ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन

Submitted by AstrologyYesOrNo on 26 December, 2021 - 05:45

ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.

मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.

आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.

आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.

आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.

आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.

वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.

इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?

म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.

आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.

जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?

https://youtu.be/RBKuOeOF79w

हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE

२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता

३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...

४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548

५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114

६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/

७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.

खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?

खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.

यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता

खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो बोकलत, पण हे सूर्यमाला आकाशगंगेत कोणत्या ठिकाणी आहे याचा आपल्या सारख्या कःयश्चित प्राण्यांवर काही परिणाम होईल का..? सूर्यमाला ही आकाशगंगेत अमुक-तमुक ठिकाणी आहे म्हणुन मिरजेत तुम्हाला साडेसाती लागू शकेल का..???

हे म्हणजे केंद्रात मोदीच्या ठिकाणी योगी आला तर एस.टी.च्या मिरज-आटपाडी फेरीच्या साध्या बसला निमाअराम करण्यासारखं नाही का..?

वर कोणीतरी मिलिंद चितांबर यांचा उल्लेख केलाय . कृपया पैसे आणि वेळ मुळीच वाया घालवू नका. आमच्या नातेवाईकांच्या समस्यांबाबतीत सल्ला घेतला होता. भक्कम फी घेऊन इंग्रजीत नुसतं घोळवतात. अजिबात विश्वासार्ह नाहीत. नुसतं आपलं तुमचा बुध वक्री , शुक्र 8 व्या घरात अस लपेटून गोंधळून टाकतात. नातेवाईकांच काम खूपच अडलेल म्हणून 3000 रुपये आहुती टाकून आले पण शेवटी बाकी शून्य

Dj मी याआधी दुसऱ्या एका धाग्यावर हे पण बोललो होतो की सध्या जी 12 घरं आहेत त्यावर पण खोलात जाऊन संशोधन व्हायला हवं. म्हणजे एकाच वेळी एकाच हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या दोन बाळांची पत्रिका वेगळी पाहिजे. त्यासाठी प्रत्येक अक्षांश रेखांश विचारात घेतले जावे. पण तेसुद्धा कोणी ऐकायला तयार नाही. प्रत्येक क्षेत्र जसं विकसित होत गेलं तसं ज्योतिष विकसित झालं नाही.

>> त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.

Interesting! त्यांनी मूलतः "अस्तित्वात असलेले आडाखे योग्यायोग्य" ह्या फंदात जास्त वेळ न घालवता, ज्या गृहीतकावर हे आडाखे बेतलेले आहेत:

व्यक्तीच्या जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून त्या व्यक्तीचे भविष्य/स्वभाव/व्यक्तिमत्व याबाबत अंदाज वर्तवता येऊ शकतो

हे गृहीतकच त्यांनी प्रश्नांकित करून त्यावर संशोधन करायला हवे असे मला वाटते. न जाणो आडाखे चुकीचे असले (जो निष्कर्ष या लेखात काढला आहे) तरी गृहीतक बरोबर असेल/नसेल कशावरून? जर हे गृहीतक बरोबर असेल तर आडाखे दुरुस्त करायची गरज आहे. पण जर गृहीतकच चुकीचे असेल तर मग प्रश्नच मिटला.
---

आडाखे म्हणजे ठोकताळे जे ज्योतिष शास्त्रात वापरले जातात, ते मला म्हणायचे आहे. याचे लेखात दिलेले एक उदाहरण: 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...'

<<<हे गृहीतकच त्यांनी प्रश्नांकित करून त्यावर संशोधन करायला हवे असे मला वाटते.>>
कसे करणार हे संशोधन?
aschig यांच्या या लेखात त्यांनी आधीच हा मुद्दा मांडला आहे.
की एवढ्या लांबच्या ग्रहावरून फक्त गुरुत्वीय बलाचा परिणाम होऊ शकतो. F= G*m1*m2/r^2. ग्रहांचे प्रचंड वस्तुमान असले तरी पृथ्वीपासूनचे अंतर लक्षात घेता मंगळापासून येणाऱ्या गुरुत्वीय बलाच्या तुलनेत बाजूला उभ्या असलेल्या नर्स, डॉक्टरचे गुरुत्वीय बल जास्त असेल.
हे पुरेसे नाही का ते गृहीतक चूकीचे आहे हे दाखवायला?

चांद्रयान मोहिमेच्या वेळी एक भारतीय शास्त्रज्ञ ओक्साबोक्सी रडला होता. लै अंगारे धुपारे , मुहूर्त काढूनही "विक्रम" हरवले. शेवटी नासाने शोधले.

@अतुल, व्यक्तीच्या जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून त्या व्यक्तीचे भविष्य/स्वभाव/व्यक्तिमत्व याबाबत अंदाज वर्तवता येऊ शकतो
हे गृहीतकच त्यांनी प्रश्नांकित करून त्यावर संशोधन करायला हवे असे मला वाटते. न जाणो आडाखे चुकीचे असले (जो निष्कर्ष या लेखात काढला आहे) तरी गृहीतक बरोबर असेल/नसेल कशावरून? जर हे गृहीतक बरोबर असेल तर आडाखे दुरुस्त करायची गरज आहे. पण जर गृहीतकच चुकीचे असेल तर मग प्रश्नच मिटला.>>>>>>तुम्ही आडाखे आणि गृहीतक अश्या दोन terms वापरल्या आहेत.
आडाखे - ज्योतिषाची तत्वे / नियम
गृहीतक म्हणजे व्यक्तीच्या जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून त्या व्यक्तीचे भविष्य/स्वभाव/व्यक्तिमत्व याबाबत अंदाज वर्तवता येऊ शकतो असे धरून चालणे
तुम्ही अशी एक possibility व्यक्त करत आहात कि आडाखे म्हणजे ज्योतिषाची तत्वे हि चुकीची असतील पण गृहीतक बरोबर असेल आणि मी ते पण तपासायला पाहिजे होते किंवा त्याच्या वर प्रश्न उभे करायला पाहिजे होते. या गृहितकावर तर प्रश्चचिन्ह आहेच, आणि ते ofcourse चुकीचे आहे म्हणून तर हा सगळं खटाटोप.
आडाखे तपासणे शक्य झाले कारण ते पुस्तकात दिले आहेत. इम्पिरिकेल टेस्टिंग ने त्यांचे अवैध असणे सिद्ध झाले. ग्रहांच्या स्थिती वरून माणसाचा स्वभाव, त्याच्या आयुष्यातील घटना घटना कशा ठरतात याचे विश्लेषण ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो, तो कुठल्याच पुस्तकात दिलेला नाही, ना कुठला ज्योतिषी त्याचा खुलासा करू शकतोय, तर मग त्याला तपासायचे तरी कसे? खरेतर ज्याला तुम्ही आडाखे म्हणता आहेत ती गृहीतके आहेत कारण ते अमुक ग्रंथात दिले आहेत म्हणौन खरे आहे असे directly यांनी मानले आहे. त्याच्या परीक्षणाचे निष्कर्ष तुम्ही वाचलेच आहे.
मला वाटते आपण सर्व सामान्य माणसाला या गृहीतके, आडाखे या शब्द जंजाळात आणि त्यातील काय बरोबर नाही आणि काय बरोबर असू शकते अश्या गोंधळात न अडकवता जे आज त्यांच्या भविष्य सांगण्यासाठी वापरले जाते आहे ते ज्ञान - ज्योतिषविद्या - कशी वैध नाही आणि म्हणून त्याने ती कशी वापरू नये इतके सोपे आणि स्पष्ट सांगायची जरूर आहे आणि तेच मी लेखात केले आहे.

<< वर कोणीतरी मिलिंद चितांबर यांचा उल्लेख केलाय . कृपया पैसे आणि वेळ मुळीच वाया घालवू नका. आमच्या नातेवाईकांच्या समस्यांबाबतीत सल्ला घेतला होता. भक्कम फी घेऊन इंग्रजीत नुसतं घोळवतात. अजिबात विश्वासार्ह नाहीत. नुसतं आपलं तुमचा बुध वक्री , शुक्र 8 व्या घरात अस लपेटून गोंधळून टाकतात. नातेवाईकांच काम खूपच अडलेल म्हणून 3000 रुपये आहुती टाकून आले पण शेवटी बाकी शून्य >>

------- हे येथे सांगितले छान केलेत. अनेक झोपलेल्या लोकांचे डोळे उघडावेत.

या धाग्यावर न राहवून सीरीयसली प्रतिसाद देत आहे.
तुम्ही जे प्रयोग केले ते संख्याशास्त्राच्या आधारावर. यात कोणतेही विज्ञान नाही. संख्याशास्त्र हे रूग्णांच्या बाबतीत वापरले तर त्याच्या निष्कर्षांमुळे काही नियम पुढे येतात. पण असे प्रयोग करण्याआधी काही बाबी या सातत्याने समोर येत असतात. जसे अनेक रूग्णात समान असणारी लक्षणे. उदा. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा संबंध अनेकांत सापडतो. मधुमेहाची लक्षणे दिसतात.

दुसरा प्रयोग सूर्याची किरणे पडून त्यातून वीज निर्माण करणार्या सेमीकंडक्टर्सचा. अनेक पदार्थ सूर्यप्रकाशात ठेवल्यावर ज्या ज्या पदार्थातून वीज तयार होते अशांची यादी बनवता येते.

ज्योतिषशास्त्रात संख्याशास्त्राचा आधार घेण्यापूर्वी अशी काय निरीक्षणे आढळली कि डेटा गोळा करावासा वाटला ?
एखाद्या ग्रहाचे रेडीएशन अमूक एका भागात अमूक वाजता इतके जास्त असते, त्यामुळे घटना घडतात असे काही आढळले ? हे तर्काच्या आधारे टिकणारे आहे ? रेडीएशन असेल, कॉस्मिक वेव्हज असतील, त्या पत्रिका पाहून परिणाम करतात ? केलाच तर आरोग्यावर करतील. त्या एखाद्या व्यक्तीचे भविष्य कसे नियंत्रित करू शकतात ?

थोडक्यात प्रयोग करण्यासाठीचा हा जो अ‍ॅप्रोच आहे तो फसवा आहे. कोणताही वैज्ञानिक प्रयोग करण्याआधी तो करण्यामागे काहीतरी रॅशनल कारण लागते. ते इथे दिसतेय का ?

एखादी गोष्ट वैज्ञानिक नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग करणे ही गोष्ट हास्यास्पद आहे. एखादी गोष्ट विज्ञान आहे हे सिद्ध करणे योग्य आहे. तसे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला शास्त्र मानता येत नाही. शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग करत राहण्याला शुभेच्छा. पण विज्ञान नाही हे सिद्ध करून लोकांमधे जागृती करणे हे फोल आहे.

लोकांमधे वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवणे हे जास्त सोपे आहे.

वरचा प्रतिसाद मोठा झाला. सोप्या भाषेत सांगायचे तर दगड विचार करतो हे खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी "वैज्ञानिक प्रयोग " करण्याला काय म्हणाल ? (दगडाला शेंदूर फासला कि तो विचारच काय चमत्कार सुद्धा घडवतो असे लोक मानतात).

वर कोणीतरी मिलिंद चितांबर यांचा उल्लेख केलाय . कृपया पैसे आणि वेळ मुळीच वाया घालवू नका. आमच्या नातेवाईकांच्या समस्यांबाबतीत सल्ला घेतला होता. भक्कम फी घेऊन इंग्रजीत नुसतं घोळवतात. अजिबात विश्वासार्ह नाहीत. नुसतं आपलं तुमचा बुध वक्री , शुक्र 8 व्या घरात अस लपेटून गोंधळून टाकतात. नातेवाईकांच काम खूपच अडलेल म्हणून 3000 रुपये आहुती टाकून आले पण शेवटी बाकी शून्य>>>>>> ३०००? अयायाया ! जाई , मी जेव्हा त्यांना मायबोली वरुन मेल केली होती तेव्हा त्यांनी त्यांचा मेल आय डी दिला होता. त्यावर मी मेल केली तर मला सध्या वेळ नाही आणी मी फी पण घेत नाही हे त्यांनी उत्तर देतांना सांगीतले होते. हे खरे होते की मायबोलीवर त्यांना खूप प्रश्न विचारले जायचे.

जोपर्यंत आकाशगंगेत आपल्या सुर्यमालिकेचे काय स्थान आहे हे विचारात घेतले जात नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. चर्चा पण आणि संशोधन पण.

जाई , मी जेव्हा त्यांना मायबोली वरुन मेल केली होती तेव्हा त्यांनी त्यांचा मेल आय डी दिला होता. त्यावर मी मेल केली तर मला सध्या वेळ नाही आणी मी फी पण घेत नाही हे त्यांनी उत्तर देतांना सांगीतले होते. हे खरे होते की मायबोलीवर त्यांना खूप प्रश्न विचारले जायचे. >> आधी ते पूर्णवेळ दुसरे काम करायचे, तेव्हा फ्री कन्सलटेशन द्यायचे. हा आता त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे.
माझ्या एका नातेवाईकांनी कन्स्लट केलेल १-२ वर्षापूर्वी. त्यांच्या मते त्यांनी सांगितलेले अ‍ॅक्युरेट झाले.

त्यांच्या मते त्यांनी सांगितलेले अ‍ॅक्युरेट झाले.
A broken clock is right twice a day.

> नुसतं आपलं तुमचा बुध वक्री , शुक्र 8 व्या घरात अस लपेटून गोंधळून टाकतात.
इतर ज्योतिषी तरी काय वेगळं करतात ? पं महादेवशास्त्री जोशींचा किस्सा एकदम चपखल आहे.

इतर ज्योतिष काय करतात ते ठाऊक नाही, ह्यांचा बोलबाला मोठा म्हणून नातेवाईक गेले होते. नाव मोठं नि लक्षण खोटं हा प्रकार.
असो.
महादेव शास्त्री यांचा किस्सा काय आहे?

आपल्या ब्रह्मांडाचे या निर्वात पोकळीतले स्थान एकदा निश्चित केले आणि या ब्रह्मांडावर दुसर्या ब्रह्मांडांचा काय परिणाम होतो हा विदा जमा केला कि भविष्य अचूक यायला सुरूवात होईल.

पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी आपल्या ‘आत्मपुराण’ या आत्मचरित्रात लिहिलेला एक किस्सा. पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा ज्योतिषाचे दुकान उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूला काही शंका विचारल्या. त्यावेळेस त्या गुरूने जोशींबुवांना गुरुमंत्र दिला की, ‘तुम्ही ग्रंथाद्वारे सांगायला गेलात की मेलात. इथे कामी येतं ते शब्दजंजाळच! समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आणि भविष्य सांगायचं. तेही बरंच सांगायचं आणि त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे! यात वाक्चातुर्य जितकं प्रभावी तितकं तुमचं भविष्य बरोबर!’

(महादेवशास्त्रींनी नंतर 'ज्योतिष सांगणार नाही' अशी प्रतिज्ञा करून ती खरी केली.)

<< इतर ज्योतिष काय करतात ते ठाऊक नाही, ह्यांचा बोलबाला मोठा म्हणून नातेवाईक गेले होते. नाव मोठं नि लक्षण खोटं हा प्रकार. >>

------- सर्व तेच प्रकार करतात. काही नावे मोठे असतात, काही लहान. शेवटी थापाच असतांत.

"व्यक्तीच्या जन्मावेळची सर्व ग्रहांची स्थिती ठराविक असेल तर त्या व्यक्ती बाबतची भाकिते ठराविक असतात" असे हे गृहीतक असू शकेल काय?
थेटपणे संबंधित नसलेल्या दोन गोष्टी योगायोगाने जुळत राहतात असे जर वारंवार आढळले, तेंव्हा कालांतराने, त्यातली एक गोष्ट घडली तर दुसरी सुद्धा घडली असे मानायला हरकत नसते. याला वैज्ञानिक परिभाषेत काहीतरी शब्दप्रयोग आहे पण आता आठवत नाही. पण भौतिकशास्त्राच्या सरांनी आम्हाला याचे एक छान उदाहरण दिले होते. समजा तुम्ही लेडीज होस्टेलला भेट द्यायला गेलात, तेंव्हा तिथे येरझाऱ्या घालणारा वॉचमन तुम्हाला नेमका गेटवर आलेला दिसेल. जेंव्हा जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा तो गेटवर दिसेल. याचा अर्थ तो नेहमीच गेटवर असतो असे नाही. तो तर अधूनमधून त्याला वाटेल तेंव्हा येरझाऱ्या घालत असतो. पण तुम्ही जेंव्हाकेंव्हा तुम्हाला वाटेल तेंव्हा जाता तेंव्हा योगायोगाने तो गेटपाशीच असतो. आता जेंव्हा तिसरी व्यक्ती (हॉस्टेलमधली मुलगी) खिडकीतून हे पाहते व सातत्याने तिच्या लक्षात हा योगायोग येतो, तेंव्हा काय होईल? पुढच्या वेळी जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा खिडकीतून तुमच्याकडे पाहून "वॉचमन आता गेटवर असेल" असा अंदाज ती बांधू शकते कि नाही? Lol

ग्रहांच्या स्थितीचे आणि तेंव्हा जन्माला आलेल्या व्यक्तीच्या स्वभावाचे/भविष्याचे समजा तसेच काही जुळत असेलही किंवा नसेलही. पण भविष्यवेत्ते "असे काही जुळत असते" या गृहितकावर विश्वास ठेवत असावेत असा माझा अंदाज आहे.

पण वैज्ञानिक पातळीवर हे तपासावे तरी कसे हा गहन प्रश्न. त्याचे उत्तर पूर्वी कदाचित देता आले नसते. पण आता कॉम्प्युटरच्या सहायाने आणि त्यातल्या त्यात आजकाल आलेल्या मशीन लर्निंगच्या मदतीने शोधता येऊ शकेल असे वाटते. लेखक डॉ. नागेश राजोपाध्ये सर हे पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे व IT क्षेत्रात उच्च पदावर काम करून म्हणून निवृत्त झाले असे उल्लेख आहेत म्हणून हे इथे मांडायचे धाडस करतोय. मशीन लर्निंगसाठी मागच्या अनेकानेक वर्षातल्या व्यक्तींच्या अचूक जन्मतारखा, तेंव्हाची ग्रहस्थिती (तारीख/वेळेवरून ती काय संगणकाला सुद्धा काढता येईल), आणि त्या व्यक्तींचे गुणविशेष, त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, कर्तृत्व इत्यादी माहिती मशीन लर्निंगला दिली तर ते त्यातून काही आडाखे निर्माण करते का हे पहायचे.

पण हे मांडायला जितके सोपे तितके पडताळणी करायला तितके सोपे नाही.
१. मशीन लर्निंगसाठी प्रचंड विदा (डेटा) लागतो. लाखो व्यक्तींच्या जन्मतारखा/वेळा आणि त्यांच्याबाबतची वर उल्लेख केलेली माहिती पुरवावी लागेल. ही सगळी माहिती अचूक आहे याची खात्री हवी.
२. ग्रहस्थितीच्या व्यतिरिक्त अजून कशाची स्थिती विचारात घेणे आवश्यक आहे का ते पहावे लागेल. उदाहरणार्थ चंद्र. चंद्र हा ग्रह नाही तरीही त्याचा विचार सध्या केला जातो. त्याचीही स्थिती विचारात घ्यायची तर बाकीच्या ग्रहांच्या चंद्रांची पण घ्यावी का? हे ठरवावे लागेल(*)
३. बरेचसे लघुग्रह आहेत. त्यांच्या स्थितीचे काय करावे हे सुद्धा ठरवावे लागेल(*)
४. ग्रहस्थिती ठरावीक म्हणजे अगदी नेमची तंतोतत तशीच हवी का? कि सध्या बारा घरांत विभागणी करतात तेवढ्या ढोबळमानाने चालेल? हे ठरवावे लागेल(*)
५. एखादी ग्रहस्थिती जशी आहे अगदी तशीच पुन्हा यायला किती कालावधी लागेल ते मोजून कमीतकमी तितक्या कालावाधीतल्या व्यक्तींचा विदा (डेटा) लागेल. (जाता जाता: ग्रहांची एकदा असलेली स्थिती अगदी जशीच्या पुन्हा निर्माण व्हायला बिलियन वर्षे लागतात असा उल्लेख एका लेखात आढळतो. पण ढोबळमानाने जशीच्या तशी यायला कदाचित कमी कालावधी लागेल. किती लागेल ते तो ढोबळेपणा कितपत आहे त्यावर अवलंबून)

(*) वरती जिथे जिथे "ठरवावे लागेल" असा उल्लेख आहे तिथे त्या 'ठरवण्याला' कशाचा आधार आहे हे सुद्धा महत्वाचे.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता असे काही आडाखे जर असतीलच तर ते शोधून काढणे अशक्य नसले तरी फार फार फार कठीण (म्हणजे जवळजवळ अशक्यच) आहे असे वाटते.

<< जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा खिडकीतून तुमच्याकडे पाहून "वॉचमन आता गेटवर असेल" असा अंदाज ती बांधू शकते कि नाही? Lol >>
वरील उदाहरण थोडे चुकीचे आहे. ज्योतिषांच्या मतानुसार, त्या मुलीला वॉचमन दिसला की त्याचा अर्थ तुम्ही येणार. मुळात या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
Correlation does not imply causation. आणि अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

बोकलत सर, तुम्ही जे सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान विचारात घ्यायला सांगता आहेत त्या सूचना ज्योतिषांसाठी आहेत असे मी समजतो कारण तुमच्या मते आत्ता ते जे नियम सांगताहेत ते तुम्ही सांगितलेल्या सुधारणा केल्याशिवाय बरोबर येणार नाहीयेत असे तुमचे म्हणणे आहे. त्या corrections कशा करायच्या, मग नवीन तयार झालेले ज्योतिषाचे version कसे टेस्ट करायचे हे तुम्ही त्यांच्या बरोबर काम करून आम्हाला जरूर सांगा तोवस्तवार मी एवढेच समजतो कि - ज्या ज्योतिषविद्येच्या आधारे सध्या म्हणजे आजच्या मितीला ज्योतिष सांगितले जाते त्यात तथ्य नाही या निष्कर्षांशी तुम्ही पण सहमत आहात. नवीन काही प्रयोग करायला, संशोधन करायला माझी ना नाही. फक्त त्याचे शास्त्रीय परीक्षण करून त्याला सिद्ध करून मगच ते माणसांच्या जीवनात आणावे असे माझे मत आहे.

@जाई आणि रश्मी, भाकीत जेव्हा जेव्हा चुकीचे ठरते तेव्हा प्रश्न हाच असतो कि ज्योतिषविद्या चुकीची का ज्योतिषी. लोकांना ज्योतिषविद्या चुकीची आहे असे म्हणायचे धैर्य नसते कारण त्या विद्येवर आपली mastery नसते आणि शिवाय त्यामागे हजारो वर्षाची legacy आहे. ज्योतिष समर्थकांना विचारले तर ते अर्थातच त्या ज्योतिषाच्या (व्यक्तीच्या) मर्यादा आहेत म्हणून सांगतील पण वस्तुस्थिती हिच आहे कि हि ज्योतिष विद्येची मर्यादा आहे. आणि हेच सिद्ध करण्यासाठी हे सर्व संशोधन केले गेले. या लेखात (आणि संदर्भ ३,४,५ मध्ये) हेच दाखवले आहे कि शुभ नियम घ्या का अशुभ नियम घ्या - नियम एकटा घ्या किंवा combination मध्ये घ्या - आणि अशा कितीतरी गोष्टी - ते दोन्ही विरुद्ध संचात सारख्याच प्रमाणात लागू पडतात. अशा विद्येच्या आधारे भविष्य सांगितले तर त्याची परिणीती चुकीच्या भाकीता मध्ये होणारच. हा विषय तसा खोल आणि गुंतागुंतीचा आहे म्हणूनच संदर्भ ३,४ आणि ५ या research papers मध्ये शास्त्रोक्त पद्धतीचा (approach) वापर करून त्याचे सर्व विवरण दिले आहे. ज्यांना interest आहे त्यांनी जरूर वाचावा.

पं. महादेवशास्त्री जोशींचा हा किस्सा माहिती नव्हता.

अतुल, एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा सध्या ज्योतिषी जी पद्धत वापरतात, तीच पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरून ते सांगत असलेले आडाखे जुळतात की नाही हे बघणं सोपं आहे. लेखकाने तेच केलं आहे. समजा, जुळतात असा निष्कर्ष निघाला असता तर मग हे पुढचं संशोधन करणं वर्थ असेल. पण मुळातच ते जुळत नाहीत.
कॉजेशन आणि कोरिलेशन हे तर आहेच.

Pages