नदी आणि विकास

Submitted by नानबा on 4 May, 2023 - 04:35

नदी आणि विकास
~ शिरीष कोठावळे

नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
पायाशी लोळत
नमून विनवी

काँक्रीट ओतशी
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले मरून!

फोडीशी खडक
चोरिशी वाळू ही
कशाचा विचार
नाही तो जराही!

नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
बेभान होऊन
कापिशी झाडे ही

तोंडचा तोबरा
नदीत टाकून
उर्मट माणूस
गर्जला माजून

दुर्बळ! अशीच
ओरड खुशाल
पहात रहा तू
माझी ही कमाल!

पोलादी अशी ही
गाडी मी फिरवेन
काठची सारी ती
झाडी मी तोडीन

तोडीन घरटी
मोडेन काठ मी
ऐकू का कोणाचे?
इथला राजा मी!

हॉर्न अन कर्कश्य
गर्वात फुंकून
पेट्रोल बरेसे
गाडीत टाकून

फिरला काठाशी
काँक्रीट ओतीत
जुमेना कुणाला
विनाश करीत

उद्दाम राजाचे
ऐकून वचन
क्रोधात तापले
मनात जीवन

दुर्बळ? दुर्बळ?
कोण रे बोलला?
कमाल दाखवी
कोण हा? कोणाला?

गर्जत नाचत
आपल्या डौलात
नदी ही शिरली
दारात, घरात!

वहात निघाली
पोलादी गाडी ती
सांगा हो गेली
ताकद कुठे ती?

रडली माणसे
मेली ती माणसे
आपल्या कर्माने
गेली ती माणसे!

प्रलय माजला
भयाण विकास
पुसले शहर
सगळे भकास!

~ शिरीष कोठावळे
५/४/२०२३

प्रेरणा - कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन. हे फक्त सद्यस्थिती साठी केलेले रुपांतर आहे. मुळ प्रतिभा/श्रेय कुसुमाग्रजांचेचे आहे.
जीवनः पाणी, आयुष्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.