ती काळरात्र - भाग १० (अंतिम)

Submitted by तुषार विष्णू खांबल on 5 December, 2022 - 12:32

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

https://www.maayboli.com/node/82708 - भाग ५

https://www.maayboli.com/node/82710 - भाग ६

https://www.maayboli.com/node/82713 - भाग ७

https://www.maayboli.com/node/82716 - भाग ८

https://www.maayboli.com/node/82719 - भाग ९

ती काळरात्र - भाग १० (अंतिम)
शब्दांकन : तुषार खांबल

दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी सर्वांना पुन्हा रुपेशच्या घरी भेटावे असे सांगितले. खरं तर आता कोणाचीच इच्छा नव्हती. रुपेश आणि रेवती दोघांच्या आशा आता पूर्णपणे मिटल्या होत्या. परंतु कोणालाही नाराज करणे हे त्यांच्या तत्वात बसत नसल्याने त्यांनी भेटायला होकार दिला. सकाळी ११:३० वाजता मंगेश त्यांच्या घरी पोहचला. काहीवेळातच पुजारी, हर्षल आणि नितीन हे तिघेही तिथे पोहचले. रात्रभरच्या जागरणाचा त्रास हा सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. घरातील वातावरण पूर्णपणे शांत होते. कोणी काहीच बोलत नव्हते. "आपण काल जे कार्य हातात घेतले होते ते आता झाले आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो." असे पुजाऱ्यांनी सर्वांना सांगितले. त्यावर रुपेशने रेवतीला सांगून पुजाऱ्यांची दक्षिणा आणि हर्षल व नितीनसाठी काढून ठेवलेले पैसे त्यांना देऊ केले. पुजाऱ्यांनी सर्व पैसे स्वतःकडे घेतले. त्यातील प्रत्येकाच्या कामाची निम्मी रक्कम घेऊन बाकीची निम्मी रक्कम रुपेशला परत केली. त्यांच्या अश्या कृतीचा कोणाला काहीही अर्थ लागत नव्हता. कोणी काही विचारणार त्या आधीच पुजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली.

"आपण काल जे कार्य हातात घेतले ते झालेलं आहे असे मी म्हणालो. आपले कार्य पूर्ण झाले असे नाही म्हणालो."

रुपेश - "म्हणजे"

पुजारी - "म्हणजे असे कि, मी तुम्हाला या कामाची १००% हमी दिली होती. त्यातील फक्त ५०% काम पूर्ण झाले आहे. आपण तुमच्या पूर्वज राधाबाई कीर्तिकर यांना याठिकाणी बोलावून आपण त्यांचे म्हणणे ऐकले. त्यांनी रेवतीचे मूल घेतल्याशिवाय शांत होणार नाही असे सांगितले. याचाच अर्थ असा कि तुम्हाला आई-बाप होण्याचे भाग्य हे लाभणार आहे. राहिला प्रश्न तुमचे मूल राधाबाईंना देण्याचा तर त्याच्या उपायासाठी आपण आपले पुढील कार्य करणार आहोत. सर्वपित्री अमावास्येला आपण आपले उर्वरित कार्य पूर्ण करणार आहोत. तरी आता तुम्हाला निश्चिंत राहण्यास काहीही हरकत नाही."
सर्वांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. रुपेश आणि रेवती मध्ये तर पुन्हा नवी उमेद जागी झाली होती. गळून पडलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. काहीवेळापूर्वी शांत असलेल्या वातावरणात पुन्हा नवचैतन्य पसरले. सर्वांचा निरोप घेऊन हर्षल, नितीन आणि पुजारी गावी जाण्यास निघाले. इकडे रुपेश आणि रेवतीला आता सर्वपित्री अमावस्या कधी येते याची घाई लागलेली होती. ती रोज एकएक दिवस कसे काढत होते हे त्यांचे त्यांना माहित. अखेर शेवटी तो दिवस उजाडला.

रेवतीने थोडे दमटावल्यावर रुपेश बेडवरुन उठला. फ्रेश होऊन त्याने देवांची पूजा केली. रेवती जेवणाची तयारी करीत होती. काही वेळाने मंगेश रात्रीच्या पूजेचे सर्व साहित्य घेऊन आला. मागोमाग पुजारी, हर्षल आणि नितीन देखील हजर झाले. दुपारी १२:०० वाजता पुजाऱ्यांनी रुपेशला सर्व पितरांसाठी वाडी (नैवेद्य हा देवासाठी असतो. आणि वाडी हि पितरांसाठी असते) काढण्यास सांगितले. त्यात त्यांनी चार पाने वेगळी काढण्यास सांगितली. जी त्यांना रात्रीच्या कामासाठी लागणार होती. पितरांची वाडी दाखवून झाल्या नंतर सर्वानी जेवणे उरकली. त्यानंतर सर्वजण आराम करण्यासाठी निघून गेले.

संध्याकाळी ५:०० वाजता सर्वजण हॉलमध्ये जमले. काहीवेळाने त्यांना पुन्हा त्या कार्याच्या ठिकाणी जायचे होते. आजचे कार्य उरकल्या नंतर रेवती आणि रुपेशचे स्वप्न साकार होणार होते. जाण्यापूर्वी पुजाऱ्यांना रुपेश आणि रेवतीला सांगितले कि तिथे जे काही होईल ते अंतिम सत्य असेल. त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा आई-वडील बनण्याचा मार्ग हा खूप खडतर आहे; आणि जी परिस्थिती येईल तिला तुम्हाला सामोरे जावेच लागेल. बाकी सर्व काही इकडे सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्याठिकाणी जावे लागेल.

रुपेश आणि रेवतीच्या मनात आता अनेक प्रश्न उभे राहिले ज्यांची उत्तरे त्यांना तिकडे गेल्यावरच मिळणार होती. त्यातही कोणत्याही परिस्थतीत आई-बाप होण्याचे त्याचे स्वप्न हळूहळू पूर्णत्वाकडे सरकत असल्याचा आनंद देखील समाविष्ट होता. सर्वांचीच परिस्थिती जवळपास सारखीच होती. परंतु रात्रीची वाट पाहण्याशिवाय आता काहीही गत्यंतर नव्हते. संध्याकाळचे ८:०० वाजले होते. ९:०० वाजता कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरातून बाहेर पडायचे होते. रात्री १:३० वाजता अमावस्या समाप्ती होणार होती. त्या कालावधीत सर्व कार्य त्यांना उरकायचे होते.

रेवतीने सर्वांची जेवणे वाढायला घेतली. सर्वांनी जेवणे उरकली. ९:०० वाजायला अजून १० मिनिटे बाकी होती. अचानक ढग गडाडू लागले. वीज चमकू लागल्या. सोसाट्याचा वर सुरु झाला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. दोन दिवस पावसाने चांगली विश्रांती घेतली होती. आता अचानक ऐन वेळी असा पाऊस सुरु झाल्याने पुढील कार्य कसे होणार याची चिंता सर्वांना सतावू लागली. पुजाऱ्यांनी रुपेशला गाडी काढायला सांगितले. अश्या परिस्थितीत त्याने गाडी चालवणे त्याला जमणार नव्हते. त्यांनी हर्षलला गाडी चालवण्यास सांगितली. सर्वजण गाडीत बसले. हर्षल अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. काही वेळातच ते कार्याच्या ठिकाणी पोचले.

पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. बरीचशी झाडी उगवली होती. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, घोंगावणारा वारा, आणि त्यात बेडकांचे भेसूर ओरडणे. वातावरण एकदम भयानक वाटत होते. हाताने झाडी बाजूला सारत आम्ही ज्याठिकाणी मृतदेह पुरला होता तिथे पोहचलो. तिथे गेल्यावर पहिले तर फक्त तेवढाच भाग संपूर्ण साफ होता. साधं एक गवताचे पाते देखील तिथे उगवले नव्हते. नितीन गाडीतून पूजेचे साहित्य घेऊन आला. पुजाऱ्यांनी त्या भागात केळीची पाने पसरली. त्यावर तांदळाच्या पिठाचे गोळे ठेवले. ते गोळे जोडून त्यांनी त्याच्या चार बाहुल्या तयार केल्या. पहिल्या दोन ह्या त्या मृत महिलेची आणि तिच्या गर्भाची. आणि दुसऱ्या दोन राधाबाई आणि तिच्या गर्भाची. त्या प्रत्येक बाहुलीसमोर त्यांनी घरातून आणलेली वाडी ठेवली. त्या नंतर त्यांनी पहिल्या दोन बाहुल्या आणि वाडी केळीच्या पाण्यात गुंडाळ्या आणि एका पिशवीत भरून त्या गेटच्या बाहेर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी राधाबाईंच्या बनविलेल्या बाहुलीसमोर रुपेशला हात जोडून उभे केले. त्यानंतर त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या आवाजाचा जोर हा मागील वेळेपेक्षा जास्त भासत होता. मंत्र सुरु असताना त्यांनी रुपेशला काळे तीळ आणि जव त्या बाहुलीवर वाहायला सांगत होते. संपूर्ण मंत्र झाल्यानंतर त्यांनी राधाबाईच्या आत्म्याला हाक दिली. त्याबरोबर समोरच्या झाडीमध्ये एक काळ्यारंगाची मानवी आकृती उमटली. जणू कोणी शेतात बुजगावणे उभे केले असावे. त्याचे डोळे निखाऱ्याप्रमाणे लालबुंद दिसत होते. भीतीने सर्वांची गेलं उडाली. असा प्रकार सर्वजण त्यांच्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. पुजाऱ्यांनी त्या आकृतीसोबत बोलण्यास सुरुवात केली.

"हे बघा राधाबाई, जी चूक घडली त्यात या दोघांचा काहीही दोष नाही. तरी देखील तुम्ही यांना त्रास देत आहात. मागे जेव्हा तुम्हाला विचारलं होत तेव्हा तुम्ही रेवतीच मूळ घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं सांगितलं होत. परंतु ते शक्य नाही आहे."

"तुला हे माहित आहे तर मला परत का बोलावलं???"

"तुम्हाला हेच सांगायला बोलावलं कि रेवतीच मूल तुम्हाला मिळणार नाही. कारण तुम्ही दिलेल्या त्रासामुळे ती कधीही आई होणार नाही."

"नाही हे शक्य नाही, ती आई होणार आणि मी तीच मूल घेणार तेव्हाच माझा आत्मा शांत होईल."

"पण त्यासाठी तुम्हाला त्यांना त्रास देणं बंद करावे लागेल ना."

"ठीक आहे. मी त्रास देणार नाही. पण जेव्हा केव्हा मूल होईल ते घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही."

"आणि मूल घेतल्यावर मग काय परत त्रास देणार का???"

"नाही. त्यानंतर मी तिला त्रास द्यायची गरज राहणार नाही. तीच स्वतःचं मूल गमाविल्याचा त्रास घेऊन जगात राहील. कारण तिला त्यानंतर कधीही मूल होऊ शकत नाही. हा हा हा हा हा........"

"त्याच काय करायचे ते मी बघेन. पण तू आता इकडे कबूल कर कि तुला रेवतीच मूल मिळाल्यानंतर तू त्यांच्या आयुष्यत परत कधीच येणार नाहीस."

"मला काही गरज नाही परत त्यांच्या आयुष्यात यायची. ते स्वतःच्या कर्माचे भोग भोगणार."

"ठीक आहे. मग तू आता वचन दे कि तू रेवतीचे मूल घेतल्यानंतर परत कधीही इकडे फिरकणार नाहीस. आणि मूल होईपर्यंत त्यांना कोणताही त्रास देणार नाहीस."

"ठीक आहे. दिल वचन." असे म्हणून ती आकृती लोप पावली.

पुजाऱ्यांनी उर्वरित विधी उरकून घरी निघण्यास सांगितले. रुपेशने पुजाऱ्यांना त्यांच्या या कृतीचा जाब विचारला तर "आता काहीही उत्तर मिळणार नाही. सकाळी सर्व सविस्तर सांगेन." असे पुजाऱ्यांनी सांगितले. सर्वांना पुजाऱ्यांच्या या कृतीचा राग आला होता. गाडीत कोणीच कोणाशी काही बोलत नव्हते. रेवतीला तर प्रथमच आयुष्यात कोणावर तरी विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होत होता.

सर्वजण घरी पोहचले. पाऊस केव्हाच थांबला होता. सर्वजण फ्रेश होऊन आले. कोणालाही झोपायची इच्छा नव्हती. सर्वजण हॉलमध्ये बसून होते. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. शेवटी पुजाऱ्यांनी सांगितले कि "मी जे केले ते योग्यच केले आहे. फक्त सविस्तर रित्या आता सांगू शकत नाही. कारण हि वेळ अयोग्य आहे. आता तुम्ही सर्वजण झोपा. उद्या याविषयावर बोलू. आणि विश्वास ठेवा, तुमचे काम १००% पूर्ण करेन मी."

दुसऱ्यादिवशी घटस्थापना होती. रुपेश आणि रेवती सकाळीच फ्रेश होऊन बसले होते. पुजारी, हर्षल आणि नितीन देखील फ्रेश होऊन हॉल मध्ये आले. मंगेश येण्यास अवकाश होता. तोवर पुजाऱ्यांनी रुपेशला संपूर्ण देव्हारा फुलांनी सजवायला सांगितला. त्यानंतर देव्हाऱ्यात घटाची स्थापना केली. एक अखंड नंदादीप लावून तो नऊ दिवस तसाच अखंड ठेवण्यास सांगितले. सर्व साग्रसंगीत पूजाअर्चा केली. तोवर मंगेश देखील आला होता. सर्वजण आता हॉलमध्ये बसले होते. सर्वजण पुजाऱ्यांच्या कालच्या कृतीचे उत्तर ऐकण्यास थांबले होते. काहीवेळ शांततेत गेल्यानंतर पुजाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात केली.

"रुपेश आणि रेवती, मला माहित आहे माझ्या कालच्या वागण्याचा तुम्हाला राग आला असेल. परंत सर्वच गोष्टींचा उलगडा करण्याची एक ठराविक वेळ असते. कालचा दिवस हा राधाबाईंचा होता. त्यामुळे त्यांना जे हवे होते ते देण्याचे आपण मान्य केले. परंतु याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला संतती सुख नाही. मी तुमच्या दोघांच्या पत्रिकेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. तुमच्या पत्रिकेत संतती सुख आहे आणि राधाबाईंची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. आता मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. जसे मी मागे सांगितले कि जे घडणार आहे तेच अंतिम सत्य आहे त्यात कोणताही बदल होणार नाही.
रेवती तुला फक्त एकच संधी मिळणार आहे आई होण्याची. त्यातही तुम्हाला जुळी मुले होतील. त्यातले एक हे तुमच्या सोबत राहील आणि एक राधाबाईंच्या सांगण्यानुसार त्या घेऊन जातील. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या बाळाला तुझा पहिला स्पर्श होईल ते तुमचे असेल आणि ज्यावेळी तो स्पर्श होईल त्याच वेळी दुसरे बाळ या जगाचा निरोप घेईल. तू कितीही टाळण्याचा प्रयत्न केलास तरीदेखील हे विधीलिखीत कोणीही टाळू शकत नाही.”

आता मात्र रुपेश आणि रेवतीच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती. आपल्या संतती प्रेमासाठी कोणाचा जीव घेणे हे त्यांना पटत नव्हते. परंतु पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार जे घडणार आहे ते अटळ होते. शेवटी सर्व सल्लामसलत करून आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. "पुढील कार्य हे खूप अडचणींचा सामना करत त्यांना पार पडावे लागणार आहे." असे पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे रुपेशने सर्वांच्या कामाचे पैसे त्यांना देऊ केले आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन त्यांची पाठवणी केली.

त्या दिवसापासून रुपेश आणि रेवतीचे आयुष्य बदलून गेले. आता प्रत्येक गोष्ट ते खूप सावधगिरीने करीत असत. अवघ्या महिन्याभरात रेवती गरोदर असल्याचे त्यांना समजले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रेवतीचे ऑफिसमध्ये येणे कमी झाले होते. रुपेशने नवीन कामे थोडी लांबणीवर ठेवली. जास्तीतजास्त वेळ ते एकमेकांसोबत घालवत होते. रुपेश रेवतीला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होता. रुपेशने ऑफिसची बहुतेक जबाबदारी मंगेशकडे दिली होती. तो देखील इमानदारीने सर्व कामे पाहत होता. प्रत्येक महिन्याला चेकअप करणे, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे औषधोपचार-आहार घेणे सुरू होते. कोणतीही रिस्क त्यांना घायची नव्हती. रुपेशने हर्षलला फोन करून सर्व हकीकत सांगितली. सर्व काही सुरळीत झाल्यावर सर्वजण देवाच्या दर्शनाला येण्याचे आश्वासन देखील त्याने दिले. एका मागून एक महिना सरत होता.

सातव्या महिन्यात रेवतीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घराजवळीच एका हॉल मध्ये सर्व मंडळी जमली होती. रेवतीच्या आवडीचे सर्व पदार्थ समोर मांडले होते. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये रेवती स्टेजवर बसली होती. मोठी चंद्रकोर, झोपला, होडी अश्या विविध साहित्याची व्यवस्था फोटोग्राफर करीत होता. कार्यक्रमाची रंगत वाढत होती. मंगेशने स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व व्यवस्था केली होती. पाहुणे मंडळी येऊन रुपेश आणि रेवतीला आशीर्वाद देत होते. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असले तरी मनात मात्र पुजाऱ्यांनी सांगितलेलं बोल घोळत होते. हळूहळू सर्व मंडळी कमी होत गेली. शेवटी हे तिघेच उरले होते. रुपेश आणि मंगेशने आलेल्या भेटवस्तू गाडीत ठेवल्या. आणि सर्व घरी निघाले.

दुसऱ्या दिवशी रेवतीला थंडी अस्वस्थ जाणवत होते. कदाचित कालच्या दगदगीमुळे झाले असावे असा दोघांनी अंदाज बांधला. काही वेळ आराम केला तरी फरक पदं नव्हतं म्हणून दोघे डॉक्टरकडे आले. तपासणी केल्यावर बाळांच्या हृदयाचे ठोके कमी दाबाने चालत असल्याचे डॉटरांनी सांगितले. लगेच प्रसूती करावी असा सल्ला त्यांनी रुपेशला दिला. दोघांना कोणतीही रिस्क घ्यायची इच्छा नव्हती. रुपेशने डॉक्टरांना प्रसूती प्रक्रिया करण्यास सांगितले. काही वेळातच रेवतीने दोन गोंडस बाळांना जन्म दिला. अकाली प्रसूती झाल्याने दोन्ही बाळांना आईपासून वेगळे ठेवण्यात आले होते. रेवतीला देखील त्रास जाणवत होता. तिला देखील ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. तब्बल चार दिवसांनंतर रेवतीला एका प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. अजूनही रेवतीला तिच्या बाळांना पाहता आले नव्हते.

एव्हाना रात्रीचे ९:०० वाजले होते. रुपेशने त्या रूममधील टीव्ही सुरु केला आणि चॅनेल बदलू लागला. इतक्यात एक नर्स दोघांपैकी एका बाळाला घेऊन आली. बाळ खूप रडत होते. त्याला भूक लागली असावी. म्हणून तिने बाळाला रेवतीकडे घेऊन आली होती. तिने रेवतीला बाळाला दूध पाजण्यास सांगितले. बाळाचा आक्रोश पाहून रेवतीने लगेच त्याला आपल्या जवळ घेतले आणि दूध पाजू लागली. रुपेश देखील चॅनेल बदलायचे थांबला होता. टीव्ही वर बातम्यांचे चॅनेल लागले होते ज्यावर जाहिराती सुरु होत्या. जाहिराती संपल्यानंतर वृत्तनिवेदकाने दिवसातील ठळक बातम्या सांगितल्या आणि चालू घडीच्या मुख्य बातमी कडे वळला. "आता आपण थेट पाहणार आहोत आजच्या चंद्रग्रहणाची लाईव्ह दृशे फक्त आमच्या वाहिनीवर."

बातमी ऐकताच रुपेश आणि रेवतीला पुजाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली. रेवतीजवळील बाळ शांतपणे दूध पीत होते. रुपेशने धावत बाहेर जाऊन नर्सकडे दुसऱ्या बाळाबद्दल विचारले. त्याच्या सांगण्यानुसार नर्सने त्याला NICU वॉर्डकडे घेऊन गेली. काचेच्या पेटीत बाळचे शरीर थंड पडले होते. कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. नर्सने तातडीने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टारांनी बाळाचा श्वास बंद झाल्याचे सांगितले. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार राधाबाईंचा बदला पूर्ण झाला होता. रुपेशने मंगेशला बोलावून घेतेले. आल्यावर मंगेशने गावी फोन करून हर्षलला सर्व हकीकत सांगितली. आणि पुजाऱ्यांना पुढील विधीसाठी विचारण्यास सांगितले. काहीवेळातच पुजाऱ्यांनी मंगेशला त्या बाळाचा मृतदेह पुन्हा त्याठिकाणी नेऊन पुरण्यास सांगितला जिथे त्यांनी राधाबाईंच्या आत्म्याची शांती केली होती.

थरथरत्या हातांनी रुपेशने तो निरागस बाळाचा मृतदेह आपल्या हातात घेतला. मंगेश आणि तो दोघे हॉस्पिटलमधून बाहेर पडले. काही वेळातच दोघे त्याठिकाणी पोहचले. बाळाचा मृतदेह बाजूला ठेवून त्यांनी एक खड्डा खणला. बाळाचा मृतदेह खड्यात ठेवण्यासाठी उचलताच वातावरण बदलू लागले. सोसाट्याचा वारा सुटला. पौर्णिमा असून ग्रहणामुळे चंद्र पूर्ण झाकला गेला होता. बाळाचा देह आत ठेवून दोघांनी तो खड्डा बुझवला. जसे ते निघण्यासाठी मागे वळले तसा रुपेशच्या अश्रूंचा बांध फुटला. तिथेच बसून तो ओक्सबोक्शी रडू लागला. एका बाळाची आनंदाची रात्र आज दुसऱ्या बाळासाठी 'काळरात्र' ठरली होती.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमली आहे गोष्ट.

अगदी भन्नाट वळण टाकले आहे शेवटी. मला अजिबात अपेक्षित नव्हते असे काही तरी. फुलवली पण चांगली आहे.

पुलेशु Happy

लिखाणाची शैली आणि वेग / नियमितता आवडली. कथा फार फाफट पसारा न होऊ देता मोजक्या पात्रांसह मुद्देसुदपणे फुलवत योग्य वळणावार संपवली ह्याचे विशेष कौतुक. पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा.
______________________________

९भाग झाल्यावर अंतिम भागासाठी बराच वेळ घेतला त्यामागे काही वैयक्तिक कारण असल्यास उत्तर अपेक्षित नाही. पण ह्या काळामागे शेवट नक्की कसा असायला हवा ह्याविषयी जे काही आडाखे मनात विचारातीत होते ते सर्व कथाशेवट लेखकाची इच्छा असल्यास इथे वाचायला नक्कीच आवडतील.

बापरे..भयंकर.
भयाबरोबरच बीभत्स/करुण रस चांगला निर्माण केलात. अजून लिहीत जा.

छान शब्दात मांडलेली कथा. शेवट अनपेक्षित पण तसा सुखद म्हणायला हवा...!!

हाताने झाडी बाजूला सारत आम्ही ज्याठिकाणी मृतदेह पुरला होता तिथे पोहचलो.
आम्ही पोहोचलो म्हणजे? तुम्ही पण त्यात सामिल होता का? (हलकेच घ्या.)

अनपेक्षित शेवट.
कथा छान फुलवली आणि योग्य वेळी संपवली आहे. सारे वर्णन अगदी चित्रदर्शी आहे.

शेवटच्या भाग उशीरा येण्याचे कारण म्हणजे कामातून मिळत असलेला अपुरा वेळ. त्यातही अर्धवट भाग टाकून वाचकांचा जास्त अंत पाहणे मनाला पटत नव्हते.