कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साथ म्हणून हा नवीन व्हायरस पसरलेला नाही.
ज्यांना गंभीर लक्षण दिसत आहेत त्याला फक्त हा व्हायरस जबाबदार नाही.
Covid आता संपल्यात जमा आहे.
लोकांनी हायपर होण्याची गरज नाही

Covid आता संपल्यात जमा आहे.>> हे चूक आहे. इतर सर्व बॅक्टेरिआ व्हायरसेस बरोबर तो आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. कृपया कोव्हिडला लाइटली घेउ नका. शनिवारी माझी हालत खूप वाइट होती. डोके हल्लक, ताप रनी नोज. त्यात मी इम्युनो कॉम्प्रमाइज्ड आहे असे कोनी
आपल्या घरी असतील तर न घाबरता काळजी पूर्वक लक्ष द्या. नुसते आयुर्वेदिक होमेपदी उपाय करू न गप्प बसू नका. घसा दुखी वर पहिल्या कोव्य्डचा गरम पाण्याचा उपाय अजूनही उपयोगी आहे. त्याचा मात्र सतत पुरवठा असूद्या. घसा कोरडा पडतो सारखा. पेशंटच्या खोलीत ह्युमिडी फायर ची गरज असेल तर ठेवा. मी उद्यापासून मध पाणी घेणार आहे. पण ते घशाला आराम म्हणून. जो चहा कॉफी, टो मॅटो सूपने पण मिळतो.

कुमार वन साहेब मला एक ( १९१९) दोन( २०२१) व तीन ( २०२३ ) तिन्ही कोव्हिड ताप झालेले आहेत. मला काहीतरी बॅज द्या. ते ऑडिबल सारखे मला बॅज देत आहे. मी एक पुस्तक लावुन झोप काढते त्यामुळे तास वाढत आहेत.

लोकांनी हायपर होण्याची गरज नाही>> पण काळजी पूर्वक लक्ष ठेवायची नक्की आहे.

पेशींच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांना mitochondria म्हणतात :
MitoChondria.jpg

दीर्घकालीन कोविडमध्ये ते विषाणू पेशींच्या mitochondriaवर आघात करतात. हा आघात थोपविण्याच्या संदर्भात काही जुन्या औषधांवर संशोधन चालू आहे. त्यात मधुमेहविरोधी metformin या मूलभूत औषधाचा समावेश आहे.

https://www.science.org/doi/full/10.1126/scitranslmed.abq1533

अश्विनीमामी >>> आता कशी आहेस? तसे मागचे दोन आठवडे viral infection चेच होते. कॉलेजात बरीचशी सोबतची मंडळी व विद्यार्थी infected होते. शेवटी मलाही झाला, कोविडसारखीच लक्षणे असली तरी कोवीड नव्हता. इकडे पोस्ट रेसिग्नशन नोटीस पिरियड वर असल्याने एकही दिवस सुट्टी घेता आली नाही (म्हणजे बिनपगारी घेता आली असती, पण मी टाळली), त्यामुळे जबरदस्तीने जावेच लागले.

लाँग covid च्या करोड लोकसंख्या मागे किती केस आहेत
लाँग covid मध्ये पण .
किरकोळ लक्षण दिसणारी किती लोक आहेत ज्यांच्या जीवाला बिलकुल धोका नाही आणि सामान्य औषधही त्या साठी पुरेशी आहेत.
गंभीर लक्षण असणारी .
म्हणजे heart , brain ह्या परिणाम करणाऱ्या per /करोड किती केस आहेत.
मला वाटतं अगदी नगण्य आहेत.
डॉक्टर नी तरी सर्व डेटा घेवून च विचार व्यक्त केले पाहिजेत.
सनसनाटी निर्माण होईल असे मोघम विचार नकोत

आता कशी आहेस? >> बॅक टू नॉर्मल. ताप गेलाच. ९८.३ झालेले तापमान. हॅकिन्ग कफ फारसा झालेला नाही. ह्या आठवड्यात इंजेक्षन घ्यायचे टाळले. गेले तरी मास्क लावुनच जाईन.

डॉक्टर नी तरी सर्व डेटा घेवून च विचार व्यक्त केले पाहिजेत. >>> अशी विधाने करण्याऐवजी स्वतः जरा विदा बघितला तर बरं होईल.
हा घ्या एक मोठा जागतिक अभ्यास :
Long COVID Through a Public Health Lens: An Umbrella Review
Prevalence estimates ranged from 7.5% to 41% in non-hospitalized adults,
2.3%–53% in mixed adult samples,
37.6% in hospitalized adults, and 2%–3.5% in primarily non-hospitalized children.

https://www.ssph-journal.org/articles/10.3389/phrs.2022.1604501/full
जगात सुमारे १४ कोटी लोक Long COVID बाधित.

जगात खूप लोक प्रश्न विचार आहेत
1) covid मधील मृत्यू covid मुळे झाले की चुकीच्या उपचार मुळे.
जागतिक स्तरावर स्पष्ट उत्तर कोणी देत नाही.
२) जागतिक स्तरावर heart अटॅक चे प्रमाण वाढले आहे त्याला covid जबाबदार आहे की लस.
स्पष्ट उत्तर कोणी देत नाही जागतिक स्तरावर.
हा प्रश्न आला की लाँग covid चे पिल्लु सोडले जाते.
जगात टोटल covid केसेस..
जगात टोटल covid मुळे मृत्यू.
जगात टोटल covid मधून बरे झालेले.
आणि राहिलेले long covide वाले अशी आकडेवारी फेकली जाते .
पण काहीच history नसताना हार्ट अटॅक नी मरणारी हीच लोक आहेत का?.
ज्यांचा covid नी अगोदर मृत्यू झाला नाही किंवा जे बरे झाले नाहीत.
ज्यांना लाँग covid चे रोगी समजले जातात ते
ह्या विषयी कोणी बोलत नाही

मला झाला कोव्हिड पहिल्यांदा या वेळी. आधी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थंडी वगैरे सगळेच होते. आता ही लक्षणे खूप कमी झाली तरी थकवा खूप आहे सहावा दिवस असला तरी. चव थोडी कमी झाली आहे पण वास मात्र कशाचाही येत नाही! खाण्याची इच्छा पण कमी आहे.

बरं नसलेल्या सर्वांनी कोविड, व्हायरल काहीही असूदे काळजी घ्या आणि आराम करा, दगदग करु नका. लवकर बरे व्हा.

अमा काही दिवस आरामच करा.

अश्विनीमामी >>> बरी झाली आहेस ऐकून आनंद झालं. आपले हुकलेले कालाघोडा गटग करायचे आहे.

sneha1 >>> नीट काळजी घ्या.

आधी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थंडी वगैरे सगळेच होते. चव थोडी कमी झाली आहे. खाण्याची इच्छा पण कमी आहे >>> मलाही अगदी अशीच लक्षणे होते पण वास येत होता. त्यामुळे वायरल इन्फेकशन चे निदान झाले. त्यात मी पोस्ट-रेसिग्नेशन नोटीस पिरियडवर असल्याने कोणतीही सुट्टी घेता येत नाही. त्यामुळे हलकीशी चिन्हे दिसताच पॅरासिटामोल घेणे सुरु केल्याने अगदी मंद ताप असे. मात्र प्रचंड थंडी व अंगदुखी होती. रात्री तीन ब्लँकेट पांघरली तरी हुडहुडी कमी होत नव्हती, अंगाच मुटकुळ करून झोपायचा प्रयत्न करत असे.

आता माझ्या हळूहळू ध्यान्यात आलंय की दुसऱ्या लाटेत कोविड मधून बरे झाल्यापासून माझी रोगप्रतिकार शक्ति कमी झाली आहे. गेल्या दोन वर्षात सीजन बदलला की मला लगेच वायरल इन्फेकशन होतोय. कोविड पूर्वी तो कधीच होत नसे.

वास येणे बंद >>>
हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहेच. बऱ्याचदा ते पहिले लक्षण असते.
आशियाईपेक्षा युरोपीय वंशातल्या या आजारात ते 2-3 पट अधिक दिसले.

वास बंद झाल्यावर एकदमच एखादं दार धाडकन तोंडावर बंद झालंय असं वाटतं.आपल्याला नकळत खूप गोष्टींचे वास घेण्याची सवय असते.अँटी व्हायरल चालू केल्यावर 4-5 दिवसात वास परत आला असा 2 वेळचा अनुभव आहे.

<<वास बंद झाल्यावर एकदमच एखादं दार धाडकन तोंडावर बंद झालंय असं वाटतं.>> +१
वास बिलकुल नसणे आणि चव पण बर्‍यापैकी गेल्याने खावं काय ही अडचण होते Happy

म्हटलं तर हे कोरोनाशी थेट संबंधीत नाहिये पण इथे वासाचा विषय चालू आहे म्हणून विचारतो -

आजच्या लोकसत्तातल्या आरोग्यवार्ता सदरात म्हटलंय की वास घेण्याची क्षमता जाणे ही बर्‍याच वेळा अल्स्झायमर्स, पार्किनसन्स अशा मेंदूच्या आजाराची नांदी असते. यात कितपत तथ्य आहे?

आता कोरोनामुळे गंधक्षमता गेलेल्यांना या आजाराची शक्यता वाढते का? या प्रश्नाचे थेट उत्तर देणे आत्ता शक्य नाहीये कारण हे रोग २-३ वर्षात प्रकट होत नाहीत पण या अनुषंगाने काही अभ्यास / संशोधन चालू आहे का?

वास घेण्याची क्षमता जाणे ही बर्‍याच वेळा अल्स्झायमर, पार्किनसन अशा मेंदूच्या आजाराची नांदी असते. यात कितपत तथ्य आहे? >>>
होय, हे सत्य आहे.

मुळात हे दोन्ही चेतासंस्थेच्या डिजनरेशनचे आजार आहेत. या आजाराच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेतच मेंदूतील वासाशी संबंधित olfactory bulb या भागाला इजा होते. यानंतर काही वर्षांनी प्रत्यक्ष या आजारांची मोठी लक्षणे दिसतात.

लक्षणविरहित वृद्धांमध्ये वास क्षमतेसंबंधित चाचणीचा, चाळणी चाचणी म्हणून उपयोग होतो. कोविडमध्ये जी वासाच्या चेतातंतूना इजा होते त्याचे भविष्यकालीन परिणाम समजण्यासाठी आपल्याला अजून बरेच थांबावे लागेल.
अर्थातच तो दीर्घकालीन अभ्यास महत्त्वाचा आहे.

पार्किनसन व वासक्षमता
यासंदर्भात अजून थोडेसे.
या आजाराच्या काही रुग्णांमध्ये, वातावरणात नसलेल्या वासाचे भास सुद्धा होतात; विशेषता स्त्रियांमध्ये.

वासाची जाणिव बंद झाली की चवी ची जाणिव पण बंद होणारच .
आणि covid चे लक्षण सर्व देशांना लागू नाही.
माझ्या पाहण्यात तीन तीन वेळा covid झालेली असंख्य लोक आहेत.
चव आनी i वास ह्यांची जाणीव त्यांची गेली नाही.
वास आणि चव ह्यांची जाणीव न होणे हे एकत्रित दिसणारे लक्षण आहे.
वास येत नाही पण चव कळते असे होवूच शकत नाही

वास येत नाही पण चव कळते असे होवूच शकत नाही >>>> असे बिलकूल नाही.
हे पाहा :
anosmia  rev.jpg

१. वास येत नाही
२. चव नाही
३. वास आणि/किंवा चव नाही

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7488171/

Omicron च्या नव्या उपप्रकाराचे शास्त्रीय नाव BA 2.86 असून Pirola हे टोपणनाव आहे.

त्याच्या जगभरात फक्त 26 केसेस आढळल्या आहेत. निरीक्षण चालू असून सध्या बाकी विशेष काही नाही.

गेल्या 24 तासात बहुतेक इ-वृत्तमाध्यमातून खालील प्रकारचा मथळा झळकतो आहे :

“'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्ट”

https://marathi.abplive.com/news/india/who-find-disease-x-can-be-dangero...

हे वाचून विचलित व्हायचे किंवा दडपून जायचे काही कारण नाही. सन 2018 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने, ‘भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या विषाणूजन्य साथींसाठी’ “डिसीज एक्स” (माहित नसलेले) हे नामकरण करून ठेवलेले आहे. हे संबोधन कुठल्याही विशिष्ट एका आजारासाठी नसून संभाव्य आजारांच्या गटासाठी आहे. जसजसे नवे विषाणू सापडत जातील ते सर्व या एक्स पंथातील घटक राहतील.
किंबहुना कोविड-19 घडविणारा विषाणू या पंथातील पहिला घटक होता.
(https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7091198/)

दुपारी वरची पोस्ट वाचली आणि आता व्हॉटऍप वर अशा बातम्यांच्या लिंक्स आल्या. त्यात डिसीज एक्स येतोय त्यात ५ कोटी लोक मरणार आणि काही बातम्यात तो कोव्हीड पेक्षा ७ पट तर काहीत २० पट घातक आहे अशे दावे केले आहे.
हे इतके लोक मरणार, इतका पट घातक यावरून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न वाटला.

Pages