खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

Submitted by aschig on 15 September, 2021 - 16:59

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?

अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.

IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत

सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्‍या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.

एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.

फलज्योतिष कशावर आधारित आहे?

पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.

पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.

या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.

या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.

लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.

त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.

खगोलशास्त्राची प्रगती

काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.

भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/

या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.

नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)

लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.

Group content visibility: 
Use group defaults

ज्योतिष्याची तुलना वारंवार डॉक्टरांशी का केली जात आहे?
डॉक्टर पेशंटची कुंडली पाहून अमुक घरात मंगळ, तिथे बुध, म्हणजे तुम्हाला डायबेटीस झालाय, इथे शनी, तिथे राहू म्हणजे कॅन्सर असे निदान करून उपचार करतात का?

तिथे राहू म्हणजे कॅन्सर असे निदान >> 'अमुक तमुक ठिकाणी अतिनील किरणं खूप जास्त प्रमाणात आढळतात, तिथे राहू म्हणजे कॅन्सर होईल' - निदान असं निदान एखादा डॉक्टर करूच शकतो.

धागा मागे पडता कामा नये. महाचर्चा अखंड अनंतकाळ तेवत राहू दे. या ग्रहांशिवाय अजून एक अदृश्य शक्ती पृथ्वीवर वावरत आहे. त्या शक्तींना या ग्रहांची नावं दिली आहेत. पत्रिकेत असलेले ग्रह हे खरोखरचे ग्रह नसून या शक्तींना रिप्रेझेंट करतात. या शक्ती मनुष्यावर परिणाम घडवत असतात. उदाहरण म्हणजे आपण म्हणतो आत्मा अमर आहे. चला आपण गृहीत धरू आत्मा अमर आहे तर आता मला सांगा आत्म्याचं वय काय आहे? जर आत्मा अमर असेल तर लहान मूल मोठया माणसांसारखं का नाही वागत? याचं उत्तर म्हणजे आत्म्याला या शक्ती बांधून ठेवत असतात. आणि हळूहळू त्याच्यावरची बंधनं ते मुक्त करत असतात आणि माणसाचं भविष्य घडत असतं. आणि आपण समजतो ग्रह परिणाम करतात.

ज्योतिष्याची तुलना वारंवार डॉक्टरांशी का केली जात आहे?
डॉक्टर पेशंटची कुंडली पाहून अमुक घरात मंगळ, तिथे बुध, म्हणजे तुम्हाला डायबेटीस झालाय, इथे शनी, तिथे राहू म्हणजे कॅन्सर असे निदान करून उपचार करतात का?>>>>

हाहा...

डॉक्टर जे उपचार करतात ते विज्ञानाच्या कसोटीवर घासलेले आहेच यात मला काहीही शन्का नही.

पण कोर्पोरेट होस्पिटलान्मधुन जी लुट केली जातेय ती पाहता डॉक्टर या जमातीवर फारसा विश्वास ठेवण्यालायक परिस्थिति राहिलेली नाही. कुठलाही आजार असुद्या, सगळ्या तपासण्या कराव्या लागतात. कुन्डलीचं म्हणा ना.. एकाचा गुण येत नाही म्हणुन डॉक्तर बदलणे अगदी सामान्य झालेले आहे. आधिची जुनी कुन्डली नव्याला चालत नाही. परत सगळे रिपोर्ट काढा... तुमचा पेशन्ट आयसियुत गेला की तो आहे का गेला हेही कळत नाही.. तो वाचला तर त्याचे व तुमचे नशिब. माणसाच्या फसवणुक करण्याच्या व्रुत्तिचा शिरकाव या क्षेत्रातही झालाय.. विज्ञान आपल्या फायद्यासाठी कसे वापरायचे यात सगळ्यानी पिएचडी केलेली आहे, कुठल्याही विद्यापिठात न शिकता.

तरिही ज्योतिष विद्यापिठात विषय म्हणुन शिकवायला माझा विरोध आहे. ते सायन्स आहे की आर्ट्स आहे यात मला रस नाही पण त्याचा़ कॉमर्स मात्र अजुन जोरात होणार यात शन्का नाही... दरवर्षी नवी फौज बाजारात उतरणार, लोकान्ना फसवायला... सामान्य जनतेने कोणाकोणाकडुन फसवुन घ्यायचे...

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे सरासरी ४० च्या आत असलेली लाईफ एक्स्पेक्टन्सी ६९च्या वर गेली आहे. तरी कॉर्पोरेट रुग्णालयांच्या पद्धतीत सुधारणेला वाव आहे हे बरोबर आहे पण ते कुठल्या क्षेत्रात नाहीय सध्या?
तो विषय पूर्ण वेगळा आहे.
"खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष्य कुठे आहे?, फल ज्योतिष्य शिक्षण अधिकृत करावं का?, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे" याच्याशी त्याचा काही संबंध नाही.

विज्ञान (science) आणि शास्त्र (-logy) या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ होतोय असं वाटलं. विज्ञान म्हणजे अनेक चाचण्यांनी आणि प्रयोगांनी सिद्ध झालेल्या सिद्धांतांवर आधारित ज्ञान प्रणाली. या मध्ये जी गृहीतके मांडली जातात त्यांचे सिद्धांतात रूपांतर होण्यासाठी काही तरी पुरावे लागतात. आणि हे पुरावे गोळा करण्यासाठी केले जाणारे प्रयोग हे वस्तुनिष्ठ असावेत, त्यात कमीत कमी bias असावेत, आणि ते पुन्हा करून बघता यावेत (reproducibility) असे काही नियम लावले जातात. या साऱ्या कसोट्यांवर पार पडून जे ज्ञान माणसाला उपलब्ध होतं त्याच्या आधारे मग त्या त्या विषयाचा अभ्यास करणाऱ्या किंवा त्या ज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शाखा निर्माण होतात.
याउलट शास्त्र म्हणजे एक नियमावली - यात कमी जास्त प्रमाणात physical reality चा सहभाग असल्याने थोडे फार विज्ञान असू शकते. पण बहुतेक करून या नियमावली anecdotal माहितीवर आधारित असतात. उदाहरणार्थ साऱ्या कला - शिल्पकलेसाठी अनेकांनी मानवी शरीराचा अभ्यास केला पण तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हता तर तो शिल्पकलेसाठी होता. गाणे, नृत्य, नाट्य अशा कोणत्याही शास्त्राचे उदाहरण घेतले तरी हे लक्षात येईल की जरी त्यात physical reality मधल्या विज्ञानाचा थोडा सहभाग असला तरी त्याचा पाया विज्ञान नाही. कारण कोणत्याही कलेत reproducibility ला महत्त्व नसतं. तिथे व्यक्तिनिष्ठ आविष्काराला महत्त्व असतं आणि हाच विज्ञान आणि शास्त्र या दोन्हीतला मुख्य फरक आहे. मी पाणी उकळलं काय किंवा लता दीदींनी पाणी उकळलं काय - पाणी १०० अंश सेल्सिअसलाच उकळणार आहे. आज उकळले तरी किंवा उद्या उकळले तरी. पण मी ‘सा’ लावणं आणि लता दीदींचा ‘सा’ यात माझा ‘सा’ कितीही अचूक लागला (मुंगेरीलाल के हसीन सपने) तरी दोन्ही ‘सा’ मध्ये फरक असणारच. आणि तो फरकच संगीत शास्त्राचे बलस्थान आहे. याउलट objectivity आणि reproducibility ही विज्ञानाची बलस्थाने आहेत.
जेव्हा आपण ज्योतिष शास्त्र म्हणतो तेव्हा ते आपण त्याला विज्ञान न मानता शास्त्र मानावे. कारण त्यात भरपूर subjectivity आहे आणि reproducibility देखील नगण्य आहे.
राज यांनी जो AI चा वापर सुचवला आहे तो तसा संगीतात सुरु झालेलाच आहे. पण it still has a long way to go for any -logy, here astrology!
आता विज्ञान आणि शास्त्र हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जातात की हा शब्दच्छल वाटू शकतो. पण संकल्पनेला कोणता शब्द वापरला आहे यापेक्षा या दोन संकल्पना मला का भिन्न वाटतात तो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते.

या निमित्ताने मला जाणवलेला भारतीयांचा विज्ञानाबद्दलचा obsessive विचित्र कळवळा पण मांडावासा वाटतो. आपल्या प्रत्येक चाली रीतीला, परंपरेला कसे कोणतेतरी वैज्ञानिक अधिष्ठान आहे हे सिद्ध करण्याची स त त धडपड सुरु असलेली दिसते. या धडपडीतून निर्माण होणारे छद्मविज्ञान हे भारतीय पारंपरिक शास्त्र आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींसाठी धोकादायक आहे. एकीकडे यात विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात न बसणाऱ्या अनेक गोष्टी manipulate करून बसवण्याचा प्रयत्न करतो (आजच व्हॉट्सअप विद्यापीठात कातरवेळी दिवा लावणे कसे वैज्ञानिक आहे हे सिद्ध करणारी पोस्ट वाचली आहे). आणि दुसरीकडे ज्या परंपरा जात्याच सुंदर, उदात्त आहेत त्यांना या आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवताना आपण हास्यास्पद करून टाकतो. ख्रिसमसच्या आदल्या रात्री सांताक्लॉज येतो ही गोष्ट साजरी करायला किंवा केकवरच्या मेणबत्त्या विझवून हॅपी बड्डे गायला आणि केक खायला कोणतेही आधुनिक विज्ञानाचे नियम सिद्ध करणारी स्पष्टीकरणे द्यावी लागत नाहीत. पण तेच कपाळावर गंध लावायला, औक्षण करायला, किंवा वावे यांच्या उदाहरणात दरवाज्याशी मीठाचे भांडे ठेवायला मात्र भारतीय छद्मविज्ञानाने हजार स्पष्टीकरणं तयार केलेली आहेत. It’s a ridiculous obsession! तुम्हाला एकत्र टाळ्या वाजवून आरती म्हणण्यात आनंद मिळतो तेवढं कारण पुरेसं आहे. टाळी वाजवताना कोणत्या नर्व्हजना ताकद मिळते वगैरे पुड्या का सोडता?

जिज्ञासा, जियो
मागे एका वेगळ्या संदर्भात हाच फरक मांडायचा प्रयत्न केला होता
https://www.maayboli.com/node/26298 प्रतिसाद बघ

शेवटचा मुद्दाही अगदी अगदी झालं

जि सुरेख प्रतिसाद.
मानवदादा, फलज्योतिष शिक्षण अधिकृत करावे ह्याचा लोकांची जागरूकता याच्याशी जवळचा संबंध येतो. प्रत्येक विद्यापीठ्/शैक्षणिक संस्थेचे मँडेट -मिशन वेगळे असते. अमेरिकेत आर-१ गटात येणार्‍या युनिव्हर्सिटीज आणि "ओपन युनिव्हर्सिटीज" ज्याची तुलना अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेजशी करता येईल याचे मँडेट-मिशन वेगळे असते. आर-१ मध्ये जसे लेखात लिहीले आहे तसे मुद्देसूद शास्त्र इ असेल तरच शिक्षण देऊ असे असते. याउलट कम्युनिटी कॉलेज/ओपन युनिव्हर्सिटीत समाजात ज्याची गरज असेल ते शिक्षण देऊ. उदा: पोर्टलंड इथे एका कॉलेजात विदूषक कसे व्हायचे ह्याचे शिक्षण दिले जाते कारण तिथे विदूषकांना मार्केट आहे. ज्याला मार्केट आहे त्या विषयात शिक्षण देणे अपेक्षित असते. लेखात IGNOU चे मँडेट-मिशन काय आणि त्याचे ज्योतिष शिक्षणाने उल्लंघन झाले काय ह्याचा उहापोहच नाही. जर समाजात "गरज" असेल आणि तेच विद्यापीठाचे मिशन असेल तर त्यात वावगे काय घडले? लोकात जागृती नाही, ज्योतिष लुबाडतात तरी लोकं तिथेच जातात ह्यात मधल्यामधे विद्यापीठाचा काय दोष??

राहता राहिला प्रश्न जर्मनीतील होमियोपॅथी. जर्मनीतील डॉक्टर पेशंट रेशियो हा function at() { [native code] }इशय उत्तम आहे, वैद्यक सुविधा उत्तम आहेत तर भारतात डॉक्टर पेशंट रेशियो वाईट आहे, वैद्यकिय व्यवस्था सहज उपलब्ध नाहीत. होमियोपॅथी फोफावली त्याला कारण कॉलेजेस नाहीत तर समाजात असलेली स्वस्त वैद्यकीय सुविधेची गरज आहे.

विदुषक बनून प्रामाणिक पणे लोकांचे मनोरंजन करून पोट भरण्यात काहीच कमीपणा नाही. भारतातही असे कोर्सेस सुरू झाले तर उत्तमच आहे. पण ही तुलना अस्थानी आहे. "पाकिट कसे मारावे" या कोर्सलाही डिमांड असेल, पण म्हणून ते सुरु करावेत ?
एवीतेवी लोक पाकिट मारणारच, मग तसे कोर्सेस व लायसेन्स सुरू करून दरमहा किती पाकिटी मारली व किती पैसे मिळाले हे सारे रजिस्टर मेन्टेन ठेवायची सक्ती करावी ?

तुलना अस्थानी आहे ते मला नका सांगू, यु.एस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटीस्टीक्सला सांगा. ते विदूषक, ज्योतिषी सर्व ए.१९४ कोड मध्ये पर्फॉर्मिंग आर्टीस्ट म्हणून घेतात.

जिज्ञासा छान पोस्ट. ते व्हॉट्सअ‍ॅप मधून फिरणारे ऑब्सेशन फार झाले आहे. असल्या पोस्ट लिहीणार्‍यांना विज्ञानाच्या कसोटीवर म्हणजे नक्की काय याचा अजिबात पत्ता नसतो, ते माहीत करून घेण्यात इंटरेस्ट नसतो. चांदीत कसलेतरी तत्त्व असते वगैरे भोंगळ वाक्ये आणि त्यातून लॉजिक रानोमाळ हरवलेली अनुमाने काढणे असल्या प्रकारांना माना डोलावणारे पब्लिक असते बहुतांश. "आमची श्रद्धा आहे म्हणून" किंवा "आमची सांस्कृतिक परंपरा आहे म्हणून" आम्ही करतो इतक्या साध्या रीतीने ज्याचे जस्टिफिकेशन देता येइल त्याला उगाचच अर्धवट वैज्ञानिक साच्यात बसवायचा खटाटोप फार हास्यास्पद होतो.

सहमत. ते 'अमुक गोष्टीतून पॉजिटीव्ह ऊर्जा बाहेर पडते किंवा सकारात्मक स्पंदने बाहेर पडतात' छाप विधाने काही कारण नसताना, फक्त ऊर्जा आणि स्पंदने ह्या शब्दांच्या वापरामुळे वैज्ञानिक समजली जातात.

बाकी वि कु म्हणतात तसं, मुळात ज्योतिष ह्या व्यवसायावरच आक्षेप आहे, म्हणून ते विद्यापीठात शिकवण्यावर आक्षेप आहे. कुणी त्याला परफॉर्मिंग आर्ट समजत असेल, तरी ज्यांना पटत नाही ते विरोध करणारच. ते शिकवल्याने स्तोम वाढेल की नाही ह्यापेक्षा तो व्यवसाय असणेच चालू द्यावे की नाही - ह्यावर चर्चा व्हावी. कारण अभ्यासक्रमात आणण्याला विरोधमागे मूळ ते आहे.

जर व्यवसाय म्हणून त्यावर आक्षेप नसेल, तर मग तो विद्यापीठात शिकवण्यावर आक्षेप का - हा मुद्दाही योग्यच. तिथेही स्तोम हे उत्तर पटत नाही. जर व्यवसाय चालू राहण्यास हरकत नसेल, तर स्तोम वाढल्यावर आक्षेप का? व्यवसाय असेल तर तो वाढण्याचाच प्रयत्न व्यावसायिक करणार. त्यामुळे ते तसेही स्तोम वाढवणारच. हा व्यवसायच चुकीचा आहे, असं मत असेल तर मग हे सगळे प्रश्न रद्द होतात.

जिज्ञासा, मस्त पोस्ट.
नाट्यकला, संगीतकला यांच्याशी ज्योतिषाची बरोबरी तेवढी पटली नाही. पण बाकी छद्मविज्ञानाच्या बाबतीत मात्र अगदी!
यात विज्ञानाचं ऑब्सेशन आहे की अनाठायी न्यूनगंडातून आलेली 'हम भी कुछ कम नहीं' अशी भावना आहे ते सांगता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी जे खरोखरच शोधून/म्हणून/लिहून ठेवलंय त्याचं रास्त श्रेय आपण त्यांना दिलं पाहिजे. भले नंतरच्या संशोधनामुळे ते कालबाह्य का झालेलं असेना. उगाच नवीन काही शोध लागला की 'हे सगळं आम्ही आधीच शोधलं होतं' या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे उलट आपण हास्यास्पद ठरतो.
विदूषक आपल्या प्रत्यक्ष आयुष्यासाठी सल्ले द्यायला लागले तर आपण ऐकणार नाही. म्हणून तुलना अस्थानी आहे.

Happy विदूषकाची तुलना बरोबर आहे. ज्योतिषाचे पण प्रत्यक्ष आयुष्याचे सल्ले ऐकायचे नसतात. हसून सोडून द्यावं. (माय फेवरिट - घबाड गवसेल!!) यु.एस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटीस्टीक्स विदूषक, ज्योतिषी सर्व ए.१९४ कोड मध्ये पर्फॉर्मिंग आर्टीस्ट म्हणून घेतात. भारतातील वर्गवारी माहिती नाही. व्यवसाय आहे म्हणल्यावर त्याची वर्गवारी काय, विद्यापीठाचे मँडेट काय अशा टेक्निकल गोष्टी संबंधित अधिकार्‍यांना बघाव्या लागतात. त्यात बसतं का? का उल्लंघन झालं आहे? माहिती नसेल तर राईट टू इंफर्मेशन मध्ये माहिती मिळू शकेल काय? लेख लिहीण्याने जनजागृती होईल पण खरंच नको असेल तर अशा टेक्निकल गोष्टी उचकल्या पाहिजेत. मला अस्थानी आहे इ म्हणून काही बद्ल/फायदा होणार नाही. वुई आर ऑन दि सेम साईड.

>ज्योतिषाचे पण प्रत्यक्ष आयुष्याचे सल्ले ऐकायचे नसतात. हसून सोडून द्यावं.

हे खरं असतं तर इतकी डोकेफोड केलीच नसती. एखाद्या विदुषकाने हा मुलगा व ही मुलगी यांचे लग्न करू नका असे सांगितले तर हसून सोडून देतील. ज्योतिषाने सांगितलं तर हसून सोडून देतील ? यू एस ब्यूरो ऑफ लेबर हे गोल्ड स्टँडर्ड आहे का? त्यांची चूक होणारच नाही का?

माझ्या बायकोच्या पत्रिकेत सासरा एका वर्षात वर जाणार असा योग होता. तिची पत्रिका एखाद्या मुलाला दाखवली तर नकार तर यायचाच, वर रागही यायचा असली पत्रिका देताच कशी म्हणून. काही लोकांना आमचे वडील एका वर्षाच्या आत वर जाणार याची इतकी खात्री होती की ते ऐन वेळी धावपळ नको म्हणून आधीच अंत्यविधीचे सामान वगैरे आणून देतील की काय अशी मला भिती वाटली. तसले काही अर्थात झाले नाही. हे खूळ हळू हळू का होईना कमी होत आहे. डिग्री सुरू केल्याने ते अजूनच लांबेल.

यू एस ब्यूरो ऑफ लेबर हे गोल्ड स्टँडर्ड आहे का? >> हो, व्यवसायांचे वर्गीकरणासाठी हे गोल्ड सँडर्ड आहे. इतर कुठले माहिती असल्यास संदर्भ देऊ शकता.

ज्योतिषाचे पण प्रत्यक्ष आयुष्याचे सल्ले ऐकायचे नसतात. हसून सोडून द्यावं.>>
पण अनेक लोक ऐकतात. त्या सल्ल्यानुसार आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेतात हे तुलाही माहिती असेल.
आणि ज्योतिषी विदूषकासारखा मनोरंजनाचा हेतू ठेवून सल्ले देतात का?

तिकडे बुद्धीजीवी/विज्ञाननिष्ठ लोकांचे सल्ले ऐकायचे नसतात, हसून सोडून द्यायचे असतात सुरु असतं. Lol
चल मुकाट्याने नारायण नागबली पूजा घाल, ते एवढे मोठे डॉक्टर (इथेही परत डॉक्टरांनाच आणतात ओढून) करतात, मूर्ख आहेत का ते?

माझ्या बायकोच्या पत्रिकेत सासरा एका वर्षात वर जाणार असा योग होता.>>>>>>माझ्या बायकोच्या पत्रिकेत एका वर्षात वैधव्य योग होता. एका ज्योतिषाने तसे सांगितले होते म्हणे.आमचे अरेंज्ड मॅरेज.तिने मला लग्नाआधीच तसे सांगितले होते. मी फलज्योतिष चिकित्सक असल्याचे तिला सांगितले होते.मी तिची पत्रिका तेव्हा पाहिली नाही व पहायचीही नाही असे सांगितेले. मी गंमतीने तिला म्हटले की माझ्या पत्रिकेत तसा योग नाही. योगायोगाने माझे लग्न झाले त्याच वर्षी मला एक मोटरसायकल अपघात व हार्ट अटॅक आला. त्यातून मी वाचलो. हा किस्सा मी सांगत नाही कारण लोकांना वाटत की पहा ज्योतिष कित्ती खरं आहे. मी माझ्या बायकोची पत्रिका माझ्या मुलीच्या लग्नाच्यावेळी तयार केली.

Submitted by जिज्ञासा on 26 September, 2021 - 22:07 >> छान पोस्ट. आधीच वाचली पण पावती द्यायची राहून गेली.

मला या विषयावर नाही पण या विषयाला अनुषंगून एक मत मांडायचं आहे.

आपण आपल्या पुराणाकडे शब्दशः बघण्यापेक्षा अर्थशः बघितलं आर बरेच प्रश्न सुटतील.
रामायण आणि महाभारत हि महाकाव्य आहेत. म्हणजे त्यात काव्यात वापरले जाणारे सगळे अलंकार अध्याहृत आहेत.

अर्थात हनुमान नक्की माकड होता का, किंवा जटायू पक्षी होता का? आणि तसं असेल तर रामाला त्यांची भाषा कशी काय येत होती? अशा प्रश्नांना काही अर्थ नाही. दंडाकारण्यातल्या अठरापगड जातीधर्माच्या लोकांच्या मदतीने रामाने रावणाचा पराभव केला. या कथेचं काव्य करायचं झालं, कि मग त्यात माकडं, गिधाडं अश्या कल्पना घालून उत्तम काव्य लिहिता येत.

तसंच ज्योतिष शास्त्राचं. (माझा अभ्यास शून्य आहे) पण आकाशातल्या ग्रहांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम सगळ्यांना माहित आहे. आणि वातावरणाचा माणसांवर परिणाम होतो या बद्दल देखील दुमत नसावं. मग वातावरणाचा अंदाज घेऊन साधारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणि मनात काय चाललं असावं याचा विचार केला तर ढोबळ मानाने एखादी घटना वर्तवणं सरावाने शक्य आहे सहज नक्कीच नाही.

इतका सोपा विचार करून आपण सुरवात केली तर हळू हळू त्यातलं गांभीर्य आणि अधिक अभ्यास करताना मनातली शंका कमी होईल.
अर्थात हे बरोबर कि चूक हे ज्याचं त्याने ठरवावं. तसेच बरेचसे ज्योतिषी, वाईट भविष्य वर्तवित नाहीत. चांगलं असेल तरच सांगतात. तस बंधन पळाल्यास मनोधैर्य वाढण्यासाठी म्हणून ज्योतिष शास्त्राचा उपयोग अवश्य करता येईल

आकाशातल्या ग्रहतार्‍यांच्या स्थितीने पृथ्वीवरील सजीवांचे भविष्य आणि जडणघडण कसे काय ठरू शकते, यात लॉजिकच नाहीये हे आपल्यातील बहुतांश लोकांना माहीत आहे.
बरे जे मानतात त्यांना त्यांच्या पोरांनी उद्या विचारले सांगा लॉजिक तर त्यांना पटेल असे काहीच उत्तर ते देऊ शकत नाही हे त्यांनाही माहीत आहे.
तरीही धाग्यावर १७६ पोस्ट आल्या आहेत.
यावरूनच कळते की ना या विषयाला मरण आहे ना ज्योतिषाला मरण आहे.
भले ते खरे असो वा नसो, हा मुद्दा ईथे दुय्यम.
कारण जे सिद्ध करता येईल तेच मानायचे ठरवले तर जगातून देव नसता का नाहीसा झाला कधीचाच Happy
अरे हो, देवावरून आठवले. लहानपणी देवांच्या, रामकृष्णाच्या कथा आम्ही शाळेतच ऐकल्या. देव सिद्ध करता येत नसेल तर लहान मुलांनाही देव आहे असे शाळेत सांगून त्यांचा ब्रेनवॉश करणे चूकच. अर्थात करू नका असे. फक्त मुद्दा समजायला एक टोकाचे उदाहरण दिले.

मूळ लेख फार छान आहे. मी कसा मिसला ईतके दिवस. गणपतीच्या नादात बहुधा. फुरसतीने सारे प्रतिसाद वाचायला हवे ईथले..

Pages