Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे पुस्तक वाचायला आवडेल.
हे पुस्तक वाचायला आवडेल.
कस्तुरभाई लालभाई हे नाव ओळखीचं वाटलं नाही. गूगल केल्यावर कळलं की अरविंद मिल्सचे संस्थापक.
लोक माझे सांगाती - एक राजकीय
लोक माझे सांगाती - एक राजकीय आत्मकथा - शरद पवार.
वाचून काही महिने झाले. इथे लिहायचं राहून गेलं. आणखी कोणीही या पुस्तकाबद्दल लिहिल्याचं आठवत नाही . त्यामुळेही लिहितोय.
हे कालानुक्रमे लिहिलेलं आत्मचररित्र नाही. कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या घटना / टप्पे तेही जिथे त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्या आठवणींचा दस्तैवज. तपशिलात क्वचित चूक होऊ शकेल.
हे पुस्तक लिहवून घेतलेलं आहे. म्हणजे पवारांनी मजकूर सांगितलाय. शब्दांकन कोणीतरी केलंय (बहुधा माहेरच्या संपादिला सुजाता देशमुख त्या दोघांपैकी एक आहेत ). लहानपणीच्या भागात हं आता याबद्दलची ढोबळ माहिती तुम्ही मिळवून लिहा असं केल्यासारखं वाटतं. पण पुढचं लेखन प्रवाही आहे. प्रस्तावनेत स्वतःवर झालेल्या आरोपांची ( उदा : भूखंड , प्रकल्पांतून फायदा) नोंद आणि त्यांना ढोबळ उत्तर दिलं आहे. पुढे त्याचा उल्लेख नाही.
आईचा जितका उल्लेख आलाय तितका वडिलांचा नाही. आई स्वातंत्र्यपूर्व काळात लोकप्रतिनिधी होती. शरद पवार तीन दिवसांचे असताना त्यांना घेऊन प्रवास करून बैठकीला हजर राहिली होती. घरचं वातावरण शेकापच्या बाजूचं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलना साठी बैठका घरी, सभा घरासमोर . तरीही काँग्रेसकडे ओढा. यशवंतराव - नेहरूंचा प्रभाव. कॉलेज शिकायला पुण्यात असतानाच संघटन कौशल्य- माणसं जोडण्याची कला- पुढे काँग्रेसमध्ये गेल्यावर याच जोरावर वेगाने प्रगती. काँग्रेसच्या आताच्या उगवत्या नेत्यांनी किमान हा भाग वाचून आत्मसात करायला हवा.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर नंतर नामविस्तार अशा दोन्ही वेळी पवार मुख्यमंत्री होते. काँग्रेसचं अंतर्गत राजकारण, अविश्वासाचं वातावरण, हाय कमांड कल्चर यांचं वर्णन आता परिचयाचं झालं आहे. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात (बहुधा) काँग्रेसमध्ये नसतानाही राजीव यांच्या सांगण्यावरून् त्यांनी पंजाब प्रश्नावर तुरुंगात असलेल्या अकाली दलाच्या नेत्यांशी मध्यस्थी केली हा भाग माझ्यासाठी नवीन होता. राव यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री म्हणून कामगिरीबद्दल ही त्यांनी अभिमानाने/ समाधानाने लिहिलं आहे. मंडल आणि अयोध्या प्रकरणांत त्यांची काही भूमिका नसल्याने या घटनांना केवळ स्पर्श केला आहे. त्या काळातले एक प्रमुख नेते म्हणून त्यांचं निरीक्षण आणि नोंदी वाचायला आवडलं असतं. मग राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थापनेचा भाग सविस्तर लिहिला आहे. खरं कारण आपल्याला इथे पक्षाध्यक्षपद मिळणार नाही हे असून सोनियांच्या विदेशी मूल असल्याचा मुद्दा भाजपच्या नथीतून तीर मारल्यासारखा आहे असं वाटलं. लवासा, महिला धोरण, लातूर भूकंप यांबद्दल लिहिलंय. युपीए मधल्या दहा वर्षांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळासाठी सगळ्यात जास्त पाने खर्च केली आहेत. मंत्रिगटांवरून काँग्रेसला चिमटे काढलेत. टुजी, मायनिंगबद्दल मनमोहन सिंग यांनी बोलायला हवं होतं (सरकारची बाजू जनतेसमोर मांडायला हवी होती) हे त्यांचं मत पटलं.
आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात ते दिल्लीत असल्याने त्याबद्दल काहीच लिहिलेलं नाही.
बारामतीच्या विकासाबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीन होती . ते एज्युकेशनल हब आहे हे माहीत नव्हतं.
कॅन्सरशी झुंज , फ्रॅक्चरनंंतर १५ दिवसांत पुन्हा कार्यरत होणं यांतून त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं दर्शन घडतं. स्वतः ला झालेल्या कॅन्सरबद्दल लिहिताना विलासराव देशमुख आणि आर आर आबा पाटील यांच्यासाठी हळहळ व्यक्त केली आहे.
राजकारणापलीकडे या प्रकरणात पाथरवट ही कविता कवीच्या तोंडून ऐकल्याचा उल्लेख आहे (पुस्तक २०१५ साली प्रकाशित झालेलं आहे)
'येत्या काळात डोकावताना' - गोष्टी इतक्या चटकन आणि इतक्या बदलतील याचा त्यांना अंदाज आला नाही असं दिसतं.
हे पुस्तक वाचनालयात चाळून
हे पुस्तक वाचनालयात चाळून पाहिलंय पण वाचावंसं वाटलं नाही. वाचेन कधीतरी. पवारांच्या विषयी ठेवलेला/असलेला माझा पूर्वग्रहही अडसर आला हे खरंय. त्यांची भाषणं, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या पाहिलेल्या आहेत. पण माणूस जबरदस्त इच्छाशक्तीवाला आहे हे एकदम शंभर टक्के मान्य. दिल्लीत पाय रोवून ठेवणे पुढील कारकीर्दीला पोषक असते. तिथे माणसं ओळखून बांधून ठेवणे, पेरून ठेवणे हे पवारांचे पेक्षा नरसिंह रावांना अधिक जमले होते.
बारामतीचा विकास पाहण्याचा एकदा योग आला भाच्याला एका अभ्यासक्रमाचा प्रवेश मिळतो का पाहण्यासाठी गेलो तेव्हा. (पण तो अभ्यासक्रम त्या वर्षी सुरू होणार नव्हता.) मला तर मी वाशी नवीन मुंबईत फिरतोय असा भास झाला. बारामती गावाबाहेर पाच किमीवर हे विद्यापीठ आहे. बसमध्ये माझ्या बाजूला बसलेला प्रवासी तिथला अकाउंट कॅशिअर होता व त्यांचेकडून पोहोचण्याअगोदरच माहिती मिळाली व बारामती काय आहे ते कळले.
पवारांवर दुसऱ्या कुणा पत्रकाराने लिहिलेले पुस्तकही आहे.
जबरदस्त असामी आहे हे नक्कीच.
हे पुस्तक अर्धे वाचले होते
हे पुस्तक अर्धे वाचले होते.नंतर काही अडचणींमुळे वाचन थबकले.मग पुढे वाचायचा कंटाळा आला.
विमेन अँड द वेटलॉस तमाशा -
विमेन अँड द वेटलॉस तमाशा -
ऋजुता दिवेकर
याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
रेखा दिवेकर
प्रकाशन २०११
पाने ३७५.
( या पुस्तकात काय लिहिलं आहे याची बरीच उत्सुकता होती.)
"फिट,परफेक्ट . . .'कम्प्लिट' वुमन बनण्याचा मूलमंत्र देणारं 'Lifestyle' गाईड."
वजन जास्ती असणाऱ्या महिलांसाठी वजन कमी करण्याचे उपाय,आहार इतर माहिती ललित पद्धतीने दिली आहे. लेखिका आहारतज्ज्ञ आहे.
झाशीची राणी,हिरकणी यांची उदाहरणे आदर्श म्हणून दिली असली तरी त्या फिट राहण्यासाठी काय आहार घेत होत्या,वजन किती असेल याबद्दल काही म्हटलेलं नाही.
ते जाऊ दे. वेटलॉस तमाशा या नावातच आशय दडलेला आहे. शहरी जीवनपद्धतीच्या बायकांना चर्चेसाठी मुद्दे देणे एवढंच असेल.
आता महिला पोलीस बऱ्याच आहेत.त्यांचं वजन किती असायला हवं? त्यांनी वजन कमी करावं का?
Srd, बऱ्याच पुस्तकांची ओळख
Srd, बऱ्याच पुस्तकांची ओळख करून दिलीत.
हलकंफूलकं आहे म्हणून 'डॉ कडे जाण्यापूर्वी' वाचायला आवडेल.
बिझनेस लेजंडस ही आवडेल.
फॅक्टरी गर्ल्स
लेस्ली टी छांग.
अनु : गौरी देशपांडे
चीन मधल्या फॅक्ट्रीज आणि त्यातला कामगार वर्ग विशेषतः स्त्री वर्ग हा विषय.
पुस्तकात ग्रामीण चीन आणि शहरी चीन यातला फरक आपल्यासारखाच दिसुन येतो. खेड्यातली प्रचंड गरिबी, फक्त शेतीवर उपजिवीका. ते ही वर्षातून ठराविक काळ. परिणामी युवा वर्ग शहरातील कारखानदारीकडे आकर्षित होतो. कारखान्यात नोकरी पटकन मिळते पण शिक्षण कमी त्यामुळं असेंम्बली लाईन पासून सुरुवात होते. दिवसाचे 12 ते 14 तास सतत काम. डोरमेंटरीतील एकेका खोलीतील 10 - 12 जणांचं राहणं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शिफ्टस. खरं तर सगळ्याच स्थलांतरित असतात पण तरीही यांच्यात मैत्रीचा धागा विणला जात नाही. एकमेकींना सतत पारखणे, हातचे राखून मैत्री करणे. केली मैत्री तर लांबच्या ठिकाणी राहणाऱ्या मैत्रिणी जोडणे.
घरच्यांना वाटतं की मुलींनी सारखे कारखाने(जॉब) बदलू नयेत. भरपूर पैसे कमवावे, गावी पाठवावेत, भविष्यासाठी रक्कम उभी करावी, लग्न करून स्थिररस्थावर व्हावे. इकडं अपुरा पगार, अपुऱ्या सोयीसुविधा, कारखान्यातल्या तळलेव्हल वरच्या एकाच कामात येणारा साचलेपणा यामुळं पुढं शिकावं ही येणारी उर्मी, नोकरीतील संघर्ष , कामगार आणि बॉस , तिथल्या मुलाखती , तरुण स्त्री कर्मचाऱ्यांची स्वप्न वगैरे.
लेखिका मूळ चिनी वंशीय आहे आणि आपल्या कुटुंबाच्या मूळ देशाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ती वेगवेगळ्या कारखान्यात काम करणाऱ्या मुलींना भेटत राहते .. त्यातून माहिती गोळा करते.
सुरवातीला लेखिका जरी वेगवेगळ्या मुलींना भेटते तरी त्यांचं जीवन एकसारखे च आहे ते रिपिटेशन वाटतं आपल्याला वाचताना.
चिखल घाम आणि अश्रू
चिखल घाम आणि अश्रू
बेअर ग्रील्स
अनु: अनिल/ मीना किणीकर
डिस्कवरी चैनल वर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मॅन v/s वाइल्ड हा कार्यक्रम पाहिला असेल. त्याचा नायक बेअर ग्रील्स. त्याचं हे आत्मचरित्र. धाडसी मोहिमा आणि किडे, अळ्या, खेकडे-बिकडे खाणारा माणूस एवढच मला त्याच्याविषयी माहिती होतं. पण तो नेमका कसा आहे ,लहानपणी कसा होता, हे धाडसी मोहिमेचे बीज त्याच्यात कसं पेरलं गेलं, तो कशालाच घाबरत नाही का अशा साध्यासुध्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतात.
त्याची धाडसी आजी ,वडिलांची गिर्यारोहणाची आवड यामुळे उपजतच त्याच्यात काही गोष्टी होत्या. वीट या बेटावर गेलेले लहानपण, तेव्हाचे शिकलेले नौकानयन त्याला धाडसी बनवत गेलं. बेअर आई-वडिलांच्या कामकाजामुळे त्यांच्या सहवासात फार कमी वाढला. स्वतंत्र राहायला तो फार लहानपणी शिकला. आठव्या वर्षी बोर्डिंग स्कूल पुढे इटॉन या प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण. या दरम्यान मित्रपरिवाराच्या त्रासामुळे आत्मरक्षणासाठी शिकलेलं मार्शल आर्ट पुढे त्यात गोडी निर्माण झाली म्हणून त्यातल्या उच्च शिक्षणासाठी जपानला प्रयाण केलं.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच लष्करातलं स्पेशल एअर सर्विस जॉईन केलं. त्यासाठीच्या SAS प्रशिक्षणा दरम्यान त्याच्या शारीरिक - मानसिक क्षमता प्रचंड रुंदावल्या . सहनशीलता म्हणजे काय हे ते संपूर्ण प्रकरण वाचून कळते. अंगावर काटा येईल इतकं अवघड प्रशिक्षण. निम्म्याहून जास्त जनता पहिल्या निवड चाचणीतच गळते इतकं खडतर प्रशिक्षण. तो थरार वाचूनच अनुभवावा. इथेच बेअर म्हणतो धाडस हेच माझ्या आयुष्याचं मग ध्येय ठरले.
SAS च्या दुसऱ्या प्रयत्नात तो निवडला गेला. हवाई उड्डाण करताना 16000 फूट उंचावर पोहोचून खाली उतरताना सिग्नल मिळाल्यावर त्यांने योग्य वेळी पॅराशुट उघडले पण तांत्रिक बिघाडामुळे अचानक ते हेलकावे खाऊ लागले आणि काही कळायच्या आत बेअर पाठीवर धाडकन आपटला गेला . डॉक्टरांचं म्हणणं पाठीचे तीन मणके मोडलेत आणि आता तो चालेल की नाही सांगू शकत नाही. वय वर्ष फक्त 23.
कित्येक महिने बेडवर पडायला लागलेलं. समोर भिंतीवर एक एव्हरेस्टचं पोस्टर होतं. सतत ते बघून एक दिवस मी हे सर करणार हे तो त्यावेळी बोलत होता . हे त्या वेळी वेड्यासारखच बोलणं होतं पण धाडस तर त्याच्या अंगात भिनलेलं. हळूहळू चालायला यायला लागलं आणि असंख्य प्रयत्न, व्यायाम करून एव्हरेस्ट साठी स्वतःला सज्ज केलं फक्त 18 महिन्यात.
अजिंक्य असा हिमालय क्षणाक्षणात होणारा हवामान बदल, हिमदंश, ऑक्सिजन तुटवडा , हिमवादळ यामुळे गिर्यारोहकांच्या मृत्यूचे प्रमाण फार. बऱ्याच प्रयत्नांती स्पॉन्सरशिप मिळवून बेअर, मित्र आणि शेर्पा एव्हरेस्ट मोहिमेकडे कूच करतात. प्रत्यक्ष मोहिमेतल्या दिवसांचे अनुभव खतरनाक आहेत. दोन वेळा जीवावर बेतलेला अपघात आणि त्यातून बाहेर पडल्यावर बेअर लिहितो की फक्त प्रयत्न पुरेसे नाहीत. नशिबाचीही साथ लागते. खूप उंचीवर गेल्यावर सगळीकडे पांढरा बर्फ , जवळचं कोणी नाही, कोणाशी संपर्क नाही, हवामानाचा अंदाज नाही , शरीर घडी घडी ढासळतं आणि या विचित्र भावनेतून, थंडी, यातना यातून मृत्यूचं आकर्षण वाटतं . वाटेत बर्फात अर्धवट गाडले गेलेले असंख्य मृतदेह दिसत असतात. आपणही यातले एक होऊ अशी भीती सतत मनात येत असते. यावर देवावरची श्रद्धा त्यांना तारुन नेते आणि 26 मे 1998 ला सकाळी सात वाजून 22 मिनिटांनी एव्हरेस्ट बेअर सर करतात.
इथूनच त्यांना प्रेरणा मिळते आणि सुरू होतो मॅन v/s वाइल्ड चा प्रवास. जिथे कोणी जात नाही तिथे जाऊन संकटांचा मुकाबला करत जिवंत राहणे. जिद्द, मेहनत ,आत्मविश्वास, प्रचंड मनोबल, कष्ट ,साहस ,संघर्ष , धाडस म्हणजेच बेअर ग्रील्स. पुस्तक वाचताना एक ॲक्शन पट बघितल्याचा फील येतो. प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून कसं जिवंत राहायचं याचा ॲक्शन पट. पुस्तकाच्या शेवटी ग्रील्स लिहितात की या पुस्तकातून त्यांना त्यांची जडणघडण कशी झाली ते सांगायचं होतं. लहानसहान मोहिमांमधून ते कसे शिकत गेले आणि सुरुवातीच्या छोट्यामोठ्या मोहिमांमुळे कसे घडत गेले.
वर्णिता, दोन्ही पुस्तक ओळखी
वर्णिता, दोन्ही पुस्तक ओळखी आवडल्या.
बेअर ग्रिल्सचं इंग्रजी पुस्तक घरी आहे. पण अजून वाचलं नाही.
@ वर्णिता , 1) डॉ. कडे
@ वर्णिता , 1) डॉ. कडे जाण्यापूर्वी हे मिळालं तर विकत घेऊन ठेवणार आहे. संदर्भासाठी योग्य आहे. हेतू असा की रोग जाणणे, गांभिर्य लक्षात घेणे आणि प्राथमिक उपचार सांगणे हे आहे. नंतर डॉ कडे जाणार आहोतच. दुसरे एक छोटे पुस्तक - 'औषधे घेतांना' - डॉ. आत्माराम पवार हेसुद्धा काही महत्त्वाच्या चालू औषधांची माहिती आहे. तेही चांगले आहे. तिसरे एक म्हणजे 'डॉ. नसेल तिथे' - ग्रामीण वैद्यक सेवकांसाठी केलेले आणि सर्वांचं उपयोगी. पण दुर्दैवाने ते आता मिळत नाही.
बिझनेस लेजंडस हे खास. चारही उद्योगपती साधारण एकाच काळातले स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच्या काळातले. ब्रिटीश सरकार एतद्दैशिय उद्योगांना कसे मारत होते ,वर येऊ देत नव्हते हे जाणून घेण्यासारखे आहे. तरीही मारवाडी उद्योजक त्यांना पुरून कसे उरले ते डिटेलमध्ये आहे. टाटांवर मी अगोदर बरीच पुस्तके वाचली होती पण इथे (जेआरडी) चांगली तुलनात्मक ( इतर उद्योगपतींच्या) माहिती आहे. टाटा उद्योगात नोकरी करणाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत एकांगीपणा जाणवला तसा नाही. शिवाय मारवाडी उद्योजकांचे आणि टाटांचे धोरणही लिहिले आहे. ब्रिटिशांना दुखावेल असे धोरण टाळून टाटा प्रगती साधत होते पण मारवाडी /जैन वणिक तसे नव्हते.वालचंद यांनी तर चांगलीच लढाई केली. आपण सामान्य लोकांनी उद्योगपतींवर टीका करणे वेगळं आणि त्यांनी एकमेकांवर टीका करणं वेगळं. आपण तेवढे सक्षम आणि समपातळी नसतो. ( टाटांच्या वंशवेलात नवल,रतन,सोहराब ही नावे वारंवार आल्याने समजण्यात गोंधळ होतो.)
घनष्यामदास बिर्ला उद्योगांत धूर्त होते. बऱ्याच राष्ट्रवादी नेत्यांना सढळ देणगी देत होते. त्यांच्या कंपन्यांविरुद्ध चौकशा सुरू झाल्या तेव्हा खूपच माहिती उजेडात आली. शेवटि प्रकरण दडपावे लागले. प्रत्येक नेत्यांशी केलेला पत्रव्यवहार टाचणी करून ठेवला आहे. त्यापैकी नव्वद टक्के बिर्ला उद्योग समुहाने अप्रकाशित ठेवण्याचा निर्णय घेतला. एक सोडून सर्व नेत्यांना हजारांत पगार /देणग्या मिळत. विजयालक्ष्मींनी मी नाही त्यातली म्हटल्यावर मथाईंनी त्यांनी पौंडात घेतलेल्या रकमांच्या पावत्या हजर केल्या.
पुस्तक भारी.
श्रेय -लेखिका गीता फिरायला.
***
बेअर ग्रील्सचं पुस्तक वाचायला हवंच. (मला एका निसर्गप्रेमींने सांगितले की शाकाहारी व्यक्तीस जंगलात राहाणे अशक्य आहे. ध्रूव प्रदेशांत तर नाहीच.)
राईनॉल्ड मेसनर वाचलं आहे. हिमालयातल्या मोहिमांबद्दल उमेश झिरपे यांचा दृकश्राव्य पटही पाहण्याचा आनंद मिळाला आहे.
चीनी जीवनावर (२०१० नंतर) काही माहितीपट पाहिले आणि त्यातून कळलं की २०५० ला असणारा चीन फार वेगळा कॉम्युनिस्ट चीन असेल. ते आता दिसतोच आहे. (खरा ड्रॅगन शिकार वेगळ्याच पद्धतीने करतो. )
वर्णिता व srd परिचय आवडले.
वर्णिता,भरत व srd परिचय आवडले.
भरत, वर्णिता, srd - परिचय
भरत, वर्णिता, srd - परिचय आवडले.
श्रेय -लेखिका गीता पिरामल -
श्रेय -लेखिका गीता पिरामल - असे वाचावे.
जरी मी वाचलेले पुस्तक असा
जरी मी वाचलेले पुस्तक असा विषय असला तरी मी मला कोणते पुस्तक घ्यावेसे वाटले याबद्दल लिहीते आहे.-
Tonight he’ll go to three dangerous ceremonies
Love between men
Smoke marijuana
And write poems
मला या ओळी अतिशय सुंदर व प्रभावी वाटल्या. विशेषतः कविता लेखन या कृतीस दिलेल्या ' ड्यु रिस्पेक्ट' मुळे.
फ क्त या ओळी वाचुने - RAÚL GÓMEZ JATTIN या लॅटिन कविचे 'Almost Obscene' हे पुस्तक वाचावेसे वाटते. अजुन एक कविता कडवे -
THE DARK WIZARDS GOT INTO HIS BRAIN
They carved up his insides with the sharpest scalpels
“You are a woman” They yelled and laughed
He felt a sharp pain in his head
नक्की हे पुस्तक घेउन वाचेन. या कविची तुलना त्याने स्वतःने, 'cavafy' बरोबर केलेली आहे. मला 'cavafy' या कविच्या थोड्यात कविता माहीत आहेत. उदा -
Body, remember
not only how much you were loved,
not only the beds where you lay,
but also those desires for you,
shining clearly in eyes and trembling in a voice—
and some chance obstacle thwarted them.
Now when everything is the past,
it almost looks as if you gave yourself to those desires as well—
how they shone— remember—
in the eyes that looked at you,
how they trembled for you in the voice—remember, body.
------------------------
हे पुस्तक कवितांमधुन अनेक विषयांवरती भाष्य करते - समलैंगिकता, ड्रग, बेघर, मनोरुग्ण वगैरे. हे सर्व डार्क विषय मला आकर्षक वाटतात. हे पुस्तक वाचल्यास येथे जरुर लिहीन.
https://www.asymptotejournal.com/poetry/raul-gomez-jattin-five-poems/
विचार संचित
विचार संचित
दुर्गा भागवत यांचे प्रकाशित पण असंकलित लेखन संकलन
आवृत्ती- में, नोव्हेंबर २०१५
पाने ३५०
संपादन - मीना वैशंपायन.
दुर्गाबाईंचे बरेच लेखन ग्रंथांत आले तरीही काही असंकलित लेख एका ठिकाणी आणले आहेत.सर्व लेखांचे संकलन करून त्यांचे तीन भाग केले आहेत.
पहिला भाग -भावसंचित . ललित लेख, व्यक्तिचित्रे,आठवणी.
दुसरा भाग -संस्कृतिसंचित -लोकसाहित्य आणि सांस्कृतिक लेख.
विचार संचित हा तिसरा भाग. स्वत:ची मते,अभिप्राय.
थोडे लेख वाचून पाहिले. काही लेख खूप मोठे झाले असते त्याचे अंशतः नमुने दिले आहेत.
आंबेडकरांचे धर्मांतर,१९७५ची आणिबाणी आणि कराड संमेलनाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्षपद यावेळेची भाषणे ही काही उदाहरणे. एकूण प्रकल्प चांगला आहे. दुर्गाबाई समजण्यात मदत होते.
वाचनीय पुस्तक.
ओके srd.
ओके srd.
धन्यवाद ललिता, अस्मिता, फारएन्ड.
ललिताप्रिती,
होतं असं खरं. मी मुद्दाम इचिगो ईची हे पुस्तक 6 महिन्यांपूर्वी आणलंय. निवांत वाचू म्हणून. प्रत्येक क्षण अविस्मरणीय करणयाची जपानी पद्धत म्हणजे इचिगो ईची. पण तो वाचायचा क्षण काही अजून आला नाही माझा 
१) माणसे अरभाट आणि चिल्लर
१) माणसे अरभाट आणि चिल्लर
जी.ए.कुलकर्णी
आवृत्ती १९८८,८९,२०००,०५,०७,२०१०
पाने १३५
परचुरे प्रकाशन.
बरीच व्यक्तिचित्रे,कथा शालेय जीवनातील आहेत. खास नाही.
________________
२) डॉ.मनमोहनसिंग - एक वादळी पर्व
सुजय शास्त्री (पत्रकार,लेखक.)
पाने २३०
आवृत्ती २०१४
ठीक. अराजकीय व्यक्तिमत्त्व. विरोधकांच्या बोलण्याला लगेच शिंगावर घेऊन प्रतिकार करत नसत. शांतपणे मते मांडत. मुख्य पदावर दहा वर्षे राहिले तरी त्यांचा उल्लेख PM by accident असाच झाला. आर्थिक निर्णयांचे स्वागत झाले तरी आतून ते श्रेय श्रीमती सोनिया गांधींना दिले जात होते.
_____________________
३) बौद्ध पर्व
वा.गो.आपटे
समन्वय प्रकाशन,२०१३.
पाने २७०
नेहमीची बुद्धाची कथा माहिती असतेच. पण यामध्ये थोडे ऐतिहासिक मतांचे विवेचन आहे. जन्म कुठे झाला असेल,बौद्ध धर्माचा प्रसार केव्हा आणि कसा झाला. वेगवेगळ्या भाषेंतील धर्मग्रंथ कोणते. भारतातून धर्माचा लोप होण्याची कारणे. बौद्ध ग्रंथांत रामायणाचा उल्लेख नाही,श्रमण/श्व्रावक आहेत. जैन धर्म जुना आहे. पण रामायणात बुद्धाचा आहे. मग रामायण नंतर झाले का? इतर देशांत गेलेल्या धर्मांत नवीन पंथ झाले. संदर्भ ग्रंथ दिले आहेत.
वाचनीय पुस्तक.
____________________
४) पैस
दुर्गा भागवत,
मौज प्रकाशन,१९७०,'७३
पाने १४०
बारा स्फुट लेख. १९४०पासून कुठे कुठे भ्रमंती झाली त्या ठिकाणांच्या (सुचेल तशा) भावूक तसेच ललित आठवणींचे लेखन आहे. प्रयाग,मथुरा, यमुना- कालिंदी,द्वारका, पंढरपूर, माहेश्वर, अजिंठा, बोरिवलीच्या कान्हेरी लेण्यातील बौद्ध स्मशानभूमी. मुख्य लेख पैस म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या दगडी खांबाला टेकून अमृतानुभव लिहिला तो खांब. मग ज्ञानेश्वरीतील आवडलेले शब्द इत्यादी.
सहज शांतपणे वाचण्याचे पुस्तक.
कान्हेरीत पूर्वी ('६९, '८० मध्ये खूप आत फिरलो होतो. पण बिबट्यांची भीती नव्हती) भटकंती झाली होती. पण त्या वेळी बौद्ध स्मशानभूमीची माहिती नव्हती. आता पुन्हा जाईन तेव्हा पाहीन. तो भाग एकदा पिंजून काढायला हवा.
__________________
५) बाजार
नंदा खरे
प्रकाशन जानेवारी २०२२
पाने २००
नंदा खरे विचारवंत आहेत. वाचन खूप आहे. पण वाचलेले इथे खिचडी सारखे टाकले आहे. काहीच बोध होत नाही. भरकटलेलं लेखन.
_______________________
भावसंचित, संस्कृतीसंचित,
भावसंचित, संस्कृतीसंचित, विचारसंचित - तीनही पुस्तकं माझ्याकडे आहेत. (काही वर्षांपूर्वी भेट म्हणून मिळाली होती.) अधूनमधून चाळते.
No Presents Please: Mumbai
No Presents Please: Mumbai Stories (Jayant Kaikini).
अनुवाद Tejaswini Niranjana
पोटापाण्यासाठी मुंबईत राहणारे स्थलांतरित, परप्रांतीय; त्यांचं दैनंदिन आयुष्य, या शहरात तगून राहण्यासाठीची त्यांची धडपड; त्यांचे प्रश्न, त्यावर त्यांनी आपापल्या परिने शोधलेली उत्तरं; या सगळ्यातून समोर येणारी माणसाची चिवट वृत्ती, खमकेपणा; असा सगळा पैस मांडणार्या १६ लघुकथा आहेत.
कष्टकरी माणसांच्या कथा असल्या तरी गळेकाढू भाषा नाहीये. उलट काही ठिकाणी नर्मविनोदाचा वापर केला आहे. कथानकं खूप छान निवडली आहेत. अगदी साधे प्रसंग, पण त्या-त्या पात्राच्या दृष्टीने महत्वाचे; आपल्या भवतालापलिकडचे असले तरी ते भिडतात. प्रत्येक कथेत मुंबई शहर हे सुद्धा एक पात्र म्हणून दिसतं.
माझ्याकडच्या किंडल आवृत्तीच्या मुखपृष्ठावर खिडकीत हँगरला लावलेला एक पांढरा स्वच्छ शर्ट आहे. एका कथेत कथानायकाच्या परिस्थितीला त्या शर्टाची उपमा दिली आहे. एकच वाक्य आहे, पण ती उपमा फार चपखल आणि झकास आहे. त्या वाक्याशी मला मुखपृष्ठ फार आवडून गेलं.
मूळ पुस्तक कानडी भाषेतलं आहे. मी इंग्रजी अनुवाद वाचला. अनुवाद छान आहे.
मी पहिल्यांदाच इंग्रजी कथासंग्रह वाचला- माझ्या वाचनानुभवात काही कसर राहिली असेल तर त्याला हेच एक कारण असू शकतं.
तरीही मला मुंबई आवडते, त्यामुळे हे पुस्तकही आवडलं.
इथे सगळे खूप छान लिहितात..मी
इथे सगळे खूप छान लिहितात..मी नेहमी वाचते.
इथं सुचवलेली बरीच म्हणजे सगळीच पुस्तके निवडक असतात आणि किंडल अनलिमिटेड वर नसतात.
कुणी किंडल अनलिमिटेड वरची छान पुस्तके सुचवेल का?
सध्या मी, फिडेल कैस्ट्रो: अतुल कहाते. वाचतेय.
पंधराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत स्पेनच्या पारतंत्र्यात असलेला क्युबा.. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्पेनफडून स्वातंत्र्य मिळवून द्यायला अमेरिकेचा हस्तक्षेप..स्वातंत्र्य तर मिळालं स्पेनकडून आणि अमेरिकेच्या हातातले बाहुला बनलेला क्युबा सरकार.. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी क्युबा सरकार विरुद्ध लढणाऱ्या फिडेल कैस्ट्रो ची गोष्ट... अर्ध पुस्तक व्हायचंय अजून.
गोल्डा एक अशांत वादळ : विना गवाणकर वाचले.
Cat o nine Tales: जेफ्री आर्चर वाचले..चांगलं आहे..छोट्या छोट्या ट्वीस्टवाल्या कथा.
किंडल अनलिमिटेड वरची छान
किंडल अनलिमिटेड वरची छान पुस्तके
नक्कीच.
चांगली पुस्तके मिळण्याची ठिकाणं -
१) शहरातली महापालिका चालवत असलेली वाचनालयं.
२) रीडींग चार्जवर पुस्तके देणारे बुक स्टॉल
जर शहराजवळ आर्मी,डिफेन्सच्या कॉलनी असतील तर असे बुक स्टॉल्स्स असण्याची शक्यता अधिक. (उदाहरणार्थ मुंबईत फोर्टात, ठाण्यात 'गुरुकृपा' आहेत. पुणे कंँपात शोधा. ) इथे साधारण महिन्याभरात नवीन पुस्तके येतात. स्टीव जॉबचं चरित्र काप्या पन्नास रुपयांत फुटपाथवर आलेल्या.
३)एक पायरेट साईट होती 'चांगली'! पण त्याचा फारच गवगवा झाला आणि ती बंद पाडली गेली. इथे प्रचंड नवी पुस्तके येत. )
ज्योतिष किरण
ज्योतिष किरण
रवी - उदय प्रकाशन
आवृत्ती पहिली २००६.
पाने ४००.
पत्रव्यवहाराचा पत्ता १)लक्ष्मीविलास, परांजपे बी स्कीम रोड नं २, विलेपार्ले, मुंबई ४०००५७
२)सुमननगर,सी६/८,चेंबूर,शीव तुर्भे रस्ता, मुंबई ४०००७१
संपादक मंडळ वि.ज.बापट, ह.के.थिटे, य.म.मराठे.
सतरा ज्योतिष अभ्यासकांनी मिळून हे पुस्तक लिहिले आहे.
यामध्ये ग्रह आणि त्यांचे भ्रमण,कुंडली मांडण्याचे प्रकार,नक्षत्र विचार आणि नक्षत्रांची भारतीय तसेच परदेशी नावे,ग्रहांचे कार्यकत्व-गोचरी परिणाम -दृष्टी-योग-शुभाशुभत्व-परिणाम-स्थानाप्रमाणे परिणाम,दशाविचार आहेत.
आयुष्यातील विशेष घटनांसाठी ग्रहयोग -विवाह,संतती,शिक्षण,घर आणि शेती, नोकरी किंवा व्यवसाय, परदेश गमन,आजार, आणि आयुष्य यावर विचार केला आहे.
ज्योतिष पद्धती -भारतीय, परदेशी, अंकशास्त्र,मेदिनीय, कृष्णमूर्ती पद्धत चर्चा आणि माहिती आहे.
भविष्य पाहण्यासाठी इतर पद्धती - हस्तसामुद्रिक,प्रश्न कुंडली,नाडी ग्रंथ.
इतर संबंधीत -रत्नशास्त्र,वास्तुशास्त्र,फेंगशुई,ग्रहणे परिणाम.
कालसर्प योग किंवा इतर दोष निवारण विचार.
विवाह काल आणि वधु-वर गुणमेलन अभ्यास.
एकूण ज्योतिष अभ्यासुंसाठी योग्य संदर्भ ग्रंथ आहे.
विविध ग्रंथ संदर्भ सूची शेवटी आहे.(१७)
त्यातील
१.सुलभ ज्योतिष शास्त्र - कृ.वि. सोमण
२. तुमचे ग्रह - तुमचा व्यवसाय - व.शं. केळकर
३. कुंडलीतील भाषा - भाग १ ते ४ - ज्योतिर्विद्या मंडळ नासिक.
चांगली आहेत.
(ज्योतिष शास्त्र आहे का या वादाला टाळून पुस्तक देत आहे.)
------------------
गेले वर्षभर इथे उत्तमोत्तम
गेले वर्षभर इथे उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन ,!
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
कुमार१ ,शुभेच्छा. तुमच्या
कुमार१ ,शुभेच्छा. तुमच्या प्रेरणेने पुस्तकांचा फडशा पाडत आहे {खरेदी न करता}.
सर्वांना चांगले आरोग्य लाभो आणि डॉक्टरकडे जाण्याची वेळ न येवो.
अंताजीची बखर
अंताजीची बखर
लेखक- नंदा खरे
अंताजी खरे नावाचा एक काल्पनिक मनुष्य, जो पहिल्या बाजीरावाच्या काळापासून दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत जगला, त्याने लिहिलेली ही बखर. मात्र ही बखर म्हणजे पेशवाईचा इतिहास नसून तिचा विषय नागपूरकर भोसले, त्यांच्या बंगालवरच्या स्वाऱ्या, बंगालमधले तत्कालीन राजकारण, इंग्रज, फ्रेंच, अलीवर्दी, सिराजउद्दौला , प्लासीची लढाई असा आहे.
प्रस्तावनेत लेखकाने स्वतःची भूमिका अशी मांडली आहे की इतिहासाचे आणि ऐतिहासिक व्यक्तींचे उदात्तीकरण करणाऱ्या कादंबऱ्या (चेहरा खर्रकन उतरला, राजे गर्रकन वळले वगैरे वाक्ये असलेल्या कादंबऱ्या) पोकळ वाटतात. त्याऐवजी विनोदी ढंगाने, सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून इतिहास लिहावा, या इच्छेतून ही कादंबरी त्यांनी लिहिली.
हेतू पटला, पण पुस्तक खूप नाही आवडलं.
) तो एकीकडे एक सामान्य बारगीर, खबऱ्या आहे, पण त्यामानाने त्याची राजकारणाची समज बरीच जास्त वाटते. तो सगळ्यांना ओळखून आहे असं वाटतं. असा माणूस खरं तर बराच वर जायला हवा होता, पण तो तसा सामान्यच राहतो.
एक कारण म्हणजे अंताजीचं व्यक्तिमत्त्व खरं वाटलं नाही. (आडनाव खरे असून
अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये तो नेमका तिथे हजर असतो. हे कसं? याचा कुणाला संशय येत नाही का?
'सती' ही प्रथा क्रूर आणि संतापजनक खरीच, पण त्या काळात ती रूढी होती हेही खरं. या पुस्तकातलं सतीचं प्रकरण वाचून सतीची प्रथा त्या काळी महाराष्ट्रात सर्रास चालू नव्हती की काय असं वाटलं. अंताजी ज्या प्रकारे सतीचं वर्णन करतो, त्यावरून त्याच्यासाठी ते नवीन होतं असं वाटलं. म्हणजे त्याला ती प्रथा माहिती होती, पण त्याने कदाचित असा प्रसंग अनुभवला नसावा. याबाबतीत मला जास्त माहिती नाही. सती गेलेल्या प्रसिद्ध स्त्रिया म्हणजे पुतळाबाई आणि रमाबाई सोडल्यास मी याबद्दल फार कुठे वाचलेलं नाही. कदाचित बंगालमध्ये ज्या प्रमाणात असेल, त्या प्रमाणात महाराष्ट्रात नसेल.
सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून इतिहासाकडे बघतानाही ठळक घटनांचाच आणि थोरामोठ्यांच्या राजकारणाचाच इतिहास मांडायचा आहे, तर मग 'राजे गर्रकन वळले' वाल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची थट्टा का करावी? इतिहासातल्या ठळक घटनांच्याच आजूबाजूला जर कल्पनाशक्तीने प्रसंग उभे करायचेच आहेत, तर तोही एक मार्ग आहे असं म्हणता येईलच की. तोच एक मार्ग नाही, आपला वेगळा मार्ग आहे हेही दाखवून द्यावं. त्यासाठी त्यांना कमी लेखण्याचं काय कारण?
शिवाय अंताजी सर्वसामान्य वाटत नाही हेही आहेच. .
उदाहरणार्थ समजा जावळीत राहणारा एखादा शेतकरी आहे. तो चंद्रराव मोऱ्यांची राजवट पाहतोय. शिवाजी महाराजांनी जावळी घेतली हे त्याने पाहिलं. नंतरची शिवाजी महाराजांनी लावलेली चांगली व्यवस्था पाहिली, प्रतापगड बांधताना पाहिला, अफझलखानाला शिवाजी महाराजांनी मारलं, त्यानंतर तो स्वतःचं सामान्य आयुष्य जगत सगळ्या घटनांकडे पहात राहिला, असं कथानक घेऊन जर एखादी ऐतिहासिक कादंबरी लिहिली, तर 'सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून इतिहास' हा हेतू साध्य होईल. पण तो शिवाजी महाराजांशीही जाऊन बोलतो, आदिलशाहीत आणि मुघलांकडेही त्याची ओळख आहे, पावनखिंडीतल्या लढाईत तो होता, आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले तेव्हाही होता असं लिहिलं तर ते खरं कसं वाटेल? आणि मग त्याचं प्रयोजनच काय? थोरामोठ्यांच्या राजकारणामुळे आणि युद्धांमुळे सामान्य माणसाचं बदललेलं आयुष्य दाखवणं असा हेतू असेल तर कादंबरीचा नायक सामान्य असण्याला प्रयोजन आहे असं मला वाटतं.
महाराष्ट्रात तरी सती प्रकरण
महाराष्ट्रात तरी सती प्रकरण तितके सर्रास नसावे. कोणी सती गेली तर त्याची चर्चा होण्याइतके कमी होते.
उदात्तीकरण न करणे, जे आहे ते तसे सांगणे, पांंढरे - काळे- करडे असे सगळे रंग दाखवणे हा फरक असावा.
उदात्तीकरण न करणे, जे आहे ते
उदात्तीकरण न करणे, जे आहे ते तसे सांगणे, पांंढरे - काळे- करडे असे सगळे रंग दाखवणे हा फरक असावा हो, बरोबर. पण मग काल्पनिक व्यक्ती का?
मी नेहमीच भैरप्पांचं उदाहरण देते असं वाटेल, पण पर्व पुस्तकामध्ये त्यांनी माणूस म्हणून सगळ्या पात्रांचे असे काळे-पांढरे-करडे रंग समर्थपणे दाखवले आहेत. त्या-त्या पात्राच्या नजरेतून त्याच घटना कशा वेगवेगळ्या दिसतात, ते दाखवलंय, जे खरं वाटतं. तसं का करायचं नाही? काल्पनिक नायकाचं प्रयोजन मला नाही समजलेलं.
@वावे, भरत मान्य. बघतो. पण
@वावे, भरत मान्य. बघतो. पण मला नंदा खरेंची अगोदरची इतर पुस्तकं नाही आवडली. ओवररेटेड आहे काय हा लेखक? (ते मागच्या
वर्षीच वारले, एका दिवाळी अंकात प्रदीर्घ लेखही आला आहे.)
@वावे : तुमच्या मताचा पूर्ण
वावे यांच्या मताचा पूर्ण आदर बाळगून मला अंताजीची बखर आवडले. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून इतिहास ही कल्पना पाश्चात्य आहे. पण इतिहास समजून घेण्याचे ते एक महत्वाचे साधन आहे असे मला वाटते. आपल्याकडे इतिहास हा महत्वाच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून लिहिला जातो. त्यात वावगे काही नाही पण सर्व सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम झाला, त्याचे एखाद्या गोष्टी विषयी काय मत आहे हे कुठे लिहिले जात नाही.
अर्थात अंताजीची बखर फिक्शन आहे. पण काही काही बाबतीत ते आय ओपनर वाटले मला.
उदा. सती प्रथा महाराष्ट्रातही होती. प्रथा असेल पण अगदी प्रत्येक घरात, समाजात ते होत असेल असे नाही. किंवा ही फार सहज आढळणारी गोष्ट होती असे कुठे नोट केलेले नाही. ज्या घटना (पुतळाबाई, रमाबाई) इतिहासातून ऐकल्या त्यात तो स्त्रीचा निर्णय होता आणि त्याबद्दल एक आदर दिसतो. पण त्यापलीकडे सतीच्या प्रथेतील अर्थकारण, स्त्रीला दुसरा ऑप्शन न ठेवणे या सगळ्यात असलेली क्रूरता हे इतर मराठी पुस्तकात आढळले नाही. यात ते फार प्रत्ययकारी मांडले आहे.
दुसरे उदाहरण म्हणजे मराठ्यांनी एके काळी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राज्य केले. त्याविषयी मराठी माणूस म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. पण इतर प्रदेशातील सामान्य माणसांना त्यातील काही गोष्टींचा त्रास होत होता, हे ऐतिहासिक किंवा त्यावर आधारित फिक्शनल मराठी पुस्तकात मांडले गेले नाही. इतर भाषिक लिखाण मी वाचले नाही त्यामुळे त्याविषयी बोलता येणार नाही.
बाकी लेखकाविषयी म्हणाल तर अश्या प्रकारच्या लेखनाची सुरुवात मराठीत त्यांनी केली असे मला वाटते. त्यांचे 'अंतकाळाची बखर' हे पुस्तकही अश्याच प्रकारचे आहे. पण ते मला फारसे आठवत नाही.
There is a separate thread on
There is a separate thread on this book detail discussion has happened
अमा, पाहते तो धागा सापडला तर!
अमा, पाहते तो धागा सापडला तर!
माझेमन, मलाही पुस्तक कंटाळवाणं वाटलं नाही आणि अगदीच आवडलं नाही असंही नाही. पण जशी अपेक्षा होती तेवढं भारी नाही वाटलं.
Pages