सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)

Submitted by मार्गी on 18 January, 2023 - 08:03

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

✪ बागलकोटची आठवण!
✪ सुंदर घटप्रभा!
✪ अजस्र कृष्णेसोबत सत्संग
✪ दुभंगलेलं गांव- कोल्हार
✪ शरीर आणि मनाचं अक्लमटायजेशन

सर्वांना नमस्कार. सप्टेंबर- ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेल्या सायकलिंगचे अनुभव लिहीण्यामध्ये बराच खंड पडला होता. आकाश दर्शनाचे उपक्रम व इतर कामांची गडबड ह्यामुळे पुढचा भाग लिहायला सवड होत नव्हती. त्यातच सध्या पहाटेच्या वातावरणातल्या रनिंगची मेजवानीचा आणि धुक्यातल्या सायकलिंगच्या सोहळ्याचा आनंद घेत होतो. अद्भुत स्वरूपाचं हे सुख! त्यामुळे हे अनुभव थोडे मागे पडले. सायकलिंग तर १८ दिवसांमध्ये झालं होतं, पण हे अनुभव लिहीणं अजून होत नाहीय! त्यामुळे सोपं काय हे स्पष्ट आहे! Happy पण ह्या पूर्ण प्रक्रियेत सोबत असलेल्या मंडळींनी एकदा आठवण करून दिली! आणि मग परत एकदा वेळ काढला. ह्या १५०० किलोमीटर सायकल प्रवासातले अनुभव आठवताना डोळ्यांमध्ये पाणी येतंय. किती किती लोकांनी किती सोबत केली होती आणि निसर्गाने किती साथ दिली होती! कुठे तो चोरला घाट, कुठे ते सिरोंचा- गडचिरोलीतलं जंगल आणि प्रत्येक ठिकाणचे स्नेही जन! सायकलनेही शेवटपर्यंत नाबाद राहून साथ केली होती. एक अतिशय आनंददायी निसर्ग तीर्थयात्रा राहिलेल्या ह्या सायकल प्रवासाची पार्श्वभूमी http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/cycling-in-4-states-on-singl... इथे वाचता येईल. ह्या सोलो सायकलिंगमधला म्हणजे निसर्ग तीर्थयात्रेतला आनंद ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे.

.... काल २६ सप्टेंबरला ठरलेल्या अंतरावर मुक्कामाची जागा न मिळाल्यामुळे १८ किलोमीटर पुढे येऊन लोकापूरला मुक्काम केला. त्यामुळे अनपेक्षित प्रकारे ९० च्या ऐवजी १०८ किलोमीटर झाले, अनपेक्षित शतक झालं! लोकापूरमध्ये चांगला आराम झाला. इथल्या कोणत्याच संस्थेशी संपर्क झालेला नसल्यामुळे तसा काही कार्यक्रमही नव्हता. संध्याकाळी लवकर जेवून आराम घेतला. आपलं शरीर अद्भुत शक्तीशाली आहे. कालचा तिसरा दिवस होता, सायकलिंगची तर सवय होतेच आहे, थकणं कमी होत जातंय. त्याबरोबर रोजची नवीन जागा, वेगळं अन्न/ जेवण, झोपताना असलेले डास अशा गोष्टींनाही शरीर जुळवून घेतंय. त्यामुळे रात्री ब-यापैकी आराम झाला. अर्थात् रोजची नवीन जागा असल्यामुळे अगदी मनसोक्त- परिपूर्ण आराम हा एकही दिवस होत नाहीय. पण तेही शरीराने व मनाने जुळवून घेतलंय.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: www.niranjan-vichar.blogspot.com/2023/01/cycling-in-4-states-on-single-g... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

चौथा दिवस, २७ सप्टेंबर! काल १८ किलोमीटर जास्त पुढे आल्यामुळे आजचा टप्पा तसा छोटा आहे. फक्त ६३ किलोमीटर! आज वाटेत बागलकोट लागेल. बागलकोटची एक आठवण म्हणजे माझे आजोबा नारायणराव वेलणकर १९४२ मध्ये म्हणजे ८० वर्षांपूर्वी इथे काही काळ संघाचे प्रचारक म्हणून होते. त्यामुळे हे गांव ऐकून माहिती आहे. लोकापूरवरून ठीक साडेसहाला निघालो. गावामधला रस्ता थोडा सामान्य आहे. पण गावाच्या बाहेर आल्यावर एकदम चकाचक हायवे सुरू! कुडाळ- गोवा- बेळगांव- लोकापूर आणि आज बागलकोटमार्गे कोल्हार. ह्या रूटची दिशा अशी आहे की रोज राईड करताना सूर्य मला समोरच्या बाजूला दिसतोय. बेळगांवनंतर डोंगर लागतच नाही आहेत. त्यामुळे सपाट प्रदेश, विस्तीर्ण हायवे आणि प्रसन्न आसमंताचा आस्वाद घेता येतोय. आज चौथा दिवस असल्यामुळे सुरुवातीच्या नर्व्हज पूर्ण निघून गेल्या आहेत. आता हळु हळु सायकल ऑटो पायलट मोडवर येतेय! रोजच्याप्रमाणे वाटेतल्या लोकांसोबत अधून मधून थोडं बोलणं होतंय. आज दोन नद्या लागणार आहेत, त्यामुळे आजचा टप्पा तसा उताराचाच आहे.

मला बागलकोटला डावीकडे वळायचं आहे. नकाशा बघताना थोडा आळस केला होता. त्यामुळे असा समज झाला होता की, बागलकोटवरून पुढे जाऊन वळायचं आहे. पण त्यामुळे गोंधळ झाला. विजयपूराचा फाटा लक्षात आला नाही आणि मी फाटा शोधत बागलकोटमध्ये पोहचलो! आधीची एक एक गावं लागली आणि बागलकोटच सुरू झालं. मग तिथेच उप्पीट- चहा असा नाश्ता केला. नकाशा बघितला तेव्हा मी ४-५ किलोमीटर पुढे आलोय हे कळालं! हरकत नाही! म्हणजे मला आज थोडी जास्त राईड करायला मिळणार! नाश्ता करून परत वळालो. ह्यावेळी मात्र नीट टर्न बघून ठेवला. सकाळची वेळ असल्यामुळे शाळेत जाणारे मुलं मोठ्या संख्येने आहेत. मला बघून मुलांच्या प्रतिक्रिया, चेहरे आणि हसू! एक सायकलिस्टसुद्धा क्रॉस झाला. बहुतेक तो मोठी बीआरएम सारखी राईड करत असावा.

योग्य रस्त्याला वळाल्यावर हायसं वाटतंय. समोर एक जलायशयासारखं दिसतंय. आधी वाटलं की, अलमट्टी असेल. पण ते तर दक्षिणेला आहे. थोडं पुढे गेल्यावर नदीच लागली. ही घटप्रभा नदी! ह्याच नदीवर असलेला गोकाक धबधबा पूर्वी बघितला होता! इथे हिचा प्रवाह चांगलाच विस्तीर्ण आहे. नदीच्या नावामुळे एक गंमत आठवली. बागलकोटमध्ये माझे आजोबा येऊन गेले होते आणि आजीचं नाव घटप्रभेसारखं स्नेहप्रभा! इथून थोड्याच अंतरावर पुढे कृष्णाही आहे. सकाळ हळु हळु मध्यान्हाच्या जवळ येतेय. हळु हळु सकाळचं कोवळं ऊन तापतंय. पण रस्ता हलका उतार असल्यामुळे आणि आज चौथा दिवस असल्यामुळे काहीच ताण वाटत नाहीय. मस्त जात राहिलो! साधारण ५५ किलोमीटरवर परत एकदा चहा- बिस्कीट असं इंधन घेतलं.

कृष्णा! अजस्र कृष्णा! तिचं पात्र दूरवरूनच दिसतंय. समुद्र वाटावा इतकं तिचं पात्र मोठं आहे. अर्थात् इथे कृष्णा नदी आणि अलमट्टीचं बॅकवॉटर आहे, त्यामुळे इतका मोठा विस्तार दिसतोय. पण काय तो ब्रिज! किमान तीन किलोमीटर लांबीचा ब्रिज आहे. मनसोक्त फोटो घेतले. ब्रिजवर रस्ता थोडा छोटा असल्यामुळे गाड्या बघूनच थांबावं लागतंय. भव्य कृष्णेचा थोडा वेळ सत्संग केला आणि पुढे निघालो. नदी ओलांडल्यावर लगेचच ओल्ड कोल्हार गांव लागतं. बॅकवॉटरमुळे हेही गाव विस्थापित झालं आहे. त्यामुळे कोल्हार गांव आता थोडं पुढे वसलं आहे. कोल्हारमध्ये भारत विकास संगमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क झाला आहे. महेशजींनी मला बस स्टँडच्या जवळ यायला सांगितलं आहे. तसं विचारत विचारत गेलो. तिथे एक जण- बस्सूजी मला रिसीव्ह करायला आले आणि मग एका घरी मला घेऊन गेले. बागलकोटमध्ये ८ किलोमीटर जास्त होऊनही आजची राईड ७१ किलोमीटरच झाली. आणि आता हे निश्चितपणे "फक्त" ७१/- किलोमीटर वाटत आहेत. बस्सूजींनी खूप विचारपूस केली आणि थोडा वेळ सोबत केली.

महेशजी बँकेमध्ये काम करतात. ते संध्याकाळी येईपर्यंत फ्रेश झालो आणि आराम केला. पण एक वेगळीच अडचण आली. ती म्हणजे सलग तीन- चार रस्त्यावरचं आणि हॉटेलचं खाऊन पोट बिघडलं. अगदी जुलाब नाही पण ब-याच फे-या माराव्या लागत आहेत. अर्थात् हे होणारच होतं. कारण मला सायकलिंग जितकं जमतं, तितकं माझं शरीर पचवण्याच्या बाबतीत कार्यक्षम नाही. पण त्यामुळे एक गोष्ट बदलावी लागेल. इथून पुढे रोडवर नाश्ता हा फक्त केळी- चहा- बिस्कीट- चिक्की- चिप्स इतक्यापुरताच करेन. हॉटेलचं मला बरोबर पचत नाही. आणि बाकी जे जेवेन, तेही अगदी हलकं ठेवेन.


.

संध्याकाळी बस्सूजींच्या सोबत कोल्हारमध्ये थोडं फिरलो. त्यांना हिंदी चांगलं बोलता येतं. त्यांनी सांगितलं की, कोल्हार इतकं छोटं गाव असूनही इथे दोन बस स्टँडस आहेत. आणि ते चक्क हिंदु- मुस्लीम असे आहेत. बसेस सारख्याच, लोक सारखेच, पण बस स्टँड दोन. इथे पूर्वी दंगलीही झाल्या आहेत असं म्हणाले. कोल्हारमध्ये शाळेत किंवा कॉलेजात कुठे कार्यक्रम झाला नाही. पण अनेकांसोबत छोट्या छोट्या भेटी झाल्या. संध्याकाळी महेशजींच्या घरी जेवण झालं. त्यांच्याशी हिंदी- इंग्लिशमध्ये थोडं थोडं बोलणं झालं. पण त्यांचा मुलगा घरात खेळत होता. त्याच्यासोबत मात्र संवाद साधता आला नाही. भाषेची अशी अडचण कुठे कुठे येते आहे. त्याबरोबर पोटाचाही त्रास सुरू आहे. त्यामुळेही खूप अशी चर्चा करता आली नाही. एकदा तर वैतागही वाटला की, पचन शक्ती चांगली का नाहीय! पण मग लक्षात आलं की, प्रत्येकालाच काही ना काही त्रास असतात. अशी राईड जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांना तर किती त्रास येत असतील. अशी स्वत:ला आठवण करून दिली. आता चांगला आराम करेन, म्हणजे उद्या व्यवस्थित राईड करता येईल. संध्याकाळी परत ढग आलेले आहेत. सकाळच्या माझ्या वेळेत आकाश मोकळं असतं आणि दुपारनंतर ढग येतात बरोबर!

इथे आजूबाजूची गावांची नावं वेगळीच आहेत. आदरणीय बसवेश्वरांचं जन्म स्थान असलेलं बसवण्णा बागेवाडी हे गांव जवळच आहे. उद्या मला सिंदगीला जायचंय. त्यासाठीचा शॉर्ट कट रस्ता ह्या गावावरून जातो. पण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर लांबच्या रस्त्याने- विजयपूरा मार्गे जायचं‌ ठरवलं. हायवे असल्यामुळे अंतर जास्त असलं तरी वेळ कमी लागेल. इथून जवळच तेलगी नावाचं गावही आहे. सिंधूदुर्ग- गोवा आणि नंतर कर्नाटकातही अशी आडनावं असलेली अनेक गावं लागत आहेत! असो. मोहीमेतला चौथा दिवस पूर्ण झाला! आता उद्या परत एक शतक!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults