"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आधी लिहिलेय का माहिती नाही पण मला वाघ सिंह हे गाई म्हशीं एवढे असतील असे वाटायचे (अंकलीपीमधली चित्रे पाहून)
अंकलीपी मधल्या अंजीर अननस याबाबत तर अपार कुतूहल होते. आमच्या खेडेगावात ती कुठून मिळणार बघायला. उंबर पाहून 'हेच आपलं अंजीर' म्हणत असू Proud

छान धागा आहे!

लहानपणी बाबांनी सांगीतलं होतं ताटात काही टाकायचं नाही, तांदळाचा एकेक दाणा उगवायला १ वर्षं लागतं. तेव्हा ताटातला वाटीभर भात बघून कित्ती वर्षं लागली असतील एवढ्या तांदळांसाठी! असं वाटायचं..

अजून एक म्हणजे, बाळं डायरेक्ट हॉस्पिटलच्या छोट्या कॉट्स वर रात्री अवतरतात आणि शेजारच्या बाईला assign होतात असं वाटायचं. त्यामुळे बरं झालं आपल्याला आपल्या आईशेजारची कॉट मिळाली असंही वाटलं होतं! Lol

सापाला जनावर? -->>>

कोकणात जनावर म्हणजे साप/घोणस/नाग ई. आणि त्यांचे बाकी भाईबंद..
आणि गुरं म्हणजे गाई/म्हशी ई.
अजून एक गमंत म्हणजे माझ्या गावात गुरांच्या गोठ्याला वाडा म्हणतात Lol

विमानांना पंख फडकवता येत नसल्याने ते शोभेसाठी असतात असं वाटायचं. इतके लांब पंख का असतात, नुसती इंजिन टांगण्यापुरती जागा असली की झालं, असं वाटायचं.

माझी आजी पण जनावर किंवा नुसत्या हाताच्या खुणेने फणा असं करुन दाखवायची. नाव घ्यायचं नाही म्हणे त्याचं.
आणि ती अमिताभ बच्चन ला पण अमिता बच्चन च म्हणायची. Lol

अजून एक समजूत - बहुतेक लिहिली असेल कोणीतरी वर.
वहीत पेन्सिलचे टोक करून उरलेले तुरे ठेवले की त्याचं फुलपाखरू होतं.

<<माझी आजी पण जनावर किंवा नुसत्या हाताच्या खुणेने फणा असं करुन दाखवायची. नाव घ्यायचं नाही म्हणे त्याचं.>>
इथुनच रोलिंग बाईंनी You-know-who ची कल्पना उचलली असावी.

रोलिंग बाई या मूळच्या रांगणेकर. त्यांचे घराणे कीर्तनकाराचे. वडील देवऋषी होते. मंत्र तंत्र करून आजार बरे करायचे. या क्षेत्रात अमेरिकेत नशीब काढायला त्यांना संधी चालून आली तेव्हां हे घराणे तिकडे गेले. रांगणेकर आजी लहान असताना पालथे पडून गोल गोल फिरत असत. त्यांच्या घराण्याची ही परंपराच होती. अमेरिकेत गेल्यावर रांगणेकर आडनावाचा अर्थ विचारला तर काय सांगायचा या विचाराने लज्जा वाटून त्यांनी रोलिंग हे आडनाव घेतले. कारण ती घराण्याची रीतच होती.

रांगणेकर आजी अमेरिकेला येण्याआधी त्यांचा एक बालमित्र होता. त्याचे नाव हरी कुंभार. त्याची त्यांना आयुष्यभर आठवण येत राहिली. वडलांचे घराणेच कीर्तनकाराचे. त्यामुळे त्या अमेरिकन मुलांना गोष्टी सांगू लागल्या. त्यात हरी कुंभारचे त्यांनी हॅरी पॉटर केले होते. वडील देवऋषी होतेच. त्यांच्या जादूची जोड या कथांना मिळाली. अशा पद्धतीने हॅरी पॉटर या पात्राचा जन्म झाला.

अशा पद्धतीने हॅरी पॉटर या पात्राचा जन्म झाला.>>>आता काही दिवसांनी हे whts app फॉरवर्ड आले तर नवल नाही

रोलिंग बाई या मूळच्या रांगणेकर.
हहपुवा...

अवांतर आहे तरी मी याचप्रकारची एक महत्वाची गोष्ट सांगतो.

कृष्णा बाळ हा मुळचा सावंतवाडीचा. दशावतारीत छोट्यामोठ्या भुमिका करायचा. एकदा कणकवलीवरून आलेल्या कृष्णकांत नुलकरने ह्या कृष्णा बाळला जटायूच्या भुमिकेत पाहिले. कृष्णकांत हा कणकवलीत फेमस होता पण त्याच्या कलेची कोकणात कदर होत नव्हती. पण ह्या जटायूच्या भुमिकेतील कृष्णाला पाहिल्यावर काही कल्पना डोक्यात आली. त्या नुसार त्याने एक चित्रपटाची पटकथा लिहीली. पण बॉलिवूडने ह्या मराठी व कोकणी माणसाला काहीच किंमत दिली नाही. त्याचे स्क्रिप्ट फेकण्यात आले. म्हणून राग येऊन कृष्णकांत नुलकर हॉलिवूड मध्ये गेला. स्वतःचे नाव कृष्णकांत नुलकर ऐवजी ख्रिस्तोफर नोलान केले, कृष्णा बाळचे मुळ नाव बदलून त्याचे नाव ख्रिश्चन बेल केले. हॉलिवूड मध्ये जटायू
पक्षी कुणाला माहित असण्याची शक्यता कमी होती म्हणून जटायूऐवजी बॅट असे बदलून स्क्रिप्टमध्ये फेरफार केले व बॅटमॅन सिरीज बनवली. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊकच आहे.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - ही म्हण ऐकली तेव्हा प्रश्न पडला होता, की गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीचे घाव कसे काय बसत असतील?

Lol

टाकीचे घाव लहानपणी माहिती होतं कारण पाट्याला टाकी लावा ओरडणारी बाई यायची, मग चाळीतले पाटे, वरवंटे बाहेर यायचे. त्यामुळे दगडाचा देव व्हायला हे सोसावे लागतं समजलं.

आठवी नववी ला असताना मराठी लेखनसंपदेला "साहित्य" शब्द आहे हे कळले.
पण तोवर "साहित्य" म्हणजे शेतकामाचे बांधकामाचे इत्यादी साहित्य इतकाच अर्थ माहित होता. घमेलं, टिकाव, खुरपं, खोरं, कुदळ इत्यादी हे "मराठी साहित्य" माहित होते Lol
पण लिखाणाला "मराठी साहित्य" वगैरे म्हणायला सुरु केल्यापासून आपण मोठे झालो असे वाटायला लागले होते.

पण लिखाणाला "मराठी साहित्य" वगैरे म्हणायला सुरु केल्यापासून आपण मोठे झालो असे वाटायला लागले होते. >>> हे भारीये Lol

"मराठी साहित्य" वगैरे म्हणायला सुरु केल्यापासून आपण मोठे झालो असे वाटायला लागले होते. >> Lol एकदम! नववी-दहावीला मराठी शिकवणार्‍या एक बाई अलंकारबंबाळ भाषेत बोलायच्या. त्यावेळी ते बिनडोक फिलर घालून वाक्यं लिहिली की मार्क मिळतात हे ज्ञान झाल्यापासून त्याकाळी तसलं साहित्यबंबाळ लेखन केलेलं आठवतंय.

<< साहित्यबंबाळ लेखन केलेलं आठवतंय. >>
काळजी नको, ती परंपरा अजूनही चालू आहे. साधं, सरळ, सोप्या भाषेतलं लेखन डाऊनमार्केट समजतात.

सापाला जनावर म्हणतात <<<< विशेषकरून कोकणात. आजी म्हणायची.
गुरं म्हणजे गायी म्हशी
मी कधी बघितला नाही पण आमच्या गावाला वाड्यात एक मोठा काळा साप फिरायचा, तो राखणदार असतो म्हणे

अगदी !!! Lol
मला अजूनही ते अंधुकपणे मनात येतंच. इतकी वर्षे झाली तरी अजून सरावच? Biggrin (माबोवरच्या समस्त डॉक्टरांची माफी मागून Light 1 )

साहित्यबंबाळ लेखन
>>> आजही कित्येकांना असलं लेखन प्रचंड वगैरे आवडतं. Biggrin

काळजी नको, ती परंपरा अजूनही चालू आहे. साधं, सरळ, सोप्या भाषेतलं लेखन डाऊनमार्केट समजतात. >>> अगदी !

Pages