माझ्या आठवणीतील मायबोली - adm

Submitted by Adm on 14 September, 2021 - 13:47

'माझ्या आठवणीतली मायबोली' हा लेखन उपक्रमाचा बाफ पाहिला तेव्हा सर्वप्रथम जाऊन माझा सदस्यत्वाचा कालावधी बघितला. तब्बल १६ वर्षे! इतकी वर्षं इथे काढली हे जाणवलंच नाही. २००५ साली सेंट लुईसला आल्यावर जेव्हा १२ महिने २४ तास इंटरनेट हाती लागलं, तेव्हा कधीतरी मराठी वाचायला मिळतंय का म्हणून शोधलं तर मराठी ब्लॉगविश्व सापडलं. तेव्हा ब्लॉगिंग हे माध्यम नवीन होतं आणि मराठीतलं ब्लॉगिंगतर फारच नवीन होतं. मराठी ब्लॉग वाचताना कधीतरी 'मायबोली'चा शोध लागला. तेव्हा गुलमोहोरातल्या कथा / लेख वगैरे नियमित वाचायला लागलो. तेव्हा त्या सुप्रसिद्ध 'ट्री व्ह्यू' बद्दल काही माहीत नव्हतं पण एकदा 'माझ्या गावात' मधल्या पार्ले बाफावर जाऊन पोहोचलो. अमेरिकेतल्या दिवसा 'पार्ले' बाफावर गप्पांचा अड्डा कसा काय असे प्रश्न पडले पण नंतर नियमित गप्पा वाचल्यावर समजलं की बरीच मंडळी ही अमेरिकेतलीच आहेत! तेव्हा पार्ल्यात लालू, सिंडरेला, सायो, सशल, अमेय देशपांडे (आणि त्याच्या शेजारणीने दिलेला डबा), शोनू, स्वाती आंबोळे, चाफा, असामी, हवाहवाई, मैत्रेयी वगैरे मंडळी नियमीत असायची. काठावर बसून त्यांच्या गप्पा वाचायला मजा यायची.

त्याचवेळेला 'नंदिनी' मायबोलीवर नवीन आली होती आणि तिची 'रेहान' या व्यक्तिरेखेबद्दलची पहिली कथा खूप गाजत होती. ती कथा मलाही आवडत होती आणि मी पुढच्या भागाची वाट बघायचो. तश्यातच 'अज्जुका' नंदिनीला काहीतरी घालूनपाडून बोलली आणि नंदिनीने 'आता मी पुढे लिहिणार नाही' असं लिहिलं. तेव्हा मी नंदिनीच्या बाजूने त्या वादात उडी घेऊन अज्जुकाशी जोरदार वाद घातला. ती सगळी माझी मायबोलीवरची पहिली काही पोस्ट्स. नंदिनीची बाजू घेण्यात माझा स्वार्थ हा की मला ती कथा वाचायची होती. नंतर तो वाद जुन्या मायबोलीवरील 'लिखाणावरील प्रतिक्रिया' ह्या बाफावर हलवला गेला आणि नंदिनीने कथा पूर्ण केली. नंतर मी पार्ल्यात गप्पाही मारायला लागलो. लालू, शोनू ह्यांच्याशी सुरुवातीला काही जुजबी बोलणं झाल्याचं आठवतंय. तिथे पुस्तकांची देवाण-घेवाण चालते असं कळलं. एकदा बिचकत बिचकत कोणी 'कोसला' पुस्तक पाठवू शकेल का असं विचारलं. तेव्हा शोनूने तत्परतेने कोसला आणि अजून तीन-चार पुस्तकं मला सेंट लुईसला पाठवली होती. तेव्हा फार भारी वाटलं होतं. पुढे पार्ल्याने अनेक पिढ्या बघितल्या, पार्ले जाऊन टीपापा झालं पण वर लिहिलेले बरेच आयडी अजूनही तिथे नियमित आहेत! (टीपापातल्या वयाच्या दृष्टीने अजून हाफचड्डीत असणारे हल्लीचे आयडी उगीच येऊन 'पार्ले स्पिरिट' वगैरे फंडे झाडतात ते मात्र मला आवडत नाही!). तेव्हा माझ्या भारत अमेरिका वार्‍या सुरू असायच्या. भारतात गेलेलो असताना 'सिंहगड रोड' बाफावर भारतातल्या दिवसा मजा चालायची. तिथेही मी टाईमपास करायचो. पुढे गडावरचं पब्लिक 'पुण्यातले पुणेकर' बाफावर गेलं आणि गड बंद पडला. पुपुवर मात्र मी वाचनमात्र असायचो. कारण बर्‍याचदा तिथले विनोद मला कळायचेच नाहीत आणि पुढे पुपुवर बरेच नियम संकेत-बिंकेत आले. पण गडावरच्या काही मंडळींशी नियमीत संपर्क मात्र आहे.

पुढे बीजिंग ऑलिंपिक तोंडावर आल्यावर मुकुंदने लेखमाला लिहायला सुरूवात केली आणि मी क्रीडाविभागातही रमायला लागलो. 'Views and Comments' ह्या विभागाचा शोध लागला. त्यात मी फार अ‍ॅक्टिव्ह सहभाग घेतला नाही पण नियमितपणे वाचायचो. त्यातले काही गाजलेले आणि लक्षात राहिलेले बाफ म्हणजे 'पुरूष जन्मा ही तुझी कहाणी', 'मनातल्या भावना', नाव आणि प्रतिमा, माझ्यात दडलेलं लहान मुल', पुढे नवीन मायबोली आल्यावर तो गृप आणि ग्रुपात वाला सुप्रसिद्ध बाफ, जगबुडी बाफ. नंतर एकदा हवाहवाईचे कवी आणि कवितांचे स्टॅटिस्टिक्स दिले होते तो बाफही खूपच गाजला होता. 'स्त्रियांसाठी जाचक आणि खटकणार्‍या प्रथा' हा बाफही प्रचंड वाहवत गेला होता. ह्यावरून पुढे झक्कींनी पार्ल्याक्कांना 'जाचक आणि खटकणार्‍या स्त्रिया' असं म्हटल्याचं आठवतय. पुढे सारेगमप लिटील चॅम्स बाफवर माझा आणि दीपांजलीचा वाद झाला होता आणि मग मैत्रेयीच्या आंब्याच्या शिर्‍याने तो मिटला होता! त्याकाळात 'बाथरूममध्ये जाऊन रडणे', 'जागच्या जागी मरून पडणे', 'एकट्या माणसाने करायचे उद्योग', 'टडोपा' वगैरे वाक्प्रचार भलतेच प्रसिद्ध झाले होते आणि पार्ल्यात त्यावरून खूप टिंगल-टवाळ्या झालेल्या आठवतायत. वाद आणि गंमती-जमती ह्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे त्यामुळे आता सरळ प्रश्नांनाच हात घालतो.

१. तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले ? ह्या विषयावरच्या काही लेखांमध्ये असं वाचलं की मायबोलीवर तांत्रिक बाबी वगळता काहीही बदललेलं नाही. मला तसं म्हणणं खूपच भाबडेपणाचं वाटतं. पंचवीस वर्षात माणसांचे स्वभाव बदलतात, देशाची दिशा बदलते तर मायबोलीचं काय घेऊन बसलात, ती ही बदलणारच! मायबोलीच्या एकंदरीत धोरणात मलातरी बदल जाणवले. चांगले का वाईट, चूक का बरोबर ह्यात न शिरता मला जे दिसलं/वाटलं ते सांगतो (हे दिसणं/वाटणं चुकीचं असू शकेल ह्याची जाणीव आहेच).

१) २००८ च्या गणेशोत्सवापासून मायबोलीवर बाहेरील मान्यवरांचं लिखाण यायला सुरूवात झाली. आशा भोसले ह्यांच्या वाढदिवसानिमित्त लेख / अभिवाचन होतं. पुढे २००८ च्या दिवाळी अंकात 'तारांकित' हा अख्खा विभागच मान्यवरांच्या लेखनासाठी होता. अधेमधे विशेष प्रसंगीही असं लेखन येत असे. आजच्याइतकी समाजमाध्यमं फोफावलेली नसताना असं लेखन आणि दृकश्राव्य कार्यक्रम वाचायला / ऐकायला मिळणं हे अप्रुपाचं होतं. पुढे मायबोलीने 'माध्यम प्रायोजक' हा उपक्रम सुरू केला. या सगळ्याचा मायबोलीला 'पेज हिट्स' वाढवण्यासाठी नक्कीच फायदा झाला असणार पण मान्यवर लेखकांच्या सहभागाचे काही तोटेही होते. या उपक्रमांवर येणार्‍या प्रतिक्रियांवर प्रशासनाची जास्तच नजर असे. विशेषतः माध्यम प्रायोजक उपक्रमात असलेल्या चित्रपटांबद्दल किंवा उपक्रमांबद्दल तसेच मान्यवरांच्या लिखाणाबद्दल थोड्याही नकारात्मक प्रतिक्रिया आल्यावर प्रशासनातल्या व्यक्ती हिरीरीने वाद घालायच्या, काही वेळा फोन करून असे प्रतिसाद बदलायलाही सांगितले जायचे (मला स्वतःला एकदा असा फोन आला होता). कधीकधी अश्या नकारात्मक प्रतिक्रिया परस्पर उडवल्या जायच्या. अजून एक म्हणजे मायबोलीवरच्या नवोदित लेखकांचं लिखाण आणि हे मान्यवरांचं लिखाण यातली तफावत दिवाळी अंकांसारख्या उपक्रमात जास्तच जाणवायची. त्यामुळे लोकांच्या दिवाळी अंकाकडून असलेल्या अपेक्षा बदलत जाऊन आणि मग मायबोलीवरच्या लेखकांकडून आणि वाचकांकडून प्रतिसाद मिळणं कमी होऊन पुढे त्याची परिणिती अंक बंद पडण्यात झाली असं मला वाटतं. मायबोलीचे पूर्वी टीशर्ट निघायचे. त्यातल्या एकाचं डिझाईनही एका मान्यवरांकडून करून घेण्यात आलं होतं आणि निदान मी घेतलेल्या सगळ्या टीशर्ट्स पैकी तो सगळ्यांत बोअर टीशर्ट होता! (तोच तो 'मयबेली' वाला). त्या डिझाईन बद्दल मायबोलीकरांनी सुचवण्या केल्या होत्या पण (डिझाईन मान्यवरांनी केलेले असल्याने) त्या नाकारण्यात आल्या. मायबोलीकरांद्वारे चालवले गेलेले लक्षात राहिलेले काही उपक्रम म्हणजे गझल कार्यशाळा, मायबोलीकरांच्या कविता छापलेले बुकमार्क, मायबोलीकरांनी टीशर्ट आणि इतर गोष्टींवर केलेली सुलेखनं, मायबोली शीर्षक गीत. बाहेरच्यांशिवाय हे असे उपक्रम होऊ शकतात हेच ह्यातून दिसतं. इथून सुरुवात केलेले लोक पुढे जाऊन बाहेर 'मान्यवर' होतात ते जास्त अभिमानास्पद आहे!
पुढे मायबोलीवर लिखाणाच्या स्पर्धा घेऊन त्यांना बाहेरचे परीक्षक नेमले. हा उपक्रम मला आवडला होता कारण ह्यात लिखाण हे मायबोलीकरांद्वारेच केलं गेलं होतं आणि स्पर्धा मान्यवरांशी नव्हती. लेखकांना लिहीण्यासाठी उद्द्युक्त करण्यासाठी आणि नवीन 'कंटेट' निर्माण करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम उपयुक्त होते. गेल्या काही वर्षांत मान्यवरांच्या सहभागाने उपक्रम झालेले दिसले नाहीत तसच त्यांचं लेखनही दिसलं नाही त्यामुळे त्याबाबत मायबोलीचं धोरण आता बदललं असावं.
पूर्वी मायबोलीवर पुस्तकांसाठी खरेदी विभाग होता, तो बरीच वर्षं बंद पडलेला आहे.
एकंदरीत 'मायबोली.कॉम' ची 'प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी' काय ह्यावर हे धोरणांबद्दलचे निर्णय ठरत असावेत असं वाटतं. पण धोरणांमध्ये बदल होत असतात हे मात्र नक्की.

२) मायबोलीवरच्या उपक्रमांमध्ये मराठीत केलेलं लेखनच असावं असा निर्णय अलिकडेच वेबमास्तरांनी दिलेला पाहिला. पूर्वी एका उपक्रमात पूर्ण इंग्रजीतला लेख आला होता आणि त्या उपक्रमाच्या मुख्य संयोजकांनी तो लेख घेणं कसं रास्त आहे हे हिरिरीने मांडलं होतं आणि तेव्हा प्रशासनाने कुठलीही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे धोरणातला हा बदल स्वागतार्ह आहे.

३) मायबोलीवरच्या उपक्रमांची संयोजक मंडळे ठरवण्यामध्येही कालपरत्वे बदल होते गेले. गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर २००७ पासून गणेशोत्सव नव्या मायबोलीत व्हायला लागला. अर्थात त्या वर्षी इतर बाफ जुन्याच मायबोलीत असल्याने उत्सव बघायला ये-जा करावी लागायची. पण २००८ साली मात्र जवळजवळ संपूर्ण मायबोली नवी झाली होती. त्यामुळे तो नव्या मायबोलीतला पहिला कार्यक्रम म्हणायला हरकत नाही.
पूर्वी गणेशोत्सवासाठीही मुख्य संयोजक नेमला जायची पद्धत होती. रूनी, पन्ना, आडो, मामी ह्या काही मुख्य संयोजक आठवत आहेत. पण आता मात्र मुख्य संयोजक नेमला जात नाही. मंडळं त्यांचं ते बघून घेतात.
दिवाळी अंक मात्र जास्त प्रतिष्ठेचा होता! त्यामुळे प्रशासनाद्वारे आधी मुख्य संपादकाची निवड केली जाऊन मग हे मुख्य संपादक स्वत:चे निकष वापरून मंडळ निवडत असत. पुढे 'संपादक मंडळात कोणाला काम करायचं आहे?' असं विचारणारा बाफ काढला जात असे पण मंडळात मात्र त्यावर नसलेलीच नाव निवडली जात. त्या पद्धतीला मी आक्षेप घेतला होता. (कारण अर्थातच माझी मंडळात निवड झाली नव्हती म्हणून!). अजूनही कोणी घेतला असेल तर माहीत नाही. कोणत्याही निमित्ताने का असेना पण पुढे मात्र ती पद्धत बदललेली दिसली. नंतर बहुतांशी सगळी नावं त्या बाफावरचीच दिसायची. अगदी सुरूवातीच्या वर्षांमध्ये मु.सं. कोण हे जाहीर होत नसे. ती पध्दत बहुतेक २००७ साली सुरू झाली. २००९ पर्यंत मु.सं. हा अमेरिकेतलाचा हवा अशी अलिखित अट होती असं ऐकलं आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे अ‍ॅडमिन आणि वेमांना तांत्रिक बाबी हाताळणं वेळेनुसार सोयीचं जावं. पण नंतर फोन / चॅट करणं सोपं झाल्याने ती पद्धत बदलून २०१० साली पहिल्यांदा भारतातली मु.सं. होती. मराठी भाषा दिवसाच्या संयोजनात मी एकदाच काम केलं आणि त्याही वेळी कोणी मुख्य संयोजक नव्हतं. त्यामुळे आताच्या गणेशोत्सवाप्रमाणे तिथेही मुख्य संयोजकाची प्रथा नसावी असं वाटतं. मध्यंतरी 'स्वयंसेवक व्यवस्थापक' असं पद काढून ती जबाबदारी रूनीला दिली होती पण नंतर ते बंद पडलं आणि अ‍ॅडमिन स्वत:च मंडळं ठरवायला लागले.
मध्यंतरी काही वर्ष भारतात मायबोलीचे पदाधिकारी होते पण हल्ली ते ह्या पदांवर नाहीत असं ऐकलय.

३) चर्चांबद्दल म्हणायचं झालं तर हल्ली कुठल्याही चर्चा ह्या राजकारण, राजकीय पक्ष आणि जात ह्यांच्याभोवतीच फिरतात! अगदी कुठलाही विषय तिकडे वळवण्यात काही आयडी पटाईत आहेत. त्यातून अजून सुटलेला विभाग म्हणजे क्रीडा विभाग. राजकारणासंबंधित बातम्यांच्या काड्या काही विद्वान तिथे टाकत असतात पण अजून त्यांना म्हणावं तसं 'यश' लाभलेलं नाही! पूर्वी म्हणजे निदान २०१० पर्यंत चर्चा बर्‍याच संयत आणि सखोल होत असत असं वाटतं.

४) २०१० ते साधारण १६-१७ दरम्यान कॉपीराईट कायद्याबद्दल अचानक खूपच जाणीव वाढली होती. त्याचा परिणाम काही उपक्रमांवर झाल्याचं आठवतं आहे. कॉपीराईट कायदे पाळणं अत्यावश्यक आहेच पण ते पाळूनही गोष्टी पुढे कशा नेता येतील हे मात्र तेव्हा कळत नसे. त्याकाळात एकूणात 'मॉरल पोलीसिंग' (प्रशानसाद्वारे नाही, सदस्यांद्वारेच) फार वाढल्याचं मला आता जाणवतं.

२. काय बदललं नाही? दिवाळी अंक वगळता इतर कधीही लिखाणाच्या 'दर्जा' वरून साहित्याला चाळणी लावली गेल्याचं पाहिलं नाही. चर्चांमध्येही वर दिलेली उदाहरणं वगळता असांसदीय भाषा किंवा वैयक्तिक भांडणे वगळता प्रशासनाचा हस्तक्षेप नसतो. मायबोलीला 'प्लॅटफॉर्म'चं स्वरूप देण्यात हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे.

३. इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली?
आपल्याला नको असलेल्या ग्रुपमधले लेखन 'नवीन लेखन' वर क्लिक केल्यावर दिसतच नाहीत! मी राजकारण / चालू घडामोडी तसच कविता या ग्रूप्समध्ये नसल्याने मला ते लिखाण दिसतच नाही. विशेषतः राजकारणासंबंधी बाफ दिसत नसल्याने फार बरं वाटतं. तिथल्या त्या लाथाळ्या आणि एकंदरीत नकारात्मक वातावरण नको वाटतं.

४. कुठली सोय आवडत नाही?
मायबोलीवर फोटो अपलोड करायची सोय इतकी वर्षं झाली तरी तशीच क्लिष्ट आहे. स्मार्टफोन आले, फोटो काढणं आणि इतरांना दाखवणं सोपं झालं तरी मायबोलीवर मात्र अजूनही २० वर्षं(?) जुनी पद्धतच वापरली जाते !

५. कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती?
आठवत नाही.


६. गेल्या २५ वर्षात मायबोलीनं तुम्हाला काय दिलं ?

बरंच काही! काही सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे :
१) वेमांपासून बरेच ग्रेट लोक इथे भेटले आणि त्यांचं लिखाण वाचायला मिळालं, त्यांच्याशी बोलता आलं, चर्चा करता आल्या. विविध विषयांमध्ये शिक्षण घेतलेली तसेच पार्श्वभूमी असलेली लोकं इथे असल्याने खूप वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळाले.
मित्रमंडळी तर खूप भेटली. कित्येकांशी आता मायबोलीबाहेर, कौटुंबिक पातळीवर मैत्री झालेली आहे. बर्‍याचदा मायबोलीवर बोलणं होत नाही पण प्रत्यक्ष किंवा इतर माध्यमांद्वारे संपर्क असतो. आम्ही २००९ साली अटलांटाला पहिल्यांदा गटग केलं. त्यावेळी जो ग्रूप हजर होता, त्यांचा सगळ्यांचा अजूनही अगदी वरचेवर संपर्क असतो. (आम्हाला अटलांटा सोडून बरेच दिवस झाले तरीही). भारतात, अमेरिकेत अनेक गटगांना हजेरी लावली. फक्त मोठी गटगच नाही तर मी कुठे गेलो असताना किंवा कोणी मायबोलीकर माझ्या गावात आलेले असताना बर्‍याच जणांच्या भेटी झालेल्या आहेत. ज्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली त्यांचाशी नंतर कधीमधी मायबोलीवर खटके उडूनही संवाद / संपर्क तसाच राहिला. आयडींमागचा चेहेरा माहीत असल्याने दोन्ही बाजूंनी फार ताणलं गेलं नसावं. अर्थात काही अपवाद आहेतच. अश्या अपवादांशी संबंध कायमचे तुटले आणि त्याबद्दल मला अजिबात खेद, खंत वाटत नाही.

२) मायबोलीवर नानाविध विषयांची माहिती मिळाली. जागूने लिहिलेल्या माश्यांच्या अनेक प्रकारांपासून ते 'संशोधन क्षेत्रातले मायबोलीकर' ह्या ग्रूपातल्या विविध विषयांपासून ते मुकुंदच्या ऑलिंपिकमधल्या गोष्टींपासून ते डॉ. कुमार, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. रुणुझुणू ( हो, सतत तिरसटपणे न लिहिणारे काही डॉक्टर मायबोलीवर आहेत!) ह्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींपासून ते चिनुक्सच्या 'अन्नं वै प्राण:'सारख्या लेखांपर्यंत लेखांचं आणि माहितीचं भांडार मिळालं! गुलमोहोरातल्या कथा, ललितं, प्रवासवर्णनं वगैरे आहेतच. ह्यातलं बरंच लेखन मी आठवण झाली की शोधून वाचत असतो.

३) मायबोलीवरच्या अनेक मंडळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आत्ता ऑनलाईन काम तसंच इतर उपक्रम करताना ह्या ऑनलाईन मंडळांच्या अनुभवाचा फार उपयोग होतो आहे! मी आत्तापर्यंत ४ गणेशोत्सव मंडळांंमध्ये काम केलं. २००८ साली पहिल्यांदा. तेव्हा सगळी कामं पहिल्यांदाच करत होतो. एकुणात मजा आली. २००९ सालचं गणेशोत्सवाचं मंडळ हे मी काम केलेल्या सगळ्या मंडळांमधलं सगळ्यात भारी मंडळ होतं! तेव्हा मी, सिंडी, पन्ना आणि बस्के असा पार्ले कंपू, मी आणि आर्जे असा अटलांटा कंपू, मी, सिंडी आणि पन्ना असा टेनिस कंपू, सिंडी आणि पन्नाचा कनेक्टीकट कंपू असे वेगवेगळे कंपू होते. खूप धमाल आली आणि आम्ही सगळ्यात प्रथम गणेशोत्सवातला झब्बू सुरू केला. २०१० साली मी दिवाळी अंक संपादक मंडळात होतो. दिवाळी अंकाचं मुख्य संपादकपद त्यावर्षी अमेरिकेबाहेर गेलं. आधीचे चार 'दिग्गज' संपादक बघता ललिता मायबोलीवर नवखी होती. शिवाय मंडळात रैना, अनुदोन, श्रद्धा, शर्मिला फडके असे त्याकाळचे 'रथी-महारथी' असताना ललिता मुख्य संपादक बघून ग्रॅमी स्मिथ किंवा ली जर्मोनला पदार्पणात कर्णधार केलं होतं तसंच काहीसं वाटलं होतं. (त्यात ललिता 'कट्टा' सारख्या उ. आणि पां. बाफावर पडीक असायची.. Light 1 ) पण ललिताच्या नेतृत्वाखाली काम करायला खूप मजा आली आणि तिच्या संपादन क्षेत्रातल्या अनुभवातून मलाही बर्‍याच नवीन गोष्टी कळल्या. वर उल्लेखलेले रथी-महारथी आणि त्यात मी, हिम्या, स्वरूप अश्या सगळ्यांची ललिताने चांगली मोळी बांधली. दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर प्रामाणिक प्रयत्न आणि काम केल्याचं जे समाधान मिळतं ते मिळालं. पुढे २०१२ साली मी 'लिंगनिरपेक्ष मैत्री' ह्या विशेषांकात काम केलं होतं. विषय (आणि मंडळ) दोन्ही गंभीर असल्याने कामही एकदम गंभीरपणे झाली! २०१३ साली मराठी भाषा दिवसाच्या संयोजनात काम केलं. ह्या मंडळात काम करायला मात्र फारशी मजा आली नाही. २०१४ आणि २०१७ साली लोकं कमी पडली म्हणून पुन्हा एकदम गणेशोत्सवात काम केलं. पैकी २०१४ च्या मंडळात आशुडी वगळता कोणीही ओळखीचं नव्हतं तरी मजा आली आणि उत्सव छान पार पडला. (उत्सव संपल्यावर ह्या मंडळातल्या काही जणांनी मला "आम्ही तुझ्याकडून 'पेशन्स' शिकलो" असं सांगितलं!!" ह्यावर नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे अजून ठरवतो आहे!) २०१७ साली मात्र ऐनवेळी ऑफिसात आणि बाकीही खूप व्यग्र झाल्याने बर्‍यापैकी पाट्या टाकल्या. तेव्हाचे सहसंयोजक मुख्यतः मैत्रेयी आणि शोनू नक्कीच वैतागले असणार! याशिवाय 'माध्यम प्रायोजक' उपक्रमात एक-दोन चित्रपटांसाठी काम केलं होतं.

४) मी मराठी ब्लॉगविश्वात आधी लिहायला लागलो असलो तरी मायबोलीवर मिळणार्‍या प्रतिक्रियांमुळे बरंच शिकायला मिळालं. मराठी माध्यमात शिकूनही आपल्या लिखाणात शुद्धलेखनाच्या किती प्रचंड चुका होतात ह्याचीही जाणीव झाली / होत असते.

५) इथल्या चर्चा वाचून दुसरी बाजू समजून घेण्याची सवय झाली. मी मध्यममार्गी झालो वगैरे म्हणणार नाही. पण निदान दुसरी बाजू असू शकते असा विचार तरी आता येतो. स्वातीने तिच्या लेखात म्हटलं तसं सामजिक विषयांबद्दल सबकॉन्शस लर्निंग खूप होत असतं.

६) इथल्या लोकांची वाचलेल्या पुस्तकांची जंत्री बघून नियमीत वाचायची सवय लागली.

७) मी माझ्या कैलास-मानसच्या लेखांमध्ये म्हटलं होतं तसं कैलास मानसची यात्रा करण्याची प्रेरणा मला इथले अनयाचे लेख वाचूनच मिळाली. शिवाय पळापळी, सायकलिंग यांच्यासाठी प्रेरणाही इथल्याच मंडळींकडून मिळाली.

७. तुम्ही मायबोलीला काय दिलं ?
मी मायबोलीवर दोन आयडी काढले, ज्यामुळे इथली सदस्यसंख्या वाढली आणि काही-बाही बाफं काढून इथले 'पेज-हिट्स' वाढवले.

८. तुमचं कुठलं लेखन गाजलं?
यात कैलास मानससरोवर यात्रेचं वर्णन असावं. ते आवडल्याचं बर्‍याच जणांनी लेखांवर प्रतिक्रिया देऊन किंवा इतर फोन, इमेल, चॅटद्वारे कळवलं होतं. ह्याशिवाय मी लिहिलेल्या बेकिंगच्या काही रेसिपीज लोकांनी आवडल्या असं सांगितलं होतं. मला स्वतःला लेखनस्पर्धेत मी लिहिलेला लेख आवडला होता. (कारण विषय जिव्हाळ्याचा होता).
गझल कार्यशाळेतली माझी गझल गाजली-बिजली नव्हती पण मी गझल किंवा कुठला काव्यप्रकार लिहिला हेच एक फार मोठं आश्वर्य होतं आणि ह्याचं श्रेय कार्यशाळा शिक्षकांना.. (ती गझल वाचून घरून मला "तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स सुरू नाहीयेत ना? असेल तर मोकळेपणाने बोल" असे फोन आले होते!). रूढार्थाने लेखन नाही पण क्रीडाविभागात मी चर्चांचे बरेच धागे काढत असतो. धागा काढल्यावर बरीच मंडळी जमतात आणि मग चर्चा करायला मजा येते.

९. कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं?
मी अ‍ॅडमिनांच्या मागे लागून लागून टेनिससाठी वेगळा ग्रूप काढायला लावला होता. त्यात मी प्रत्येक ग्रँड स्लॅमकरता वेगळा बाफ काढायचो. ह्या बाफांनी काही जणांना नक्की गांजलं होतं. पुढे वेळ मिळेनासा झाल्यावर ते बाफं काढणं बंद केलं. लेखनाशिवाय काही ठिकाणच्या प्रतिक्रियांनीही लोकं गांजली असणार!

१०. कुठल्या अपूर्ण गोष्टी किंवा आता होत नसलेल्या गोष्टी पुन्हा व्हाव्यात ?
हा प्रश्न विचारलेला नसला तरी उपजत आगाऊपणाचा वापर करून सांगूनच टाकतो. एकंदरीत मायबोलीने कितीही दिलं तरी हाव काही सुटत नाही.
१) दिवाळी अंक पुन्हा सुरू व्हावा असं फार वाटतं. ज्या काही समस्या असतील त्यांचं इथे चर्चा करून निराकरण करता येईल का हे प्रशासनाने पडताळून पहावं ही विनंती. दिवाळी अंक पुन्हा सुरू झाला तर 'पूनम' ला मुख्य संपादक झालेलं बघायला आवडेल!
२) पूर्वी नियमीतपणे कथा लिहिणारे लेखक हल्ली कथा लिहित नाही किंवा लिहिल्या तरी इथे टाकत नाही. त्यांनी ते पुन्हा सुरू करावं! त्यानिमित्ताने कथाकथी ह्या बाफाची आठवण झाली. टण्याची 'वारी', शोनूची 'एका वर्षाची गोष्ट' दहा दहा वर्ष झाली तरी अजून अर्धवटच पडल्या आहेत! मध्यंतरी कविनने कथा लिहिल्या तेव्हा मी काही कथा लेखकांना "बघा! शिका काहीतरी" असे मेसेज केले होते. पण काहीही उपयोग झालेला नाही!
३) हहची कुजबूज पुन्हा सुरू व्हावी असंही वाटतं.
४) मुकुंदने 'ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन', ऑलिंपिकमधल्या गोष्टी, अमेरिकेतल्या नॅशनल पार्क्सची प्रवासवर्णनं वगैरे बरंच काही लिहायचं कबूल केलं होतं पण ते अजूनही लिहीलेलं नाही!
५) 'यो-रॉक्स' आणि कंपू त्यांच्या गड-किल्ले भटकंतीचे वृत्तांत नियमीत टाकायचे. ते आता अजिबात दिसत नाहीत. मला खात्री आहे की भटकत तर नक्कीच असणार. त्यांनी वृत्तांत लिहीणं पुन्हा सुरू करायला हवं.

मायबोली हा दिवसाच्या रुटीनचा अविभाज्य भाग झालाय आणि पंचवीसच काय पण मायबोलीला पन्नासावा / शंभरावा वाढदिवसही साजरा करण्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा!

(ह्या लेखनाचे मुशो केल्याबद्दल स्वाती आंबोळेला धन्यवाद!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहपहष्टह. Proud
मस्त लिहिलंयस. Happy
तुझा मंडळाच्या कार्यप्रणालीबद्दलचा लेख अजूनही नवीन मंडळांना मार्गदर्शक ठरतो आहे. Happy

अवांतर :
१. प्रश्नांच्या उत्तरांत दर दोन आकड्यांच्या मध्ये लाइनब्रेक दिला तर वाचणं सुलभ होईल.
२. दुसर्‍या आयडीने निराळ्या आठवणी येणार आहेत का? Proud

वा वा! बर्‍याच विस्मरणात गेलेल्या आठवणी वर आल्या!! Happy
गझल वाचून घरून मला "तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स सुरू नाहीयेत ना? असेल तर मोकळेपणाने बोल" असे फोन आले होते >>> Lol हाईं ? वाचायला पाहिजे आता ती गझल
तुझा मंडळाच्या कार्यप्रणालीबद्दलचा लेख अजूनही नवीन मंडळांना मार्गदर्शक ठरतो आहे >> +११

ह्या लेखनाचे मुशो केल्याबद्दल स्वाती आंबोळेला धन्यवाद >>> तरीच स्वातीबद्दलच्या निगेटिव्ह कॉमेण्ट्स उडालेल्या वाटत आहेत Wink

जस्ट किडिंग. छान लिहीले आहेस. ते सगळे अनुभव आठवणे आणि त्याबद्दल इतके लिहीता येणे हे भारी आहे. डीजे ने वैशाली माडे का कोणतरी त्या गाण्याच्या कार्यक्रमात होती तिची तारीफ सुरू केल्यावर तू ती हाणून पाडणे वगैरे आठवते Happy

फा Lol
त्याने मला भाबडं म्हटलेलं तेवढं राहू दिलंय. Proud

धन्यवाद. Happy

तरीच स्वातीबद्दलच्या निगेटिव्ह कॉमेण्ट्स उडालेल्या वाटत आहेत >>
त्याने मला भाबडं म्हटलेलं तेवढं राहू दिलंय >>>
Lol

लहान आहे ना!
आणखी थोड्या वर्षांनी विसरेल (आणि भाबडा होत जाईल)! Proud

हा लेख वाचला.आणि त्यात दिलेल्या वादग्रस्त मंगळसूत्र कुंकू वाल्या ठिकाणी जाऊन सगळी पानं वाचत बसले.
माझा गैरसमज बरेच दिवस adm हा ऍडमीन चा आयडी असा होता.मग ते बिस्कीट क्रॉसॉ वाल्या धाग्यावर पराग=adm कळले.

(मला हेही जाणवलं की 15 वर्षं इथे असूनही यातले बरेच गृप मला माहित नव्हते.)

चांगला आढावा घेतलास . 2014 च्या गणेशोत्सव मंडळात सगळेच अनोळखी होते. पण नैय्या तरली हे खरंच

छान लिहिलं आहे! स्पष्टपणा आवडला. (मलाही क्रॉसॉं किंवा अशाच कुठल्याशा धाग्यावर कळलं होतं की पराग आणि Adm हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. )

छान लिहिलं आहे! स्पष्टपणा आवडला. (मलाही क्रॉसॉं किंवा अशाच कुठल्याशा धाग्यावर कळलं होतं की पराग आणि Adm हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. ) +११११

धन्यवाद. Happy

मग ते बिस्कीट क्रॉसॉ वाल्या धाग्यावर पराग=adm कळले. >>>>> हो. त्या दोन आयडींचीही गोष्ट आहे. पण ते पुन्हा कधीतरी. मागे मी adm वापरायचो तेव्हा अ‍ॅडमिनांना येतात तश्या तक्रारीच्या विपु मला यायच्या... Happy

छान सटीक लिहिलंय >>>> हे विशेषण भारी आहे.. Proud

२. दुसर्‍या आयडीने निराळ्या आठवणी येणार आहेत का? >>>> भारी आयडीया! लिहून मुशोला पाठवतो. Proud

लहान आहे ना! आणखी थोड्या वर्षांनी विसरेल (आणि भाबडा होत जाईल)! >>>>> ते उलटं असतं ना? म्हणून तर तुझ्या भाबडेपणाचं आश्वर्य Wink

दुसर्‍या आयडीने निराळ्या आठवणी येणार आहेत का? >>> Lol राम और श्याम, किशन कन्हैय्या, सीता और गीता प्रमाणे. किंवा "दत्त आचमने" (हे माहीत नसलेल्यांनी लाइफ चॉईसेस....)

अरे हे फारच छान लिहिले आहे. विस्तृत असूनही मुद्देसूद, परखड आणि संदर्भासहित. ( पुराव्याने शाबीत Wink )

एकदम मस्त, स्पष्ट आणि प्रामाणिक. २००९चं मंडळ आणि तो उत्सव सगळंच भारी होतं. आपण एक रियुनियन कॉल केला पाहिजे. मजा आली वाचून.

प्रांजळ, मनापासून केलेले लेखन... आवडलंच !
>>> २००९ सालचं गणेशोत्सवाचं मंडळ हे मी काम केलेल्या सगळ्या मंडळांमधलं सगळ्यात भारी मंडळ होतं! >>> मायबोलीवरच्या आतापर्यंतच्या गणेशोत्सवांतील मला सर्वात आवडलेला २००९ चा आहे. Happy

प्रामाणिक आणि रोखठोख आढावा. मायबोलीचा जुन्या काळापासूनचा प्रवास छान मांडलात.
तुमची कैलास मानसरोवर यात्रा खूप आवडलेली. (खरं तर त्या तिन्ही लेख मालिका सुंदरच होत्या.)
लेकामधल्या संदर्भासाठी बरेच जण इथे पुन्हा पुन्हा यावेत.

Pages