डोंगराला आग लागली - पळा पळा पळा sss (फक्त प्रौढांसाठी)

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 January, 2023 - 14:26

काही गोष्टी लिहिल्या जात नाहीत. काही रहस्ये आपण आपल्यासोबत घेऊनच ईहलोकाचा रस्ता धरतो. बरेचदा झाकली मूठच सव्वा लाखाची असते. पण कधी कधी आपल्या लोकांचा पराकोटीचा आग्रह मोडवत नाही, आणि ती गुपिते उलगडायला भाग पाडतो.

अशीच एक कथा, जी दंतकथा म्हणून आजही दक्षिण मुंबईत प्रसिद्ध आहे. आज मी जो सांगणार आहे, हा तोच मायबोलीप्रसिद्ध किस्सा आहे. जो तुम्ही ईथे तिथे फुटकळ प्रतिसादात ऐकला असेल. किस्सा ए माझगाव-डोंगर जाळण्याचा!.. वाचा आणि विसरा. किंवा कवटाळून बसा. पण या मायबोलीच्या चार भिंतीबाहेर जाऊ देऊ नका.

------------------------------------------------

रात्रीचे पावणेअकरा वाजले होते. एक सिगारेट जळत होती आणि साडेपाच पावले झपझप अंधार्‍या गल्लीतून चालत होती. मध्येच एक कुत्रे भुंकले. गण्याने दगड उचलला आणि त्या दिशेने अंदाजानेच भिरकावला. तसे दुसर्‍या बाजूने अजून दोनचार कुत्रे उठले आणि एकत्र भुंकू लागले. लगोलग बल्लीने एक शिवी हासडली. "ए गण्याss गप बस ना आईघाल्याss.. किती खाज तुझ्या डांगीला.." (हल्ली हा नवीन ट्रेंड आला आहे. गां##डीला असे डायरेक्ट न म्हणता डांगीला म्हणावे. समजणारे समजून जातात आणि आपलेही चारीत्र्य जपले जाते. आपण या कथेत तसेच करूया. मामला संगीन आहे, त्याला असे रंगीन करूया.)

पात्र ओळख - तर ही कथा आहे चार मित्रांची.. गण्या, बल्ली, आत्मा आणि मी..

१) दिड पायांचा गण्या उर्फ गणेश. ज्याला त्याच्या या व्यंगावरून प्रेमाने 'देड फुटीया' अशी हाक मारली जायची. लहानपणीच लकवा मारल्याने तो एका पायाने लंगडत चालायचा. कोणी म्हणायचे त्याच्या आईला गरोदरपणात मद्यपानाचे डोहाळे लागले होते, जे भेलकांडत चालणे याच्या नशिबी आले. तर कोणी म्हणायचे पोलिओ डोस प्रमाणाबाहेर झाल्याने त्याची अशी गत झाली. खरे खोटे देवास ठाऊक. पण आजही स्वतःच्या मुलांना पोलिओ डोस देताना काही कमी जास्त झाले तर काय? या भितीने गण्या आठवतोच.

२) बल्ली - अंगापिंडाने दणकट, वृत्तीने राकट. व्यायामाने कमावलेले शरीर, आणि ते दिसावे म्हणून टाईट फिटींगची जाळीची बनियान घालणारा, आम्हा पोरांच्या टोळीचा दादा, आणि म्हणूनच खेळता येत नसूनही आमच्या क्रिकेट टीमचा कप्तान असलेला बल्ली उर्फ समीर ब़ळीराम ठाकूर!. एखाद्याला प्रेमाने हाक मारायला त्याच्यात व्यंग सापडले नाही तर खुशाल त्याच्या बापाच्या नावावरून हाक मारा. अशीही एक पद्धत होती आमच्यात.

३) आत्मा - त्या रात्री डोंगरावर आमची आधीपासूनच वाट बघत बसलेला आत्मा उर्फ आत्माराम. जो वासरात लंगडी गाय हिशोबाने आमच्यात अभ्यासू होता. आजोबांचे नाव आत्माराम म्हणून याचेही नाव आत्माराम. असे केल्यास आजोबांचाच आत्मा नातवात येतो या समजूतीने ठेवले गेलेले नाव. आता आजोबांच्या नावाने पोराला हाक कशी मारायची म्हणून घरचे सोनू म्हणायचे. पण आम्ही खास मित्र त्याला आत्माच हाक मारायचो. याला चिडवायला वेगळ्या टोपणनावाची गरज नव्हती.

४) आणि चौथा कलाकार मी, ऋन्मेऽऽष - आणि माझे टोपणनाव ...
छे,, ते महत्वाचे नाहीये. त्यापेक्षा आपण त्या रात्री काय झाले याकडे वळूया..

रस्त्यावरच्या कुत्र्यांपासून वाचत मी, गण्या आणि बल्ली डोंगराच्या मेन गेटपाशी पोहोचलो. तिथवर पोहोचायला दोन रस्ते होते. एक रस्ता उजाळलेला अन रहदारीचा पण लाँगकट होता. तर दुसरा अंधारलेला अन सामसूम पण शॉर्टकट होता. तिथून निवांत सिगारेट शिलगावत जाता येते म्हणून बल्ली आम्हाला नेहमी त्या अंधारगल्लीतून न्यायचा. गण्याचे माहीत नाही, पण मला तिथल्या कुत्र्यांची फार भिती वाटायची. तरी ते सांगायचा पर्याय माझ्याकडे नव्हता. नाहीतर बायल्या म्हणून एक टोपणनाव मलाही पडले असते. कारण आमच्याईथले कल्चरच तसे होते. तुमच्या डांगीत किडे असणे गरजेचे, नसल्यास तसा आव तरी आणावा. तरच तुम्हाला चारचौघांत ईज्जत मिळायची. अन्यथा लुटली जायची.

तर आज मेनगेटला शिक्युरटी फुल्ल "टाईट" होती. मामा दोन पेग टाकून तोंडाला मफलर गुंडाळून झोपलेले. जवळच अर्धवट विझलेली शेकोटी पेटलेली. थंडी नुसती बर्फ ओकत होती. टल्ली मोड मध्ये असलेल्या मामांची झोपमोड न करता आम्ही तिथून निघणार होतो. पण शेकोटी बघून आमच्याही हाताला खाज सुटली. क्षणभर थांबून थोडे हातपाय शेकून घेतले. बल्लीने तेवढ्यातही मामांच्या खुर्चीत खोचलेल्या बंडलातून दोन बिड्या काढून घेतल्या. हा शौक कधीपासून नवाब, म्हणून आम्ही त्याकडे चमकून बघू लागलो. त्यावर सिगारेटचा स्टॉक संपला तर तेवढीच रात्रीची सोय म्हणत दात विचकावत तो हसला. शेकोटीच्या उजेडात त्याचे दात तेवढे दिसले.

त्या दोन मिनिटांच्या शेकोटीने शरीराला केवळ ऊब दिली नव्हती तर गर्मीची चटक लावली होती. वर पोहोचताच बल्लीने अजून एक सिगारेट शिलगावली. तर स्टडीरूममध्ये आत्माही अंगाभोवती शाल स्वेटर गुंडाळून, त्यात पुस्तक खोचून बसला होता. ते पाहून गण्या आणि मी एकमेकांच्या हाल्फ स्लीव्ह टीशर्टकडे टकामका बघू लागलो. आज डेरीवेटीव्ह आणि ईंटीग्रेशनशी नाही तर शीतयुद्धाशी लढायचे होते.

हा माझगावचा डोंगर म्हणजे परीसरातील अभ्यासू आणि आमच्यासारख्या अतिअभ्यासू मुलांसाठी वरदान होते. डोंगराची वेळ संध्याकाळी चार ते आठ होती. पण ईतरवेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणून केवळ त्यांनाच प्रवेश दिला जायचा. त्यासाठी खास तंबू उभारले होते. तिथे एक्स्ट्रा बेंच टाकले होते. मुलांना गार्डनमध्ये चादर वा पेपर अंथरून बसायची परवानगी होती. अर्थात बिडीकाडी सिगारेटची व्यसने करायची परवानगी नव्हती. पण पोरं दारूच्या बाटल्याही घेऊन बसायची. वॉचमन मंडळींना याची थोडीफार कल्पना होती. तरी त्याकडे ते कानाडोळा करायचे. एकंदरीत सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांची फुल्ल सोय होती.

ऐय गण्या, काssय थंडी आहे भावाss. आज खंबाच आणायला हवा होता.. असे म्हणत बल्लीने खिश्यातून एक चपटी काढली. तळहातावर ठोकली. बूच उघडले. आणि थंड वार्‍यासोबत तो वास वातावरणात पसरताच मला भडभडून आले. मी तिथून ऊठलो.

गण्या पिणारा नव्हता. पण पिणार्‍यांसोबत ऊठबस केल्यास आपल्यालाही ईज्जत मिळते या गैरसमजूतीचा शिकार होता. मी मात्र ऊठून आत्माकडे गेलो. काय रे आत्म्या, काय आणलेय आज, असे म्हणून त्याच्या पुस्तकात डोकावलो. तर डोळे जागीच खिळले.

आत्म्याss भोssस.... डीच्याss
काय झाले रे रुनम्या? माझी शिवी पुर्ण व्हायच्या आधी गण्या तुरूतुरू धावत आला. त्याला अश्या गोष्टींचा सुगावा पहिले लागतो. आत्म्याकडून धुंद हैदोस नामक एक पिवळे पुस्तक खेचून तो ही एक कोपरा पकडून ऊब घेत बसला. अभ्यासूच नाही तर कामसू मुलांचीही ईथे सोय होती.

मी देखील माझी (अभ्यासाच्या) पुस्तकांची पिशवी उचलली आणि नो एंट्रीचे कुंपण ओलांडून पलीकडे पाण्याच्या टाकीकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, माझ्या आवडीच्या जागी स्थानापन्न झालो. वासरात लंगडी गाय गोगलगाय या नात्याने आमच्यात सदगुणांचा पुतळा मीच होतो. आता साडेबारा वाजेपर्यंत मी तिथून हलणार नव्हतो. त्यानंतर ठिक साडेबारा वाजता आम्ही नेहमीप्रमाणे डोंगराखालच्या थापाच्या गाडीवर चिकन मंनचाऊ सूप प्यायला जाणार होतो. आज तर त्याची फार गरज होती.

ठिक पावणेबारा वाजताच थंडीने आमचे बारा वाजवले. पण थापाच्या गाडीवर साडेबाराआधी जाण्यात काही पॉईंट नव्हता. ती त्याची गाडी बंद करायची वेळ असल्याने तो सूपसोबत उरले सुरले नूडल्स, राईस, चिकन, भाज्या जे हाताला लागेल ते कढाईत टाकून आम्हाला फुकट ते पौष्टिक म्हणत खाऊ घालायचा. पैसे आम्ही टू बाय फोर सूपचेच मोजायचो. त्या बाकड्यावर चिकन मंनचाऊ सूप पिता पिता आणि तो चायनीज रावडाचिवडा खाताखाता ज्या गप्पा रंगायच्या त्याला तोड नसायची. बाहेरून अभ्यासी आणि आतून हैदोसी असलेल्या आत्म्याकडे बिल्डींगच्या पोरापोरींच्या आणि भैय्याभाभींच्या सार्‍या खबरी असायच्या. कुठल्या गॅलरीतून शिट्टी वाजल्यावर कुठली खिडकी उघडते आणि कोणाचा दरवाजा बंद होतो याची त्याकडे बित्तंबातमी असायची. रोजच तो आम्हाला नवनवे अपडेटस पुरवायचा.

पण या मेहफिलीला अजून वेळ होता. साडेबारा वाजायला अजून पाऊण तास शिल्लक होता. तेवढ्या वेळेत माझ्या गारगोट्या झाल्या असत्या. बल्लीची चपटी केव्हाच रिकामी झाली होती. गण्या आणि आत्माचा वाचनाचा किडा वळवळून सुस्तावला होता. हे पाहून मी शेकोटीचा प्रस्ताव मांडला. जर मला कल्पना असती की पुढे जाऊन ईतके मोठे कांड घडणार आहे तर.....

...पण त्या दिवशी आमची शेकोटी पेटायचीच होती.
गण्याने लागलीच प्रस्ताव उचलून धरला आणि तडक काड्या गोळा करायला उठला. ते पाहून मी आणि आत्माही एकेका दिशेला गेलो. बल्ली काही ऊठण्याच्या परीस्थितीत नव्हता. तरी त्याने त्याही अवस्थेत बसल्याजागीच हातपाय पसरवत ईकडचा तिकडचा पालापाचोळा गोळा केला.

'माचिस', असे म्हणत गण्याने बल्लीपुढे हात धरला. बल्लीने आपल्या काखा झटकल्या तसे दोन तीन माचिसचे पुडके जमिनीवर पडले. एकापाठोपाठ एक आम्ही माचिसची काडी पेटवत होतो आणि आजूबाजूचा थंड वारा ती विझवत होता. अर्धे अधिक पुडके संपले पण आम्ही जमा केलेल्या ऐवजातील एकही काटकी पेटली नव्हती. सर्वांनी प्रयत्न करून झाले. अखेरीस बल्लीने चारपाच माचिसच्या काड्यांची एक मोळी केली, आणि पेटवून पायाखाली पडलेल्या पालापाचोळ्याच्या होळीत भिरकाऊन दिली.

आणि काय आश्चर्य..!! बघता बघता पालापाचोळ्याने पेट घेतला. नुसती उष्णताच नाही तर प्रकाशानेही क्षणभरासाठी परीसर उजळून निघाला. पण जितक्या पटकन तो उजळला तितक्याच वेगाने मावळला. जमवलेल्या पालापाचोळ्याची क्षणार्धात राखरांगोळी झाली. पण आमच्या डोळ्यात आता चमक आली. आम्ही भरभर आजूबाजूला तश्या प्रकारची सुकलेली पाने शोधू लागलो. कितीही पाने गोळा केली तरी काही मिनिटांचाच खेळ असणार याची आम्हाला कल्पना होती. तरीही त्या दोनचार मिनिटांच्या उबेसाठी टोपलीभर पाने गोळा करायचे कष्ट मोठ्या आनंदाने उपसायची आमची तयारी होती. चटक रे चटक... महाराजा चटक.

आणि अचानक....
सुरेssखा सुरेssखा .. जणू आपल्यालाच पटलेली आहे म्हणत, आत्मा डोक्यावरचे मफलर फिरवत स्वतःला सौरव गांगुली समजून नाचू लागला.

ए डांssगू उतर खाली, बल्लीने शिवी हासडली.
पडलास तर सिनिअर आत्मारामच्या भेटीला जाशील..

पण आत्मा कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो डोंगराच्या कठड्यावर उभा होता आणि पलीकडच्या उताराकडे अधाश्यासारखा बघत होता. त्याला काय अशी अलिबाबाची मर्जिना सापडली म्हणून आम्हीही धावत तिथवर गेलो. तर पलीकडचे द्रुश्य बघून आमचेही डोळे निवले.

त्या कठड्याच्या पलीकडे, डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत, पेट्रोलच्या किंमतीशी तुलना व्हावी अशी ती सुकलेली पाने पसरली होती. जणू आम्हाला तेलाची विहीरच सापडली होती.

पण प्रश्न असा होता की ते तेल उपसून न्यायचे कसे? म्हणजे ती पाने तिथून गोळा करून आमच्या शेकोटीच्या जागी आणायची कशी? कारण कठड्यापलीकडील उतारावर जाऊन ती गोळा करणे तितके सोपे नव्हते. अंधारात कुठे पाय घसरला तर? कुठून ऊंदीर वा साप निघाला तर?? बर्रं ईतके करूनही काही पाने गोळा करून आणलीच तर ती किती वेळ पुरणार? पुन्हा पुन्हा कठड्यापलीकडे उतरायचा स्टंट कितींदा करणार?

समोर अथांग महासागर पसरला होता आणि आम्ही हातात फुटके डबडे घेऊन बसलो होतो.
आणि याच द्विधा मनस्थितीत आमची अक्कल पेंड खायला गेली. मेंदूला लकवा मारला. त्या ऊबेसाठी आम्ही ईतके आसुसलो होतो की एक अविचारी निर्णय एकमताने घेतला गेला.

कुआँ प्यासे के पास नही आ सकता, तो क्या हुआँ,
अब प्यासा कुएं के पास जायेगा..
असे म्हणत आम्ही ती पाने तिथल्यातिथे जाळायची ठरवली.

पण तो कुआँ तेलाची विहीर होती हे मात्र विसरलो.

पुन्हा एकदा बल्लीने चारपाच माचिसच्या काड्यांची मोळी करून पेटवली, आणि भिरकावताच....

बूssम ! धड्डाक !!
पहिलाच भडका असा उडाला की सारा आसमंत उजाळून निघाला. काळजाचा थरकाप उडाला. पुढच्याच क्षणाला चूक लक्षात आली आणि आम्ही पाण्याच्या नळाकडे धाव घेतली. हाताला मिळेल ती बाटली, वाडगे, करवंटी घेऊन त्यात पाणी भरभरून तिथे ओतू लागलो. पण तो हनुमानाची पेटलेली शेपटी चूळ मारून विझवण्यासारखा हास्यास्पद प्रकार होता. हे आम्हाला दोनचार प्रयत्नांनंतर समजले.

मग थोडावेळ सारे शांतपणे कठड्यावर ऊभे राहून ती आग आता स्वतःहून कधी विझते याची वाट बघत उभे राहिलो. पण जिथवर नजर जाईल तिथवर पालापाचोळा पसरलेला असल्याने ती रसद संपणे शक्य नाही हे लवकरच ध्यानात आले. तसे आमचे धाबे दणाणले. कारण आग उताराच्या ज्या दिशेने वेगाने पसरत होती तिथे काही छोटाली मोठाली गोडाऊन दिसत होती. आता आग तिथवर जाऊ नये याची प्रार्थना करण्याशिवाय आमच्या हातात काही नव्हते.

ईतक्यात गण्याला काहीतरी आठवले आणि तो मटकन खालीच बसला...
आईsss झौलाssss... बल्ली, आत्मा, रुनम्याss... ती गोडाऊन कापसाची आहेत..
बस्स! काळजात धस्स!.. गण्याने असे म्हणताच आमच्याही हातापायातले त्राण गेले.

पण लवकरच भानावर आलो. ही वेळ हार मानून बसायची नव्हती....
तर पळायची होती...
डोंगराला आग लागली, पळा पळा पळा sss

पुस्तके बॅगेत कोंबली, पादत्राणे चढवली, आणि जिथून आलो होतो त्याच रस्त्याने धूम ठोकली. आमच्या सार्‍या पाऊलखुणा मिटवत तिथून पसार झालो.

गेटवरचे मामा अजूनही टल्ली मोड मध्येच होते. बल्लीने शिस्तीत त्यांच्या ढापलेल्या विड्या परत होत्या त्या जागी ठेवल्या. आणि त्यांच्या विझलेल्या शेकोटीला दूरूनच नमस्कार करून लोखंडी गेटचा आवाज होणार नाही याची काळजी घेत आम्ही बाहेर पडलो.

दूरहून थापाच्या कढाईचा आवाज येत होता. डोंगर जळत होते तेव्हा थापा कढाई वाजवत होता. चायनीज बनवत होता. साडेबारा वाजले होते. पण आम्ही त्या दिशेने न जाता विरुद्ध दिशेने वळालो. जिथून ती आग दिसेल अश्या जागी आता आम्हाला जायचे होते. डावीकडे १२० अंशात वळसा घालताच जे दृश्य आमच्या नजरेस पडले ते पाहून आमचे हृदय बंद पडते की काय असे वाटले. आग आमच्या कल्पनेपलीकडे मोठी होती. नुसती जमिनीवरच पसरली नव्हती तर आगीचे लोट आकाशात उठू लागले होते. दक्षिण मुंबईत भीषण आग! गोदाम जळून खाक!! अश्या हेडलाईन आमच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या.

पण त्याही परीस्थितीत एक भान कायम होते. यात कुठलीही जिवितहानी होऊ नये. आपला मुर्खपणा कोणाच्या जीवावर बेतू नये. कोणाचा नाहक बळी जाऊ नये.

तसे आगीपासून कोणाला मुद्दाम सावध करायची गरज नव्हती. मी पेटलेय हे ती स्वतः अंधारात मशाल हाती घेऊन ओरडून सांगत होती.
पण तरी आपलीही आता एक जबाबदारी आहे म्हणत लोकांना सावध करायला आम्ही डोंगराच्या पायथ्याकडे जायचे ठरवले, जिथे आग वेगाने सरकत होती.

आता आम्ही एका मैदानात उभे होतो. समोर डोंगर जळताना दिसत होता आणि वस्तीतील लोकं ती आग कशी लागली असावी याचे तर्कवितर्क लढवत होते. आम्ही बेमालूमपणे त्यांच्यात मिसळून गेलो आणि पुढे काय घडामोडी घडताहेत याची वाट बघू लागलो.

लवकरच आमच्या लक्षात आले की ती परधर्मीयांची वस्ती होती. देव न करो ती आग या दिशेने सरकत आली आणि ईथे कोणाच्या मालमत्तेने नुकसान झाले. तसेच त्या आगीला आम्हीच जबाबदार आहोत हे कोणाला समजले तर..
अरे देवाss आमच्या डोक्यातील विचार आता धार्मिक दंगलीपर्यंत पोहोचले होते. आणि हे सारे काही प्रत्यक्षातही होऊ शकते हे डोळ्यासमोर दिसत होते.

ईतक्यात काही लोकांना आमचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी आम्हाला हटकले. ए उस्मान, देख रे जरा ईन लौंडोको, असे गफूर यांनी म्हणताच आमची तंतरली. ततपप सुरू झाली. सुदैवाने बल्लीला आवाज फुटला आणि त्याला तिथे राहणारा एक भाईजान मित्र आठवला. त्याचे नाव घेत आम्ही तिथून सटकलो. ते थेट घरचा रस्ता धरला. मागाहून फायर ब्रिगेडच्या गाड्यांचा ठणाणणा आवाज कानावर पडत होता. पण आपले त्याच्याशी काही घेणेदेणे नाही म्हणत, एकदाही मागे वळून न बघता आम्ही आपापल्या घरी पोहोचलो.

दुसर्‍या दिवशी आम्हा चौघांनाही सडकून ताप भरला. जो संध्याकाळपर्यंत कायम होता. दिवसभरात कुठलीही वित्त वा जिवीतहानी झाल्याची बातमी कोणाच्याच तोंडून आली नाही तेव्हाच तो उतरला.

दोन दिवसांनी मी आणि बल्ली डोंगराला भेट देऊन आलो. जिथवर नजर जाईल तिथवर डोंगर जळालेला होता. पण दूर कुठेतरी क्षितिजावर एक पायवाट होती तिथे जाऊन आग थांबली होती.

डोंगरावरचा सिक्युरीटी स्टाफ तपासणी करत होता. पण त्या रात्री थंडीच ईतकी होती की आम्हा चार टाळक्यांशिवाय तिथे कोणीच आले नव्हते. ना आम्हाला कोणी आत वा बाहेर जाताना पाहिले होते. तो सीसीटीव्हीचा जमाना नव्हता. त्यामुळे डोंगराचे रहस्य आजवर रहस्यच राहिले.

-----------------------------

त्यानंतर..........

१) पुढे कित्येक दिवस बल्ली ठाकूर स्वतःला बालपणीचा विजय दिनानाथ चौहान समजू लागला होता, ज्याने कांचा चीनाचे पेट्रोलपंप जाळले होते. त्याआधी कधी क्रिकेट मॅचमध्ये समोरच्या टीमशी राडा झाला की तो स्टंप डोक्यात घालायची धमकी द्यायचा. त्यानंतर मात्र स्टंपसह तुमची बॅटही जाळून टाकेल अशी धमकी देऊ लागला. हे काहीतरी भलतेच आहे म्हणत त्याला घाबरणार्‍यांची संख्याही वाढली होती.

२) आत्मा भुमिगत झाला होता. भूमीवरच रेंगाळू लागला होता. पुन्हा कधी डोंगराची पायरी तो चढला नाही. घरीच अभ्यास करू लागला. परीणामी हैदोसच्या पुस्तकांची जागा ईतिहास भुगोलाच्या पुस्तकांनी घेतली. आणि बारावी बोर्डात विक्रमी सदुसष्ट पुर्णाक पंच्याण्णव टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला.

३) गण्याच्या डांगीतले किडे त्यानंतर पुन्हा कधी वळवळलेच नाहीत. आजही तो आपला फेसबूकवरचा प्रोफाईल फोटो तीन वर्षातून एकदाच बदलतो आणि आपली ओळख गुप्त राखतो. कारण आजही शेकोटी म्हटले की त्याच्या अंगाला कापरे भरतात. दारू, सिगारेट आणि जुगाराची व्यसने घर जाळतात, संसार जाळतात, आयुष्ये जाळतात.. पण शेकोटीचे व्यसन अख्खेच्या अख्खे डोंगर जाळतात.. प्यायला बसला की तो असे काहीतरी बरळू लागतो.

४) आणि चौथा कलाकार, मी ऋन्मेऽऽष -,

छे ,.. माझे काय...
मी आपले नातवंडांना सांगायला एक छान स्टोरी मिळाली या आनंदात जगतोय मजेत Happy

तर मंडळी, आपली साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
अब दोबारा मत पूछना Happy

धन्यवाद,
आपलाच...

~ ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद केशवकूल Happy
प्रत्येक लेखाचा वा लिखाणाचा उद्देश वेगळा असतो. त्यांची एकमेकांशी तुलना करू नये. तर प्रत्येक प्रकाराचा आनंद लुटावा. शेवटी प्रत्येक लिखाणाचा मूळ उद्देश एकच असतो. लिहीताना आपल्याला स्वत:ला आनंद मिळणे गरजेचे. कारण तुम्ही प्रत्येकवेळी प्रत्येक वाचकाला खुश करू शकत नाही Happy

मो ठाडावटा कला आ. हेबघूको णको णतेआ यडीउ डतात.

माझ्या शैक्षणिक पात्रतेइतकेच भारदस्त लिखाण पाहून नयनलोचननेत्र निवले.
आज जर आचार्य (अत्रे) असते तर म्हणाले असते... ( भावनाविवशतेने मनगटात आलेल्या आवंढ्यामुळे पुढचे लिहवत नाही)

झंपूजी, ते फुल्यांचे शब्द तुम्ही मुद्दाम उलटे करण्याची गरज नव्हती. Lol
तुमचे कौशल्य वादातीत आहे. Wink

छान लिहिले आहे.
असंसदीय शब्दांऐवजी फुल्या फुल्या टाकल्या असत्या तरी जाणकारांनी आप आपल्या तब्येतीनुसार भरून घेतल्याच असत्या. असो..
बाकी ठरवलं तर थोडा फार मसाला टाकून सिरीज लिहू शकता.

वा, भारीच लिहिलंय .. फायनली डोंगर जाळायचा किस्सा बाहेर आला
ह्यावरून आठवलं की मीही लहानपणी आग लावायचं काम केलंय. नंतर इथेच किस्सा टाकेन

धन्यवाद शैलपुत्री, सामो आणि वीरू Happy

असंसदीय शब्दांऐवजी फुल्या फुल्या टाकल्या असत्या तरी >>>> ह्ममम.. पण त्यात लिखाणाचा आणि वाचनाचा फ्लो जातो असे मला वाटते..
तसेही गरजेच्या होत्या त्या लिहील्या. पण शिव्या हव्यातच म्हणून पटकथेला धक्का लावत ओढून ताणून आणल्या नाहीयेत.

वा, भारीच लिहिलंय .. >>> धन्यवाद म्हाळसा Happy

फायनली डोंगर जाळायचा किस्सा बाहेर आला >>>> हो, आशूचॅंप यांचे विशेष आभार. त्यांनी सतत आग्रह केल्याने अखेर याचे डॉक्युमेंटेशन झाले Happy

ह्यावरून आठवलं की मीही लहानपणी आग लावायचं काम केलंय. नंतर इथेच किस्सा टाकेन >>> वाह, वाट बघतोय किश्याची.. किंबहुना मायबोलीवरील सर्व आगलाव्यांचे स्वागत आहे धाग्यावर Happy

मस्तच जमलीयं कथा..
वीरू सांगताहेत त्याप्रमाणे सिरीज लिहा...
तुमच्या कथेवरून आठवलं, असाच आगलावेपणा काही लहान मुलांनी आमच्या शेताजवळ करून आमची चिकू , खजूरी, केळी आणि सोनमोहोरांची झाडं जाळली होती..

धन्यवाद रुपाली Happy

हे झाडे जाळण्यावरून आठवले, कालच ऑफिसमध्ये लंच टाईमला गप्पांमध्ये विषय चालला होता. झाडांवरील फळेचोरीचा. त्यावर तर वेगळा धागा निघेल. पण जिवंत झाडे जाळणे हे फार क्रूर आहे Sad

नेहमी सारखंच जबरदस्त लिखाण
@एन एस
सारुख आलाय ऑलरेडी तुम्ही तो पायथ्या जवळच्या विशिष्ट वस्तीचा उल्लेख मिस करताय

अरे देवा...
मी कथेचे एक पात्रच शाहरूख आहे या अर्थाने म्हणालो होतो ओ Sad

सामान्य ज्ञान
अ) डोंगराला आग लाग/वणे हे शक्य आहे.
ब) डोंगर जाळणे हे अतिमानवीय काम आहे.

कुणी (ब) हे काम केले असे सांगितले तर त्याच्याकडे इतर लोक आदराने पाहतात. जमिनीवरून डोंगरच्या डोंगर गायब करणाऱ्या बिल्डर / राजकारण्यांना असे लोक हवेहवेसे वाटू शकतात.

(अ) हे काम करणाऱ्यांचा पोलीस / वनप्रशासन / स्थानिक प्रशासन शोध घेते.

मनमोहन धन्यवाद
हो लिहेन कधीतरी.. पण ईतक्या लहान वयात नको Wink

रघू आचार्य, सहमत आहे
डोंगराचे रक्षण करायला वर आई बसली आहे. त्याला नाही होणार कधी काही. ती डोंगराचेच नाही तर समोर पसरलेल्या दर्याचेही रक्षण करते.
माझगावचे घर ताब्यात आले की एकदा तिथे भेट देऊन येईन. काही फोटो काढेन. माहीती जमवेन. आणि त्याचा स्वतंत्र लेख लिहेन.

अरे आशूचॅंप कुठे आहेत ?
त्यांच्याच सततच्या आग्रहाने तर धागा काढायला प्रोत्साहन मिळाले Happy

अरे आशूचॅंप कुठे आहेत ? >> ते नाहीयेत तरी करमत नाही का? हे असे उकसवायचे आणि मग उत्तर दिले की आहेतच राखीव महिला फोर्स ट्रोलिंग केले म्हणून गळे काढायला.
वाचताय ना महिला मंडळ? हे असे ट्रॅप लावले जातात ते अर्थातच यांना दिसत नाहीत.

Pages