दोन, एक की शून्य ?

Submitted by साद on 3 October, 2019 - 09:54

भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्या अवाढव्य झाल्याने तो एक चिंतेचा विषय असतो. चीनने काही काळ सक्तीचे धोरण राबवून लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडच्या खुल्या लोकशाहीमुळे आपण जोडप्यांच्या अपत्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालू शकत नाही. थोडक्यात याबाबत्त आपण राष्ट्रीय असे सक्तीचे धोरण काही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रश्न प्रबोधनाने सोडवावा या निष्कर्षावर आपण येतो. सुशिक्षित वर्ग यासंदर्भात खूप जागरूक आहे आणि असे बरेच लोक आता ‘एकच मूल पुरे’ हे धोरण पाळताना दिसतात. मात्र काही सुशिक्षित जोडप्यांचा ‘एकाला दुसरे भावंड हवेच’ यासाठी आग्रह असतो आणि तो पुरा करून ते या विषयाला पूर्णविराम देतात. अशिक्षितांची आणि काही प्रमाणात ग्रामीण लोकांची याबाबत विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तूर्त मी या विचारभिन्नतेला बाजूस ठेवत आहे. काही सुशिक्षित लोक या मुद्द्याबाबत किती संवेदनशील असू शकतात याची काही उदाहरणे मी देणार आहे. किंबहुना तोच या लेखाचा हेतू आहे.

माझ्या माहितीत एक कुटुंब आहे. त्यांचा दरवर्षी १५ ऑगस्टला एक कौटुंबिक मेळावा असतो. त्यातील एक आकर्षण म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तेव्हा त्या वर्षीचा एक ‘संकल्प’ जाहीर करतो आणि पुढे वर्षभरात तो अमलात आणतो. हा संकल्प कुठल्या ना कुठल्या विधायक कामाशी निगडीत असतो. या कुटुंबात दोन विवाहित भाऊ आहेत. त्यापैकी काही वर्षांपूर्वी मोठ्या जोडप्याने केलेला संकल्प असा होता.
या जोडप्याला स्वतःची पहिली मुलगी आहे. लोकसंख्येच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याने आपल्याला दुसरे मूल होऊ देणे त्यांना काही पटत नव्हते. त्याचबरोबर आपल्या मुलीस भावंड हवे असेही त्यांना वाटे. या प्रश्नावर त्यांनी एक तोडगा काढला. दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याऐवजी त्यांनी दुसरे मूल अनाथालयातून दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि तो लवकरच अमलातही आणला. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मुलगीच दत्तक घेतली. त्यांच्या या निर्णयाचे बरेच कौतुक झाले.

या घटनेला दोन वर्षे उलटली. त्या दरम्यान धाकट्या भावाचे लग्न झाले. तोही मोठ्याप्रमाणेच याबाबत संवेदनशील. तेव्हा त्यांच्या वार्षिक संकल्पदिनी तोही त्याचा संकल्प जाहीर करण्यास उत्सुक होता. याबाबत बहुधा त्याने लग्न करतानाच होणाऱ्या बायकोशी त्याचे धोरण स्पष्ट केले असावे. त्याला आपल्या भावाच्या पुढे एक पाउल टाकायचे होते. तेव्हा त्याने जाहीर केले की, ते दांपत्य स्वतःला एकही मूल होऊ देणार नाही. पण त्याचबरोबर लग्नाचे पहिल्या वाढदिवशी अनाथालयातून एक मुलगीच दत्तक घेईल. त्याच्या पत्नीनेही या निर्णयास पूर्णपणे पाठींबा दिला. त्यांनी तो निर्णय यथावकाश अमलात आणला हे वेगळे सांगायला नकोच.

आता या घटनेला बरीच वर्षे उलटलीत. दोघाही भावांचे संसार उत्तम चालू आहेत. मोठ्याचे कुटुंबात दोन्ही मुलींना अगदी समान वागणूक व प्रेम मिळते. एखाद्या परक्या व्यक्तीस त्या दोन्ही मुली या सख्ख्या बहिणी नाहीत, अशी पटकन शंकाही येत नाही.

आता पाहू पुढचे उदाहरण. हा एक अभियंता आहे. आर्थिक स्थिती उत्तम. जसा तो स्थिरस्थावर झाला तसा त्याच्या पालकांनी त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावला. २-३ वर्षे त्याने “बघू सावकाश, काय घाई आहे”, असे म्हणत तो विषय टाळला. पुढे त्याची तिशी उलटली. आता त्याचे पालक तर अधीर पण तो एकदम निवांत ! अखेर त्याने त्याचा मानस पालकांपुढे उघड केला. लोकसंख्येच्या विषयावर तो खूप संवेदनशील होता. त्यामुळे लग्न करायला हरकत नाही, पण मूल अजिबात नको हा त्याचा निर्धार होता. शक्यतो त्याला दत्तकच्याही फंदात पडायचे नव्हते. या निर्णयाला पाठींबा असलेली मुलगी तो लग्नासाठी शोधत होता. पण अद्याप त्याला यश येत नव्हते. त्याने संपर्क केलेल्या मुलींनी “एकतरी हवेच”, “दत्तक अजिबात नको”, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याने यावर खोलवर विचार केला. एक गोष्ट त्याला जाणवली की पुरुष जितका याबाबत निरिच्छ होऊ शकतो तेवढे स्त्रीचे सोपे नसते. त्यामुळे जर त्याच्या विचाराची मुलगी मिळत नसेल तर त्याला अविवाहित राहायला आवडेल. आता पुढची १-२ वर्षे त्याचा पालकांशी वैचारिक संघर्ष झाला. पण तो त्याच्या विचारांशी ठाम होता. त्याला अपेक्षित अशी वधू काही मिळाली नाही. आता त्याने कायम अविवाहित राहण्याचे ठरवले आहे.

त्याच्या सारख्याच विचाराचे एक अविवाहीत माजी सैन्याधिकारी माझ्या पाहण्यात आहेत. आता ते सत्तरीचे आहेत. एकदा त्यांच्याशी या विषयावर निवांत गप्पा झाल्या. त्यांच्या तरूण वयात ते देशभक्तीने झपाटले होते. त्यात भर म्हणजे लोकसंख्येच्या विषयावर अति संवेदनशील. ते म्हणाले, “ ४० वर्षांपूर्वी लग्न हवे पण मूल नकोच असा विचार असणारी मुलगी मिळणे खूप अवघड होते. त्यात मीही दुसऱ्या बाजूने विचार केला. मूल असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ आवड असते. स्त्रीच्या शरीरधर्मानुसार मूल असल्याचे काही फायदेही तिला मिळतात. तेव्हा उगाच आपले विचार एखादीवर लादायला नकोत. त्यापेक्षा मी एकटा सुखी राहीन”.

मध्यंतरी एका प्रकल्पाच्या निमित्ताने काही कॉलेजच्या मुलांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. आपल्याकडील गरीबी, बेरोजगारी इ. विषयांवर बोलता बोलता गाडी स्वाभाविकच लोकसंख्येवर घसरली. त्यातले एकदोघे आता अधिकच तावातावाने बोलू लागले. मग एकजण उपरोधाने म्हणाला, “ खूप बाबतीत आपण अजून परावलंबी आहोत. साऱ्या जगाला लाजवेल असे आपले एकच उत्पादन आहे, ते म्हणजे आपली लोकसंख्या निर्मिती !” शिक्षण संपल्यावर या तरुणांची परदेशात स्थायिक व्हायची इच्छा आहे. पुढे जाऊन ते म्हणाले, “ जर का आम्हाला एखाद्या समृद्ध देशात स्थायिक होता आले तरच आम्ही एखाद्या मुलास जन्म द्यायचा विचार करू. पण जर का भारतातच राहावे लागले, तर उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?”
...

वर उल्लेखिलेले सर्वजण सुशिक्षित आणि शहरी आहेत. आपली लोकसंख्या बेसुमार होण्यास कोण जबाबदार आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या आपापल्या घरांत गेल्या पिढीत कुटुंबनियोजनाचा अवलंब झालेला आहे. त्यांना एखादेच भावंड आहे. तरीसुद्धा ते या विषयावर खूप संवेदनशील आहेत. त्यांच्यासारखे विचार असणारे लोक आपल्या देशात अजून तरी अल्पसंख्य आहेत. अशा मूठभर लोकांनी एखाददुसऱ्या अपत्यास जन्म दिला तर देशावर काही आभाळ कोसळणार नाही. तरीसुद्धा त्यांना असे वाटते. इतर बहुसंख्य कसे का वागेनात, पण आपण स्वतःवर निर्बंध घालावा असे त्यांना मनोमन वाटते. आपल्याकडून आपण निदान एकने तरी लोकसंख्या वाढू दिली नाही तरी त्यांना त्याचे समाधान आहे. म्हणून मला ही सर्व मंडळी वैशिष्ट्यपूर्ण वाटली.

आपण सुशिक्षित जेव्हा या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्याचा सूर साधारण असा असतो. आपली लोकसंख्या खूप वाढवण्यास आर्थिक-सामाजिकदृष्ट्‍या कनिष्ठ लोक, विशिष्ट विचारांचे लोक आणि ‘वंशाचा दिवा’ असल्या मागास विचारांचे लोक हे जबाबदार आहेत. ते जर विचारांनी सुधारत नसतील तर आपण फार गांभीर्याने कशाला विचार करायचा? आपण तशीही मोजूनमापूनच मुले जन्मास घालत असतो. त्यामुळे खरे दोषी ‘ते’ लोक आहेत. विशिष्ट लोकांनीच नियोजन करीत राहिल्यास सामाजिक असमतोल होतो ......वगैरे वगैरे.

लेखात उल्लेखिलेल्या मंडळींनी या ठराविक चर्चेस छेद दिला आहे. जे आपल्याकडून होण्यासारखे आहे ते आपण का करू नये असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचे विचार अतिरेकी वाटू शकतील, ते योग्य की अयोग्य यावरही काथ्याकूट होऊ शकतो. मला ते वेगळे वाटले एवढेच.

तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवजात नष्ट होणार. बाकी झाडे, पशुपक्ष्यांना सुद्धा यात नाहक मरावे लागणार आहे
>>>>>>
यावरून डॉ. जोन्स साल्क यांचे एक अवतरण आठवले:

“ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नष्ट झाले तर ५० वर्षांत इथली सर्वच जीवसृष्टी नष्ट होईल. पण, जर का सर्व माणसे नष्ट झाली तर मात्र पुढच्या ५० वर्षांत निरनिराळ्या सजीवांची भरभराट होईल”.

जर का सर्व माणसे नष्ट झाली तर मात्र पुढच्या ५० वर्षांत निरनिराळ्या सजीवांची भरभराट होईल”.>>>>

जिथे गवताचे पातेही उगवणार नाही अशी माणसाने भविष्यवाणी केली होती त्या चेर्नोबिलचे रूपांतर जंगलात झाले व तिथे पशु पक्षीही सुखाने नांदू लागले. माणसे मात्र आजही तिथे कायम राहात नाहीत, टुरिस्टस जातात पण तेही आत जात नाहीत, किरणोत्सर्गापासून बचावाचे कपडे घालावे लागतात.

In fact, parts of the exclusion zone have become a haven for biodiversity. Researchers have seen brown bears, lynxes, European bison, boar and Przewalski’s horses in growing numbers. An unexpected side effect of evacuating people from the area has been to create a wildlife sanctuary, where species can live untouched by human activity.

As a result, some scientists have come to two conclusions. First, animals and plants may be more resilient to radiation than we had originally thought. And second, the effects of the world’s worst nuclear disaster may be less damaging to the natural world than the continuing presence of people. Whether that is a lesson of hope, or a warning about our everyday impact on the planet, is up to you.

https://www.weforum.org/agenda/2019/05/what-s-going-on-in-chernobyl-today/

29.56% are Muslims who contribute to 43.00% of total child births>>>>

हे जगभर सुरू आहे. जगभरातील सुसंस्कृत लोक दोन, एक की शून्य या प्रश्नाचे उत्तर शोधायच्या प्रयत्नात असताना हे लोक मात्र हम पांच, हमारे पचासचा विचार करत असतात. काही वर्षात जगभर फक्त हेच उरतील.

दुःखात सुख इतकेच की यांना कुठेही सुख लाभत नाहीच, हे शांत राहूच शकत नाहीत. त्यामुळे पूर्ण जग जरी यांनी पादाक्रांत केले तरी काही काळातच आपसात भांडून मानव जातीचा विनाश करतील आणि मग परत सर्व मानवेतर सजीव सृष्टी सुखाने नांदायला लागेल. जशी सध्या चेर्नोबिलमध्ये नांदतेय.

यावरून डॉ. जोन्स साल्क यांचे एक अवतरण आठवले:

“ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नष्ट झाले तर ५० वर्षांत इथली सर्वच जीवसृष्टी नष्ट होईल. पण, जर का सर्व माणसे नष्ट झाली तर मात्र पुढच्या ५० वर्षांत निरनिराळ्या सजीवांची भरभराट होईल”.

Submitted by कुमार१ on 14 January, 2020 - 19:44
जर का सर्व माणसे नष्ट झाली तर मात्र पुढच्या ५० वर्षांत निरनिराळ्या सजीवांची भरभराट होईल”.>>>>

जिथे गवताचे पातेही उगवणार नाही अशी माणसाने भविष्यवाणी केली होती त्या चेर्नोबिलचे रूपांतर जंगलात झाले व तिथे पशु पक्षीही सुखाने नांदू लागले. माणसे मात्र आजही तिथे कायम राहात नाहीत, टुरिस्टस जातात पण तेही आत जात नाहीत, किरणोत्सर्गापासून बचावाचे कपडे घालावे लागतात.>>>>>हे नव्हते माहिती.हिरोशिमा नागासाकी ची वर्णने ऐकून मला वाटले होते की अणुबॉम्ब एकदा पडला की सर्व बेचिराख करतो आणि तेथे कधीच काही चांगले होऊ शकणार नाही.

वरील चर्चेतून या विषयाच्या एका वेगळ्या पैलूवर चांगली चर्चा झाली.
उपयुक्त माहिती.
सर्व संबंधितांना धन्यवाद देतो.

अणुबॉम्ब एकदा पडला की सर्व बेचिराख करतो आणि तेथे कधीच काही चांगले होऊ शकणार नाही.>>>>>

निसर्गाला समजणे मानवाला अजूनही शक्य झालेले नाही.

एक मुल आईबापांच्या माघारी एकटं पडतं असं बरेच जण बोलतात. त्यावर काही मार्ग काढता येईल का? त्यावर काही उपाय असेल तर एक मुल ठिक राहील.

एक मुल आईबापांच्या माघारी एकटं पडतं असं बरेच जण बोलतात.>>>>मला नाही वाटत तसं.उलट सध्या इस्टेट वाटप आणि पालकांचा सांभाळ यावरून दोघांत वाद होण्याची शक्यता जास्त.

काही उपाय असेल तर एक मुल ठिक राहील.>>>>सख्ख्या चुलत, चुलत,आते,मामे,मावस भावंडांकडे जाणे येणे असावे. त्यांच्याशी मिळून मिसळून रहावे. मित्र/मैत्रिणी जोडावे

माझ्या माहितीत अशी ४ कुटुंबे आहेत. त्या सर्वांना एकेक अपत्य आहे. दोन एकुल्त्यांनी एकमेकास भावंड मानायचे ठरवले आहे.

मला दोन मुले होती. दुर्दैवाने मुलगी ५ वर्षांची झाल्यावर गेली. आता परत घरातले पुढच्या अपत्यासाठी मागे लागले आहेत. परंतु मला परत बाळंतपण नको वाटतंय. कधी कधी असंही वाटतं आमच्या माघारी मुलाला एकटेपणा वाटला तर? किंवा वेळप्रसंगी त्याच्या मदतीला कोण धावून येईल जसा मला मदतीला माझा भाऊ आणि नवर्याला त्याचा भाऊ धावून येतो. वैयक्तिक मी माझा स्वतःचा विचार केला तर मात्र मला दूसरे (तिसरे) अपत्य नको आहे. Sad

@ नौटंकी,
तुमच्यावर ओढवलेला प्रसंग दुखःद आहे. आता इथून पुढचे तुम्हा तिघांचे आयुष्य सुखात जावो ही शुभेच्छा.
मला तरी तुमचा वैयक्तिक विचार योग्य वाटतो. अनाथाश्रमात वाढलेल्या मुलाला पुढे आयुष्यात कोण असते, असा विचार केल्यास तुमची चिंता कमी होऊ शकेल.

तुमच्या दुख्खात सहभागी आहे.

नौटंकी,क्षमा करा. असे काही घडले असेल याची कल्पना नव्हती. माझे वरचे काही प्रतिसाद harsh वाटू शकतात.पण मी ते in general लिहिले आहे.तुमच्या दुःखात सहभागी आहे.
साद यांना अनुमोदन.

कनिका,
तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका. तुम्ही धागाविषयाच्या अनुषंगानेच लिहीत होतात. नौटंकी यांचा प्रश्न विचारण्याचा हेतू तेव्हा आपल्या कुणालाच माहित नव्हता.

आता तो समजला आहे. त्यांच्या दुख्खात आपण सर्वजण सहभागी आहोत. अशा प्रसंगात त्रयस्थाने सल्ला देणे अवघड जाते. तरीही त्यांचा ‘तिसरे नको’ हा निर्णय मला योग्य वाटतो.

कनिका, तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका. मीच सुरुवातीला मोघम प्रश्न न विचारता थोडं सविस्तर बोलायला पाहिजे होतं. असो.
कुमार१, कनिका धन्यवाद.

नाही वाटून घेत अपराधी.
साधनाताई म्हणतात तसे दत्तक पर्यायाचा विचार करून बघा. घरात सांंगून बघा

दत्तक घेण्याबद्दल बोलले मी, पण कोणालाच पटलं नाही. नवर्यालाही नाही पटलं. त्यामुळे तो पर्याय नाही विचारात घेत.

दत्तकच्या निमित्ताने काही मुद्दे :

१. असे मूल घेण्याची प्रतीक्षा यादी बरीच असते. पुरवठ्यापेक्षा मागणी ६ पट अधिक आहे, असे वाचनात आले होते.
२. मागे माबोवर आदित्य यांनी त्या प्रक्रियेतील अनेक कटकटी लेखातून मांडल्या होत्या. दाम्पत्याच्या आर्थिक स्थितीची जाचक तपासणी, न्यायालयातील ‘खाक्या’ वागणूक वगैरे.

३. मुलगा की मुलगी हवी यानुसार लालफीतीचा त्रास कमी अधिक असतो.

हे सर्व पाहता काही इच्छुक जोडपी देखील दत्तक कल्पनेपासून मागे हटतात.

.... पण हे सगळं आवश्यक आहे. हा त्रास काढायची तयारी माणसाला दाखवून देते की स्वतः च नसलेलं मूल स्वतः च म्हणायची आणि त्याच्यासाठी खस्ता खायची खरंच तयारी आहे का?

दत्तक गेलेल्या मुलांची संस्थेमध्ये वापसी हा एक नवा प्रश्न अलीकडे उपस्थित झाला आहे. त्यासंबंधी हा एक लेख :

दत्तकपेचावर उपाय आवश्यक
(https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/adoption-requir...)

इतर बहुसंख्य कसे का वागेनात, पण आपण स्वतःवर निर्बंध घालावा असे त्यांना मनोमन वाटते. आपल्याकडून आपण निदान एकने तरी लोकसंख्या वाढू दिली नाही तरी त्यांना त्याचे समाधान आहे. म्हणून मला ही सर्व मंडळी वैशिष्ट्यपूर्ण वाटली.
->> मला प्रचंड मूर्ख वाटली हि मंडळी. त्यांनी कोणता अनुभव गमावला आहे त्यांना कधीच कळणार नाही. तो अनुभवल्याशिवाय कळत नाही.

चाईल्डफ्री असणे हाही एक अनुभवच असेल ना जो आपल्याला कळत नाही.
एनिवेज, जगाचा भार कमी करणे हेच एक कारण नसतं. चाईल्डफ्री लोक्स स्वतःच्या आयुष्यात एक मोठी जबाबदारी नको, या वाईट होत चाललेल्या जगात एक नवीन मूल आणायला नको, मुलांचीच दिवसरात्र काळजी करत बसायला नको अशा अनेक कारणांनी तो निर्णय घेत असतात.

चाईल्डफ्री असणे हाही एक अनुभवच असेल ना जो आपल्याला कळत नाही.
—> मूल न होईपर्यंत कळतोच कि तो अनुभव .

भारताची लोकसंख्या आणि धर्मातील फरक याविषयीचा एक चांगला अभ्यास इथे प्रसिद्ध झाला आहे
https://www.pewresearch.org/fact-tank/2021/09/21/key-findings-about-the-...
१९९२ पासून २०१५ पर्यंत मुस्लिम व हिंदू यांच्यात जन्मदरातील फरक आता बराच कमी झाला आहे
१.१ वरून ०.५ मुले असा आता तो फरक आहे

चाईल्डफ्री असणे हाही एक अनुभवच असेल ना जो आपल्याला कळत नाही.
—> मूल न होईपर्यंत कळतोच कि तो अनुभव .

हास्यास्पद !

Pages