खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

Submitted by aschig on 15 September, 2021 - 16:59

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?

अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.

IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत

सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्‍या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.

एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.

फलज्योतिष कशावर आधारित आहे?

पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.

पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.

या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.

या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.

लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.

त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.

खगोलशास्त्राची प्रगती

काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.

भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/

या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.

नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)

लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.

Group content visibility: 
Use group defaults

तुमचा प्रॉब्लेम फलज्योतिषाचा उल्लेख एक्स्प्लिसिटली आलेला नाहि हा आहे. >> उलट एक्स्प्लिसिटली उल्लेख करून त्यांनी सांगितलेलं आहे की Astrology ला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

बाहेर गेलेला माणूस लवकर घरी परत आला नसेल तर उंबरठ्यावर मीठ ठेवण्याची प्रथा होती असं सांगणं आणि उंबरठ्यावर मीठ ठेवलं की बाहेर गेलेला माणूस सुखरूप परत येतो असं सांगणं यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे! >> हो गं, फरक आहे पण तो तुझ्या-माझ्यासाठी. १७-१८ वर्षाची मुले इतकी परिपक्व असती तर चर्चेचा प्रश्नच नव्हता.
१५० वर्ष शास्त्र (सायन्स. बी.एस्सी इ) शिकवतंय विद्यापीठ, इतके शास्त्राचे ग्रॅज्युएट्स-पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत तरी समाजात शास्त्राचे स्तोम अजून झालेले नाही. झाले असते तर हा धागाच अनावश्यक ठरला असता. विद्यापीठात ज्योतिष आल्याने स्तोम वाढेल ही भिती अनाठायी आहे हे माझे मत- कारण तसा सपोर्टीव्ह डेटा काही नाही आणि जे विषय शिकवले जातात त्याचे स्तोम होते असेही चित्र समाजात फारसे दिसत नाही. समाजात हे जे अनरेग्यूलेटेड ज्योतिष व्यवसाय (जिथे अवाजवी पैसे, बळी इ उपाय) चालले आहे ते बंद व्हायला पाहिजे. दारू, तंबाखू विक्रीसाठी नियम आहेत तसे किंवा ज्योतिष सर्व्हीस मानली तर डॉक्टर आर्किटेक्टला जशी नियमने आहेत तशी नियमने लवकर यायला हवी. शास्त्राच्या कसोटीवर देव, धर्म, ज्योतिष इ बसत नाही म्हणून ते सगळे भिरकावून दिले पाहिजे नि मानसोपचार घेतले पाहिजे हे अगदी बरोबर. पण तो दिवस अजून काही दशके दूर आहे. तोवर कुणी ज्योतिषाने त्रास देऊ नये म्हणून लवकर नियम यायला हवे. बौद्धिक, शाब्दिक किस पाडणारे वाद मला जमत नाहीत, प्रॅक्टीकली काय व्हायला हवं आहे ते उमजत तेवढं लिहून मी थांबते ग खरंच, वावे.

चांगली चर्चा आहे. एकंदर ज्योतिष थोतांड आहे हे पटवून देणे ज्योतिष खरेखुरे शास्त्र/विद्या आहे हे दाखवून देण्यापेक्षा अतिसोपे असल्याने बहुतेक प्रतिसाद एकाच बाजूचे आले आहेत. दुसऱ्या बाजूचे प्रतिसाद येतील अशी शक्यता पण नाही.
माझा काही अभ्यास नाही पण माझ्या ओळखीत डोंगरभागातल्या गावात राहणारे एक वृद्ध अंध गृहस्थ आहेत. अंध असल्याने त्यांना पत्रिका वाचून दाखवावी लागते. पत्रिकेवरून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी १००% नाही पण ८०%तरी अचुक असतात. पण प्रश्नकुंडलीवरचे त्यांचे प्रभुत्व पाहून मात्र अचंबीत व्हावे लागते इतक्या अचूक गोष्टी सांगतात. सकाळी ठराविक वेळेतच पाहतात. पैसे वगैरे कोणाला मागत नाही, आलेले लोकं आपल्या मर्जीप्रमाणे देतात. हे इथे सांगण्याचा उद्देश हाच की बहुतांश भोंदुगिरी चाललेली असली तरी अशी काही दुर्मीळ मंडळी भेटल्यावर यात थोडाफार दम आहे हे अनुभवास येते. ज्योतिष कला म्हणा किंवा विद्या पण ती विद्यापीठात शिकवून किंवा पुस्तके वाचून आत्मसात होत नसल्याने अभ्यासक्रमात आणणे चुकीचे वाटते.
( वरील गृहस्थांचा नावपत्ता दिल्यास येथील कोणीही जाऊन स्वतः पडताळा घेऊ शकतात पण असे सोशल साईटवर दिल्यास पब्लिक गर्दी करून त्यांना वात आणेल. घाटपांडे सरांना इच्छा असल्यास त्यांना मात्र देऊ शकतो खाजगी सम्पर्कातून)

१७-१८ वर्षाची मुले इतकी परिपक्व असती तर चर्चेचा प्रश्नच नव्हता.>>
याहून लहान मुलांना याहून किती तरी गुंतागुंतीच्या गोष्टी शिकवतो की आपण. उलट मोठ्या माणसांनाच मतं पक्की झाल्यावर वेगळं काही पटवून देणं कठीण.
विज्ञानाचं महत्त्व (स्तोम नव्हे) दीडशे वर्षांत वाढलं नाही असं कसं म्हणता येईल? किती तरी प्रगती विज्ञानामुळे झालेली आहे. ती आपल्या समोर आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन हा विज्ञानाच्या शिक्षणातून आपोआप येत नाही. तो प्रयत्नपूर्वक आणावा लागतो. एखाद्या अशिक्षित माणसातही तो असू शकतो आणि एखाद्या उच्चशिक्षित माणसाकडे तो नसतो.
ज्योतिष रेग्युलेट करायचं म्हणजे ज्योतिषांनी सांगितलेली भाकितं लिखित स्वरूपात घेऊन, दोन्ही बाजूंच्या सह्या घेऊन, सांगितलेल्या कालावधीत ती खरी न ठरल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार करता येईल आणि ज्योतिष सांगणाऱ्याला दंड/ शिक्षा होईल असा कायदा करायचा का?
डॉक्टर आणि आर्किटेक्टच्या शिक्षणाला जो तर्कसुसंगत, वैज्ञानिक आधार असतो, त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे, केलेल्या उपाययोजनेचे परिणाम (तुमचा विश्वास असो वा नसो) ढळढळीत समोर दिसतात, ते सिद्ध करता येतात, तशी परिस्थिती मुदलात फलज्योतिषाची नसताना विद्यापीठात ते शिकवून त्याला मान्यता कशासाठी मिळवून द्यायची?

ज्योतिष रेग्युलेट करायचं म्हणजे ज्योतिषांनी सांगितलेली भाकितं लिखित स्वरूपात घेऊन, दोन्ही बाजूंच्या सह्या घेऊन, सांगितलेल्या कालावधीत ती खरी न ठरल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार करता येईल आणि ज्योतिष सांगणाऱ्याला दंड/ शिक्षा होईल असा कायदा करायचा का?>>>>>> एक जुना संदर्भ दिला आहे.

https://www.maayboli.com/comment/4718067#comment-4718067

ज्योतिष रेग्युलेट करायचं म्हणजे ज्योतिषांनी सांगितलेली भाकितं लिखित स्वरूपात घेऊन, दोन्ही बाजूंच्या सह्या घेऊन, सांगितलेल्या कालावधीत ती खरी न ठरल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार करता येईल आणि ज्योतिष सांगणाऱ्याला दंड/ शिक्षा होईल असा कायदा करायचा का?
>>>>
डेंटिस्ट व डॉक्टरही आधी सही करुन घेतातच की काही गंभीर परिणाम झाल्यास आम्ही जबाबदार नाही. तसे ज्योतिषीदेखील करुच शकतात. की खरे न ठरल्यास दोषी ठरविले जाउ नये.

अजुन एक - समजा ज्योतिषाने सांगीत ले पत्रिका जुळते आणि घटस्फोट झाला नाही पण बेबनाव राहीला तर त्या बेबनावाची टक्केवारी कशी मोजायची, कसे न्यायालयात जायचे?

म्हणूनच, असा कायदा करणे बरंच गुंतागुंतीचे आहे. या कायद्याखाली यायला ज्योतिषी तयार होतील की नाही, जे यायला इच्छुक नसतील पण व्यवसाय चालू ठेवतील त्यांचं काय?
रेग्युलेट करा असं जे जे कुणी वर म्हणतायत त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे?

माझं या बाबतीत सध्या तरी काहीच मत नाही. विद्यापीठात फलज्योतिष शिकवावं का याबद्दल मात्र माझं मत नकारार्थी आहे!

पण मग अश्विनी यांचा मुद्दा आवडला मला. फ्रीडम आहेच की सर्वांना. त्याचे तर दमन करता येत नाही.
मग अमितव म्हणाले - फ्रीडम आहे शिकण्याचे. प्रश्न एवढाच आहे की अशा कोर्सेस ना अनुदान मिळावे का?

तर मला वाट्ते फ्रीडम आहे = अनुदान मिळेलच.

शस्त्रक्रीयांसाठी डॉक्टर लिहून घेत असले तरी ते ज्या शस्त्र क्रिया करतात त्यावर संशोधन होऊन ते जगासमोर मांडून ते करण्याची नियमावली बनवून, पडताळून त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेऊन सक्सेस रेट किती आहे, धोका किती आहे हे सिद्ध करून, संबंधीत बॉडीज कडुन मान्यता मिळवून केलेल्या असतात. पेशंटला किती धोका आहे याची माहिती देऊन त्याबद्दल त्याचा कंसेंट घेऊन त्याची स्वाक्षरी घेतली जाते.
जनरल फिजिशियन "मला वाटते तुमच्या डोक्यात टेप वर्म आहे म्हणुन मीच तुमच्या मेंदूची शस्त्रक्रिया करतो, करा सही " असे नाही करू शकत.
योग्य त्या चाचण्या करून शस्त्रक्रियेची गरज का आहे याचे नीट डॉक्युमेंटेशन करून, मान्यता प्राप्त तज्ञाने, मान्यता प्राप्त शस्त्रक्रिया केली असली आणि त्यात गलथानपणा केल्याने पेशंट दगावला तर केस करता येते.

ज्या प्रमाणे ग्रह तारे आपल्या भविष्यावर परिणाम करतात त्याप्रमाणे आकाशगंगेची सध्याची स्थिती, आकाशगंगेत आपल्या सुर्यमालिकेचं स्थान, आजूबाजूच्या आकाशगंगांची स्थिती. नजीकच्या ब्लॅकहोलची स्थिती हे सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात.

सामो लै भारी! वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. ते घटस्फोटीत कुंडल्यांवर संशोधन करत होते; मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)

प्रकाश घाटपांडे, घटस्फोट वगैरे जाऊद्या, कुंडलीवरून मुलगा/मुलगी गतिमंद आहे की नॉर्मल बुद्धिमत्तेचा/ची हेही सांगता येत नाही असं तुम्ही https://www.maayboli.com/node/78593 या धाग्यावर सांगितलं होतं.

सीमांतीनी यांचे विचार पटले नाहीत तरी त्या कुठून येत आहेत ते मी समजू शकतो. ( understand where she is coming from) .
ज्योतिष लोकांकडून होणारी लूट कमी व्हावी, त्यांच्या फी वर नियत्रण रहावे, अघोरी उपाय बंद व्हावेत या सदिच्छेनेच त्या लिहित आहेत. पण असे अभ्यासक्रम सुरू केल्याने त्यांना लेजिटिमसी मिळते, हे चूक वाटते. शिवाय हस्तसामुद्रिक, पोपट वाले, रमल वाले यांनी काय घोडे मारले आहे, तेही सिलॅबस मध्ये घ्या अशीही मागणी होईल.

वावे ह्यांचे प्रतिसाद पटलेच, शिवाय बोकलत ह्यांचेही! उपहासाने का होईना, मुद्दा बरोबर आहे. जर शेजारी उभ्या असलेल्या नर्सपेक्षा मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त फरक पडत असेल, तर मग अजून दूरवरच्या ब्लॅक होल चा का नाही, आकाशगंगेच्या इतर गोष्टींचा का नाही? जर शहरानुसार को ऑर्डीनेट बदलत असतील आणि पत्रिका बदलत असेल तर आता रेझोल्युशन आणखी फाईन का करू नये? शेजारच्या खोलीत जन्मलेल्या बाळाची पत्रिका वेगळी असली पाहिजे.

त्याही पुढे जाऊन म्हणतो, की ते १२ घराचं कोष्टक रद्द करून आता अजून फाईन करावं. निदान ३६० घरे तरी हवीत. त्यात आपल्या सूर्यमालेतले युरेनस, नेपच्यून, शिवाय लघु ग्रह, सगळ्या ग्रहांचे उपग्रह, मानवाने सोडलेले उपग्रह, इतर तारे, आकाशगंगा, कृष्णविवर असे सगळे दाखवता आले पाहिजेत. त्यांचा एकत्रित परिणाम बघा. १२ म्हणजे फारच ढोबळ होतंय. नाही म्हणायला २७ नक्षत्र, त्यांचे चरण वगैरे फाईन रेझोल्युशन असतंच की. ते आणखी फाईन करण्याची गरज आहे.

हर्पा ब्लॅक मुन लिलीथ, वेस्टा. जुनो आणि काही (मला आठवत नाहीयेत आत्ता) वगैरे लघुग्रहदेखील आहेत वेस्टर्न ज्योतिष्यात.

रेग्युलेट करा असं जे जे कुणी वर म्हणतायत त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे? >> Happy मला इथे अधिक लिहायचे नव्हते पण बहुधा माझ्या नशीबातच तसे असावे किंवा विल पॉवर वाढवण्यासाठी मानसोपचार घेणे गरजेचे असावे Wink मला ह्या ६ गोष्टी अपेक्षित आहेतः
१. ज्योतिषी व्यवसाय संघटनेकडे रजिस्टर्ड असावा, त्याचे लायसन्स असावे. आचारसंहितेचे उल्लंघन घडल्यास ते रद्द होईल अशी सोय हवी. विनापरवाना ज्योतिषाची जाहिरात दिसल्यास, स्टींग ऑपरेशन मध्ये आढळल्यास त्यावर कायद्याने कारवाई व्हावी.

२. आचारसंहिता असावी उदा: डॉक्टरांना जसे स्त्री पेशंट, लहान मुले, मनोरूग्ण यांना तपासताना आचारसंहिता असते तशी.

३. व्यवसायात ज्योतिष-ग्राहक कॉन्ट्र्क्ट असावे, ट्रान्स्परंसि असावे. किती पैशात काय प्रॉड्क्ट (पत्रिका, १ महिन्याचे प्रेडीक्शन इ लिखितमध्ये, ५ प्रश्नांची उत्तर इ) मिळणार हे स्पष्ट असावे. दरमहा "द्या दोन हजार एक" असे स्टेल्थ लुबाडण्याचे प्रकार कमी होतील

४. प्रेडीक्शन बद्दल "वैधानिक इशारा" असावा. हे प्रेडीक्शन संशोधनातून आलेले नाही तर व्यावसायिकाचे मत आहे, रेकमेंडेशन आहे. जातकाने पालन स्वतःच्या जबाबदारीवर करावे अशा काही आशयाचे.

५. ज्योतिषाला डेटाबेस ठेवणे कंपल्सरी असावे - किती लोक आले, काय सर्व्हिसेस घेतल्या, किती फी घेतली व काय प्रॉडक्ट विकले. आयकर इ कुठल्याही संबंधित खात्याला रेड पडली इ मध्ये हा डेटा बघता यावा. इतर डॉक्टर इ व्यावसायिकांचे डी-आयडेंटीफाईड डेटाबेसेस बघता येतात.

६. अघोरी उपाय - पशू व माणसे यांची हत्या, जातकाच्या इंकम पेक्षा ३०% अधिक उपाय सुचवणे, जातकाला शारिरीक हानि होईल असे १००० लोटांगणे एका दिवशी घाला इ इ - हे बंद केले पाहिजे. सती, लिंगनिदान इ जसे कायद्याच्या बडग्याने बंद केले तसे असले उपाय सुचवणारा ज्योतिष व्यवसाय बंद व्हायला हवा.

अशा पद्धतीचे रेग्यूलेशन आणणे हे "लो-हँगिंग फ्रूट" आहे. बरेच ताप त्याने कमी होतील. अनेक ज्योतिषांचीही त्याला मनापासून मान्यता असेल. मायबोलीवरही ज्योतिषी मंडळी वैद्यक व्यावसायिकांशी संवाद साधू इच्छितात, इंटर डिसिप्लीनरी अप्रोच ठेवू इच्छितात असे अनेकवेळा आढळते. मी ह्या विषयातील तज्ञ नाही पण विकुंनी म्हणल्याप्रमाणे 'कुठून आले' ते समजून घ्या.

मी विद्यापीठात डिग्री आली काय, नाही आली काय सारखंच ह्या मताची आहे. त्याने फार फरक पडणार नाही. प्रोफेशनल एथिक्स सांभाळणे जरूरी.

> विद्यापीठात डिग्री आली काय, नाही आली काय सारखंच ह्या मताची आहे. त्याने फार फरक पडणार नाही.
चूक ! एकदा विद्यापीठात डिग्री आली की मग ती देणारी कॉलेजेस, शिकविणारे प्राध्यापक , शिक्षण संस्था, शिकवण्या अशी एको सिस्टीम तयार होईल व हे स्तोम वाढतच जाईल. हे चालूच रहाण्यात हितसंबंध असलेले मग ते सुरूच ठेवतील.

याचे उत्तम उदाहरण होमिओपॅथी ! अमेरिकेत, इतकेच काय पण खुद्द जर्मनीतही होमियोपॅथ्यी मरणासन्न आहे. भारतात ती जोमात आहे कारण कॉलेजेस व लबाड शिक्षण संस्था !

शिवाय तुमचे उपाय रोगापेक्षा भयंकर आहेत. एखादा ज्योतिषी जर मी हिमालयात राहून अभ्यास केला आहे व माझी फी एक लाख रुपये पर पत्रिका आहे असे म्हणत असेल तर तो त्याचा अधिकार आहे. त्याने किती फी घ्यावी हे सरकार का ठरवणार ? सलमान खान ने एका सिनेमाचे अरमान कोहली इतकेच पैसे घ्यावेत असे सरकार सांगते का ?

शिवाय तुमचे उपाय रोगापेक्षा भयंकर आहेत. >> आणि त्याहून भयंकर तुमचे वाचन आहे. मी लिहीले काय ते नीट वाचा बरं... सलमानचे नुकसान होईल असं काहीही लिहीले नाही Happy

सीमंतिनी, तू जरी म्हटलंस की जातकाच्या उत्पन्नाच्या अमुक टक्केच फी आकारता येईल वगैरे तरी ते प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही. माणूस आधी आपल्याला परवडेल असा ज्योतिषी बघेल. गुण येत नाही म्हटल्यावर विकु म्हणतात तशा एखाद्या नामांकित ज्योतिष्याची फी परवडत नसतानाही ओढाताण करून त्यांच्याकडे जाईल. अडलेला माणूस त्यांचा सल्ला मिळावा म्हणून खोटं उत्पन्नही दाखवायला तयार होईल. वर नामांकित ज्योतिष्यांची काही जबाबदारी नाही कारण खुद्द क्लायंटनेच लिहून दिलंय माझं उत्पन्न अमुक आहे असं!
हे कदाचित आजही चालू असेल. पण त्याला उलट कायद्याचं संरक्षण मिळेल.

जातकाच्या उत्पन्नाच्या अमुक टक्केच फी आकारता येईल वगैरे तरी ते प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही. माणूस आधी आपल्याला परवडेल असा ज्योतिषी बघेल. गुण येत नाही म्हटल्यावर विकु म्हणतात तशा एखाद्या नामांकित ज्योतिष्याची फी परवडत नसतानाही ओढाताण करून त्यांच्याकडे जाईल>>>>>

डॉक्टरच्या बाबतितही लोक असेच करतात... सरकारी दवाखाने सोडता खासगी डॉक्टरानी किती फी आकारावी यावर कुणाचेही बन्धन नाही.

बाकीचे पाच मुद्दे पटले ना, मग तिथे नियम सुरू करा. जिथे ज्योतिष संघटना व ग्राहकात कंसेंसस आहे तिथे पुढे जाऊन नियम येणे गरजेचे.

मी लिहीलेले सहा मुद्दे कुठल्याही प्रस्तावित कायद्याचा मसुदा नाही. त्यामुळे सुधारणेस वाव आहे. बँकेत जसे उत्पन्नाच्या अमुकच कर्ज देतात तसे काही मॉडेल डोक्यात होते. जेणेकरून प्रेडेटोरी प्रॅक्टीसेसना आळा बसला पाहिजे. आज अमुक बाबाने लुबाडले, काल तमुक बाबाने सांगितले ह्या वेळी मराल तर मोक्ष मिळेल नि अख्ख्या कुटूंबाने आत्महत्या केली असल्या बातम्या वाचल्या की रेग्यूलेशनची गरज फार जाणवते. एकूण शिक्षणपद्धतीचा खेळखंडोबा बघता ज्योतिष विद्यापीठात आले तर ते लवकर लयाला जाण्याची शक्यता अधिक Wink

येल्लो टोपाझ - पुखराज अमेरिकेत कुठे मिळेल?>> हेही स्तोम वाढवा आता तिथेही .कुठे मिळेल>>कुठेही ज्वेलरी शॉप मध्ये मिळेल .अजून लागू बंधू खडे मोतीवाले अमेरिकेत गेले नाहीत नाहीत त्यांच्याकडून ऑनलाइन मागवू शकता.इकडून तिकडे डिलीव्हरी देतात का ते माहीत नाही.

Pages