नमस्कार. ४ ऑक्टोबर २०२२ ची सकाळ. आजचा टप्पा तसा अगदी छोटा असणार आहे. फक्त ५४ किमी/-! कर्नाटकमध्ये एका दिवसात मी ह्याच्या दुप्पट अंतर पार केल्याचं अंधुकसं आठवतं! कुठून कुठून राईड करत आलोय, हेही नीटसं आठवत नाही कधी कधी! हे अंतर कमी आहे, कारण गेले दोन दिवस मी ठरलेल्या अंतराहून पुढे मुक्काम केला होता. ते बरंच आहे. मला वारंगलमध्ये गाठीभेटींना जास्त वेळ मिळेल. सायकलही दुकानात नेऊन तपासायची आहे. आज हे करता येईल! अर्थात् त्यासाठी पहिले वारंगलला पोहचावं लागेल!! उत्तम आराम झाल्यानंतर सकाळी जनगांववरून निघालो. आज आकाशात ढग दाटलेले आहेत आणि पाऊस कधीही पडू शकेल. तसंच, ह्या मोहीमेच्या पुढच्या दिवसांबद्दल मनामध्येही मळभ दाटून आलेले आहेत. वारंगलनंतर मी महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील अगदी दुर्गम व वन प्रदेशातून राईड करेन.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/04/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

लवकरच हायवेला आलो आणि वारंगलसाठी उजवीकडे वळलो. किती जबरदस्त वातावरण आहे हे! एकच गाणं सारखं मनात येतंय-

होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है
साईकिल चलाईए, फिर समझिए ज़िन्दगी क्या चीज़ है

काय आल्हाददायक हवा! पाऊस पडत नाहीय, पण कमालीचं प्रसन्न वातावरण! आणि अशा हवेत अशी राईड करणं ही पर्वणी आहे! हायवे छोट्या छोट्या गावांमधून जातोय. एक चर्च अगदी हायवेच्या बाजूला लागलं. जीसस ख्रिस्टांची मूर्ती! ज्ञानी व्यक्तींचं प्रतिक म्हणून आदराने त्यांच्याकडे बघितलं. आजची राईड खरंच स्वप्नासारखी वाटते आहे. त्यामध्ये अक्षरश: डुंबतोय! आज २५ किमी‌ अंतरावर फक्त एक ब्रेक घेतला. अंतर कमी आहे आणि सायकल उत्तम चालते आहे, तरी मी तिच्याकडे लक्ष देतोय. वाटेत जेव्हा खाली उतरतो तेव्हा प्रत्येक वेळी टायर्समधली हवा तपासतोच. आणि दर ४-५ दिवसांनी ती कमी झाल्यावर भरून घेतो. माझ्याकडे पंप आहे, पण त्याने हवा नीट भरली जात नाही. तो फक्त आणीबाणीच्या स्थितीमध्ये वापरण्यासाठी आहे. हवा मी रस्त्यावरच्या मॅकेनिककडेच भरून घेतो. फक्त कोणत्याही मॅकेनिककडे हवा भरता येईल असा एक कनेक्टर व्हॉल्व्ह मी सोबत ठेवला आहे. तसंच सायकलीच्या आवाजाकडेही माझं लक्ष आहे. सायकलीशी घट्ट मैत्री करून तिची काळजी घेणं गरजेचं आहे.


.

वारंगलला फारच लवकर म्हणजे १० वाजताच पोहचलो. आजचे ५४ व एकूण ११ दिवसांमधले ९१५ किमी झाले. वारंगल इतकं ऐतिहासिक नगर आहे, हे मला माहिती नव्हतं. महान वारशाच्या खुणा! किल्ले व ऐतिहासिक वास्तू! श्री. सुधीरजींच्या घरी गेलो. वयाने ज्येष्ठ नागरिक असूनही ते स्वत: आवडीने सायकल चालवतात! त्यांना भेटताना छान वाटतंय. दिवसभरात त्यांच्याशी आणि त्यांच्या मित्रांशी मस्त गप्पा झाल्या. त्यांनी मला ह्या परिसराची पार्श्वभूमी सांगितली. पूर्वी ब्रिटीशांच्या काळात हा प्रदेश हैद्राबाद संस्थान म्हणून परिचित होता. माझं गांव परभणी हेही पूर्वी त्या संस्थानात येतं होतं. त्यांनी ह्या हैद्राबाद संस्थानाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आणि काही लोक कोणत्या दृष्टीकोनातून बघतात ते सांगितलं. काही लोकांच्या मते पोलिस कारवाई (जी वस्तुत: सरदार पटेलांनी पाठवलेली सेना होती), तिने हैद्राबादवर "आक्रमण" केलं आणि ती मुक्त करणारी नव्हती! हे ऐकून धक्का बसला. काही लोकांसाठी व पक्षांसाठी "मुक्ती दिन" हा "आक्रमण दिन" म्हणून बघितला जातो, हेही कळलं. तत्कालीन हैद्राबाद संस्थानाच्या वीकीपीडिया पेजवरही मला माहित असल्यापेक्षा वेगळं चित्र दाखवणारी माहिती दिसली.

दुपारी सायकलच्या दुकानात सर्विसिंगसाठी गेलो. वारंगलचे एक सायकलिस्ट बंडी वेणू ह्यांनी त्यासाठी मदत केली. ते मला भेटू शकले नाहीत, पण कुठे जाऊ ते मला सांगितलं. सायकलला काहीही झालेलं नाहीय! सर्विसिंग करायची गरजच नाहीय! फक्त थोडं ऑईलिंग केलं, काही स्क्रू टाईट केले आणि चेनही पक्की केली! सायकल अगदी सुशेगाद आहे!

संध्याकाळी श्री. सुधीरजींचे मित्र मला भेटायला आले. हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत. त्यांना भेटताना व माझे अनुभव सांगताना छान वाटलं. शाळ व कॉलेजेसना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे तिथे कार्यक्रम होऊ शकला नाही. चर्चेत बोलताना एक जण म्हणाले की, काही धूप किंवा गोमूत्र इ. जाळल्याने होणारा धूर बौद्धिक अक्षम मुलांच्या क्षमतांसाठी चांगला असतो. पण जेव्हा मी त्यांना आकडेवारी व संशोधनाबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, असं आम्हांला फक्त वाटतं. बरं वाटावं, ही इच्छा चांगली आहे, पण आपण अनेक गोष्टी सजगपणे समजून घेतल्या पाहिजेत. असो.

श्री. सुधीरजींचे एक मित्र मला मल्लिकंबा मानसिक दिव्यांग व संलग्न विकलांगता संस्थेमध्ये घेऊन गेले (Mallikamba Institute of Mentally Handicapped and associated Disabilities). अनेक विकलांगता असलेल्या मुलं व प्रौढांसोबत ही संस्था काम करते. विशेष मुलांसाठी तिथे निवास व्यवस्था व शिक्षण सुविधा दिली जाते. त्यांच्याकडे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञसुद्धा आहेत. तिथे संस्थेच्या संस्थापिकाही भेटल्या. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या दोन मुलांमध्ये गंभीर बौद्धिक अक्षमता होत्या आणि स्वत:च्या संघर्षातून त्यांनी मार्ग काढला. पुढे त्यांनी विशेष शिक्षणामध्ये डिप्लोमा केला व इतर काही जणांच्या मदतीने ही संस्था स्थापन केली. स्पीच थेरपी, फिजिओथेरपी व इतर पद्धतींद्वारे मुलांना इथे विशेष शिक्षण दिलं जातं. चर्चेमध्ये त्या म्हणाल्या की, बौद्धिक अक्षमता असलेल्या विशेष मुलांचं प्रमाण आता खूप वाढतंय. आता त्यांचं प्रमाण कदाचित ३% इतकं वाढलं असावं. त्याची संभाव्य कारणं उशीरा होणारे विवाह, गर्भधारणेचं नंतरचं वय आणि स्ट्रेस अशी असावीत. समाजामध्ये अशा गोष्टी लवकर ओळखण्यासंदर्भात जागरूकतेची कमतरता आहे, त्यामुळे अनेक मुलांना लवकर उपचार दिले जाऊ शकत नाहीत. मी ह्या विषयासाठी सायकलिंग करतोय ह्याचा त्यांना आनंद झाला.

ही भेट भावुक करून गेली. किमान अशा लोकांना व ह्या मुलांना मी भेटू तरी शकलो, असं वाटतंय. समस्या खूप मोठ्या व गंभीर आहेत. पण आपण नक्कीच त्यांना मदत करू शकतो व त्यांच्याशी संवाद करू शकतो. आपल्या भागात आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्यांच्या समस्यांबद्दल जागरूक होऊ शकतो. त्यांना भेटू व बोलू शकतो. अशी मुलं असलेल्या पालकांना मदत करू शकतो. परंतु त्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या समस्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

... आजची राईड छोटी असली तरी दिवस विशेष जातोय. मोहीमेचे १८ पैकी ११ दिवस पूर्ण झाले व फक्त ७ दिवस बाकी‌ आहेत. आणि तेही तितकेच रोमांचक होणार असं दिसतंय. पुढच्या दिवसांबद्दल मनामध्ये अनिश्चिततेचं मळभ आहे. दुर्गम भाग, कमकुवत रस्ते, वन, नक्षलग्रस्त परिसर आणि अनोळखी परिस्थिती ह्यामुळे मनामध्ये अनिश्चितता वाटतेय. काही दिवस मनामध्ये असं अस्वस्थतेचं मळभ आलं आहे. पण हळु हळु हे ढग आले तसे निघूनही जात आहेत. विचार करून करून मन दमलं. मला आठवतंय, एका फुल मॅरेथॉनच्या वेळी मन खूपच अस्वस्थ झालं होतं. मनामध्ये त्याच त्या शंका आणि प्रश्नांचं भरपूर "गॉसिपिंग" झालं. त्याच त्या गोष्टींमध्ये मन अडकलं होतं. पण नंतर त्यामुळे थकून गेलं आणि हळु हळु ती अस्वस्थता निघून गेली! आताही खूप विचार करून झाल्यानंतर मनाचं मळभ मोकळं झालं! भुपालपल्लीच्या पुढचा टप्पा म्हणजे अज्ञातामध्ये ठेवलेलं पाऊल असेल! बघूया, कळेल लवकरच!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults

छान