सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

Submitted by मार्गी on 30 November, 2022 - 07:03

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)

✪ कर्नाटकातील ग्रामीण भागातून राईड!
✪ कर्नाटकातला मराठीचा प्रभाव
✪ "यारगट्टी" गांव- ओ यारा, गत्ति कित्थे गत्ति?
✪ "क्षमस्व, गावात तुमची सोय करता आली नाही!"
✪ मुक्कामाच्या जागेसाठी १८ किलोमीटर पुढे!

सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी ४ राज्यांमध्ये केलेल्या सोलो सायकलिंगमधला म्हणजे निसर्ग तीर्थयात्रेतला आनंद ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. २६ सप्टेंबर! बेळगांवरून सकाळी साडेसहाला निघालो. आज ह्या मोहीमेतला तिसरा दिवस! काल चोरला घाट पार केल्यानंतर चांगली विश्रांती झाली. आजपासून पुढे पूर्ण अंतरापर्यंत सोपा रस्ताच असणार आहे. बेळगांवमधून निघण्याचा रस्ता थोडा विचारला आणि निघालो. नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. आज बहुतेक दुसरी माळ आहे. बेळगांवामध्ये काही ठिकाणी मिरवणुकीची लगबग दिसली. बेळगांव बसस्टँड आणि किल्ला परिसरातून पुढे जाऊन मुंबई- बेंगलोर हायवे ओलांडला आणि बेळगांव- बागलकोटच्या महामार्गाला आलो. बेळगांव विमानतळाच्या परिसरातून हा महामार्ग जातोय. मस्त चकाचक रस्ता! मोठ्या लेन्स. दाट लोकवस्तीचा एक बोर्ड इथे दिसला. आजचा टप्पा तसा छोटा आहे. ८९ किलोमीटरवर बदनूर- कदमपूरला मुक्काम करेन. आणि सपाट रस्त्यामुळे हे अंतर लवकर पार होईल.

सकाळची वेळ, छान रस्ता! मस्त वेग मिळतोय. बेळगांवजवळचे गावं मागे पडले आणि रहदारी थोडी कमी झाली. कालचं जंगल आणि डोंगर गेल्यानंतर आजचा सपाट रस्ता छान वाटतोय. डोंगर- जंगलाऐवजी आता शेत आणि सपाट प्रदेश आहे! आणि ढग- पावसाच्या ऐवजी बरचसं मोकळं आकाश!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

नवीन परिसराचा आनंद घेत पुढे जात राहिलो. इथे रस्त्यावर प्रत्येक अंतर दर्शवणा-या बोर्डवर इंग्लिशबरोबर कन्नडमध्ये बागलकोट नाव सारखं दिसत आहे. हळु हळु त्यामुळे कन्नडमधलं बागलकोट वाचता यायला लागलं! आणि त्यावरून हेही वाटलं की कन्नडमधलं "ब" अक्षर हे बदकाच्या चिन्हासारखं दिसतंय! वाटेत रस्त्यावर काही जण अधून मधून माझी चौकशी करत आहेतच. आता हा प्रकार अगदीच सवयीचा झालाय. आता कर्नाटकच्या खूप अंतर्भागातून जात असल्यामुळे लोकांचं कुतूहल जरा जास्त आहे. थोडा पुढचा रस्ता जरा वर चढताना दिसतोय. एक छोटी टेकड्यांची रांग आहे व हा रस्ता ती पार करून जाईल. एक अगदी छोटासा घाट लागला. मस्त नजारे आहेत! इथून पुढे मस्त उतार मिळेल. गेले तीन- चार दिवस रोज राईड करत असल्यामुळे आता मस्त वेग मिळतोय. सहज अंतर पार होतंय.


.

साधारण ६० किलोमीटरवर यारगट्टी गाव लागलं. इथले नावं गमतीदार आहेत! यार आणि गट्टी! थोड्या वेळाने परत एकदा एनर्जी ब्रेक घ्यावासा वाटला. एका छोट्या गावात एका चहाच्या हॉटेलात थांबलो. चहा आणि बिस्कीट घेतले. बोलता बोलता हॉटेलवाल्याने चौकशी केली. महाराष्ट्र से आया हूँ म्हणाल्यावर चक्क तोही मराठी बोलतोय! वाटलं होतं की, बेळगांवपासून पुष्कळ पुढे आत आता कोणी‌ मराठी बोलत नसेल. पण कुठे कुठे मराठी बोलणारे आहेत. आणि जिल्हा बेळगांवच आहे अजून. थोडा ब्रेक घेऊन निघालो आणि साडेबारा वाजता ८९ किलोमीटरवर असलेल्या कदमपूर गावात पोहचलो. हे गांव अगदी लहान नाहीय. हायवेवरच चांगल्या वस्तीचं गाव आहे. आज इथे असलेली कोणती संस्था/ किंवा कार्यकर्ते ह्यांच्याशी संपर्क झाला नाहीय. बेळगांवच्या लोकांचंही इथे कोणी ओळखीचं नाहीय. आणि पुढच्या मुक्कामातल्या संस्थांनाही ह्या गावातलं काही माहित नाहीय. एका हॉटेलवर चौकशी केली तेव्हा कळालं की, व्यवस्था होईल. तो हॉटेलवाला चांगला दिसतोय. अगदी समजुतदार वाटतोय. अगदी लहान टपरीवजा त्याचं हॉटेल, पण त्याला माझ्या प्रवासाचा विषय- हेतु व स्वरूप लगेचच कळालं. मग त्याने त्याच्या मित्रांना फोन लावून ग्राम पंचायतमध्ये राहण्याची सोय होतेय का बघितलं. इथे नेमके लॉज नाही आहेत. पण तरीही इथे मुक्कामाची सोय होईल असं वाटल्यामुळे माझी स्ट्राव्हावरची राईड सेव्ह केली, ब्रेक घेतला. सामान सायकलवर ठेवून दुकानात बसलो. नंतर ग्राम पंचायतमध्येही जाऊन आलो. पण तब्बल दोन तास खटपट करूनही ग्राम पंचायतची रूम मिळाली नाही. आणि दुसरी कोणती शाळाही नाही. आणि इथे तर लॉज नाहीच आहेत. जे लॉज म्हणून आहेत, तेही फक्त रेस्टॉरंटच आहेत. एका ठिकाणी जेवण केलं. तिथल्या हॉटेल नव्हे रेस्टॉरंटवाल्यालाही म्हणालो की, मला फक्त झोपण्यापुरती जागा द्या. पण तो तयार झाला नाही. आणि ज्याच्या हॉटेल- टपरीमध्ये थांबलो, तो तर तयार होता, त्याचं मन मोठं होतं, पण त्याच्याकडे सोय अशी नव्हती. शेवटी दोन तास प्रयत्न करून अखेर १८ किलोमीटर पुढे असलेल्या लोकापूरला जायला निघालो.

तो दुकानदार मात्र गाववाल्यांवर नाराज झाला होता. "Very sorry, आपकी मदद नही कर सके," म्हणत राहिला. २० किलोमीटर मागे यारगट्टी किंवा १८ किलोमीटर पुढे लोकापूरला सोय नक्की होईल, तिथे लॉज आहेत अशी माहिती घेऊन शेवटी लोकापूरसाठी निघालो. इथेही यारगट्टीवरून आठवतंय- ओ यारा, गत्ति कित्थे, गत्ति? इथेच थांबायचंय असं वाटल्यावर भर दुपारी अडीच वाजता परत सायकल सुरू करताना बरेच मानसिक कष्ट पडले! स्टॉप- स्टार्ट राईड नेहमीच कठीण जाते. पण उपाय नव्हता. आणि १८ किलोमीटरच आहेत, फारही जास्त नाहीत. त्यामुळे निघालो शेवटी. एकदा पेडलिंग सुरू केलं आणि हळु हळु वेग घेतला. पाच- पाच किलोमीटरचे टप्पे केले आणि तास पूर्ण होण्याच्या आतच लोकापूरला पोहचलो. लोकापूर, जिल्हा बागलकोट! आजचे ८९ +‌ १८.५ असे जवळ जवळ १०८ किलोमीटर झाले! अनपेक्षित प्रकारे शतक झालं! गजबजलेली वस्ती, अस्वच्छ रस्ते आणि धूळ! पण हे जरा मोठं गांव दिसतंय. इथे बस स्टँडही आहे. लॉजेसही मिळाले. त्यात कमी रेटचा लॉज बघण्यात थोडा वेळ गेला. पण अखेर संध्याकाळ होता होता एक रीजनेबल लॉज मिळाला आणि सायकलवर सामान काढून फ्रेश झालो. थंड पाण्यानेच पण आंघोळ केली. आराम करायला मिळाला.

संध्याकाळी लवकर जेवायला एका हॉटेलात गेलो. हॉटेलवाल्यांनी माझी चौकशी केली. त्यांना माझ्या मोहीमेबद्दल सांगितलं. आणि गंमत म्हणजे तेही मराठी बोलणारे निघाले! इथे कर्नाटकात इतक्या आतमध्ये छोट्या गावात हॉटेल चालवणारे मराठी आहेत तर! हलकं जेवण घेतलं आणि परत हॉटेलला आलो. काल बेळगांवमध्ये एका उत्तम लॉजवर होतो आणि आज एका अगदीच साधारण लॉजमध्ये! पण दक्षिण भारतातली शिस्तही जाणवतेय. लॉज अगदीच साधा असला तरी खोली स्वच्छ आहे. टापटीप आहे. आजही कुठल्या संस्थेसोबत भेट नाही झाली. पण अनेक लोकांशी थोडं थोडं बोलता आणि भेटता आलं. आणि १८ किलोमीटर एक्स्ट्रा चालवल्यामुळे चक्क शतकही झालं! फक्त एक गडबड झालीय. ह्या मोहीमेत माझं लॅपटॉपवरचं काम करायला वेळ मिळत नाहीय. काल- परवाच्या लोकांच्या भेटी व त्यात जाणारा वेळ बघून मी माझ्या भाषांतराच्या क्लाएंटसना सांगितलं होतं की, मला आधी कळवलं होतं, तितकंही काम करता येणार नाहीय. त्यांना विनंती केली होती की, मला त्यांनी ह्यावेळी अर्जंट आलेलं काम स्किप करू द्यावं. त्यांना थोडी पर्यायी व्यवस्थाही करून दिली होती. त्यामुळे आज वेळ जरी गेला असला तरी ते टेंशन नव्हतं. ह्या मोहीमेतल्या भेटी- गाठी व संवादाचं स्वरूप बघून वाटतंय की पुढेही मला लॅपटॉपवर माझं प्रोफेशनल काम करता येणं कठीणच आहे. बघूया कसं होतंय.


.

.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults