शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शासनमान्य नियमांनुसार -

पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.)
उदा. - पैसा - पैशाचा, घसा - घशाचा, ससा - सशाचा.

पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो, त्याचा 'ज्या' होत नाही.
उदा. - मांजा - मांजाने, गांजा - गांजाचे, सांजा - सांजाची

ओह ओके.
पण 'सांजाची पोळी' नाही लिहीत ना? 'सांज्याची'च लिहितात.
असे अपवाद (स/ज) ठरवताना कसला आधार घेतात?

'सांज्याची' वगैरे रूपं सवयीनं येतात. 'य' अनेकदा लेखनात येतो. नियमानुसार तो तिथे नसावा, इतकंच. किंबहुना नियमांची उदाहरणं देताना 'सांजाची' असाच शब्द दिला आहे. या नियमाला अपवाद मलातरी माहीत नाही.
सामान्यरूपांमधला 'य' हा अनेकवचनी स्त्रीलिंगी शब्दांमध्ये येतो. माश्यांना, मिश्यांना, उश्यांना.

मी वर दिलीत ना दोन पुल्लिंगी उदाहरणं - छरा आणि घडा.
जो नियम र आणि ड अक्षरांना लागू होतो तो स/ज यांच्याबाबतीत का नाही असं विचारते आहे.

ओह ओके.
ते बघावं लागेल. नियमांमध्ये फक्त शेवटी 'सा' आणि 'जा' यांचाच उल्लेख आहे. हा नियम यांनाच का, हे माहीत नाही. विचारतो कोणालातरी.

सामान्यरूपांमधला 'य' हा स्त्रीलिंगी शब्दांमध्ये येतो. माश्यांना, मिश्यांना, उश्यांना.>>>> इथे स्त्रीलिंगी बरोबरच 'अनेकवचनी' शब्द पाहिजे असा पण नियम आहे का?

लॉर्ड ऑफ द फ्लाइजचे भाषांतर माश्यांचा राजा असे हवे आहे. ते माशांचा राजा असे आहे ना मुखपृष्ठावर? कुणाकडे पुस्तक असेल तर खात्री करता येईल.

मासा माश्या खाई.
'य' वगळणे किंवा वापरणे हे दोन्ही प्रचलित आहे.
दरवाज्यांना, उशाला असं लिहितात.

म्हणजे नियमानुसार साकारांत पु. शब्दातच 'य' न लागता 'श' होतो. इतर ठिकाणी (कावळा-कावळ्याचा आणि स्वातीने दिलेली इतर उदा.) 'य' लागतो. असेच ना?

स्वाती, त्या उदा. प्रमाणे जायचे तर ससा-सस्याचा असे व्हायला हवे खरेतर. Happy

चिनूक्स, ते 'मासा माशा खाई'च हवे.

मासा (दुसऱ्या) माशा(ला) खाई असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. म्हणून 'माशा'..
(माश्या लिहिले तर ते माशीचे अनेकवचन वाटेल.)

>> स्वाती, त्या उदा. प्रमाणे जायचे तर ससा-सस्याचा असे व्हायला हवे खरेतर. स्मित
हाहा!
नाही, स चा श इथपर्यंत मान्य आहे ऑलरेडी. Happy

मासा (दुसऱ्या) माशा(ला) खाई असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. म्हणून 'माशा'..
(माश्या लिहिले तर ते माशीचे अनेकवचन वाटेल.)
>> Lol बरोबर.
माशाच हवं. मासा पुल्लिंगी आहे.

पुल्लिंगी, स्त्रीलिंग(अनेकवचनी), नपुसकलिंगी अशा तिन्ही प्रकारच्या नामांची सामान्यरूपे याकारान्त होताना दिसतात.
घोडा : घोड्या/घोड्यां , माळी - माळ्या/माळ्यां
स्त्रीलिंगी
नदी - नदी/नद्यां, पेटी- पेटी/पेट्यां
तळे - तळ्या/तळ्यां, पाणी - पाण्या
--
मो रा वाळांबेंच्या मराठी शुद्धलेखन प्रदीपमधून :
आकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.पण शब्दाच्या अन्ती सा हे अक्षर असेल तर 'सा'चा 'शा' होतो. अशा वेळी 'सा'चे सामान्यरूप 'श्या' न जोता ते शा असेच राहते काराण 'श' व 'य' हे दोन तालव्य उच्चार एकत्र आल्याने त्यांतील 'य' निघून जातो. मूळचा श तसच राहतो. श्य होत नाही.
उदा : घसा, खिसा, मासा, पैसा, ससा, प्रवासी, कसा, आरसा, कोळसा, डोसा
कूस, मूस, (वीस : विशीत = हेही दिले आहे Uhoh )
पण हिस्सा : हिश्श्या रस्सा : रश्श्या. (हेही त्याच यादीत दिलेत)

जा-कारान्त श्ब्दांची सामान्यरूप जाकारान्तच राहतात. ज्याकारान्त नाही. "कारण 'ज'या तालव्य उच्चारात 'य' हा तालव्य उच्चार मिळवताना एक तालव्य उच्चार नाहीसा होतो.
उदा : राजा, पणजा, मोजा, दरवाजा, दर्जा, (पुढे फौजा :अओ:)

पण पणजा, मोजा, फौजा यांतले ज चे उच्चार तालव्य नाहीत ना? अर्थात सामान्यरूप होताना ते तालव्य होतात. दरवाजाचा उच्चार बहुतकरून राजासारखाच ऐकला आहे.

हा प्रश्न पुर्वी लिहिला होता पण कुठे आठवत नाही आणि त्यामुळेच त्याला उत्तर दिले गेले की नाही हे पण माहीत नाही.
बोलताना ज चा उच्चार 'ज' कधी करतात' आणि ज्य' कधी करतात... जेव्हा लिहिताना 'ज' असेच गेलेले असते.
उदा. गजर, नजर, साजन, गाजर.

मयेकर आणि मंडळी धन्यवाद.

हा नियम शेवटी 'सी' असणार्‍या शब्दांनाही लागू होईल ना? उदा. प्रवासी - प्रवाशांना, रहिवासी - रहिवाशांना.

हो, हो, आलाय.
नियमात मात्र फक्त पण शब्दाच्या अन्ती सा हे अक्षर असेल तर 'सा'चा 'शा' होतो. असे आहे.

'सांज्याचे' हे मी ऐकलेले असले, तरी 'गांजाचे झाड' असेच ऐकले आहे, 'गांज्याचे झाड' असे कधी ऐकले नाही, त्यामुळे तो सवयीचा भाग असावा हे बरोबर वाटते.

'सांज्याचे' हे मी ऐकलेले असले, तरी 'गांजाचे झाड' असेच ऐकले आहे, 'गांज्याचे झाड' असे कधी ऐकले नाही,

>>

सांजाचे, सांज्याचे- गांजाचे , गांज्याचे असे शब्द तुम्हाला वेगवेगळे सुस्पष्टपणे ऐकू येतात?::अओ:

लोकान्ला श नी ष येगळा ऐकू येतूया नी तुमान्ला गांजाचे नी गांज्याचे येगळं न्हायी ऐकू येत म्हनताय्सा? गांजाची सवयच इपरीत!

Pages