आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आनंदीचे कौतुक आहेच पण प्रॅक्टिसिंग डॉक्टर व्हायच्या आधीच निधन झाल्याने कितीही नाही म्हणले तरी त्यांच्या अचिव्हमेंट वैयक्तिकच राहतायत. सावित्रीबाई-रमाबाई-रखमाबाई यांच्यासारखा सामाजिक परिणाम नाहीय त्यात.>>>> डॉक्टर होण्याच्या ध्येयापायी निधन झाले त्यांचे.

आनंदीबाईंवर अमेरिकेत काही उपचार झाले नाहीत का. त्या डिग्री घ्यायला मंचावर जातात तेव्हा दोन शब्द बोलणेही त्यांना जड जाते, दयनीय अवस्था असते त्या स्वत: डाॅक्टर असूनही. गोपाळराव, त्या भारतातल्या पहिल्या महिला डाॅक्टर आहेत यातच खूष दिसतात, निदान चित्रपटात तरी. कागदपत्र गहाळ होऊन गोपाळरावांची नोकरी जाते ती त्यांची चूक असते की काही कटकारस्थान. डाॅॅक्टर होण्याचे ठरवल्यावर ते बैलगाडीत सामान ठेवताना दाखवले आहेत, मला वाटले चालले अमेरिकेला, पण त्या नंतर बराच मोठा टप्पा आहे अमेरिकेला जाईपर्यंत. आनंदीबाई काही ठिकाणी अनाठायी हट्टी दाखवल्या आहेत, त्या हट्टीपणानेच त्यांचा घात केला असावा. ललितचा प्रवास पंचविशीपासून ते साधारण चाळीशीपर्यंत चांगला दाखवला आहे, मेकपनेही आणि अभिनयानेही.

फार छान चर्चा चालु आहे.
आनंदीच्या अकाली संपलेला आयुष्याबदल फार वाईट वाटते.

चिनुक्स, कोणता भाग लिहिला आहेस या बद्दल? सॉरी, वाचायचा राहुन गेलाय.

कालच्या 'लोकमत'मध्ये डॉ. अंजली कीर्तने यांचा 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातल्या इतिहासाच्या विपर्यासाबद्दल लेख प्रसिद्ध झाला. ही या लेखाची लिंक - http://www.lokmat.com/manthan/anandi-gopal-biopic-real-story-first-lady-...

अंजलीताईंनी आनंदीबाईंच्या आयुष्यावर संशोधन करून एक उत्तम चरित्र लिहिलं आहे, शिवाय लघुपटही तयार केला आहे.
काल हा लेख वाचून आनंदी गोपाळ पाहिला आणि वैतागलो. अंजलीताईंनी लेखात उल्लेखलेले मुद्दे तर चांगलेच खटकले. याशिवाय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि कलादिग्दर्शक यांचा त्या काळाचा अभ्यास पुरेसा नाही, हे लक्षात आले.

यापुढे कदाचित स्पॉयलर्स असू शकतील.

१. यातली पात्रं कोल्हापुरी पद्धतीच्या चपला घालतात. अशा चपला त्यावेळी घालण्याची पद्धत नव्हती, पुरुष जोडे वापरत. स्त्रिया पायताणं वापरत नसत. गोपाळरावांमुळे आनंदीने पायताणं वापरली, हे मानलं तरी ती चपला घालणार नाही. शिवाय चित्रपटात दृश्यांमध्ये ब्याकग्राउंडास दिसणार्‍या स्त्रियाही चपला घालतात. हे त्या काळास सुसंगत नाही.

२. कोल्हापूर, कलकत्ता इथल्या बाजारांमध्ये टोमॅटो, फूलकोबी या भाज्या दिसतात. टोमॅटो अगदी पन्नाससाठ वर्षांपूर्वीपर्यंत खाल्ला जात नसे. फूलकोबीची लागवड होत नसे. कणसं पांढरी असत, पिवळी नव्हे.

३. या बाजारांमध्ये स्त्रिया मस्तपैकी भाज्या खरेदी करतात. 'चांगल्या' घरांतल्या बायका बाजारात भाजी आणायला जात नसत. कलकत्त्यात तर नाहीच नाही. बंगालात एकोणिसाव्या शतकात स्त्रीने एकटीने बाहेर पडणं शक्य नव्हतं. अगदी टागोरांच्या घरातल्या बायकाही 'अंतर्महालात' राहत.
कोल्हापुरात आनंदी-गोपाळांना विरोध करणार्‍या मोर्च्यातही दोनचार स्त्रिया सामील झालेल्या पाहून माझे डोळे पाणावले.

४. त्या काळच्या स्त्रिया गजरे माळत नसत, वेणीत किंवा अंबाड्यात एखादं फूल ओवीत.

५. चित्रपटातल्या इंग्रज स्त्रिया हॅटा घालत नाहीत. हेही त्याकाळी अशक्य होतं. आनंदीच्या शाळेतल्या मुली तिला त्रास देतात. हा त्रास ज्या पद्धतीने दाखवला आहे, तो अतिरंजीत आहे.

६. चित्रपटात सिमेंटच्या गिलावा केलेल्या भिंती आहे, भारताचा तिरंगा असलेली बोट आहे.

७. गोपाळराव मिरचीचं वाटण करताना त्यात लसूण घालतात.

८. चित्रपटातल्या विधवा स्त्रिया बाहेरच्या खोलीत बसून जेवतात.

९. आनंदीची आई आपल्या जावयाशी ओसरीवर येऊन वाद घालते. केवळ नाट्यनिर्मितीसाठी लिहिले गेलेले हे प्रसंग अजिबात कालसुसंगत नाहीत.

१०. सगळी पत्रं ए४ आकाराच्या कागदावर लिहिलेली आहेत. असे कागद त्या काळी नव्हते. शिवाय कागद पांढरेशुभ्र आहेत. ब्लिचिंग करून कागद शुभ्र करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. आनंदी अमेरिकेतून पत्र लिहिते तो तर मस्त रेषा आखलेला नवनीतच्या वहीचा कागद आहे.

११. आनंदी झाडाखाली बसून बोरूनं पत्र लिहिते. शेजारी शाईची दौत मात्र नसते.

१२. सगळ्या पाट्या टपरी. त्या काळी दगडी पाट्या होत्या. पाट्यांच्या चौकटी लाकडी असत. हिरव्यानिळ्या नव्हे.

१३. आनंदी बंगालच्या कॉलेजात शिकते, असं दाखवलं आहे. त्यावेळी त्या कॉलेजात स्त्रियांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश नव्हता. शिवाय तिथे प्रवेश घेतल्यावर मग अमेरिकेत कशास जायचे?

१४. धर्मांतराचा प्रसंगही कपोलकल्पित. अशा प्रसंगांमुळे शून्य वाचन आणि माहिती असलेल्या परंपरावाद्यांचे मात्र फावते.

१५. आनंदी एण्डोप्लाझ्मिक रेटिक्यूलम आणि फोल्डिंग ऑफ प्रोटीन्स हे शब्द वापरून गोपाळरावांना निरुत्तर करते. एण्डोप्लाझमिक रेटिक्यूलमचा शोधच मुळी १८९७नंतर, म्हणजे आनंदीच्या मृत्यूनंतर लागला.

१६. आनंदीच्या आजारपणाच्या तेव्हाच्या वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या आहेत. एका ठिकाणी बुधवारच्या केसरी दिसतो. केसरी तेव्हा मंगळवार दिसत असे. इंग्रजी बातमीत चक्क तुषार कांती घोष असं पत्रकाराचं नाव आहे. बायलाईन देण्याची तेव्हा पद्धत नव्हती.

१७. कोलकात्यातल्या घरात एक कुंभार चक्क दुगेची मूर्ती रंगवत असतो. हे वास्तवाला धरून नाही. याच घराबाहेर बायकांचे कपडे वाळत टाकलेले असतात.

१८. आनंदीला पाळी आल्यावर ती 'अपवित्र' असा शब्द वापरते. तिच्या माहेरी तिला विटाळ, विटाळशी, विटाळशीची खोली हे दिसलेच असणार. तरीही ती गोपाळरावांसमोर अडाण्यांसारखं बोलते.

१९. चित्रपटात श्रीरामपूरचं भाषण नाही, बंगालात गोळा केलेले पैसे नाहीत.

२०. गोपाळराव रानडे, चिपळूणकर यांचा कधी उल्लेखही करत नाहीत. इतरत्र घडणार्‍या एकाही घटनेचा (अपवाद ७८चा दुष्काळ) उल्लेख होत नाही. आनंदीवर निबंधमालेचा विलक्षण पगडा होता. ती सारे अंक अमेरिकेस घेऊन गेली होती. हे चित्रपटात कुठेही येत नाही.

२१. आनंदीच्या सर्टिफिकिटावर reddit division असं लिहिलं आहे. ते नक्की काय, हे शोधायला हवं.

२२. चित्रपट संपतो तेव्हा आनंदीच्या मृत्यूबद्दल लिहून येतं. त्यात बहुतेक तारीख टाकायला विसरले असावेत. 'फेब्रूवारी, १८८७ रोजी' असा उल्लेख आहे.

२३. आनंदीच्या सासूबाईंना स्वयंपाक करायला काय प्रॉब्लेम होता, हे कळले नाही. त्या काळी केशवपन केलेल्या स्त्रिया खाणावळी चालवायच्या, स्वयंपाकही करत सगळ्यांचा. सोवळं असलं म्हणजे झालं. किंबहुना आपला भार दुसर्‍यावर पडू नये, म्हणून बिचार्‍या दुप्पट राबत. चुलीशेजारी बसून भिंतीकडे तोंड करून जेवत. मात्र गोपाळरावांच्या सुधारणा ठळक करण्यासाठी उगाच त्या गरीब बाईला आळशी आणि सनातनी दाखवलं आहे.

असो. लिहून थकलो.

गीतांजली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर यांचा अभिनय उत्तम. गाणीही आवडली. 'इस दुनिया में जिना हो तो सुन लो दिल की बात'च्या चालीचं पार्श्वसंगीत, किंबहुना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत वाजत राहणारं पार्श्वसंगीत कदाचित प्रेक्षकांना आकर्षक वाटत असावं. डोळ्यांत बोटं घालून प्रेक्षकांना रडायला लावण्याचा प्रकार आहे हा.

शेवटी कर्तृत्ववान स्त्रियांच्या यादीत काशीबाई कानिटकरांचं नावच नाही. ते असायलाच हवं होतं.

>>आनंदीच्या सासूबाईंना स्वयंपाक करायला काय प्रॉब्लेम होता, हे कळले नाही. त्या काळी केशवपन केलेल्या स्त्रिया खाणावळी चालवायच्या, स्वयंपाकही करत सगळ्यांचा. सोवळं असलं म्हणजे झालं. किंबहुना आपला भार दुसर्‍यावर पडू नये, म्हणून बिचार्‍या दुप्पट राबत. चुलीशेजारी बसून भिंतीकडे तोंड करून जेवत. मात्र गोपाळरावांच्या सुधारणा ठळक करण्यासाठी उगाच त्या गरीब बाईला आळशी आणि सनातनी दाखवलं आहे.<<<<

हा मुद्दा मात्र पुर्ण चुकीचा आहे. माझ्या वडिलांची चुलत काकी ( माझ्या वडिलांच्या वडीलांची चुलत भावाची बायको ) बाल विधवा होती. तिला तिचे जेवण स्वतः बनवून खावे लागे.
घरातील पुजाअर्चा पासून वेगळे रहावे लागे. विधवे कडून देवाचा नैवेद्य चालत नसे. हे घरा घरा प्रमाणे चित्र बदले. व ते सुद्धा जातीनुसार.
ज्या खानावळी विधवा चालवत, त्यात गरीब, सहसा इतर जातीय जेवत.

झंपी,
नाही.
सकेशा विधवांच्या हातचं जेवण कोणालाच चालत नसे. केशवपन केलेल्या विधवांच्या हातचा नैवेद्य चालत नसला तरी इतर जेवण व्यवस्थित चालत असे. आनंदीबाई कर्व्यांनी केशवपन केलं नव्हतं म्हणून अण्णासाहेबांनी त्यांना स्वयंपाक करू दिला नाही. केशवपन केलेल्या इतर विधवा सर्वांसाठी स्वयंपाक करीत. विधवांच्या हातचं जेवण चाललं नसतं तर अनेक कुटुंबं उपासमारीनं मेली असती.
खाणावळींबाबतचा तुमचा दावा सर्वस्वी चुकीचा आहे. आगरकर, टिळक, नामजोशी, पांगारकर, माटे, नातू हे काही 'इतर जातीय' नव्हते. केशवपन केलेल्या विधवांच्या खाणावळींतच ते जेवत असत.

खाजगी खेळ करतात त्या कधी कधी. बराच जुना आहे तो. विसेक वर्षं तरी झाली असतील. त्या लघुपटाच्या निमित्ताने त्यांनी साप्ताहिक सकाळमध्ये लेखमालाही लिहिली होती. हा लघुपट वीस मिनिटांचा आहे.

आजच्या पिढीला "रिलेट" व्हावं म्हणून जुन्या काळातल्या बर्‍याच गोष्टी तशाच्या तश्या चित्रपटात दाखवलेल्या/घेतलेल्या नाहीत असं चित्रपटाशी संबंधित एक बाई सांगताना टिव्हीवर बघितलं होतं. या वर उल्लेख झालेल्या सगळ्या उणीवा म्हणजे cinematic liberty की काय असणार नक्कीच.

त्या सिनेमॅटिक लिबर्टीपायी चित्रपटात बोडक्या डोक्यानं वावरणार्‍या, मोर्च्यात पुरुषांच्या बरोबरीनं चपला घालून जाणार्‍या, टोमॅटो खाणार्‍या आणि जावयाला झापणार्‍या बायकांच्या तुलनेत आनंदी बिच्चारी आणि मागासलेली दिसेल, हे बहुधा दिग्दर्शकाच्या लक्षात आलं नसावं.

पण मुळात गोपाळरावांची सासू त्यांच्याबरोबर राहात होती हेच काल्पनिक आहे ना? त्यांची म्हातारी आजी होती असं वाचल्याचं आठवतंय....

टोमॅटो, कॉलिफ्लॉवर, चपला, गजरा, कुंभार, बाहेर वाळणारे कपडे वाचून अशक्य मनोरंजन झालं. असो.

विकेशा विधवांबद्दल चिनूक्सला अनुमोदन. माझी स्वतःची पणजी विकेशा विधवा होती आणि पुण्यात स्वैपाकिण म्हणून उपजीविका करत असे.

<<जावयाला झापणार्‍या बायका कालातीत आहेत>> आपल्या अतिमहान भव्यदिव्य भारतीय संस्कृतीत??? जावयाला झापणार्‍या सासवा आजही बहुसंख्य नसतील इये देशी..... जावई आणि कजाग सासू हे खास पाश्चात्य समीकरण साहित्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे आलेलं आहे...

खरचं कल्पना करवत नाही की 100- 150 वर्षापूर्वी काय अवस्था असेल स्त्रीची.. एक प्रश्न : केशवपन हे काही जातीसाठीच अनिवार्य होत की सर्वाना??

चिनूक्स, निरीक्षणे आवडली.
हल्ली बहुतेक जनरल बजेट आणि योग्य गोष्टी सुचवणारे अभ्यासक रिसोर्स महाग असल्याने हायर न करणे या दोन गोष्टी असाव्या.

<हल्ली बहुतेक जनरल बजेट आणि योग्य गोष्टी सुचवणारे अभ्यासक रिसोर्स महाग असल्याने हायर न करणे या दोन गोष्टी असाव्या.>

गैरसमज आहे हा.

चिनूक्स, खूप चांगली निरीक्षणे आहेत. सिनेमा पाहील्यापासूनच कसलातरी पोकळपणा जाणवत होता. सतत कादंबरीचा रेफरन्स मनात येत असल्यामुळे "ये बात कुछ जमी नहीं" असं जे वाटत होतं ते काय असावं ते सापडलं.

श्री. ज. जोश्यांच्या 'आनंदी गोपाळ' आणि 'रघुनाथाची बखर' या दोन्ही कादंबर्‍यांमध्ये इतिहासाची मोडतोड केली आहे. हेच 'दुर्दम्य'च्या बाबतीतही खरं आहे. 'दुर्दम्य'च्या बाबतीतली एक गंमत म्हणजे, पहिल्या आवृत्तीत आगरकरांच्या शेवटच्या दिवसांत टिळक त्यांना भेटायला आलेले असताना आगरकरांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, असं आहे. सीतारामपंत देवधरांच्या आत्मचरित्रात तसं असल्यानं गाडगीळांनी हे लिहिलं असावं. मग गाडगीळांना कोणीतरी यशोदाबाई आगरकरांचे 'स्त्री'मधले लेख दाखवले. त्यात यशोदाबाई म्हणाल्या होत्या की, दोन्ही मित्रांचे संबंध शेवटी सुधारले होते. मग गाडगीळांनी पुढच्या आवृत्त्यांमध्ये हे प्रसंग बदलून टाकले. Rofl कादंबरी लिहिताना गाडगीळांनी यशोदाबाईंचे आत्मचरित्रात्मक लेखच वाचले नव्हते, हे निव्वळ महान आहे. असो.

म.कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावर आहे.लेखक श्री.ज.जोशी आहेत. बरं केलंत,माझेही परत वाचन होईल.

हे श्रीरामपुर कलकत्याजवळचं श्रीरामपुर का, मला आधी वाटलं नगर जिल्ह्यातलं.

चिनुक्स तुम्ही छान लिहीलंत.

सकेशा विधवांच्या हातचं जेवण कोणालाच चालत नसे. केशवपन केलेल्या विधवांच्या हातचा नैवेद्य चालत नसला तरी इतर जेवण व्यवस्थित चालत असे. >>> बापरे हे फार चुकीचं होतं. असं होतं त्या काळात वाचून वाईट वाटलं.

>>>सकेशा विधवांच्या हातचं जेवण कोणालाच चालत नसे. केशवपन केलेल्या विधवांच्या हातचा नैवेद्य चालत नसला <<<

चिनूक्स, मी सुद्धा माझ्या पोस्ट्मध्ये हेच लिहिलय की, विधवांच्या हातचा नैवेद्य चालत नसे.
आणि, खालील ओळीत लिहले की, >>विधवा खानावळीत, गरीब , सहसा इतर जातीय जेवत. <<
लिहिताना हे राहिले लिहायचे की, गरीब, व सहसा इतर जातीय जेवत.
कर्मठ सधन ब्राम्हण तसेच काही उच्च जातीय( त्यातील उच्च गोत्रीय ) लोकं जेवायचे नाहीत.
ब्राम्हण विधवा आणि इतर जातीय विधवा ह्यांना डूज एंड डोंट वेगळ्या होत्या थोड्या फार फरकाने.
तुमचा रेफेरेन्स कुठला माहित नाही पण हे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या व साम्गितलेल्या अनुभवावर आधारीत आहे.

ज्या लोकांची नावं तुम्ही लिहिलीत , ते त्या काळातील बर्‍यापैकी वैचारीक दृष्ट्या पुढारालेले ब्राम्हण होते. टिळकांची तशी मतं बुरसटलेलीच होती स्त्रीयांच्या बाबतीत. ( हा विषय नाहिये पण वरच्या यादीत नाव असल्याने लिहितेय).
महाराष्ट्रातील विधवांचे हाल तरी बरे पण बंगाल आणि नॉर्थ मध्ये भयानक रिती होत्या. असो.

चिनूक्स, इथे पोस्ट लिहील्याबद्दल आभार. नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्वक लिहीले आहे.

बापरे हे फार चुकीचं होतं. असं होतं त्या काळात वाचून वाईट वाटलं.>>>> १०-१५ वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या घराची वास्तुशांतीच्यावेळी ज्या बाईंनी स्वयंपाक केला होता,तिचे नाव ऐकून दुसरी मै. म्हणाली अग तिच्या हातचा नैवेद्य कसा चालेल? ती विधवा आहे.
थोडक्यात काय तर अजूनही ही परिस्थिती आहे.कालांतराने डायल्यूट झाली इतकेच.बाइच्या अस्तित्वाची मोजणी तिच्या नवर्‍याच्या हयात असण्या/नसण्यावर होते हीच खरी शोकांतिका आहे.

माझ्या १३ वर्षांच्या भाचीने तेव्हा थेटरात आणि परवा tv वर तितक्याच उत्साहाने चित्रपट बघितला. शेवटी गोपाळ रावानी साडीच्या पदराला फेट्याचे टोक का बांधले एवढे एकच तिला समजले नाही. Happy

मी पुढचा भाग लिहीन त्यात लिहायचा विचार आहे.
Submitted by चिनूक्स on 24 February, 2019 - 08:39 >>>> चिनुक्स कसला पुढचा भाग? लिहिला का? आधीचा भाग कुठे मिळेल?

परत सगळे प्रतिसाद वाचताना प्रश्न पडला... त्या दोघांमधे समाजातल्या सुधारकी चळवळीबद्दल चर्चा कदाचित झाली होती असेल किंवा नसेल... गोपाळ रावांनी त्या काळातील इतर सुधारकी विचारांच्या लोकांशी संपर्क केला असेल किंवा नसेल... पण न्यायमूर्ती रानडे दांपत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न नाही केलेला का?

गोपाळराव त्यावेळच्या सुधारकांच्या गोतावळ्यात होते. संमती वयाच्या वादावर त्यांनी पुण्यात गाढवांचं लग्न लावलं होतं.
ग्रामण्य प्रकरणात टिळक, रानड्यांच्या सोबत तेही होते.
गोपा ळराव आपल्या नोकरीमुळे भारतभर फिरत होते. रानडेही एके जागी कायम नव्हते. न्यायाधीश म्हणून त्यांचीही बदली होत होती.

दुर्दैवाने / वेळेच्या कमतरतेमुळे / हे सगळे आनंदीच्या निधनानंतर झाले असल्याने चित्रपटात असे काहीच दाखवले नाही. भारतिय समाजाने त्यांची फक्त हेटाळणी करतानाच दाखवली आहे. Sad

चित्रपट आवडला. 'तू आहेस ना' गाणे पाणी आणते डोळ्यांत. ललित ने उत्तम काम केले आहे आणि आनंदीबाईंची भूमिका करणारी सुद्धा छान!

बाकी गाणी सुंदर आहेतच. Happy

माझा धागा चित्रपट tv वर आल्यामुळे परत वर आल्याचा आनंद झाला. तू आहेस ना हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा स्त्री म्हणून जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. Lyrically बेस्ट song इन these days.

Pages