पावसाळी भाजी ...अळू

Submitted by मनीमोहोर on 18 July, 2022 - 09:28
Aluchi bhaji

पावसाळी भाजी ...अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात , देठी चांगली जाडजूड होते . आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता , घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिला “फ़दफद” हा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही न म्हणता नुसतं “ अळू “ च म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला.

भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, ( आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाही केली तरी चालत असे. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षांपूर्वीच लिहितेय, आता कोकण ही बदललं आहे. असो. कधी कधी उपासाचं अळू ही करतो. त्याला थोडं दाण्याचं कूट, जिरं आणि हिरवी मिरची वाटून लावतो म्हणजे छान मिळून येतं.

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या न तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

अळूवड्या
20210816_135035_0.jpg

आणि हे प्रसादाचं ताट , अळूवडी हवीच ...
IMG-20210910-WA0008~2-1.jpg

कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर वापर किंवा उपयोग आणि काही ही फुकट न दवडणे हे कोकणी माणसाच्या रक्तातच आहे. कोणतीही गोष्ट तशीच फेकून देववतच नाही कोकणी माणसाला. पूर्वीच्या काळी साधन सामुग्री कमी, हातात पैसा कमी, मार्केट नाही अशी अनेक कारण असू शकतील ह्या मागे. पण त्यामुळे अळू वड्या केल्या की त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या देठीची रस्सा भाजी केली जातेच दाण्याचं कूट, ओलं खोबरं घालून. गॅसवर भाजून मीठ हिंगाबरोबर चुरडलेली हिरवी मिरची आणि आंबटसर दही घालून भरीत ही करतो कधी कधी देठीच. इथे मुंबईत ही मी वड्यांचं अळू आणलं तर ती मरतुकडी देठी ही फेकून देत नाही, भरीत करतेच. शेवटी कोकणी रक्तच धमन्यातून वहात आहे माझ्या ही. ☺️

मर्यादित साधन सामुग्रीतून नाविन्यपूर्ण पदार्थ करणे हे कोकणी माणसाचं खरं कसब आहे आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अळूच्या गाठी. ह्यासाठी अळू आदल्या दिवशी कापून घरात आणून ठेवतात म्हणजे ते थोड मऊ पडत आणि त्याच्या गाठी वळण सोपं जातं. साधरण तळ हाता एवढा आळवाच्या पानाचा तुकडा कापून किंवा हातानेच फाडून त्याची सुरनळी करायची आणि त्याची गाठ वळायची. गोल भरीव रिंग सारख्या दिसतात ह्या गाठी. अश्या गाठी वळून घेऊन त्यांची भाजी करायची. ह्या गाठी वळायला खूप वेळ लागतो आणि भाजी शिजली की मरत असल्याने भरपूर गाठी वळाव्या लागतात. अति शिजून गाठींचा लगदा होणार नाही इकडे ही लक्ष ठेवावं लागतं भाजी करताना. अळूची गाठ नीट शिजवणे आणि तिचा आकार ही टिकवून ठेवणे हे खरं स्किल आहे ह्या भाजीचं. गाठीची भाजी हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे.

ऋषी पंचमीच्या भाजीत ही घरच्या भेंडी, भोपळा, माठ, पडवळ , काकडी दुधी, सुरण ह्या बरोबर अळू लागतंच. श्राद्ध किंवा पक्ष असेल घरात तर अळू करावंच लागत. श्रद्धा चा स्वयंपाक अळू शिवाय अपूर्णच असतो. काही ठिकाणी तर त्यामुळेच शुभ कार्याच्या मेन्यूमध्ये अळूचा समावेश नसतो. अळू निषिद्ध मानलं जातं. असो.

अश्या तऱ्हेने जोपर्यंत आगरात अळू आहे तोपर्यंत आज काय जेवायला करू हा पेच बायकांना पडत नाही. वर सांगितल्या पैकी एखादा पदार्थ करून वेळ साजरी केली जाते. पानातली डावी बाजू, उजवी बाजू , तळण असं काही ही करता येत असल्यामुळे अळू हे गृहिणींना वरदान वाटते. पत्त्यातल्या जोकर प्रमाणे अळू गरजेनुसार पानात कुठे ही फिट बसते.

पावसाळा संपत आला की मात्र फोफावलेलं अळू सुकायला लागतं. मुद्दाम पाणी घालून गरजेपुरतं थोडं जगवलं जातं पण बाकीचं कमी होतं आपोआप. हल्ली आम्ही फणसाची भाजी जशी पॅक मिळते तशी अळूची भाजी ही करून ठेवतो त्यामुळे कधी ही भाजी पटकन करता येते. परदेशातल्या नातेवाईकांना ही तिकडे घरचं अळू खाल्ल्याचं समाधान देते. हा आमच्या भाजी चा फोटो.
20220810_191349.jpg
अर्थात अळूची गोष्ट इथे नाही संपत. दिवाळीच्या सुमारास वरची पानं सुकली की तिथे खणून खालती लागलेल्या आळकुडया काढल्या जातात. मीठ आणि कोकम घालून उकडल्या की मस्तच लागतात. उत्तर प्रदेशात आणि सिंधी समाजात ह्या आळकुडया म्हणजे आर्वी फार पॉप्युलर आहे. ते ह्यांची चमचमीत सुखी करतात पण आम्ही उकडून खाण्याशिवाय जास्त काही करत नाही.

काही चांगल्या मोठ्या आळकूडया पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवून देतो. अश्या तऱ्हेने आगरातल्या अळूचे चक्र अनेक वर्षे चालू राहते.

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. अळू, अळूवडी इ. आवडतंच.
मीठ घालून उकडलेल्या अळकुड्या आणि अळकुड्यांच्या ओवा घालून काचर्‍या भाजी ही आवडते. उपासाला पूर्वी आजी अळकुड्या उकडून त्यात भरपूर नारळ कोथिंबीर लिंबू पिळून भाजी/ कोशिंबीर असं काही करत असे. ते ही भारी लागायचं. इकडे कॅनडात कुठल्याही दुकानात अळकुड्या कायम मिळतात. वर सायोनी लिहिलंय तसं एशिअन/ जपानी लोकं ही खात असणार.

मस्त लेख!
आळूच्या गाठी आणि वड्यांची भाजी नवीन आहे. करुन पहायला पाहिजे.
मनिम्याऊ : बापरे.. एवढे काही होते माहित नव्हते. लहान्पणी फक्त कुठल्याही अळवाला हात लावायचा नाही हे सांगितलेले आठवतेय. फक्त न्हाणीघराच्या पाण्यावर अळू वाढायचा तोच खायचा ..

वावे : छान आठवण. आमच्याकडे सासुबाई करतात. पिठोरी आवसेला खीर पुरीचा नैवेद्य करतात आणि देवासमोर त्ताट घेऊन मागे न ब घता विचारायचे अतिथी कोण? मग मुलगा म्हणतो मी आहे.. मग त्याला ते खीर पुरीचे ताट द्यायचे ..

अळू आणि श्रावण, अळू आणि शुभकार्य यांचे अतूट नाते आहे. परवाच मोठी मोठी देठं पाहिली बाजारात आता अळू आणि देठं दोन्ही घेऊन यायला पाहिजे.

म.मो : तुम्ही कोकणाचे इतक सुंदर वर्णन करता की दरवेळी कोकणात जाऊन आल्यासारखे वाटते. आमचे तसे कोकणात घर नव्हते पण आजोळी हे सारे खूप अनुभवले आहे. त्यामुळे अजून छान वाटते. कोकणातल्या खास रेसिपींसाठी खरच तुम्ही वर्ग घ्या.. माझा नंबर पहिला Happy

भाजी - लहान पान , कोवळा देठ , फिकट कलर
वडी - मोठे पान , जाड देठ , गडद कलर
>>>>
धन्यवाद ब्लॅककॅट

ममो, खरंच तुम्ही डिटेलमध्ये रेसिपी द्या सगळ्या.

उलट आहे. निदान आमच्याकडे तरी.
भाजीची पाने गडद रंग, थोडीशी पातळ आणि गोलट.
वडीसाठी थोडीशी त्रिकोणी, लांब टोकाची. पाठीमागच्या बाजूला अगदी फिकट. शिरा ठळक.

भाजीची पाने गडद रंग, थोडीशी पातळ आणि गोलट.
वडीसाठी थोडीशी त्रिकोणी, लांब टोकाची. पाठीमागच्या बाजूला अगदी फिकट. शिरा ठळक.

भाजीची पाने फिकट असतात, पातळ आणि गोलट हे बरोबर आहे.
वड्यांसाठी गडद, जाड आणि त्रिकोणी.
वड्यांच्या अळूची पाने भाजीला चालत नाही, कितीही घोटून घेतली तरी एकजीव होत नाही आणि चवदार लागत नाही.
भाजीच्या अळूच्या वड्या फाटतात किंवा सुटतात.

वाह मस्त लेख !
अळूवडीचा शोध ज्याने लावला त्याची खरेच कमाल आणि लाख लाख उपकार. गरमागरम वरणभात आणि बारीक चकत्या केलेल्या खमंग कुरकुरीत अळूवड्या. नैवेद्याच्या ताटात हे दिसले की मी श्रीखंड पुरी भाजीच्या नादाला लागत नाही..

मसाले भात अळूची भाजी व जलेबी. मठ्ठा. >> perfect महाराष्ट्रीयन मेन्यू.
अमितव परदेशात ही मिळतात अळकुडया हे आत्ताच समजलं.

म.मो : तुम्ही कोकणाचे इतक सुंदर वर्णन करता की दरवेळी कोकणात जाऊन आल्यासारखे वाटते. आमचे तसे कोकणात घर नव्हते पण आजोळी हे सारे खूप अनुभवले आहे. त्यामुळे अजून छान वाटते. कोकणातल्या खास रेसिपींसाठी खरच तुम्ही वर्ग घ्या.. माझा नंबर पहिला Happy भारीच आहे हे निलाक्षी

भाजी आणि वड्यांकरता आग्या१९९० म्हणतायत तेच मला वाटते.

ममो, खरंच तुम्ही डिटेलमध्ये रेसिपी द्या सगळ्या. >> चैत्रगंधा Happy

सणाचं विशेषतः श्रावण भाद्रपद महिन्यातल्या आणि अळूवड्यांचं जवळच नात आहे. माझ्याकडे शोधून एक फोटो मिळालाय तो दाखवते हेडर मध्ये

छान गं ममो. मोहोन्याची आठवण झाली. ( म्हणजे माझ्या माहेरची) मोहोन्याला पावसाळ्यात जागोजागी अळू उगवे. आणि आमच्या बागेत आजूबाजूला येणारं अळू खाजरं नव्हतं. आई ह्या अळू ची भाजीच करायची. वडीचा अळू विकत आणत असू. पण आम्ही कधी अळकूड्या खणून काढल्या नाहीत.
(अळकूड्या तलावात मिळतात असा समज होता माझा, तलावात उगवतात असं वाटायचं)

आमच्या सातारा भागात.
मोरी चे पाणी जिथे साचते तिथे आळू लावतात.
वर्षभर पान असतात
पानाची वडी हा प्रकार सर्रास केला जातो
देठाची भाजी पण मस्त लागते

मस्त!

>>> वड्यांच्या अळूची पाने भाजीला चालत नाही, कितीही घोटून घेतली तरी एकजीव होत नाही आणि चवदार लागत नाही
वड्यांची पानं चिरून थोड्या तेलावर परतून घ्यायची आणि मग शिजवायची, म्हणजे बऱ्यापैकी मिळून येते भाजी. इथे आम्हाला वड्यांचीच पानं (त्रिकोणी ही खूण!) मिळतात, त्यामुळे तीच गोड मानून घेतो आम्ही. Happy

ममो, अळकुड्या फार शेंबड्या नसतील तर उकडलेल्या बटाट्यांसारखीच त्यांचीही भाजी छान होते. उपासाची किंवा बिन-उपासाची.

मस्तच लेख. कोणत्याही विषयावर घरगुती आस्थेने लिहिणे तुम्हांला छान जमते. >>> अगदी अगदी. फोटोही सहीच. भूक लागली हे सर्व बघून, वाचून.

सुरेख लेख. फोटो मात्र अजुन हवे होते.
इथे पटेल मधुन अळकुड्या आणुन दोन वेळा अळु लावला. अगदी उत्तम आला. परंतु दोन्हीवेळा प्रचंड खाजरा. Sad काढून टाकला.
कोल्हापुरच्या घरी जो अळु आहे तो आईच्या माहेरहून आलाय. तिच्या आजोबानी लावलेला. किती लोकांनी कंद तेव्हापासून नेले असतील कुणास ठाऊक. इतका प्रसिद्ध आहे जो तो आला कि कंद मागतोच. उत्तम वड्या होतात. आणि हास्यास्पद वाटेल पण फार देखणा आहे. हिरवीगार अगदी सुरेख पान आहेत.

>>>>>>>>>> #ममस्मगलर्सचीधावअळवापर्यंत!
लोल!!!

छान लेख मनीमोहोर. ते नैवैद्याचं ताट, अळूवड्या मस्त रेखीव दिसत आहेत Happy

या विकांतालाच बागेतल्या अळूची पानं काढली होती. या वेळी अळूवड्या केल्या. आधी २,३ दा भाजी केली तेव्हा बागेत असलेला आंबट चुका वापरला होता. छान मिळून आली होती.
आता पुढच्या वेळी देठी करुन बघेन, तो प्रकार आवडेल असं वाटतय Happy

Alu.jpegBhajya.jpeg

भरपूर पाणी मिळाल्यावर ह्या अळवाचे देठ जांभळे काळे होतात का? >>> नाही हिरवेच रहातायत. पानं एकदम नाजूक आहेत. भाजीचाच अळू आहे. इथे वाचून आज भाजी, देठी केली.

मीपु, मस्त आहेत भाज्या. मी आजच काढल्या. अळूभाजी , देठी, मसालेभात केला Happy
देठ कोवळे होते म्हणून कुकरला एकच शिट्टी करून शिजवून घेतले. घोटून घेऊन त्यात घरात हिरव्या मिरच्यांचा ठेचा होता, तोच घातला. वरून जास्त हिंगाची फोडणी आणि दही घातलं. सही झालं होतं

WhatsApp Image 2022-07-16 at 7.57.32 PM.jpeg

अळूची भाजी, देठी, मसालेभात, मठठा, घरच्या मिरच्या-कारलं-गवारीचं लोणचं, बागेतल्या काकड्या

IMG-20220719-WA0009.jpeg

ममो मस्त लेख. अळू प्रमाणेच माडी आणि मूडली ही फेमस आमच्या साईडला. गोवा, कारवार, ऊडूपी, मंगलोर आणि कोची. वर महाराष्ट्र कोकणात त्या पासून काही पदार्थ तयार करतात का काही माहीत नाही.

मीही अरवी आणून कुंडीत लावलय.अंजलीने म्हटल्याप्रमाणे त्याची पाने फार मऊ आहेत.देठ पोपटी हिरवे आहेत.बहुतेक अळूचा जातभाई , तेरं असावे.भाजीची टेस्ट किंचित वेगळी लागते.
घरी भाजी नसल्यास हे कामाला येते.आता तर पाने मोठी मोठी आली आहेत.कामवालीने 2 वेळा घरी नेऊन वड्या केल्या. मीही एकदाच या पानांच्या अळूवड्या केल्या होत्या.बाकी पाने बाहेरून विकत आणली.
आई कडे वड्याचे अळू आहे.पण माझा म्हणजे तेही भाजीला वापरले तरी चालते.त्याची पाने कडक नाहीत.भाजी मिळून येते.

ममो यांनी फोटोत दाखवलेले अळू आम्ही आणतो. वसई विरार पालघर पट्ट्यात हीच जात असते जास्त करून. त्यामुळे मुंबईत हेच अळू दिसते. गच्चीत कुंड्यांत लावले आहे पण तितकेसे जोमदार होत नाही. गणपती, उंदीर मामा, नागोबा ह्यांच्या विसर्जनाच्या वेळी दहीभाताची शिदोरी बांधून देण्यासाठी आणि इतर वेळी विकतच्या अळवात भर म्हणून त्याची पाने वापरतो. मीपुणेकर ह्यांच्या फोटोतले wavy margin चे अळू आमच्याकडे नाही खात. (हे कुठेही अगदी गटारातही उगवून माजते असे पूर्वी म्हणत असत.) आणखी एक बिनरसाच्या फिक्या पोपटी देठाचे आणि फिकट पानांचे धावरे अळू असते. ते थोड्याश्याच काळात खूप पसरते. त्याला आम्ही तेरं म्हणतो. हे खाल्ले जाते पण तितकेसे चविष्ट लागत नाही.
अंजली ह्यांच्या फोटोतल्या अळवाला आमच्याकडे गोडं अळू म्हणतात. हे कुकरशिवाय अगदी मऊ शिजते. खाजही नसते. ह्याचे देठ पालघर वसई पट्ट्यात खाडीतल्या कोलंबीच्या किंवा बारीक पांढऱ्या मासळीच्या कालवणात वापरतात. (खाडीतल्या छोट्या छोट्या बोटभर लांबीच्या मासळीला सरसकट कोलंबट म्हणतात) ही भाजी त्यांच्याकडे विशेषत: आदिवासींमध्ये सर्वपितरीच्या जेवणात पूर्वी असायचीच असायची.
ह्याशिवाय एक माडाळू नावाची जात असायची. खूप उंच वाढायची. माडासारखे वाढते म्हणून माडाळू. देठ आणि पाने दोन्ही जाड, रसरशीत. देठ कृष्णतुळशीसारखे श्यामल जांभळे. पाने आणि देठ मऊ शिजतात. चवीला अप्रतिम. पण हे फार पसरत नाही. आपला आब राखून असते. कांदे पुन्हा पुन्हा लावावे लागतात.

अळूच्या मुंडल्या गोवा कारवारकडे नैवेद्याच्या पानातल्या खतखते किंवा खतखतले ह्या नावाच्या मिसळ भाजीत असतातच असतात. खतखत्यामध्ये अकरा, चौदा (अनंत चतुर्दशी दिवशी) अशा भाज्या घातल्या जातात.
माड्यांचे बहुधा काप करून तळतात. अशा तळलेल्या कोणत्याही भाजीच्या कापाला फोड आणि कापांना फोडी म्हणतात.

मग तू स्मगल का नाही केलास तो? Proud #ममस्मगलर्सचीधावअळवापर्यंत!>>
लोल. आता नेक्स्ट टाईम. आमच्या इथलीबादी,मम लोकांची धाव दही, टोमॅटो, बीया, देशी औषध, देवाच्या मुर्त्या,लसुण , रब्बुकम,कोहळा इत्यादी आणण्यापर्यंत आहे. अळुला तो इमिग्रेशन ऑफिसर बघणार पण नाही. Happy
अंजली, मीपु सुरेख फोटो.
हिरा , फार सुरेख/अद्भुभुत माहिती लिहिता तुम्ही.

मस्त प्रतिसाद सगळेच. धन्यवाद सर्वांना.

धनुडी, तलावात येतात ते शिंगाडे अस वाटतय नक्की माहीत नाही.

स्वाती, करून बघते अळकुड्यांची भाजी. ठाण्याला हल्ली amezon वर अळकुडया बारा ही महिने मिळतात पूर्वी मार्केट मध्ये दिवाळी नंतरच मिळायच्या थोडे दिवस.

कोकणात वडी भाजी सगळं एकाचंच करतात शहरात मात्र ते ते त्याला त्यालाच वापरावे लागते नाहीतर रिझल्ट चांगला मिळत नाही. अर्थात परदेश ची गोष्ट वेगळी. तिथे मिळतंय हेच अधिक.

कोल्हापुरच्या घरी जो अळु आहे तो आईच्या माहेरहून आलाय. तिच्या आजोबानी लावलेला. किती लोकांनी कंद तेव्हापासून नेले असतील कुणास ठाऊक. इतका प्रसिद्ध आहे जो तो आला कि कंद मागतोच. उत्तम वड्या होतात. आणि हास्यास्पद वाटेल पण फार देखणा आहे. हिरवीगार अगदी सुरेख पान आहेत. >>मस्तच सीमा

ममस्मगलर्सचीधावअळवापर्यंत अमितव लय भारी कमेंट.

अंजली मी पुणेकर भाज्यांचे घरच्या आळवाचे फोटो मस्त. रसरशीत दिसतय अळू.
अंजली ताट मस्तच दिसतंय . अमा म्हणतायत तस जिलबी वाढली की लग्नाच्या पंगतीतलच वाटेल. देठी मस्त दिसतेय.

माडी मुदली हे कधी ऐकलं ही नाहीये रागीमुद्दे. हीरा मस्त प्रतिसाद. मस्तच लिहिता तुम्ही.

हे घरच्या पुरतं अळू होतं हे माहीत नव्हतं देवकी आता मी पण नाडणहुन कंद आणून लावून बघेन.

हेडर मध्ये अळू वड्यांचा आणि प्रसादाच्या ताटाचा फोटो दाखवला आहे. खास ऋ साठी.

कंद म्हणजे अरबी हिंदी मध्ये.
आलू ची पान किंवा कोणताही भाग ह्याची भाजी, वडी घस्यात घवघव करू शकते.
त्या मुळे योग्य निवड हे सर्वात महत्वाचे.
नाही तर त्रासदायक आहे आलू.
मुंबई मधील खाडीत खूप असतात पण खाण्यास अयोग्य.
त्रास होवू शकतो.
देठा च रंग, पानाचा आकार ह्या वरून खाण्यास योग्य की अयोग्य .
असा निष्कर्ष काढला जातो.
आणि त्या साठी अभ्यास हवा

Pages