पावसाळी भाजी ...अळू

Submitted by मनीमोहोर on 18 July, 2022 - 09:28
Aluchi bhaji

पावसाळी भाजी ...अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात , देठी चांगली जाडजूड होते . आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता , घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिला “फ़दफद” हा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही न म्हणता नुसतं “ अळू “ च म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला.

भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, ( आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाही केली तरी चालत असे. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षांपूर्वीच लिहितेय, आता कोकण ही बदललं आहे. असो. कधी कधी उपासाचं अळू ही करतो. त्याला थोडं दाण्याचं कूट, जिरं आणि हिरवी मिरची वाटून लावतो म्हणजे छान मिळून येतं.

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या न तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

अळूवड्या
20210816_135035_0.jpg

आणि हे प्रसादाचं ताट , अळूवडी हवीच ...
IMG-20210910-WA0008~2-1.jpg

कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर वापर किंवा उपयोग आणि काही ही फुकट न दवडणे हे कोकणी माणसाच्या रक्तातच आहे. कोणतीही गोष्ट तशीच फेकून देववतच नाही कोकणी माणसाला. पूर्वीच्या काळी साधन सामुग्री कमी, हातात पैसा कमी, मार्केट नाही अशी अनेक कारण असू शकतील ह्या मागे. पण त्यामुळे अळू वड्या केल्या की त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या देठीची रस्सा भाजी केली जातेच दाण्याचं कूट, ओलं खोबरं घालून. गॅसवर भाजून मीठ हिंगाबरोबर चुरडलेली हिरवी मिरची आणि आंबटसर दही घालून भरीत ही करतो कधी कधी देठीच. इथे मुंबईत ही मी वड्यांचं अळू आणलं तर ती मरतुकडी देठी ही फेकून देत नाही, भरीत करतेच. शेवटी कोकणी रक्तच धमन्यातून वहात आहे माझ्या ही. ☺️

मर्यादित साधन सामुग्रीतून नाविन्यपूर्ण पदार्थ करणे हे कोकणी माणसाचं खरं कसब आहे आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अळूच्या गाठी. ह्यासाठी अळू आदल्या दिवशी कापून घरात आणून ठेवतात म्हणजे ते थोड मऊ पडत आणि त्याच्या गाठी वळण सोपं जातं. साधरण तळ हाता एवढा आळवाच्या पानाचा तुकडा कापून किंवा हातानेच फाडून त्याची सुरनळी करायची आणि त्याची गाठ वळायची. गोल भरीव रिंग सारख्या दिसतात ह्या गाठी. अश्या गाठी वळून घेऊन त्यांची भाजी करायची. ह्या गाठी वळायला खूप वेळ लागतो आणि भाजी शिजली की मरत असल्याने भरपूर गाठी वळाव्या लागतात. अति शिजून गाठींचा लगदा होणार नाही इकडे ही लक्ष ठेवावं लागतं भाजी करताना. अळूची गाठ नीट शिजवणे आणि तिचा आकार ही टिकवून ठेवणे हे खरं स्किल आहे ह्या भाजीचं. गाठीची भाजी हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे.

ऋषी पंचमीच्या भाजीत ही घरच्या भेंडी, भोपळा, माठ, पडवळ , काकडी दुधी, सुरण ह्या बरोबर अळू लागतंच. श्राद्ध किंवा पक्ष असेल घरात तर अळू करावंच लागत. श्रद्धा चा स्वयंपाक अळू शिवाय अपूर्णच असतो. काही ठिकाणी तर त्यामुळेच शुभ कार्याच्या मेन्यूमध्ये अळूचा समावेश नसतो. अळू निषिद्ध मानलं जातं. असो.

अश्या तऱ्हेने जोपर्यंत आगरात अळू आहे तोपर्यंत आज काय जेवायला करू हा पेच बायकांना पडत नाही. वर सांगितल्या पैकी एखादा पदार्थ करून वेळ साजरी केली जाते. पानातली डावी बाजू, उजवी बाजू , तळण असं काही ही करता येत असल्यामुळे अळू हे गृहिणींना वरदान वाटते. पत्त्यातल्या जोकर प्रमाणे अळू गरजेनुसार पानात कुठे ही फिट बसते.

पावसाळा संपत आला की मात्र फोफावलेलं अळू सुकायला लागतं. मुद्दाम पाणी घालून गरजेपुरतं थोडं जगवलं जातं पण बाकीचं कमी होतं आपोआप. हल्ली आम्ही फणसाची भाजी जशी पॅक मिळते तशी अळूची भाजी ही करून ठेवतो त्यामुळे कधी ही भाजी पटकन करता येते. परदेशातल्या नातेवाईकांना ही तिकडे घरचं अळू खाल्ल्याचं समाधान देते. हा आमच्या भाजी चा फोटो.
20220810_191349.jpg
अर्थात अळूची गोष्ट इथे नाही संपत. दिवाळीच्या सुमारास वरची पानं सुकली की तिथे खणून खालती लागलेल्या आळकुडया काढल्या जातात. मीठ आणि कोकम घालून उकडल्या की मस्तच लागतात. उत्तर प्रदेशात आणि सिंधी समाजात ह्या आळकुडया म्हणजे आर्वी फार पॉप्युलर आहे. ते ह्यांची चमचमीत सुखी करतात पण आम्ही उकडून खाण्याशिवाय जास्त काही करत नाही.

काही चांगल्या मोठ्या आळकूडया पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवून देतो. अश्या तऱ्हेने आगरातल्या अळूचे चक्र अनेक वर्षे चालू राहते.

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लेख. कोणत्याही विषयावर घरगुती आस्थेने लिहिणे तुम्हांला छान जमते.
अळू म्हटलं की मला नेहमी नागपंचमीचा दुसरा दिवस आठवतो. उंच वाढलेल्या माडाळवाची मोठी मोठी काळसर हिरवी पानं. जाड रसरशीत देठ. सगळंच चिरून आई भाजी करायची. अळू असं दणकट दिसलं तरी भाजी अगदी मऊ व्हायची. एका मोठ्या ताटात त्या भाजीचा मोठा द्रोण, घट्ट दही आणि वाफाळता भात घेऊन आई विहिरीवर यायची. आजूबाजूच्या मुलांना बोलावून त्यांच्यावर पाणी ओतून त्यांना ओलेतं करायची आणि अतीथ कोण असं म्हणून त्या मुलांच्या दोन हातांवर दही आणि अळवामध्ये कालवलेल्या गरम भाताचे मोठे उंडे ठेवायची. ती चव अजूनही विसरता येत नाही. ती काही तरी आकोबा तुकोबा अशा दोन मुलांची गोष्ट आहे. त्यांना हाक मारून बोलवायचं आणि घास द्यायचे.
बाकी गाठीची भाजी अनेक वर्षांत खाल्लेली नाही. छानच लेख. आठवणी जाग्या झाल्या.

पहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद हीरा.
हीरा मस्त प्रतिसाद , तुम्ही फार सुंदर लिहिता. छान आठवण लिहिली आहे. हे मला माहित नव्हतं मात्र.

अळू सारख्या विषयावर ही तुम्ही इतके छान कसे लिहिता हो ममो ? लेख सुंदर च आहे .फोटो ही छान . तुमचा लेखातून कोकणी माणसाबद्दल चा अभिमान जागोजागी दिसतो .

आमची लाडकी भाजी. हेमाताई तुम्ही खूप सुरेख लिहिलं आहे.

एका अशाच धुंवाधार पावसात मी आणि माझी ताई बाबांची कावासाकी बाइक घेऊन भटकायला निघालो. वरच्या आळीतून सड्यावर जाऊन तिथल्या एका भारी पैकी बंगल्याचा केस स्टडी केला. (ताई आर्किटेक्चर करत होती). मग इतक्या पावसात कांदाभजी हे फार टिपीकल होतं म्हणून वाटेतच मावशीच्या घरी जाऊन तिच्या परसदारचं अळू काढून आणलं, अळूवड्या करायला. तिन्हीसांजेला घरी आलो तर इतक्या पावसात गेलोच कशा म्हणून आम्ही आणि "तुम्ही तरी त्यांना कसं जाऊ दिलंत" म्हणून बाबांनी ऐकून घेतलं. मग अळूवड्या घडल्या. नवशिक्या अळूवड्या घशाशी खाजतायत हे कळेस्तोवर रात्रीचे १० वाजून गेले होते. मग वरून चिंच खावी असं आमचं आमचंच ठरलं आणि बुटुकभर चिंच खाल्ली. मग घसा कमी आला.

याच मावशीकडे सगळी भावंडं जमली होती तेव्हा स्वयंपाक चालू होता, अळूची भाजीच फक्त तयार होती. "बघत्येस काय गं जरा कशी झाली ते" असं म्हटलं तिने, तर आवडली म्हणून मी आणि ताईने मिळून ३-४ वाट्या भाजी अशीच खाल्ली होती.

माझ्याकडे वसईची अळू आहे. खूपच चवदार आहे. पाने पातळ आहेत आणि कमी खाजरी आहे. पातळ भाजी खूपच चवदार होते. अळूवड्यांची भाजी कधी खाल्ली नाही, आता नक्की करून बघेन. अळूची पातळ भाजी ,पोळी ,भात किंवा नुसती ओरपून खाता येते. अळूची पातळ भाजी बनवावी ती कोकणी लोकांनीच.
एका मुंजेत मी अळूची पातळ भाजी खाल्ल्याचे आठवते. चित्पावन ब्राम्हणांची मोनोपोली असावी हि भाजी बनवण्यात.

मस्त लेख. आमच्या वाड्यात अळू होता, अजिबात खाजरा नव्हता. वाडा पाडला तेंव्हा त्या अळूचे कंद ओळखीत वाटल्याचे आठवत आहे. पूर्वी पुण्यात लग्नात अळू असेच असे. अळू, खोबऱ्याचे काप, मुळा, चुका, ह डाळ, दाणे आणि चिंच गूळ Happy अळूची वड्यांची भाजी पण मस्तच लागते.

ऋषी पंचमी ला हमखास होणाऱ्या भाज्यांमधली ही भाजी,आम्ही 'तेरी म्हणतो त्या भाजीला,अगदी छान लागते पण मी स्वतः भाजी नाही केली कधी,वड्या नाहीतर पोळाच लावते मी,
खूप छान लिखाण ममो

सुंदर लिहिलंय ममो.
भाजीचं आणि वडीचं अळू एकच >> हे तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं Happy अळूची भाजी करताना आमच्याकडे 'आंबटवेल' घालतात. चिंच किंवा आंबट चुका नाही.

गाठी हा प्रकार मात्र मलापण माहिती नाही. वड्यांची भाजी खाल्ल्याचं आठवतंय. अळूची भाजी आणि नेहमीच्या अळुवड्या हे मात्र नेहमीचे यशस्वी कलाकार! गावाहून आम्ही कुणी पुण्याला जाणार असलो किंवा आईबाबा पुण्याला येणार असले की हल्ली आई अळुवडीचे उंडे करून उकडून आदल्या दिवशी फ्रिजमध्ये ठेवते. दुसऱ्या दिवशी ते पुण्याला आणायचे आणि गरमागरम अळुवड्या करायच्या. म्हणजे सगळ्यांनाच खायला मिळतात.
वर आदूने लिहिलंय ती तेरीही आमच्याइकडे पावसाळ्यात उगवते. तिची भाजीपण मस्त होते. तेरीची पानं लहान लहान असतात.

फारच छान लेख, अळू शिक्षणाला पुण्यात आल्यावरच जास्त खाण्यात आला , कधीकधी ही पातळभाजी न्यू पूना बोर्डिंग हाऊसला असे, एकदोनदा सुवर्णरेखा मेसला पण खाल्ला आहे हा प्रकार. बाकी आमच्याकडे गावी इतकं प्रस्थ नाही अळूचे, मुळात सातारच्या दुष्काळी भागातील गाव आमचे तिथं माणसाला प्यायला पाणी नसेल त्यात आणि अळू कोणी मातवायचा ! पावसाळ्यात गावच्या ओढ्याला वगैरे अळू असे पण हा शिजवून खातात ते माहिती नसे.

अळूचे पात्रा नाव धारण करणाऱ्या गुजराती अळूवड्या अन अळकुड्यांची भाजी ही पण प्रथम तिथेच खाल्ली होती. नंतर महाराष्ट्रात आल्यावर आपल्याकडेही वड्या अन कुड्यांची भाजी होते हे महाज्ञान प्राप्त झाले होते, आजही जर एखाद गुजराती रेस्टॉरंट हलवायाकडे जाणे झाले तर पत्नीसाठी खमण, पोरांसाठी समोसे अन माझ्यासाठी खास पात्रा येतोच घरी.

नेहमीप्रमाणे मस्त लेख
अळूभाजी, वडी अत्यंत प्रिय
गावी बारमाही अळू आहेत, मुंबईला येताना मी मोठी मोठी पाने कापून व्यवस्थित गुंडाळून आणत असे, ते कापताना त्या डागांचे भय
गुजराती "पातरा" गोडूस लागते, फार आवडत नाही
खाजरे अळू आणि चिंचेविषयी:
अळूत, देठात calcium oxalate चे crystal असतात. ते सुईसारखे टोकदार असतात. चिंचेत tartaric acid असते, त्यात ते विरघळतात.
आपली खाद्यसंस्कृती अफाट आहे

कुठल्या तरी बेटावर चुकून चार पोरे गेली होती आणि ती तिथेच अडकून पडली होती. दोन वर्षांनी जेंव्हा ती सापडली तेंव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त सुदृढ होती म्हणे

2 वर्षात त्यांना तिथे एक झाड सापडले , त्याचे मूळ , देठ अन पान तिन्ही ईडीबल होते म्हणे , ते खाऊन जगले म्हणे.

कोणते म्हणून बघितले तर कोलोकेशिया

म्हणजे अळू

जेम्स वांड, पावसाळ्यात आपोआप उगवणारे अळूसारखे सगळेच प्रकार खाण्यासारखे नसतात. ज्यांना माहिती असतं ते बरोबर योग्य ती पानं शोधून आणतात Happy

मस्तच लेख नेहेमीप्रमाणे!!
कोणत्याही विषयावर घरगुती आस्थेने लिहिणे तुम्हांला छान जमते. >> +१

देठी किंवा गाठी हे प्रकार कधी खाल्ले नाहीत. अळूची पातळ भाजी, अळूच्या वड्या खूप आवडतात. लहानपणी समजत नव्हते. आता मिळत नाही तेव्हा किंमत कळते आहे.

@वावे

मला पण तसेच वाटले बघा कारण गावात शक्यतो ओढा गचपण वगैरे अनाकर्षक ठिकाणीच ती पाने वाढलेली दिसतात, पण खायचा अळू जबरदस्त असतोच, आता मंडईत पाने शोधणे आले किंवा भाजीवाल्याला स्पेशल ऑर्डर देऊन मागवणे आले अळूची पाने, इतकं जोरदार लेखन आहे का ते वाचूनच अळू खायची इच्छा झाली हे हे हे हे.

गंमत म्हणून अळकुड्या वगैरेवर गूगल केले तर सिंधी जेवणातले आलू टुक हे बाळ बटाट्याचे अन अरबी टुक हे अळकुड्यांचे उकडून साबूतच थोडे ठेचून धणे पावडर वगैरे घालून तळलेले पदार्थ दिसले, एक्सप्लोर करावे लागणार अजून

पावसाळ्यात आपोआप उगवणारे अळूसारखे सगळेच प्रकार खाण्यासारखे नसतात. ज्यांना माहिती असतं ते बरोबर योग्य ती पानं शोधून आणतात >>>
हो. याबाबत एक किस्सा घडलेला आहे. बाबा व काका १२-१३ वर्षांचे असताना एकदा गावाकडे तलावाजवळ उगवलेले अळू (?) भरपूर तोडून घरी घेऊन आले.
तोडतानाच अंगाला बऱ्यापैकी खाज सुटली. पण त्याकडे दुर्लक्ष करून घरी येऊन स्वतःच भाजी वगैरे करून खाऊन फस्त पण केली. (आजोबा घरी न्हवते)
संध्यकाळपर्यंत प्रचंड जुलाब उलट्या सुरू झाल्या. आजोबा घरी आले तोवर दोघे अक्षरशः निपचित पडलेले होते. घाईघाईने डॉक्टरकडे न्यावे लागले. It was a medical emergency. मग प्रकारचा छडा लावला तर हे जंगली अळू उर्फ ब्रह्मराक्षस खाल्याचे समजले. त्यानंतर पुढे कित्तेक वर्षे साधा अळू खायला पण घाबरायचे दोघे

छान लेख.
भाजीच्या अळूची आणि वड्यांच्या आळूची पाने कशी ओळखायची?

अळूव डी माझी फेव्रिट. गरम वरण भाता बरोबर किंवा अगदी मस्त सायीच्या दहि भाता बरोबर कुरकुरीत मस्त लागतात. आळूची पातळ भाजी पुण्यातील लग्नात बेस्ट . मसाले भात अळूची भाजी व जलेबी. मठ्ठा.

धन्यवाद सर्वांना.
प्रज्ञा मस्त आठवण . लिहितेस छानच.

चित्पावन ब्राम्हणांची मोनोपोली असावी हि भाजी बनवण्यात. >> आग्या १९९०, असं काही नाही प्रत्येकाची वेगळी चव एवढंच.

अळू सारख्या विषयावर ही तुम्ही इतके छान कसे लिहिता हो ममो ? लेख सुंदर च आहे .फोटो ही छान . तुमचा लेखातून कोकणी माणसाबद्दल चा अभिमान जागोजागी दिसतो . >> धन्यवाद अश्विनी.

वावे मस्त आयडिया उंडे करून आणण्याची. मी नाही आणलेत कधी पण म्हणे हल्ली काही मराठी दुकानात ही असे उंडे मिळतात विकत , अर्थात घरच्याची चव वेगळीच.

अळूचा महिमा भारीच. BLACKCAT

गावी बारमाही अळू आहेत, मुंबईला येताना मी मोठी मोठी पाने कापून व्यवस्थित गुंडाळून आणत असे, ते कापताना त्या डागांचे भय >> ऋतुराज हो , आमचेकडे ही गणपतीत जाणारे येणारे भेटले की घरच अळू येत इकडे ठाण्यात ही.

अळूची भाजी करताना आमच्याकडे 'आंबटवेल' घालतात. >> वावे आमची आई त्या आंबट वेली ची ही भाजी करत असे. पण सासरी कोकणात नाही करत आंबटवेल, चिंच कोकम किंवा आंबट ताक ही घालतात.

बाकी आमच्याकडे गावी इतकं प्रस्थ नाही अळूचे, मुळात सातारच्या दुष्काळी भागातील गाव आमचे तिथं माणसाला प्यायला पाणी नसेल त्यात आणि अळू कोणी मातवायचा ! करेक्ट आहे , अळूच प्रस्थ कोकणातच जास्त. अळकुडया सिंधी , यूपी वाले खूप खातात. ते आमचूर पावडर वैगेरे लावून शिजवून घेतलेल्या अळकुड्या थोड्या फ्लॅट करतात हातावर आणि परतून भाजी करतात. आम्ही उकडूनच खातो जनरली. कधी तरी दह्यातलं भरीत करतो उपास असेल तर.

देठी आणि गाठी हे रेअर प्रकार आहेत सुमुक्ता.
विषारी अळू विषयी मी पण ऐकलं आहे खूप. मला तर वाटत रानभाजी घेताना ती खात्रीच्या भजीवाल्या कडूनच घ्यावी. मनिम्याउ काय भयानक प्रसंग ओढवला .. नशीबाने वाचवलं.

श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना केळीच्या पानात अळूच्या तळलेल्या खरपूस वड्यांना खास मान असतो आमच्याकडे. गावी न्हाणीघराच्या आसपासच्या गरम पाण्यातील दलदलीतच अळू उगवते. सध्या घरा बाहेरील न्हाणीघर आत गेल्यामुळे अळू सुद्धा दिसत नाही. अळूची वेगळी स्वतंत्र अशी शेती कोठे पाहिली नाही. कोठे असल्यास जाणकार सांगतीलच. ममो नेहमीप्रमाणे उपयुक्त माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा