मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Animal farm सर्वोत्तम.
१९८४ अनुवाद मराठीत आहे. इंग्रजीत वाचले होते. पण animal इतकी पकड घेत नाही.
रस्कीन बॉन्डही इथेच राहिला. ते.यानेही बरीच पुस्तके लिहीली. उत्तराखंड/हिमाचलमध्येच राहतो. हिल स्टेशनच्या संथ जीवनात वाचायला बरी अशी शैली वापरतो.
जिम कॉर्बैट आणि केनेथ एन्डरसन यांचं.यापैकी केनेथ आवडतो.

तीन चांगली पुस्तके वाचली. एक चरित्र आणि दोन गड किल्ल्यांवरची.
१)
मास्तरांची सावली
कृष्णाबाई नारायण सुर्वे
( शब्दांकन नेहा किशोर सावंत)
डिंपल पब्लिकेशन,विरार,२००९-२०११
पाने १८०
नारायण सुर्वे हे कामगार चळवळीचे नेते आणि कवी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे चरित्र पत्नीने लिहिले आहे. मुंबईतील गरीब गिरणी कामगारांचे जीवनही यामध्ये आले. अत्यंत नम्रपणे लिहिलेले ह्रुद्य लेखन.

२)वेध जलदुर्गांचा
भगवान चिले.
पाने २५०
शिवस्पर्श प्रकाशन, कोल्हापूर, २००८

महाराष्ट्राला ७२० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. अगदी उत्तरेस गुजरात सीमेपाशी डहाणू गाव आहे. तर दक्षिणेला गोव्याच्याजवळ तेरेखोलची खाडी आहे. या किनाऱ्यावरच्या एकूण ६९ किल्ल्यांची विस्तृत माहिती भगवान चिले देतातच शिवाय मार्गदर्शक रेखाटने ही दिली आहेत. या कामात त्यांना अनेकांचे सहकार्य मिळाले त्याची नोंद सुरवातीलाच चिले देतात. मी लहानपणापासून फक्त तीन चारच जलदुर्ग पाहिले आहेत. शीवचे(सायनचे) दोन आणि वसईचा एक. इतर ठिकाणी गेलो नाही कारण एकट्याने जलदुर्ग जाणे परवडणारे नव्हते. तरी आता हे पुस्तक वाचून वाटायला लागले की आणखी काही जलदुर्ग पाहणे शक्य आहे.
वाचनीय तसेच संग्रही ठेवण्यासारख अपूर्व ग्रंथ.

३)पुणे जील्ह्यातील २९ किल्ले
महारिजांच्या जहागिरीतून
- संदीप भानूदास तापकीर

प्रकाशन - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे.
आवृत्ती जुलै २०२२,२०२२.
पाने २८०

किल्ल्यांचा थोडक्यात इतिहास, जायचे कसे,काय पाहायचे आणि मुख्य म्हणजे गडांची रेखाचित्र नकाशे दिले आहेत. शेवटी गड किल्ले संदर्भांत अगोदर प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांची सूची दिली आहे.
गडांना भेट देणाऱ्यांसाठी संग्राह्य ग्रंथ.
_____________

भरत, पुस्तक परिचय आवडला.

एका परिच्छेदात वडलां - हे सामान्यरूप वारंवार आले आहे. >>> म्हणजे काय ?

मेरी बेनेडिक्ट (आणि व्हिक्टोरिआ मरे) या लेखिकांचं "The Personal Librarian" हे पुस्तक वाचलं. एका वेगळ्या विषयावरवरील ही ऐतिहासिक fact based कथा आहे बेले ग्रीन या तरूणीवर बेतलेली.

२० च्या शतकाच्या सुरूवातीची न्यु यॉर्क मध्ये घडणारी ही कथा. J. P. Morgan या त्या काळातला अमेरिकेतील investment banker and financier आणि अमेरिकेतील त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. बिझनेसमन असले तरी मॉर्गन साहेब कलेचे, दुर्मिळ साहित्याचे जाणकार, प्रेमी आणि संग्रहक होते. त्यांचे स्वतःचे वैयक्तिक संग्रहालय होते - Pierpont Morgan Library*, ज्याकरीता बेले ग्रीन या तरूण लायब्ररियन स्त्री ची त्यांनी नियुक्ती केली.

त्याकाळी स्त्रीयांनी नोकर्‍या करायच्या तर शिक्षिका हा सर्वसामान्य पर्याय होता. त्याकाळात, तिच्या कलेच्या आवडीमुळे आणि जाणकारीमुळे बेलाने ही संधी कमवली. तिची ही कथा. Not only was she the only woman in the men's world but also she was hiding a big secret. वर्णाने गौर असली तरी बेलेची रेस ही कृष्णवर्णीय होती. हे जर समजले असते, बाहेर पडले असते तर तिचं जीवन असह्य झालं असतं... स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरीता, चांगल्या संधी मिळाव्या म्हणून तिच्या आईने हा निर्णय कुटुंबाकरीता घेतला होता. पण असं द्विधा आयुष्य जगणे, स्वतः ची मूळ ओळख लपवून समाजात वावरणे - यात होणारी कुतरओढ कथेतून परिणामपणे समोर येते.

१०० वर्षापूर्वीचे अमेरिकन जीवन - Civil war नंतर वर्णभेदाचे बंध तुटून पडतायंत असं वाटेपर्यंत अमेरिकेवर परत white supremacy आणि वर्ण-विभक्तीकरणाने (segregation) पगडा घ्यायला सुरूवात केली. एकीकडे स्त्रिया त्यांच्या मुलभूत नागरी हक्काकरीता झगडतायंत, दुसरीकडे कृष्णवर्णिय ku klux klan सारख्या गटाला तोंड देत आहेत...सगळ्याच दृष्टीने आव्हानात्मक काळ! हा सगळा एका वेगळ्या अंगाने समोर येतो...त्यातच बेलेचं वेडं-धाडसी प्रेमजीवन मिसळलंय...

मेरी बेनेडिक्ट ही एक गोरी अमेरिकन लेखिका. तिची इतिहासातल्या अश्या फार माहित नसलेल्या, वेगळ्या-खंबीर स्त्रियांविषयी पुस्तके आहेत. त्याच प्रकारातील हे पुस्तक लिहीताना मात्र तिला हे एकटीने लिहीणे योग्य ठरणार नाही, ती त्याला नीट न्याय देऊ शकणार नाही असे वाटून तिने तिच्याबरोबर व्हिक्टोरिआ मरे या कृष्ण्वर्णिय लेखिकेचे - सहलेखिका म्हणून सहाय्य घेतले. व्हिक्टोरिआ - तिच्या आई-वडिलांकडून, त्यांच्या आधीच्या पिढ्यांकडून कृष्णवर्णिय दृष्टीकोनातून तो काळ नीट रेखता यावा - याकरीता. हे मला फार भावलं. आणि खरोखरंच पहिल्या पानापासून पुस्त॑क draws you in.

काही गोष्टी - जशी काही दुर्मिळ पुस्तकांची माहिती, कलाकृतींचे वर्णन अजून सखोल असते... पुस्तकांच्या लिलावाचे - त्यात बेलेने वापरलेल्या क्ल्युप्त्यांची अजून समग्र वर्णनं वाचायला मला आवडली असती. पण तरीही एक वेगळे - एका वेगळ्या व्यक्तीरेखेचे, financier and businessman म्हणून माहिती असलेल्या जे.पी. मॉर्गन यांची कला-साहित्याची आवड असलेली दुसरी बाजू दाखवणारे हे पुस्तक खूप रोचक वाटलं.

*आज हे संग्रहालय न्युयॉर्क शहरात सर्वांना उपलब्ध आहे.

(आता मेरी बेनेडिक्टची बाकी पुस्तकं वाचणं ओघाने आलंच!)

सय - माझा कलाप्रवास - सई परांजपे - राजहंस प्रकाशन - सप्टेंबर २०१६ -३५८ पृष्ठे.
रविवार लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी लिहिलेल्या लेखांत भर घालून लिहिलेलं पुस्तक. शकुंतला परांजपेंचं 'काही आंबट काही गोड ' वाचलंय. त्यामुळे सईच्या लहानपणीच्या काही गोष्टी माहीत होत्या. इथे सईने पहिला लेख आईवर लिहिला आहे.तरुणपणी - कॉलेज करत असल्यापासूनचं आकाशवाणीवरचं काम , बालरंगभूमी पुणे, NSD, FTII , दूरदर्शन , बालचित्रसमिती इथपर्यंतचा प्रवास या संस्थांच्या सावलीत आणि सोबतीने झाल्यावर पॅरिस वास्तव्याच्या भागात आपल्या जवळच्या नातलगांबद्दल सविस्तर लिहिलं आहे. त्यातही नाटकाचे धागे जुळून येतातच. इथवरचा भाग कालानुक्रमे येतो. पुढला भाग एकेका निर्मितीबद्दल - नाटक /चित्रपट ( तरी मालिका सगळ्या नाही आल्यात) . अगदी सविस्तर लिहिलं आहे. एकेका कलाकृतीची कल्पना कशी सुचली, तिला आकार कसा आला, निर्माता मिळवणं, टीमची जुळवाजुळव, नेपथ्य ,
कपडेपट , चित्रपटाबाबत पोस्ट प्रॉडक्शन ते अगदी श्रेयनामावली पर्यंत आणि हा सगळा भाग रंजक आहे. त्यातल्या काही कलाकृती पाहिल्या आणि आवडत्या असल्याने तो आणखी रंजक होतो. दिल्लीत त्यांनी केलेल्या नाट्यप्रयोगांबद्दल मात्र काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्यात आलेल्या अभिनेत्यांची नावं गुगल केली. साथ निभाना साथिया मधली कोकिला बेन (रसोडे में कौन था) म्हणजे रूपल पटेल ही एन एस डी मध्ये शिकलेली आहे. तिने नाटकांत उत्तम भूमिका केल्यात ही नोंद तिच्या विकी पेजवरही नाही. अस्म अनेक आता प्रसिद्ध असलेल्या कलाकारांच्या सुरुवातीच्या काळा बद्दल कळतं.
स्पर्श'चा निर्माता म्हणून बासु भट्टाचार्य यांचा आलेला अनुभव आणि त्याचं 'कथा' मध्ये काढलेलं उट्टं खास सई परांजपे ट्रेडमार्क. सईने आप ली सर्वात आवडती कृती म्हणून जिचा उल्लेख केलाय त्या दिशा चित्रपटाचं मात्र नावसुद्धा माझ्या कानावर पडलं नव्हतं. डिट्टो - पपीहा.

कलाकृतींबद्दलचा भाग एकेका कृतीला धरून आहे. मग त्यातच त्या कृतीची बदललेली रूपं (मराठी नाटकावरून काही वर्षांनी केलेलं हिंदी नाटक, मालिका किंवा चित्रपट) हे एका लेखात. त्यात कालानुक्रम नाही त्यामुळे वाचताना गोंधळ उडतो. इतकंच नाही तर तारीख , वर्ष लक्षात राहत नाही, शोधत बसणं कठीण , म्हणून त्यांचे उल्लेख नाहीत आणि आहेत तिथे सपशेल चुकलेत. एक तमाशा अच्छा खासा चा प्रयोग १९७१ साली केला असं तीनदा म्हटलंय आणि त्या तमाशात आणीबाणीचे संदर्भ आलेत हेही लिहिलंय. मुंबईत झालेल्या बाँबस्फोटांची तारीख २६ नोव्हेंबर १९९२ अशी पडली आहे. दिल्लीच्या इंडिया गेटचं गेटवे ऑफ इंडिया झालं आहे.
लेख लिहिताना आपण वाचकांशी संवाद साधतोय हे भान कायम आहे. पण काही भाग अगदी समरसून लिहिला आहे.
पॅरिसला जाईपर्यंतच्या भागातली मराठी अगदी गोड जुन्या वळणाची आहे. पण दूरदर्शनबद्दल लिहिताना दर्शक म्हटलंय. आणि दिल्लीत आमची गृहस्थी असंही. विनोदबुद्धी कोपरखळी ते चिमटा अशी टोकदार आहे. दोन मासले -"बोलूनचालून ती फ्रेंच झाडं. म्हातारी झाली तरी त्यांचा हिरवटपणा जातो थोडाच!" " अ तीशा नाईकच्या गिधाडेनं तेंडुलकरांच्या हिंसा नाटकाला पूर्ण न्याय दिला. तो प्रयोग पाहिल्यावर मला वाटलं, मी बसवलेलं नाटक साने गुरुजींनी लिहिलं होतं की काय?"
इतरांचे आलेले बरेवाईट अनुभव लिहिलेत ; तसंच स्वतःच्या कलाकृतींबद्दल - वागण्याबद्दल चांगलं लिहिलंय तसं जिथे वावगं झालंय तेही नोंदवलंय.
त्यांनी विविधभारतीवरून सादर केलेली विशेष गीतगंगा दोनतीनदा ऐकली आहे. त्यामुळे हे पुस्तक मला त्यांच्या आवाजात आणि शैलीत मनात ऐकता आलं.

@पराग , 'वडील'चे सामान्यरूप 'वडिलां' असेच हवे, असे मला वाटत होते. पण वडिलां /वडलां अशी दोन्ही रूपे बरोबर असावीत असे आता शोधल्यावर दिसते.

सय - माझा कलाप्रवास - सई परांजपे वाचतोच आता.
माझी सिनेमाची नावड समजून 'जाने भी दो यारों' हा सईचा सिनेमा बघायला लावलेला. आणि तो आवडला होता.

वाचनालयात कलाकारांची चरित्रे खूप आहेत पण सर्वच घेत नाही. हे बघेनच. लागू, भिमसेन,कुमार गंधर्व,बालगंधर्व,वाचली आहेत.
सचिनचं काल एक दिसलं पण प्रकाशन २०११ बघून घेतलं नाही.
-------------
वडील **** इथे राहिले पण 'वडलां'चे मूळ गाव ***हे वाक्य बरोबर आहे. परागना शंका आली पण बरोबर आहे.
_________
मागे एकदा मराठी 'भाषक' का मराठी 'भाषिक' यातलं कोणतं बरोबर ही चर्चा झाली होती. 'एका मारवाड्याची गोष्ट' पुस्तकात (गिरीश जाखोटिया लेखक) मराठी 'भाषक' हेच लिहिले आहे.

भाषण करणारा तो भाषक. म्हणून हेच बरोबर आहे, असे यास्मिन शेख यांनी गतवर्षीच्या लोकसत्तामधील भाषासूत्र सदरात लिहिले होते

जाने भी दो यारों - सईचा नाही.
स्पर्श, कथा, चश्म-ए- बद दूर, दिशा, पपीहा, साज हे त्यांचे चित्रपट.

१) ग्रीकपुराण
सुप्रिया सहस्रबुद्धे
रोहन प्रकाशन
२०१८,
पाने २६०, तेवीस रंगीत चित्रे
आतापर्यंत ग्रीक कथा, पुराणातील काही पुस्तके वाचली होती. पण हे फार आवडले. 'ग्रीक आणि भारतीय महाकाव्यांतील साधर्म्य' या विषयात लेखिकेने पी एच डी केली आहे. म्हणून नाही तर ग्रीक कथा फार सोप्या पद्धतीमधून मांडल्यामुळे. शिवाय होमरच्या इलिअड,ओडिसीची कथाही थोडक्यात चांगली दिली आहे. ट्रॉय ट्रोजन युद्ध, वीरांच्या भवितव्याबद्दल देवतांनी केलेली ढवळाढवळ सांगितली आहेच. ग्रीक कथा या खऱ्या किंवा खोट्या याबद्दलचा वाद कसा मिटला तर तुर्कस्तानातल्या खोदकामात सापडलेल्या सोने,ब्रांझ,मातीच्या वस्तू कथांतील वर्णनांची पूर्तता करतात. हेच ते जुने ट्रॉय शहर.
आणि मुख्य म्हणजे साहित्याला,शिल्पकलेला,नाटक सिनेमांना भरपूर कथाबीजे पुरवण्याचं काम ग्रीक पुराणकथा अजूनही करत आहेत.
वाचनीय पुस्तक.
________________
२ ) ब्रीलिंअट स्टार्ट-अप
How to set up and run a brilliant business
By Caspian Woods,
2008,Pearson Education limited
या पुस्तकाचे मराठी भाषांतर
रश्मी हेबाळकर, अरविंद नगरकर.
पाने २००
संगतवार,सोप्या पद्धतीने मांडलेला विषय.विचार करायला लावणारे मुद्दे.

The Fall of heaven हे इराणच्या मुहम्मद शाहच्या शेवटच्या वर्षांवर लिहिलेले पुस्तक वाचतोय. हे पुस्तक शाहची राणी फराह, तात्कालीन आणि सद्य इराणमध्ये अभ्यासक, अधिकारी, तात्कालीन अमेरिकन परराष्ट्र धोरण सल्लागार ह्यांच्या मुलाखती घेऊन लिहिले आहे. न्युझीलंड च्या एका पत्रकाराने पुस्तक लिहिले आहे.

सय मधले लेख लोकसत्ताच्या संकेतस्थळावर वाचता येतील.
तिथे पहिलीच बातमी सई ताम्हणकरबद्दल दिसते आहे, ती सोडा Wink
सगळे लेख दिसत नाहीत, पण शोधून मिळायला हवेत. उलटही आहे. तिथे असलेले सगळे लेख पुस्तकात आले नसावेत. छोटे बडे आणि अडोस पडोस हे लेख पुस्तकात नाहीत . चित्रपटांसंबंधीचे काही लेख लोकसत्तेत नाहीत. हे सईने आणि तिच्या आईने केलेल्या तिच्या वर्णनाला साजेसेच आहे.
वृत्तपत्रात लेख छापताना त्यांनी तारखांचे घोळ दुरुस्त केले नाहीत आणि पुस्तक छापतानाही!

पुस्तकाचे नाव : अशीही एक झुंज
लेखिका : डॉ मृदुला बेळे

ही झुंज कोणी दिली तर एका भारतीय औषध कंपनीने - सिप्लाने. कोणाशी दिली तर युरोप - अमेरिकेतला बलाढ्य औषध कंपन्यांशी. कशासाठी दिली तर मानवतेसाठी.

2013 मध्ये इटलीत 'बौद्धिक संपदा कायदा' या विषयाचे उच्च शिक्षण घेताना लेखिका एक दिवस विरंगुळा म्हणून चित्रपट महोत्सव बघायला जाते. 'फायर इन द ब्लड' हा चित्रपट बघून आल्यावर मात्र प्रचंड अस्वस्थ होते. कारण असतं औषधं परवडत नाहीत म्हणून लाखोंच्या संख्येने मृत्यू पाहणारा आफ्रिका देश. आणि त्यांच्या मदतीला धावून गेलेला फक्त भारत देश.

औषधं तर युरोप अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांकडेही होती. पण त्यांच्या दृष्टीने लाखोंनी मरणाऱ्या आफ्रिकन लोकांपेक्षा औषधं विकून लाखो डॉलर्सनी होणाऱ्या नफेखोरीचं पारडं जास्त जड होतं. याचवेळी आपल्याकडे भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ, अस्वच्छता, गरिबी असून देखील जेव्हा बीग फार्मा ,फायझर सारख्या बलाढ्य कंपन्या एड्स वरचे वर्षभराचे औषध तब्बल 15 ते 20,000 डॉलरला विकत होत्या तेव्हा आपली सिप्ला केवळ 350 डॉलरला विकायला तयार झाली होती. तेही नुकसान सोसून. का? तर जगाच्या पाठीवर कुणाचाही जीव इतका स्वस्त नाही की औषध महाग आहे म्हणून तो जावा या नैतिकतेसाठी. माणूस मग तो काळा- गोरा , गरीब- श्रीमंत ,मागासलेल्या - पुढारलेल्या देशातील असो प्रत्येकाचा जीव सारखाच. यासाठी धडपडणारी भारतीय औषध कंपनी सिप्ला आणि ती उभारणारे डॉक्टर युसूफ हमीद.

1990 च्या दशकात एड्स च्या रोगाची साथ कशी सुरू होते, कशी पसरते, लाखोंनी लोकं मृत्युमुखी पडतायत तरीही आफ्रिकन सरकारचं साथ नाकारणे, वेगळेच राजकारण करणे हे वाचून खेद वाटतो.

पेटंट म्हणजे काय, युरोप / अमेरिकेतल्या बलाढ्य औषध कंपन्यांची ताकदवान संघटना बिग फार्मा , त्यांची लॉबी, तिथल्या निवडणुकांना जास्तीत जास्त पैसा पुरवून सरकारवर दबाव आणून कायदे आपल्याला हवे तसे वळवून घ्यायचे, औषधांच्या किमती भरमसाठ वाढवायच्या ही सगळी साखळी आपल्याला हळूहळू उलगडत जाते.

1957 मध्ये भारत सरकारने आपल्या देशाचे आरोग्यमान सुधारण्यासाठी समिती स्थापन केली आणि त्यांच्या अभ्यासानुसार 1970 चा भारतीय पेटंट कायदा लागू करण्यात आला ज्यात उत्पादन पेटंट पद्धत बंद करून प्रक्रिया पेटंट देण्याचं ठरवण्यात आलं जेणेकरून शक्कल लढवून प्रक्रिया पद्धती बदलून भारत औषध निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हायला मदत झाली. सिप्ला, डॉ रेड्डीज, रॅनबॅक्सी यांसारख्या जेनेरिक औषध कंपन्या स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत प्रयत्नशील राहिल्या. हा पुस्तकातला भाग वाचून भारत सरकारच्या दूरदर्शीपणाबद्दल आणि आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.

चला, आता आपण स्वस्त औषधं निर्माण करू लागलो. आपल्या देशातल्या जनतेला त्याचा फायदाही होतोय. त्याचवेळी दुसऱ्या देशात औषधाअभावी भयानक परिस्थिती आहे तर आपण नुकसान सोडून त्यांना मदत करायचं ठरवतोय तर त्यातही बिग फार्मा पाय ओढायचा प्रयत्न करते. भारतीय कंपन्या लफंग्या आहेत. कुठतरी घाणीत, घाणेरड्या दर्जाची बनावट औषधं बनवतात. ती औषधे उंदराच्या विषाइतकी विषारी आहेत. अशा जाहिराती बनवून अपप्रचार करते. एकदा का भारताची स्वस्त औषधं आफ्रिकेत आली की इतर देशही त्याची मागणी करतील. खुद्द अमेरिकनही ही मागणी करेल आणि मग आपला नफा जाऊन धंदा बसेल. या भीतीतून खरंतर बिग फार्मा हा अपप्रचार करत असते.

याचवेळी मॅक्नील हा हाडाचा पत्रकार या सगळ्याची पडताळणी करून सत्य समोर आणतो आणि न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लेख छापतो. आता मात्र सगळ्या जगाला याची दखल घ्यावी लागते. या बातमीने जगभरातला औषध उद्योग ढवळून निघतो. बिग फार्माने 39 बलाढ्य कँपन्यांना हाताशी धरून आपल्या तथाकथित पेटंट साठी जो खटला आफ्रिका सरकारविरुद्ध उभा केलेला असतो तो माणुसकीचा आव आणत मागे घेतला जातो. हे शक्य होतं ते सिप्ला ने दिलेल्या झुंजीमुळे.

मेडिकल फिल्डशी आपला/ वाचकांचा काहीही थेट संबंध आला नसला तरी पुस्तकाची भाषा समजत नाही, क्लिष्ट आहे असं होत नाही. लेखिका स्वतः औषध निर्माण शास्त्राच्या अध्यापिका आहेत. जगभर चालणारा औषध उद्योग, औषधांचे लागणारे शोध, त्यावरची पेटंट्स, औषधांची किंमत, कंपन्यांची मक्तेदारी ते नफेखोरी अशी बरीच माहिती रंजक शैलीत लेखिकेने लिहिली आहे.

झुंज अजूनही संपलेली नाही भारताने ट्रिप्स करारावर सही केली. 2005 साली पेटंट कायदा पुन्हा बदलण्यात आला. तरीही त्यातल्या तरतुदींचा अभ्यास करून भारताचं 'जगाची औषधशाळा' हे बिरुद टिकवण्याची धडपड चालू आहे. लुटारू, रॉबिनहूड अशी विशेषणे बलाढ्य अशा बिग फार्माकडून डॉक्टर हमीदना मिळुनही त्यांनी टक्कर देत आपलं काम चालू ठेवलं आहे.
रंजक भाषेत लिहिलेलं वाचनीय आहे पुस्तक.

एखादं नवीन औषध शोधून पेटंट घेऊन मोठ्या किंमतीला बाजारात आल्यावर ते परवडले तर औषध आहे म्हणून शकतो. नाही परवडले तर ते औषध उपलब्ध नाही असं. जर काही खटले करून बाजारात पेटंट मुक्त करायला लावणे म्हणजे त्या कायद्याचा भंग होईल. औषध कंपन्या औषधे शोधण्यावर वेळ घालवणार नाहीत.
त्यावर उपाय एकच की देणगीदार जमा करून ते महागडे औषध विकत घेऊन सर्वसामान्यांना देणे.

मस्त परिचय वर्णिता. पुस्तक वाचलं पाहिजे!

मी आत्ता पूर्ण केलेली कादंबरी -विदेश. लेखिका आशा कर्दळे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लग्न करून भारतात आलेली एका ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी ॲन ही या कादंबरीची नायिका आहे.
इंग्लंडमध्ये सामान्य परिस्थितीत वाढलेली ॲन हिंदुस्थानात येऊन कलकत्ता या राजधानीच्या शहरात, बंगल्यात राहणारी 'मेमसाब' होते. भारत आवडून घ्यायचाच नाही, असा निर्धार करूनच ती आलेली असते. तिचा नवरा हेन्री हा लग्नाच्या आधी काही काळापासून इथेच रहात असतो. त्याचे इथल्या नोकरांशी एक अंतर राखून का होईना, पण चांगले संबंध असतात, त्याला इथली भाषा समजायला, बोलता यायला लागलेली असते. तोही इथे 'राज्यकर्ता' म्हणूनच वावरतो, पण त्याला हा देश समजून घेण्यात रस असतो. ॲन मात्र इथे तुटकपणेच राहते. सतत होमलँडच्या आठवणीने कष्टी होते. इथे रुजण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. तिचं फारसं शिक्षणही झालेलं नसतं, तिला नवीन ठिकाणं, नवीन माहिती, चालू घडामोडी जाणून घेण्यात काडीमात्रही रस नसतो. अत्यंत मर्यादित, संकुचित असं तिचं विश्व असतं.
पण नकळतपणे, जशी वर्षं जातात तशी ती अपरिहार्यपणे परिस्थिती स्वीकारते, अनिच्छेने का होईना, पण इथली माणसं, नोकरचाकर, इथली झाडं-फुलं तिला आवडू लागतात. शेवटी हेन्री निवृत्त झाल्यानंतर ते इंग्लंडला परत जातात तेव्हा तिकडे गेल्यावर तिला चक्क हिंदुस्थानाची आठवण येऊ लागते.

त्या काळात भारतात येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बायकांची ही एक प्रातिनिधिक कथा आहे. सातासमुद्रापार असलेल्या पूर्णपणे अनोळखी देशात लग्न करून येणं, हवामान, माणसं, भाषा, संस्कृती सगळंच आपल्या मायदेशापेक्षा खूप वेगळं असणं, आजूबाजूला फारशी ब्रिटिश कुटुंबं नसणं, एकटेपणा ही प्रतिकूल परिस्थिती एकीकडे आणि त्याचबरोबर प्रशस्त बंगल्यातलं आरामशीर आयुष्य, स्वस्ताई, दिमतीला नोकरांचा ताफा, आपण इथले राज्यकर्ते असल्याचा गर्व हेही.

इंग्लंडहून इथे आलेल्या काही अविवाहित अधिकाऱ्यांचे इथल्या स्त्रियांशी संबंध आले, त्यातून त्यांना मुलंही झाली. ही अजून एक गुंतागुंत.
१८५७ च्या उठावानंतर या इंग्लिश कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची, भीतीची भावनाही निर्माण झाली. हळूहळू इंग्लंडहून इथे येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. उच्चशिक्षित, उच्चभ्रू इंग्लिश तरुण इथे जास्त प्रमाणात येऊ लागले. अशा वेळी आधीपासून इथे असलेल्या, तुलनेने कमी शिकलेल्या ब्रिटिशांमध्ये एक न्यूनगंड येऊ लागला.
हे अधिकारी आपल्या मुलांना सात-आठ वर्षांच्या वयात शिकायला इंग्लंडला धाडत असत. तिकडे जाऊन शिकून ती मुलं 'राज' च्या सेवेत रुजू होण्यासाठी परत येत असत. राजसाठी अधिकाधिक मुलगे देणं (आणि नंतर त्यांचा विरह सहन करणं) हेही या बायकांचं एक कर्तव्यच.
ॲन आणि हेन्रीच्या व्यतिरिक्त या कादंबरीत असलेल्या इतर अनेक ब्रिटिश आणि भारतीय व्यक्तिरेखाही उत्तम उभ्या केलेल्या आहेत. ॲनची बहीणही भारतात येते, पण मिशनरी म्हणून. तिचं एक समांतर आयुष्य.
बंगालमध्ये भारतीयांमध्ये निर्माण होत असलेली जागृती, सुशिक्षित भारतीय तरुणांचं वाढत जाणारं प्रमाण, हेही चित्रण चांगलं झालं आहे.
आशा कर्दळे यांच्या मुख्यतः कथा पूर्वी दिवाळी अंकांमध्ये वाचल्या होत्या. 'पलीकडच्या' बाजूने भारतातल्या ब्रिटिश सत्तेचं रूप दाखवणारी ही कादंबरी मला आवडली. लेखिकेने अनेक इंग्रजी आणि मराठी संदर्भग्रंथ वापरलेले आहेत, त्यांची सूची शेवटी दिली आहे.

भरत, हो. लोकसत्तेत लेखमाला असायची.

Srd, ही सगळी गुंतागुंत आहे खरं तर. अमेरिकेतली कितीतरी औषधं विद्यापीठात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या संशोधनाने जन्माला येतात. या विद्यापीठांकडे संशोधनासाठी जो पैसा येतो तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही सरकारी संस्था देते . या संस्थेकडे हा पैसा कुठून येतो तर लोकांनी भरलेल्या करांमधून आणि मग ही औषधं कंपन्या विकत घेतात त्यावर क्लिनिकल चाचण्या करतात आणि मग ते औषध बाजारात आणतात. थोडक्यात जे संशोधन करायला लागल्यामुळे औषधाची किंमत वाढली असा दावा औषध कंपन्या करतात ते संशोधन खरं म्हणजे सार्वजनिक खर्चातूनच झालेलं असतं. आणि तरीही लोकांना जेव्हा ते औषध मिळतं तेव्हा ते जाम महाग मिळतं. औषध कंपन्या विकत घेतलेल्या औषधावर संशोधन करतात पण त्यावर नक्की किती खर्च करतात हे सांगत नाहीत. 1964 मध्ये कॅन्सर वर म्हणून एक औषध शोधलं गेलं पण ते कॅन्सर वर कुचकामी ठरलं. नन्तर १९७४ मध्ये कळलं की ते विषाणूजन्य रोगांवर काम करतय, 1983 मध्ये एड्स विषाणू मुळे होतोय हे कळल्यावर त्यावर औषकम्पनी ने चाचण्या केल्या , त्या यशस्वी झाल्यावर 1985 मध्ये त्या औषधावर पेटंट घेतलं गेलं आणि आम्ही हे प्रचंड कष्ट करून औषध शोधलं म्हणून कँपन्यांनी ढोल बडवला. आणि अवाजवी किमतीत विकायला सुरू केलं.

अर्थात हे प्रत्येक औषधाच्या बाबतीत लागू नाही. काही औषधं मुळातून शोधून, त्याच्या क्लिनिकल चाचण्या माणसांवर ,प्राण्यांवर करून त्याची सुरक्षितता तपासून घेणे, औषधांची कॉम्बिनेशन्स करणे हे प्रचंड खर्चाचं आहे हे ही मान्यच.

शिवाय जेव्हा आणीबाणी ची परिस्थिती म्हणजे साथ वगरे येते, लाखोंच्या घरात लोकं मृत्युमुखी पडतायत तेव्हा सक्तीचे परवाने द्यायची तरतूद कायद्यात होती . साथ आटोक्यात आणण्यासाठी काही काळ स्थानिक कँपन्यांना औषधं बनवण्याची परवानगी देणे. हे करारात सुद्धा होते तरीही नफेखोरी कमी होतेय म्हणून निव्वळ फार्माने विरोध करून खटला चालवायला सुरू केलं. हा हट्टीपणाच झाला त्यांचा . देणगीदार जमा करून औषधे पुरवणे हे थोड्या लोकांसाठी शक्य आहे.

छान परिचय वावे. हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. तू लिहिलेला परिचय वाचताना आठवत गेलं.

आशा कर्दळे यांच्या मुख्यतः कथा पूर्वी दिवाळी अंकांमध्ये वाचल्या होत्या. 'पलीकडच्या' बाजूने भारतातल्या ब्रिटिश सत्तेचं रूप दाखवणारी ही कादंबरी मला आवडली. ->>>
'विदेश' मीसुद्धा वाचली आहे.
अ‍ॅनसारख्या असंख्य ब्रिटिश स्त्रिया लग्नानंतर इथे येऊन एका पूर्णतः नवीन संस्कृतीशी/समाजाशी जुळवून घेउ पहात होत्या. त्यांचं भावविश्व दाखवून, इतिहासात पूर्णपणे दुर्लक्षीत अशा त्यावेळच्या एका समाजघटकाच्या आयुष्यावर आशा कर्दळे यांनी प्रकाश टाकला आहे.
मला पुस्तकातला शेवटचा भाग आवडला होता. जिथे अ‍ॅन भारताची आठवण येऊन खूप भावनिक होते. दुर्दैवाने या बायका कुठेच मूळ धरू शकल्या नाहीत. ना इथे, ना इंग्लंडमधे.
शेवटी आपण कुठून आलो यापेक्षा आपण आयुष्यातला मोठा काळ कुठे व्यतीत केला हे महत्वाचे ठरते, असे लेखिकेने सुचवले आहे.

अशीच दोलायमान भावनिक स्थिती काही अंशी काही काही NRIs ची सुद्धा होत असेल असे वाटते.

अशीच दोलायमान भावनिक स्थिती काही अंशी काही काही NRIs ची सुद्धा होत असेल असे वाटते.
सहमत.
'विदेश' ओळख आवडली. १८५७ अगोदर आणि नंतर इथे येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची वागणूक आणि भावना बदलल्या हे बरोबर. ब्रिटिशांचे दोन गट पडू लागले.

IMG-20230222-WA0006(1).jpg

Pages