गूढ अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 September, 2020 - 07:25

हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.

आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.

कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.

एक नमुद करु इच्छीतो की ज्यांना गंभीर अमानवीय अनुभव येतात त्यात तथ्य नाही असा कुठला दावा करण्याचा हेतु नाही. ज्यांना ते येतात ते त्यांच्या दृष्टीने पूर्ण खरे असतात आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलेले असतात. तेव्हा इतर कुणाचे तसे अनुभव सांगून, त्यामागील कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे करु नये. मात्र तुमचे स्वत:चे जर तसे काही अनुभव असतील आणि त्यामागील कारण मिमांसा जाणुन घेण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करायची असेल तर करु शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे काही छोटे अनुभव:

  • रात्री येणारा घुंगरांचा आवाज:

लहानपणची गोष्ट. गावी आमच्या कॉलनीत तेव्हा वीज नव्हती. आमची कॉलनी म्हणजे एक जुन्या बंद पडलेल्या ऑइल मिल ची कॉलनी होती. त्यात मोठी रिकामी गोदामे होती, त्याना पत्र्यांचे छत होते. त्याच्या आजुबाजुला घरे. उन्हाळ्यात लोक बाहेर झोपायचे. एकदा उन्हाळ्यात अचानक रात्री घुंगराचा आवाज येउ लागला. कधी गोदामावरुन, कधी अजुन कुठुन. दोन चार दिवस त्याची खूप चर्चा झाली. नंतर लक्षात आले की कुणी तरी एका मटमटीच्या ( घुबडा सारखा एक निशाचर) पायात घुंगरु बांधले आहे, त्याचा तो आवाज होता.

  • रात्री आपोआप लागलेला खोलीतला दिवा:

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, वाशीला एका वनरुन पँंट्री फ़्लॅट मध्ये दोन मित्रांसह रहात होतो.
मला रात्री झोपताना पूर्ण अंधार लागतो, नाईट लॅंप पण चालत नाही. त्या दिवशी आम्ही दोघेच होतो, एक मित्र गावी गेला होता.
रात्री अचानक जाग आली. लक्षात आले की ट्युब लाईट सुरु झालाय. बाजुला पाहिलं तर मित्र झोपलाय.
कुणी लावला दिवा? कळेना.
काहीच सेकंदात मित्रही उठला. डोळे चोळत म्हणाला लाईट का लावलास? मी म्हटलं मी नाही लावला, आपोआप लागला.
दोघेही उठुन बसलो. त्या ट्युब लाईटच्या बटनाचा स्प्रिन्ग जरा सैल होता आणि बंदच्या स्थितीत वरचा भाग पूर्ण मागे टेकत नव्हता. पण दिवा आपोआप लागेल एवढा सैलही नव्हता स्प्रींग.
आम्ही अजून काही बोलणार एवढ्यात काही हालचाल झाली स्विचबोर्ड जवळ.
तोंडात रातकीडा धरलेली पाल त्या स्विच बोर्डच्या साधारण फ़ूटभार खालुन त्या बटणा जवळुन सर्र्कन वर जाउन थांबली.
आणि थोडा पॉज घेउन वर निघुन गेली.
तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. कि्डा पकडायला त्याच्या मागे धावलेली पाल त्या बटनावर पाय देउन गेली होती आणि स्र्पिंग सैल असल्याने बटन सुरु होउन ट्युबलाईट लागला होता. बंद करुन आम्ही परत झोपुन गेलो.

  • अचानक सुरु होणारा नळ:

काही वर्षे झाली, एका बाथरुम मधला नळ अचानक स्वत:हून सुरु झाला असे बायकोने सांगीतले.
मी नळ चालू बंद करुन पाहिला व्यवस्थीत चालू बंद झाला, पण जर अधिक जोर लावून बंद केला तर कदाचित नळा मधील झडपेचे आटे खराब होउन नळ गळु लागेल असे मला वाटले. याची झडप बदलावी अशी मी मनात नोंद केली. (घरात प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियनची कामे मीच करतो.).
पण मी ते नंतर विसरलो आणि सधारण आठवडाभर काहीच झाले नाही. हा नळ रोजच्या वापरातला नव्हता.
आणि एक दिवस रात्री नळ अचानक सुरु झाला. झोपेत मलाच पाण्याचा आवाज येउन जाग आली. किती वाजले होते वगैरे लक्षात नाही.
मी नळ बंद करुन झोपून गेलो. सकाळी मात्र अंघोळ करण्या पूर्वी मी दुकानात जाउन झडप घेउन आलो आणि झडप बदलली. तेव्हा लक्षात आले की जुन्या झडपेचे आटे जरा खराब झाले आहेत. पाण्याचा दाब वाढला आणि जास्त वेळ राहिला की आटे घसरुन झडप भसकन उघडली जात होती. ती झडप बदलल्यावर परत कधी तो नळ आपोआप उघडल्या गेला नाही.

इथे दुस~या धाग्यावर वावे आणि प्रकाश घाटपांडे यांनी सांगितलेले अनुभव कॉपी करण्याची इच्छा आहे, त्यांची परवानगी असल्यास.
किंवा त्यांनी स्वत: केल्यास उत्तमच.

चांगला धागा मानव.
मी कॉपी करते माझा अनुभव.

कॉलेजला पुण्याला असताना मी पेइंग गेस्ट/कॉट बेसिस वर राहायचे. घरमालकांचं कुटुंब खाली राहायचं, वर समोरासमोर दोन खोल्यांमधे आम्ही मुली राहायचो. तशीच खालीपण एक खोली होती, त्यात दोन मुली राहायच्या. एकदा पी. एल. मधे मी रात्री अभ्यास करत बसले होते. रात्रीचा एक वाजला होता. माझी कॉट भिंतीला लागून होती, त्या भिंतीतून अचानक घोरण्याचा आवाज येउ लागला. रूममेट झोपली होती पण ती घोरत नव्हती. समोरच्या रूममधे त्या रात्री कुणीच नव्हतं हे मला माहिती होतं, खालच्या रूममधून आवाज येत असेल असं म्हणून मी पुस्तक बंद करून झोपले. त्यानंतर खूप दिवसांनी एकदा असंच रात्री उशीरापर्यंत आम्ही तिघी जाग्या होतो आणि परत एकदा मला असा भिंतीतून घोरण्याचा आवाज येउ लागला. मी मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांनी आधी मला वेड्यात काढलं पण माझ्या कॉटवर बसून आवाज ऐकल्यावर त्या टरकल्या, कारण त्या दिवशी खालच्या रूममधे कुणीच नव्हतं, हे आम्हाला माहिती होतं । आणि समोरच्या रूममधली मुलगी आमच्याबरोबरच होती. आधीही असा आवाज आल्यामुळे यावेळेस मी ठरवलं की या आवाजाचं मूळ शोधायचं . मी खाली जिन्यात जाउन उभी राहिले आणि मैत्रिणीला सांगितलं की आवाज आला की मला सांग. असं ३-४ वेळा केल्यावर लक्षात आलं की समोरच्या बंगल्यातून हा आवाज येतोय. इतका लांबचा आवाज इतक्या स्पष्टपणे भिंतीतून येताना बघून आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटलं, पण १००% खात्री झाल्यामुळे आम्ही निर्धास्त झोपलो.

मला आलेले गेल्या वर्षातला दोन अनुभव नोंदवावेसे वाटतात.

ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

चांगला धागा

उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण >>> आवडले.

मानवकाका, माझाही एक अनुभव आहे असा, जरी हल्ली मी भुत अन देव दोन्हीवर विश्वास ठेवते तरी. नंतर लिहीते थोड्यावेळाने.

माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते - मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली. मी पर्सवरचा हात काढून डोक्यावर हात नेला की तो हात एकदम जायचा. असे १० मिनीटे चालले. मी मागे वळून तुसड्यासारखी म्हणाले "हात मत लगाओ" , ती बाई म्हणाली "मै नही लगा रही हूं" परत तिला म्हटले "एक बार बोला ना हाथ मत लगाओ" ती बाई परत म्हणाली "अरे बहन मै नही लगा रही हुं". मी पर्सवरचा हात चटकन डोक्यावर नेऊन तो हात पकडायचा प्रयत्न अनेकदा केला पण तो हात बरोब्बर "इन निक ऑफ टाईम" निघून जायचा त्यामुळे माझ्या काही तो हात पकडीत आला नाही.

१० मिनिटात मला काही गोष्टी जाणवल्या - (१) स्पर्श हळूवार होता , स्त्रीचा होता(२) हाताची बोटे लहानसर (लांबसडक नाही) पण निमुळती होती . (३) टाळूवरुन हात क्लॉकवाईज फिरत होता.
बरं मागील कोणाही स्त्रियांना काही दिसत असल्याचे जाणवत नव्हते. त्या गप्पांमध्ये मग्न होत्या.
मी ना पर्सवरचा हात सोडायला तयार होते ना बारवरचा. कारण बारवरचा हात सोडला असता तर १००% बाहेर फेकले गेले असते.
तब्बल १० मिनिटांनी हात फिरणे थांबले व मी त्या दिवशी गर्दीमुळे मुलुंडऐवजी ठाण्याला उतरून परत मुलुंडला आले. मुलुंडला माझा फ्रेन्च भाषेचा वर्ग होता (शिकत होते) तो करून घरी आले .
_________________________________________

चोरट्या बायकांची मोडस ऑपरंडी असेल काय?

सामो
तुमचा (किंवा अजून कोणीतरी) हां असाच अनुभव ह्याआधी जिथे मांडला होता (बहुतेक अमानवीय धागा) तिकडे दारात उभे राहिल्याने रेसोझन्स् निर्माण होऊन असे घडले असावे ह्या अर्थाचे काही प्रतिसाद वाचल्याचे ओझरते आठवतात.

अनंतनी बरोबर. तसे असेल तर मग मला अन्य काही अनाकलनिय अनुभव नाहीत. हाच एक आहे. बाकी स्वप्ने तर ओपन टु इन्टरप्रिटेशन असतात. ती गूढ अनुभवांत धरता येणार नाहीत.
आठवण करुन दिल्याबद्दल आभार. आय रेस्ट माय केस. मला अन्य काही अनुभव नाहीत.

चोरट्या बायकांची मोडस ऑपरंडी असेल काय? शक्य आहे.
ती नेमकी परिस्थिती कशी होती, कुणाचा हातच होता की आणखी कशामुळे हात फिरवल्यासारखे वाटत असेल हे इतर कुणी कल्पना करून सांगणे कठीण वाटतेय.

कायच्या काय पर्सनल प्रश्न आहेत याची जाणीव आहे, उत्तरे मनात द्या.
केस कसे होते म्हणजे बांधलेले इ.
ट्रेन मधल्या पंख्याचा झोत आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याची दिशा, वेग आणि गर्दी असल्याने बाहेरचा वारा दारातून सरळ आत न शिरता वरच्या दिशेने / कोनात गेल्याने बारीक वावटळ होते तसं कशी तयार झालं असेल का? रस्त्यात अचानक वारा येऊन कचरा गोल फिरतो तसं काही? ते घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने झालं असेल का?

https://www.maayboli.com/node/67291

रिक्षा

हा माझा खरा अनुभव आहे, एवढंच की मी कोसळले नाही. तोंडावर पांघरूण ओढून झोपले. थकले होते लगेच झोप लागली. खूप भित्रा स्वभाव आहे, स्वतःच्या पैंजणाच्या आवाजाला घाबरणारा Biggrin
त्या दिवशी काही तास एकटी होते हे ही थोडं modification

दुसऱ्या धाग्यावर लिहिलेला साधासुधा अनुभव सोडून दुसरा काही अनुभव नाही...
गुढ अनुभवांचे शास्त्रीय कारणे समजून घ्यायला आवडतील...
छान धागा..

असाच एक अनुभव माझा सुद्धा आहे
हॉस्टेल वर असताना रात्री अभ्यासा साठी जागरण व्हायची.
एका रूम मधे आम्ही 5 जनी राहत होतो. एके दिवशी सगळ्या रुमेट्स लवकर झोपल्या आणि मी एकटीच रात्री 2 पर्यंत वाचत बसली होती अचानक रस्त्यावरून घुंगरांचा आवाज यायला लागला. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती मी खिडकीतून खाली पाहिले पण रस्त्यावर कुणीच दिसले नाही. असेल कुणीतरी म्हणून मी झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी लवकर लाईट बंद करून आम्ही सगळ्या जनी झोपलो पण कालच्या प्रकाराने मला चांगली झोप येत नव्हती अर्धवट झोपलेल्या अवस्थेत पुन्हा घुंगरानचा आवाज आला यावेळेस मात्र मी खूप घाबरली रुमेटला उठवल तिने लाईट लावून खिडकी जवळ जाईपर्यंत कुणीतरी घुंगरू घालून रस्त्यावरून धावत जातोय असा जोरात आवाज व्हायला लागला पण खिडकीतून पाहिल्यावर परत खाली कुणीच नव्हत. आता रूमेट्स पण थोड्या घाबरल्या.
दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी लाईट लाऊन जागं राहुन काय प्रकार आहे हे पहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी पण घुंगरानचा आवाज आला कुणीतरी जोरात धावत जातंय अस वाटायचं पण दिसायचं मात्र कुणीच नाही..आम्ही खुपचं घाबरलो. लाईट रात्रभर चालू ठेऊन हनुमान चालीसा लाऊन झोपलो. मी तर रुमेटचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता की अक्षरशः सकाळी तिच्या हातांवर माझ्या नखांचे ओरखडे उमटले होते.
सकाळीच आम्ही आमच्या हॉस्टेल च्या वोनर ला सांगितला ती आमच्यापेक्षा पण घाबरट होती. मी आमच्या ' यांना ' सांगते म्हणे मग पाहू काहीतरी..तिनेच आजूबाजूच्या रूम मधे चौकशी केली तर आमच्याच मजल्यावरच्या दुसऱ्या रूम मधल्या मुलींनी पण घुंगरानचा आवाज येतो अस सांगितलं. आम्ही सगळेच खूप घाबरुन होतो.
आमच्या ओनर म्हंटल्या कुणीतरी पोरं उगीच मुलींना घाबरायला असला प्रकार करत असेल.
पण रस्त्यावर कुणी दिसायची पण नाही. या सगळ्यात माझा अभ्यास खूप मागे पडत होता. रात्रीच जागरण तर सोडाच दिवसा पण एकटीला हॉस्टेलवर भीती वाटायची. रात्री नीट झोप व्हायची नाही म्हणून सकाळी लेट उठण चालू झालं. 4 5 दिवस असेच घाबरत गेले मग यावर आपणच काहीतरी उपाय शोधावा असं वाटून मी सकाळीच उठून हॉस्टेल च्या खाली असलेल्या बाकावर येऊन बसले. जाम टेन्शन आलेल होत. अभ्यासाचे तीन तेरा वाजले होते. आज काही करून हे प्रकरण मिटवायच हे ठरवून मी आजूबाजूचा रस्ता , येणारी जाणारी लोक, आजूबाजूचे अपार्टमेंट्स सगळ्यांचे निरीक्षण करत बसले. 2 तास होत आले पण कुठेच काही संशयास्पद वाटतं नव्हते आणि अचानक तो घुंगरानचा मंद आवाज कानी पडला.
रहदारी मूळे तो खुपचं क्षीण होता तरी मी लक्षपूर्वक त्या आवाजाचा पाठलाग केला आणि समोरच्या गल्लीत जे दिसलं ते पाहून तर मला अगदी हसावं की रडाव असच झालं.
एका बारक्या कुत्र्याच्या पिल्ल्याच्या गळ्यात कुणीतरी घुंगरू बांधले होते. तो धावला की धावणाऱ्या घुंगरानचा आवाज यायचा अगदी रात्री यायचा तसा..कुणीतरी माणूस धावतोय असा..
मी एकदाच हुश्श केलं आणि इतके दिवस ज्या बारक्या पिल्लाने आम्हाला दहशतीत ठेवलं त्याला साष्टांग नमस्कार केला आणि निर्धास्त होऊन रूमवर आले.

ट्रेनमध्ये उभे असल्यावर आपल्याला वारा(W) जोरात लागतो. आपली बॉडी(B) कॉन्स्टंट असून फक्त केस(K) वाऱ्यावर उडतात. तो जोराचा वारा पाठीमागे जाऊन एक रेझोनन्स(R) तयार करतो. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर पाठीमागे तयार होणाऱ्या रेझोनन्सची ताकद पुढील सूत्राने समजते
P= R£-Kπ÷B∆ तर या रेझोनन्सची ताकद ही हातासारखा स्पर्श निर्माण करून आपल्याला कोणीतरी हात लावतोय असा भास निर्माण करू शकते.

>> Submitted by अमृताक्षर on 30 September, 2020 - 19:17

Lol अगदी असेच असते. आपण भयंकर काही कल्पना करतो प्रत्यक्षात खूप क्षुल्लक कारण असते ते लक्षात येते तेंव्हा भरपूर मनोरंजन होते.

हो ना..आणि सगळ्या रुमेट्स माझ्यावर चिडत होत्या की तू लक्षात आणून दिलं म्हणूनच आम्ही घाबरलो नाहीतर आधी निवांत झोपत होतो म्हणे..2 3 दिवस तर चांगलाच राग सहन करावा लागला होता मला सगळ्यांचा..म्हणून मीच त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावला..

हा काही वर्षांपूर्वी असाच अनुभव. तेंव्हा चांगलीच तंतरली होती. त्या छोट्या फ्ल्याटवर एकटा राहत होतो. कंपनीने गेस्ट हाउस म्हणून घेऊन ठेवला होता. दिवसभर काम करून थकून भागून आल्यानंतर लवकर झोप लागे ती सकाळीच जाग येत असे. अतिशय व्यस्त असे ते दिवस होते. येऊन पंधरा वीस दिवस झाले असतील. आता कुठे थोडीफार नवीन जागेशी सवय लागली होती. एक दिवस असेच थकून भागून येऊन रात्री बेडवर पडल्या पडल्या लगेच डोळा लागला. पण कधी नव्हे ती त्या रात्री उशिरा अचानक जाग आली. डोक्यावरचे पांघरून हळूच काढून पाहतो तर खोलीत अंधार गुडूप झाला होता. काही म्हणजे काही दिसत नव्हते. अर्थात वीज गुल झाली होती. यूपीएस पण बोंबलला होता बहुतेक. कारण पूर्ण घर काळोखात होते हे जाणवले. बाहेर वातावरण चांगले वाटत नव्हते. जोराचा वारा सुटला होता. त्यामुळे हलणाऱ्या झाडांच्या सळसळणाऱ्या पानांचा आणि वाकून एकमेकांवर घासणाऱ्या फांद्यांचा जोरजोरात आवाज येत होता. पण झोपेचा अंमल जबरदस्त असल्याने मी डोक्यावरचे पांघरून ओढून पुन्हा डोळे मिटले. आणि अचानक डोक्याशेजारी वॉचमनने काठी आपटल्याचा आवाज आला. एरवी त्या सोसायटीतले वॉचमन रात्रीच्या वेळी काठी आपटत जातात ते इतक्या दिवसांत माहित झाले होते, त्यामुळे हा आवाज तसा अपरिचित नव्हता. भिंतीना परावर्तीत झाल्याने तो आवाज कानाच्या जवळ वाटायचा. पण यावेळचा आवाज वॉचमनच्या काठीचा असणे हे थोडे विचित्र वाटत होते. इतक्या रात्री आणि ते सुद्धा वादळ वाऱ्यात वॉचमन कशाला फिरेल? पण असेल एखादा वॉचमन, उशिरा ड्युटी करत असेल असा विचार केला आणि डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने पुन्हा काठी आपटल्याचा आवाज. यावेळी डोक्याच्या अजून जवळ. मग मात्र लक्षात आले हा वॉचमनच्या काठीचा आवाज वाटत नाही. कारण यावेळी आवाज बराच स्पष्ट ऐकायला आला. आणि मग झोप उडाली. सावध होऊन आवाज ऐकणे सुरु केले. आणि काही मिनिटांनी कानाच्या जवळ स्पष्टपणे दोन वेळा काठी आपटल्याचा आवाज आला.

आता मात्र खात्रीच पटली. हा वॉचमनच्या काठीचा नाही. हा वेगळा आवाज आहे. नेहमीचा नाही. अन्यथा जाग आली नसती. अवेळी जाग येण्याचे हेच कारण आहे हे लक्षात आले. पण कसला आवाज? पुन्हा एकदा काठी आपटली. ठॉक्क, ठॉक्क. डोक्याशेजारी खिडकी होती. खिडकीबाहेरून तर कोणी काठी आपटत नसेल? फ्ल्याटवर कोणी नाही असे समजून चोरीच्या उद्देश्याने कोणी आले असेल आणि खिडकी तोडण्यापूर्वी भिंतीवर काठी आपटून अंदाज तर घेत नसेल? कि माझे लक्ष नसताना कधीतरी आत कोणी येऊन बेडखाली वगैरे लपून तर बसले नसेल (हि माझ्या दृष्टीने सर्वात भीतीदायक शक्यता)? नानाविध विचार. जे मनात येऊ नये ते येत होते. श्वास रोखून जीव कानात आणून हालचालींचा अंदाज घेत होतो. असेच काही क्षण भयंकर तणावात गेले. आणि पुन्हा एकदा डोक्याच्या मागे जवळच जोरात काठी आपटल्याचा आवाज. यावेळी एकदाच पण जास्तच जोरात. ठॉक्क!

कसला आवाज? कोण असेल? भूत वगैरेची भीती वाटत नव्हती. पण हत्यार घेऊन कोणी एकदोघे तयारीनिशी आले असतील तर मी काय करणार होतो? ती भीती जास्त होती. लाईट नसल्याने उठून लाईट लावायचा प्रश्न येत नव्हता. म्हणून पट्कन उठून खिडकीचा पडदा उघडायचे ठरवले जेणेकरून बाहेरचा अंधुक प्रकाश येईल. दीर्घ श्वास घेतला. तोच पुन्हा काठी आपटल्याचा आवाज. सलग दोन वेळा आवाज आला. ठॉक्क, ठॉक्क! यावेळी हलकेच आपटली होती. पण जाणीवपूर्वक डोक्याजवळ आपटल्यासारखी. मला घशाला कोरड पडलेली जाणवली. आता मात्र जे काय असेल ते असेल. मनाची तयारी करून येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचे ठरवले. पर्याय नव्हता. काही झाले तरी आता तसेच झोपून राहणे जास्त धोकादायक वाटू लागले. कारण काठीचा पुढचा तडाखा थेट डोक्यात बसला तर काय? बेशुद्ध पाडण्यासाठी चोर हे करू शकतात. तितक्यात अजून एकदा आवाज. ठॉक्क! त्यासरशी मनाचा हिय्या करून तोंडावरचे पांघरून झट्कन काढून फेकले, ताडकन उठून बसलो, आणि खच्चून ओरडलो "कोण आहे ऽऽऽ?" अंगावर सरसरून काटा आला होता. डोळ्याचे पाते लावायच्या आत खिडकीच्या पडद्याची चेन त्वरेने ओढून पडदा भराभर वर घेतला. बाहेरचा प्रकाश थोडफार आत आला. त्या अंधुक प्रकाशात डोळे फाडफाडून आजूबाजूला बघितले. खोलीत सर्वकाही नेहमीसारखे जाणवले. बेडरूमचा दरवाजा बंद होता. कुणीही आले असल्याच्या कसल्याही खाणाखुणा जाणवत नव्हत्या. म्हणजे घरात तरी कोणी आले नव्हते हे नक्की. अन्यथा ती व्यक्ती आता गप्प थांबली नसती. मग खिडकीबाहेर कोणी असेल का? शिडी लावून वर चढून वगैरे आलेले? एका बाजूची काच सावधपणे सरकवून उघडली. त्याबरोबर थंडगार वारा भस्सकन घरात घुसला. मी अंदाज घेतला आणि काचेबाहेर डोके काढून जोरात ओरडलो "वॉचमऽऽऽन... वॉचमऽऽऽन..." माझ्या आरोळ्या हवेत विरल्या. आजूबाजूला सगळी सोसायटी अंधारात चिडीचुप्प दिसत होती. जोराचा वारा मात्र सुटला होता. आडवा तिडवा. झाडांना अक्षरशः घुसळून काढत होता. थोड्याच वेळात पाऊस येण्याची दाट शक्यता होती. सगळीकडेच लाईट गुल झाले होते. दूरवर अंधुक प्रकाशात दिसणाऱ्या गेटवर सेक्युरिटी केबिनमध्ये सुद्धा कसली हालचाल जाणवत नव्हती.

चला म्हणजे चोर वगैरे कोणी नाही हे पक्के झाले. जीव भांड्यात पडला. चोरच काय वॉचमन सुद्धा नव्हते. पण मग काठी कोण आपटत होते? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच होता. काठी आपटत नसेल तर तो आवाज कसला? स्पष्ट होता तो. भास नव्हता हे नक्की. अजून एक म्हणजे मघाशी बेडमधून उठल्यापासून मात्र तो आवाज आला नव्हता. आता फक्त अमानवी शक्ती हा एकच पर्याय होता. जो मनाला पटत नव्हता. मी अजून थोडा वेळ आवाजाची वाट पहिली. पण आवाज आला नाही. घड्याळात बघितले. रात्रीचे दोन-अडीच वाजलेले. झोपेचे खोबरे केंव्हाच झाले होते. मी खिडकीची काच बंद केली. पडदा खाली घेतला. आणि पुन्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपी जायचा प्रयत्न केला. असाच एखाद दुसरा मिनिट गेला असेल. आणि डोक्याजवळ पुन्हा काठी आपटली. चांगली दोन तीन वेळा.

हे भगवान! धिस इज टू मच. आता मात्र खरंच हद्द झाली. दोन तीन मिनिटांनी पुन्हा काठी आपटली गेली. स्पष्ट. खणखणीत. पुन्हा एकदा आपटली. ठॉक्क, ठॉक्क. काठीच होती एकशे एक टक्के. जमिनीवर किंवा भिंतीवर कुणीतरी आपटलेली. यावेळी मात्र फक्त तोंडावरचे पांघरून काढून अंदाज घ्यायचे ठरवले. आणि अलगदपणे पांघरून काढून अंधारात डोळे फाडून पाहत कानात जीव आणून ऐकू लागलो. काही क्षण असेच गेले आणि अपेक्षितपणे डोक्याच्या मागून पुन्हा काठीचा आवाज आला. पट्कन त्या दिशेने मान वळवली. खिडकीच्या पडद्याचा खालचा जाडजूड रॉड हलकेच भिंतीवर आदळत होता. ठॉक्क, ठॉक्क, ठॉक्क, ठॉक्क. अरे पण इतका जाडजुड पडदा कोण हलवतेय? थोड्या वेळाने पुन्हा पडदा हलला. पुन्हा रॉड भिंतीवर आपटला. आता मात्र मी सावकाशपणे उठलो आणि पडदा वर न घेता पडद्याच्या एका बाजूने फटीतून बाहेर पाहू लागलो. पाहतो तर बाहेरून पवनराज पडद्याला धक्का देत होते! पलीकडची काच नीट सरकली नव्हती. अगदी बारीकशी फट तिथे राहिली होती. पण बाहेर जोराचा वादळी वारा असल्याने तितक्या फटीतून हळूहळू हवा आत येऊन काच आणि जाडजूड पडद्यामध्ये साठत होती. पडदा हलकेच फुगायचा. पण थोड्या वेळात ती हवा भरपूर साठून पडद्यातून निघून जायची. त्यासरशी पडद्याचा रॉड भिंतीवर आपटायचा. मघाशी मी खिडकी उघडली होती तेंव्हा पडदा वर घेऊन या बाजूची काच उघडल्याने हवा साठून राहत नव्हती. ती थेट आत येत होती. रॉड भिंतीवर आपटायचा प्रश्न येत नव्हता. हे लक्षात आल्यावर मी ती काच नीट बंद केली. आता मात्र बराच वेळ झाला तरी पडदा हलला नाही. हलेल कसा? कारण हवाच येत नव्हती. काठी वाजली नाही. मग सगळ्या प्रकारचा उलगडा झाला. मी बेडवर पुन्हा आडवा झालो. पांघरून घेतले. एकवार हात लांब करून पडदा हलकेच ओढून पुन्हा सोडून दिला. ठॉक्क, ठॉक्क. दोनतीन वेळा आवाज आला. अजून एकदोनदा तो आवाज काढून जरा मजा घेतली. डोक्याजवळ काठी आपटल्याचा आवाज. मग स्वत:शीच हसत डोक्यावर पांघरून ओढले. आणि झोपी गेलो.

पुण्यात एक कोर्स करत असताना हडपसर परिसरात PG ला राहत होतो. सगळं काही सुरळीत चालू होतं. एके दिवशी रात्री मोबाईल खेळत खेळत झोपलो. साधारण पहाटे 3 च्या सुमारास अचानक जाग आली. तहान लागली होती म्हणून उठायचा प्रयत्न केला तर छातीवर कुणीतरी बसलंय असं वाटत होतं. हात पाय काहीच हलवता येईना.. हे असं काही पहिल्यांदाच होत होतं.. जाम टरकलो. माझ्या डोक्यात विचार आला भूत! त्या दिवशी आमच्या ग्रुपमध्ये भुतांच्याच गोष्टी सुरू होत्या. मग मारुतीस्तोत्र म्हणायचा प्रयत्न केला. कसलं काय, जीभ देखील वळत नव्हती. जास्तीत जास्त 2 मिनिटांचा हा प्रकार, पण कितीतरी तास उलटून गेले असावेत असं वाटत होतं. दीर्घ श्वास घेऊन मी जागेवर आलो. उठून पाणी वगैरे प्यायलो आणि मोबाईल घेतला हातात. काय झालं असावं याचा शोध घेतला तर...

सकाळी लवकर उठून, भरपेट नाश्ता करीन 4 किमी जाणे, 8 वाजता क्लास असे. मग एकामागोमाग एक लेक्चर करून भर दुपारी 3 वाजता परत. मध्यंतरी फक्त कॉफी घ्यायचो, परत आल्यावर जेवण. जेवण झाल्यावर टीपी टाकत भटकत राहायचो. रात्री पण झोपायला कधी 2 तर कधी 3 वाजायचे. झोप नीट व्हायची नाही. त्यात वजन भरपूर! ऍसिडिटी वगैरेचा एकत्रित परिणाम होऊन झोपेत मला स्लिप पॅरालिसिसचा झटका आला होता!

Pages