निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकार शेंगदाण्यापेक्षा लहान आहे होय, मला आकार मोठा वाटला.. अगदी कोकमा एवढा. पण पानावरुन लक्षात आल की कोकम नाही वेगळ कहीतरी आहे.

शालीदा, ऋतुराज, वर्षा, सिद्धि धन्यवाद.
@शालीदा. ईतके दिवस मला फोटो अपलोड होत नव्हते. कालपासूनच जमायला लागले, तर आनंदच्या भरात धडाधड फोटो अपलोड करत सुटले त्यामुळे स्पेस द्यायला विसरले.

बाकी सगळ्याचे प्रचि पण छान आहेत. ( कोळ्याचे सोडून, मला भिती वाटते कोळ्याची Sad ).
शालीदा त्या पाणजुळीच्या फळातून शाईसारखा रस निघतो का??

मस्त आहेत सर्व फोटो.

पाणजुळी फळे cute दिसतायेत.

डॉ विनया जंगले सध्या लोकप्रभात "जंगलबुक" नावाचं सदर लिहितात. अत्यंत वाचनीय. >>> वाचायला हवं, thank u. यावरून आठवलं माझी भाची पण लिहिते लोकप्रभात अधून मधून, मध्ये घुबडाबद्दल लिहिलेलं ते मी अजून वाचलंच नाहीये, त्याआधी पण एका जंगल सफारीवर आणि वाघांवर लिहिलं होतं.

नवीन भाग आला आणि पळतोय ही मस्त ..असंच राहू दे.

दोन्ही मनोगते छान आणि प्रचि पण सगळेच सुन्दर.

माझी भाची पण लिहिते लोकप्रभात अधून मधून, मध्ये घुबडाबद्दल लिहिलेलं ते मी अजून वाचलंच नाहीये>>>>>>> अन्जु ताई तुम्ही म्हणताय तो हा लेख का?
http://epaper.lokprabha.com/2237413/Lokprabha/19-07-2019#dual/4/1

हो हो हीच भाची माझी. मनोरंजन क्षेत्रात काम करते आणि लेखनही करते. Thank u so much. हा ही वाचेन. मागे लेख आलेला तेव्हा नवऱ्याने लोकप्रभा विकत आणलेला पण यावेळी राहिलाच. त्यामुळे इथेच वाचेन.

माझ्याकडे याच रंगाची लिली आहे, उन्हाळ्यात फुलते. कोकणातून आणलीय. सुरेख रंग. इथे माझं किड्याकडे आधी लक्ष गेलंच नाही.

बाब्बो नाकतोडा, मी घाबरते पण मस्त फोटो.

12345_0.jpg

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…

इंदिरा संत

निवडुंगाचं फुल!! सुंदर!!!
पण इंदिरा संतांची ही कविता वाचताना मला निवडुंगाची ही फुलं कधीच डोळ्यासमोर आली नाहीत. ती फुलं खालच्या फोटोतल्या नेपतीची असावीत असंच मला अजूनही वाटतं. कारण माहीत नाही Happy
(फोटो गूगलवरून)
image2.jpeg

ही फुलं कर्णफुलासारखी कानात घालताही येतात.
निवडुंगाची कशी बरं घालत असतील?

वावे, तो फोटो डेलिया चा आहे
अदीजो , झुबे म्हटलंय त्यामुळे कदाचित निवडुंगाचे फुल म्हटलंय
झुबे नावाचा एक कर्णालंकार असतो

फोटो आणि कविता ही अगदी मेजवानी. मला जिप्सी यांची आठवण आली, ते असेच फोटो आणि सोबत सुरेख कविता द्यायचे.

अदीजो मस्त फोटो.

या धाग्याच्या मनोगतातील कविताही सुंदर!
यातील इंदिरा संतांच्या कवितेतल्या
"ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर" या ओळींबद्दल:

निखाऱ्यावर ऊद टाकून, त्यावर जाळीदार टोपली उपडी टाकून, तीवर न्हालेले केस (कचभार) पसरून उदाच्या/ धुपाच्या सुगंधी धुरात वाळवण्याची पूर्वी पद्धत होती. तो संदर्भ इथे आहे. उष्ण ग्रीष्म म्हणजे ती कचभार वाळवण्याची टोपली !

निखाऱ्यावर ऊद टाकून त्यावर जाळीदार टोपली उपडी टाकायची आणि त्यावर न्हालेले केस (कचभार) पसरून उदाच्या/ धुपाच्या सुगंधी धुरात वाळवण्याची पूर्वी पद्धत होती. तो संदर्भ इथे आहे. उष्ण ग्रीष्म म्हणजे ती कचभार वाळवण्याची टोपली ! >>> वाह, हा संदर्भ नव्हता मला माहिती.

निखाऱ्यावर ऊद टाकून, त्यावर जाळीदार टोपली उपडी टाकून, तीवर न्हालेले केस (कचभार) पसरून उदाच्या/ धुपाच्या सुगंधी धुरात वाळवण्याची पूर्वी पद्धत होती. तो संदर्भ इथे आहे. उष्ण ग्रीष्म म्हणजे ती कचभार वाळवण्याची टोपली !>>>>>>>>अहाहा मस्तच...

अदीजो, thanks! कवितेच्या न उमजलेल्या ओळींच रसग्रहण! सुंदरच. मलाही हे माहिती नव्हत. Happy

अदीजो बर झाल अर्थ सांगितलात ते.
बाकी सुगंधी धुरात केस वाळवण्याची पूर्वी पद्धत होती हे आजी कडून माहित झालं होतं, पण कचभार या शब्दाचा अर्थ न समजल्याने मी ती ओळ तशीच ठेवली होती. त्याचे स्पष्टीकरण एवढं सहज सुंदर रित्या करणे हे मला जमलं नसत बहुतेक.
- हजार धन्यवाद या स्पष्टीकरणा साठी.

आमच्या सोसायटीच्या वॉचमनने पाळलेली ही टर्की. जोडी आहे पण फोटो काढायला गेलो की मागे लागतात. आज एक जण शांत होता म्हणून फोटो काढता आले.
तुर्की (Bronze Turky)
प्रचि: १
टर्की१.jpg
प्रचि: २
टर्की२.jpg
प्रचि: ३
टर्की३.jpg
प्रचि: ४
टर्की४.jpg

आदिजो खुप सुंदर माहिती.
सगळे फोटो सुंदर

आमचा दयाळू दयाळ. बरेच येतात आमच्याकडे व कुजबुज, गाणी आणि भांडणे चालू असतात यांची.
1565326265-picsay.jpg

Pages