विश्वरूपदर्शन..... स्फुट

Submitted by अस्मिता. on 7 July, 2020 - 21:51

*****मूळ कथा इथे वाचू शकता******

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण...१
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण...२
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण...३
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण...४
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण...५
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठम चरण...६
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण...७

**************************************

उपोद्घातः

मी कृष्णडोहाच्या पैलतीरी कथा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा मनात एक ढोबळ कथांत होता पण तो सुयोग्य पद्धतीने शब्दबद्ध करणे आव्हानात्मक वाटत होते. पण त्या कथेने मला पुढे नेले व कृष्णकृपेने हवा तसा अंत सुचला , तो इतका सुचत राहिला की या स्फुटाचा जन्म झाला. मला जे थोडे फार विश्वरूपदर्शनाचे आकलन झाले आहे ते मी या स्फुटात ओवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या दृष्टीने
हे फक्त विराटरूप नसून चराचरात , सर्व अवस्थेत ,सर्व सजीवनिर्जीवात असलेले परब्रह्मतत्व आहे.

या दर्शनाच्या वर्णनाला अंत असूच शकत नाही. तरीही मी चिरंतर सच्चिदानंद रूपाला शब्दबद्ध करण्याची धडपड केली आहे.

************************************

हा कथांत आहे.......

तू नर आहेस आणि नारायणीही ! तुझी माझी यात्रा नित्य आहे , अनंत आहे. सहज आहे, निर्धारितही आहे. तू यात्रेला आरंभ कर."

मार्ग मी गंतव्य मी !
स्वत्व मी ईश्वरत्व मी !
चिरंतन मी आणि काळ मी !
आरंभ मी आणि अंत मी !

व्यक्त मी तरी गुप्त मी !
आदी मी अनादी मी !
सृजन मी भेदन ही मी !
निमित्त मी प्राक्तन ही मी !

सुक्ष्म मी आणि स्थूल मी !
नित्य मी अनित्य मी !
अ-क्षरही मी आकार मी !
ओंकार मी हुंकार मी !

नाद मी आणि गर्भ मी !
संगीत मी आणि नीरव मी !
उत्सवही मी एकांत मी !
गृहीही मी मंदीरीही मी !

अचिंत्य मी आणि नाम मी !
राघवही मी शबरीही मी !
नरही मी नारीही मी !
मुक्त मी अव्यक्त मी !

पिपलिकाही मी ब्रह्मांड मी !
तेज मी अंधार मी !
सार्थ मी अनर्थ मी !
आर्त मी अहंही मी !

शौर्य मी कारुण्य मी !
स्मित मी आणि रूदन मी !
स्थीर मी आवर्त मी !
स्वर्ग मी भूमीही मी !

अवकाश मी आकाश मी !
नित्य मी अनित्य मी !
अभंग मी आणि धूलिकणही मी !
सत्त्व मी आणि तमस मी !

चंद्र मी आणि क्षयही मी !
मार्तंड मी आणि ग्रहण मी !
जलही मी तृष्णाही मी !
समुद्र मी सरिताही मी !

भोज्य मी भोक्ताही मी !
आहार मी क्षुधाही मी !
आसक्त मी योगीही मी !
निर्माण मी आणि प्रलय मी !

संत मी आणि दैत्य मी !
गतही मी आगतही मी !
खही मी आणि खगही मी !
पर्जन्य मी दुर्भिक्ष्य मी !

शून्य मी विराट मी !
वृक्ष मी आणि पुष्प मी !
भृंग मी आणि कमल मी !
मधुही मी माधवही मी !

हन्त मी आणि वीर मी !
जीत मी आणि जयही मी !
शस्त्र मी आणि रक्त मी !
अस्त्र मी निःशस्त्र मी !

दर्शनही मी अदृश्य मी !
रमणीय मी आणि कुरूप मी !
गुणही मी निर्गुणही मी !
ममताही मी माताही मी !

स्वप्न मी जागृतीही मी !
रजनीही मी उषाही मी !
भूत मी भविष्य मी !
शुभ्र मी आणि कृष्ण मी !

निर्भीडही मी आरक्त मी !
सुखही मी आणि क्लेश मी !
विद्वान मी व्यासंग मी !
शाप मी उःशाप मी !

वेग मी अवरोध मी !
व्याध मी मृगयाही मी !
मृगही मी कस्तुरीही मी !
साध्वीही मी राज्ञीही मी !

मयूर मी आणि नृत्य मी !
तोयमी आणि मत्स्य मी !
प्रपात मी प्रतिबिंब मी !
अग्नीही मी आणि भस्म मी !

ब्रह्म मी ब्रह्मांड मी !
अतर्क्य मी आणि सुलभ मी !
संग मी निःसंग मी !
अवध मी वनवास मी !

दीन मी सम्राट मी !
हिरण्य मी मृण्मयही मी !
पावित्र्य मी कलंकितही मी !
अणूही मी आणि स्फोट मी !

आक्रोश मी उन्माद मी !
भोगी मी उन्मनीही मी !
उत्कटही मी विरक्त मी !
त्रिलोक मी आणि नाथ मी !

अमोघ मी अवशेष मी !
अहिल्याही मी प्रतिक्षाही मी !
गौतमही मी ग्लानीही मी !
सीताही मी परित्याग मी !

राममी आणि श्याम मी !
नरही मी नारीही मी !
जीव मी निर्जीवही मी !
तूही मी आणि मीही मी!

तूही मी आणि मीही मी!
तूही मी आणि मीही मी!
तूही मी आणि मीही मी!
तूही मी ........................

************************************
।।शुभं भवतु।।

शब्दसूचीः

पिपलिका.. मुंगी
अ-क्षर.. अविनाशी
प्राक्तन..प्रारब्ध
सृजन..निर्मिती
अचिंत्य..ज्याचे चिंतन करणे अवघड
नीरव..शांतता
अभंग.. न भंग करता येणारे
मार्तंड..सूर्य
ख..आकाश
खग..आकाशात गमन करणारे ते (पक्षी)
गत..गेलेला (अभिप्राय मरण पावलेला)
आगत..आलेला (अभिप्राय जन्माला आलेला)
भृंग..भुंगा
मधु..मध
व्याध..शिकारी
मृगया..शिकार (करणे)
राज्ञी..राणी
तोय..पाणी
प्रपात..धबधबा
अवध..अयोध्या
हिरण्य..सोने
मृण्मय..मातीचे बनलेले
उन्मनी..अध्यात्मिक शांतीची अवस्था
ग्लानी..आत्मग्लानी
अमोघ..भग्न न होऊ शकणारे

**************************************

धन्यवाद Happy !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! सुरेख.
अथर्व शीर्षच आहे हे.
>>>>>>आक्रोश मी उन्माद मी !
भोगी मी उन्मनीही मी !>>>> यातील आक्रोश मी कधीही पचनी पडत नाही Sad

धन्यवाद साद....हा भाग शेवटच्या भागातील कवितेची पुरवणी आहे कारण कविता लांबत गेली. जमल्यास कथाही वाचा.

धन्यवाद रुपाली, तुम्ही वेळोवेळी वाचून प्रतिसाद दिले त्याबद्दल विशेष आभार.. प्रोत्साहन मिळाले.

यात आक्रोश करणाऱ्या म्हणजे पराभूत झाल्यावर दुःखाने आक्रोश करणाऱ्या मध्ये सुद्धा परमात्मा आहे आणि विजयोन्मादाने आनंदीत झालेल्या मध्ये सुद्धा 'तो' आहेच या अर्थाने घेतले आहे... पण वाचणारा स्वतः चे अर्थ लावू शकतोच की ........तिच तर अनुभूती आहे.
धन्यवाद सामो !!

छान लिहीलंय.
स्फुट म्हणजे नक्की काय??

धन्यवाद मी चिन्मयी.
स्फुट म्हणजे ललित लेखनाचा एक प्रकार त्यात लेखक एखाद्यागोष्टी बद्दलचे स्वतःचे मत व्यक्त करतो. त्याला एक लय (थीम) असते असे मला वाटते.

मला वाटतं स्फुट म्हणजे प्रकटीकरण. अस्फुट म्हणजे न प्रकट केलेले. पण प्रत्येक कविता, निबंध, ललित हे स्फुट असेलच असे नाही. स्फुट म्हणजे शब्दांच्या मुशीत, काहीतरी मनापासून ओतलेले व त्यातही विषय अगदी पक्का नाही , लेखकाला थोडे भरकटण्याचे स्वातंत्र्य असलेले .

https://www.maayboli.com/node/16253?page=1
यावर रैना यांचा प्रतिसाद आवडला. Copy paste केला आहे.

मोल्सवर्थ शब्दकोशात -
स्फुट (p. 877) [ sphuṭa ] p (S) Blown, opened, expanded. 2 Burst, rent, broken or torn open or asunder. 3 Opened, figuratively; explained, expounded, explicated, manifested, declared, revealed: also as a open, plain, clear, apparent, evident. 4 as a Loose, separate, detached; that stands alone, or forms no part of a collection, disquisition, or book;--as a stanza, verse, sentence, story, tale. 5 In astronomy. Apparent; as स्फुटसूर्यगतिः Apparent motion of the sun.

बर्‍याचदा स्फुट आणि ललित हे interchangeably वापरल्या जातात.
स्फुट म्हणजे जे कुठल्याही वास्तवाचा आधार घेउन असे, पण तरीही लेखकाचा दृष्टीकोण विषद करणारे स्तंभलेखनासारखे आणि एक प्रकारे वर भरतने म्हणले आहे तसे वर्तमानपत्री ललित. (?)
स्फुटकाव्य अशा शीर्षकाची पुस्तकं पाहिली आहेत.
ललितलेखनचा वास्तवाशी वास्तवाच्या कुठल्या घटनेशी संबंध असेलच असे नाही. ललितात त्या अर्थाने कल्पनेच्या पाट्या टाकता येतील.

माझे पूर्ण स्फुट उलगडून सांगू का अमा ? हे मी सांगू शकते.

की स्फुट म्हणजे काय हे उलगडून सांगू ? हे वरच्या लिंक मध्ये आहे आणि मला नीट सांगता येणार नाही.

कथा वाचल्यास थोडा अधिक संदर्भ लागेल...पण आग्रह नाही. Happy

अस्मिता बहुतेक अमा म्हणतायत की अन्य लोक 'स्फुट काय अन अमकं काय अन तमकं काय' फार चिरफाड करतायत Happy जे की माझंही मत आहे Happy मी स्वतः उगाच आगीला वारा घातलाय वरती.

अस्मिता तुला मी ऐकलेली उपमा सांगते. कदाचित इथेच ऐकली /वाचली असेल कदाचित अन्यत्र. पण निव्वळ मोहक आणि लाघवी कल्पना आहे. ज्या कोण्या संतास ती सुचली त्यांना माझे शतप्रणाम. नमनाला घडाभर तेल झालं.
ब्रह्म अज, अनंत, अचल आहे ते आरंभ आणि अंत आहे. अ‍ॅब्सोल्यूट आहे. शीख धर्मानुसार अर्थात नानक म्हणतात तसे ते 'निर्भोह, निर्वैर, अकाल मूरत' ही आहे. पण हे ऐक.
ब्रह्म हे एक नवजात अर्भक आहे. इतकं नवीन, अनाघ्रात,कोवळे आणि निर्मळ. कोणीही त्याच्या जवळ पोचू शकलेले नाही. नुकतेच जन्मलेले तान्हुले. कदाचित पिंपळपानावर पहुडलेले पण नाही कारण ते पान तिथवर पोचलं आहे. त्याहूनही आदि.
मला परब्रह्माकरता ही तान्हुल्याची उपमा नितांत आवडली. कोणी कुठुन इतकं मुलायम हृदय आणू शकेल कोठुन मुलायम कर की या तान्ह्या जीवाला जवळ घेता येइल,? कसं या बाळाला जवळ उचलून घेता येइल? अदिती, अनसूया, कौसल्या ही देवी रुपे लक्ष्मी, पार्वती आदि पत्नी व प्रेयसी रुपापेक्षा भिन्न नाही का? . हे जे मातृतत्व आहे त्याला शतशः प्रणाम.