ती काळरात्र - भाग ३

Submitted by तुषार विष्णू खांबल on 20 November, 2022 - 10:36

https://www.maayboli.com/node/82689#comment-4861925

ती काळरात्र - भाग ३
शब्दांकन : तुषार खांबल

पहाटे रुपेशला लवकर जाग आली. त्याने बाहेर पाहिलं तर अजून अंधारच होता. पक्षी हळूहळू किलबिलाट करत आपल्या घरट्याबाहेर पडत होते. त्याने रूममधील डिमलाईट चालू केला. रेवती अजूनही झोपेतच होती. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावरील चादर बाजूला केली. रूममधील मंद प्रकाशात तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याने बाजूला केली. हळुवारपणे तिच्या गालावरून हात फिरवला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली. तिने अलगदपणे तिचे डोळे उघडले. तो तिच्या बाजूलाच पहुडला होता. ती लगेच त्याच्या मिठीत विसावली. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकविले. हळूहळू त्यांचा प्रणय रंगात येत होता. आज बऱ्याच दिवसांनंतर त्यांना असा निवांत वेळ मिळाला होता त्यामुळे त्यांनी मनसोक्त सहवासाचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते.

त्यानंतर फ्रेश होऊन दोघेही बरोबर ९:०० वाजता हॉटेलच्या डायनिंग रूम मध्ये आले. समोर विविध प्रकाराच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. हर्षल देखील एव्हाना पोहचला होता. त्यांनी हर्षलला आपल्यासोबत नाश्ता करण्यास सांगितले. परंतु घरूनच न्याहारी करून आला असल्याने त्याने नकार दिला. यावर त्या दोघांनी दुपारी आपल्या सोबत जेवण्याचे आणि तसा आपला आदेशच असल्याचे त्याला सांगितले. चहा-नाश्ता झाल्यावर त्यांनी गाडीकडे आपला मोर्चा वळवला. आज हर्षल त्यांना मालवण किल्ला, आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर फिरवणार होता. तो ज्या-ज्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचा तिथली माहिती तो त्यांना देत असे. त्याच्या या सेवेवर दोघेही खुश होते.

दुपारी हर्षल त्यांना त्याच्या ओळखीच्या मालवणी हॉटेलमध्ये जेवण्यास घेऊन गेला. त्या दोघांनी त्याला तिथल्या प्रसिद्ध असलेल्या खास मालवणी पद्धतीत बनविलेल्या जेवणाची ऑर्डर देण्यास सांगितले. हर्षलच्या ओळखीत असल्याने हॉटेल मालकाने देखील त्यांचा उत्तमरीत्या पाहुणचार केला. विविध प्रकारचे मासे, तांदळाची भाकरी, मऊमऊ भात आणि सोलकढी...... अश्या स्वादिष्ट भोजनावर त्यांनी येथेच्छ ताव मारला. जेवणे उरकल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. एक-एक ठिकाण पाहता पाहता संध्याकाळ होत आली होती. मालवणच्या किनाऱ्यावर आता बोटी लागत होत्या. काही अंतरावरच मच्छीचा लिलाव सुरु होता. एकंदरीतच यापूर्वी पाहिलेले कोकण आणि आता पाहिलेले कोकण यात त्यांना बराच फरक जाणवत होता.

आजचा प्रवास संपवून ते पुन्हा आपल्या हॉटलकडे येण्यास परतले. हर्षलने उद्यासाठी त्यांना स्कुबा आणि वॉटर स्पोर्ट्सची बुकिंग करून दिली. आजचे बरेच आनंदाचे क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. दोघांना हॉटेलवर सोडून हर्षल आपल्या घरी जाण्यास निघाला. रेवतीने त्याला उद्या सकाळी नाश्ता आणि दुपारचे जेवण त्यांच्या सोबतच करण्यास सांगितले. त्याने देखील त्यांचा ते निमंत्रण आनंदाने काबुल केले. निघता-निघता रुपेशने त्याच्या हातावर काही पैसे ठेवले. हर्षल नको नको म्हणत होता तरी त्याने बळजबरीने त्याच्या हातात ते कोंबले. हर्षल आनंदाने घरी निघून गेला. त्याच्या या संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच त्याला इतके चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. त्यामुळे तो खूप आनंदी होता.

तिसरा दिवस उजाडला. रुपेश आणि रेवती दोघेही या दिवसांचा मनसोक्त आनंद घेत होते. यानंतर असा आनंद कधी घेता येईल याची काही त्या दोघांनाही खात्री नव्हती. बरोब्बर ८:३० वाजता हर्षलचा कॉल आला. आज तो लवकरच हॉटेलला पोहचला होता. रुपेश आणि रेवती आता आपल्या डायनिंग हॉल मध्ये आले. हर्षलदेखील सोबतच होता. तिघांनी एकत्र चहा नाश्ता केला. हर्षल आज खूप आनंदी आणि उत्साही दिसत होता. तसेच सर्व कामे तो आज घाईघाईत करत होता. त्याच्या एकंदरीत देहबोलीवरुन त्याला कुठेतरी जाण्याची घाई असावी असे दिसत होते. चहा-नाश्ता आटोपल्यावर तिघेही गाडीकडे निघाले. सकाळीच लवकर पोहचल्यावर त्यांना मनसोक्त स्कुबा आणि वॉटर स्पोर्ट्स करता येणार होते. गाडीत बसल्यावर रुपेशने हर्षलला त्याच्या आजच्या घाईचे कारण विचारले.

आज त्रिपुरारी पौर्णिमा होती. हर्षलच्या गावामागील टेकडीवर असलेल्या पुरातन मंदिरात आज देवाचा उत्सव होता. काहीही करून त्याला या उत्सवासाठी जायचे होते. याकरिता तो आज थोडासा घाई करत होता. रुपेश आणि रेवतीने हा उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कोकणातील उत्सवांबद्दल ऐकले होते. परंतु आज त्यांना प्रत्यक्षात हा उत्सव पाहता येणार होता. त्यांनी असे म्हटल्यावर हर्षलचा आनंद व्दिगुणीत झाला. त्याने संपूर्ण प्रवासात त्या उत्सवाची साधारण कल्पना त्यांना दिली. यामुळे दोघांचीही उत्सुकता आता वाढली होती. उत्सव संपूर्ण रात्रभर चालणार असल्याने त्यांनी लवकर हॉटेलवर जाणे पसंत केले. तसेच संध्याकाळी हर्षलला त्यांना घेऊन जाण्यासाठी येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे हर्षल ठीक ६:३० वाजता हॉटेलवर पोहचला. रुपेश आणि रेवती त्याची वाटच पाहत होते. तो आल्यावर तिघेही देवाच्या उत्सवासाठी निघाले. मंदिरामध्ये महाप्रसादाची व्यवस्था असल्याने रात्रीच्या जेवणाचा प्रश्न नव्हता. जाताजाता वाटेतच हर्षलच घर होते. हर्षलने त्यांना घरी येण्याची विनंती केली. त्यांनी देखील आनंदाने त्याच्या घरी जाण्याची तयारी दर्शवली. हर्षल आणि त्याच्या कुटुंबाने त्यांचा उत्तम पाहुणचार केला. हर्षलच्या आईने निघताना रेवतीची ओटी भरली. आपल्या श्रीमंतीचा कोणताही दिखावा न करता अत्यंत साधी राहणीमान असणाऱ्या दोघीनींही सर्वांच्या मनात घर केले. "जाण्यापूर्वी घरी नक्की जेवायला येऊ" असे आश्वासन देऊन ते सर्व उत्सवाकरिता निघाले.

देऊळ थोडे डोंगराळ भागात असल्याने गाडी तिथपर्यंत नेणे शक्य नव्हते. त्यामळे पुढील काही अंतर हे त्यांना पायी चालत जावे लागणार होते. हर्षलने त्यांना आधीच याची कल्पना दिली होती. याशिवाय थंडीचा मोसम असल्याने अंधार देखील लवकर पडला होता. त्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरु केल्या. हर्षलच्या सोबतीला आता गावातील काही उत्साही मुले देखील होती. ते सर्व व्यवस्थितरित्या दोघांना मार्ग दाखवत होते. हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच रोमांचकारी होता. एखाद्या जंगल सफारी प्रमाणे मार्गक्रमण करीत ते देवळापाशी पोहचले.

Group content visibility: 
Use group defaults