ती काळरात्र - भाग ७

Submitted by तुषार विष्णू खांबल on 24 November, 2022 - 05:17

ती काळरात्र - भाग ७
शब्दांकन : तुषार खांबल

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

https://www.maayboli.com/node/82708 - भाग ५

https://www.maayboli.com/node/82710 - भाग ६

आज रुपेश आणि रेवतीला उशिरा जाग आली. पहाटे कधी त्यांचा डोळा लागला हे त्यांनाच माहित नव्हते. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे ११:०० वाजले होते. हर्षलचे १०-१२ मिसकॉल येऊन गेले होते. दोघेही आज शांतच होते. रेवती उठून फ्रेश व्हायला गेली. इकडे रुपेशने चहा आणि नाश्ता रुममध्येच मागवला. अजून दोन दिवसांची ट्रिप त्यांची शिल्लक होती. पण आता कुठेही जायची त्यांची इच्छा होत नव्हती. रुपेशने हर्षलला कॉल केला आणि तसे कळविले. परंतु हर्षल आधीच त्यांच्या हॉटेलवर येऊन बसला होता. त्याला काल झालेल्या विषयावर त्यांच्याशी बोलायचे होते. तसे त्याने रुपेशला सांगितले. रुपेशने दुपारी २ वाजेपर्यंत येण्यास सांगितले. तसे तो निघून गेला.

दुपारी २:३०-३:०० च्या दरम्यान रुपेशचा फोन वाजला. हर्षलचा कॉल होता. रुपेश आणि रेवतीची जेवणे उरकली होती. त्यांनी हर्षलला जेवणाबद्दल विचारले तर तो जेवून आल्याचे त्याने सांगितले. त्याने हर्षलला रूमवर येण्यास सांगितले. हर्षल रूमवर आल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.

"सर, काल मी तुमची मदत करायला तयार झालो खरा, परंतु काय करायचं आणि कसं करायचं याबाबत मला काहीच कल्पना नाहीय. रात्रभर हाच विचार करत मी बसलो होतो. मला काहीच मार्ग सापडत नव्हता. म्हणून मी सकाळी तुमच्याकडे आलो होतो. प्लिज मला समजावून सांगा."

"खरं तर आम्ही दोघे तुलाच याबद्दल विचारणार होतो. परंतु तुझ्याकडे देखील काही मार्ग नाही म्हटल्यावर आता फक्त एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकतात. ते म्हणजे मंदिरातील पुजारी. आपण आताच त्यांची भेट घेऊया. उगाच उशीर नको." रुपेशने उत्तर दिले.

हर्षल आणि रेवतीला देखील ते योग्य वाटले. लागलीच ते देवळाकडे जाण्यास निघाले. काही वेळातच ते देवळात पोहचले. आरतीला अजून अवकाश असल्याने देवळात पुजाऱ्यां व्यतिरिक्त कोणी नव्हते. या सर्वांना आलेले पाहून पूर्वजारी बाहेर आले. आणि आता या वेळेला येण्याचे कारण विचारले. हर्षलने सर्व हकीकत त्यांना सांगितली. पुजाऱ्याने सर्व ऐकून घेऊन पुन्हा त्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर या सर्व कार्यात ३-४ प्रकारच्या विधी असतील. याकरिता त्यांना स्वतःला पुण्याला यावे लागेल. त्यानुसार एक वर्षात सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत याची देखील जाणीव करून दिली.

हे सर्व ऐकल्यानंतर तिघेही काहीसे निर्धास्त झाले आणि तिथून निघाले. रुपेशने दुसऱ्याच दिवशी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. ट्रेन च्या तिकीट मिळत नसल्याने त्याने हर्षल आणि नितीनला सोबत येण्याची विनंती केली. त्यांना मदत करायचे कबूल केले असल्यामुळे हर्षल आणि नितीन तयार झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:०० वाजता ते सर्व पुण्यासाठी रवाना झाले. दुपारी २:०० वाजेपर्यंत ते सर्व पुण्याला पोहचले. आपण येत असल्याची सूचना त्यांनी कामवाल्या बाईला दिली होती. तिने सर्वांसाठी स्वयंपाक करून ठेवला होता. दुपारची जेवणे उरकून हर्षल आणि नितीन माघारी परतणार होते. परंतु रुपेश आणि रेवतीने त्यांना आजचा दिवस थांबण्याची विनंती केली. नको-नको म्हणत असताना देखील बळजबरीने त्यांना थांबण्यास भाग पाडले.

थोड्या वेळाने सर्व फ्रेश होऊन आले. जेवणे उरकून सर्व गप्पा मारत बसले. त्यांनी हर्षल आणि नितीनला त्यांच्या दैनंदिन आयुष्याविषयी चौकशी केली. गप्पांचा ओघ पुढे मुख्य कार्यावर आला. आता प्रत्येकजण आपापल्या परीने काय करता येईल याची माहिती देत होता. परंतु कोणाचेच समाधान होत नव्हते. शेवटी रुपेशने त्याच्या एक मित्र मंगेशला फोन करून बोलावून घेतले. तो आल्यावर रुपेशने त्याला सर्व हकीकत सांगितली आणि या कामात त्याला मदत करायला सांगितले. सर्व ऐकून घेतल्यावर मंगेशने बोलायला सुरुवात केली.

"या गोष्टींसाठी आपल्याला एखादे असे हॉस्पिटल शोधावे लागेल जिथे डिलिव्हरी होतात. कारण आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तिथेच मिळू शकतील. त्यातही जर का त्या हॉस्पिटलचे नाव जास्त चर्चेत नसेल तर अतिउत्तम. एकदा का असे हॉस्पिटल सापडले कि तेथील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला या गोष्टी मिळवता येतील…………. यासर्व कामात जोखीमही तितकीच आहे. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी सावधगिरीने कराव्या लागतील. खास करून रुपेश तुला विशेष काळजी घ्यावी लागेल; कारण मार्केट मध्ये तुझे नाव खूप मोठे आहे. आपण ऑनलाईन जवळपासच्या हॉस्पिटलची नावे शोधूया आणि त्याविषयीची लोकांची मते पाहूया…………………….. हर्षल आणि नितीन तुम्ही या कामात यांना मदत करायला तयार झालात यासाठी खरंच खूप धन्यवाद. मला तुमची मदत तेव्हा लागेल जेव्हा या गोष्टी मिळविण्यासाठी हॉस्पिटलला जावे लागेल. जेव्हा जायचे असेल तेव्हा मी तुमच्या सोबत येईन. तिथे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची सर्व काळजी घेतली जाईल. बाकी आर्थिक व्यवहार जे असतील ते रुपेश बघेल. तुम्हालाही कुठे जर या गोष्टींची माहिती मिळाली तर आम्हाला नक्की कळवा."

मंगेशचे बोलणे ऐकून सर्वांना धीर आला. रेवतीच्या डोळ्यात मातृत्वाची आस पुन्हा जागृत झालेली दिसली. सर्व गप्पा आवरेपर्यंत रात्रीचे ८:०० वाजले होते. जेवणाची तयारी झाली होती. जेवणे उरकल्यानंतर मंगेश त्याच्या घरी निघून गेला आणि बाकी सर्व झोपण्यास निघून गेले. पाहुण्यांसाठी असलेली खोली हर्षल आणि नितीनला देण्यात आली होती.

सकाळी ९:०० वाजता सर्वजण डायनींग हॉल मध्ये जमले. हर्षल आणि नितीन निघण्याच्या तयारीत होते. चहा नाश्ता आटोपून त्यांनी दोघांचा निरोप घेतला. रुपेशने हर्षलला त्याच्या कामाचे पैसे दिले आणि दोघांना प्रत्येकी ५०००/- रुपये दिले. "हि आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे. आम्ही अनेक वर्षे या सुखाची वाट पाहत आहोत. तो मार्ग आम्हाला तुमच्यामुळे सापडला. त्याच्या समोर हि रक्कम अगदीच नगण्य आहे. तुमच्या कामाचा मी योग्य तो मोबदला देईन. हि फक्त एक सदिच्छा भेट म्हणून स्वीकार करा." हर्षल आणि नितीनने ते पैसे घेतले आणि त्यांचा निरोप घेऊ ते परतीच्या प्रवासाला निघाले.

काही वेळाने रुपेशने ऑफिसला कॉल केला. आणि मागील ४-५ दिवसातील कामाची माहिती घेतली. पुणे शहरापासून काहीश्या अंतरावर त्यांच्या कंपनीने एक प्लॉट पहिला होता. ज्यावर त्यांच्या बंगलो स्कीमचा प्रोजेक्ट बनणार होता. त्या प्लॉटचा सौदा पक्का झाला होता. येणाऱ्या १०-१५ दिवसात सर्व व्यवहार पूर्ण होऊन कागदपत्रे हातात मिळणार होती. रुपेशला लगेच पुजाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्याला मनाजोगती जागा मिळाली होती. त्याने लगेच हि गोष्ट रेवतीला सांगितली. दोघांनी मनोमन देवाचे आभार मानले.

आता मुख्य काम बाकी होते. रुपेशने लगेच आपला लॅपटॉप चालू केला. दोघे मिळून पुण्यातील सर्व मॅटर्निटी हॉस्पिटलची माहिती शोधू लागले. जवळपासची-लांबची सर्व हॉस्पिटलची माहिती ते घेत होते. आज दिवसभरात त्यांना हव्या असलेल्या अश्या ५-६ हॉस्पिटलची माहिती मिळाली होती. आता प्रत्यक्ष त्या हॉस्पिटलला जाऊन भेटणे गरजेचे होते. रुपेशने मंगेशला याची माहिती दिली आणि या हॉस्पिटलला भेट घेण्यासाठी तयारी करण्याचे ठरविले. या आठवड्यात काहीही करून त्यांना या हॉस्पिटलला भेटी द्यायचाच होत्या. दुसऱ्या दिवसापासून रोज एक हॉस्पिटलला ते दोघे भेट देऊ लागले. आपण एक सर्व्हे करीत आहोत. गर्भावस्थेत मृत होण्याचे प्रमाण तसेच जन्मताच मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण अश्या इतर काही बेसिक गोष्टींची माहिती ते विचारात होते.

३-४ दिवस गेल्यानंतर ते पुणे सातारा रोड वर एका ‘बाळलीला मॅटर्निटी हॉस्पिटल’ला भेट देण्यास गेले होते. शहरापासून काहीसे आतल्या बाजूस ते हॉस्पिटल होते. आजूबाजूला अनेक खेडेगावांसाठी हे एक मध्यवर्ती हॉस्पिटल असल्याने गर्दी बरीच होती. थोडावेळ थांबल्यावर तेथील एका सफाई कर्मचाऱ्याने त्यांना येथे येण्याचे प्रयोजन विचारले. यावर त्यांनी इतर ठिकाणी सांगितल्याप्रमाणेच इकडे देखील सर्व्हेचे कारण पुढे केले. यावर त्याने "मी सर्व माहिती देतो. मला त्याबदल्यात काय मिळेल?" अशी विचारणा केली. त्याच्या ह्या प्रश्नानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिले. "आता तर तशी काही तरतूद नाही आहे. झाली कि आम्ही येऊन भेटतो." असे सांगून तिकडून निघाले. बाहेर आल्यावर रुपेशने हर्षलला कॉल केला आणि पुण्याला येण्यास सांगितले. हर्षलने देखील नितीन सोबत रात्री निघून सकाळी पोहचण्याचे कबूल केले.

Group content visibility: 
Use group defaults