लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझी बहिण दागिने दागिने खेळायचो, जुने सोनेरी मुलामा निघालेले असे नकलि दागिने, पिना वगैरे वस्तु एखाद्या ज्वेलरच्या डब्यात ठेवायचं, मग बहिण चोर होणार आनि डबा लंपास करणार्...किंवा बहिण ते दागिने घालुन खोटच झोपणार, मी ते चोर बनुन काढुन घेणार आणि धावायला लागता क्षणीच ती उठणार, मग ओरडणार ..देखो देखो चोर मेरे दो करोड के गेहने लेकर भागा...
सिक्वेन्स उलट सुलट पण आम्ही ओरडणार मात्र हिंदितच! Happy

अजुन १ म्हणजे मी आणि बहिण बाथरुम बंद करून , ड्रेनेज भोकात कहितरि कपडा वगैरे कोम्बुन स्वच्छ पाणि जमा करायचो आनि स्विम्मिन्ग पूल बनवुन त्यात "गल्यान साखलि सोन्याची" गाण्यावर नाचत नाचत २-३ तास येथेच्छ खेळत बसायचो. तेंव्हा आम्हा मुंबई करांच्या नशिबात कुठले हौद्,तलाव किंवा जिम मधला स्विम्मिन्ग पूल Sad

देखो देखो चोर मेरे दो करोड के गेहने लेकर भागा...
>>>
दो करोड Rofl

मी आणि माझी बहिण अशाच प्रकारचा एक खेळ खेळायचो. फक्त दागिने पळविणारा चोर न येता मारामारी करणारा हल्लेखोर यायचा आम्च्या खेळात. म्हणजे बहिणीने झोपल्याचं सोंग घेऊन पडून रहायचं आणि मी अचानक तिच्यावर हल्ला कराअय्चा आणि मग जमेल तशी खरी मस्ती करायची अगदी. आलटून पालटून कधी ती हल्लेखोर कधी मी हल्लेखोर . Rofl

दिनेशदा
हा बांगड्यांचा हार आम्ही कित्येक वेळा केला आहे. काय क्रिएटिव्हिटीचं समाधान व्हायचं. हार पहाताना अगदी मन भरून जायचं.
नाटक नाटक खेळतानाची प्रोसेस तर खूपच मोठी असायची. आधी वाड्याच्या अंगणातल्या डोणीवर बसायचं...... ...(बर्‍याच जणांना हा शब्द माहिती नसेल. डोणी म्हणजे अक्षरशः आतून कोरलेला दगड. यात चांगल्या ५/६ बादल्या पाणी मावायचं) आणि डोणीवर शब्दशः नाही बसायचं. काही ठरवायला त्या जागी जायचं याला ती फ्रेज बनलेली होती. ही जागा १२ ही महिने थंडगार असायची. मग या ठरवण्याच्या प्रोसेसमधे कुणाला कटवायचं...कुणाला घ्यायचं ही कॉन्स्पिरसी आधी कुजबुज करून चालायची.
मग नाटकातल्या राजाचा मुकुट बनवण्याची प्रोसेस्.....त्यासाठी रस्त्यावर चांदी शोधण्यापासून चालू व्हायची.(सिगारेटच्या पाकिटातली...चक्क)
आणि या चांद्या शोधत गावभागातून(सांगली) आमच्या स्वार्‍या निघायच्या त्या थेट आनंद थिएटरपर्यंत. तिथे खूप चांद्या मिळतात असा जावईशोध आमच्यातल्या एकाने लावलेला होता. मग भरपूर चांद्या शोधून सार्थक मनाने घरी येऊन जुन्या वह्यांचे पुठ्ठे फाडायचे. त्याला करकटकने भोकं पाडून त्यात आईच्या शिवणसामानातल्या इलॅस्टीकला गाठी मारून ....त्या पुठ्ठ्याला मस्त चांदी , मणी, टिकल्या वगैरे चिकटवून .... त्याचा सुंदर मुकुट करायचा........
बाप रे हल्लीच्या पिढीला वाटेल काय या लोकांना वेळच वेळच होता वाटतं.
हो ...पण टीव्ही, आणि कॉम्प नसल्याने ख्रंरच खूप वेळ मिळायचा. त्यामुळे, खेळ, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, नाटकं , वाचन, पोहोणे, संगीत... अश्या अनेक गोष्टीत वेळ सत्कारणी लागायचा.

मानुषी, ते नाटक प्रकरण आमच्यातही रंगायचे. चादरीचे पडदे, पुठ्ठ्याचे मुकुट... कथानक कुठलेही चालायचे. लाकूडतोड्याची गोष्ट ते हाथी मेरे साथी..

सिगारेटच्या चांदीचा आमचा एक खेळ. सायकलच्या (म्हणजे जिथे भाड्याने सायकली मिळायच्या त्या) दुकानाबाहेर छोटी छोटी बॉल बेअरिंग्ज मिळायची. सिगारेटच्या चांदीला, आतून एक पातळ कागद असायचा तो काढून आतली चांदी घ्यायची. पेन्सिलीच्या टोकाच्या विरुद्ध बाजूला साधारण इंचभर ती दाबून बसवायची. मग ती अलगद काढायची. त्या पोकळीत ते बॉल बेअरींग टाकायचे. मग उघडे टोक हळून बंद करायचे (हे जरा कौशल्याचे काम असायचे.) आता बॉल बेअरिंग आत असलेली एक पोकळ कॅप्सुल तयार झालेली असायची. ती कॅप्सुल तळहातावर ठेवली, आणि जरा हलवली, तर चक्क नाचायला लागायची.
आमची सगळी खेळणी अशी. बिनखर्चाची आणि स्वतः तयर केलेली.

हो हो आमच्यातली काही मुलं हा बॉल बेअरिंगचा बाहुलीचा खेळ करायची.
आणि आता मी माझ्या पुतणीला मोठी होताना पहाते....सगळी ड्रेपरी रेडिमेड मिळते बाजारात. मस्तच असते ती. पण हाताने करण्यातली मजा काही औरच! हो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं बिन खर्चाचं!
थोडं विषयांतर होतंय. पण चालायचंच!

मि बॉल बेअरिंग औषधाच्या कॅप्सुल मध्ये ठेवायचो. त्यासाठि घरातले मोट्यांच्या औषधांमधले कॅप्सुल्स पळवायचो नि त्यातलि पाउडर टाकुन देउन, त्यात बॉल बेअरिंग घालुन मस्त नाचवायचो.
कित्ते वेळा तर कॅप्सुल पोठात गेल्यावर कशि कै विरघळते पाहण्यासाठि वाटित पानि घेउन एक कॅप्सुल त्यात ठेवुन द्यायचो. नंतर थोड्यावेळाने पाहुयात काय होतंय म्हणुन विसरुनच जात. मग आईला ते दिसल्यावर ति कॅप्सुल चुकुन वाटित पडलि कि कै म्हनुन पाणी फेकुन वाटि धुवुन ठेवायचि. असं खुप वेळा झालंय, शेवटि एके रात्रि पाण्यात ठेवलेलि कॅप्सुल मला सकाळि पहाय्ला मिळालि, तेव्हा आइला क्ळलं कि हे उद्द्योग कोन करत होत ते.

लाकूडतोड्याची गोष्ट >>>> आतापर्यंत नाटकक्षेत्रात मला मिळालेला एकमेव रोल...पाचवीत असताना क्लासमधे दिसायला ठिकठाक असल्याने मी देव झालो होतो. डायलॉग बोलताना आवाजाने धोका दिला आणि देवाच्या ऐवजी घशातून चक्क देवीचे सुर निघायला लागले हो.......
belle-beauty-beast-6.gif

गुलमोहोराच्या न उमललेल्या कळ्या, पहिल्या पावसाचा जो वारा सुटतो, त्यावेळी गळून पडतात. त्या गोळा करायच्या. त्यातली बाह्यदले आणि पाकळ्या अलगद मोकळ्या करायच्या, आतले पुंकेसर खुडायचे. आणि त्यानी लढाई लढाई खेळायचे. हे एकमेकांत अडकवून जोरात ओढायचे. ज्याच्या पुंकेसराचे मुंडके तूटेल, तो आऊट.

त्यावेळी डोक्यात काय भन्नाट आयडीया यायच्या !!

हो हो ह खेळ आम्हि पण खेळायचो... आणि अजुन एक म्हणजे गुल्मोहोराच्याच पाकळ्या ऩखाना लावुन ठेवायची ..

आमच्या वाड्यामागच्या घरी ईड्लिंबूचे झाड होते.. मी, चिंगी, अनिल, बंटी कोणी पहात आहे की नाही याची खात्री करुन पत्र्यावर चढुन आळीपाळीने लिंबू तोडायचो (चोरायचोच) , साखर ,मीठ आणून (घरातुन कोणी पहात नाही याची खात्री करुन) आणि टाकीचेच पाणी वापरुन सरबत करुन प्यायचो.. एकदा मी लिंबू तोडताना पत्र्यावरुन घसरुन धप्पकन अंगणात पडले.. माझ्या भोकाड पसरण्याने पकडले जाऊ नये म्हणून या तिघांनी माझे रडू दाबून लगेच मला तिथुन हलवले.. कारण चोरी केली म्हणून मिळणारा मार जास्ती भयानक होता..

मानुषी,दिनेशदा,ठकु..
तुमच्या आठवणी तर धमालच !
मी त्यावेळी साधारण ६ वीत असेन (१९८७), दिवाळीत केलेल्या किल्यासमोर (किल्यासाठी नदीकाठावरुन लाल माती, वाळु आणण्यात मजा यायची) पाण्याच्या कारंज्यासाठी सायकलच्या ट्यूबचा व्हॉल्व मला पाहिजे होता,मग मी मामाच्या सायकलच्या दोन्ही चाकाची त्यासाठी हवा सोडली, मग आजोबांनी झाप-झाप झापलं, मला त्यांच्याकडुन पहिल्यांदाच एक तडाका (पाठीवर) दिला, अशी थाप मी गेल्या ६ वर्षात प्रथमच खाल्ली होती, पण ते मला मनाला खुप लागलं, कारण मी लहानपणापासुन आजोळलाच शाळा शिकायला होतो, मग मी काय केलं जेवण नाही घेतलं आणि घरातच दुपारी १२ च्या दरम्यान रागाच्या भरात एका मोठ्या लाकडी पेटार्‍याच्या भींतीजवळच्या आडोशाला लपुन बसलो,ते हललोच नाही.
१-२ तासांनी सगळ्यांची शोधाशोध,धावाधाव सुरु झाली, २-४ जणांनी भितीने सगळा नदी काठ शोधुन काढला, माझ्या वयाची आंघोळीला आलेले, पोहणारे मुलं तपासली, नदीजवळचे मोठे ओढे पाहिले, कुणी गावातल्या सगळ्या मंदीरात शोधल,लायब्ररीत पाहिलं,संपुर्ण घर,जनावराचा गोठा पाहिला,मित्रांच्या घरी पाहीलं.. शेवटी आजोबांनी एका गड्याला माझ्या गावी (१५ किमी) बघायला पाठवलं, तो गडी देखिल संध्या.६ वाजता परत आला, शेवटी परक्याचं पोरं..शेजारी बोलु लागले .
आता आजी रडायला लागली, आजोबांना पस्च्चाताप झालेला दिसला, शेवटी घरात १०-१२ गल्लीतले लोक गोळा झाले होते, मी हे सगळं गेले ५-६ तास शांतपणे ऐकत होतो (कि आनंद घेत होतो माहीत नाही), मग शेवटी आमच्या शेजारच्या एका काका सहज घरात नीट पाहिलय का म्हणुन बघत बघत पेटार्‍याजवळ आले ..
आणि एकदाचा त्यांनी सुस्कारा सोडला आणि माझी मान पकडली .....
गेले ६-७ तासापासुन चाललेला शोध संपला, मला हॉलमधे बसवण्यात आलं, माझी मात्र सगळे लोक घरातुन जाऊ पर्यंत एकदाही मान वर करुन पाहायची हिम्मत झाली नाही,
दुखावलो गेलो होतो आजोबांनी मला मारलच कसं म्हणुन ..

घरी जिथे लहाणपण गेलं (१५-१६ वर्षे),ते आजोळ तर कृष्णेच्या काठी होतं,कृष्णेचा भव्य समृद्ध नदीकाठ कधीच विसरता येणार नाही.
रोज आंघोळ तर नदीत असायची,शनिवारी,सुट्टी दिवशी तर अर्धा दिवस नदीकाठावर जायचा,पोहायला तर आवडायचं,नंतर पलिकडे जाऊन नारळाची,मोसमात आंब्याची झाडे,आवळ्याची,जांभळाची,विलायती चिंचेची झाडं तर ठरलेली असायची ,कुणी काही बोलायचं नाही कारण सगळी जवळची शेजारची माणसं, त्यात त्यांना काही फरक देखील पडायचा नाही.नंतर वाळुत येऊन निवांत पडायचं,कधी कधी थोडं क्रिकेट/फुटबॉल/धपाधपी खेळायला आवडायचं,तोपर्यंत अंगावरची हाफ पैंट वाळलेली असायची.
लाजाळुच्या झाडाबरोबर मजा यायची,रंगपंचमीला शिवरीच्या झाडापासुन गडद हिरवा रंग तयार व्हायचा, दगडी पाल्याचा उपयोग (जखमेवर) भरपुर केला.
पुढे माझ्या गावी (जिथे नदी नव्हती)कॉलेजला जायला लागल्यावर शेतीचा अगदी जवळचा संबध आला,पडेल ते काम करायला लागलं, पण खाऊच्या पानांच्या मळ्याला,ऊसाला,शाळुला धावत्-पळत पाणी देताना निसर्गाचा थोडा अभ्यास व्ह्यायला लागला,यात ऊसाला थोडं निवांत (तास भर) पाणी सोडुन ऊस,पपई,केळी खायला मजा यायची. खाऊच्या पानांच्या मळ्याला पाणी म्हणजे तारेवरची कसरत,नुसती पळापळ, त्यात काही विंचु,झुरळ , गोगलगाईंचा तर ढीग यायचा हातात, कधी कधी काहीतरी चावल्या सारखं व्हायचं नंतर वेलीवर वर चढलेला विंचु दिसायचा,त्यातुन पांढरे,काळे ,लाल विंचु बघायला मिळाले
शेतात काम केल्यावर खुप बरं वाटायचं,भलेही त्यातुन शेवटी रोकड पैसा कमी मिळायचा तरी !
ओढ्याकाठी चिंचेची (लाल,गोड,साधी अशी विविध प्रकारची) मेंदीची झुडपे,करंजाची झाडे असायची त्याच्या पानाची पिपानी करुन खुप वाजायची,सुरपारंब्या खुप रंगायचा,मग त्याच्या शेंगा गोळा करुन, फोडुन त्याचे डावच्या डाव खेळले जायचे.
आईने एकदा सिताफळाची,पेरुची अशी काही १५-२० झाडे पाटाकडेनी लावली, अनेक वर्षे त्या झाडावर खुप माझा वेळ जायचा

हे सगळं वाचून माझे २ किस्से द्यायचा मोह आवरत नाहिये...
१. मी ७-८ वर्षांची होते. मी आणि शेजारची मैत्रिण (माझ्याहून ६ महिन्यांनी लहान) खेळत होतो. आमचे खेळ म्हणजे शाळा-शाळा किंवा डॉक्टर-पेशंट किंवा भातुकली. ते हळूच बघून आम्हाला चिडवायचं हा माझ्या दोन्ही तायांचा आवडता उद्योग. त्यांनी चिडवू नये म्हणून आम्ही एकदा माडीवरच्या खोलीत डॉक्टर-पेशंट खेळत असताना दार लावून कडी घातली. मग खेळून झाल्यावर दार उघडताना मी कडी आधी काढून दार ढकलायचं त्याऐवजी चुकून आधी दार ढकललं आणि नेमकी कडी घट्ट बसली!!!झालं! ५-१० मिनिटं खुडबुड केल्यावर आमचा धीर खचला! दोघींनीही "बाबा....आई...बाबा..." करून हाका मारयला सुरुवात केली. वरच्या खोलीतून लवकर हाक जाईना, मग रडून गोन्धळ! मग आधी मैत्रिणिच्या बाबांना आमचा आवाज ऐकू आला. मग ते आमच्याकडे आले, मग माझे बाबा मागच्या बाजूच्या पत्र्यावरून चढून आले, खोलीचं मागचं दार उघडता आलं मला, आणि आमची सुटका झाली. नशिब, मागच्या बाजूला ते दार होतं, आणि मला ते उघडता आलं!

नंतर असे खेळ अज्जिबात खेळायचे नाहीत, आणि तायांनी चिडवलं तरी तुम्ही लक्ष द्यायचं नाही आणि दार बंद करून खेळायचं नाही वगैरे बरंच काय काय ऐकून घेतलं होतं.

२. हा जरा जास्तच पराक्रमी किस्सा आहे. मी पहिलीत आणि ताई चौथीत. ताईला शिकवायला आईच होती. माझा वर्ग पहिल्या मजल्यावर, ताईचा दुसर्या मजल्यावर. मधल्या सुट्टीत मी तिच्या वर्गात गेले होते उगिच मजा म्हणून. तिच्या वर्गातले काही मुलगे मला "पोळपाट ४ वाजले" म्हणून चिडवत. (कुठल्यश्या वर्गातल्या भिंतीवर अक्षरओळख म्हणून काहीतरी लिहिलं होतं ते मी एकसलग वाचलं आणि हे असंबद्ध वाक्य तयार झालं होतं. आणि 'बाईंची मुलगी' असले तरी उगिच शेफारून ठेवलं नव्हतं आईने, त्यामुळे अशी चेष्टा-मस्करी होत असे)
मला एकदा हे चिडवल्यावर खूप राग आला. ताईची गॅदरिंगच्या नाटकाच्या तालमीतली एक तलवार मी उचलली आणि वर्गाच्या मधोमध उभी राहून, तलवार हातात धरून मी स्वतःभोवती गोलगोल फिरायला सुरुवात केली. मुलं जरा बिचकली आणि मागे झाली. ताईने बघून "नको नको" म्हणेपर्यंत ती तलवार एका मुलीच्या डोळ्याला लागली Sad काय झालंय ते मला कळताच मी तलवार टाकून पळत आले आणि माझ्या वर्गातल्या मुलीला म्हटलं, कोणी दादा मला शोधायला आला तर सांगू नको. आम्ही लपाछपी खेळतोय. (हे असलं भयंकर बोलायला का जमलं माहित नाही, पण आई आणि मुख्याध्यापिका असलेली सख्खी मावशी मिळून माझी वाट लावतील ही भिती होती.) सुदैवाने त्या मुलीला जास्त नाही लागलं, एक खोक पडली भुवयीच्या बाजूला. पण आई, मावशी आणि ताई असे सगळे तिला भेटून आले, तिच्या आई-बाबांना सॉरी म्हटलं त्यांनी. आईने सगळं निस्तरलं. मे जामच टरकले होते, मग ताईने समजावलं मला, की असं करायचं नाही कधीच. आणि चूक झाली आहे हे समजलं तर लगेच आईला सांगायचं. आई रागवेल, कारण तू अशी चूकू नयेस असंच तिला वाटतं...

खूप हळूवारपणे ताईने हे सांगितलं होतं...

आठवलं तरी अजून शहारा येतो आणि असं कसं करू शकले मी म्हणून लाजही वाटते! Sad

मी लहानपणी खूपच आईवेडी होते. सारखी आईच्या मागे मागे असायचे. जरा कुठे एकटीनी बाहेरगावी वगैरे गेले नाही आणि आईलापण जाऊ दिलं नाही.

मला "आईचं शेपूट" ही पदवी मिळाली तो हा किस्सा....

कशीबशी मी आजोळी चिपळूणला रहायला तयार झाले ४ दिवस. आईशिवाय. दोघी ताया आहेत या भरवशावर आणि साने गुरुजी उद्यान, युनायटेडच्या ग्राऊंडवर खेळ आणि घरासमोरच्या डोंगरावर फिरायला जायचं (एरव्ही मी लहान म्हणून ताया नेत नसत) हे आमिष म्हणून आई पण आशेवर होती. शिवाय आजोळी २ मामेबहिणी होत्याच. आमची रवानगी चिपळूणला झाली आणि पहिला दिवस मजेत पार पडला. रात्री झोपताना मात्र अस्वस्थ झाले मी. आता आईजवळ झोपायची सवय, आज कशी झोपू असं झालं. पण "आपण राहू शकतो' असं स्वतःला समजावलं आणि मोठ्या ताईच्या जवळ झोपले. तिनेपण बिचारिने आईसारखं जवळ घेतलं मला. कशीबशी झोपले त्या रात्री.
सकाळी उठल्यावर जरा नॉर्मल झाले. नाश्ता, पेरूच्या झाडावर नेहेमीची मस्ती वगैरे करून दुपारचं जेवलो आणि भातुकली काढली. (कुठेही गेले तरी मी माझा भातुकली नेत असे Happy ) धाकटी मामेबहीण आणि मी झकासपैकी साड्या नेसून खेळ मांडला. मोठी मामेबहीण आणि माझ्या ताया त्यांच्या आवडीचा उद्योग करयला लागल्या- आम्हाला चिडवायचा. पण आम्ही दुर्लक्ष केलं.खूप वेळ खेळलो.
संध्याकाळ झाल्यावर मात्र माझा धीरच खचला. मी रडायला लागले. ४ वर्षांच्या धाकट्या मा.बहिणीला कळेना मला काय झालं! तिने ताईला सांगितलं. तायांना पण मी सांगेना तेव्हा प्रकरण आजी-आजोबा आणि मामीकडे गेलं. तोवर मामाही आला. आईची आठवण येते हे कसं सांगू कळेना. पण शेवटी "आईची आठवण येतेय मलाsssssssss" करून भोकाड पसरलं!
आजोबांनी कसलंसं चाटण करून दिलं, कारण मी रडून रडून घमेजले होते, आणि डोकं तापलं होतं. कशीबशी जेवले, सकाळी आईकडे जाऊ याच अटीवर, आणि झोपले. खरंच सकाळी पहिल्या गाडीने मामीने मला रत्नागिरीला सोडलं.

हा किस्सा मी पहिलीतून दुसरीत गेले तेव्हाचा.
अजून २-३ किस्से आहेत. पुन्हा कधीतरी. Happy

माझ्या लहानपणी सरकारची देवीच्या रोगाच्या निर्मूलनाची योजना सुरू होती. जागोजागी 'देवीचा रोगी कळवा आणि निदानानंतर रु. १००० बक्षिस मिळवा.' असे लिहून ठेवलेले असायचे.

आमच्या वाडीतल्या व्रात्य पोरांनी त्याचे 'देवीचा सोंगी कळवा ....... ' असे सगळीकडे करून ठेवले होते.

रच्याकने : हे 'निदानानंतर' चं प्रक्रण मला त्यावेळी कळायचेच नाही. ते 'निदान नंतर' आहे आणि सगळीकडे लिहिण्यात काहीतरी चूक आहे असेच मी समजायचे. Happy

तरी नशिब 'निधनानंतर' नाही वाटायचे. Biggrin

बापरे, एकेकांचे किस्से धमाल आहेत अगदी.
मी लहान असताना, प्राथमिक शाळेत कोणितरी सांगितले की, पेन्सिलचे टोक करताना त्याचे जे साल निघते (आमच्या सोलापुरी भाषेत "खुर" म्हणुनच sharpner ला "खुरकटर"), ते खुर न तुटविता, २-३ circles जमा करायचे, एका वाटित, आणि त्यात सायीचे दही घालुन भिजवुन ठेवायचे २-३ दिवस, त्यानंतर त्याचे आपोआप, खोडरबरात रुपांतर झालेले असते. त्यानुसार मी खुर घेतले, चांगले सायीचे दही घातले, आणि आइचे लक्ष जावु नये म्हणुन लपवुन ठेवले, बास आता फक्त २-३ दिवसांची गोष्ट की मला एक नविन खोडरबर मिळणार होते. (जणु काही एकही रबर नव्हते माझ्याकडे?) रोज दोनदा उघडुन बघायची पण काही रबर सद्रुश दिसेना, २ दि. नी मात्रुदेवतेच्या तिक्षण नाकाला काही घाण वास येवु लागला. त्यानंतर खुप शोध घेवुन "ती" वाटी मिळाली. मग बरेच दिवस मला चिडवत होते, की झाले का रबर?
-----------------------------------------------------------------------------
मी २-३ व. ची असताना कोणत्याहि पदार्थांची reciepe सांगायचे, एकच......
उदा.- पेढे कस्से करावेत्?(तालासुरात)- थोड्डा खव्वा घ्यावा, तो भिजवुन ठेवावा दुपाSSSरभर, संध्याकाळी पेढे होतेत... (again सोलापुरी)

माझी मुलगी, आभा, १ वर्षाची असतानाचा हा घोळ. मी नोकरीला जायचे, घरात सा. बा मुलीला सांभाळायच्या. आभा नुकतीच चालायला लागली होती, १-२ दिवसच झाले असतील. आई बाथरूममध्ये जाताना तिला काहीतरी खेळायला, खायला देऊन जायच्या, तसेच त्या दिवशीही गेल्या आणि आभाला चालण्याची हौस आली, गेली आजीच्या मागे. आजीने दार लोटले म्हणताक्षणी ह्या पठ्ठिने बाहेरून कडी लावली. लावता आली काढता कुठे येते? आणि आजी आतून ओरडायला लागल्यावर जोरजोरात रडायला लागली. हा गोंधळ १ तास चालू होता. आई हाका मारत होत्या बिल्डिंगमधल्यांना, नशीब अगदी चांगलं की आमच्या वरच्या मजल्यावर राहणारे तेव्हा घरी जेवायला येत होते त्यांनी आवाज ऐकला आणि मग दार फोडून वगैरे आत आले. तोपर्यंत आभा बाईसाहेब बाथरूमच्या बाहेर पायपुसण्यावर झोपूनही गेल्या होत्या.

महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी तेव्हा तसे गावाबाहेच आणि सगळा शेती विभाग! त्यामुळे साप, विंचु, गोम निघणे नित्याचेच! कॉलनीत आदल्या दिवशी कोणाच्या तरी बागेत साप निघाला होता. दुस-या दिवशी संध्याकाळी आम्ही मुली मुली खेळत असतांना (मुलांचा ग्रुप दुसरीकडे खेळत असायचा .... हो हे स्ट्रीक्टली फॉलो केलं जायचं नाहीतर 'मुलीत मुलगा लांडोरा, भाजुन खातो कोंबडा' अशी मुक्ताफळं त्याला ऐकायला लागायची) मुलांची गंमत करायची अस्मादिकांना लहर आली.
आमच्या घराबाहेर टॉयलेटच्या पाईप फिक्स केलेले होते.त्याच्या खाली उगाचच दगडं मारुन आम्ही सगळ्या मुली खोटं खोटं ओरडत होतो..."ए! किरण, रमाकांत!!! साप आहे इथे"! त्यातली एक-दोन मुले आली पण आम्ही का ओरडतोय ते पहायला ! आणि काय आश्चर्य खरोखरच त्या जागेवर एक सर्पराज सळसळत भिंतिवर आडवा झाला!!! Sad
यावेळेस मात्र आम्ही खरोखरच जीव खाउन ओरडलो!!!

" माझ्या सारख गोर व्हायच असेल तर..." ताई सांगत होती ते ऐकून,

"अरे नकोssss रेsss नको!!!! विश्वकर्म्या तिच ऐकूssssस" आजी ने टाहो फोडला.

पण मी मात्र ताईसारख गोर व्हायच ठरवलेल त्यामुळे तिच ऐकून मी सर्फने तोंड धुवायला सुरवात केलेली.

आजीने नंतर माझा चेहरा धुवून त्यावर निव्हीयाच लिंपण लावलेल.

आजही त्या गरम वाफा आठवतायत, चेह-यातून येणा-या. ती बुळब्ळीत काळी निळी पडलेली त्वचा.

"अरे रे गोरा होता होता राहीलास" ताई
मला तेव्हापासून ती वांगी कलर चिडवते

अर्थात आजीने बोलून आणि आईने चोप देऊन तिची बोलती बंद केलेली.

Pages