खमंग, चटपटीत अळूवडी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 August, 2021 - 05:00

IMG_20210809_154127.jpg
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतितील लाडका आणि मानाचे स्थान असलेला पारंपारिक पदार्थ म्हणजे माझ्या मतानुसार अळूवडी. खुसखुशीत, खमंग, रुचकर तितकीच देखणी अशी अळूवडी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असते. मराठमोळ्या पक्वान्नाच्या ताटात तर अगदी दिमाखदार पणे ही भाव खाऊन बसते. श्रावणात तर या अळूवडीला भारीच मान.
अळूच्या पानांचे बरेच प्रकार असतात त्यातील काही खाजरे तर काही कमी खाजरे. पण चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरे पणा जातो. चॉकलेटी रंगाचे गावरान अळू, पांढर्‍या देठाचे अळू, हत्तीच्या कानाएवढे मोठी पाने असलेले अळू आणि अळूवडी साठी खास वापरण्यात येणारे काळ्या देठाचे आणि गडद हिरव्या रंगाच्या पानांचे अळू. श्रावण सरींपर्यंत या काळ्या देठाच्या अळूची पाने हिरवी, तजेलदार आणि बाळसेदार झालेली असतात. बाजारात तर श्रावणात भरपूर विकायला येतात ही पाने आणि घरच्या लागवडीची असतील तर मग करावे तितके कौतुक थोडेच.
उपवास असलेल्या काही घरी दर आठवड्याला तर काहींकडे श्रावणात एकदा तरी अळूवडी करून उपवासाच्या नैवेद्याच्या ताटात या अळूवडी ताईंना मान दिला जातो. गृहिणी ताटात ठेवतानाही तिला जपून हळुवारपणे ठेवते बरं का कारण अळूवडी करताना गृहिणीचे पाककौशल्य त्या पदार्थासाठी प्रेमपूर्वक केलेले श्रम त्या अळूवडीत उतरलेले असतात. कष्ट आणि संयम हे अळूवडी करताना ठेवले की अर्धे यश हाती लाभते. बाकी अवलंबून असते ते प्रमाणात घेतलेले बेसन म्हणजे चण्याचे पीठ, त्याच पिठाची सोबत करणारे तांदळाचे पीठ ज्याने खुसखुशीतपण येतो, त्यातील जिभेला चव आणणारे आंबट गोड चवीचे चिंच आणि गूळ , मिरची पूड, गरम मसाले, मीठ व इतर काही चवदार व पौष्टिक जिन्नसे यांचे योग्य प्रमाण, पिठाचा बेताचा पातळपणा, योग्य पद्धतीने अळूची पाने लावून कलाकुसरीने पाने दुमडून त्याची वळकटी गुंडाळून उंडे करणे मग ते उंडे योग्य वेळ ठेवून वाफवणे आणि शेवटचा टप्पा म्हणजे ते व्यवस्थित कापून त्यांना प्रमाणबद्ध तळणे. असे केल्यावर तयार होते ते गोल, आत पदर असलेली अशी नक्षीदार खुसखुशीत चटपटीत अळूवडी. काहींना ही अळूवडी नुसती उकडून आवडते तर काहींना फोडणी देऊन पण जास्त चविष्ट लागते ती तेलाचे संस्कार करून तळलेली अळूवडीच. चला तर मग बघूया आमच्या चविष्ट या यू ट्यूब चॅनेलवर मराठमोळी गुणी आणि सगळ्यांची लाडकी अशी अळूवडी.
https://youtu.be/jkDYE7w4rcM
चविष्ट (उरण) - कृपया लेखन कॉपी पेस्ट करू नये केल्यास चविष्ट नावाने व लिंक देऊन करावा ही नम्र विनंती.IMG_20210809_154127.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खतरा दिसतेय
धागा उघडतानाच वाटलेले की झणझणीत अळूवडी बघायला मिळणार..

छानच. .
तांदळाचे पीठ आणि सुके खोबरे घालतात ही नवीन माहिती कळली.
उकडायचे भांडे एकदम पारंपरिक दिसतेय.
लेखाच्या शेवटी तुझे नाव आणि चॅनलची लिंक दे..

काय म्हणावं या डिजेंना Uhoh अहो डिजे , जागु अजून चाळीशीत पण नाही, तर काकु काय म्हणताय तिला ? आँ ! ताई म्हणा, वैनी म्हणा. Happy

अहो, ते मी माबो वर आलो तेव्हा पासून म्हणतो... घरातील थोरल्या स्त्रीप्रमाणे त्या स्वतः शाकाहार, मांसाहार असा कोणताही भेदभाव न करता त्यांच्या पारंपारीक स्वयंपाकाच्या रितींचा काटेकोर अभ्यास असल्याने अगदी निगुतीने स्वतः स्वयंपाक करतात.. त्यातले बारकावे सांगतात.. घरातील सर्वांना खाऊ घालत असतीलच पण इथे रेसिपिंचे फोटो टाकून माबोकर मंडळींच्या पोटात भुकेचा खड्डा पाडतात Proud . अशा स्वानुभवी अन्नपुर्णा असणार्‍या स्त्रीचं वय काहीही असो पण घरातील थोरल्या काकीचं प्रतिबिंब त्यांच्या पाककृतींतून दिसतं म्हणुन मी त्यांना आदराने काकी म्हणतो. Bw

तुम्हाला पण नाही का वैनी म्हणत.. Wink

छान

किशोर, blackcat, ऋन्मेष, अमुपरी, DJ, रश्मी, धनवन्ती.

Dj काकी ताई काहीही म्हणा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सन्मानाबद्दल.

रश्मी अग धुमकेतूसारखी येते कारण पहिलासारख आता आ‌‌‌ॅफिसच्या पिसीवर माबो उघडत नाही. मोबाईलवर सगळ पहाण, लिहिण मला किचकट वाटत. घरी laptop वर बसल्यावर माबोवर काही करता येत त्यामुळे हल्ली माबोवर मधुन मधुनच येण होत.

धनवन्ती हो ते मोदकपात्र माझ्या सासूबाईंच आहे.

आत्ताच अळू आणलाय वड्यांचा. करणारे.
तांदळाचे पीठ आणि सुके खोबरे घालतात ही नवीन माहिती कळली.>>>+1मलापण.
काय टेम्प्टींग दिसताएत.

धुवून, पुसून, पूर्ण कोरडी झाल्यावर प्लास्टिक पिशवीत घालून ठेवा फ्रीजात. बाहेर ठेवलीत तर सुकतील.

रेसिपी खमंग आणि फोटो चमचमीत आणि विडिओ कुरकुरीत.
मस्त. आज रविवारच्या नाष्ट्यालाच करणार आहे.

गृहिणी, पौष्टिक, संस्कार असे अनेक लोडेड शब्द लेखात येऊनही किंवा अळू कसा शरीरासाठी toxic आहे अशा विषयाच्या ठेकेदारांची जाब विचारण्यासाठी अजून इथे धाड पडली नाही हे तुमच्या पूर्व पुण्याईचे फळ आहे. Happy

जागु, तुझं वाचून, व्हिडीओ बघून आज केल्या. अप्रतिम झाल्या होत्या. आजपर्यंत एवढ्या छान कधी झाल्या नव्हत्या.
थॅंक्यु जागु.

ममो मस्त दिसताएत गं तुझ्या अळूवड्या. मी तव्यावर शॅलो फ्राय केल्या. ६ पानांचे दोन छान व्यवस्थित उंडे झाले. आता मला कॉन्फिडन्स आलाय कि मी अळुवडी करू च शकते. Happy

थॅंक्यु धनुडी , अळूवड्यांवर मी पण जामच खुश आहे. माझ्या इतक्या छान आत्ता पर्यंत कध्धीच झाल्या नव्हत्या, अर्थात त्याच श्रेय जागुला आहे.
आता मला ही confidence आलाय , परत कराव्याश्या वाटतायत☺️

जागू, छानच केल्या आहेस अळूवड्या! मी खोबरे नाही घालत.उद्या करेन त्यावेळी खोबरे घालून करेन.

ममो,धनुडी अळूवड्या झकास आहेत.

देवकी खोब-याने खाताना मस्त क्रिस्पी वाटतात अळूवड्या.

धनुडी आणि ममोताई खुप आनंद आणि समाधान वाटल तुमच्या पोस्टने. दोघींच्याही अळूवड्या छान झाल्या आहेत.

अश्विनी, अनू, अस्धमिता, किट्टू, ऋतूराज धन्यवाद.