पावसाळी भाजी ...अळू

Submitted by मनीमोहोर on 18 July, 2022 - 09:28
Aluchi bhaji

पावसाळी भाजी ...अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात , देठी चांगली जाडजूड होते . आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता , घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिला “फ़दफद” हा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही न म्हणता नुसतं “ अळू “ च म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला.

भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, ( आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाही केली तरी चालत असे. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षांपूर्वीच लिहितेय, आता कोकण ही बदललं आहे. असो. कधी कधी उपासाचं अळू ही करतो. त्याला थोडं दाण्याचं कूट, जिरं आणि हिरवी मिरची वाटून लावतो म्हणजे छान मिळून येतं.

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या न तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

अळूवड्या
20210816_135035_0.jpg

आणि हे प्रसादाचं ताट , अळूवडी हवीच ...
IMG-20210910-WA0008~2-1.jpg

कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर वापर किंवा उपयोग आणि काही ही फुकट न दवडणे हे कोकणी माणसाच्या रक्तातच आहे. कोणतीही गोष्ट तशीच फेकून देववतच नाही कोकणी माणसाला. पूर्वीच्या काळी साधन सामुग्री कमी, हातात पैसा कमी, मार्केट नाही अशी अनेक कारण असू शकतील ह्या मागे. पण त्यामुळे अळू वड्या केल्या की त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या देठीची रस्सा भाजी केली जातेच दाण्याचं कूट, ओलं खोबरं घालून. गॅसवर भाजून मीठ हिंगाबरोबर चुरडलेली हिरवी मिरची आणि आंबटसर दही घालून भरीत ही करतो कधी कधी देठीच. इथे मुंबईत ही मी वड्यांचं अळू आणलं तर ती मरतुकडी देठी ही फेकून देत नाही, भरीत करतेच. शेवटी कोकणी रक्तच धमन्यातून वहात आहे माझ्या ही. ☺️

मर्यादित साधन सामुग्रीतून नाविन्यपूर्ण पदार्थ करणे हे कोकणी माणसाचं खरं कसब आहे आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अळूच्या गाठी. ह्यासाठी अळू आदल्या दिवशी कापून घरात आणून ठेवतात म्हणजे ते थोड मऊ पडत आणि त्याच्या गाठी वळण सोपं जातं. साधरण तळ हाता एवढा आळवाच्या पानाचा तुकडा कापून किंवा हातानेच फाडून त्याची सुरनळी करायची आणि त्याची गाठ वळायची. गोल भरीव रिंग सारख्या दिसतात ह्या गाठी. अश्या गाठी वळून घेऊन त्यांची भाजी करायची. ह्या गाठी वळायला खूप वेळ लागतो आणि भाजी शिजली की मरत असल्याने भरपूर गाठी वळाव्या लागतात. अति शिजून गाठींचा लगदा होणार नाही इकडे ही लक्ष ठेवावं लागतं भाजी करताना. अळूची गाठ नीट शिजवणे आणि तिचा आकार ही टिकवून ठेवणे हे खरं स्किल आहे ह्या भाजीचं. गाठीची भाजी हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे.

ऋषी पंचमीच्या भाजीत ही घरच्या भेंडी, भोपळा, माठ, पडवळ , काकडी दुधी, सुरण ह्या बरोबर अळू लागतंच. श्राद्ध किंवा पक्ष असेल घरात तर अळू करावंच लागत. श्रद्धा चा स्वयंपाक अळू शिवाय अपूर्णच असतो. काही ठिकाणी तर त्यामुळेच शुभ कार्याच्या मेन्यूमध्ये अळूचा समावेश नसतो. अळू निषिद्ध मानलं जातं. असो.

अश्या तऱ्हेने जोपर्यंत आगरात अळू आहे तोपर्यंत आज काय जेवायला करू हा पेच बायकांना पडत नाही. वर सांगितल्या पैकी एखादा पदार्थ करून वेळ साजरी केली जाते. पानातली डावी बाजू, उजवी बाजू , तळण असं काही ही करता येत असल्यामुळे अळू हे गृहिणींना वरदान वाटते. पत्त्यातल्या जोकर प्रमाणे अळू गरजेनुसार पानात कुठे ही फिट बसते.

पावसाळा संपत आला की मात्र फोफावलेलं अळू सुकायला लागतं. मुद्दाम पाणी घालून गरजेपुरतं थोडं जगवलं जातं पण बाकीचं कमी होतं आपोआप. हल्ली आम्ही फणसाची भाजी जशी पॅक मिळते तशी अळूची भाजी ही करून ठेवतो त्यामुळे कधी ही भाजी पटकन करता येते. परदेशातल्या नातेवाईकांना ही तिकडे घरचं अळू खाल्ल्याचं समाधान देते. हा आमच्या भाजी चा फोटो.
20220810_191349.jpg
अर्थात अळूची गोष्ट इथे नाही संपत. दिवाळीच्या सुमारास वरची पानं सुकली की तिथे खणून खालती लागलेल्या आळकुडया काढल्या जातात. मीठ आणि कोकम घालून उकडल्या की मस्तच लागतात. उत्तर प्रदेशात आणि सिंधी समाजात ह्या आळकुडया म्हणजे आर्वी फार पॉप्युलर आहे. ते ह्यांची चमचमीत सुखी करतात पण आम्ही उकडून खाण्याशिवाय जास्त काही करत नाही.

काही चांगल्या मोठ्या आळकूडया पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवून देतो. अश्या तऱ्हेने आगरातल्या अळूचे चक्र अनेक वर्षे चालू राहते.

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशिष्ट चव म्हणजे देऊळ , महाप्रसाद इ मधली असेल तर ती घरी येत नाही

त्यात इतर भाज्याही टाकल्या जातात व भरपूर आटवले जाते

चिंच गूळ भरपूर , हिरवी मिरची मोठे तुकडे करून, कढीलिंब फोडणीत आणि अगदी थोडा गोडा मसाला घालून करतो आम्ही. कांदा, लसूण टोमॅटो बिग नो अळूमध्ये.

डाळ दाणे, भाजी , देठ शिजवलेलं पाणी काढून टाकायचं मग थोडं पीठ लावून गरम असतानाच चांगली घोटायची , मग ते पाणी पुन्हा मिक्स करायचं. घोटताना पाणी असेल खूप तर नीट घोटली जात नाही.

अर्थात नाडण सारखी भाजी ठाण्यात होत नाही , आमचं गावचं अळूच मऊ आणि चवदार आहे. मिळून येणे हा कधीच इश्यू होत नाही तिकडे.

जाई सांगायचं राहिलं , भाजी मस्तच दिसतेय एवढ्या पोस्ट मध्ये हा एकच फोटो आहे अळूचा , त्यामुळे शोभून दिसतोय धाग्यामध्ये.

अर्थात नाडण सारखी भाजी ठाण्यात होत नाही , आमचं गावचं अळूच मऊ आणि चवदार आहे. >>>> +१००
ईनफॅक्ट, तळकोकणात जशी अळूची भाजी होते, तशी इतरत्र कुठेच जमत नाही.

ब्लॅककट, विशिष्ट चव म्हणजे आजीच्या हातची हो. मला तीच चव आठवते. कितीतरी वर्षात ही भाजी घरात खाल्ली नाहीये. कार्यात खाल्लीय.
ममो धन्यवाद, टीप्ससकट रेसिपीबद्दल.

हेमा ताई अळू च्या भाजीवर खरोखर सुंदर लिहिलेत. तशी हि जरा दुर्लक्शित भाजी. बर्यच लोकांना नाही आवडत .
पण करण्यावर आहे . मागे कुणीतरी सांगितल्याप्रमाणे मुळा , शेंगदाणे खोबरे काप , मिरची चिंच घालून छान होते हि भाजी .
माझी आइ पण करायची पण मराठवाडी पद्धतीने आणि बाबाची आई नाशिकच्या पदतीने चवीत जमीन अस्मानाचा फरक . पण दोघीही उत्तम
करत . आणि हो चित्त्पावनच नाही तर देशस्थ पण उत्तम करता :).
श्राद्ध आणि सण यात हि भाजी पाहिजे . आमच्याकडे चुका (आबंट हो) घालतात यात. हेमाताई आणि अंजली असे वाटले कि एकदम पानावर येऊन बसावे.
खूप आठवणी जाग्या झाल्या या लेखामुळे.
मागच्या वर्षीचा किस्सा आहे. गौरीच्या वेळेस हि भाजी होती प्रसादात ,काही मत्रिणींनी पहिल्यादा खालली त्यांना नवी चव आवडली पण जे नेहेमी खाणारे होते त्यांना कळले कि काय कमी होते भाजीला ..)

माझी एक आठवण अळू ची-
सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाचा स्वयंपाक करत होते. कुकर मध्ये वरण भात अन् अळूची भाजी शिजायला ठेवून काहीतरी घ्यायला दुसऱ्या खोलीत गेले. इकडे कुकर चा मोठ्ठा स्फोट.
नशिबाने तिथे कुणीच नव्हतं. त्यापुढे पसारा आवरायला तासभर. अन् पुढे छतावर अळू ची नक्षी वर्षभर.

वर्णिता होऊ दे तुझ्या मनात आहे तश्या चवीची भाजी ...
इंद्रा, छान लिहिलं आहे.
SharmilaR , कुकरचा स्फोट भयंकर गोष्ट आहे , कायम लक्षात राहिल अशी आणि ते ही सासऱ्यांच्या श्राद्धाच्या दिवशी ...

मनीमोहोर, उत्तम लेख. आणी प्रतिसादही छान आहेत. माझ्या माहेरी अशीच अळूची भाजी करतात. आणी श्राद्धाला तर पाहिजेच. त्यामुळे एकदम रिलेट झाले.
पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

ssj थॅंक्यु.
अनामिका विपु मिळाली , थॅंक्यु so much. तुला उत्तर ही सेंड केलंय पण इथे ही लिहितेय , मी जागू ची रेसिपी फॉलो करते ती नीट फॉलो कर. मस्त होतात. खाली लिंक देत आहे.
https://www.maayboli.com/node/79731
मस्त होऊ देत तुझ्या अळूवड्या.

वाचली. थँक्यु. हा लेख वाचल्यावर अळूची भाजी सतत डोक्यात फिरत होती आणि मागच्या शनिवारी जावेच्या हातची आयती खाल्ली सुध्दा. Lol साबांना कळेचना मला इतका कशाचा आनंद? Happy
आता अळूवड्या आणि देठींचे भरीत करायचा प्लॅन आहे.
हेमा काकू... परत आभार तुमचे.

भरपूर चिंच घालायची आणी लाज वाटेल इतका गूळ घालायचा. >> Rofl इथेच चूक झाली, गोडसर आवडत नसल्याने गुळ खूपच कमी घातला होता.

वाचली. थँक्यु. हा लेख वाचल्यावर अळूची भाजी सतत डोक्यात फिरत होती आणि मागच्या शनिवारी जावेच्या हातची आयती खाल्ली सुध्दा. Lol साबांना कळेचना मला इतका कशाचा आनंद? Happy >> अळू डोक्यात घोळत होतं आणि अळू खायला ही मिळालं तुला म्हणून मला ही खूप मस्त वाटलं.
अनामिका, वड्या करून झाल्या का ? छान झाल्या होत्या का ?

इथेच चूक झाली, गोडसर आवडत नसल्याने गुळ खूपच कमी घातला होता. >> चिंच आणि गूळ दोन्ही भरपूर लागत ह्या भाजीला.

यावेळी ताजा अळू तोडून, अळूची पातळ भाजी आणि देठी केली होती. देठी प्रकार आवडला, पण त्यात अळूची अशी चव जाणवली नाही, परत करेन तेव्हा अजून जास्त देठ वापरून करून बघेन. हो अळूचे देठ हिरवे/पोपटी आहेत, डार्क /काळे असले कि वेगळी चव असेल का?

ईथे घरचा अळू खाजरा नाही ना हे बघतो, मग त्यात वडीचा, भाजीचा अळू असा भेदभाव न करता, पातळ भाजी, वड्या करुन तल्लफ भागवतो Happy
ईथली अळूची पान चिरुन तेलावर परतून घेतली व जरा बेसन लावुन घोटली कि मिळून येते.
फोडणीत तेलावर मेथीदाणे खमंग परतून, मोहोरी, हळद, भरपूर हिंग, हिरवी मिरची चिरुन, कडीपत्ता, भिजवलेले शेंगदाणे + हरभरा डाळ + काजू, शिजवून व थोडं बेसन लावून नीट घोटलेला अळू + आंबट चुका(असल्यास), चिंचेचा कोळ , भरपूर गुळ ( चिंचेच्या किमान दुप्पट ), ओलं खोबर, चवीपुरतं मीठ. आमच्या कडे या भाजीत गोडा/गरम मसाला घालत नाहीत.
अळूच्या पातळ भाजीबरोबर मस्त गरम वरण भात तूप मीठ लिंबू असल तरी बस! बाकी काही नसलं तरी चालेल Happy

अंजली तुझ्याकडचा अळू मस्त बहरला आहे.
आमच्या अळूला कॅलिफोर्नियाच्या दुष्काळाच्या झळा लागल्यात, पण किचन वापराच्या पाण्यावर तग धरून आहे अजून Happy

Alucgi bhaji.jpgAlu_Vadi.jpgAlu Leaves.jpeg

पुणेकर, कातिल फोटो आलेत भाजीचे, वड्यांचे. मला अजून भाजीचा अळू मिळाला नाहीये. काळे देठ वालेच अळू आहेत सगळे. भाजीवाले म्हणतात याचीच भाजी होती की. गावातल्या मोठ्या मंडईत चक्कर टाकली पाहिजे.
तिसऱ्या फोटोत अळूच्या शेजारी जांभळ्या शेंगा कसल्या आहेत? हिरव्या घेवड्या सारख्या आहेत का? ( कु का त कु का - अळूच्या धाग्यावर अळूची हिरवीगार पानं बघून गप बसावं की नै)

मी पुणेकर फोटो फारच सुन्दर दिसतायत. भाजी आणि वड्या दोन्ही. एकदम मस्त.
मला मोठी मोठी अळूची पानं बघणं ही खूप आवडतं. एकदम सुदिंग वाटत नजरेला. परदेशात ही अळू बिळू घरी लावता खूपच कौतुक आहे तुमचं.

रेसिपी perfect लिहिली आहेस. एवढ्या मोठ्या धाग्यात प्रॉपर रेसिपी मिसिंगच होती. त्याबद्दल धन्यवाद.

पुढच्या वेळी जास्त घालून बघ देठी , पडेल फरक.

तिसऱ्या फोटोत अळूच्या शेजारी जांभळ्या शेंगा कसल्या आहेत? हिरव्या घेवड्या सारख्या आहेत का? ( कु का त कु का - अळूच्या धाग्यावर अळूची हिरवीगार पानं बघून गप बसावं की नै) >> वर्णिता हा हा हा
भाजीवाला म्हणला तरी काळ अळू आणि पांढरं अळू हा शहरात फरक पडतो. वड्याना काळसर आणि भाजीला पांढरट च लागत शहरात.

गाठीची भाजी केली होती
पण गाठी सुटल्या >> blackcat करून बघितलीत हेच जास्त आहे. ती थोडी ट्रीकी भाजी आहेच. कारण अळू शिजलेलं ही हवं आणि गाठ ही सुटायला नको. पहिल्या फटक्यात जमणं कठीण आहे.
Btw ह्या भाजीसाठी शहरात भाजीसाठी मिळत ते घ्या अळू. वडयांचं अळू नका घेऊ. तसच पानं थोडा वेळ तशीच ठेवून द्या किंवा एक सेकंद शेकवा गॅसवर म्हणजे मऊ पडतील आणि घट्ट गाठी घालता येतील.

मी म्हटलं होतं तसं ही आमची रेडी टू eat अळूची भाजी. मुळात अळू च टेस्टी असत तिकडंच त्यामुळे छान होते आणि अळू सोला , चिरा काही व्याप नाही. हा फोटो हेडर मध्ये ही देऊन ठेवते.

20220810_191349.jpg

मीपुणेकर, जबरी फोटो. पुढच्या वर्षी परत अळु लावायचा ट्राय करते.
ममो मस्त वाटत आहे प्रोडक्ट. आईला घेवून ठेवायला सांगेन.

ममो मस्त वाटत आहे प्रोडक्ट. आईला घेवून ठेवायला सांगेन. >> आईला ट्राय करून बघायला सांग एक पाकीट आधी, मग ने तिकडे.
आमच्या मुलीला अळू म्हणजे जीव की प्राण , ती हल्ली हेच नेते. ही आणि फणसाची ही.

शिजवून खायचे की सलाईनमधून द्यायचे Happy

अळू वाचून वाचून एकदा भाजी केली.आज अळूवड्या केल्या आहेत.तळायच्या आहेत. ऑनलाईन पाने मागवली.ती इटुक पिटुक होती.मग कुंडीतल्या भाजीच्या alvachi 2 पाने उपयोगी पडली.

रेडी टू ईट मस्तच. ममो, तिखट नाही ना ही फार? मागे एकदा पुण्याहुन घेतलेली (ब्रँड आठवत नाही). चव चांगली होती पण जहाल तिखट निघाली.
नसेलच तुमची पण एकदा तोंड अगदी शब्दशः पोळलंय म्हणून विचारलं. Happy ही पण पुढच्य ट्रिपला अ‍ॅड करतो Happy

हेमाताई पॅकिंग छान आहे. उकडगऱ्यांचं मिळतं का असं रेडीमिक्स? पाऱ्याच्या फणसाचं नकोय.
यंदा आमच्याकडे गौरी आहेत, अळूवड्या होतीलच. नक्की फोटो देईन इथे.

लेख आणि सगळ्यांच्या भाज्या/ वड्या खासच __/\__

Pages