गूढ अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 September, 2020 - 07:25

हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.

आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.

कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.

एक नमुद करु इच्छीतो की ज्यांना गंभीर अमानवीय अनुभव येतात त्यात तथ्य नाही असा कुठला दावा करण्याचा हेतु नाही. ज्यांना ते येतात ते त्यांच्या दृष्टीने पूर्ण खरे असतात आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलेले असतात. तेव्हा इतर कुणाचे तसे अनुभव सांगून, त्यामागील कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे करु नये. मात्र तुमचे स्वत:चे जर तसे काही अनुभव असतील आणि त्यामागील कारण मिमांसा जाणुन घेण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करायची असेल तर करु शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभव आहेत एकेक कारणमीमांसा सोबत

ते देव (कि भूत?) अंगात येणे काय असते? कोणाला माहीत आहे का?
मी लहानपणी घरच्यांसोबत ताडदेवच्या दत्ताच्या देव्ळात जायचो तिथे हे प्रकार खूप चालायचे. भजन म्हणता म्हणता वा त्या तालावर नाचता नाचता अचानक एखाद्या भाविकाच्या अंगात संचारायचे आणि मग तो फुल्ल सुटायचा. शेवटी तिथले लोकं अंगारा लावायचे आणि शांत करायचे. बाकी तिथले वातावरण बाबागिरीचे नव्हते वा भाविकही त्यांची माणसे नव्हती. वा ते नाटकही वाटायचे नाही. एकूणच लहानपणी असे काही बघितल्याने मग तो देव आणि ते देऊळ आणखी भारी वाटायचे.

त्यानंतर मग एकदा नवरात्रीला आमच्या बिल्डींगमधील एका चालू टाईप्स मुलीच्या (शब्दाबद्दल सॉरी) अंगात देवी आलेली पाहिली आणि बाकी गुजराती बायकांना तिच्या पाया पडताना पाहिले तेव्हा देवी अंगात येणे यावरचा विश्वासच उडाला.

मानव पृथ्वीकर, चांगली आय्डिया आहे. एक सूचना - प्रत्येकाने आपला "गण" (देव, राक्षस, माणुस काय असेल तो) हि आपापल्या कथेसोबत लिहावा. ज्यायोगे कुठल्या गणाला अमानवी घटनांचा सामना करावा लागतो, आणि कोणत्या गणाला शास्त्रीय बैठक मांडता येते याचा निष्कर्श काढता येईल. सॉर्ट ऑफ डेटा ड्रिवन कंन्क्लुजन (मग सँपल साइझ कितीहि लहान असला तरी गेला तेल लावंत)... Happy

मुळात हे देव मनुष्य राक्षस गण वगैरे खरे असते का?
काय लॉजिक आहे यामागे?
अमुकतमुक गणाला भूत दिसते आणि तमुकामुकला नाही हे म्हणजे भूताचे अस्तित्व मान्य केल्यासारखे झाले. आणि ईथे तर लोकं भूत नसतात तर आणखी काहीतरी असते ती कारणे उलगडताहेत..

>>काय लॉजिक आहे यामागे?<<
एंड गोल हाच आहे कि यात काहि तथ्य नाहि. बट लेट्स नॉट स्पेक्युलेट, रादर स्टार्ट कॅप्चरिंग डेटा... Wink

मला एकदा रात्री झोपेत कुणीतरी छातीवर बसून गळा दाबतंय असं वाटलं. श्वास कोंडत आला. आणि काही केल्या डोळे उघडतच नव्हते. आवाज फुटत नव्हता. कुणाला हाक मारता येत नव्हती. पूर्ण शरीर घामाने चिंब झालं. जाग होती पण डोळे बंद होते. शरीर अगदी बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. अजिबात हालचाल करता येत नव्हती. जे कूणी गळा दाबतंय, ते भयंकर आहे आणि डोळे उघडले तर अत्यंत भयंकर असं काहीतरी दिसेल अशी सतत जाणीव होत होती. देवाचं कुठलंच स्तोत्र जे इतरवेळी तोंडपाठ असायचं, २-३ शब्दांपलिकडे आठवतच नव्हतं. यातून सुटका नाहीच, जीव जाणारच अशी खात्री होऊ लागली होती. एवढी भीती कधीच अनुभवली नव्हती. असं वाटलं की जवळजवळ तासभर हा प्रकार चालू आहे. नको नको झालं अगदी. मग थोड्यावेळाने सगळं थांबलं. डोळे उघडले. घशाला कोरड पडली होती. पण उठून पाणी प्यायला जायची हिम्मत नव्हती. चुपचाप डोळे मिटून पडून राहिले.

या प्रकाराला स्लीप पॅरालिसीस म्हणतात हे इथे येऊन कळलं. कुणीही गळा दाबत नव्हतं, तर प्रचंड शारिरीक आणि मानसिक थकवा आल्याने हा प्रकार झाला असं समजलं. पुन्हा कधी असं झालं नाही.

नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.>>>>पुढे अनेक महिने देखील ती म्हातारी दिसली नाही.नंतर ही कधीच दिसली नाही. कदाचित एकदाच भिकारी म्हणून बसली असेल. सोडून दिला विषय.

सगळे किस्से आणि त्यामागचे कारण शोधणे इंटरेस्टिंग.
मला अजून तरी असा काही अनुभव नाही.
पण सांगण्यासारखे एक आहे. माझं गाव तसे लहानसेच.
आमच्या घरासमोर एक 100/150 वर्षे जुने दुमजली घर होते. जरा रचना वेगळी होती. रस्त्यापासून उंच जीना, नंतर अंगण, जीन्याच्या दोन्ही बाजूला घर.रस्त्याच्या बाजूला लांबच लांब गैलरी.
अंगणाच्या तिन्ही बाजूला मोकळ्या जागा. तर ते घर एकांनी विकत घेतले. रिनोव्हेट केले. अंगणाच्या तिन्ही बाजूला उंच भिंती बांधून घेतल्या.
एखाद्या वर्षानंतर अचानकच घरात अपघात होऊन ते काका वारलेत. काकु मुलांना घेऊन मुळगावी परत गेल्या.
पण नंतर ते घर विकत घ्यायला किंवा भाड्याने रहायला कोणीही तयार नव्हते. काकुंना तेवढीच मदत झाली असती.
एक, दोन वर्ष ते बंदच होते.
शेवटी माझ्या बाबांनी ठरवले कि आपण तिथे रहायला जाऊ.
आई आणी आम्ही तयार नव्हतो. मग एक महिना फक्त झोपायला जायचो. भिती चेपल्यावर मग शिफ्ट झालो. काही त्रास झाला नाही. नंतर ते घर विकले पण गेले.
तेव्हा जर असे घाबरून राहीलो असतो तर कदाचित आजही ते घर बंदच असते.

अनुभव येत असताना खरा वाटतो कारण तेव्हा आपण घाबरलेलो असतो. आटोनॉमिकची पॅरासिम्पथेटिक ब्रांच त्यातही डॉर्सल वेगस नर्व्ह खुप ॲटिव्हेट होऊन मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह कमी होऊन सारासार विचारशक्ती कमी होते. जेव्हा नंतर नर्व्ह पुन्हा बॅलेन्स होते तेव्हा डोकं चालायला लागतं व तो अनुभव किती साधा होता हे कळते.

मि चिन्मयी....
असा अनुभव मला पण येतो...जेव्हा मी दुपारी मस्त झोपून घेतलेले असते आणि रात्री लवकर झोप येत नाही..
डोक्यात खुप विचार सुरू असतील आणि झोप येत नसेल तेव्हा बर्याच वेळाने झोप लागली कि असा अनुभव येतो..

याला स्लीप पैरेलिसिस म्हणतात का? मला वाटायचं स्वप्नं आहेत.

अंगात येणे/ संचार: १० पैकी ८ लोक शुद्ध नाटक करत असतात. आमच्या शेजारच्या एक काकू नवरात्रीतल्या अष्टमीला घुमायच्या (शब्दश:)! आळोखे पिळोखे, हाताची बोटे अडकवून वगैरे बरच काय काय. मधूनच महिषासुरमर्दिनी रूपात येऊन भाला मारल्याची नक्कल.. पण त्यावेळी त्या जे बोलायच्या ते फक्त त्यांच्या स्वात: च्या आयुष्यातल्या समस्यांशी निगडित असायचं. त्रासदायक सुनेला शिव्या घालणे, घुम्या नवरोबाला कानपिचक्या देणे, शेजारी पाजारी लोकांशी काही खुट खूट असेल तर त्यांचा काहीतरी उध्दार त्या आवेशात व्हायचा. काही मतलबी भविष्यवाण्या करायच्या ज्या कधीच खऱ्या झाल्या नाहीत. हे एक नाटक. मानसिक शारीरिक दमन, सतत होणारे दुर्लक्ष अश्या काही गोष्टींमुळे लक्ष वेधून घेण्याच्या/ मोकळे होण्याच्या गरजेतून घडत असावे

माहूरला दत्त मंदिरात/ गणगापूर मंदिरात/ काही पीर वगैरे ठिकाणी अतिशय विमनस्क अवस्थेत मानसिक रुग्ण पहिले आहेत. शिझोफ्रेनिया असण्याची शक्यता वाटते. आरती सुरु झाल्यावर रडणे वगैरे होते, कारण त्यांच्या मनाला त्यांनी ते संदेश दिलेले असतात.

कुणी फक्त वातावरणामुळे ट्रान्स मध्ये जाऊन शांतपणे अश्रू ढाळतात. आवाजाची टीप बदलते, तोल जातो. याचे खरे कारण कळले नाही.

अंगात येणे/ संचार: १० पैकी ८ लोक शुद्ध नाटक करत असतात.>>> हो हे खरं आहे. मी कितीतरी लोक्स बघितले आहेत, ज्यांच्या अंगात कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती येते आणि पैसे,जमीन,शेती अंगात आलेल्याच्या नावावर करायला सांगते. अशा लोकांना झाडूने फटके दिले की सरळ होतात.

अंगात येणे/ संचार: १० पैकी ८ लोक शुद्ध नाटक करत असतात. >>>

8 लोक नाटक करत असतात याच्याशी सहमत. पण उरलेल्या दोघांचे काय?? न बोलता येणारा असह्य मानसिक ताण किंवा मनोरुग्ण ह्यापैकी काहीतरी असावे हा माझा अंदाज.

माझी काकी गावी कुठलीही वाजंत्री वाजायला लागली की घुमायला लागायची, अंगात अमुक देवी येते म्हणून. तिची सासू वर देवाघरी गेल्यावर आणि हिला थोडी मोकळीक मिळाल्यावर देवीने पाठ फिरवली. आता काकीला आठवतही नसेल कधीकाळी अंगात यायचे हे Happy Happy

एके दिवशी माझी मेड आल्या आल्या माझ्या सासर्याना म्हणाली ' डॅडी पोलीस complaint करायची आहे कारण माझी जाऊ करणी करते आणि त्यामुळे जीवाला धोका आहे' ( ते मुंबई पोलीस कमिशनर - DCP होते त्यामुळे तिच्या मुलाचा हरवलेला मोबाईल, मुलीचा मवाली बॉयफ्रेंड, नवऱ्याने मारणे, दुकानदाराने रेशन नाही म्हणणे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांनी लक्ष घालून सोडवावेत अशी अधिकारयुक्त अपेक्षा असायची. )
करणी करते हे कशावरून तर भात केल्यावर त्यात काही रक्तासारखी लाल शितं असायची.

मग 7-8 दिवस टेन्शनमध्ये काम केले, खूप घाबरली होती. पैसे घेऊन गेली आणि देवाला नैवेद्य वगैरे करून झालं. आणि एके दिवशी मात्र प्रचंड रडारड केली आणि कायमचं गावाला जाते सांगितलं. एवढं झाल्यावर तिचं दुसरं काम जिथे होतं ती माझी शेजारीण, तिला यात लक्ष द्यावस वाटलं. ती मेडच्या घरी गेली आणि भात चेक केला तर काही शितं खरच लाल, काही फिकट तर काही गुलाबी दिसत होती. माझ्या शेजारीण मैत्रिणीने तिला म्हटलं तांदूळ कोणत्या डब्यातून घेतेस तो डबा दाखव तर म्हणे जावेने गावाहून पाठवलेल्या पोत्यात आहेत आणि डायरेक्ट पोत्यातून काढून घेते. म्हणे की जावेला तांदुळाचा वाटा द्यायचा नव्हता म्हणून खूप भांडली आणि रागारागाने तांदूळ पाठवले. तो राग/ करणी जे काय असेल ते त्यामुळे भातात रक्त येतं. हिने मेडला सांगितलं की मीरा आणि मी तुला 25 किलो तांदूळ देऊ आणि तुझे तांदूळ आपण अनाथाश्रमात देऊ. मग ते गाडीत घालून घरी आणले आणि गॅरेजमध्ये ठेवताना अचानक शोध लागला की तांदूळ भरल्यानंतर मग ते पोतं रंगवलं होतं ( दुकानाचं की गावाचं नाव, मेडचं नाव आणि मुंबई एवढं सारं लाल रंगाने पोत्यावर लिहिलं होतं.त्याचा रंग झिरपून आत तांदुळावर वाळला होता. भल्या मोठ्या अक्षरात आणि लालजर्द रंगात लिहिल्यामुळे खूप तांदूळ रंगले होते. हे गॅरेजमध्ये उजेडात मला दिसलं पण बिचारी मेड चाळीतल्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या खोलीत रहायची, बरं पोतं ठेवलं तो कोपरा अंधारा आणि स्वयंपाक करायची ती जागा अजून काळोखी. फक्त स्वयंपाक झाला की रूमच्या बाहेर कट्ट्यावर बसून जेवायचे तिथे उजेड असायचा त्यामुळे शिजलेला भात तेवढा लाल दिसायचा. तिने मात्र करणीच्या भीतीने जवळजवळ जगाचा निरोप घ्यायला सुरुवात केली होती. ( माझ्या नवऱ्याशी कधीही न बोलणारी, पण त्यालाही सांगितलं की 'साहेब माझे थोडेच दिवस राहिले आहेत. Wink )

माझ्या नवऱ्याशी कधीही न बोलणारी, पण त्यालाही सांगितलं की 'साहेब माझे थोडेच दिवस राहिले आहेत Biggrin

ओहह बिचारी
आमच्या लहानपणी घरी असायचे असे लाल तांदूळ
सत्यनारायण पूजेचे, कुंकू लागलेले

@ऋन्मेष : अंगात येणे ही एक मानसीक डिसऑर्डर आहे. याला डीसोसिएटिव्ह ट्रान्स डिसऑर्डर किंवा पझेशन ट्रान्स असेही म्हणतात.
ती मनाची एक अवस्था आहे.
अनेक प्रकारच्या वातावरणात व्यक्ती त्या अवस्थेत जाऊ शकते. लयबद्ध ढोल, भांडे बडवण्याचा आवाज, लयबद्ध संगीत, नृत्य, दीर्घ आणि भरभर घेतलेला श्वास, सोबत डोके गोल फिरवणे यांचा मेंदूच्या मज्जासंस्थेवरच्या कार्यावर परिणाम होतो. मज्जासंस्थेची विशिष्ट अवस्था या ट्रान्सला कारणीभूत ठरते. गदा गदा शरीर हलणे, हाता पायांना कंप सुटणे, घुमणे ही याची शारीरिक लक्षणे. मानसिक पातळीवर स्वतःचे अस्तित्व विसरणे, काळ-त्रिमितीचे भान न रहाणे, आवाज घोगरा होणे अथवा वेगळा होणे, स्वतःला दुसरी व्यक्ती समजणे आणि त्याप्रमाणे वागणे-बोलणे, शुद्ध हरपणे इत्यादी लक्षणे आढळतात.
मानसशास्त्र जाणणारी व्यक्ती याबद्दल अधिक सांगु शकेल.

यात अजून एक गंमत आहे.

भारतीय आणि इतर काही गैर पाश्चात्य देशात भगत, मांत्रिक मंडळींना हा ट्रान्स ठाऊक आहे, पण डिसऑर्डर म्हणुन नव्हे आणि त्याची शास्त्रीय माहितीही नाही. या ट्रान्स मध्ये व्यक्तीच्या अंतर्मनाशी अबोध पातळीवर संवाद साधता येतो आणि यासाठी हे भगत / मांत्रिक लोक (त्यांना अंतर्मन त्याची अबोध पातळी वगैरे ठाऊकही नसेल) मुद्दाम वातावरण निर्मिती करून व्यक्तीला या ट्रान्स मध्ये घेऊन जातात आणि त्यांच्या अंतर्मनाशी अबोध पातळीवर संवाद साधून सूचना देतात. त्यांना फक्त एवढेच ठाऊक असते की अमुक वातावरण निर्मिती केल्याने पुढच्या व्यक्तीला वश करता येते आणि तिच्यात शिरलेल्या बाधेशी (ट्रान्स मध्ये व्यक्ती स्वतःचे अस्तित्व विसरून स्वतःला दुसरी व्यक्ती समजते - अशी अवस्था आली म्हणजे ज्याने झपाटले आहे तो आता बोलतोय असे समजतात) संवाद साधता येतो. अशी वातावरण निर्मिती करण्यात ते एक्सपर्ट असतात. ठरावीक लक्षणे दिसली म्हणजे व्यक्ती वश झाली (ट्रान्स मध्ये गेली) हे ते ओळखतात. अशा अवस्थेत अंतर्मनास अबोध पातळीवर दिलेल्या सूचना खूप परिणाम कारक ठरू शकतात.
काही भगत मांत्रिक या ट्रान्समध्ये असलेल्या व्यक्तीकडून झाड सोडायला काय घेशील वगैरे संवाद साधून हवं ते त्या व्यक्तीकडुन वदवून घेत असावेत. (उदा. बकरं पाहिजे, कोंबडी पाहिजे) आणि तो उपाय केल्यावर झाड सोडणार हे वदवून घेतात. अंतर्मनास अबोध पातळीवर मिळालेली सूचना खूप परिणाम कारक ठरू शकते आणि मूळ ज्या कारणासाठी त्या व्यक्तीवर हा अघोरी प्रयोग केला आहे त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण हे उलट घातक सुद्धा ठरू शकते. अर्थात प्रत्येक व्यक्ती या ट्रान्समध्ये जाईलच असे नाही.

अंगात येणे/ संचार: १० पैकी ८ लोक शुद्ध नाटक करत असतात. आमच्या शेजारच्या एक काकू नवरात्रीतल्या अष्टमीला घुमायच्या (शब्दश:)! आळोखे पिळोखे, हाताची बोटे अडकवून वगैरे बरच काय काय. मधूनच महिषासुरमर्दिनी रूपात येऊन भाला मारल्याची नक्कल.. पण त्यावेळी त्या जे बोलायच्या ते फक्त त्यांच्या स्वात: च्या आयुष्यातल्या समस्यांशी निगडित असायचं. त्रासदायक सुनेला शिव्या घालणे, घुम्या नवरोबाला कानपिचक्या देणे, शेजारी पाजारी लोकांशी काही खुट खूट असेल तर त्यांचा काहीतरी उध्दार त्या आवेशात व्हायचा. काही मतलबी भविष्यवाण्या करायच्या ज्या कधीच खऱ्या झाल्या नाहीत. हे एक नाटक. मानसिक शारीरिक दमन, सतत होणारे दुर्लक्ष अश्या काही गोष्टींमुळे लक्ष वेधून घेण्याच्या/ मोकळे होण्याच्या गरजेतून घडत असावे>>> अगदीच खरे आहे. हे सर्व माझ्या सासूबाई करायच्या. मी विश्वास ठेवत नाही असे दिसू लागल्यावर बंंद झाले सगळे.

@ अजिंक्यराव @ मी चिन्मयी:.
स्लीप पॅरालिसिसचा मला बऱ्यापैकी आणि बराच जुना त्रास आहे. साधराण दहावी - बारावी पासून सुरू झाला. पहिल्यांदा झाला तेव्हा घरी सगळे असताना व्हायचा आणि सलग काही दिवस झाला.
नंतर काही वर्षे झाला नाही, मग परत सुरू झाला, तेव्हा मात्र बहुत करून मी एकटा असताना होतो. आजकाल वर्षातून पाच सहा वेळा होतो.
यात predormital (झोप लागत असताना, पण निद्रावस्थेत जाण्यापूर्वी) आणि postdormital (निद्रावस्थेत असताना) असे दोन प्रकार आहेत. मला दोन्ही प्रकारे होतो.
आधी निद्रावस्थेत असताना होतो. त्यातून बाहेर आले की परत झोपताना predormital होतो. एका रात्री एकदा झाला की मग तीन चार तास पर्यंत सुरूच असतो. रात्रीच्या झोपेचे खोबरे होते.

१.बर्‍याच वर्षांन्पुरवीची ही गोष्ट. नुकतेच आम्ही चाळीतिल दोन खोल्यांचे घर बदलून नविन तिन खोल्यांच्या घरात रहयला गेले. त्या वेळी तो भाग तेवढा निसर्ग सोडला आणि दोन चार आजुबाजुला ईमारती सोडल्या तर अन्य कुठल्याच गोष्टींनी व्यापलेला न्हवता. ही ईमारत तशी आमचीच कारण वडील, काका, आत्येभाऊ आणि एक नातेवाईक अश्या सगळ्यांनी मिळून जागा घेउन ती बांधुन घेतली. एकाच वेळी सर्व जण ठरवुन तिथे रहायला गेलो. सुरवातिचे काही महिने नविन मोठे घर फार मस्त वाटत होते. बांधकाम झाल्यावर लगेचच दारांना आणि खिडक्यांना ग्रिल बसवुन घेतले होते. परंतु अजुन काही छोटी छोटी कामे चालु होती. दिवस मजेत जात होते. मी, आज्जी आणि लहान बहिण बेडरुम मध्ये झोपायचो. अधुन मधुन आज्जी बाथरुम ला जायला उठायची. आम्हाला कोणालाच दिवा चालु लागायचा नाही. कारण शेजाच्या ईमारतिचा पार्किम्ग्चा लाईट खिडकितुन आत यायचा तो पुरेसा असायचा. उलट कधी कधी तो नको वाटायचा. त्या दिवशीपण रोजच्याप्रमाने सगळे आवरुन आम्ही झोपलो. रात्री मधेच आज्जीने हाक मारली. आम्हाला वाटले पाणि हवे असेल. तेवढ्यात बहिणीने विचारले काय हवय. तशी दबक्या आवाजात म्हणाली बाबा ला उठव..... खिडकीत काहीतरी आहे. मी आणि बहीण अश्या गोष्टींची लहान्पणापासुनच उत्सुकता. दोघिही उठ्लो आणि खिडकीत बघु लागलो. खिडकिच्या छज्जावर कोणीतरी पाय सोडुन बसले होते आणि ते हलवत होते. पण त्या पायांना पंजे न्हवते.
आता मात्र वडिलांना उठवणे भाग होते. कसलाही आवाज न करता वडिलांना उठवले आणि खिडकित काय आहे ते दाखवले. तसे वडिलही जरा साषंक झाले. त्यांनी धुण वाळत घालायची काठी घेतली आणि खिडकीवर आतुन टकटक केली. तरी वरील व्यक्ती अजुनही पाय हलवत बसली होती. आता काय करावे कळेना. तेव्हा कोणाकडेही साधा दुरध्वनीपण न्हवता की एक मेकाला फोन करून काही सांगता येईल. भाऊ वरच्याच मजल्यावर राहायचा. पण त्याच्या पर्यन्त निरोप पोहचवता येइना की तुझ्या खिडकीत काहितरी आहे.
शेवटी वडिलांनिच बाहेर जाउन पाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही पण दबक्या पावलांनी त्यांच्या मागे जाउ लागलो. वडिलांच्या हातात मोठी काठी, माझ्या हातात झाडू आणि बहिणीच्या हातात आज्जिची काठी असे एका मागो माग एक त्या बाजुला जाउ लागलो. भिंतिच्या आडुन वडिलांनी हळुच खिडकीच्या वर डोकावुन पाहिले आणि हसु लागले. मी आणि बहीन जरा मागेच उभ्या होतो. आम्हाला काहिच कळेना काय झाले. तेवढ्यात ते आम्हाला म्हणाले तुम्ही व्हा घरात मी आलोच. तरी आम्ही तिथेच थांबलो. वडील खिडकीखाली गेले आणि हातात एक पॅन्ट घेउन आले. मग आम्ही पण हसु लागलो. पाय हलवत कोण बसल होत याचा उलगडा झाला होता. दुसर्‍या दिवशी वहिनी खाली आली आणि आईला म्हणाली," अहो काल ह्यांची पॅन्ट चोरिला गेली बहुतेक, खिडकीत वाळत घातली होती. कुठच दिसत नाही."
तसे रात्री घडला प्रकार तिला सांगितला आणि कपड्यांना चिमटे लाव असेही बजावले आणी पुन्हा एकदा घरात हसु पसरले.
२. वर लिहल्याप्रमाणे सर्वजण ठरवून एकाच वेळी ह्या ईमारतित रहायला आलो. ही गोष्ट घडली ती या वरिल घटनेनंतरच. आमचे आजोबा जाउन एक वर्ष ईथे रहायला यायच्या आधी पुर्ण झाल. बांधकाम चालू असताना वडिल त्यांना अधुन मधुन काम दाखवायला घेउन यायचे. काम पुर्ण होत आले आणि आजोबांचे निधन झाले. वडिलांनी ठरवले की ज्या घरी आजोबा गेले. तेथेच त्यांचे श्राध्द करायचे. त्या मुळे नविन घरात जायाला तसा उशीरच झाला. आमच्या घराला दोन दार आहेत. एक बेडरूम ला तर एक हॉल ला. एका रात्री हॉलच्या बाजुच्या दाराची कडी कोणीतरी जोरात ठकठक वाजवली. तसे वडिलांनी आतुनच आवाज देउन विचारले कोण आहे. परंतु बाहेरुन काहिच आवाज आला नाही. आम्ही पुन्हा झोपुन गेलो. ५ मिनितांच्या अंतराने पुन्हा तशीच दाराची कडी वाजली. आता वडिलाबरोबर आम्ही पण उठुन बसलो. पुन्हा त्यांनी आवाज दिला.."कोण आहे?" बाहेरुन काहिच आवाज आला नाही. वडिलानी हातात काठी घेतली आणि दाराची कडी उघडणार तोच आमचे मागचे दाराची कडी जोरात वाजली.
आम्हाला वाटले कोणीतरी ओळखिचेच आहे. पुढचे दार उघडायला उशीर झाला म्हणुन मागच्या दाराने आले. वडिलांनी काठी ठेवली आणि लगेच दार उघडले. परंतु बाहेर कोणिच न्हवते. मग आम्ही परत हॉल चे दार उघडले पण तिकडेही कोणी न्हवते. पार्किन्ग मध्ये पण चक्कर मारली कोणिच दिसेना. अगदी टेरेस पर्यन्त वर जाउन बघुन आलो तरी कोणिच दिसेना. घरात येउन आम्ही पुन्हा झोपुन गेलो. हे नेमके काय घडले माहित नाही. पण सर्वाचे म्हणने पडले की आजोबा येउन गेले नविन घर बघायला. पुन्हा हा प्रकार कधी घडला नाही. परंतु कडी वाजलेली आम्ही सर्वांनीच ऐकली होती.

निर्झरा, पहिला अनुभव मजेशीर आहे.
दुसरा इथे गेस करायला लिहिलाय असे गृहीत धरतो.
तीन शक्यता.
१. भुरटा चोर घर रिकामं आहे का याची टेहळणी करून, नाहीय पाहून निघून गेला.
२. कुणी खोडी केली.
३. वरच्या घरातून दोन्ही दारांच्या वर काही आवाज झाला जो तुम्हाला दारातच झाला असे वाटते. (आमच्या वरच्या घरातील बाथरूमचे दार रात्रीच्या शांततेत त्यांनी उघडले तेव्हा कडी काढल्याचा आणि दार उघडताना होणारा करर आवाज हे दोन्ही आमच्याच बाथरूमच्या दाराचे आवाज आहेत असे वाटते.)

स्लीप पॅरालिसिस हा "गूढ अनुभव" याअंतर्गत येऊ शकेल का माहिती नाही पण प्रकार अत्यंत भीतीदायक असतो हे मात्र पक्के. यावर अन्य धाग्यांत सुद्धा बरीच चर्चा झाली असल्याचे आठवते. मानव आणि इतरांनी याबाबत वर लिहिले आहेच. स्लीप पॅरालिसिस हा चुकीच्या पद्धतीने झोपणे, किंवा पुरेशी झोप न झाल्याने होतो असे म्हणतात. अशी स्वप्ने मात्र जीवघेणी असतात. मला ठळक आठवणारे उदाहरण:
कोण्या एका अज्ञात घरात अडकलो होतो. खूप खोल्या आणि अत्यंत क्लिष्ट रचना असलेले घर. घरात माझ्याशिवाय अन्य कुणीही नव्हते. मला बाहेर पडायचा मार्ग दिसेना. खूप खूप फिरलो. सगळे दरवाजे उघडत होतो. पण बाहेर जायचा मार्ग दिसत नव्हता. अखेर एक दरवाजा उघडला. पाहतो तर ती अडगळीची बंदिस्त खोली होती आणि तिथे एक म्हातारा नोकर हातात झाडू घेऊन मख्खपणे माझ्याकडे बघत उभा. बाहेर कडी असताना तो तिथे आला कसा कळेना Lol ओरडलो, जोरात बोंब मारली तरी आवाज निघेना. हलता येईना. स्लीप पॅरालिसिस!

>> Submitted by निर्झरा on 1 October, 2020 - 17:44

पहिला अनुभव फारच विनोदी Lol घडते असे मात्र.
दुसरा गूढ.

मी बाईंना पेपर द्यायची तेव्हा त्यावर १०० पैकी असे असायचे पण पेपर परत येताना त्यावर १ ते १० मधला अंक असायचा. हा भानामतीचा प्रकार... ट्यूशनने सुटतो. Wink

अजिंक्यराव, मी- चिन्मयी, मानवकाका मला माहित नव्हते याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. आणि तो कशामुळे होतो वगैरे. आजपर्यंत मी समजत होते, फक्त मलाच हा त्रास झाला की काय? माझ्या माहितीतही आजपर्यंत कुणाला हा त्रास झाला नाही. मला मात्र बरेचदा झाला आहे. जाम घाबरले होते मी. आता कारण कळले पण असा त्रास एखाद्याला झाला तर त्यावेळी लगेच काही ऊपाय करता येतील का?

Pages