Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 26, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through January 26, 2008 « Previous Next »

Mukund
Saturday, January 12, 2008 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२००८ वर्ष सुरु झाले व माझ्यासारख्या अनेक क्रिडाशौकीनांना साहजीकच दर ४ वर्षांनी येणार्‍या ऑलिंपीक्स स्पर्धेचे वेध लागले. या वर्षीच्या स्पर्धा बैजिंग येथे अजुन जवळ जवळ २०० दिवसात सुरु होतील. त्या निमित्ताने या बीबीवर ऑलिंपीक संदर्भातल्या मनोरंजक आठ्वणी किंवा माहीती टाकता यावी यासाठी हा बीबी सुरु करावासा वाटला.

लहानपणापासुन सगळ्या खेळांची आवड असल्यामुळे १९७६ पासुन मला या स्पर्धांचे जबरदस्त आकर्षण! फास्टर.. हायर... स्ट्रॉन्गर... असे ब्रिदवाक्य असलेल्या या खेळांबद्दल लिहीताना (व आजच्या अनेक खेळांमधील खेळाडुंच्या उत्तेजक पदार्थांच्या सेवनाच्या बातम्या रोज वाचायला मिळत असताना)मला एका खेळाडुच्या स्फुर्तीदायक गोष्टीने या बीबीची सुरुवात करावी असे वाटते.. ती गोष्ट मी माझ्याकडे असलेल्या
100 years of Olympic glory या ८ व्हिडिओ कॅसेट्स च्या( बड ग्रीनस्पॅन या अतिशय प्रतिभावान दिग्दर्शकाने निर्मीत व दिग्दर्शीत केलेल्या)संचात अनेक वेळा पाहीलेली आहे.. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट बघताना माझ्यातला प्युरिस्ट क्रिडाप्रेमी अजुनही असे मानायला तयार होतो की आज जगातला एक जरी ऍथलिट या गोष्टीतल्या ऍथलिटसारखा असेल तर त्या अशा एका ऍथलिटसाठी मी ऑलिंपीक स्पर्धा बघायला तयार आहे...

तर ही गोष्ट आहे १९६८ मेक्सिको सिटी ऑलिंपीकची. स्पर्धेचा शेवटचा दिवस.. ऑलिंपीक्स स्पर्धेच्या ट्रॅडीशनप्रमाणे स्पर्धेची सांगता ही नेहमी मॅरेथॉन शर्यतीने होते. त्याप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता ही मॅरेथॉन शर्यत सुरु झाली. २६ मैलाची ही शर्यत साधारणत: सगळे सव्वा दोन ते तिन तासात पुर्ण करतात.साधारणपणे ९ वाजता ती स्पर्धा मेन ऑलिंपीक स्टेडीअममधे संपुन मग स्पर्धेचा क्लॉजींग सेरीमनी पार पाडायचा असा संयोजकांचा बेत असतो.

या शर्यतीत भाग घेणारे सगळे ५ वाजता धावण्यास सुरु झाले. सगळे रप रप असा ठेका घेत आपापल्या स्ट्रॅटीजीप्रमाणे वेग घेउ लागले. आणी अचानक एक टांझानियन स्पर्धक अडखळुन ठेच लागुन खाली पडला. ठेच अगदी साधीसुधी नव्हती.... त्याच्या उजव्या पायाला जबरदस्त खरचटुन रक्तस्त्राव सुरु झाला.तेवढेच नाही तर त्याच्या उजव्या गुढग्याचा सांधा निखळला. अतिशय वेदनेने तो स्पर्धक कोलमडला. बाकीचे सर्व स्पर्धक त्याला मागे टाकुन केव्हाच पुढे गेले. हा थोडा वेळ एक हात डोक्याला व एक हात उजव्या गुढग्यावर ठेवुन वेदनेने विव्हळत डोळ्यात पाणी येउन बसुन राहीला. पण दोनच मिनीटात त्याने त्याच्या पायावरच्या जखमेवर कपडा गुंडाळला व अडखळत अडखळत उभा राहीला व लंगडत लंगडत, अतिशय वेदना होत असुनसुद्धा पुढचे २५ मैलाचे अंतर काटण्यास त्याने जिद्दीने सुरुवात केली.

इथे त्याच्या पुढे गेलेले सर्व स्पर्धक एका मागुन एक असे मेन ऑलिंपीक स्टेडीअम मधे येउन पोहोचले. पहिला, दुसरा, तिसरा असे सुवर्ण पदक,रजत पदक व ताम्र पदक जिंकणारे निश्चीत झाले. दहावे विस्सावे,तिस्सावे वगैरे पण शर्यत संपवुन मेन ऑलिंपीक स्टेडीअम मधे परत आले. आता जेव्हा २० ते २५ मिनिटे कोणीच येइनासे झाल्यावर स्पर्धेच्या क्लोजींग सेरिमनीला संयोजकांनी सुरुवात केली.

इथे तो टांझानियन स्पर्धक लंगडत लंगडत का होइना..आपला मजल दरमजल करत मेन ऑलिंपीक स्टेडीअमकडे वाटचाल करतच होता.

इकडे स्पर्धेची क्लोजींग सेरिमनी संपलीसुद्धा. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की अरे अजुन एक स्पर्धक जखमी अवस्थेत असुनसुद्धा स्पर्धा पुर्ण करण्याचा प्रयत्न करत मैदानाकडे येत आहे.

मोठ्या जंबोट्रॉनवर त्याचे थेट प्रक्षेपण दाखवायला सुरु झाले व जे खरे दर्दी व क्रिडाशौकीन होते ते हजारोंच्या संख्येने टाळ्या वाजवत व जंबोट्रॉनकडे बघत त्या स्पर्धकाची वाट बघत स्टेडीअममधेच थांबले.

सरते शेवटी अतिशय दमलेल्या अवस्थेत रात्री बाराच्या सुमारास या स्पर्धकाने मेन ऑलिंपीक स्टेडीअममधे प्रवेश केला. त्याला माहीतही नव्हते की स्टेडीअममधे कोणी त्याची वाट पाहात असेल म्हणुन!लंगडत लंगडत तो जेव्हा स्टेडीअममधे प्रवेशकर्ता झाला तेव्हा जे काही ५-१० हजार लोक त्याची वाट पाहात ताटकळत इतक्या उशीरापर्यंत बसले होते त्या सगळ्यांनी त्याचे टाळ्यांच्या कडकडात त्याचे सुवर्णपदक विजेत्यासारखे स्वागत केले! त्या स्पर्धकानेही शेवटची एक फेरी स्टेडीअमला घालताना दोन्ही हात वर करुन,डोळ्यातले अश्रु आवरत लंगडत लंगडत एकदाची अंतिम रेषा पार केली व एकदम कोलॅप्स होउन जमिनीवर पडला पण टाळ्यांचा कडकडाट मात्र चालुच होता....

त्या स्पर्धकाची मुलाखत घ्यायला एक वार्ताहर पुढे झाला.. त्याने त्याचा माइक पुढे करुन त्याला विचारले... अरे इतका जखमी झालेला असताना व वेदनेने विव्हळत असुनसुद्धा तु शर्यत का नाही सोडलीस? त्या स्पर्धकाने पटकन उत्तर दिले.... "माझ्या देशाने मला इथे ५००० मैल दुर शर्यत सुरु करण्यासाठी नव्हते पाठवले.... शर्यत पुर्ण करण्यासाठी पाठवले होते....."

त्या स्पर्धकाचे नाव होते...जॉन स्टिव्हन अखवारी.....


Tanyabedekar
Saturday, January 12, 2008 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येउदे, अजुन येहुदे मुकुंद.. जबरी...

Panna
Sunday, January 13, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहिये किस्सा हा!!
हॅट्स ऑफ जॉन स्टिवन!! :-)


Dineshvs
Sunday, January 13, 2008 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद. ऑलिंपिक्स मधे असे अनेकवेळा घडलेय. नादिया कोमोनिच तर आदर्शच ठरावी.
मला वाटते झोला बड (CBDG) चा पण असाच किस्सा आहे.
एकदा तर एक स्पर्धक पडला, म्हणुन दुसर्‍याने थांबुन त्याला हात दिला होता.
हे वाचायला खुप आवडेल.

ऐतिहासिक काळातदेखील ग्रीसमधे अश्या रोमांचक घटना घडल्या होत्याच.


Hkumar
Sunday, January 13, 2008 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्युनिच आॅ. शालेय जीवनात चांगलीच लक्षात राहिली आहे (? १९७२) व त्याचे कारण म्हणजे त्यात झालेली Israel च्या खेळाडूंची अमानुष हत्त्या.

Gobu
Sunday, January 13, 2008 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंदा, छान लिहीले आहेस!


Raviupadhye
Sunday, January 13, 2008 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द great आणखीन येऊ दे.

Mukund
Monday, January 14, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे अभिप्रायाबद्दल आभार..

जसा वेळ मिळेल तसा ऑलिंपिकबद्दलच्या आठवणी.. काही वर संदर्भ दिलेल्या बड ग्रीनस्पॅनच्या संचामधुन तर काही स्वत्: अनुभवलेल्या व पाहीलेल्या गोष्टींबद्दल लिहीत जाइन.

सगळ्यात आधी... नेमस्तक.. तुम्ही जर वाचत असाल तर माझी एक मोठी चुक माझ्या पहिल्या पोस्टातुन दुरुस्त कराल काय? मी ऑलिंपिकच्या ब्रिदवाक्यात स्विफ़्टर.. हायर... स्ट्रॉन्गर अस लिहायच्या ऐवजी फ़ास्टर असे लिहिले आहे. तेवढे फ़ास्टरच्या ऐवजी स्ट्रॉन्गर असे दुरुस्त कराल काय? चुकीबद्दल क्षमा असावी..

दिनेश.. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अशा बर्‍याच नाही.... पण हातावर मोजण्याइतक्या घटना ऑलिंपिकच्या इतिहासात झाल्या आहेत. पण मी या बीबीची सुरुवात वरील गोष्टीने केली कारण त्याने केलेल्या कृत्यापेक्षा त्याने दिलेले उत्तर खरच मनाला जास्त भिडुन जाते व त्याने केलेल्या कृत्याला एक वेगळेच वलय निर्माण होते.

तुम्ही म्हणता तो प्रसंग झोला बडचा १९८४ च्या लॉस ऍंजलेस ऑलिंपिक्स मधे घडला होता. तो प्रसंग खुप गाजला त्याला २ कारणे होती. एक म्हणजे झोला बडचा घोटा जिच्या बुटाशी घासला गेला ती अमेरिकेची मेरी डेकर स्लेनी ही होती. साहजीकच ती लोकल फ़ेव्हरेट असल्यामुळे ती पडल्यावर लोकांनी झोलाला बु करायला सुरुवात केली. वास्तवीक पाहता आंतराष्ट्रिय नियमांनुसार मेरी डेकर ही झोलाच्या मागे असल्यामुळे पुर्ण चुक मेरीचीच होती. पण त्या प्रसंगामुळे अर्ध्या शर्यतीपर्यंत पहिली असलेली झोला दुसर्‍या १५०० मिटरमधे मागे पडुन शेवटी सातवी आली. खर म्हणजे ती फ़ेव्हरेट होती कारण विश्वविक्रम तिच्या नावावर होता. शर्यत संपल्यावर टनेलमधे तिने जखमी मेरी डेकरची माफ़ी मागीतली पण मेरी डेकरने उद्वेगाने "डोंट बॉदर!" असे तुसड्या रितीने उत्तर देउन दुर्लक्ष केले.

आणी हे सगळे रामायण घडायच्या आधी इंग्लंडने आटापिटा करुन झोला जरी खरी साउथ आफ़्रिकेमधे जन्माला येउन लहानाची मोठी झाली असली तरी तिला ऑलिंपिकच्या आधी दोनच महीने त्यांचे नागरिकत्व देउन तिच्याकडुन सुवर्णपदकाची आशा असल्यामुळे स्वत:च्या चमुमधे सामील करुन घेतले होते. त्यावेळी साउथ आफ़्रिकेला ऍपर्थिड मुळे ऑलिंपिकमधे बंदी होती. त्यामुळे जेव्हा ती सातवी आली तेव्हा बर्‍याच लोकांना बरे वाटले कारण ती खरी साउथ आफ़्रिकेची ऍथलिट होती.

आणी दुसरा प्रसंग बहुतेक बार्सिलोना ऑलिंपिकमधला असावा. त्यावर्षी अमेरिकेचा एक खेळाडु(नाव आठवत नाही) ज्याच्या नावावर तेव्हा ४०० मिटर्सचा विश्वविक्रम होत..तो ४०० मिटर सेमिफ़ायनलमधे २०० मिटर पर्यंत आघाडीवर असताना मांडीच्या स्नायुचा टेंडन तुटल्यामुळे अर्ध्यावरच कोसळुन पडला व वेदनेने विव्हळत बसुन राहीला. तेव्हा त्याचे वडिल प्रेक्षकात होते ते सुरक्षा अधिकार्‍यांना न जुमनता मैदानावर उडी मारुन आले व त्यांच्या जखमी मुलाला खांदा देत बाकीची शर्यत पुर्ण करायला मदत केली. तो ऍथलिट लंगडत लंगडत वडिलांच्या खांद्यावर हात टाकुन सेमी फ़ायनल हिट संपली असुनसुद्धा शेवटपर्यंत गेला. ते द्रुष्य जंबोट्रोनवर पाहुन स्टेडीअममधले ९०,००० प्रेक्षक टाळ्या वाजवत त्याच्या प्रत्येक लंगडत्या पावलाची दाद देत होते. फ़िनिश लाइननंतर बाप लेक दोन्ही गळ्यात गळा घालुन मनसोक्त रडले व वडिल मुलाला म्हणाले.." सन.. आय ऍम व्हेरी प्राउड ऑफ़ यु... मोर प्राउड दॅन इफ़ यु हॅड वन द गोल्ड मेडल!". याच खेळाडुला १९८८ च्या सेउल ऑलिंपिकमधे त्याचा अकिलीस टेंडन फ़ायनलच्या १० मिनिटे आधीच वॉर्म अप मधे तुटल्यामुळे शर्यतीत भाग घेता आला नव्हता... त्या पार्श्वभुमीवर बाप लेकांची निराशा आपण समजु शकतो.

हेमंतकुमार.. म्युनिच मधे ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टीनी दहशतवादी संघटनेने केलेल्या इस्रायलच्या १३ ज्यु ऍथलिट्सचे अपहरण व नंतर केलेली त्यांची हत्या सगळ्यांच्या मनात कायमची घर करुन गेली यात वादच नाही पण म्युनिक ऑलिंपिक खेळाच्या द्रुष्टीने कोणी गाजवले असेल तर अमेरिकेचा(ज्यु!) जलतरणपटु मार्क स्पिट्झ याने! सात शर्यतीत तो उतरला.. सातही तो जिंकला व नुसताच जिंकला नाही तर सातही मधे वर्ल्ड रेकॉर्ड करुन जिंकला... आता बोल! त्याचा हा विक्रम अजुन अबाधीत आहे. १९८८ मधे अमेरिकेचेच मॅट बिऑंडी(५ सुवर्णपदके) व २००४ मधे मायकेल फेल्प्स(सहा सुवर्णपदके) त्या विक्रमाच्या जवळ आले होते. मार्क स्पिट्झला ताबडतोब अमेरिकेने तो ज्यु असल्यामुळे म्युनिकमधुन उचलबांगडी करुन जर्मनी मधल्या अमेरिकन मिलिटरी बेसवर नेले व तिथुन त्याची ताबडतोब अमेरिकेत रवानगी केली होती. त्याबद्दल व ब्लॅक सप्टेंबर या दहशतवादी संघटनेच्या या कृत्याबद्दल मी पुढे कधीतरी सविस्तर इथे लिहीनच.

आणी दिनेश.. तुम्हाला बहुतेक अमेरिकेची जिमनॅस्ट केरी स्ट्रग बद्दल म्हणायचे असेल जिचा आपल्या पहिल्या प्रयत्नात व्हॉल्टवरुन उडी मारल्यावर लॅंडींग करताना पायाचा घोटा तुटला होता.. तसे असुनसुद्धा दुसर्‍या प्रयत्नात त्याच व्हॉल्ट वरुन अचुक उडी मारुन तिने पर्फ़ेक्ट लॅंडींग केले(तुटलेल्या घोट्यात लॅंडींग करताना जिवघेण्या वेदना होत असुनसुद्धा!)व अमेरिकेच्या महिला जिमनॅस्ट संघाला पहिले वहिले सुवर्णपदक ऍटलांटा ऑलिंपिकमधे मिळवुन दिले. त्याबद्दल व ऍटलांटा ऑलिंपिकच्या( जे मी स्वत्: ऍटलांटाला जाउन अनुभवले!) अविस्मरणिय अनुभवांबद्दल व आठवणींबद्दलसुद्धा जरुर लिहीणार आहे. नादिया ही पहीली जिमनॅस्ट होती की जिने पर्फ़ेक्ट १० गुण मिळवुन सुवर्णपदक जिंकले होते.Shravan
Monday, January 14, 2008 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद,
खरोखर सुंदर BB उघडलाय. अभिनंदन..!
आम्ही वाचतोय, येऊ द्यात.


Pooh
Monday, January 14, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mukund,

The Olympic motto is Citius, Altius, Fortius, which is Latin for "Faster, Higher, Stronger."

It is not "higher, faster, swifter".

Rest is good.

Hkumar
Tuesday, January 15, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाॅकीच्या सामन्यांचे हिंदीतून धावते समालोचन जसदेवसिंग करीत ( चु.भु.दे.घे.) ते अजून आठवते. भारत जिंकलेला असताना होणारा त्यांचा उत्तेजित स्वर ( मै जसदेवसिन्ग आपको बता रहा हूॅ ) चांगलाच लक्षात आहे.

Zakasrao
Tuesday, January 15, 2008 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद छान आहे माहिती तुम्ही दिलेली :-)


Mukund
Thursday, January 17, 2008 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुह.... धन्यवाद.. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल. पण मी आधीच नेमस्तकांना विनंती केली होती दुरुस्तीसाठी आणी त्यांनी ती चुक दुरुस्त केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद..(मला वाटत स्विफ़्टर आणी फ़ास्टर हे शब्द वेग या अर्थाचेच दोन शब्द आहेत.. जसे आपण म्हणतो की रिव्हर करंट इज व्हेरी स्विफ़्ट! असो.)

आपल्या सगळ्यांना ठाउकच आहे की एक ऑलिंपिक पदक मिळवायचे म्हणजे किती कठिण काम असते पण काही काही अशाही व्यक्ती आहेत की ज्यांनी एकच नाही तर चार किंवा जास्त सुवर्णपदके ऑलिंपिकमधे पटकावली आहेत.. तेही ३ वेगवेगळ्या ऑलिंपिकमधे. ही पुढची गोष्ट तशाच एका अमेझिंग ऍथलिटबद्दल आहे. त्याने १९४८ ते १९५६ दरम्यान ४ सुवर्णपदके पटकावली त्याबद्दल तर ही गोष्ट आहेच पण मी ही गोष्ट का निवडली ते तुम्हाला नंतर कळुन येइलच! त्या झेक ऍथलिटचे नाव होते एमिल झाटोपेक...

झाटोपेकने आपल्या ऑलिंपिक विजयाची सुरुवात केली १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्स मधे. त्यात त्याने ५००० मिटर्स व १०,००० मिटर्स शर्यतीत भाग घेतला पण फक्त १०,००० मधेच तो सुवर्णपदक पटकावु शकला. १०,००० मिटर्समधे दुसरा नंबर म्हणजे रजत पदक पटकावले फ़्रांसच्या (पण अल्जेरिया मधे जन्मलेल्या) अलाय मिमुने.

जोपर्यंत १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिकची वेळ आली तोपर्यंत झाटोपेकने आपल्या दिर्घ पल्ल्याच्या शर्यतीतील धावण्याच्या कौशल्याने सगळ्या जगात प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे हेलसिंकीमधे त्याच्याचकडे ५००० व १०,००० मिटर्समधे संभावीत विजेता म्हणुन पाहिले जात होते.

त्यानेही १०,००० मिटर्सच्या शर्यतीत त्याच्या चाहत्यांची निराशा केली नाही व ७०,००० प्रेक्षकांच्या झाटो.... पेक!..... झाटो.... पेक! झाटो.... पेक!.... अशा गजरात त्याने सुवर्णपदक पटकावले. दुसरा नंबर म्हणजे परत रजतपदक मिळाले फ़्रांसच्या अलाय मिमुला.

२ दिवसांनी ५००० मिटर्सची फ़ायनल सुरु झाली. एव्हाना चार दिवसात झाटोपेक ५००० व १०,००० च्या प्रर्थमिक,उपांत्य व अंतिम फेर्‍या मिळुन ६ फेर्‍यांमधे धावला होता. त्यामुळे ५००० मिटर्सची अंतिम फेरी जेव्हा चालु झाली तेव्हा झाटोपेकची पुरी दमछाक झाली होती. ती दमछाक शेवटच्या ४०० मिटर्सची सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच दिसुन आली. झाटोपेक चक्क चौथ्या क्रमांकावर होता व धापा टाकत कसाबसा बाकीच्यांबरोबर धावत होता. पण ७०,००० प्रेक्षक एकच गजर करत होते... झाटो.... पेक! ....झाटो.... पेक!... झाटो..... पेक!... त्या गजराने बळ आले का कोण जाणे पण झाटोपेकने आपल्या धावण्याचा वेग एकदम दुसर्‍या गीअरमधुन चौथ्या गिअरमधे गाडी टाकतात तसा एकदम वाढवला व तो चौथ्याचा तिसरा... मग दुसरा असे करत करत २०० मिटर उरले होते तोपर्यंत परत पहिल्या स्थानावर तो आला. त्याच्या मागे पाचव्या क्रमांकावर असलेला अलाय मिमुन... तोही झाटोपेकचा पाठलाग करत त्याच्या मागे दुसर्‍या क्रमांकावर आला. शेवटचे १०० मिटर उरले असताना अलाय मिमुने झाटोपेकला मागेही टाकले! पण झाटोपेकने एक शेवटचा जोर लावुन शेवटचे २० मिटर्स उरले असताना मिमुला मागे टाकले व स्पर्धेतले दुसरे सुवर्णपदक अटीतटीच्या लढतीत पटकावले. दुसरा नंबर म्हणजे रजत पदक पुन्हा एकदा... फ़्रांसच्या अलाय मिमुला!

झाटोपेकचा पराक्रम एवढ्यावरच थांबला असता तर तो झाटोपेक कसला?

५००० मिटर्सच्या शर्यतीनंतर दोनच दिवसात मॅरेथॉन शर्यत होती. झाटोपेकने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात एकदाही एवढ्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेतला नव्हता पण तो म्हणाला की मला मॅरेथॉनमधे भाग घ्यायचा आहे. परवानगी मिळाल्यावर त्याने चौकशी केली की या मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणुन कोणाकडे बघीतले जात आहे? ती माहीती मिळाल्यावर त्याने ठरवले की त्या संभाव्य विजेत्याच्या पाठीमागे त्याच्या तो द्रुष्टीक्षेपात राहील अशा वेगात आपण धावायचे.

झाले.. मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली. ५ किलोमिटर, १० किलोमिटर असे हेलसिंकीच्या मंद उन्हाळ्यात सगळे ही ४२ किलोमिटर्सची स्पर्धा धावु लागले. १५ किलोमिटर झाले तरी संभाव्य विजेता अजुन झाटोपेकच्या द्रुष्टिक्षेपात होता.पण २० किलोमिटरच्या आसपास तो संभाव्य विजेता धापा टाकुन मागे पडु लागला. झाटोपेक मात्र त्याच वेगात पुढे धावत होता. ३० किलोमिटरपर्यंत झाटोपेक आघाडीवर सगळ्यांच्या पुढे गेला. ४० किलोमिटर.. झाटोपेक अजुनही प्रथम क्रमांकावर.... आणी जेव्हा तो मेन ऑलिंपिक मैदानात आला तेव्हा सर्व ७०,००० प्रेक्षक परत एकदा झाटो... पेक!... झाटो... पेक!.... झाटो...... पेक! च्या गजरात त्याचे कौतुकाने स्वागत करायला तयारच होते. त्यांना माहीत होते की त्यांच्या समोर एक इतिहास घडत आहे... झाटोपेक हा अजुनपर्यंतचा असा एकमेव ऍथलिट आहे की ज्याने एकाच ऑलिंपिकमधे ५०००,१०००० व मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला व तिन्हीमधे सुवर्णपदक पटकावले... तेही त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या मॅरेथॉनमधे भाग घेतलेला असतानाही त्याने ते सुवर्णपदक जिंकले हे अजुन एक विशेष!

आता साल होते १९५६... स्थळ... मेलबोर्न ऑलिंपिक. परत एकदा झाटोपेक मॅरेथॉन स्पर्धेत उतरला होता. मेलबोर्नचा उन्हाळा ४ वर्षापुर्वीच्या हेलसिंकीच्या मंद उन्हाळ्यासमोर फारच कडक भासत होता! शिवाय झाटोपेकचे फक्त ६ आठवड्यापुर्वीच हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. तरीही झाटोपेकला विश्वास होता की तो मॅरेथॉन जिंकु शकेल.पण झाटोपेकही शेवटी एक माणुसच होता! ४० किलोमिटरपर्यंत कडवी लढत देउनसुद्धा तो या वेळेला पहिल्या ३ मधे स्थान मिळवु शकला नाही. त्याला ५ जण मागे टाकुन पुढे ऑलिंपिक स्टेडिअममधे निघुन गेले होते. झाटोपेक जेव्हा दमुन सहाव्वा पोहोचला तेव्हा पहिला आलेला सुवर्णपदक विजेता झाटोपेकची आतुरतेने वाट पाहात होता... झाटोपेकने जेव्हा अंतिम रेषा पार केली तेव्हा तो सुवर्णपदक विजेता झाटोपेकला म्हणाला... मित्रा... मला बघ! मी एकदा तरी तुला हरवुन एकदाचा ऑलिंपिक विजेता झालो आहे... माझे अभिनंदन नाही करणार तु? झाटोपेकने त्याला पटकन मिठी मारली व त्याचे मनापासुन अभिनंदन केले.... झाटोपेकचा तो सुवर्णपदक विजेता मित्र होता............. फ़्रांसचा अलाय मिमु!:-)

अलाय मिमु शर्यतीनंतर पाणावलेल्या डोळ्याने म्हणाला..... माझ्या सुवर्णपदकापेक्षा झाटोपेकसारख्या अजरामर ऍथलिटने केलेले माझे अभिनंदन मला जास्त महत्वाचे वाटते...


Raviupadhye
Friday, January 18, 2008 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा खरोखर अविस्मरणिय आणि निर्भेळ आनन्द देणा-या या आठवणी वजा गोष्टी आहेत.शाळेत असताना टोकियो ओलिम्पिक ला भारत वि पाक hockey रेडियोवर ऐकली
अबेबे बिकिलाची कहाणी टाकाल का?


Mukund
Saturday, January 26, 2008 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि उपाध्ये.... बिकिलाची रोम व टोकियो ऑलिंपिकमधील आगळ्यावेगळ्या ऑलिंपिक मॅरेथॉन पराक्रमाची कहाणी सांगण्यासारखीच आहे आणी मी ती सांगीनच पण मॅरेथॉन संबंधीतच २ गोष्टी वर लिहिल्यावर जरा बदल म्हणुन थोड्या वेगळ्या गोष्टींबद्दल मी आज लिहिणार आहे.

पण त्याआधी मॅरेथॉनबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगावीशी वाटत आहे. ही स्पर्धा कशी सुरु झाली त्याबद्दल ही माहीती आहे. आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की प्राचिन ग्रीसमधे या ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात झाली. त्यावेळपासुन मॅरेथॉन हा या स्पर्धेचा अविभाज्य भाग आहे ज्यात माणसाच्या एंड्युरंसची खरी परिक्षा होते.

त्याकाळी म्हणजे इसवीसनापुर्वी ४०० वर्षांपुर्वी पर्शियन लोकांनी ग्रीसवर आक्रमण केले. ते आक्रमण त्यांनी मॅरेथॉन सामुद्रधुनीकडुन ग्रिसच्या मॅरेथॉन प्रदेशावर हल्ला करुन सुरु केले. पण ग्रीक योद्ध्यांनी पराक्रमाची शर्थ करुन पर्शियनांचा पाडाव केला. त्या विजयाची बातमी अथिनीयन लोकांकाडे(म्हणजे अथेन्स या राजधानी पर्यंत) पोहोचवण्याचे काम एका तरुण सैनीकाकडे सोपवले गेले. त्या उमद्या तरुणाने मॅरेथॉन ते अथेन्स हे ४० किलोमिटरचे अंतर नद्या,डोंगर,पठार असे विविध प्रदेश पायी धावुन काटले व अथेन्सला जाउन
We are victorious! We are victorious! असे आनंदाने व गर्वाने म्हणुन त्याने अथिनिअन लोकांना त्यांच्या विजयाची बातमी दिली. तेव्हापासुन त्या विजयाच्या आठवणीकरता सर्व ऑलिंपिकम्धे ही ४० किलोमिटरची शर्यत ठेवण्यात आली.

Fast forward 1600 years....

१८९६ चे अथेन्सचे पहिले मॉडर्न ऑलिंपिक्स.... जवळ जवळ १६०० वर्षांनन्तर फ़्रांसच्या पिअर डी क्युबर्टीनच्या पुढाकारामुळे प्राचिन ग्रिसच्या ऑलिंपिक सोहळ्यांचे पुनरज्जिवन झाले. साहजीकच ग्रिसला हे पहिले ऑलिंपिक्स भरवायचा मान दिला गेला. अथेन्समधल्या या पहिल्या मॉडर्न ऑलिंपिक्समधे फक्त १३ देशांनी व ३०० खेळाडुंनी भाग घेतला होता. ग्रिसने सगळ्यात जास्त खेळाडु या स्पर्धेत उतरवले होते पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना एकाही स्पर्धेत पदक मिळाले नव्हते. सगळा देश त्यामुळे शरमेने लाजिरवाणा झाला होता. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धेत ग्रिसचे तब्बल ९ जण उतरले होते. मेन ऑलिंपिक स्टेडिअममधे सगळे ग्रिक क्रिडाप्रेमी जिव मुठीत घेउन प्रार्थना करत बसले होते की देवा.. या मॅरेथॉनमधे तरी आपला खेळाडु विजयी ठरु देत.... त्यावेळेला जंबोट्रोन ही भानगड नसल्यामुळे सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती... आणी शेवटी मेन ऑलिंपिक स्टेडीअममधे पहिल्या स्पर्धकाने प्रवेश केला... आणी सगळे स्टेडीअम जल्लोशात उठुन उभे राहीले... हो.. तो स्पर्धक ग्रिसचाच होता... सगळे स्टेडीअम एक सुरात गर्जु लागले... We are victorious! We are victorious!....

आपल्याला हे माहीतच आहे की जगाची हीच रित आहे की सगळे विजेत्यांनाच लक्षात ठेवतात पण असेही काही प्रसंग व खेळाडु असतात की ते विजयी जरी झाले नाहीत तरी जगातल्या सगळ्या लोकांच्या मनात ते कायमचे घर करुन जातात.. वर आपण त्या टांझानियाच्या स्पर्धकाबद्दल वाचलेच. पण ही पुढची गोष्ट एका वेगळ्याच कारणासाठी लोकांच्या मनात कायमची घर करुन गेली आहे.

१९६४ चे टोकियो ऑलिंपिक्स.. प्रत्येक ऑलिंपिक्समधे यजमान देश आपल्या देशाच्या जुन्या ऍथलिटचा सन्मान म्हणुन त्या ऍथलिट्सना ऑलिंपिक्सची मशाल पेटवायचा किंवा ऑलिंपिक्सचा ध्वज फडकवण्याचा असा सन्मान देतात. टोकियोमधे एक आगळावेगळा सन्मान त्या देशाने आयोजीत केला होता. त्यावर्षी मैदानातल्या ऑलिंपिक ध्वजाची उंची होती... ४९ फ़ुट ४ इंच... इतकीच उंच की जितकी १९२८ च्या ऍमस्टरडॅम ऑलिंपिक्समधे जपानच्या मिको ओडाने मारलेल्या ट्रिपल जंपच्या लांबी इतकी... ज्यामुळे मिकोने जपानला त्यांचे पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवुन दिले होते. त्याच्या आदराप्रित्यर्थ ऑलिंपिक ध्वजाची उंची तेवढीच ठेवली होती. पण त्या ध्वजाच्याच बाजुला अजुन २ ऍथलिट्सच्या आठवणीकरता एक आगळेवेगळे प्रदर्शन जपान ऑलिंपिक कमीटीने मांडुन ठेवले होते...त्याची पार्श्वभुमी अशी....

साल १९३६.. स्थळ होते.. बर्लिन ऑलिंपिक्स. स्पर्धा होती पोल व्हॉल्टची. त्याधीच्या ४० वर्षात ही स्पर्धा अमेरिकन पोल व्हॉल्ट खेळाडुंनीच डॉमिनेट केली होती. हे ऑलिंपिक सुद्धा त्याला अपवाद नव्हते... पण अमेरिकन विजेत्याला २ जपानी खेळाडुंनी अतिशय कडवी लढत दिली. त्यांची ती चढाओढ त्यांना रात्रीपर्यंत घेउन गेली. शेवटी अमेरिकन स्पर्धकाने विजयी उडी मारुन सुवर्णपदक पटकावले... पण रजत व ताम्र पदकासाठी हे २ जपानचे स्पर्धक अजुन २ तास लढत राहीले. ते दोघे होते... शिहेकी निशिडा व ओये. शेवटी रात्री १२ वाजता पंचांनी दोघांमधील स्पर्धा स्थगीत करुन दोघांनाही दुसरा नंबर दिला. दुसर्‍या दिवशी पदक वितरण समारोह सुरु झाला. पण पंचाइत अशी झाली की सुवर्णपदक विजेत्याला सगळ्यात उंच उभे केल्यावर रजत पदकविजेता त्याखालच्या चौथर्‍यावर व ताम्रपदक विजेत्याला सगळ्यात खालच्या चौथर्‍यावर उभे करायचे असते. पण इथे तर दुसरे स्थान २ जणांनी पटकावले होते.. दुसर्‍या स्थानावर कोणाला व तिसर्‍या स्थानावर कोणाला उभे करायचे हा गहन प्रश्न सगळ्यांना पडला... त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे रजत पदक एकच होते व ताम्र पदक सुद्धा एकच होते.. म्हणजे निशिडा व ओये या दोघांपैकी एकाला ताम्र पदक द्यावे लागणार होते. शेवटी संयोजकांनी निशिडाला रजत पदकाच्या चौथर्‍यावर उभे केले व त्याला रजत पदक दिले व ओयेला ताम्र पदकाच्या चौथर्‍यावर उभे केले व त्याला ताम्र पदक बहाल केले.

पण या झालेल्या गोष्टीमुळे निशिडाला काही बरे वाटले नाही.. निशिडा व ओये हे निकट मित्र होते. समारोहानंतर ऑलिंपिक व्हिलेजमधे परत आल्यावर निशिडा ओयेला म्हणाला.. मित्रा आपण दोघांनीही दुसरे स्थान मिळवले आहे तेव्हा मला रजत व तुला ताम्र पदक हे मला अजिबात रुचले नाही. आपण त्यापेक्षा असे करुयात का?... आपण दोघेही आपापले पदक अर्धे कापुयात व सोनाराकडे जाउन अर्धे रजत व अर्धे ताम्र असे ते परत जोडुयात.. व आपण अशी नविन तयार झालेली पदके गळ्यात घालुन मिरवु यात... आणी त्या दोघा मित्रांनी ती कल्पना खरोखरच अमलात आणली... ही बातमी जेव्हा सगळ्या जगाला समजली तेव्हा या दोन मित्रांची ही जगावेगळी निर्भेळ व निस्वार्थी मैत्री सगळ्या जगातल्या लोकांच्या मनाला खरच भावुन गेली....

टोकियो ऑलिंपिकमधले ऑलिंपिक्स ध्वजाबाजुचे ते जगावेगळे प्रदर्शन दुसरे तिसरे काही नसुन ती जगावेगळी दोन अनमोल पदकेच होती.... आजही ही दोन पदके टोकियो ऑलिंपिकच्या म्युझियम मधे आपल्याला बघायला मिळतील...


Mukund
Saturday, January 26, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलिंपिक स्पर्धेत आजपर्यंत अनेक महिला खेळाडुंनी सुद्धा आपले नाव अजरामर करुन ठेवले आहे. या पुढच्या २ आठवणी अशाच २ महिला खेळाडुंबद्दल आहेत...

विजेत्याबद्दल आदर वाटणे हे साहजीकच आहे पण तो आदर शतपटीने वाढतो जेव्हा त्या ऍथलिटने प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन, चिकाटी व आपल्या जिद्दीच्या बळावर दिर्घकाळ स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले असते.. ही पुढची गोष्ट अशाच एका महिला ऍथलिटबद्दल आहे... तिचे नाव आहे.. उलरिके मायफ़ार्थ...

१९७२ चे ऑलिंपिक्स सगळ्यांच्या लक्षात राहीले ते त्यात झालेल्या १३ इस्राएली ऍथलिट्सच्या अपहरणामुळे व त्यानंतर झालेल्या त्यांच्या हत्येमुळे पण त्या स्पर्धेमधल्या ज्या काही गोष्टी गाजल्या त्यात रशियाची इवलीशी जिमनॅस्ट ओल्गा कोर्बुट होती, अमेरिकेचा जलतणपटु मार्क स्पिट्झ होता, रशियाचा अगडबंब वेट्लिफ़्टर व्हॅसिली अलेक्सीव्ह(ज्याच्या नावावर ८० पेक्षा जास्त विश्वविक्रम होते)होता...... पण त्यात अजुन एक नाव लक्षात ठेवण्यासारखे होते.... ते म्हणजे पश्चिम जर्मनिची उलरिके मायफ़ार्थ.... तिने म्युनिचमधे काय केल यासाठीच नाही पण पुढच्या १२ वर्षात तिने दाखवलेली चिकाटी व मेहनत यासाठी तिचे नाव आदरास जरुर पात्र ठरते...

म्युनिचमधे या १६ वर्षाच्या तरुणीने जर्मनिला उंच उडीत सुवर्णपदक मिळवुन दिले... ऑलिंपिक्समधे एवढ्या कोवळ्या वयात महिलांमधे ट्रॅक ऍन्ड फ़िल्डमधे सुवर्णपदक जिंकुन तिने इतिहास घडवला. साहजिकच या कामगिरीचा तिला खुप आनंद झाला. मग पुढची ४ वर्षे तिने अजुन मेहनत घेउन १९७६ च्या मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे परत उंच उडीत भाग घेतला.. पण त्यावेळी इटलीच्या सॅरा सिमीऑनीने तिचा पराभव केला.. उलरिके सहाव्वी आली. जर्मन ऍथलिट फ़ेडरशनने तिला स्पर्धेनंतर टिमच्या बाहेर काढले... तुझे आता वय झाले... तु आता जाडीच झालीस.... वगैरे कारणे देउन तिला संघाबाहेर फेकुन दिले. फक्त २० वर्षे वय असलेल्या उलरिकेला ती गोष्ट फार लागली... फक्त २० वर्ष वय असुन आपल्याला ओल्ड म्हटले याची तिला खंत वाटली. पण नाउमेद न होता तिने कसोशीने कंबर कसली व परत स्वत:च्या जोरावर नियमीत प्रॅक्टीस चालुच ठेवली व पुढच्या २ वर्षात परत एकदा वर्ल्ड चॅन्पिअनशिपमधे आपल्या निपुणतेने जर्मन संघात स्थान मिळवले. पण तिच्या दुर्दैवाने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक्सवर वेस्ट जर्मनिनी बहिष्कार घातला व ती स्पर्धेला मुकली. पण तरीही नाउनेद न होता तिने आपली तयारी चालुच ठेवली व आपले लक्ष १९८४ च्या लॉस ऍंजिलीस ऑलिंपिक्सवर केंद्रीत केले.

१९८४ लॉस ऍंजिलीस ऑलिंपिक्स... उंच उडीचा फ़ायनल्सचा दिवस... सगळ्यात शेवटी स्पर्धा उरली होती फक्त २ जणीत... एक होती इटलीची सॅरा सिमीओनी व दुसरी होती... जर्मनिची उलरिके मायफ़ार्थ... उलरिके आता १९७२ ची षोढशा राहीली नव्हती. पण १९७६ मधे झालेला तिचा अपमान तिच्या मनात अजुन ताजाच होता. त्याने ती प्रेरीत होउन सॅरा सिमिओनीशी..... (जी विश्वविजेती होती व या ऑलिंपिक्सच्या दोनच महिने आधी ती निव्रुत्तीमधुन बाहेर आली होती ऑलिंपिक्समधे परत एकदा सुवर्णपदक मिळवण्यासाठी......)टक्कर द्यायला ती तयार होती. त्या दोघींमधे जवळजवळ २ तास अटितटीची लढत झाली. एकीने एक उंची पार केली की दुसरी तिच्यापेक्षा एखादा इंच जास्त उंच उडी मारुन कुरघोडी करायची. शेवटी जेव्हा सिमिओनीची उंची ३ प्रयत्नानंतर सुद्धा उलरिकेइतकी होउ शकली नाही तेव्हा उलरिकेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु वाहु लागले होते... १२ वर्षाच्या तपश्चर्येचे आज तिला फळ मिळत होते. १९७२ मधे उलरिके मायफ़ार्थने सगळ्यात तरुण सुवर्णपदक विजेती महिला ऍथलीट म्हणुन विक्रम केला होता... आज बरोबर एक तपानी तिने सगळ्यात जास्त वयाची सुवर्णपदक विजेती महिला खेळाडु म्हणुन विश्वविक्रम केला होता... अशा रितीने आपल्या जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात कोरुन ठेवले आहे..


Mukund
Saturday, January 26, 2008 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ही गोष्ट आहे हॉलंडच्या फ़ॅनी ब्लॅंकर्स कुह्नची..... एकाच ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदक विजेते ऍथलीट म्हणुन आपल्याला कार्ल लुइस(१९८४ लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्स) व जेसी ओवेन्स(१९३६ बर्लिन ऑलिंपिक्स) यांचे पराक्रम ठाउक आहेतच पण स्त्रियांमधे हा मान फ़ॅनी ब्लॅंकर्सने १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्समधे मिळवला हे आजच्या पिढीला कदाचित ठाउक नसेल.( त्यानंतर अमेरिकेच्या मेरिअन जोन्सने तसा पराक्रम केला आहे पण उत्तेजीत पदार्थांच्या सेवनामुळे तिची पदके काढुन घेण्यात आली आहेत)

फ़ॅनी ब्लॅन्कर्सने आपली सुरुवात १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्समधे केली. हॉलंडच्या संघात असताना तिने रिलेमधे व उंच उडीमधे पाचवे स्थान मिळवले होते. पण त्या स्पर्धेत तीसुद्धा सर्व जगासारखीच जेसी ओवेन्सच्या चार सुवर्णपदक मिळवण्याच्या अलौकीक कामगीरीने भारावुन गेली होती. आपल्याला चार सोडा पण एकतरी सुवर्णपदक मिळाले असते तर आपण किती खुष झालो असतो असे तिला वाटत होते. तिने जेसी ओवेन्सची स्वाक्षरी मिळवली व एखाद्या अनमोल भेटीसारखी ती स्वाक्षरी जपुन ठेवली.

त्यानंतर दुसर्‍या महायुद्धामुळे पुढची २ ऑलिंपिक्स रद्द झाली. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्समधे फ़ॅनीने परत भाग घेतला. पण आता ती लग्न झालेली व २ मुलींची आई झाली होती. पण दरम्यानच्या १२ वर्षात तिने तिच्या नवर्‍याच्या मदतीने आपला सराव चिकाटीने चालुच ठेवला होता... तिचा सराव म्हणजे एक फ़ॅमीली अफ़ेअर असायचे.. मुलीबरोबर दोरीच्या उड्या मारणे,नवर्‍याबरोबर धावणे वगैरे...

१९४८ च्या ऑलिंपिक्समधे तिने चार स्पर्धेत भाग घेतला होता. १०० मिटर्स स्प्रिंट, ८० मिटर्स हर्डल्स, २०० मिटर्स व ४ बाय १०० मिटर्स रिले...

१०० मिटर्समधे तिने सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकुन सुवर्णपदक पटकावले. ८० मिटर्स हर्डल्स्मधे पण तिने त्याची पुनरावृत्ती केली. एव्हाना सगळ्या हिट्समधे,सेमीफ़ायनल्स व फ़ायनल्समधे धावुन तिची पुरी दमछाक झाली होती व ती नवर्‍याला म्हणाली आता माझ्यात त्राण उरले नाही.... पण नवरा म्हणाला... अग अशी चार सुवर्णपदके मिळवायची संधी तुझ्या आयुष्यात परत परत येणार नाही... जेसी ओवेन्सच्या पराक्रमाची बरोबरी करायची तुला हिच सुवर्णसंधी आहे. तुला २ सुवर्णपदके तर मिळालीच आहेत.... अजुन थोडी कळ काढ... त्या प्रोत्साहनाने स्फुर्ती घेउन ती चौथ्या दिवशी २०० मिटर्समधे फ़ायनल्सला पोहोचली. फ़ायनल्समधे तिला कडवी स्पर्धा होती इंग्लंडच्या क्राउड फ़ेव्हरेट महिलेची.... फ़ायनल खरच फोटोफिनिश झाली पण फ़ॅनीला माहीत होते की तिच फोटोफिनिशमधे जिंकली आहे.. पण लगेच अचानक
God save the king हे इंग्लंडचे राष्ट्रगीत वाजायला सुरुवात झाली... ते ऐकुन फ़ॅनीला वाटले.. अरेरे! खरच इंग्लंडची आपली प्रतिस्पर्धी विजयी झाली व आपण सुवर्णपदकाला मुकलो... पण तिने जेव्हा स्कोरबोर्डकडे पाहीले तेव्हा त्यावर तिचे नाव पहिले म्हणुन झळकत होते.. ती क्षणभर गोंधळुन गेली.. पण तिच्या लक्षात आणुन दिले गेले की ती खरच सुवर्णपदक जिंकली आहे व ते राष्ट्रगीत वाजवले गेले कारण त्याक्षणीच King George the 6th स्टेडिअममधे पदार्पण करत होता म्हणुन ते राष्ट्रगीत....

पाचव्या दिवशी ४ बाय १०० मिटर्समधे ती हॉलंडसाठी ऍन्कर लेगमधे धावणार होती... पण हॉलंडच्या तिसर्‍या लेगमधल्या महिला ऍथलिटने फ़ॅनी ब्लॅंकर्सला जेव्हा बटान हातात दिले तेव्हा फ़ॅनी जवळजवळ १० मिटर्सनी... जी पहीली होती तिच्या मागे होती. पण पहिल्या ५० मिटर्समधे फ़ॅनीने तिला गाठले व नंतर तिला सहज मागे टाकुन हॉलंडला सुवर्णपदक मिळवुन दिले. अशा रितीने एकाच ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदके मिळवणारी एकमेव महिला ट्रॅक ऍंड फ़िल्ड्स ऍथलिट म्हणुन फ़ॅनीने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात अजरामर करुन ठेवले.

तळटिप... लंडन ऑलिंपिक्समधे फ़ॅनीने तिच्या दोन फ़ेव्हरेट शर्यतीत.. लांब उडी व उंच उडी... (ज्यात ती जिंकेल असे भाकीत होते...)त्यात भागच घेतला नाही ज्यात तिच्या नावावर रेकॉर्ड होता!...


Hkumar
Saturday, January 26, 2008 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडे marathon च्या धर्तीवर walkathon हा एक प्रकार ऐकण्यात येतो. कोणी माहिती लिहील त्याबद्दल?

Mukund
Saturday, January 26, 2008 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पुढची गोष्ट सुद्धा टोकीयो ऑलिंपिक्समधे सुरु होते.

या ऑलिंपिकची डायव्हींग स्पर्धा जलतरण तलावात सुरु होण्याची वेळ... अमेरिकेचा बॉब वेबस्टर हा ती स्पर्धा जिंकणार हे सर्वमान्य होते... बॉब वेबस्टर हा विश्वविजेता होता व त्याचा प्रशिक्षक म्हणजे लिजेंडरी डायव्हींग प्रशिक्षक डॉ. सॅमी ली हा होता. स्पर्धा सुरु व्हायच्या २ तासच आधी एक माणुस डॉ. ली कडे चालत येतो व नम्रतेने विनंती करतो... एक्स्युज मी... जरा आपण आपल्या बहुमुल्य वेळातुन फक्त ५ मिनिटे देता का? डॉ. ली म्हणाले.. शुअर! तो माणुस डॉ. लींना जलतरण तलावात जे काही डायव्हर्स सरावाच्या उड्या मारत असतात तिथे घेउन जातो व एका शाळकरी मुलाकडे बोट दाखवुन विचारतो की या मुलाची डाइव्ह बघा व तुम्हाला काय वाटते ते मला स्पष्ट सांगा... त्या मुलाची डाइव्ह बघुन सॅमी ली उत्तरतात.. या मुलाने अशीच डाइव्ह मारली तर याला सुवर्णपदक मिळवण्यापासुन कोणीच थोपवु शकत नाही!.. कोण आहे हा मुलगा? मोठ्या गर्वाने तो माणुस म्हणतो.. हा माझा शिष्य व माझा मुलगा क्लॉड डिबीआसी आहे!

आणी खरच त्या स्पर्धेत त्या १८ वर्षाच्या क्लॉड डिबीआसीने वेबस्टरच्या व त्याचा प्रशिक्षक डॉ. लीच्या तोंडचे पाणी पळवले.. पण शेवटी केवळ अनुभवाच्या जोरावर वेबस्टरने अगदी नॅरो मार्जीनने सुवर्णपदक मिळवले. रजतपदक अर्थातच मिळाले १८ वर्षाच्या क्लॉड डिबीआसीला.

आता होते वर्ष १९६८. मेक्सिको सिटी ऑलिंपिक्स. डायव्हींग फ़ायनल्समधे परत एकदा उतरणीला लागलेल्या तिशीतल्या वेबस्टरमधे व २२ वर्षाच्या क्लॉड डिबीआसीमधे अटितटीचा लढा सुरु झाला. १० डाइव्ह मारायच्या असतात त्यामधे प्रत्येक डाइव्हमधे दोघे एकापेक्षा एक अशा वरचढ डाइव्ह्स मारत होते. वेबस्टरच्या शेवटच्या १० व्या डाइव्ह नंतर वेबस्टर पहिल्या स्थानावर होता. त्याला हरवायला डिबीआसीला सर्वात कठीण अशी हॅन्ड स्टॅन्ड करुन बॅकवर्ड फ़्लिप व ३ ऍन्ड हाफ़ समरसॉल्ट अशी सगळ्यात कठीण डाइव्ह यशस्वीरित्या मारुन दाखवावी लागणार होती. तो पुलमधे पाण्यापासुन ३० फ़ुट उंचावर उलटा हातावर डायव्हींग बोर्डच्या काठावर उभा राहीला.. सगळे प्रेक्षक व पंच अतिशय पिन ड्रॉप सायलंसमधे उत्सुकतेने त्या डाइव्हची वाट बघत होते... इथे वेबस्टरचा प्रशिक्षक डॉ. सॅमी ली पण जीव मुठीत घेउन डिबीआसीच्या त्या प्रयत्नाकडे पाहात होता.. त्याच्या मनात तो म्हणत होता.. देवा प्लिज एकदाच या अमेझींग डिबीआसीची डाइव्ह चुकीची पडु दे.... असे म्हणत असतानाच डिबीआसीने पाण्याकडे झेप घेतली होती... आणी दोन सेकंदांनंतर डिबीआसी जेव्हा पाण्यात प्रवेशकर्ता झाला तेव्हा पंचच काय.. पण डो. सॅमी लीच्या मनातही किंचीतही संदेह नव्हता की क्लॉड डिबीआसीने सुवर्णपदक जिंकले आहे.. आणी खरच डिबीआसीने मायटी वेबस्टरला हरवुन सुवर्णपदक जिंकले! डॉ. सॅमी लीला त्यानंतर २ महीने स्फगेटी बघुन मळमळायला होत होते व तो स्फगेटी खाउ शकला नाही....( डिबीआसी इटालीअन असल्यामुळे!:-))

पुढे क्लॉड डिबीआसीने १९७२ म्युनिक ऑलिंपिक्समधे सुद्धा सुवर्णपदक मिळवुन आपले डायव्हींगमधले वर्चस्व चालु ठेवले.

आता साल होते १९७६... मॉंट्रीयाल ऑलिंपिक्स... परत एकदा डिबीआसी डायव्हींग स्पर्धेत उतरला.. तेही परत एकदा फ़ेव्हरेट म्हणुन... या वर्षी अमेरिकेने व डॉ. सॅमी लीने आपल्याबरोबर एक १६ वर्षाचा कोवळा डायव्हर नेला होता... त्याचे नाव होते ग्रेग ल्युगॅनीस.... अमेरिकेच्या व डॉ. सॅमी लीच्या त्या कोवळ्या मुलाकडुन फार मोठ्या अपेक्षा होत्या. आता चित्र १९६४ च्या टोकियो ऑलिंपिक्स सारखेच होते... फक्त आता बॉब वेबस्टरची जागा तिशीतल्या डिबीआसीने घेतली होती व डिबीआसीची जागा ल्युगॅनीसने घेतली होती.

आणी यावेळेलाही निर्णय शेवटच्या डाइव्हपर्यंत लागला नव्हता. या वेळेला शेवटची डाइव्ह मारायची होती ल्युगॅनीसला... पण त्याधी नवव्या डाइव्हला ल्युगॅनीसने त्याचा कोच डॉ. सॅमी लीला जोरात ओरडताना ऐकले होते व त्याला वाटले की त्याचा गुरु त्यालाच ओरडला की काय.. खर म्हणजे डॉ. ली पंचांना उद्देशुन ओरडला होता पण १६ वर्षाच्या ल्युगॅनीसला वाटले की त्याने काही चुकी केली म्हणुनच त्याचा गुरु त्याला ओरडला असावा. त्याचा त्याच्या मनावर परिणाम होउन त्याने त्याच्या दहाव्या व शेवटच्या उडीत थोडीशी चुक केली व त्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले व क्लॉड डिबीआसीने त्याचे लागोपाठ तिसरे ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले. आजही ऑलिंपीक्स डायव्हींगबद्दल लिहिले जाते तेव्हा क्लॉड डिबीआसीचा उल्लेख आदराने एक महान डायव्हर म्हणुनच केला जातो...

आणी तो १६ वर्षाचा ग्रेग ल्युगॅनीस? त्यानेही पुढे जाउन १९८४,१९८८ व १९९२ मधे सुवर्णपदके मिळवुन क्लॉड डिबीआसीच्या विक्रमाची बरोबरी केली.. त्याबद्दल पुढे कधीतरी...


Kedar123
Saturday, January 26, 2008 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान मुकुंद

खरच अफलातून किस्से लिहीता आहात.

कीप गोइंग.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators