"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<बहुतेक त्यातले अणु-रेणु उलटे असावेत. इलेक्ट्रॉन्स आत आणि प्रोटॉन्स बाहेर घिरट्या घालताहेत. अँटीमॅटर!>>
हे वाचून भुतं पण भीतीने मरतील..

भूताच्या सपाता सापडल्या:
20230122_153105.jpg

आता यावरुन कळते का बघा, भूताचे पाय उलटे म्हणजे नक्की कसे ते.

मला Nobel laureate हा शब्दप्रयोग कॉलेजला जाईपर्यंत माहित नव्हता. एकदा मित्रांच्यात गप्पा सुरु असताना कुणीतरी तो शब्द वापरला तेंव्हा मी विचारले. "कोण आहे हा?" मला वाटले होते Laureate आडनावाचा कोणी मनुष्य असेल
>>>मला अजूनही माहित नाही...

मार्टिन ल्युथर किंग यांच्यावर एक धडा होता पाठ्यपुस्तकात. त्यात त्यांच्या हत्येचे वर्णन "चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाची हत्या झाली" असे काहीसे वाक्य होते. ते वाचून मार्टिन ल्युथर किंग घराच्या उंबऱ्यावर उभे असताना त्यांना मारले असावे असे वाटले होते.

केनेडी (जेएफके) यांच्या हत्येविषयी सुद्धा अशीच चुकीची समजूत होती. केनेडी कार मधून उतरून एका उंच बिल्डिंगमध्ये जात असताना काही कारणास्तव खाली वाकले. त्याच क्षणी त्या बिल्डिंगमध्ये दहाव्या मजल्यावर असणाऱ्या बंदूकधारी इसमाने त्यांच्या मानेत गोळी झाडून हत्या केली, अशी कहाणी ऐकली होती. केनेडी केवळ काही क्षणांसाठी खाली वाकले नेमके तेवढ्यातच इतक्या उंचावरून गोळी मारणारा किती मास्टरमाइंड असेल अशी आमची चर्चा सुद्धा व्हायची. खूप वर्षं तशीच समजूत होती.

मला लहानपणी वाटायचे की प्रत्येक दुकानाचा मालक प्राध्यापक असतो. कारण पाटीवर लिहिलेलं असे. प्रो. अमुक तमुक. कधीकधी प्रोप्रा असे. ते वाटायचं प्रोफेसर प्राध्यापक. एवढी शिकलेली माणसं दुकानात माश्या मारत़ का बसतात हा प्रश्नच असे. तसेच ड्रगिस्ट अँड केमिस्ट ह्या पाटीचे. इतक्या उघडौघड हे लोक आपण ड्रगिस्ट असल्याचे कसे लिहितात हे खुप वर्षे कळले नव्हते.

ते वाचून मार्टिन ल्युथर किंग घराच्या उंबऱ्यावर उभे असताना त्यांना मारले असावे असे वाटले होते.
त्यांना ते उंबर्‍यावर उभे असतानाच मारले ना?

त्यांना ते उंबर्‍यावर उभे असतानाच मारले ना? >> ते हिरण्यकश्यपू यांना. मार्टिन यांना बाल्कनीत उभे असताना मारले म्हणे.

>> ड्रगिस्ट अँड केमिस्ट
+११ खुलेआम ड्रग्स विक्री Lol

>> मार्टिन यांना बाल्कनीत उभे असताना मारले म्हणे.
हो. विकिपीडियावर तसेच वर्णन आहे.

पूर्वी सचिन तेंडुलकर व्हिसा क्रेडिट कार्डची जाहिरात करायचा. (व्हिसा पॉवर..गो गेट इट Happy ) तेव्हा मला परदेशात जायला व्हिसा लागतो एवढंच माहिती होतं. त्या जाहिरातीत तो व्हिसामुळे परदेशात आयुष्य कसं सोपं होतं वगैरे सांगायचा. तेव्हा मला वाटायचं की व्हिसाची जाहिरात का करतात? ती तर आवश्यकच गोष्ट आहे Happy व्हिसा नसेल तर परदेशात जाताच येणार नाही.

निरागस ते बालपण! स्गळ्यांचे मजेशीर किस्से आहेत.

लहानपणी ते उखाणे घ्यायचे ना

भाजीत भाजी मेथीची वगैरे
तेव्हा मला वाटायचं एका जुडीत दुसरी जुडी अडकलीये... भाजीत भाजी मिक्स असं काहीतरी Lol

नवर्‍याला वाटायचं सेम प्रकारच्या बस किंवा एकाच मॉडेलच्या दोन कार्स जवळ आल्या की त्यांची मारामारी होणार.
एकदा आईची आई आणि बाबांची आई एकत्र होते घरी तर हा दोन आज्यांची मारामारी म्हणत फिरत होता घरात Lol

सिनेमाच्या बाबतीत जिथे पटकथाकार आणि दिग्दर्शक वेगवेगळे असतात तिथे पटकथाकारापेक्षा दिग्दर्शकाला इतके का महत्व असते हे अजिबात कळायचे नाही. सिनेमा पाहताना सगळ्यांच्या नावाच्या छोट्या पाट्या यायच्या आणि दिग्दर्शकाच्या नावाची पाटी मात्र सगळ्यात मोठी!

सिनेमाचा लेखक (पटकथाकार) हा अभिनेत्यांनंतर सगळ्यात महत्वाचा वाटायचा. कारण पटकथाकार सगळी कथा कशी कशी घडली ते संवादासहित लिहिणार. त्यानुसार अभिनेते अभिनय करणार. इथे दिग्दर्शकाचा संबध येतोच कुठे? असे वाटायचे Lol तो फारफारतर अभिनेत्यांकडून हवा तसा अभिनय झाला कि नाही, कॅमेरा ठिक लागला कि नाही वगैरे हे पाहत असेल. पण पटकथाकाराने जर कथाच नाही लिहिली, संवाद नाही लिहिले तर दिग्दर्शक तरी काय करणार? असे प्रश्न मनात यायचे. हे चांगले कॉलेजला जाईपर्यंत कळले नव्हते. त्याचे कारण सिनेमाची पटकथा आणि नेहमी आपण वाचतो ती कथा यातला फरक तेंव्हा माहित नव्हता.

सिनेमाच्या बाबतीत जिथे पटकथाकार आणि दिग्दर्शक वेगवेगळे असतात तिथे पटकथाकारापेक्षा दिग्दर्शकाला इतके का महत्व असते हे अजिबात कळायचे नाही.
तुमच्या लहानपणी तुम्हाला बीए / एमए लेवलेच प्रश्न पडायचे तर..

Lol
एक तर शाळेत मराठी विषय प्रचंड आवडीचा. लेखक लोक लहानपणी हिरो होते. पुलं, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव इत्यादी. कदाचित त्यामुळे असेल. लिखाणातून सिनेमाच उभे करायचे हे लोक. मग दिग्दर्शक बिनकामाचा वाटणारच ना Lol

मला अजूनही पटकथाकार नक्की काय करतात ते माहीत नाही. आधी वाटायचं की कथाकार मूळ कथा लिहितात आणि पटकथाकार त्यात संवाद लिहितात. पण काही कथेतच संवाद असतात, मग पटकथा कशाला पाहिजे वेगळी, किंवा त्यांना फार काही काम नसेल, अशी माझी अजूनही समजूत आहे.

कथेत विनोदी(?) प्रसंग, विनोदी(?) संवाद घालणे, प्रेमकथा, रोमान्स घालुन किंवा करुण रस वाढवून (उदा. "क्या? माँ का खून बेटे को नही चलेगा? ये तुम क्या कह रहे हो डॉक्टर? मैने अपने कोख मे उसे नऊ महिने पालकर जनम दिया है" असे डायलॉग काय मूळ कथेत असतात होय!) गाणी घालायला वाट करून देणे, क्लायमॅक्स हास्यास्पद करणे, अडीच तास जास्त होत असतील तर लांबवणे एवढी किमान कामे तरी असतातच ;).

Pages