ती काळरात्र - भाग ५

Submitted by तुषार विष्णू खांबल on 22 November, 2022 - 14:26

ती काळरात्र - भाग ५
शब्दांकन : तुषार खांबल

आता पुजाऱ्याने दोघांना फ्रेश होऊन येण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने पूजेच्या सर्व साहित्याची मांडणी केली. देवाच्या मूर्तीच्या समोर जवळपास २०-२५ पानाचे विडे मांडले होते. मध्यभागी एक मातीचा दिवा लावला होता. देवाच्या पायाजवळ धूप दरवळत होता. देवाच्या गळ्यातील सर्व हार फुले काढली होती. फक्त उजव्या आणि डाव्या खांद्यावर एक-एक पांढरे फुल ठेवले होते. देवाला एक सोन्याचा मुखवटा चढविण्यात आला होता ज्यात फक्त लाल रंगाच्या माणिक रत्नांचे डोळे होते. रुपेश आणि रेवती फ्रेश होऊन आले तसे पुजाऱ्याने त्यांना सतरंजी घालून त्यावर बसण्यास सांगितले. बसल्यावर त्याने आपण आता काय करणार आहोत याही माहिती देण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी त्याने हर्षल आणि नितीनला काही वेळ बाहेर थांबण्यास सांगितले.

"रुपेश आणि रेवती, तुम्ही या ठिकाणी एका ओढीने आणि तुमच्या आयुष्यातील समस्यचे निवारण करण्यासाठी आला आहात. मी सांगितल्यावर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या माता-पितांचे आणि कुलदेवतेचे स्मरण करून मनातल्या मनात आपली समस्या देवासमोर मांडायची. त्यानंतर तुमच्या समोर एक श्रीफळ ठेवले आहे त्यावर त्याच्या बाजूला ठेवलेल्या ताटातील एक-एक फूल वाहायचे. जोपर्यंत देवाचा कौल मिळत नाही तोपर्यंत हे करायचे. एकदा का कौल मिळाला तर त्यानुसार मी पुढील गोष्टी तुम्हाला सांगेन. जर का होकारार्थी म्हणजे उजवा कौल मिळाला तरच पुढील सर्व गोष्टी होतील. अन्यथा तुम्हाला फक्त तुमची अशी परिस्थिती का आहे याचे उत्तर मिळेल. आता आपले हात जोडा आणि देवाच्या चेहऱ्याकडे पहा. कोणतीही भीती मनात बाळगू नका. आता आपण पूजाविधीला सुरुवात करीत आहोत." यावर दोघांनी होकारार्थी मान हलविली.

पुजाऱ्याने हर्षलला देवळातील सर्व लाईट बंद करण्यास सांगितले. त्याबरोबर देवळात सर्वत्र अंधार पसरला. मातीच्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात मूर्तीचे रूप आता वेगळेच वाटत होते. त्यात समोर धुपारती मधून निघणाऱ्या धुराने ती मूर्ती जिवंत वाटत होती. पुजाऱ्याने काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या भारदस्त आवाजाने संपूर्ण गाभारा गजबजून गेला होता. मंत्र म्हणत असतानाच त्याने खुणेने फुले श्रीफळावर वाहण्यास सांगितले. तसे दोघांनी फुले वाहण्यास सुरुवात केली. १०-१५ फुले वाहून झाल्यावर पुजाऱ्याने त्यांना थांबण्यास सांगितले. आता पुजाऱ्याने देवाला गाऱ्हाणे घालण्यास सुरुवात केली. रुपेश आणि रेवती हात जोडून स्तब्धपणे सर्व बघत होते. त्यांना आपल्या ह्या परिस्थितीचे कारण जाणून घ्यायची घाई झाली होती. देवाचा कौल सकारात्मक यावा अशी मनोमन दोघेही प्रार्थना करत होते.

गाऱ्हाणे घालत असताना पुजारी आपल्या हातातील तांदूळ त्या श्रीफळावर टाकत होते. आणि देवाला योग्य तो कौल देण्यास विनवणी करत होते. ५-६ असे केल्यानंतर देवाच्या उजव्या खांद्यावरील फुल खाली पडले. सकारात्मक कौल मिळाला होता. दोघांनाही मनापासून आनंद झाला. दोघांचेही डोळे पाणावले. आई-बाप होण्याच्या सुखापेक्षा आता त्यांना काहीही दिसत नव्हते. पुजाऱ्याने हर्षल आणि नितीनला आता आत येण्यास सांगितले. हर्षलने घंटी वाजवली तसे रुपेश आणि रेवती भानावर आले. पुजाऱ्याने त्यांना आता हर्षल आणि नितीन सोबत देवळात थांबण्यास सांगितले आणि देवाच्या समोरील पूजेचे सर्व साहित्य जमा केले. हर्षलने देवळातील लाईट चालू केला होता. सर्व आवरून झाल्यावर बाहेर सतरंजी टाकून पुजाऱ्याने त्यांना सदेव गोष्टी सांगण्यास सुरुवात केली.

"रुपेश आणि रेवती, जसे मी मघाशी तुम्हाला सांगितले कि इकडे तुम्ही पिकनिकसाठी येणे हे फक्त एक निमित्त होते. जगात कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी होत नाही. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या या समस्येचं कारण समजून घेण्याची. मी जे सांगेन यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हेच त्रिवार सत्य आहे."

"रुपेश हा त्रास तुम्हाला तुमच्या सात पिढ्या अगोदर झालेल्या घटनेचा आहे. तुमच्या पूर्वजांनी तेव्हा २ लग्ने केली होती. पहिली पत्नी गर्भवती असताना त्यांनी दुसरे लग्न केले. आलेल्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला छळण्यास सुरुवात केली. त्याचाच धसका तिने घेतला आणि स्वतःचे आयुष्य संपविले. तिने स्वतःचे आयुष्य संपवले खरे; परंतु तिच्या सोबतच तिच्या पोटातील बाळाचेही आयुष्य तेव्हा संपले होते. आता तुमची वंशावळ हि त्या दुसऱ्या पत्नीपासून सुरु झालेली आहे. आणि त्या निरपराध बाळाच्या मृत्यची शिक्षा तुम्ही भोगत आहात.”

रुपेश आणि रेवतीला खरंच हे सर्व कल्पनेपलीकडलं होत. यावर विश्वास ठेवावा कि नाही हा यक्षप्रश्न त्यांच्या मनात उभा होता. त्यांच्या मनातील संभ्रम त्यांच्या चेहयावर स्पष्ट जाणवत होता. अशीच काहीशी अवस्था हर्षल आणि नितीनची देखील होती. पुजाऱ्याने सर्वांचे चेहरे पाहून त्यांना रुपेशच्या सर्व वंशावळीची नावासहित माहिती दिली. सर्वजण स्तब्ध होऊन हे सर्व ऐकत होते. विश्वास बसत नसला तरी पुजाऱ्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मात्र खरी होती. त्यामुळे विश्वास ठेवण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.

शेवटी रुपेशने त्यांना यावर काय उपाय आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल हे विचारले. त्यावर पुजारी म्हणाले, "देवाने कौल दिल्याप्रमाणे तुम्हाला संतती प्राप्ती होणार हे निश्चित आहे. परंतु यावरचा उपाय मात्र अतिशय कठीण आहे. तुमच्या पूर्वजांच्या चुकीची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. हि पूजा सुरु करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे कि एकदा का तुम्ही या पूजेसाठी होकार दिला तर त्यातून तुम्हाला माघार घेता येणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे कार्य संपन्न करावेच लागेल."

रेवतीला आणि रुपेशला कोणत्याही परिस्थितीत संततीप्राप्ती हवी होती. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होते. खरं तर पुण्याला परत गेल्यावर एखादं मूल दत्तक घेण्याचा त्यांचा विचार होता. परंतु आता पुजाऱ्याच्या सांगण्यावरुन रेवतीच्या आतील मातृत्वाची भावना उफाळून आली होती. रुपेशची देखील परिस्थिती काहीशी सारखीच होती. दोघांनीही एकसुरात "आम्ही हे कार्य पूर्ण करण्यास तयार आहोत" असे पुजाऱ्यांना सांगितले. आणि आता पुढे पुजारी काय सांगतात याकडे लक्ष लावून बसले.

Group content visibility: 
Use group defaults

तुषार
पुढच्या मागच्या लिंक देत चला. मी स्वतः ह्या बाबतीत आळशी आहे.पण तुम्ही तसे होऊ नका.

धन्यवाद केशवकुल
धन्यवाद शैलपुत्री
धन्यवाद वावे