भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विष्णुदासांच्या अष्टकांत काही मजेशीर यमके येतात. बहुधा अवल यांनी वरती उदाहरण दिलेली 'युग्मक यमक' असावीत.

एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
----------
मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
----------
तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
-----------
रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना

अशी बरीच उदाहरणे सापडतात.

अवल आणि अनिंद्य - खूप छान माहीती दिलीत.

नववर्षाची सुरुवात एका परिचित शब्दाने….
इस्तरी/ इस्त्री
याचे दोन अर्थ एकदम भिन्न प्रकृतीचे ! त्यांचा उगमही वेगळा.

१. कपडयावरील सुरकुत्या जाऊन त्यास कडकपणा येण्यासाठी त्यावर (ज्यांत विस्तव आहे असे) फिरवावयाचें यंत्र.
( इस्तु = विस्तव + आर-आरी = विस्तव]

२. बायको; बाई ( ‘स्त्री’चा अपभ्रंश)

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%...

'सहस्त्र' हा शब्द बरोबर की 'सहस्र'?
'गाय' ह्या शब्दाचं अनेकवचन 'गाई' की 'गायी'
तसंच 'सवय' आणि 'सवयी' की 'सवई'

बरोबर अस्मिता.
"गाई" हे एकवचनी संबोधन असेल का?

अस्मिता+१.

गाय, सवय यांची सामान्यरूपे मात्र गाई, सवई अशी आहेत.

गाई - परिचित आहे (गाई पाण्यावरि काय म्हणुनि आल्या). सवई वाचल्यासारखं वाटत नाही, पण तुम्ही म्हणताय तर बरोबर असेल. अनेकवचनात ई होत असेल. त्या शब्दाच्या चतुर्थी / षष्ठी एकवचनात पण ई होतो का? सवयीला - सवयीची की सवईला - सवईची? तिथे ई लिहिणं माझ्या सवयीचं नाही. Happy

तसंच आंब्याच्या कोयीचं अनेकवचन कोई होईल का? कोई मिल गयी/गई?

हरचंद पालव, अनेकवचने गायी, सवयी, कोयी अशीच होतील.
मी सामान्यरूपाबद्दल लिहिले आहे.
मराठी शुद्धलेखन प्रदीपात गाई, सोई, सवई, कोई हीच नेमकी उदाहरणे दिली आहेत.

सवयीचा लिहिलं जातं, हे खरं. पण उच्चार काय करतो ? मला तरी सवईचा भाग, सवईचा गुलाम असाच उच्चार केल्याचं / ऐकल्याचं आठवतं.

अच्छा. हा फरक माहीत नव्हता. तसं य र ल व हे वर्ण इ ऋ लृ उ, अनुक्रमे, यांपासून तयार झाले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्याच स्वरांना जोडल्यास उच्चारणे अवघड जात असावे. यी वु वगैरे. स्वतंत्र उच्चार जमतो, पण शब्दात मध्ये वा शेवटी आल्यास ई उ असेच उच्चार ऐकू येतात.

सवई, समजाऊन इत्यादी

कोई मिल गयी/गई? >>> Lol

सवईने दार उघडले. -असं कधीही लिहिल्या जात नाही. सवयीने दार उघडले.
हे सवई 'गवई' सारखं वाटतं. फार मोठे गवई तशा फार वाईट सवई. Happy

'ई' आणि 'यी' हा उच्चार संथपणे केला तरच वेगवेगळा करता येतो.

उत्तम चर्चा !
..
Submitted by कुमार१ on 30 December, 2023 - 12:37 :
>>
मी मागच्या पानावर विचारलेल्या कारा ( “ लग्न न झालेला”) या शब्दाच्या संदर्भात कोणाला माहिती आहे का ?

<तसं य र ल व हे वर्ण इ ऋ लृ उ, अनुक्रमे, यांपासून तयार झाले आहेत > हे माहीत नव्हते. म्हणजे तिथपर्यंत माझी धावच नाही. यासाठीच तुमचे प्रतिसाद मोलाचे आहेत.

धन्यवाद भरत. खालील शब्द (किंवा वर्णसमूह) उच्चारून पहा आणि कोणते व्यंजन ऐकू येते ते पहा - (त्यात पहिला स्वर थोडक्यात उच्चारा; लांबवू नका)
इअ
उअ

मी कविता लिहिली. माझ्याकडून कविता लिहिली गेली.
मी कविता लिहिलया. माझ्याकडून ..... लिहिल्या गेल्या.
मी निबंध लिहिला / लिहिले. ...... लिहिला गेला . लिहिले गेले
मी पत्र लिहिले. ... लिहिले गेले.
मी पत्रे लिहिली. ... लिहिली गेली.

हपा , य आणि व.

भरत, लिहिल्या गेले/ लिहिले गेले सारखीच माझी एक चूक तुम्ही मागे दाखवून दिली आणि वरील प्रमाणेच काही उदाहरण दिले होते, ते तेव्हाही पटले.

काम केल्या गेले नाही, पुस्तक वाचल्या गेले नाही वगैरे माझ्याही बोलण्या लिहिण्यात घट्ट रुजले आहे. निक्षून सुधारायला हवे.

इअ - य
उअ - व

काही हिंदी गाण्यांत शब्दात नसलेला य मला ऐकू येतो. पुढच्या वेळी आठवणीने लक्षात ठेवून इथे लिहेन.

लिहिल्या >> हे बहुधा जुनं मराठी आहे. एक-दोन पिढ्यांआधीच्या लिखाणात अशी भाषा वापरल्याचं बघितलं आहे.

ता. क. ह्यात तुमच्या वयावर कुठलीही टिप्पणी नाही अस्मिता, कृपया नोंद घ्यावी Wink

इ+अ / इ+आ बद्दल

ए/आशिया, ऑलिंपियाड, कोरिया - इत्यादी शब्दांत स्पेलिंग बघावे तर ए/आशिआ, ऑलिंपिआड, कोरिआ (कोमल रिषभ आसावरी - हा राग पण ह्याच लघुनामे ओळखला जातो) असे आहेत. पण इ च्या पुढे आ आल्यामुळे उच्चार या असा होतो आणि आपण देवनागरीत चक्क लिहितानाच या करतो.

{हे बहुधा जुनं मराठी आहे}
मी छापील लेखनात असं कधीही पाहिलं नाही.
आंतरजालावरून गेल्या साताठ वर्षांत फओफआवतआनआ पाहिलं.
वैदर्भीय पद्धत आहे, असं वाचलं.

हर्पा Happy
माझा तर विदर्भाशी संबंधही नाही. (घराबाहेर) मराठी भाषेविषयी फारशी आस्था नसलेल्या लोकांनी शिकवले, प्रमाण मराठी कधीही कानावर पडले नाही, मग देशच सोडून दिला. आता 'मिंग्लिश' मधे विचार केले जातात. एकुणात मी गाभा हरवून बसले आहे. वर कितीही नोंदी केल्या तरी ते लक्षात रहात नाही, लिहिताना पुन्हा चुकीचेच लिहिले जाते. एक ओळ लिहिली तरी ती योग्यच असावी अशी तळमळ स्वस्थ बसू देत नाही, म्हणून या धाग्यावर चर्चेत भाग घेतला जातो. Happy

आता तुम्ही लिहिले जाते हे बरोबर लिहिले. Happy

मायबोलीवरच वाचलं की हे केल्या गेले टाइप दुसर्‍या एक मराठी संकेतस्थळावर एका व्यक्तीने सुरू केलं आणि मग ते पसरलं. इतरांना खटकणारं काही दिसलं की विदर्भात असं असतं असं सांगायची एक पद्धत असावी Light 1 तसं कोणीतरी तेही सांगितलं.

फोनने फोफावतानाचं काय केलं? Uhoh

फोनने फोफावतानाचं काय>>>
मला वाटलं तुमचा काही नियम असेल , आता मी अंध व्याकरण भक्त झाले आहे. Lol

केले दुरुस्त.
'ले'
'ले'
'ले'
'ल्या' नाही. Happy

Pages