दोन, एक की शून्य ?

Submitted by साद on 3 October, 2019 - 09:54

भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्या अवाढव्य झाल्याने तो एक चिंतेचा विषय असतो. चीनने काही काळ सक्तीचे धोरण राबवून लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडच्या खुल्या लोकशाहीमुळे आपण जोडप्यांच्या अपत्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालू शकत नाही. थोडक्यात याबाबत्त आपण राष्ट्रीय असे सक्तीचे धोरण काही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रश्न प्रबोधनाने सोडवावा या निष्कर्षावर आपण येतो. सुशिक्षित वर्ग यासंदर्भात खूप जागरूक आहे आणि असे बरेच लोक आता ‘एकच मूल पुरे’ हे धोरण पाळताना दिसतात. मात्र काही सुशिक्षित जोडप्यांचा ‘एकाला दुसरे भावंड हवेच’ यासाठी आग्रह असतो आणि तो पुरा करून ते या विषयाला पूर्णविराम देतात. अशिक्षितांची आणि काही प्रमाणात ग्रामीण लोकांची याबाबत विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तूर्त मी या विचारभिन्नतेला बाजूस ठेवत आहे. काही सुशिक्षित लोक या मुद्द्याबाबत किती संवेदनशील असू शकतात याची काही उदाहरणे मी देणार आहे. किंबहुना तोच या लेखाचा हेतू आहे.

माझ्या माहितीत एक कुटुंब आहे. त्यांचा दरवर्षी १५ ऑगस्टला एक कौटुंबिक मेळावा असतो. त्यातील एक आकर्षण म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तेव्हा त्या वर्षीचा एक ‘संकल्प’ जाहीर करतो आणि पुढे वर्षभरात तो अमलात आणतो. हा संकल्प कुठल्या ना कुठल्या विधायक कामाशी निगडीत असतो. या कुटुंबात दोन विवाहित भाऊ आहेत. त्यापैकी काही वर्षांपूर्वी मोठ्या जोडप्याने केलेला संकल्प असा होता.
या जोडप्याला स्वतःची पहिली मुलगी आहे. लोकसंख्येच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याने आपल्याला दुसरे मूल होऊ देणे त्यांना काही पटत नव्हते. त्याचबरोबर आपल्या मुलीस भावंड हवे असेही त्यांना वाटे. या प्रश्नावर त्यांनी एक तोडगा काढला. दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याऐवजी त्यांनी दुसरे मूल अनाथालयातून दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि तो लवकरच अमलातही आणला. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मुलगीच दत्तक घेतली. त्यांच्या या निर्णयाचे बरेच कौतुक झाले.

या घटनेला दोन वर्षे उलटली. त्या दरम्यान धाकट्या भावाचे लग्न झाले. तोही मोठ्याप्रमाणेच याबाबत संवेदनशील. तेव्हा त्यांच्या वार्षिक संकल्पदिनी तोही त्याचा संकल्प जाहीर करण्यास उत्सुक होता. याबाबत बहुधा त्याने लग्न करतानाच होणाऱ्या बायकोशी त्याचे धोरण स्पष्ट केले असावे. त्याला आपल्या भावाच्या पुढे एक पाउल टाकायचे होते. तेव्हा त्याने जाहीर केले की, ते दांपत्य स्वतःला एकही मूल होऊ देणार नाही. पण त्याचबरोबर लग्नाचे पहिल्या वाढदिवशी अनाथालयातून एक मुलगीच दत्तक घेईल. त्याच्या पत्नीनेही या निर्णयास पूर्णपणे पाठींबा दिला. त्यांनी तो निर्णय यथावकाश अमलात आणला हे वेगळे सांगायला नकोच.

आता या घटनेला बरीच वर्षे उलटलीत. दोघाही भावांचे संसार उत्तम चालू आहेत. मोठ्याचे कुटुंबात दोन्ही मुलींना अगदी समान वागणूक व प्रेम मिळते. एखाद्या परक्या व्यक्तीस त्या दोन्ही मुली या सख्ख्या बहिणी नाहीत, अशी पटकन शंकाही येत नाही.

आता पाहू पुढचे उदाहरण. हा एक अभियंता आहे. आर्थिक स्थिती उत्तम. जसा तो स्थिरस्थावर झाला तसा त्याच्या पालकांनी त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावला. २-३ वर्षे त्याने “बघू सावकाश, काय घाई आहे”, असे म्हणत तो विषय टाळला. पुढे त्याची तिशी उलटली. आता त्याचे पालक तर अधीर पण तो एकदम निवांत ! अखेर त्याने त्याचा मानस पालकांपुढे उघड केला. लोकसंख्येच्या विषयावर तो खूप संवेदनशील होता. त्यामुळे लग्न करायला हरकत नाही, पण मूल अजिबात नको हा त्याचा निर्धार होता. शक्यतो त्याला दत्तकच्याही फंदात पडायचे नव्हते. या निर्णयाला पाठींबा असलेली मुलगी तो लग्नासाठी शोधत होता. पण अद्याप त्याला यश येत नव्हते. त्याने संपर्क केलेल्या मुलींनी “एकतरी हवेच”, “दत्तक अजिबात नको”, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याने यावर खोलवर विचार केला. एक गोष्ट त्याला जाणवली की पुरुष जितका याबाबत निरिच्छ होऊ शकतो तेवढे स्त्रीचे सोपे नसते. त्यामुळे जर त्याच्या विचाराची मुलगी मिळत नसेल तर त्याला अविवाहित राहायला आवडेल. आता पुढची १-२ वर्षे त्याचा पालकांशी वैचारिक संघर्ष झाला. पण तो त्याच्या विचारांशी ठाम होता. त्याला अपेक्षित अशी वधू काही मिळाली नाही. आता त्याने कायम अविवाहित राहण्याचे ठरवले आहे.

त्याच्या सारख्याच विचाराचे एक अविवाहीत माजी सैन्याधिकारी माझ्या पाहण्यात आहेत. आता ते सत्तरीचे आहेत. एकदा त्यांच्याशी या विषयावर निवांत गप्पा झाल्या. त्यांच्या तरूण वयात ते देशभक्तीने झपाटले होते. त्यात भर म्हणजे लोकसंख्येच्या विषयावर अति संवेदनशील. ते म्हणाले, “ ४० वर्षांपूर्वी लग्न हवे पण मूल नकोच असा विचार असणारी मुलगी मिळणे खूप अवघड होते. त्यात मीही दुसऱ्या बाजूने विचार केला. मूल असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ आवड असते. स्त्रीच्या शरीरधर्मानुसार मूल असल्याचे काही फायदेही तिला मिळतात. तेव्हा उगाच आपले विचार एखादीवर लादायला नकोत. त्यापेक्षा मी एकटा सुखी राहीन”.

मध्यंतरी एका प्रकल्पाच्या निमित्ताने काही कॉलेजच्या मुलांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. आपल्याकडील गरीबी, बेरोजगारी इ. विषयांवर बोलता बोलता गाडी स्वाभाविकच लोकसंख्येवर घसरली. त्यातले एकदोघे आता अधिकच तावातावाने बोलू लागले. मग एकजण उपरोधाने म्हणाला, “ खूप बाबतीत आपण अजून परावलंबी आहोत. साऱ्या जगाला लाजवेल असे आपले एकच उत्पादन आहे, ते म्हणजे आपली लोकसंख्या निर्मिती !” शिक्षण संपल्यावर या तरुणांची परदेशात स्थायिक व्हायची इच्छा आहे. पुढे जाऊन ते म्हणाले, “ जर का आम्हाला एखाद्या समृद्ध देशात स्थायिक होता आले तरच आम्ही एखाद्या मुलास जन्म द्यायचा विचार करू. पण जर का भारतातच राहावे लागले, तर उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?”
...

वर उल्लेखिलेले सर्वजण सुशिक्षित आणि शहरी आहेत. आपली लोकसंख्या बेसुमार होण्यास कोण जबाबदार आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या आपापल्या घरांत गेल्या पिढीत कुटुंबनियोजनाचा अवलंब झालेला आहे. त्यांना एखादेच भावंड आहे. तरीसुद्धा ते या विषयावर खूप संवेदनशील आहेत. त्यांच्यासारखे विचार असणारे लोक आपल्या देशात अजून तरी अल्पसंख्य आहेत. अशा मूठभर लोकांनी एखाददुसऱ्या अपत्यास जन्म दिला तर देशावर काही आभाळ कोसळणार नाही. तरीसुद्धा त्यांना असे वाटते. इतर बहुसंख्य कसे का वागेनात, पण आपण स्वतःवर निर्बंध घालावा असे त्यांना मनोमन वाटते. आपल्याकडून आपण निदान एकने तरी लोकसंख्या वाढू दिली नाही तरी त्यांना त्याचे समाधान आहे. म्हणून मला ही सर्व मंडळी वैशिष्ट्यपूर्ण वाटली.

आपण सुशिक्षित जेव्हा या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्याचा सूर साधारण असा असतो. आपली लोकसंख्या खूप वाढवण्यास आर्थिक-सामाजिकदृष्ट्‍या कनिष्ठ लोक, विशिष्ट विचारांचे लोक आणि ‘वंशाचा दिवा’ असल्या मागास विचारांचे लोक हे जबाबदार आहेत. ते जर विचारांनी सुधारत नसतील तर आपण फार गांभीर्याने कशाला विचार करायचा? आपण तशीही मोजूनमापूनच मुले जन्मास घालत असतो. त्यामुळे खरे दोषी ‘ते’ लोक आहेत. विशिष्ट लोकांनीच नियोजन करीत राहिल्यास सामाजिक असमतोल होतो ......वगैरे वगैरे.

लेखात उल्लेखिलेल्या मंडळींनी या ठराविक चर्चेस छेद दिला आहे. जे आपल्याकडून होण्यासारखे आहे ते आपण का करू नये असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचे विचार अतिरेकी वाटू शकतील, ते योग्य की अयोग्य यावरही काथ्याकूट होऊ शकतो. मला ते वेगळे वाटले एवढेच.

तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू उच्चवर्णीय लोकांनाच हे सगळे सल्ले. गरीब आणि बाकीच्यांना पूर्ण सूट. मध्ये एकाला २२ मुलं झाल्याची बातमी वाचली. सुशिक्षित हिंदूंची मुलं वाढली पाहिजे कि बाकीच्यांची.

तुमचा नक्की मुद्दा काय कळलं नाही.
पण आमच्या ओळखीचं एक कपल आहे. नवरा मराठी, बायको गोरी अमेरिकन. त्यांनी आधीच 'मूल नको' असं ठरवलं होतं. I think that is totally cool. त्या मुलाचे आईबाबा पण या निर्णयाबाबत एकदम कूल आहेत. याशिवाय अनेक सामान्य लोक व सेलेब्रिटीदेखील ठरवून मूल होऊ न देणारे आहेतच.
भारतात बरेचदा सोशल प्रेशरमुळे लोकाना असा निर्णय घेणं एकेकाळी सोपं नव्हतं पण आता तिथेही सोशल स्ट्रक्चर बदलत चाललंय. त्यामुळे चाईल्ड फ्री लोकांची संख्या वाढत जाईल. तसं होणं स्वागतार्हच आहे.

India’s population growth slows substantially, may ‘no longer be pressing problem’

Official government data shows that states such as Uttar Pradesh, Bihar and Madhya Pradesh have an average fertility rate of well above 3, reflecting the challenges that the government still faces.

The all-India average fertility rate, however, is around 2.3, close to the ideal replacement level fertility rate of 2.1.

Maharashtra, West Bengal, Kerala, Tamil Nadu, Telangana, Karnataka and Andhra Pradesh are among the states where the fertility rate has fallen well below the ideal fertility rate, the previous edition of the UN population report had found.

बाकी हा पर्सनल स्पेस मधला प्रश्न आहे. मूल जन्माला घालायचं, दत्तक घ्यायचं का काहीच करायचं नाही का लग्नच करायचं नाही! यातील कोणतीही निवड काकणभर ही सरस किंवा काहीच नाही.
हे निर्णय योग्य/ अयोग्य/ वेगळे असे काही काही नाहीत. फक्त पर्सनल चॉईस. बस्स.

ह्या प्रश्नाचे उत्तर थोडेफार आर्थिक परिस्थिती शी जोडलं गेले पाहिजे .
ज्याच्या उद्योग व्यवसाय विस्तारलेला आहे .किंवा खूप सारी जमीन आहे त्या लोकांनी ती मालमत्ता जपण्यासाठी जास्त मुलांना जन्म द्यायला काही हरकत नाही आणि ते व्यवहारिक सुधा आहे .सरकारी
नोकरी पेशा व्यक्ती किंवा बऱ्या पैके आर्थिक प्राप्ती होते असे खासगी क्षेत्रात नोकरी करणारे पण मिळणारे वेतन हेच आहे .आर्थिक प्राप्तीचे साधन आहे
नोकरी संपली की इन्कम संपला त्यांनी 2 मुल जन्माला घालणे ठीक आहे .
वरील दोन्ही गटातील लोक मुलांना व्यवस्थित शिक्षण देवू शकतात आणि त्यांना स्वतःच्या पायावर सुद्धा उभे करू शकतात .
आणि शेवटी बेभरवशाचे आर्थिक तुटपुंजे उत्पादन आहे त्यांनी एकच मुलाला जन्म देवा.
पण आपल्या कडे सर्व उलट आहे ज्यांचे पोट भरायचे वांदे आहे त्यांना 5 =5 मुल आहेत

. पण जर का भारतातच राहावे लागले, तर उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?”
>>> अगदी बरोबर आहे. आजकाल निम्न मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब घरातील मुले जन्माला घातले म्हणून आई-वडिलांना दोष देताना पाहिले आहे. तुम्ही आमच्या साठी काय केलं हे विचारतात मुलं. अशा आईवडीलांना म्हातारपणात खूप हाल सोसावे लागतात.

अफाट लोकसंख्या व त्यामुळे सध्या येणार्‍या अडचणींचा विचार करुन ही लग्नाळु पिढी इतका व्यवस्थीत सुस्पष्ट विचार करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणुन सर्व उदाहरणे आवडली.
परंतु आर्थिकदृष्ट्या खुप हलाखीत असलेल्या कुटुंबांपर्यंत कमी मुलं असल्याचे फायदे नीट का बरे पोचत नसतील? मुल जन्माला येतंय म्हणजे किती प्रचंड खर्च वाढणार हे सरळ गणित त्यांना का बरे कळत नसेल हा प्रश्न नेहमीच पडतो. बरं मुल न होऊ देणे याकरता सोयी आहेत हे आता समाजाच्या कोणत्याही थरावर माहीत झाले असेल. कारण कित्येक वर्षांपासुन याचा प्रसार होतो आहे.

राजेश यांचा प्रतिसाद आवडला, जरी आपल्याला या सर्वांना सांगायचा अधिकार नसला तरी.

> बाकी हा पर्सनल स्पेस मधला प्रश्न आहे. मूल जन्माला घालायचं, दत्तक घ्यायचं का काहीच करायचं नाही का लग्नच करायचं नाही! यातील कोणतीही निवड काकणभर ही सरस किंवा काहीच नाही.
हे निर्णय योग्य/ अयोग्य/ वेगळे असे काही काही नाहीत. फक्त पर्सनल चॉईस. बस्स. > +१.

> ह्या प्रश्नाचे उत्तर थोडेफार आर्थिक परिस्थिती शी जोडलं गेले पाहिजे . > +१.
===

ज्यांना मुलं आवडतात && जे लोकं अर्थिकदृष्ट्या जास्त मुलांना सांभाळू शकतात त्यानी जास्त मुलं जन्माला घालावीत (शक्यतो वेगवेगळ्या जोडीदारासोबत!). कमी मुलं जन्माला घालून त्यांना वारसाहक्कात डबोलभरून पैसे देऊन ऐदी-आळशी बनवण्याऐवजी जास्त मुलांमधे संपत्ती विभागलेली जास्त बरी (सामाजिकदृष्ट्या).
+ कमी मुलं, एकाच जोडीदार सोबत मुलं यामधे असलेल जैविक नुकसान विसरू नये.
===

> परंतु आर्थिकदृष्ट्या खुप हलाखीत असलेल्या कुटुंबांपर्यंत कमी मुलं असल्याचे फायदे नीट का बरे पोचत नसतील? मुल जन्माला येतंय म्हणजे किती प्रचंड खर्च वाढणार हे सरळ गणित त्यांना का बरे कळत नसेल हा प्रश्न नेहमीच पडतो. बरं मुल न होऊ देणे याकरता सोयी आहेत हे आता समाजाच्या कोणत्याही थरावर माहीत झाले असेल. कारण कित्येक वर्षांपासुन याचा प्रसार होतो आहे. > निम्नवर्गातले लोकं मुलांची संख्या आर्थिक परिस्थितीशी जोडत नाहीत. ते गणित करत बसत नाहीत.+ मला नाही वाटत त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनांचा प्रसार, वापराचे प्रशिक्षण, उपलब्धता पुरेशी झाली आहे.

जैविक नुकसान झालं, संपत्ती कमी लोकांत विभागली गेली, मुलं निसर्गाच्या (तुमच्या सगळ्यांच्या न्हवे) कसोटीपेक्षा कमी दर्जाने वाढवली गेली तर निसर्ग बघुन घेईल की! सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट हा दांडुका सगळी कडे समान बसतो. मानव आपल्या मेंदूच्या बळावर निसर्गतः किंवा मानवनिर्मित लेस फिट लोकांना समान संधींचं द्वार खुलं करू बघतोय. त्याला मर्यादा आहेत का नाहीत हे येणार काळ सांगेलच.

बाकी बक्कळ पैसे कमावणारे बहुसंख्य भारतीय लोक सदैव मोबाईलवर बसून बिनडोकासारखे काय वाट्टेल ते फॉरवर्ड करतात, ग्रह तार्‍यांनुसार पत्रिका करतात आणि मंगळ/ शनीची बाधा आपल्या पोरांना देतात, आपल्या पोट्ट्यांना काहीही शिस्त लावत नाहीत, कुठे कसं वागायचं हे त्यांनाच झेपत नाही, मुलांना काय शिकवणार? अशांनी एका पोराला तरी जन्माला घालावं का?
परत घाला नका घालू... ज्याचा त्याचा प्रश्न.
गरिबांची समृद्धी वाढवा.... आपोआप जन्मदर कमी होईल.

जैविक नुकसान झालं, मुलं निसर्गाच्या कसोटीपेक्षा कमी दर्जाने वाढवली गेली तर -> निसर्ग बघुन घेईल की! सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट हा दांडुका सगळी कडे समान बसतो.
∆ हे ठिकय.

संपत्ती कमी लोकांत विभागली गेली तर -> निसर्ग बघुन घेईल की! सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट हा दांडुका सगळी कडे समान बसतो.
∆ हा रिस्की विचार वाटतोय श्रीमंत लोकांसाठी. लग्न, एकच जोडीदार असणे, संपत्ती, वाटणी हे सगळंच अनैसर्गिक आहे.

<परंतु आर्थिकदृष्ट्या खुप हलाखीत असलेल्या कुटुंबांपर्यंत कमी मुलं असल्याचे फायदे नीट का बरे पोचत नसतील? मुल जन्माला येतंय म्हणजे किती प्रचंड खर्च वाढणार हे सरळ गणित त्यांना का बरे कळत नसेल हा प्रश्न नेहमीच पडतो.>
या वर्गातल्या लोकासाठी मूल जन्माला येणं म्हणजे खूप खर्च असं गणित नसतं. फक्त पर्सेप्शनच नव्हे,तर प्रत्यक्षातही. तसंच मुलं ही त्यांच्यासाठी गुंतवणूक असतात.
त्याउलट आर्थिक सु स्थिर वर्गातल्या लोकांसाठी मुलं म्हणजे भरपूर खर्च
१. आईची बाळंतपणाची रजा + नोकरी - व्यवसायातल्या हुकलेल्या संधी
२. मुलांच्या संगोपनाचा खर्च
३. मुलांच्या शिक्षणाचा खर्च.
४. त्यांच्या करियरचा खर्च
यांच्यासाठी मुलं ही गुंतवणूक नसतात.

गरीब कु टुंबांत हे खर्च नगण्य असतात. मुलं लहान वयातच काम करू लागतात. ती उत्पन्नात भर घालतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक मुलं जन्माला घालणं हा पर्फेक्टली रॅशनल डिसिजन असतो.

लेख आवडला.
मध्ये ट्विटरवर पर्यावरण आणि पृथ्वीचे भवितव्य या संबंधाने एक थ्रेड वाचला होता. त्यात आपण काय करू शकतो यातलं एक उत्तर मुलं होऊ न देणं हा होता.

भरत जी सहमत. मला हेच म्हणायचं होतं. गरीब कुटुंबांमध्ये मुलं पैसे कमवायचे असेट समजतात. लहाणपणापासूनच कामाला जुंपले जाते. एखादा मुलगा/ मुलगी कर्तबगार निपजून गरीबी दूर करील हा दुर्दम्य आशावाद सुध्दा असतो.

समतोल चर्चेबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यामुळे कुठलाही एक पर्याय सर्वोत्तम असे ठरवता येत नाही. अजूनही भारतात ‘मूल हवे’ असे विचार असणारेच बहुसंख्य आहेत. म्हणून मला लेखातली उदाहरणे ‘वेगळी’ वाटली. म्हणून हा चर्चाविषय घेतला.

‘व्यक्तिगत आवड’ आणि आर्थिक स्थिती हे दोन्ही मुद्दे आवडले.

बाकी हा पर्सनल स्पेस मधला प्रश्न आहे. मूल जन्माला घालायचं, दत्तक घ्यायचं का काहीच करायचं नाही का लग्नच करायचं नाही! यातील कोणतीही निवड काकणभर ही सरस किंवा काहीच नाही.

हे पर्सनल स्पेसमधील नाही. चीन मध्ये सक्तीने एकच मूल होऊ देणं हा स्टेट लॉ होता. भारतात खरंतर संजय गांधीनी ही व्हिजन दाखवली होती पण दुर्दैवाने गलथान implementation आणि त्याचवेळी आणीबाणी डिक्लेअर होणे या कारणांमुळे एक चांगला उपक्रम वाया गेला. त्यानंतर कोणत्याही सरकारने याबद्दल ठोस पावलं उचलण्याची हिंमत दाखवलेली नाही. पण तरीही लग्न कितव्या वर्षी करावे, किती लोकांशी करावे, डिव्होर्स कसा घ्यावा याबद्दल कायदे आहेत. आणि दोन तिनपेक्षा अधिक मुलं असल्यावर अनेक बेनिफिट कायद्यानुसार मिळत नाहीत. Society does have a say in this matter.
So while I am against the shaming and judging of non -breeders (they should be thanked instead !), I think people having ten kids should definitely face some consequences unless they are very rich and are not a burden on society.

मुळात मुल एक असू ध्या किंवा अनेक तो पर्सनल प्रश्न आहे असं नाही समजता येणार .
तो राष्ट्रीय प्रश्न आहे आणि राष्ट्राच्या भवितव्य शी निगडित प्रश्न आहे .
राष्ट्र च्या नैसर्गिक संपत्ती वर घाला आहे .
राष्ट्र च्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे (उत्पादनाची साधने नसतील तर ती व्यक्ती गुन्हेगारी मार्गाला वळते).
त्या मुळे ह्या बाबतीत राष्ट्रीय धोरण हे असलेच पाहिजे आणि त्याची कडक अमलबजावणी झाली पाहिजे

चीनला सक्तीने एकच मूल धोरणाची कटु फळं आता चाखायला मिळत आहेत. त्यामुळे आ धी दोन आणि आता तीन मुलं अ सं त्यांचं धोरण बदललं आहे.
भारतातला जननदर रिप्लेसमेंट लेव्हलच्या जवळपास आलेला आहे. सक्ती न करता.

भारतातला जननदर रिप्लेसमेंट लेव्हलच्या जवळपास आलेला आहे. सक्ती न करता.
हे जरा सविस्तर सांगाल तर समजायला बर होईल .
मुळात जन्म दराची आकडेवारी दिशाभूल करू शकते .
राज्याची लोकसंख्या
किती च्या पटित वाढत गेली ह्याचा सुधा विचार करावा लागेल .
जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील लोक कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात स्थलांतरित झाल्या मुळे आकडेवारी वेगळेच चित्र निर्माण करते .
जसे मुंबईचे आर्थिक उत्पादन संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आकडेवारीत प्रगत राज्याच्या पंगतीत बसवते .
नीट मला सांगता आले नाही पण मला काय म्हणायचे आहे ते समजलं असेल

जनन दर आणि विशिष्ट भागातला लोकसंख्यावाढीचा दर यांत फरक आहे.
जननदरात स्थलांतरितांचे आकडे येत नाहीत.
https://www.downtoearth.org.in/news/lifestyle/economic-survey-2018-19-sc...

आता ज्या राज्यांतून इतर राज्यांत अधिक स्थलांतर होतं तिथेच हा जननदर अधिक आहे.

जननदराचा थेट संबंध स्त्रियांच्या सबलीकरणाशी आहे. स्त्रीशिक्षण, लग्नाचं वय, उत्पन्नाची संधी, स्त्री असल्याचा अभिमान या गोष्टी बळावतील, तसा जननदर अधिक घटेल.

निम्नवर्गायल्या लोकांना हिणवणं = फक्त जन्माने लाभलेल्या प्रिव्हिलेज मुळे डोळ्यांवर आणि मनावर घट्ट बसलेलं झापड

मुल एक नाहीतर अनेक ती नैसर्गिक साधनसंपत्ती वरच अवलंबून असतात त्या मुळे नैसर्गिक साधनसंपत्ती वर तान येतो हे खरे आहे .
खोटं असेल तर कसं?
देशाच्या संपत्तीत वाटेकरी आहेत .
हे सुधा खोटं असेल तर कसं .
जास्त लोकसंख्या गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत होते(कमी संपत्ती आणि वाटेकरी जास्त त्या मुळे गुन्हेगारी ,नैराश्य हे येत).
हे सर्व खर असेल तर राष्ट्रीय धोरण ठरवून लोकसंख्या नियंत्रित ठेवली तर विरोध करणारे का विरोध करतात ?

तो मार्ग चुकीचा आहे. वर मी स्त्री सबली करणाबद्दल लिहिलंय ते वाचा. जम ल्यास समजून घ्या.

बाकी वरच्या सगळ्या ऑर्ग्युमेंट्स फसव्या आहेत.

श्रीमंत लोक देशाच्या साधनसंपत्तीची अधिक नासधूस करतात. ( पटत नसेल तर प्रगत आणि प्रगतीशील देशांचा नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर यांची तुलना करून ते लॉजिक इथे बसतंय का ते बघा )

अर्थात ज्यां चा लोकशाहीवर विश्वास नाही, बहुसंख्यांनी किंवा काही मोजक्या दांडग्या लोकांनी सगळ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायचे आणि ते कठोरपणे राबवायचे , तसंच संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप यात ज्यांना काही वावगं वाटत नाही, त्यांना हे समजावता येंणं अशक्य आहे.

चीनच्या एकच मूल धोरणाचे परिणाम - नव्या जोडप्यावर आधीच्या पिढीतल्या चार जणांची जबाबदारी. उलटा पिरॅमिड.

नोकऱ्या आणि इच्छुक
ह्यांचे अतिशय व्यस्त प्रमाण.
जमिनीचे होत जाणारे तुकडे.
शेतीसाठी कमी होत जाणारी जमीन.
वाढत्या लोकसंख्या च्या राहण्यासाठी जंगलाची होणारी कत्तल आणि निसर्गाचा बिघडणार तोल.
आणि त्यातून निर्माण होणारे भयंकर प्रश्न ह्यांच्या कडे कानाडोळा करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण नको असे मत व्यक्त करणे म्हणजे समोर धोका दिसत असून त्याच मार्गाने सुसाट वेगात जाणे ह्याचे वर्णन आत्महत्येला प्रोत्साहन देणे अस च करावे लागेल .

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण नको, असं कुठे म्हटलंय? त्याचा मार्ग वेगळा हवा. तो कोणता तेही लिहिलंय. स्त्रियांचं सबलीकरण होऊन लोकसंख्यावाढीचा वेग आटोक्यात आलेला तुम्हांला नकोय का?

असो, तुम्हाला सिलेक्टिव्ह रीडिंग करून स्वतःचंच म्हणणं पुढे रेटण्यात रस आहे.

माझ्याकडून पूर्णविराम.

मूल असावे की नसावे हा व्यक्तिगत प्रश्न की राष्ट्रीय, यावर मतभेद जरूर असणार. क्षणभर सामाजिक मुद्दा बाजूला ठेऊ. मूल जन्मास न घातल्याने पुरुषाला तसा आरोग्यदृष्ट्या फरक पडत नाही पण स्त्रीला पडतो. याबाबतचा एक अनुभव लिहितो.

एक ओळखीच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या बाई आहेत. त्या पुण्याच्या के इ एम मध्ये कामास होत्या. त्यांना एक मूल झाल्यानंतर पूर्णविराम द्यावा की नाही या संभ्रमात होत्या. खूप विचार करून गोंधळल्यावर त्या सल्ल्यासाठी थेट डॉ. बानू कोयाजींकडे गेल्या.
त्यांनी या बाईंना असे सांगितले, “ तू वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेस. अनेक आजार जवळून बघतेस. २ मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रीस आरोग्यविषयक फायदे ( उदा. स्तन- कर्करोगाची शक्यता कमी राहणे, इ.) असतात हे तुला माहित आहे. तेव्हा फक्त यादृष्टीने पाहता मला तरी २ मुले असणे योग्यच वाटते”.

आणि आता जग अशा ठिकाणी उभ आहे तिथे मानवी श्रमिकांची गरज कमी होत जाईल .कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगत होवून माणसाची श्रमाची काम सुद्धा करू लागेल .
त्या मुळे तरुण लोकसंख्या चा economy शी संबंध कमी होत जाईल .
स्किल प्राप्त असलेलं मनुष्य बळ च वापरलं जाईल unskil लोकांचा रोजगाराचा प्रश्न उभा राहील .
तरुण लोकसंख्या जास्त आहे की कमी की कमी हा प्रश्नच उपस्थित होणार नाही

Pages