पुष्पौषधी : सामान्य माहिती

Submitted by अवल on 4 June, 2011 - 07:12

यात दिलेली माहिती केवळ माझ्या वाचनाच्या आधारावर आहे. यातील कोणतीही माहिती मी स्वतः प्रयोगशाळेत तपासलेली नाही. परंतु स्वानुभवाने ही सर्व पद्धती मला तरी विश्वासार्ह वाटली आहे हे मुद्दाहून नमूद करावे वाटते.

कोणी शोधून काढली ही "पुष्पौषधी " ?

डॉ. एडवर्ड बाख ( १८८६-१९३६)
लंडनमधील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. बाख यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टीस चालू केली. कालांतराने आवड म्हणून त्यांनी बॅक्टेरिऑलॉजिकल लॅब मध्ये संशोधनाचे कामही चालू केले.
डॉ. हनिमन यांच्या होमिओपॅथीचाही त्यांनी अभ्यास केला.
याच सुमारास त्यांनी फुलांवरही संशोधन केले.
या सर्वातून त्यांनी आपले फुलांच्या संदर्भातले पहिले संशोधन प्रसिध्द केले, "Heal Thyself"
आपल्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तींचे काही गट अधोरेखीत केले. मानवी स्वभावांच्या निरिक्षणातून त्यांचे पडणारे विविध गट, प्रत्येक रोगामागची खरी कारणपरंपरा आणि निसर्गातील फुलांचे अर्क यांचा एकत्रित उपयोग करून त्यांनी एक नवीन "स्वतःलाच स्वतः बरे करण्याची " उपाययोजना शोधून काढली. हीच ती "फ्लॉवर रेमिडि" किंवा "पुष्पौषधी "!

काय आहे ही पद्धती ?

एकूण ३८ पुष्पौषधी डॉ. बाख यांनी शोधून काढल्या आहेत.
होमिओपॅथीच्या सारख्याच पांढर्‍या साखरेच्या गोळ्यांवर पुष्पौषधींचे थेंब टाकून ही औषधे बनवली जातात. दिवसातून ४-४ गोळ्यांचे ३/४ डोस अशी काहीशी औषधयोजना असते.
प्रत्येक व्यक्ती नुसार, तिच्या त्या त्या वेळच्या गरजेनुसार औषध योजना बदलते. एखाद्या हट्टी अन तापट मुलाच्या हट्टीपणासाठी आणि तापटपणासाठीची उपाययोजना कालांतराने फक्त त्याच्या हट्टीपणापुरती राहू शकते, किंवा कालांतराने यापैकी कोणतेच औषध लागत नाही.
एखाद्या व्यक्टीच्या डिप्रेशनसाठीफक्त २-३ आठवडेच औषध द्यावे लागेल, तर एखाद्या अतिशय हुकूमशाही प्रवृत्तीच्या व्यक्टीला बराच काळ काही औषधांचे काँबिनेशन द्यावे लागे.
प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती अन प्रत्येक घडामोडीनुरूप ही योजना बदलावी लागते. अन त्या साठीच ज्या व्यक्तीला औषध द्यायचे तिची नीट माहिती, तिच्या स्वभावातले बदल, तिच्या आयुष्यातील बदल या सर्वांचा नीट विचार करावा लागतो.

कोण देऊ शकतो ही औषधे?

या ३८ औषधांच्या विविध काँबिनेशन्स ने तुम्ही आपले औषध तयार करू शकता. हो, हो, तुम्ही स्वतःच स्वतः चे डॉक्टर बनू शकता. किंवा अगदी जवळची व्यक्ती, जी तुम्हाला नीट ओळखते ती व्यक्तीही औषधोपचार करू शकते. अर्थात त्यासाठी थोडे कष्ट घेऊन या सर्व थेरपीचा अभ्यास अन काही मार्गदर्शन घावे लागेल हे खरे !

खरच उपयुक्त पडते का ही पद्धती ?
सुरुवातीच्या काळात अर्थातच त्यांच्या या संशोधनाची टर उडवली गेली, तिच्या शास्त्रीयते बद्दल आजही शंका उपस्थित होतात, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांचा मात्र या औषधांवर विश्वास बसतोच.
मुळात ही औषधे/ दुरुस्ती पद्धत/ हिलिंग सिस्टिम ही काही शारीरीक बिघाडासाठी नाही. तर ही पद्धती मनाला उभारी देणारी, स्वभावाला बदलायला उपयुक्त ठरणारी, मनाचा,-बुद्धीचा तोल साधण्यासाठी उपयुक्त ठरते. एका अर्थाने मनःशक्तीचा गेलेला तोल सावरण्यासाठी या औषधांचा खुप उपयोग होतो.
मनःशक्तीला जास्तीत जास्त सकारात्मक बनवण्यासाठी एक सपोर्टींग सिस्टिम म्हणून मला ही थेरपी फार उपयुक्त वाटली.

काही उपयुक्त पुस्तके वा साईटस कोणत्या ?

साईटस :
http://www.bachcentre.com/centre/remedies.htm
http://www.bachflower.com/
http://www.healingherbs.co.uk/
पुस्तके :
Healing Thyself : Edward Bach
पुष्पौषधी भाग १,२,३ : डॉ. माधवी वैद्य
डॉ. बाख यांच्या पुष्पौषधी : सौ. कला चितळे

कोठे मिळू शकतात ही औषधे ?
साधारणतः जिथे होमिओपॅथीची औषधे मिळतात त्या दुकानात ही औषधे उपलब्ध असतात.
पुण्यात कर्वे रोडला नळ स्टॉपच्या चौकात लॉ कॉलेजरोडच्या डाव्या कोपर्‍यात होमिओपॅथीच्या दुकानात ही औषधे मिळतात.

गुलमोहर: 

अवल, उत्तम सुरवात. या औषधांचे काहि साईड इफेक्ट्स आढळत नाहीत, याचे व्यसन लागत नाही, असे वाचल्यासारखे आठवते. ते जर खरे असेल, तर तसे या मूळ लेखात नमूद करणार का ?

हो दिनेशदा ! मी ही असे वाचले आहे, ज्यांच्याकडून ही माहिती मी घेतली त्यांनीही तसे सांगितले आहे. शिवाय याचे डोस इतके कमी असतात, अन वृत्तीत / स्वभावात बदल झाला की ते फार काळ घायची गरजही नसते. त्यामुळे नाही लागनार सवय.

ह्म्म्म... interesting... पण मी मधे बरीच चर्चा ऐकली त्यावरुन असं आढंळलं की होमिओपाथीच्या औषधांवरच शास्त्रज्ञांमधे दुमत आहे. (that's why its called 'alternative' medicine)
कुठल्याही उपचाराला 'औषधी' म्हणायचं असेल तर स्वतःचा अनुभव हा पुरावा ठरत नाही... randomized double-blind studies should show the effectiveness more than placebo effect.
इथे लिहिल्या प्रमाणे पुश्पौषधींच्या बाबतीत हे सिद्ध झालेले नाही.
[मी स्वतःच जरा गोंधळलेलो आहे, कारण मी लहानाचा मोठ्ठा होमिओपथीवर झालोय!!]

सॅमल अनुमोदन. जर केवळ सायकॉलॉजीकल असेल तर अजुन अनेक गोष्टींनी फरक पडु शकेल. त्याकरता याचा एक पॅथी म्हणुन गवगवा (चुकीचा) नको करायला. चिकन सूप सारखा हा ही प्रकार आहे.

काही बेसीक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे: या मागे काय शास्त्र असु शकते? हे खरे असेल तर जास्त मान्यताप्रत का नाही? मोठ्या कंपन्या या मागे का नाहीत? फुलेच का? ३२च का?

होमिओपथी हे एक शास्त्र आहे, त्याचे निष्कर्श सिद्ध केले गेलेले आहेत. फ्ळोवर आणि होमिपथि यांची तत्वे वेगली आहेत. पण शाबुदाना गोळ्या वापरायचे तत्व समान असल्याने यांचा होमिओपथी अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. Happy होमिपथी हे जर शास्त्र नसते तर स्वतंत्र कौन्सिल स्थापायची सरकारला गरज नव्हती.

रँडमाइज स्टडीमध्ये चुकीचे निश्कर्ष मिळणं हे तर अ‍ॅलोपथीबाबतही घडू शकते, त्यामुळे एखाद्या स्टडीवरुन शास्त्र खोटे आहे, असे म्हणता येत नाही.

कुठल्याही उपचाराला 'औषधी' म्हणायचं असेल तर स्वतःचा अनुभव हा पुरावा ठरत नाही

तिथे लिहिणार्याना अनुभव येण्यापूर्वीच हे उपचार औषधे म्हणून सगळीकडे वापरले जातात ना? इथे लिहिणार्‍यानी थोडेच स्वतःच्या १-२ अनुभवावरुन आता या पॅथीला मान्यता द्या असा दावा केलाय?

सॅम, अचिंग अगदी मान्य.
पण येणारे अनुभवही नाकारता येत नाहीत ना ? म्हणूनच मी >>>मनःशक्तीला जास्तीत जास्त सकारात्मक बनवण्यासाठी एक सपोर्टींग सिस्टिम म्हणून मला ही थेरपी फार उपयुक्त वाटली.<<< हे ठळक टाकलय.
कधी कधी मलाच प्रश्न पडतो, आपण आपली बुद्धीची कसोटी खरच सगळ्या ठिकाणी लावतो का अन त्याहून महत्वाचे लावू शकतो का ? Uhoh
सॅम म्हणूनच मला तुमच्या प्रतिसादातला शेवटचा कंसही महत्वाचा वाटतो Happy
अन म्हणूनच ज्याचा फार अपाय होणार नाही अन उपयोग होऊ शकतो अशा ठि़काणी मी माझी बौद्धिक कसोटी जरा जपूनच वापरते Wink
शेवटी जामोप्यांनी म्हटल्या प्रमाणे "फ्लॉवर रेमेडी हा होमिओअपथि अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याशिवाय नॅचरोपथीवालेही यांचाही वापर करु शकतात. इतर लोकही याचा अभ्यास करुन वापर करु शकतात. कोणतेही कायदेशीर बंधन या औषधीना नाही. त्यांचा वापर कुणीही करु शकतो."
अन म्हणूनच हे लेखन मी "लेख " या सदरात टाकलेय, "आरोग्य" या गृपमध्ये नाही टाकले. यातली माहिती वाचा, पटली तर आपल्या जबाबदारीवर प्रयोग करा, नाही तर विसरून जा. हे मी अगदी मनापासून लिहितेय, रागाने नाही Happy
अन त्यासाठीच अगदी लेखाच्या वरती मी तसा डिस्क्लेमर टाकलाय Happy

जाता जाता : आजीबाईंच्या बटव्यातल्या कितीतरी औषधांना आपण औषधंच म्हणातो; त्यांच्यातल्याही कित्येकांची शास्त्रशुद्ध तपासणी नाहीच झालेली की Happy

अवल, चांगली ओळख करून दिली आहेस. कोणत्याही शास्त्राला स्वतःच्या अशा मर्यादा असतात. पुष्पौषधी ह्या पूरक औषधी आहेत. त्यांच्यापासून शरीराला कोणताही अपाय होत नाही. त्यांचा दुरुपयोग होऊ शकत नाही, काळा बाजार / साठेबाजी ही होत नाही. बाखने जे काही वर्गीकरण केले आहे ते वाचल्यावर केवळ अवाक् व्हायला होते. मनुष्यस्वभावाचा इतका सूक्ष्म अभ्यास!! बरं, आणि ह्या औषधांचं आणखी एक आहे... सर्वसामान्य व्यक्तीही आपल्या स्वभावगुण विशेषांनुसार त्यातील स्वतःस योग्य औषध घेऊ / निवडू शकते. ही औषधे घेण्यास / विकण्यास कोणतेही कायदेशीर बंधन नाही. होमिओ औषधांच्या दुकानात ती विनासायास मिळू शकतात. इमर्जन्सीला अतिशय उपयोगी पडतात. इतर कोणत्या शास्त्रीय संशोधनापेक्षा वा निष्कर्षांपेक्षा मला पुष्पौषधींबाबतच्या ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या वाटतात. थोडक्यात, यूजर फ्रेंडली.

अवल,
धन्स ! "फ्लॉवर रेमिडि" किंवा "पुष्पौषधी " याबद्दल उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
जमीनीवर उगवणार्‍या साध्या फुलात देखील माणसाला उपयोगी पडणारी ताकत,एनर्जी असते हे वाचुन या जमीनीला,निसर्गाला पुन्हा पुन्हा सलाम करावासा वाटतो.
Happy

यावनस्पतींची अधिक माहिती घेण्यास मला नक्की आवडेल.

जागोमोहनप्यारे, माझा स्वतःचा होमिओपाथीचा अभ्यास नाही (तसही प्रत्येक मत बनवण्याआधी अभ्यास करणं कसं जमणार?), पण एकंदर वाचन/चर्चा/फ्रान्समधला अनुभव यावरुन जरा गोंधळ उडतो.
तसं भारतात (आणि काही इतर देशात) सोडुन इतर ठिकाणी होमिओपथी alternative medicine आहे. (इथे वाचा)
होमिओपथी बद्दलचे शास्त्रीय संशोधन आणि मत इथे वाचा.
औषधी तत्व नसतानाही काही आजार बरे होण्याची संभाव्य कारणे इथे वाचा.

अवल, तु म्हणतेस तसं जर कमी खर्चात, जास्त रसायनं न वापरता, काही विपरीत परिणाम न होता, माणसाच्या अंतर्गत शक्तीनेच आजार बरा होत असेल (किंवा बरा व्हायला मदत होत असेल) तर वापरावी का? हा कळीचा प्रश्ण आहे. पण वापरलीच तर त्या पद्धतीच्या मर्यादांची नीट माहिती करूनच. (या मर्याला तु लेखात ठळक दिल्या आहेसच)
मला त्याहुन महत्वाचा प्रश्ण हा वाटतो की, ह्या alternative medicine च्या spectrum मधे एका टोकाला होमिओपथी तर दुसर्‍या टोकाला भोंदू बाबा आहेत, रेघ कुठे ओढायची - बौद्धिक कसोटी वापरणं कुठे सुरू करायचं - हे कसं ठरवायचं?
(... आणि मी आपली बुद्धीची कसोटी सगळीकडे लावणं पसंत करतो हे वेगळं सांगायला नको)

>> त्यांच्यातल्याही कित्येकांची शास्त्रशुद्ध तपासणी नाहीच झालेली की
ही चांगली गोष्ट आहे की वाईट? का कुणा दुसर्‍यानी हळदीचे पेटंट घेतले की मग आपण हालचाल करायची? जुने ज्ञान नवीन परिस्थितीत, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून नवीन निकशांवर पारखून घेण्यात काय हरकत आहे. निदान इतर सामाजीक बाबतीत आपण तसं करतोच की.

फ्लऑवर रेमेडीज ची माहिती देणे हाच मूळ लेखिकेचा उद्देश आहे आणी तसे डिस्क्लेमर ही प्रामाणिकपणे टाकलेले आहे त्यबद्दल आभार.

मनःशक्तीला जास्तीत जास्त सकारात्मक बनवण्यासाठी एक सपोर्टींग सिस्टिम म्हणून मला ही थेरपी फार उपयुक्त वाटली.

होमेओपॅथी हेच मुळी बोगस शास्त्र असल्याने त्यावर आधारित बाख रेमेडीज बोगस आहेत हे ओघानेच आलं. पण तरीही कदाचित placebo effect मुळे फरक पडत असेल तर घ्यायला हरकत नाही. विशेषतः डिप्रेशन सारख्या मानसिक कारणात. आपण एखादे औषध घेतोय आणी त्याचा गुण येणार आहे ही भावनाच कधी कधी बरे वाटायला मदत करते.

>>पण एकंदर वाचन/चर्चा/फ्रान्समधला अनुभव
यावर थोडासा प्रकाश टाकणार का? फ्रान्स मध्ये Double Blind Pacebo Controlled Studies झालेल्या आहेत का?

>>मी स्वतःच जरा गोंधळलेलो आहे, कारण मी लहानाचा मोठ्ठा होमिओपथीवर झालोय!!]
हेही विधान बरेच धाडसी आहे. लहानपणापासून एकही अ‍ॅलोपॅथिक औषध, लस, वगैरे घेतलेले नाही काय?

>>होमिओपथी हे एक शास्त्र आहे, त्याचे निष्कर्श सिद्ध केले गेलेले आहेत.
जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत हे सिद्ध झालेले नाहीत. जेम्स रँडीने तर दहा लाख डोलर्स चे बक्षीसच लावले आहे. Avogadro's Number सारखी बारावी मध्ये शिकविलेली संकल्पनाही होमिओपॅथी वाल्यांना माहित नसते.

>होमिपथी हे जर शास्त्र नसते तर स्वतंत्र कौन्सिल स्थापायची सरकारला गरज नव्हती.
भारत सोडता जगात इतरत्र होमिओपॅथी मेलेलीच आहे. भारतात जिवंत आहे कारण लबाड शिक्षणसंस्थांचा स्वार्थ. खेड्यातून आलेल्या मुलांना डॉक्टर व्ह्यायचे आमिष दाखवून होमिओपॅथी ला प्रवेश दिला जातो. आणी सहा वर्षांचा अभ्यासक्रम केल्यावर कुणीही विचारत नाही.

परसात किंवा गॅलरीत फुलझाडे लावून त्यांचा आस्वद घेणे उत्तम.

प्रत्येक देशाचे स्टँडर्ड हे वेगळे असतात. अगदे अ‍ॅलोपथीमध्येही काही औषधे अमेरिकेत बॅन पण भारतात सुरु किंवा वाइस वर्सा ( याला मराठी शब्द काय? ) असू शकतात.. त्यामुळे परदेशात कुणीतरी काहीतरी बॅन करतो म्हनून भारतात ते सगळे बंद करावे असा अर्थ होत नाही.

लोक होमिओपथीची पृअ‍ॅक्टिस करत नाहीत, त्याला कारणे वेगळी आहेत. पण त्याचा आणि होमिओपथीच्या उपयुक्ततेचा काय संबंध? होमिओअपथीची/फ्लॉवरची पृअ‍ॅक्टिस क्लिष्ट असते, आजकाल तर लोक सॉफ्टवेअर वापरतात, त्याने रेमेडी लगेच सिलेक्ट करता येते म्हणे. आता खेड्यापाड्यात कॉम्प्युटर आणि लायसन्स फी भरुन सॉफ्टवेअर आणणार कोण? त्याच्या २५ % पैशात साधी ओ पी डी चालू होऊ शकते. लोकानाही तेच लागते.

बोगस डॉक्टर हे तर सगळ्या पॅथीत आहेत.

अ‍ॅवागाड्रो नंबर..? एवढा लहान आकडा कशाला घेताय? अगदी मिलिग्रॅम , गृअ‍ॅम मध्ये अ‍ॅलोपथी औषधे घेऊनही किती तरी लोकाना इफेक्ट येत नाही..:) त्याचं काय? आणि प्रत्येक गोष्टीत परिक्षानळीत सापडावे एवढे औषध असावेच असे कुठे आहे? प्राणायाम, योगा, ध्यान... यात तरी अ‍ॅवागाड्रो नंबर इतके औषध कुठे असते? Proud मग होमिपथी/फ्लॉवर वाले यानी काय घोडं मारलं आहे? भारत वगळता इतरत्र होमिओपथी मेलेली आहे का माहीत नाही.. आपल्या देशात सुरु आहे ना, मग झाले. अगदी ओ पी नय्यरही संगीतातील कारकीर्द संपल्यावर मुंबईत होमिओपथीची चांगली प्रॅक्टिस करत होते म्हणे..

मी स्वतः अ‍ॅलोपथ आहे.( गैर्ससमज नसावा. Happy ) पण माझाही या शास्त्रावर विश्वास आहे. मला स्वतःला हर्पेस ( नागीण) झाली होती तेंव्हा मी होमिओपथी औषध घेतले होते ( आणि हे औषध मला देणारा माझा मित्र आयुर्वेदिक डॉक्टर आहे! Proud ) अ‍ॅलोपथी काउन्सिल्स, फार्मा असोसिएशन्स यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना आयुर्वेद , होमिओ, योगा इ. वाल्यांच्या पेक्षा फार बलाढ्य आहेत. मागे एकदा आयुर्वेदिक औषधात पारा सापडला म्हनून परदेशात गाजावाजा झाला होता. पण ते औषध पार्‍यापासूनच तयार करतात म्हणे, मग त्यात काय सोने सापडायला हवे होते? नंतर पुन्हा या औषधावरची बंदी उठवली गेली. वैद्यकीय जगतात असे जर्नल्स, स्टडी रोज येत असतात. त्याना कितपत महत्व द्यावे हाही एक प्रश्न आहे. आपल्या देशात त्याला असणारी/नसणारी मान्यता आणि स्टँडर्ड टेक्स्ट बुकची अद्यावत आवृत्ती यापलीकडे कोणत्या गोष्टीना फारसे कायदेशीर महत्व नसतेदेखील. इंटरनेटवरचा अमूक एक स्टडी बघून मी औषध दिले किंवा दिले नाही, असे डॉक्टरला करुन कसे चालणार?

स्किन डिसीज, अ‍ॅलर्जी, लहान मुलांचे वारंवार होणारे इन्फेक्शन्स, श्वसन वा पचन संस्थेचे विकार , मानसिक आजार अशा आजारांवर दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात, तिथे होमिओपथी बर्‍याचदा काम करुन जाते, असा अनेकांचा अनुभव आहे.

खरे तर, कोणत्याही विद्याशाखेच्या डॉक्टरला शेवटचे सहा महिने इतर दोन्ही पॅथीची तोंड ओळख शिकवावी आणि नंतर प्रत्येक डॉक्टरने आपापल्या अनुभवानुसार आपले ज्ञान अद्यावत करावे, अशा मताचा मी आहे. आणि कोणत्याही पॅथीचा कुणीही कितीही अभ्यास केला तरी मानवी शरीर हे आणि आरोग्य हे एक रहस्यच रहाणार आहे.

सॅम >>> त्यांच्यातल्याही कित्येकांची शास्त्रशुद्ध तपासणी नाहीच झालेली की
ही चांगली गोष्ट आहे की वाईट? का कुणा दुसर्‍यानी हळदीचे पेटंट घेतले की मग आपण हालचाल करायची? जुने ज्ञान नवीन परिस्थितीत, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून नवीन निकशांवर पारखून घेण्यात काय हरकत आहे. निदान इतर सामाजीक बाबतीत आपण तसं करतोच की.<<<
मलाही तेच म्हनायचय, की जरी आजीबाईंच्या बटव्यातल्या गोष्टी "सिध्द" झालेल्या / केलेल्या नसल्या तरी त्यांना आपण "औषधे"च म्हणतो ना Happy
आज अ‍ॅलोपॅथी आपण बहुतांशी मान्य केलेली वैद्यकीय पद्धती आहे, कारण त्यात कारण मिमांसा आहे, संशोधन आहे. पण तिथेही अनेकदा झालेले संशोधन अपुरे/ नव्याने झालेल्या संशोधनाने आधी वापरलेली औषधे टाकावू अगदी काही प्रसंगी अपायकारक ठरली आहेत.
मला वाटतं प्रत्येक "शास्त्रा"ची स्वतःची अशी स्वतंत्र कार्यकारण पद्धती असते. आज आपण फक्त पाश्चात्य कारण मिमांसा हीच "शास्त्रीय" मानतोय.
यात काही घोळ आहे का Uhoh
म्हणजे आयुर्वेदात नाडीचिकित्सा ही प्रमाण. पण अ‍ॅलोपॅथित त्याला किती महत्व ?आयुर्वेदात नाडी परिक्षेने होणारे रोग निदान अ‍ॅलोपॅथीत त्यासाठी केल्या जाणार्‍या अनेक तपासण्या...
आता यातले काय "शास्त्रशुद्ध " ? कसे ठरवणार ?
आजही अगदी अचूक नाडी परीक्षा करणारे वैद्य आहेत अन त्या उलट अनेक तपासण्या होऊन रोग निदान न होणे ही आहे. अन अगदी याच्या उलटही आहे. Uhoh
या सगळ्याचा मेळ कसा घालणार?
माझ्यापुरते मी शोधलेले उत्तर म्हनजे : ज्या "शास्त्रा" चा विचार करतोय, त्याच शास्त्राच्या कारणमिमांसा वापरायच्या. म्हणजे आयुर्वेदाचा विचार असेल तर तो पारंपारीक हिंदू ( इथे धर्म नाही प्रदेश अभिप्रेत) कारणमिमांसा वापरायची. तर अ‍ॅलोपॅथीचा विचार करायचा तर पाश्चात्य कारणमिमांसा पद्धती वापरायची.

स्वप्ना, ही रेमिडी म्हणजे मानसिक आजारांवर औषध नाही तर एका अर्थाने स्वभाववर औषध आहे. कोणत्याही शाररीरिक आजारात शाररीरिक व्याधी दूर करण्यासाठी अ‍ॅलोपॅथीच/ मान्यता प्राप्त वैद्यकीय प्रणाली वापरावी, पण त्या काळात मानसिक आधारासाठी ही पुष्पौषधी सपोर्टींग ठरू शकते. म्हणजे एखादी मनाने कणखर व्यक्ती एखाद्या आजारात नीट पणे तोंड देउ शकेल अन तिचा आजार त्यामानाने लवकर बरा होऊ शकेल. परंतू मनाने दुबळी व्यक्ती अशाच आजारात तेव्हढ्याच छान पद्ध्तीने तोंड देऊ शकेलच असं नाही. अशा वेळेस जर तिला या पुष्पौषधींचा आधार मिळाला तर अशी मनाने दुबळी/ हळवी व्यक्तीही आजाराशी नीट तोंड देऊ शकेल Happy
जागू, थोडी सविस्तर माहिती लिहेन. पण ज्यांना खरोखर या विषयात इंट्रेस्ट आहे, त्यांना मी विनंती करेन की वर सांगितलेल्यातले "डॉ. माधवी वैद्य यांचे पुष्पौषधी : भाग १, रु. १४०, नंदिनी पब्लिकेशन, पुणे" हे पुस्तक मिळातून वाचावे. यात त्यांनी या फुलांची नावे, फोटो, व्यक्तींचे गृप, औषधोपचार या स्र्वांची खुप छान अन सोपी माहिती दिली आहे. कोणत्याही होमिओपॅथीच्या दुकानात ते उपलब्ध होईल. ज्यांना हे उपलब्ध होणार नाही, परंतु ते हवेच आहे असे वाटत असेल त्यांनी मला संपर्कातून कळवावे. मी पुण्तातून घेउन पाठवू शकेन. Happy

डॉ. बाख यांनी शोधलेल्या पुष्पौषधींती फुलांची नावे :
१.अ‍ॅग्रीमनी, २.आस्पेन, ३. बीच, ४.सेंटॉरी, ५.सिरॅटो, ६.चेरी प्लम, ७.चेस्ट नट बड, ८.चिकरी, ९.क्लेमॅटिस, १०.क्रॅब अ‍ॅपल, ११.एल्म, १२.जेंटीयन, १३.गॉर्स, १४.हीदर, १५.हॉली, १६.हनीसकल, १७.हॉर्नबीम, १८.इम्पेशन्स, १९.लार्च, २०.मिम्युलस, २१. मस्टर्ड,२२. ओक,२३. ऑलिव्ह, २४.पाईन, २५.रेड चेस्ट नट, २६.रॉक रोज, २७.रॉक वॉटर, २८.स्क्लेरँथस, २९.स्टार ऑफ बेथलहेम, ३०.स्वीट चेस्ट नट, ३१.व्हरव्हेन, ३२.व्हाईन, ३३.वॉल नट, ३४.वॉटर व्हॉयलेट, ३५.व्हाईट चेस्ट नट, ३६.वाईल्ड ओट, ३७.वाईल्ड रोज, ३८.विलो आणि ३९. रेस्क्यू रेमिडी ( यात वरील पैकी पाच- स्टार ऑफ बेथलहेम, रॉक वॉटर, इंपेशन्स, चेरी प्लम आणि क्लेमॅटिस औषधे एकत्रीत केलेली आहेत )

अवल, वर disclaimers दिलेस यावरुन तुझी sincerity दिसते. ते योग्यच आहे. पण skepticism मध्ये एक पाऊल पुढे जायला हवे.

मनला मदत होऊ शकते हे खरेच. पण समजा कोणाला कळले की हे खरे नाही पण मनाला मदत होऊ शकते. तरी मग होईल मदत? की अंधारातच ठेवणे योग्य? दूसरे असे की आपले शरीर हे लाखो वर्षांच्या प्रक्रीयेतुन उत्क्रांत झाले आहे. अनेक गोष्टी आपसुक बर्या होतात. काहि गोष्टी औषध योग्य असेल तर तुमचा विश्वास नसला तरी, तुम्ही कमकुवत मनाचे असलात तरी बर्या होतात. काळ हे तर सर्वोत्तम औषध आहेच.

अशा पॅथींच्या मागे लागण्याचा एक तोटा हा की ज्यांचा जरा जास्तच विश्वास बसतो ते काही झाले तरी हीच औषधे वापरुन बरे व्हायचा प्रयत्न करणार व ते योग्य नाही. नाहीतर मनाला बरे वाटावे म्हणुन लोक नाही नाही त्या गोष्टी करतातच की.

अचिंग, मलाही या बाबत खुप शंका आहेत. या निमित्ताने जर त्या दूर करता आल्या तर पाहू.
मुळात मी ही पूर्वी होमिओपॅथीच्या विरोधात होते. काय साखरेच्या गोळ्या म्हनायचे. पण माझ्या अन त्याहूनही लेकाच्या लहानपनातल्या सर्दी, ताप अन खोकल्यावर मी खरोखर अ‍ॅलोपॅथी ( अगदी नॅब्युलायझरपर्यंत- पुण्यातल्या एका प्रतिथयश नावाजलेल्या डॉक्टरांनी प्रिस्र्काईब केल्याने ) अन आयुर्वेद ( अगदी काढा-निकाढ्यापर्यंत ) उपाय केले. पण दोन्हींनी मला रिझल्ट्स दिले नाहीत Sad त्याचू सर्दी, ताप ( अगदी ३ पर्यंत ) , खोकला चालूच राहिला. उलट होमिओपॅथी मुळे काही प्रमानात का होईना त्याची ताप अन खोकला आटोक्यात आला. अन या सर्व आजारातून तो बाहेर पदला ते पोहण्याच्या व्यायामातून Happy
माझ्या पुष्पौषधीचे अनुभव यात लिहिलेल्या अवस्थेतून मात्र मला फक्त पुष्पौषधींनीच मदत केली. मी खरोखर बुद्धीवादी आहे रादर जरा जास्तच तार्कीक आहे. पण तरीही माझा अनुभव मला हे सत्य स्विकारायलाच लावतोय Happy त्या कालात मी खुप प्रयत्न करूनही त्यातून नुसती नाही बाहेर येऊ शकले. मला इथे असं म्हणायचय की मनाला फसवून नाही तर खरा आधार देउन हे घडले असं मला वाततं. अर्थात हा खुप खुप वैयक्तीक अनुभव आहे. पण मला स्व्तःलाही हे अजून स्पस्ट करून घायचय ..... Happy
तू खुप जेन्युईनली मला समजावून घेतलेस , मनापासून धन्स Happy अजून मदत करशीलच ...

ही पुष्पौषधी अगदी लहान मुलांसाठीही फायदेशीर व परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. तान्ह्या बाळांनाही ही औषधे देता येऊ शकतात. ह्या लहान मुलांना तर औषध दिले जाते आहे हेही कळत नाही, कारण पुष्पौषधी ज्याप्रमाणे साबुदाण्यासारख्या ग्लोब्यूल्स मधून दिल्या जातात त्याचप्रमाणे त्यांचे टिंक्चर ही उपलब्ध असते... हे टिंक्चर किंचित कोमट पाण्यात ठराविक थेंब घालून देता येते. त्यात तर पाण्याची चव/ रंगही जास्त बदलत नाहीत. अशा प्रकारांत औषध घेतल्यावर ह्या लहान मुलांच्या तक्रारी दूर झाल्याची मी स्वतःच्या नात्यात उदाहरणे पाहिली आहेत.

तसेच अ‍ॅलोपॅथीची अनेक वर्षे यशस्वी किंवा ज्याला रोअरिंग प्रॅक्टिस म्हणता येईल, अशी प्रॅक्टिस करणारे काही डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथीच्या लिमिटेशन्समुळे व काही रोगांवर अ‍ॅलोपॅथीत ठोस किंवा पूर्णतः बरे करणारे उपचार नसल्यामुळे होमिओपॅथी, अ‍ॅक्युपंक्चर, पुष्पौषधी अशा अल्टर्नेटिव्ह मेडिसीनकडे वळले असून आवश्यक तिथे ह्या उपचार पध्दतींचा अवलंब करत असल्याचे माझ्या पाहण्यात आहेत. त्यांच्या पेशंट्सना ते त्या त्या आवश्यकतेनुसार औषधे देतात.

अवल, तुझा दृष्टिकोन तू व्यवस्थित मांडलाच आहेस (डिस्केमर वै). हा विषय असा आहे की फक्त प्रतिसादातून चर्चा करणं माझ्यासाठी अवघड आहे (फार मोठ्ठे आणि सविस्तर लिहावं लागेल Sad ). पण खालील विचार मला फार घातक वाटतो. त्यामुळे त्याबद्दल फक्त थोडं लिहितो...
>> आज आपण फक्त पाश्चात्य कारण मिमांसा हीच "शास्त्रीय" मानतोय.
शास्त्रीय दृष्टिकोन हा एकच असतो, तुम्ही काय पडताळून पहाताय यानुसार तो बदलला तर जगात सगळ्याच गोष्टी सिद्ध होतील. हे समीकरण घे, निरोगी शरीर + आजार + औषध = निरोगी शरीर
यात औषध हे अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, पुष्पौषधी, चायनीज मेडिसीन, रेकी, वू-डू काहीही असेल तरी प्रत्येकाचा परिणाम randomized double blind tests वापरून तपासता येईलच.... त्या पद्धतीची तत्व काहिही असो.

नाही सॅम, माझे मत थोडे वेगळे आहे.
म्हणजे आपण पाश्चात्य शास्त्रीय पद्धतीने जर आयुर्वेदाची चिकित्सा करू लागलो तर मग सगळे आयुर्वेद चुकीचेच ठरेल . कारण मुळात नाडी परीक्षा हीच या पाश्चात्य शास्त्रीय संकल्पनेत बसत नाही.
माझा म्हणण्याचा दृष्टिकोन हा आहे की ज्या त्या थेरपीचा उहापोह ज्या त्या कारणमिमांसेने करावा. एका शास्त्राची कारणमिमांसा पद्धतीने दुसरे शास्त्र तपासू नये इतकेच मला म्हणायचे आहे.

छान माहिती अवल, धन्यवाद.
कोणत्याही 'पॅथी'चे उपचार घेताना, त्यावर विश्वास असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कोणत्याही औषधोपचाराकडे साशंकतेने पाहिलं की त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. पुष्पौषधी, होमियोपथी ह्याबद्दल आमचे वैयक्तिक अनुभव एकदम पॉझिटिव्ह आहेत.

अवल, शास्त्रीय पद्धत एकच असते. कोणत्याही शास्त्रीय प्रयोगाकरता (कोणत्याही प्रयोगाकरता ) ती अवलंबीता येते. प्रयोग अर्थातच भिन्न असु शकतात.

वरती साम आणि अस्चीग जे म्हणताहेत ते पटत जरी असलं तरी.. ठीक आहे आत्ता नाहीये डेटा पण.. थोडे अजून वर्ष थांबलात तर हळदी सारखे बाकी गोष्टींचे पण पेटंट घेतील , आत्ताशी तर त्यांना म्हणजे पाश्चात्य लोकांना (सिद्ध करणारे तेच आहेत न सध्या) ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होतेय. आणि आत्ता कुठे सूर बदलतोय कि अल्टर नेट मेडिसिन आहे (मला स्वतःला आणि मुलांना इथले डॉक्टर तुम्ही कुठले घरगुती औषध देता हे विचारून पुढच्या वेळेस आवर्जून विचारतात कि ते पण घेताय न, आम्ही बसून तार्तिक चर्चा करतो कि नक्की त्याने काय होत असेल.. माझी पिडीयात्रीशियन चक्क मला तेवढा वेळ पण देते ) . आणि ते वापरायला पाहिजे.

हे खरच घातक असेल (म्हन्जे हे "शास्त्रीय" नाहीये ) तर सगळ्या जगातले आजीचे बटवे अमेरिकेत का यायला लागलेत (मला इथले माहिती आहे म्हणून बाकी हि सगळी कडे असतीलच) .. होल फुड्स किवा तत्सम स्टोअर मध्ये तुलसी टी पासून आफ्रिकेतल्या कुठल्या फळांपासून हे आणि ते बरं होतंय आणि खरच फरक पडतोय म्हणून त्याची मागणी वाढत चालली आहे .. कि फक्त मार्केटिंग strateji आहे.. नवीन काही तरी देवून लोकां कडून पैसे उकळायचे.. ?? हे पण प्रश्न विचारले पाहिजे तेव्हा फेयर चर्चा होईल न .. नाही तर हे पण एकांगी नाही वाटत का .. साम तरी म्हणताय कि मी स्वतः confused आहे तो पण डिस क्लेमर च आहे.. किवा तुम्ही खोडू शकता.. कि त्यांच्या आई वडिलांची चोइस होती म्हणून..

अशा पॅथींच्या मागे लागण्याचा एक तोटा हा की ज्यांचा जरा जास्तच विश्वास बसतो ते काही झाले तरी हीच औषधे वापरुन बरे व्हायचा प्रयत्न करणार व ते योग्य नाही. नाहीतर मनाला बरे वाटावे म्हणुन लोक नाही नाही त्या गोष्टी करतातच की>>तो तर मनुष्य स्वभाव आहे न .. "अलो पथी" च्या मागे लागणारे हि लोक आहेत .. शिकले सवरलेले पण पेशंट आहेतच न ज्यांना सरळ distil water ची इंजेक्ष्ण द्यावं लागतं आणि tyat हि pratyek जन त्याच tritment मुळे बरे झाले असे तर नाहीचेय न..

मानसिक रोगांसाठी तरी सध्या जी काही "अलो पथी" औषध आहेत ती कोणी बघितली असतील त्यांचे अपायकारक परिणाम बघितले असतील तर हे बरंच म्हणायला पाहिजे इतके भयंकर त्यातले कंतेन्स आहेत. मी हे घरात खूप जवळून बघितले आहे..योगायोग म्हणा किवा चुकून म्हणा ते दोघे हि स्वतः अलो पथी डॉक्टर होते.. त्याची व्यसने लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहेत.. त्यातून किती लोक बरे होतात आणि खरच निरोगी म्हणून जगतात ह्याची मला तरी शक्यात खूप कमी दिसते.. हा तुमच्यात जगायची जिद्द असेल किवा वर अवल म्हणतेय मानसिक रीत्य तुम्ही strong असाल तर ठीक आहे.. त्यातून बाहेर पडाल हि.. असो तर त्यातले एक जन पुष्पौषधी मुळे बाहेर आले पण दुसरे काही प्रमाणातच ..
(नवरा इथे उसगावात manufacturing मध्ये काम करतो तिथे जे काही वर्कर्स बघितले ते लोक जे डिप्रेशन किवा तत्सम गोष्टींसाठी औषध घेतात आणि त्यांचे जे काही प्रोब्लेम्स ऐकले ते बघून मला तरी त्यांची खूप दया येते आपल्याला तरी दुसरे पर्याय उपलब्ध आहेत. )

त्यामुळे अकु ने लिहिलेलं जास्त पटतं ह्या औषधी 'पूरक' आहेत.. दोन शास्त्र एकमेकांना पूरक होवू शकतात न... नाही तरी अवल ला आलेला अनुभव .. त्यासाठी अजून काय करता आले असते.. .. त्यावर जनरल प्रक्तीशणर ने काय केले असते.. sagale रिपोर्ट नॉर्मल आले असते.. saykologist हे kaunselar swarupat astat न.. ते फक्त bolun kadhun घेतात न.. साय्कीयात्रिस्त म्हणजे शास्त्रोक्त डॉक्टर न.. कडे अवल का गेली असते.. तिला काय मानसिक रोग नाहीये .. फक्त एका घटनेमुळे झालेला मनस्ताप आहे.. अस्चीग म्हणतात तसं योग्य औषध (???हे किती वेळा होतं..),काळ हा उपाय आहे...तेवढी तुमची थांबायची तयारी असते.?? माझ्या १.५ - २ वर्षाच्या ब्रोन्कालाय्तीस jhalelya mulakade मी baghat basel प्रत्येक वेळेस?? नेब्युलाय्झार ने सुद्धा आटोक्यात येत नाहीये म्हटल्यावर पण ?? तेच जर काढे देवून कमी व्हायला मदत होत असेल तरी सुद्धा?? होमियो ने होतंच नाही म्हटल्यावर सुद्धा.?? मी जे काही "३-४" वर्ष सहन केलंय त्याच्या तब्येती मुळे ते जर मला भारतात जावून कमी/गयब करता आलं असतं तर .. प्लीजच पटेल असं बोला.. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण पण मला ते आदर्शवादी वाटत भारतातच काय इथे हि ..

प्रित, अगदी अगदी Happy खरच जो त्या अनुभवातून जातो त्याला जास्त पटू शकतं .
>>>aschig | 7 June, 2011 - 00:27 नवीन
अवल, शास्त्रीय पद्धत एकच असते. कोणत्याही शास्त्रीय प्रयोगाकरता (कोणत्याही प्रयोगाकरता ) ती अवलंबीता येते. प्रयोग अर्थातच भिन्न असु शकतात.<<< या बाबत मी स्वतंत्र काही लिहू म्हनते, तिथे घालूयात गोंधळ Wink
पण माझे मत मांडतेच इथेही.... "गृहितक -> पडताळणी -> नियम -> प्रयोग -> सिद्धान्त " फक्त याच पद्धतींतून मिळालेल्या ज्ञानाला आपण "शास्त्र" समजतो. खरच के किती खरं ?( ते म्हणजे विज्ञान -सायन्स असेल पण शास्त्र ? ) आजही "सायकॉलॉजी" सारख्या "शास्त्रात" कितीतरी "सिद्धांत" अजून प्रायोगांनी सिद्ध करता आलेले नाहीत ( कारण मानवावर हे प्रयोग करताच येत नाहीत.) मग तिथे आडाखे, अनुभव आणि संदाज यावरच "सिद्धांत" ठरतात . मला नक्की माहिती नाही पण मागे कधीतरी एका शास्त्रज्ञाच्या लेखात वाचलेले आठवतेय... अ‍ॅटम अजून कोणीच "प्रत्यक्ष डोळ्यांनी" पाहिलेला नाही.तो 'बौद्धिक तर्काने" सिद्ध झालाय.
यात कोठेही हलक्या स्वरुपाची चेष्टा मला जरासुद्धा अभिप्रेत नाही. खरच आपण या सर्वाचा खुप जाणीवपूर्वक अन डोळसपणे विचार करावा असं वाटू लागलय. अन वर मी जे जे "शब्द" वापरलेत ते अतिशय काळजी पूर्वक आणि जाणीवपूर्वक वापरलेत.....

Pages