माझगावची शान - माझगावचा डोंगर - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 June, 2023 - 12:32

--

डोंगर?? हाहा... टेकडी असेल.

भाऊच्या धक्याला तर समुद्र आहे ना? तिथे कसला डोंगर? काहीही फेकू नकोस.

तू दहावी बारावीला अभ्यासाला जायचास तिथे? म्हणजे टेकडीच असेल? दिव्याखाली अभ्यास करायचा की झाडाखाली?

माझगाव म्हणजे ते हार्बर लाईनला आले ना? किती झोपडपट्टी आहे त्या लाईनला.. तिथे कसले आलेय गार्डन?

काय बोलतोस? कारंजे सुद्धा आहे तिथे? म्हणजे खरेखुरे गार्डन आहे?

काय नाव म्हणालास? जोसेफ बापटिस्टा गार्डन... हाहा.. कधी नावही ऐकले नाही.

आज ट्रेन थांबली होती डॉकयार्ड स्टेशनला तेव्हा पाहिले. वर देवीचे मंदीर आहे ना? ते ही नीट दिसत नव्हते. आणि गार्डन तर कुठे दिसलेच नाही...

बस आता उगाच फेकू नकोस.. म्हणे आमचा माझगावचा डोंगर !

-------

म्हणजे अगदी लहानपणापासून जेव्हा जेव्हा कोणासमोर आमच्या माझगावच्या डोंगराचा आणि तेथील गार्डनचा उल्लेख केला तेव्हा तेव्हा हेच ऐकत आलोय.

दादरकरांना जेवढे शिवाजी पार्क बद्दल अभिमान आणि आपुलकी आहे साधारण त्याच भावना आम्हा माझगावकरांच्या माझगावच्या डोंगराबद्दल आहेत. सकाळचा व्यायाम, संध्याकाळचे फिरणे, रात्रीच अभ्यास, शेकोट्या, चायनीजच्या पार्ट्या आणि मित्रांच्या मेहफिली अश्या बालपणीपासूनच्या कैक आठवणी ज्या जागेशी जोडल्या गेल्या आहेत, तिच्याबद्दल जाणून न घेताच तिची अशी टिंगल उडवली जाणे ईतके अंगवळणी पडले होते की त्याचे कधीच वाईट वाटले नाही.

पण आज मुंबईतल्या उद्यानांबद्दल चित्रवर्णनासह लिहीत आहे तर त्या मालिकेत नैसर्गिक आणि भौगोलिकरीत्या सुंदर असलेल्या आमच्या माझगावच्या डोंगराचा नंबर लागायलाच हवा Happy

१) फर्स्ट लूक
वर निळे आकाश, त्याखाली झाडांनी आच्छादलेली टेकडी, पायथ्याशी लहान मुलांचे खेळायचे गार्डन..
लेखाच्या सुरुवातीला आलेले आरोप खोडून टाकायला हे चित्र पुरेसे आहे.

या फोटोत वर जी टेकडी दिसत आहे ती पाण्याची टाकी आहे, आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी जे गार्डन दिसत आहे ते डोंगरावर आहे.
कसे ते आता तिथवर गेल्यावरच समजेल...

01_4.jpg
.

२) चला तर मग डोंगर चढायला सुरुवात करूया. मेन गेट पासून आत जायच्या रस्त्याचा फोटो टिपायचा राहिला. पण हा नागमोडी रस्ता लहानपणापासून फार आवडीचा.

02_4.jpg
.

३) थोडे याच रस्त्याने अजून वर जाऊया...

03_4.jpg
.

४) तसे पटकन पोहोचतो वर. तरी दमले असल्यास या कट्ट्यावर क्षणभर विश्रांती घेऊ शकता. आम्ही दमलो नसलो तरी या दगडी कट्ट्यावर बसायचा मोह आवरत नाही. Happy
एक वेगळाच फिल येतो ईथे. दुपारच्या वेळी कॉलेजकुमारांचे टोळके ईथे बसलेले आढळते.

04_4.jpg
.

५) ईथून बसल्याबसल्या खाली नजर टाकली तर गर्द झाडींमध्ये हरवलेला मेनगेटपासून येणारा रस्ता हा असा दिसतो.

05_4.jpg
.

६) आणि समोर नजर टाकली तर हे असे गार्डन दिसते.
पिसाचा झुकता मनोरा दिसला असेल तर सांगू ईच्छितो की तोच नाही तर जगातली सारी आश्चर्ये ईथे आहेत.

07_4.jpg
.

७) आम्ही सकाळीच गेलो होतो. नुकतेच उजाडत आहे..

06_4.jpg
.

८) चला तर मग थोडा आत फेरफटका मारूया. वॉकला येणारी लोकं कडेकडेने जातात. त्यामुळे मधले गार्डन असे छान शांत आणि रिकामे मिळते.

08_4.jpg
.

९) मुले मात्र सर्वात पहिले स्लाईडस जिथे आहेत तिथेच पळतात. ईथे ओपन जिम सुद्धा असल्याने काही व्यायामपटू ईथे आढळतात.

09_4.jpg
.

१०) सकाळीच सकाळी मुले फारशी नसल्याने स्लाईडसवर मात्र सन्नाटा असतो. असे आरपार दिसते.

10_4.jpg
.

११) त्याचाच फायदा उचलत मग असे बागडत खेळता येते आणि पोज देत फोटोही काढता येतात.

11_4.jpg
.

१२) छे, चुकून राणीबागेचा फोटो या धाग्यावर पडला असे समजू नका. काही जनावरे आमच्या डोंगरावरही आहेत Happy

12_4.jpg
.

१३) त्यांचीही नुकतीच सकाळ झाल्याने पाणवठ्यावर आले आहेत.

13_4.jpg
.

१४) झोका घसरगुंडी खेळून मन भरले की भाऊच्या धक्क्याला जाग येताना बघणे हा आवडीचा उद्योग.

14_4.jpg
.

१५) यांना ईथून काय दिसतेय कल्पना नाही. पण अध्येमध्ये वाढलेली झाडीझुडपे जरा साफ केली जातात. तेव्हा त्या रेलिंगवर बसल्याबसल्या छान नजारा दिसतो.

15_4.jpg
.

१६) आता थोडे ऊन येऊ लागले.

16_4.jpg
.

१७) १८) तसे हिरव्या बगीच्यांचे सौंदर्य खुलू लागले

17_3.jpg
.
18_3.jpg
.

१९) २०) उन्ह कोवळेच असल्याने आम्हीही त्याचा आनंद लुटत फेरफटका मारू लागलो.

19_2.jpg
.
20_3.jpg
.

२१) थोडे वाढले तसे झुडुपांच्या पायवाटेतून चालू लागलो

21_2.jpg
.

२२) परततानाही हा सावलीचा रस्ता धरला.

22_2.jpg
.

२३) २४) चला आता जरा संध्याकाळचा नजारा बघूया...

23_1.jpg
.
24_2.jpg
.

२५) सकाळ असो वा संध्याकाळ, पोरं सोबत असली की पहिली पावले झोका घसरगुंडीच्या दिशेनेच वळवावीत हे शास्त्र असते.

25_1.jpg
.

२६) सकाळच्या मानाने ईथे आता गर्दी होती. पण रविवारची संध्याकाळ असूनही हे चित्र असेल तर तुरळकच म्हणायला हवी.

26_1.jpg
.

२७) २८) पोरांना खेळायला सोडावे आणि आपण आपला एक कट्टा पकडून बसावे.

27_1.jpg
.
28_1.jpg
.

२९) मध्येच फोटो काढायचा मोह झाला तेव्हा तेवढे उठावे

29_1.jpg
.

३०) आता हे आजोबा कोण म्हणता?
तर ते आजोबा नसून अजूबा आहेत..
नाही ओळखले?

30_1.jpg
.

३१) चला तर मग पुढून बघूया..

31_1.jpg
.

३२) याला ओपन थिएटर म्हणू शकता. मधोमध एक स्टेज आणि सभोवताली बसायला स्टेप्स.
आम्ही सकाळच्या वेळी ईथे एक डान्सची रील बनवली होती. बघायला कोणीच नसल्याने लाजायचा प्रश्न नव्हता.

32_1.jpg
.

३३) हे असे रस्ते पुर्ण डोंगराच्या परीघाभोवती पसरले आहेत. कुठलाही पकडा आणि चालायला सुरुवात करा.

33_1.jpg
.

३४) ३५) संध्याकाळच्या वेळी भाऊच्या धक्क्याचा नजारा असा दिसतो. ईथे कितीही वेळा येऊन बसा, फोटो काढायचा मोह आवरत नाही. पण ईथले सौंदर्य फोटोत कधीच सामावत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच मजा आहे.

34_1.jpg
.
35_0.jpg
.

३६) चला आता परतीचा रस्ता धरूया. पण जर या नागमोडी रस्त्याने मन भरले असेल....

36_0.jpg
.

३७) तर मग या झाडीझुडुपात लपलेल्या खुफिया रस्त्याने उतरूया..

37_0.jpg
.

३८) त्याचाही एक अनुभव घेतला असेल तर शेजारीच असे आणखी दोन आहेत.

38_0.jpg
.

३९) आम्ही मात्र आणखी चौथ्या रस्त्याने उतरलो Happy

या वाटांची गंमत म्हणजे हे रस्ते सर्व पब्लिकला ठाऊक नसतात. त्यामुळे ईथे कधीच वर्दळ नसते. मग कुठलीही वेळ असो. त्यामुळे दहावी बारावीला असताना या पायर्‍यांवर पेपर टाकून अभ्यासाला बसणे ही एक आवडीची जागा होती.

39_0.jpg
.

४०) अरे हो, गावदेवीचे दर्शन राहिलेच... चल तर मग.
त्यासाठी मेन गेटने आत शिरल्यावर समोरचा नागमोडी रस्ता न धरता हा डावीक्डचा रस्ता पकडावा लागतो.

40_0.jpg
.

४१) ४२) तोच रस्ता पकडून हळूहळू वर चढूया..
41.jpg
.
42.jpg
.

४३) थोडे आणखी पुढे... जसजसे वर जाऊ तसे डावीकडचे द्रुश्य बघण्यातले मजा वाढत जाते.

43.jpg
.

४४) ईथे हा रस्ता संपल्यावर पुढे जो कॉर्नर दिसतो आहे त्याला सेल्फी पॉईंट म्हणू शकता. कोणी का कोणी ईथे महाबळेश्वरच्या एखाद्या पॉईंटला आल्यासारखे फोटो काढताना आढळतेच.

44.jpg
.

४५) ४६) कारण तिथे उजेड खूप छान असतो आणि बॅक ग्रांऊडला हे असे द्रुश्य दिसते..

45.jpg
.

46.jpg
.

४७) तिथून पुढे हा अखेरचा टप्पा. हा रस्ता तुम्हाला थेट देवीकडे घेऊन जातो.
देवीचा फोटो काढला नाही. कारण ती समोर पसरलेल्या दर्यावर लक्ष ठेवण्यात बिजी असते. तिच्या दर्शनासाठी तुम्हाला तिथेच जावे लागेल.

47.jpg

.......

४८) लेख खरे तर ईथेच संपवायचा होता. पण हा स्पेशल फोटो टाकायचा मोह आवरला नाही.

48.jpg

हा असा डोंगराच्या कडेला सुका पालापाचोळा पसरलेला असतो. थंडीच्या रात्री अभ्यासाला जायचो तेव्हा हाच वापरून कित्येक शेकोट्यांच्या आठवणी रंगल्या आहेत. आणि कैक भूताखेतांचे किस्से आणि अनुभव आले आहेत. त्यांना पुन्हा कधीतरी स्वतंत्र लेखात उजाळा देऊ.
तरी त्या आठवणींवर आधारीत एक कथा पुर्वी ईथे लिहिली होती ती वाचू शकता -
डोंगराला आग लागली - पळा पळा पळा sss (फक्त प्रौढांसाठी)

धन्यवाद,
ऋन्मेष

-------------------

या मालिकेतील ईतर लेख

निसर्ग उद्यान - Hidden Gem of नवी मुंबई (फोटोंसह)

ती, मी आणि मुंबईची खादाडी ! (मरीन ड्राईव्ह) - फोटोसह

प्रियदर्शिनी पार्क - मुंबईच्या समुद्रकिनारी लपलेली एक सुंदर जागा - (फोटोंसह)

हरीश महिंद्रा चिल्ड्रन पार्क - (फोटोसह)

राणीबागेतला पाणघोडा - विडिओसह

अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)

राणीबागेचा राजा - (फोटो आणि विडिओसह)

-------------------

वाचा, प्रतिसाद द्या, आणि धागे वर काढा.
धन्यवाद,
आभारी आहे,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे!
सगळे फोटो, फोटोंचं वर्णनही छान!

या वाटांची गंमत म्हणजे हे रस्ते सर्व पब्लिकला ठाऊक नसतात. त्यामुळे ईथे कधीच वर्दळ नसते. >> असं नाहीये ते. खरतर हे रस्ते पब्लिकसाठी नाहीत ऑफिशियली. आत येताना एक गेट आहे तिथे खरतर पाटी आहे तशी पण कोणी ती वाचत नाही आणि वाचली तरी गांभीर्याने घेत नाही Lol

मस्त आहे जागा.

झब्बू द्यायला हात शिवशिवतायत >>> तुझीच आठवण आली आणि विनार्चची पण.

मस्तच!
फोटो आणि वर्णन आवडलं. तुझ्या कॅमेरातुन दिसणारी मुंबई आणि आमची मुंबई या अगदीच वेगळ्या आहेत Lol
आणखी अशाच जागांचे लेख वाचायला आवडतील. Happy

धन्यवाद सर्वांचे
प्रतिसाद उद्या देतो. फार झोप आली आहे.
फक्त असामी यांना सांगू इच्छितो. शेवटचा फोटो तिथलाच आहे.. इतक्या वर्षांनी आजही शेकोटीसाठी पालापाचोळ्याची सोय आहे Happy

खरतर हे रस्ते पब्लिकसाठी नाहीत ऑफिशियली. आत येताना एक गेट आहे तिथे खरतर पाटी आहे तशी
>>>>>>>>

अच्छा असेल. आम्ही अभ्यासाला येणारी मुले डोंगर सामान्य पब्लिकसाठी बंद झाल्यावरही यायचो ना. त्यामुळे स्वताला स्पेशल समजायचो आणि असे सामान्य लोकांसाठी असलेले बोर्ड वाचायचो नाही Proud

बाकी झब्बू येऊ द्या..
आपलाही भेटायचा योग आला की मी सेल्फी काढून इथे टाकेन आणि धागा वर काढेन Wink

@ अमितव,
हो धन्यवाद. मलाच आता नव्याजुन्या जागा नव्याने एकस्पलोर कराव्या लागतील. मजा येते असे धागे काढायला Happy

फोटो रिसाईज करुन टाकेन इथे. काल ट्राय केले पण साईजमुळे रिजेक्ट झाले. लॉकडाऊनच्या काळातले आहेत काही फोटो. त्यावेळी तर गार्डन आणि तिथली फुले, शांतता, माणसांची गर्दी कंपल्सरी बंद असल्याने पक्षी आणि फुलपाखरांचा वाढलेला वावर हे लॉकडाऊन सुसह्य करणारे मेजर घटक होते. Tiny hopes to tackle gloomy days तसे काहीसे

हा पण लेख छान . नवीन जागां ची माहिती मिळाली. माझ्या लहान पणीचा डोंगर म्हणजे चतुश्रुंगीचा. मामा बहिरट वाडीत राहायचा . तिथे गेले की आईला गप्पा मारायला सोडून आम्ही डोंगर चढून वर जाउन बसायचो. दिवेलागण झाली की खाली उतरायचो. तेव्हा चुली/ स्टोव्ह वर शिजणार्‍या वरण भाताचा एक एकत्रित सुगंध बहिरट वाडीतील घरांच्या वर पसरलेला असे.

आता रोज दिवस रात्र मुलुंडचा डोंगर दिसतो. पण तिथे जाणे झाले नाही. पहाटे उठले की कधी कधी तिथे एकदम लाइट चमकून जातो. काय असेल कोण जाणे. फोनच्या फ्लॅश सारखा चमकून जातो.

आता रोज दिवस रात्र मुलुंडचा डोंगर दिसतो.>> लहानपणी सुट्टीत मामा आम्हा सगळ्या छोट्या मुलांना मुलुंडच्या डोंगरावर घेऊन जायचा. (म्हणजे त्याच्या लेकी आणि आम्ही भाचरं मिळून ८ जणांना) फार छान आठवणी आहेत माझ्या सुट्टी मामा भावंड आणि डोंगराच्या

ऋन्मेष स्क्रीनशॉटची कल्पना आवडेश. असेच करते आता Lol थॅंक्यू

सुंदर फोटो आणि शीर्षके.
सुंदर जागा. सहज जाता येण्यासारखी.

एक राहिलं. या बागेखाली पाण्याची टाकी आहे. तिथे आत जाण्यासाठी जिने आहेत. पाणी खात्याचे लोकच जातात. अगदी उंचावर माजगावचा किल्ला होता. तिथे जाता येत नाही. तो किल्ला कायमचा पाडण्यात आला.
_____________________
मुलुंडचा डोंगर दिसतो. . . . तिथे एकदम लाइट चमकून जातो.

डावीकडच्या उंच डोंगरावर एरफोर्सची ट्रॅकिंग डिश आहे. इकडे कुणालाही जाता येत नाही. उपवन जाणाऱ्या वाटेवर मेन गेट आहे. कुठुनही आत जाणे मनाई आहे. तर वरती लाइट आहे. (मी गेलो आहे. एका एर फोर्स साहेबांची कृपा.)
उजवीकडचा डोंगर 'मामा भानजे' डोंगर आहे, वर दोन दर्गे आहेत. सुंदर जागा. तिकडे जाता येते. जरा पाऊस झाल्यावर जा.

१)
IMG_20230622_124013.jpg

२)
IMG_20230622_124309.jpg

३)
IMG_20230622_124252.jpg

४)
IMG_20230622_124143.jpg

५)
IMG_20230622_124103.jpg

६)
IMG_20230622_124029.jpg

७)
IMG_20230622_125033.jpg

८)
IMG_20230622_124927.jpg

मुलुंडच्या डोंगराबद्दल माहित नव्हते.
उपवन बद्दल एका गर्लफ्रेंडच्या कृपेने माहीत झाले.
पावसाळ्यात ती सुद्धा छान जागा आहे
तरीही आमच्या मिनी सी शोर ची सर नाही..

कविनचे फोटो आवडले. मागच्या महिन्यात मीही काढले होते.

पाच वर्षांपूर्वी विविध पाम्स होते ते आता गायब आहेत. त्यापैकी दोनच होते. फणसाला फणस लागलेले होते.
____________________
मामा - भाँनजे डोंगरावर कसे जावे
ठाणे ते लोकमान्य नगर २३ नंबर बस. शेवटच्या स्टॉपवरून थोडे पुढे मामा भानजे डोंगराची छान वाट सुरू होते. प्रथम पार्किंग - ओढ्यावरचा पूल आहे. वर थोडे गेले की (१५०मि)चहा वडा मोठी टपरी लागते. यापाशीच डावीकडून वागळे आगारकडून येणारी वाट मिळते. मग वर (३५०मि) सपाटी लागते. उजवीकडे प्रसाद( शिरा) देणाऱ्या दर्ग्याच्या घरावरून उंचावर मामा दर्गा. तर डावीकडे भाँनजे दर्गा.
वागळे आगार ते ठाणे बस नं ६.
वागळे आगार ते मुलु़ड बसही आहे.
वागळे आगारच्या पुढे हनुमान नगर- एका मशिदीजवळून वर जाणारी वाट आहे. कॉलेजची मुलं इकडूनच जातात. पण या वाटेवर ओढा नाही.

वेगळा धागा काढत नाही. पण तुमच्या चांगल्या फोटोंच्या धाग्यांत थोडीशी माहिती टाकतो. 😀
मला फिरण्यासाठी यूट्यूबवर विडिओ शोधतो त्यात बरेच ' आम्ही कशी मजा केली' किंवा रटाळ बडबडींचे असतात. फारच थोडे जाण्याची संपूर्ण माहिती देणारे असतात.
१) Arun Shankar. मुंबई ( मामा भांनजे, उपवन, संजय गांधी उद्मान, )
2) Rutvic Ved. मुंबई (सह्याद्री सोपे ट्रेक)
3) Travelling Tadaka. पुणे (घोराडेश्वर डोंगर, तिरुपती )
कुठून सुरुवात, वाहन,प्रवेश वेळा आणि तिकिट इत्यादी सविस्तर माहिती देतात.

मुंबईत मुलांना फिरवण्यासारख्या जागा दुर्मिळ आहेत. अजून सुरेख जागेची ओळख करून दिल्याबद्दल आभार ऋन्मेष.

धन्यवाद माझे मन Happy

शरदजी हो, बडबड जास्त झाली तर ते व्हिडिओ बोअर होतात. बरेचदा रील आणि शॉर्ट व्हिडीओमध्ये थोडक्यात छान माहिती मिळते.

धन्यवाद SRD सजेस्ट केल्याबद्दल। कारण खरंच जर अशी डीटेल्ड माहिती हवी असेल तेव्हा अश्या बडबडीचा त्रास होतो व हाती काहीच लागत नाहि .

Pages