"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घराच्या आणि इतर चाव्या आमच्या कडे जपुन ठेवल्या जात. .... म्हणजे कपाटाच्या आत. तर मला लहानपणि वाटायचे की चाव्या म्हणजे दागदागिन्यांसारखी काहीतरी मौल्यवान वस्तू आहे.

"बापरे! आज केवढा गारठा पडलाय नाही?"

आज खूप वर्षांनी हे वाक्य आठवलं. आताशा थंडीचा कडाका पुण्यात वाढत आहेच. पण लहानपणी हे वाक्य मोठ्या माणसांच्या तोंडी हमखास असायचं ते आठवलं. "आज थंडी खूप वाजत आहे" या लहान मुलांच्या साध्या वाक्याचं ते मोठ्या माणसांच्या भाषेतलं भाषांतर होतं Lol खूप खूप जुनी स्मृती आहे हि. पण त्याचा अर्थ कळत नव्हता हे अजूनही स्पष्ट आठवते आहे. शक्यतो संध्याकाळी वा रात्री कोणी बाहेरून आले असेल तर त्यांच्या तोंडी हे वाक्य असायचेच. त्यामुळे बाहेर रस्त्यावर कोणीतरी 'गारठा' पडला असेल, असे मनात यायचे. अर्थ कळला तेंव्हा एकदा मोठ्या माणसांची मिमिक्री करायची म्हणून "थंडी वाजत आहे" च्या ऐवजी हे वाक्य आपण अगदी तसेच म्हटलो होतो आणि सगळे हसले होते, इतके सारे अजूनही स्पष्ट आठवते.

अतुल Happy

मला 'गरवा लगाना' याबद्दल अशीच काहीतरी समजूत होती. नैनों में बदरा छाए , .. ऐसे में बलम मोहे गरवा लगाए. मला वाटायचं काहीतरी गार वस्तू लावतात. ते लहानपणी मित्रांच्या कॉलरवरून आत पाठीवर गपचूप बर्फ सोडण्याचा खट्याळपणा ज्यांनी केला असेल त्यांना मी काय म्हणतोय ते कळेल. आधीच ढग जमलेत, वीज कडाडतीय आणि त्यात माझा बलम मला गारवा लावतोय. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास.

हर्पा Happy

ऑफिशियली हिंदी हा विषय पाचवीपासून शिकलो (ते सुद्धा शाळाखात्यानं मान्यता दिलेलं हिंदी). बाकी हिंदीचा परिचय फाळकेकृत सिनेसृष्टीतूनच झालाय. त्यातलाच एक आपल्या लिमिटेड ज्ञानाचे दिवे लावणारा किस्सा म्हणजे, अनेक वर्षं मी ‘तेरे बिना ज़िंदगीसें कोईं शिकवा नहीं’ ह्याचा अर्थ, तू सोडून आयुष्यात इतर कुणीही काहीही शिकवलेलं नाही असा लावत होतो. हे कळतं तर गुलझार सुद्धा ज़ार ज़ार रडले असते Happy

गारठा , गरवा अन् शिकवा Lol

'दोन दिवाने शहरमे' ह्या गाण्यात नेहमी साबुदाणा ऐकू यायचं.. साबुदाणा शोधायला इतका का वेळ लागत असेल, किराणा दुकान नाहीय का ह्यांचा गावात असंही वाटायचं .. गाण्याचा व्हिडिओ बघितला नव्हताच , वर विविधभारतीवर ऐकून लावलेले अंदाज Proud

मला तर अजूनही 'गरवां लगाना' म्हणजे काय ते माहित नाही. मी आपले अझ्युम करते की 'गले लगाना' असावे. नेमका काय अर्थ आहे?

Lol Lol Lol

तस माझं चश्मेबद्दूर च होतं.
हिंदीची पार चिंधी.
पुलंनी चश्मेबद्दूर म्हणजे चष्मा घातलेले. राव बहाद्दूर म्हणतात की त्या पंचला मी पण हसायचे... पण त्यातला विनोद तर कळलं नव्हता. मग पुढे कधीतरी त्याचा कळला.

प्रत्येक गावाचा आपापला सूर्य असतो असं मला वाटायचं, संध्याकाळ झाली की त्या गावाच्या टेकडी, डोंगर, लांबच झाड, समुद्राची लाईन (ज्याला मोठेपणी आपण क्षितिज म्हणतो )अशा त्या त्या गावाच्या लांबच्या गोष्टींमागे तो जाऊन बसतो, सकाळी परत येतो. सेम चंद्राच असत फक्त शिफ्ट वेगळी असं मला लहानपणी वाटायचं

आपल्या घरात जे जास्त पिकत ते खाऊन सुद्धा उरलं की लोक विकतात. जसं गवळी मामा आम्हांला त्यांच्या घरातलं जास्तीच दूध विकायचे, आमच्या नात्यातले एक जणांची शेती होती ते जास्ती च धान्य विकायचे असं ऐकलं होत. त्या न्यायाने मला चॉकलेट, बिस्कीट वाल्या दुकानदाराच्या मुलांचा प्रचंड हेवा वाटायचा लहानपणी. असं वाटायचं हे यांच्या घरात बनत, आणि खाऊन सुद्धा उरत म्हणून हे विकतात.:D

लहानपणी वाड्यातल्या ताईने सांगितलं होत की लाल कलर च्या उदबत्त्या मध्ये माणसाचं रक्त घातलेल असत. ते ऐकल्या पासून काळ्या सोडून कुठल्याही कलर च्या उदब्बती बद्दल इतका ट्रॉमा बसला होता डोक्यात की वेगळ्या कलर च्या उदाबत्ती लावली की मला मळमळ व्हायची खूप वर्ष.

लहानपणी हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं वाटायचं पण आता कळालं की हिंदी भाषीकांनी पिकवलेली ही कंडी आहे. काही लोक अजूनही लहानच राहीलेत त्यांना अजूनही हिंदी ही राष्ट्रभाषा वाटते.

बारातियोन का स्वागत पान पराग से होना चाहिये असं टीव्ही ला बघून मी बहिणीला विचारलं होत की आपल्याला का कुठल्या लग्नात पान पराग नाही मिळालं. तर तीन सांगितलं होत की ते खायचं नसतं त्यात तंबाखू असतें, लहान्यांनी तर नाहीच नाही मोठ्यांनी पण नसतं खायचं, त्यांन माणूस मरत खाल्लं की. म्हणून आपल्या नात्यातल्या लग्नात ते नसतं Happy
मी जन्मात कधी पान पराग खाल्लं नाहीये त्यामुळे हे खरं का खोटं मला आजतगायत माहित नाही.
आणि ते इतकं वाईट असेल तर शम्मी कपूर चा ते खायला घालून बारातीयो ना मारायचा प्लॅन का असेल असं मला वाटायचं लहानपणी

@पियू इव्हिल eye pendant चा उर्दू भाऊ आहे चष्मे बहाद्दूर Happy तिकडं पेंडंट इकडं चष्मा Happy मजा केली, मला पण कळायचं नाही हिरोईन ला चष्मे बहाद्दूर का म्हणतात म्हणून मी शोधल्यावर कळलं होत की त्याचा अर्थ वाईट नजरेपासून दूर राहोस असा होतो बहुदा. चष्म ए बद्द दूर अशी फोड असावी. थोडक्यात आफ्रिकेतून भारतात सध्या आलेलं evil eyes off

ओह असा अर्थ आहे काय चश्मे बद्दूर चा? मला वाटायचं की गूड लूकिंग.. डोळ्यांना सुंदर दिसणारे रूप..

त्या गाण्यात सांगितला आहे ना अर्थ. आधी अर्थ explain करून मग तो कीवर्ड वापरला आहे. बघा -
अर्थ - मेतेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे
कीवर्ड - चष्मेबद्दूर

लहानपणी आई, आजी च्या तोंडून सडा सारवण हा शब्द ऐकला होता. पण पुस्तकात जेव्हा सडासंमार्जन हा शब्द वाचला तेव्हा हे वेगळं काहीतरी आहे असं वाटायचं. पहिल्या स वरचा अनुस्वार चुकून दुसऱ्या स वर गेलाय असं वाटायचं आणि सरळ सरळ टॉयलेट घासणे असा त्याचा अर्थ मी लावून टाकायचे. आणि मी जो विचार करतेय तोच बरोबर आहे अस मला खूप दिवस वाटायचं

आम्ही राहायचो त्या वाड्यात एकदा नाग निघाला. निघाला म्हणजे आजूबाजूच्या झाडाझुडुपातून घरमालकांच्या एका खोलीत आला. रीतसर सर्प मित्र /गारुडी कोणाला तरी बोलावून त्याने तो पकडून नेला. जाताना त्याने सांगितल्या प्रमाणे वाड्याच्या एकन एक दरवाज्यांवर एक मंत्र लिहिला गेला. आस्तिक नास्तिक कालभैरव. याचा मला असा अर्थ वाटायचा की त्या पकडणाऱ्या माणसाचं नाव कालभैरव आहे आणि त्याच्या नावाची लिखित धमकी त्याने सर्व नाग, साप यांना देऊन ठेवली आहे की असाल नसाल (आस्तिक नास्तिक )तिथून पकडून नेईन Lol
आता आठवून हसायला येत की लहानपणी आपण कस प्रत्येक गोष्टीत स्वतःच अस एक लॉजिक लावतो आपण

Pages