पुस्तक परिचय : Permanent Record (Edward Snowden)

Submitted by ललिता-प्रीति on 26 November, 2025 - 22:37

एडवर्ड स्नोडेननं २०१३ साली केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल मला जुजबी माहिती होती. तेव्हाच्या पेपरात आलेल्या बातम्या काही दिवस मी फॉलो केल्या असतील, नसतील. मात्र नंतर त्याबद्दल विसरायला झालं होतं.
पण माझ्या मुलाच्या रेकोवरून नुकतंच हे पुस्तक वाचलं.
मला पुस्तक आवडलं.
त्यात प्रत्यक्ष गौप्यस्फोटाचा भाग शेवटच्या ७०-८० पानांमध्ये येत असेल. ते थ्रिलिंग आहेच. पण त्यापूर्वीची शाळकरी वयापासूनची त्याची जडणघडण, कम्प्युटर आणि इंटरनेटवर त्याचं बालपण, teens पोसलं जाणं, त्यातून त्याचं geek बनत जाणं, देशासाठी काहीतरी करायचं या प्रेरणेनं सुरू केलेली नोकरी - हा भागही खूप वाचण्यासारखा आहे. त्यानं तो अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, आडपडदा न ठेवता लिहिलाय. तो वाचकांच्या पुढ्यात बसून गप्पा मारतोय असं वाटतं. कम्प्युटर, इंटरनेट, त्याच्याशी जोडलेलं तंत्रज्ञान, माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याचा होणारा अधिकाधिक वापर, या सगळ्याबद्दल सांगताना त्यानं जागोजागी तात्विक पातळीवर भाष्य केलं आहे. ते शोधायला, वाचायला खूप मजा आली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं माणसाच्या जीवनातलं महत्व काय याचा तात्विक पातळीवर विचार स्नोडेनच्या मनात सतत नकळत सुरू होता, की या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचं हे चिंतन घडलं हे समजायला मार्ग नाही. पण तंत्रज्ञानात बुडवून काढलेल्या या माणसाने त्याचा बेछूट वापर किती मारक ठरू शकतो हे ओळखलं होतं. त्याचवेळी त्या तंत्रज्ञानावर, गॅजेट्सवर त्याचं मनापासून प्रेमही होतं.
अमेरिकी सरकारचा छुप्या सर्वेलन्सचा उद्देश त्याच्या कसा लक्षात आला, त्या शंकेची पाल मनात चुकचुकण्यापासून ते त्याची खातरजमा होईपर्यंतचे उलटसुलट विचार, घालमेल, पुढे त्याबद्दलचे पुरावे गोळा करण्याच्या खटपटी, त्यासाठीही त्याचं techno-geek असणं कसं कामी आलं, त्याने शांत डोक्याने सर्व परिस्थितीचा विचार करून कशी योजना बनवली, हे सगळं वाचता वाचता सतत प्रश्न पडत होता, की इतक्या तरुण वयात हे त्याने कसं काय जमवलं! म्हणजे नैतिक-अनैतिकचं द्वंद्व तरुण वयात कमी सतावतं, असं मानलं जातं. असं द्वंद्व त्याच्या मनात एकदा सुरू झाल्यावर त्याने ते कधीही झटकून टाकण्याचा, डिनायलचा प्रयत्न केला नाही, हे विशेष वाटलं.

गोपनीय माहितीचे तुकडे बाहेर नेणे, भांडेफोड, गौप्यस्फोट, हेरगिरी - या शब्दांच्या अर्थछटांमध्ये काय काय फरक आहे हे त्यानं सविस्तर लिहिलं आहे. ते सुद्धा वाचायला आवडलं. (अमेरिकेनं त्याच्यावर हेरगिरीचा आरोप लावला आहे. पण त्यानं हेरगिरी केलेली नाही. गोपनीय माहिती कुणा बाहेरच्या देशाला नव्हे, तर अमेरिकेच्या पत्रकारांना दिली.)
आज तो रशियात राहतो आहे. तिथपर्यंत तो कसा पोचला, त्यासाठी जगाच्या दुसर्‍या टोकावरच्या अनोळखी लोकांनी हातचं न राखता त्याला कशी मदत केली, त्याची गोष्टही थरारक आहे.

अमेरिकी सरकारच्या छुप्या सर्वेलन्समुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कॉल रेकॉर्ड्सची, इंटरनेटवापराची इत्थंभूत माहिती सरकारकडे गोळा होणार, तिथे ती कायमस्वरूपी राहणार (पर्मनण्ट रेकॉर्ड), अतिरेकी कारवाया टाळण्याच्या नावाखाली भविष्यात त्या माहितीचा कसाही वापर होऊ शकतो, हे टाळण्यासाठी जीवावरचा धोका पत्करला, हे जगाला कळावं यासाठी एडवर्ड स्नोडेननं त्याचे अनुभव पुस्तकरूपाने ’पर्मनण्ट रेकॉर्ड’ करून ठेवले आहेत.

(स्नोडेनच्या गौप्यस्फोटानंतर इंटरनेट वापरासंबंधित काही बदल, नियम नव्याने झाले का, त्याचा काही उपयोग झाला का, की आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, हे शोधून वाचायचं ठरवलं आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला परीचय. विस्मरणात गेलेलं हे नाव.
आता रस संपल्याने पुस्तक वाचायची शक्यता कमी आहे. पण परिचयाबद्दल आभार.

चांगला परिचय.
सरकारकडून छुपा सर्व्हेलन्स केल्या जाण्याच्या वा तशा वाटा आखून ठेवल्याच्या बातम्या , मतं येत असतात. स्नोडेनच्या कामाचं महत्त्व वाढणार आहे.

>>स्नोडेनच्या गौप्यस्फोटानंतर इंटरनेट वापरासंबंधित काही बदल, नियम नव्याने झाले का, त्याचा काही उपयोग झाला का<<
बरेच बदल झाले, कंपन्यांच्या डेटा प्रायवसी पॉलिसिज पासुन गवर्नमेंट लॉमेकिंग पर्यंत. मुख्य म्हणजे जनता जागरुक झाली त्यांच्या पर्स्नल डेटा एक्स्पोजर, एन्क्रिप्शन, लोकलायजेशनच्या बाबतीत...

ललिता प्रीति
सध्या स्नोडेन कुठे आहे त्याबद्दल काही माहिती आहे का?
@राज
मिसळपावच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात एक कथा आहे.
सुकेत्सु, युरी, चिमेरा! -
https://misalpav.com/node/53274
ह्या कथेत इस्रायल असे एक app बनवत आहे कि जे माणसाच्या डोक्यात काय विचार सुरु आहेत त्याबद्दल समग्र reporting करेल. अर्थात हे फिक्शन आहे. पण शक्यता आहेच.
तेव्हा राज सगळे काही अलबेल आहे अशी चुकीची समजूत करून घेऊ नका.

सध्या स्नोडेन कुठे आहे त्याबद्दल काही माहिती आहे का? >>>
पुस्तकात सांगितल्यानुसार तो आता रशियात असतो.
अमेरिकेचं शत्रुराष्ट्र म्हणून रशियाने त्याला आसरा दिलाय इतकं स्ट्रेट्फॉरवर्ड घडलेलं नाही हे.

ओह!
नवीन माहिती.
मी शेवटचं जेव्हा वाचलं होतं तेव्हा तो लंडन मधल्या एका साउथ अमेरिकन वकिलातीत दडून बसला होता, आणि लवकरच त्या देशात प्रयाण करणार होता.


आल लक्षात, माय मिस्टेक.
आभार.

स्नोडन बदल तेव्हा बरंच वाचलेलं. नंतरही अधूनमधून त्याचं नाव बातम्यात येत असे.

लप्री, परिचय फार आवडला. पुस्तक लायब्ररीत होल्ड वर ठेवतो.
(जुनं पुस्तक दिसतंय. २०१९..ऑडिओ पण मिळालं. ऐकून बघतो)

छान परिचय,
पुण्यात अशी नवीन पुस्तके किंवा त्याच्या किन्डल प्रती लेंडिंग लायब्ररी आहे का ?

आत्ताच पुस्तक ऐकुन संपवलं.
आवडलं. एडवर्डने जे जुनं सुरुवातीचं इंटरनेट बघितलं, अनुभवलं आणि वर्णन केलं आहे साधारण त्याच सुमारास, किंवा थोडं नंतर इंटरनेट वापरायला लागल्याने ते दिवस, त्या इंटरनेटवरचे वातावरण, एकमेकासाह्यकरु, सगळेच शिकत आहेत आणि आपण वयाने आणि इंटरनेटवरील वयाने शाळकरी (वयाने कॉलेजकरी म्हणू) आहोत ते सगळं ऐकताना मी स्नोडनच्या कधी प्रेमात पडलो कळलं नाही इतकं प्रत्ययकारी आणि साधं सहज लिहिलंय ते. त्याच बरोबर अमेरिकन ड्रीम जे आज अप्राप्य आहे ते दिसल्याने, मी जरी अगदी ते जगलो नसलो तरी, काहीसं जगल्याने की उगाचच, गतकालविव्हल वगैरे न होता ही 'आत' काही तरी छान वाटलं.

नंतरचा त्याचा प्रवास, मॉरल कंपास, आजची परिस्थिती आणि त्यात तो जी काही थोडीफार उत्तरे म्हणून सांगतो ते प्रोटोकॉल आज किंवा लवकरच क्वाँटम कम्प्युटिंगच्या जमान्यात बाराच्या भावात निघणार आहेत/ निघत आहेत ते बघणं भयावह आहे. कुठलीही सुरक्षा काही काळापुरती असते हे जरी शाश्वत सत्य असलं तरी तो काही काळ जो काही हजार वर्षे होता तो काही महिने ते काही मिनिटे होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. पर्मनंट रेकॉर्ड आहेत आणि यच्चयावत सगळा सर्वेलंस होतो हे तर नाकारण्यात अर्थच नाही. हे सगळं संयत टेक्निकल तरीही कोणालाही सहज कळेल अशा भाषेत लिहिण्याची हातोटी आवडली. बरोबरच ह्युमन एलिमेंटही जागोजागी असल्याने आणि लिहिण्याची शैली चित्रदर्शी असल्याने हवाईच्या एनएसए ऑफिसच्या कधीही प्रत्यक्ष न पाहिलेल्या टनेलमध्ये मी सहज प्रवेश मिळवला.
शेवटचे प्रकरण तर मननीय आहे. असलेल्या शक्यतांच्या अधीन राहुन, शेवटही गोड झाला.
इथे शिफारस केल्याबद्दल धन्यवाद. हे पुस्तक विकत घेऊन मुलाला वाचायला ही नक्की देईन, मला ही काही काळाने परत वाचायला आवडेल.