पावसाळी भाजी ...अळू

Submitted by मनीमोहोर on 18 July, 2022 - 09:28
Aluchi bhaji

पावसाळी भाजी ...अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात , देठी चांगली जाडजूड होते . आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता , घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिला “फ़दफद” हा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही न म्हणता नुसतं “ अळू “ च म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला.

भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, ( आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाही केली तरी चालत असे. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षांपूर्वीच लिहितेय, आता कोकण ही बदललं आहे. असो. कधी कधी उपासाचं अळू ही करतो. त्याला थोडं दाण्याचं कूट, जिरं आणि हिरवी मिरची वाटून लावतो म्हणजे छान मिळून येतं.

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या न तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

अळूवड्या
20210816_135035_0.jpg

आणि हे प्रसादाचं ताट , अळूवडी हवीच ...
IMG-20210910-WA0008~2-1.jpg

कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर वापर किंवा उपयोग आणि काही ही फुकट न दवडणे हे कोकणी माणसाच्या रक्तातच आहे. कोणतीही गोष्ट तशीच फेकून देववतच नाही कोकणी माणसाला. पूर्वीच्या काळी साधन सामुग्री कमी, हातात पैसा कमी, मार्केट नाही अशी अनेक कारण असू शकतील ह्या मागे. पण त्यामुळे अळू वड्या केल्या की त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या देठीची रस्सा भाजी केली जातेच दाण्याचं कूट, ओलं खोबरं घालून. गॅसवर भाजून मीठ हिंगाबरोबर चुरडलेली हिरवी मिरची आणि आंबटसर दही घालून भरीत ही करतो कधी कधी देठीच. इथे मुंबईत ही मी वड्यांचं अळू आणलं तर ती मरतुकडी देठी ही फेकून देत नाही, भरीत करतेच. शेवटी कोकणी रक्तच धमन्यातून वहात आहे माझ्या ही. ☺️

मर्यादित साधन सामुग्रीतून नाविन्यपूर्ण पदार्थ करणे हे कोकणी माणसाचं खरं कसब आहे आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अळूच्या गाठी. ह्यासाठी अळू आदल्या दिवशी कापून घरात आणून ठेवतात म्हणजे ते थोड मऊ पडत आणि त्याच्या गाठी वळण सोपं जातं. साधरण तळ हाता एवढा आळवाच्या पानाचा तुकडा कापून किंवा हातानेच फाडून त्याची सुरनळी करायची आणि त्याची गाठ वळायची. गोल भरीव रिंग सारख्या दिसतात ह्या गाठी. अश्या गाठी वळून घेऊन त्यांची भाजी करायची. ह्या गाठी वळायला खूप वेळ लागतो आणि भाजी शिजली की मरत असल्याने भरपूर गाठी वळाव्या लागतात. अति शिजून गाठींचा लगदा होणार नाही इकडे ही लक्ष ठेवावं लागतं भाजी करताना. अळूची गाठ नीट शिजवणे आणि तिचा आकार ही टिकवून ठेवणे हे खरं स्किल आहे ह्या भाजीचं. गाठीची भाजी हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे.

ऋषी पंचमीच्या भाजीत ही घरच्या भेंडी, भोपळा, माठ, पडवळ , काकडी दुधी, सुरण ह्या बरोबर अळू लागतंच. श्राद्ध किंवा पक्ष असेल घरात तर अळू करावंच लागत. श्रद्धा चा स्वयंपाक अळू शिवाय अपूर्णच असतो. काही ठिकाणी तर त्यामुळेच शुभ कार्याच्या मेन्यूमध्ये अळूचा समावेश नसतो. अळू निषिद्ध मानलं जातं. असो.

अश्या तऱ्हेने जोपर्यंत आगरात अळू आहे तोपर्यंत आज काय जेवायला करू हा पेच बायकांना पडत नाही. वर सांगितल्या पैकी एखादा पदार्थ करून वेळ साजरी केली जाते. पानातली डावी बाजू, उजवी बाजू , तळण असं काही ही करता येत असल्यामुळे अळू हे गृहिणींना वरदान वाटते. पत्त्यातल्या जोकर प्रमाणे अळू गरजेनुसार पानात कुठे ही फिट बसते.

पावसाळा संपत आला की मात्र फोफावलेलं अळू सुकायला लागतं. मुद्दाम पाणी घालून गरजेपुरतं थोडं जगवलं जातं पण बाकीचं कमी होतं आपोआप. हल्ली आम्ही फणसाची भाजी जशी पॅक मिळते तशी अळूची भाजी ही करून ठेवतो त्यामुळे कधी ही भाजी पटकन करता येते. परदेशातल्या नातेवाईकांना ही तिकडे घरचं अळू खाल्ल्याचं समाधान देते. हा आमच्या भाजी चा फोटो.
20220810_191349.jpg
अर्थात अळूची गोष्ट इथे नाही संपत. दिवाळीच्या सुमारास वरची पानं सुकली की तिथे खणून खालती लागलेल्या आळकुडया काढल्या जातात. मीठ आणि कोकम घालून उकडल्या की मस्तच लागतात. उत्तर प्रदेशात आणि सिंधी समाजात ह्या आळकुडया म्हणजे आर्वी फार पॉप्युलर आहे. ते ह्यांची चमचमीत सुखी करतात पण आम्ही उकडून खाण्याशिवाय जास्त काही करत नाही.

काही चांगल्या मोठ्या आळकूडया पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवून देतो. अश्या तऱ्हेने आगरातल्या अळूचे चक्र अनेक वर्षे चालू राहते.

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन प्रतिसादां बद्दल धन्यवाद.

अळू वाचून वाचून एकदा भाजी केली. >> देवकी Happy , बाजारची पान फारच लहान असतात, घरची होती म्हणून कामी आली.

ममो, हे पाकीट पुण्यात मिळते का? >> actually मला माहीत नाहीये , फोन नं आहे बघ पॅकेटवर , प्लिज फोन करून विचार म्हणजे सविस्तर कळेल.
अमितव आमची तिखट नसेल अस वाटतय. मी अजून खाऊन नाही बघितली आहे पण मुलगी आणि सुनबाई दोघी ही वापरतात त्या अर्थी तिखट नसेल.

उकडगऱ्यांचं मिळतं का असं रेडीमिक्स? पाऱ्याच्या फणसाचं नकोय. >>प्रज्ञा, उकडगऱ्याच पाकीट नाहीये , पाऱ्याच्या फणसाचच आहे. उकडगरे म्हणजे फणसाचे जून झालेले पण न पिकलेले गरे. गौरी गणपतीत केल्यास अळूवड्या की दाखव इथे ही प्रज्ञा.

विजयाताई , धन्यवाद . बरेच दिवसांनी भेटलात.

वर्णिता, त्या फोटोत अळू शेजारी जांभळी वालपापडी आहे Happy

सीमा, मागे आम्ही पण एक दोनदा ईंग्रो मधून अळूचे कंद आणून लावलेले, ती पानं प्रचंड खाजरी निघाली. तू परत आणून बघ.
ममो, अळूचं रेडी टू ईट मस्त. सोईचं असेल Happy

नावडत्या भाजीचे इतके चाहते बघून आश्चर्य वाटले, तळलेली अळूवडी मात्र आवडते Happy

BTW अळू कंद 'अरवी' म्हणून अन्यत्र लोकप्रिय आहेत हे वर आलंय - चमचमीत भाजी आणि तळलेल्या काचऱ्या दोन्ही पद्धतीने करतात/खातात. आपल्या तळलेल्या अळूवडीला उत्तर प्रदेशात 'रिकवच', पंजाब प्रांतात 'पतौड' तर उत्तरांचल भागात 'पैत्यूड' म्हणतात.

सहज आठवले म्हणून Happy

मी पुणेकर ह्यांच्या फोटोतलं अळू हे किंचित wavy marjin चं ,thidyaa वेगळ्या रंगाचं आणि गोलसर आकाराचं वाटलं, जे मुंबईत सहसा मिळत नाही.

>>>>>>>.मिळाली एकदाची अळूची पानं आणि अळूची पातळ भाजी काल घडलेली आहे. काल खाता आली नाही पण आज खाऊ.
कुठे मिळाली गं? इथे (जे एस क्यु) पटेलमध्ये, अपना बझार, डी मार्ट मध्ये नाहीत.

28 जुलै ला ममो नी दिलेला आशीर्वाद आज फळास आला. अगदी हवी तशी भाजी झाली. शर्मिला च्या, ममोंच्या टिप्स कामी आल्या. भरपूर चिंच गूळ, बराच वेळ रटरटत ठेवणे, पाणी काढून भाजी स्मॅश करणे. मसाल्याचं कँफुजन होत. मी कुठलाच मसाला घातला नाही. शर्मिला, लंपन, देवकी, ममो, पुणेकर रेसिपीबद्दल धन्यवाद. हा धागा आला नसता तर मी कधी ही भाजी करून नसती पाहिली. आता जमली म्हणल्यावर वरचेवर करणार. खूप खूप धन्यवाद ममो.

Screenshot_20220818-103141_Gallery.jpg

मस्त दिसतेय भाजी, वर्णिता. बाकी सगळ्यांच्याच भाज्यांचे फोटो छान आलेत. इतके फोटो बघून मला खावीशीच वाटतेय ( आयती) Proud

लंपन , सायो, वर्णिता मस्त दिसतायत भाज्या.

28 जुलै ला ममो नी दिलेला आशीर्वाद आज फळास आला. अगदी हवी तशी भाजी झाली. >> वर्णिता , मस्तच वाटलं हे वाचून.

एक दोन माणसासाठी केले की चांगले होत नाही

10, 20 लोकांसाठी हंडाभर केले की चव खुलते >> blackcat पटलं हे.

म मो तुमचे पॅक अळू कुठे मिळेल ? ऑनलाईन विकत घेता येईल का ? >> त्यावर फोन नं आहे बघ म्हणजे direct त्यांच्याशीच बोलता येईल. मला इतकं डिटेल माहीत नाहीये म्हणून.

केली एकदा! धागा पाहिल्यापासून चैन पडत नव्हतं! उगा कामाला लावलं ममोंनी! Proud

aLoo_final.JPG

इथे चर्चा वाचली म्हणून पारंपरिक पाककृती सविस्तर लिहिली आहे.

हा धागा वाचून जवळच्या दुकानातून अळू आणण्यात आला आहे.
सध्या अळू शीत कपाटात स्थानबद्ध आहे आणि मी अळूच्या फदफाद्याच्या प्रतीक्षेत आहे.

कोकणातलं आमचं अळू.. पांढऱ्या देठाच, जंबो साईजच
माझ्या मोठ्या पोळपाटावर ही न मावणर ..इतकं मोठं असून ही आहे सुपर सॉफ्ट. वड्या, भाजी सगळ ह्याचच करतो आम्ही. आज वड्या करणार आहे.

फोटो इथे डकवून ठेवतेय.

20230925_164101.jpg

वर दिसतेय त्या अळूचे वड्यांचे उंडे केले , दोन दिवस फ्रीजर मध्ये ठेवले आणि अगदी आयत्या वेळी काढून चेकिन बॅग मधून मुलीकडे लंडनला घेऊन गेले. छान टिकले होते. तिच्याकडे गेल्यावर लगेच पुन्हा फ्रीजर मध्ये ठेवले. पाच सात दिवसांनी वड्या तळल्या. कोणाला उपयोगी पडेल म्हणून जस्ट इथे लिहून ठेवतेय.
वड्या अप्रतिम झाल्या होत्या. ते अळू फारच ताजं ,मऊ आणि कोवळ असल्याने तोंडात अक्षरशः विरघळत होत्या वड्या.
हा फोटो
IMG-20231013-WA0005.jpg

ममो. धन्यवाद इथे दिल्याबद्दल.
बाकी या अळुवड्या म्हणजे अगदी साक्षेपी पाकचित्र वाटताहेत. तुमच्या घरचे खरंच भाग्यवान आहेत. इतक्या प्रेक्षणीय व चविष्ट पदार्थांचे साक्षीदार आणि भागीदार होऊ शकतात. :सलाम.

वा खमंग दिसतेय अळूवडी.

नाडण ते लंडन प्रवास भारीच, via ठाणे का, म्हणजे अळूची पाने नाडण, उंडे केले ठाण्यात आणि वड्या तळल्या लंडनमध्ये. हेमाताई ग्रेट.

Pages