निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ व निसर्ग लेखक श्री किरण पुरंदरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव पक्षीनिरीक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत केवळ पक्षीच नव्हे तर जंगलातील इतर जैवविविधतेविषयी जाणून घेण्याची, अभ्यासण्याची संधी मिळेल. केवळ पक्षिनिरीक्षण हे उद्दिष्ट न ठेवता एक अभ्यासपूर्ण कार्यशाळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
पक्षिनिरीक्षण यातलं निरीक्षण म्हणजे नेमके काय? आपण शहरात राहून पक्षांविषयी काय करू शकतो? शहरात राहून आपल्याला निसर्गविषयक कोणते उपक्रम करता येतील? पक्षिनिरीक्षण करताना आपला दृष्टिकोन कसा असावा? या आणि अश्या अनेक गोष्टींबद्दल आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या चाळीस वर्षांच्या अनुभवाचा खजिना आपल्या समोर ते उघडणार आहेत. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. निसर्गप्रेमींनी याचा जरूर लाभ घ्यावा.
कुठे : पिटेझरी गावात. नागझिरा जवळ, भंडारा
कधी : ६ ते ९ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी मला विपु मध्ये लिहा

त्या घुबडाला कावळे फार त्रास देत होते. सारखे येऊन टोचा मारत होते. मग आम्ही सहजच खिडकीतलं विंडचाईम वाजवलं तर पळून गेले. कावळे पळाले की घुबड झोपायचं. मग परत थोड्या वेळाने कावळे यायचे त्रास द्यायला. मग पुन्हा आम्ही विंडचाईम वाजवायचो आणि कावळे पळायचे. परत घुबड झोपायचं. बराच वेळ हा खेळ चालला.
शेवटी घुबड वैतागून विंडचाईमच्या खालीच येऊन झोपलं.
Lol

सुपारीच्या झावळीपासून बनवलेल्या पत्रावळीत मेथीलावण्याचा प्रयोग केला. चांगली आली मेथी.

मनिम्याऊ ते गव्हानी घुबड खरच गोड आहे. मी पाहिले नाही अजुन. वावे यांच्याकडेही हे आले होेते एकदा.
परवानगी असती तर मी खरच एक घुबड पाळले असते. मला आवडते त्यांचे मान हलवने, डोळे वगैरे.

शेवटी घुबड वैतागून विंडचाईमच्या खालीच येऊन झोपलं>>>> बिचारं Lol
लालबुडे आणि कावळे फार त्रास देतात इतर पक्ष्यांना. त्यांची हद्द नसते, खाद्य नसते, जवळपास घरटे नसते तरीही उगाच एखाद्या नविन पक्ष्याला या फांदीवरुन त्या फांदीवर उडवत राहतात. मागे धनेशचे एक पिल्लू आले होते आमच्याकडे त्याला इतके छळले की ते शेवटी झाड सोडून उडून गेले. हे कावळे मायबोली वाचतात की काय आजकाल काय माहित.

जागूताई सगळ्यांना कशी पुरणार एवढीशी भाजी? Wink
ही समुद्र किनारी अशीच उगवते का? याच्या गोजीरवाण्या जुड्या विकायला ठेवलेल्या पाहिल्यात कोकणात. कशी लागते ही भाजी. कडसर असते का नेहमीच्या मेथीसारखी?

लालबुडे आणि कावळे फार त्रास देतात इतर पक्ष्यांना.>>
कावळे आणि घुबडाचे हाडवैर खूप प्राचीन आहे. पंचतंत्रमधे एक पूर्ण पाठ काकोलूकीयम् नावाने आहे.

काकोलूकीयम् नाम तृतीयम् तंत्रम्। यस्यायम् आद्यः श्लोकः-

न विश्वसेत् पूर्व-विरोधितस्य
शत्रोश् च मित्रत्वम् उपागतस्य।
दग्धाम् गुहाम् पश्य उलूक-पूर्णाम्
काक-प्रणीतेन हुताशनेन॥पञ्च_३.१॥

कावळे आणि घुबडाचे हाडवैर खूप प्राचीन आहे.>>> हे नव्हते माहित. माणसांनी गैरसमजातून खुप घुबडे मारली हे माहित आहे. मागच्या आठवड्यात सासवडला घुबड महोत्सव झाला. त्यात अनेक मुलाखती पाहिल्या. त्यात एका धनगराने सांगितले की आम्ही खुप घुबडे मारली. दिसले की सोडत नाही आम्ही त्याला. नाहीतर आमची मेंढरे मरतात त्याच्या शापाने. आणि महत्वाचे म्हणजे शेवटी तो म्हणाला की आज इतकी लोकं पाहिली येथे. माझी चुक मला समजली. घुबड तर आमचे मित्र आहे. मी त्याला कधीच मारणार नाही आणि आमच्या लोकांनाही मारु देणार नाही. ते ऐकून मला तो महोत्सव यशस्वी झाल्यासारखे वाटले. Happy

हस्तीशुंडी (नाव अर्थात ऋतुराजकडून)

ही खुप फुलली आहे. अतिशय सुंदर आणि नाजूक फुले आहेत. प्रथमच पाहीली व नावही प्रथमच ऐकले.

केरळमधे उत्सवादरम्यान हत्तीच्या गंडस्थळापासून सोंडेवर सोनेरी झुल सोडतात तेंव्हा सेम असेच दिसते.

इथे फुलं कितीही गोंडस दिसली तरी पॉलीगॉनम आमच्या इथे अतिशय इन्व्हेसिव वीड आहे . स्मार्टवीड हे कॉमन नाव . माझ्या घरी डॅफोडिल्स आणि आयरिसेस जिथे आहेत तिथे अगदी दिन दूनी रात चौगुनी या हिशोबाने पसरत असते !

Red+napped ibis
Aug 2019 (Pune)

काळी शराटी

मेधा ती फुले प्रथमच पाहिल्याने मला फारच भारी वाटली. एखादे रोप घरी आणून लावता येईल का याचा विचार करत होतो. पण कितीही सुंदर असले तरी अनोळखी झाड व किडा यांना मी हात लावत नाही म्हणून ते राहीलं.

शालीदा हस्तिशुंडी आणि शेरळ दोन्ही कित्ती छान दिसताहेत. बाकीचे सगळे फोटो पण सुरेख.
जागुतै खरंच ईतकुशी भाजी कशी पुरणार सगळ्यांना?
@शालिदा ही भाजी कांद्याची फोडणी देवून तिखट आणि गूळ घालून तव्यावर परतून मस्तच लागते. जागुतैची काही स्पेशल रेसिपी असेल ती सांगेलच.

जबरदस्त फोटो एकेक.

ही छोटी मेथी थायरॉईडवर औषधी असते असं मला कोणीतरी सांगितलं. रोज खायची थोडी मीठ घालून आणि लिंबु पिळून.

नमस्कार.
मला घरी कुंडीत हिरवी मिरची उगवायची आहे. थोडं मार्गदर्शन करा प्लीज.
कुंडी किती मोठी हवी? पाणी खत वैगेरे. घरगुती खत कुठलं मानवतं मिरचीला? आता प्लान्ट केलं तर चालेल का?

मला घरी कुंडीत हिरवी मिरची उगवायची आहे. ..........अगदी सोपे आहे.एखादी सुकी मिरची, मातीत पुरून ठेवायची किंवा की मिरची स्वयंपाकात वापरत असाल ती 2 दिवस बाहेर
ठेऊन मग कुंडीत पुरायची.रोज पाणी घालायचे.कुंडी मोठी असेल तर चांगलेच.पण मध्यम आकाराच्या कुं डीत ही मिरची येते.
मिरचीला ऊन हवे. डाळ तांदूळ धुतलेले पाणी, गोमूत्र()दायल्यूत करून) घाला.मिरचीची रोपे आल्यापासून 3.6 महिन्यांनी
मिरचीची फुले यायला सुरुवात होते.

Pages