आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

असं सिनेमात तर दाखवलं आहेच.>>>>> सिनेमा नाही पाहिला, पण पहायचा आहेच.कादंबरी शाळकरी वयात वाचली असल्याने त्याला युगं लोटली आहेत.त्यामुळे परत पुस्तकही वाचायचे आहे.

कालच पाहिला ,
खूप छान बनविला आहे

Submitted by निलुदा on 18 February, 2019 - 17:03

वरिल धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद

सिम्बा,
माझ्यासोबत आमचे कन्यारत्न ५वर्षे १०महीने होते.
न कण्टाळता पूर्ण चित्रपट पाहिला
झी वरिल promotion बघून तिला गाणी आवडली होती

नक्कीच दाखवा

चित्रपट काल पाहिला, चित्रपट छान आहे.

सर्व कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. जुन्याकाळची वातावरण निर्मिती उत्तम साधली गेली आहे.

ह्या सिनेमात माबोकर वैभव जोशी ह्यांचे लिरिक घेतले आहे. आज बघते जमते का. सिनेमा बघायचा आहे नक्की. पण नवर्‍याचं ऑफीस आणि लेकाची १२वीची परिक्षामधे मी अडकले आहे Wink

काल पाहिला हा चित्रपट . housefull होता . सुरेख आहे . गोपाळराव विक्षिप्तच दाखवलेत. अगदी राग यावा इतके. पण जेव्हा आनंदी स्वतः डॉक्टर व्हायचं ठरवते तेव्हा पुरुषी अहंकार आड न आणता तिला सर्वस्वी साथ करतात . एका बालभारतीच्या जुन्या धड्यात आनंदीबाईंनी त्यांच्या दिराला लिहिलेलं पत्र होतं . पण चित्रपटात इतर घरच्यांचा उल्लेख नाहीये बहुधा. तसंच पंडिता रमाबाई पण त्यांच्या पदवीदानाला गेल्या होत्या ना त्याचाही काही उल्लेख नाहीये. आनंदी आणि सावत्र मुलाचं एकमेकांशी नातं मस्त दाखवलंय . त्यांचे संवादही गोड . `रंग माळियेला ' ध्रुवपद haunting आहे . मला त्या चालीतले हेलकावे कर्नाटकी संगीतासारखे वाटले . ( अगदी सुब्बलक्ष्मी च्या विष्णुसहस्रनामाशी किंचित साम्य असणारी चाल ! )

@मानिमोहर छान लिहिलंय.
@ शुजिता मी माझ्या सव्वा वर्षाच्या बाळाला रविवारी नवऱ्याच्या स्वाधीन करून एकटीने पाहून आले पहिल्यांदा. घरातल्या जबदाऱ्यांमुळे बाळ झाल्यावर कुठल्याही मूवी ला जाऊ शकले नव्हते या सिनेमाला मात्र आवर्जून गेले आणि माबो वर पहिल्यांदा review पण लिहिला. तुम्हीही वेळ काढून जाऊन या.
बादवे तुम्ही सगळे कुठल्या पुस्तकाबद्दल बोलत आहात मी तरी त्यांच्यावरचे कुठले पुस्तक वाचले नाही. आनंदीबाई बद्दल अर्थातच शाळेत समजले.

मला तर तो गोपाळ जोशी नारसिस्ट वाटला जेव्हा कांदबरी वाचली तेव्हा >>मलाही. पुस्तक वाचल्यावर त्याच्यात पर्सनॅलिटी डिसऑर्डर असावी असंच वाटतं. तिने धर्म सांभाळला तरी हिणवणं...तिनं थंडीचा सामना करण्यासाठी गोल पातळ नेसलं तरी तिरसट प्रतिक्रीया पाठवणं. तिला सतत तू आता मोठी झालीस आमच्यासारख्यांना तू काय किंमत देणार वगैरे म्हणणे...एकूणातच आनंदीबाईंना आयुष्यभर खूप ताण असणार.

ताण तर त्या दोघांना ही प्रचंड असणार संपूर्ण आयुष्यभर त्यातूनच हा सणकीपणा आला असेल.

पैशाची कमी, समाजात जास्त प्रतिष्ठा नाही, power हातात शून्य कारण नोकरी म्हणजे पोष्टात कारकुनी ..अशा माणसाने इतकं जगावेगळं स्वप्न पाहण आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्याचा होम करणं ह्या गोष्टी नॉर्मल माणसाला जमणं फार कठीण आहे. त्याला माणूस तिरसटच हवा.

चित्रपट पाहिला ....छान आहे....मध्यंतरा पूर्वीचा भाग पटकन संपला...पण नन्तर काहीसा संथ वाटला...गाणी अप्रतिम..
चित्रपट बघण्यापुर्वीच मी सगळ्या गाण्यांची पारायणं केली होती...अतिशयच आवडली...
पण....
स्पॉईलर अलर्ट
शेवट काहीसा पटकन संपतो..आणि "तू आहेस ना" हे गाणं एकदम अचानक सुरु होतं ते जरा खटकलं मला...
आनंदीबाईं आणी गोपाळराव त्यांच्या सम्पूर्ण डॉक्टर होण्याच्या प्रवासाबद्दल बोलत आहेत...ईतके कष्ट घेउन डॉक्टर झाले तरी काय फायदा माझा.. अशी अगतिकता त्या मांडतात आणी गोपाळराव त्याना समजावतात ..आनंदीबाई आणि गोपाळराव समुद्राच्या दिशेने जातात आणि त्यांचा मृत्यु झाल्याचा उल्लेख होउन चित्रपट संपतो...या नोटवर तिथे काही क्षण थांबायची गरज होती..हे सगळं प्रेक्षकांना अंतर्मुख होउन पचु द्यायचं होतं...पण तेव्हाच अचानक सर्व महान स्त्रीयांच्या रंगीत चित्रांचा कोलाज आणी तू आहेस ना गाणं सुरु झालं ते मला जरा खटकलं...
गाणं आणि कोलाज अतिशय सुंदर आहे..पण त्याची जागा चुकली असं माझं मत झालं...कदाचित सगळे महत्वाचे नामोल्लेख झाल्यावर गाणं सुरु झालं असतं तरी चाललं असतं असं वाटलं....

आनंदी गोपाळ नावाचं श्री.ज. जोशी ह्यांचं पुस्तक आहे. त्यावरून बनलेलं मत आहे. पुस्तक फार छान आहे. त्यात वर्णन केलेलं गोपाळरावांचं राक्षसी रुप अंगावर येतं. सतत भिती वाटत रहाते वाचताना. त्यामानानं सिनेमात ते फारच मवाळ वाटतात. आनंदीबाईंचं आयुष्य किती कठीण असेल, धर्माबद्दलच्या त्यांच्या जाणिवा कशा विकसीत होत गेल्या, ज्ञान मिळवताना एका क्षणी आपण गोपाळरावांना फार मागे टाकून पुढे आलोय ह्याचा झालेला साक्षात्कारी प्रसंग, गोपाळराव अमेरीकेत आल्यानंतरचं बायकोशी तुटक व अंतर ठेऊन वागणं...तरुण बायकोच्या मनाची अमेरिकेसारख्या मुक्त वातावरणात रहाताना धर्म जपताना होणारी घालमेल, अंतसमयी, धर्म बुडवला अशा आरोपाखाली वैद्यकीय मदतीसाठी प्रख्यात वैद्याने औषधोपचारासाठी दिलेला नकार...बरेच प्रसंग आहेत पुस्तकात.

तिरसट असणं बाहेरच्या जगाबरोबर ठिक आहे. पण आपले फ्रस्टेशन बायकोवर काढून , तिला सतत टोचुन बोलणे , मानसिक छळ करणे नारसिसिस्ट वागणे वाटते.
कांदबरीत, तिला बर्‍याच मानसिक भिती खाली जगावे लागले.
आसे वर्णन आहे. सतत तिला आपण गुन्गेगार आहोत ह्या भावनेखाली गोपाळरावांनी जगायला लावणॅ हे साधं नाही.

>>>आनंदी गोपाळ नावाचं श्री.ज. जोशी ह्यांचं पुस्तक आहे. त्यावरून बनलेलं मत आहे. पुस्तक फार छान आहे. त्यात वर्णन केलेलं गोपाळरावांचं राक्षसी रुप अंगावर येतं. सतत भिती वाटत रहाते वाचताना. <<<<<
मला तर धक्का बसलेला आणि कुठेतरी ते खुप खोलवर एक निराशा आलेली आठवतेय इतक्या वर्षाने. मी नव्ववीत होते आणि आजही विसरले नाहीये.

मला तर धक्का बसलेला आणि कुठेतरी ते खुप खोलवर एक निराशा आलेली आठवतेय इतक्या वर्षाने. मी नव्ववीत होते आणि आजही विसरले नाहीये. >>>> हो, मी पण 10वी नंतरच्या मोठ्या सुट्टीत वाचलेलं. त्या वयात फारच धक्का बसला होता आणि ते शिकणं आणि गोपाळरावंच ते ध्येय फार व्यर्थ वाटलं होतं. प्रोमोज मध्ये ललित प्रसादला पाहिलं तेव्हा वाटलं की कास्टिंग गंडलं सिनेमाचं. माझ्या मनात इतकी वर्षे टिकून राहिलेली गोपाळरावांची प्रतिमा त्याच्यापेक्षा फार वेगळी होती. आज रात्री सिनेमा पहाणार आहे, तोपर्यंत मत करून घेणं बरोबर नाही.

फारच धक्का बसला होता आणि ते शिकणं आणि गोपाळरावंच ते ध्येय फार व्यर्थ वाटलं होतं. प्रोमोज मध्ये ललित प्रसादला पाहिलं तेव्हा वाटलं की कास्टिंग गंडलं सिनेमाचं. माझ्या मनात इतकी वर्षे टिकून राहिलेली गोपाळरावांची प्रतिमा त्याच्यापेक्षा फार वेगळी होती. >>>>>> अगदी हेच. +१

मला पुस्तक वाचल्यावर गोपाळ जोशी मुळीच आवडला नाही. आनंदीची अतीव दया आली. सिनेमात तो विक्षिप्त असला तरी कनवाळू असेल असं वाटतं.>>>> exactly. गाणी पाहून तरी सिनेमात त्याचे glorification केले असावेसे वाटते. >>>> अगदी अगदी + १००००००० .
माझ्या मैत्रिणीला हा चित्रपट फार आवडला . मला म्हणाली बघच. मी म्हटलं , मला फारशी ईच्छा नाही .
तिने पुस्तक वाचल नाहीये . म्हटलं मी शाळेत असताना वाचलेलं , तेन्व्हा पासूनची गोपाळरावांबद्दलची चीड अजूनही मनातून जात नाही आहे .
आनंदीच्या शिकण्याला जसे गोपाळराव कारणीभूत आहेत तसेच बर्याच अंशी तिच्या अकाली मृत्युलाही .
कालपासून सगळे प्रतिसाद वाचताना हेच डोक्यात घोळत होते . आज मेधाविची पोस्ट पाहिली आणि सविस्तर प्रतिसाद दिला .
समाजाशी बंडखोरी करून बायकोला शिकवण्याच महान कार्य केलं हे मानलं तरीही मनातली अढी काय जात नाही .

कादंबरीत रंगवले ल्या व्यक्तिरेखेला लेखकानेही रंग चढवले असतील का?
"गोपाळरावांच्या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा अर्थातच मी हो म्हणालो, कारण भूमिका वेगळी होती, काळ वेगळा होता. गोपाळरावांविषयी फार माहिती नव्हती. मग अंजली किर्तने यांचं ‘आनंदीबाई जोशी काळ आणि कर्त्वृत्व’ नावाचं पुस्तक वाचलं. ते वाचलं तेव्हा कळलं की ही खूप प्रभावी व्यक्तिरेखा आहे. ते रागीट होते, विक्षिप्त होते, या गोष्टी वरवरच्या होत्या. पण त्यांची मन:स्थिती काय असेल त्या वेळेस? एखादी व्यक्ती एवढी पुरोगामी विचारांची आहे, जी आपल्या बायकोला स्वत:पेक्षा जास्त शिकवते. हे आजच्या काळातही किती पुरुष सहन करू शकतील किंवा तसं पाऊल उचलू शकतील? स्वत:पेक्षा जास्त शिकवणं, तिच्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वास ठेवणं, अमेरिकेला पाठवणं.. काय विचार असेल त्या माणसाचा आणि हे सगळं त्यांनी निस्वार्थीपणे केलं होतं. अभिनेता म्हणून ते मांडणं ही माझी जबाबदारी होती.

गोपाळरावांची व्यक्तिरेखा आणखी नीट समजून घेण्यासाठी मी त्यांची पत्रं वाचली, ती खूप फायद्याची ठरली. त्या पत्रांमधील मजकूर खाजगी होता, आणि खूप खरा होता. काही पत्रं अशी नाटय़ात्मक होती की ते एक पत्र म्हणजे नाटक किंवा चित्रपट वाटावा. आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवल्यावरचं त्यांचं पहिलं पत्र होतं, त्यात त्या दूर गेल्याचा त्यांना किती त्रास झाला, ते त्यांच्याशी किती कठोर वागले होते, अशी वर्णनं होती. त्यात त्यांनी आपल्याला वाईट वाटत होतं मात्र कठोर वागण्याशिवाय पर्याय नव्हता, हेही नमूद केलं होतं. या सगळ्यातून त्यांची स्वभाववैशिष्टय़े समजण्यासाठी मदत झाली."

मी पुस्तक वाचले आहे. सिनेमाही पाहिला. दोन्ही ऐतिहासिक दस्तावेज नाहीत हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे! एक श्री. ज. जोशींचं इन्टरप्रिटेशन होतं. सिनेमा हे समीर विद्वांसांचं इंटरप्रिटेशन आहे आणि तेही त्या कॅरेक्टरशी अगदी काही फटकून नाही आहे. फक्त पुस्तकापेक्षा माइल्ड आणि स्वभावाने जरा जास्त लॉजिकल वाटते.

तत्कालीन नवरे वाचू गेल्यास साधारण असेच चित्र दिसून येते.यात कुठेही त्यांची बाजू घ्यायचा प्रयत्न नसून वस्तुस्थिती होती.आनंदीबाईंविषयी खूप वाईट वाटलं होते.

१.पण लक्षात कोण घेतो.--- शंकरमामंजी
२.स्मृतीचित्रेमधील लक्ष्मीबाईंचे सासरे. आपल्या पत्नीला जी मारहाण करीत ती वाचून त्या काळात जन्माला न आल्याबद्द्ल देवाचे आभार मानले.
३. कै.र.धो.कर्वे.... मारपीट नाही,पण संततीनियमनाच्या प्रसाराकरिता स्वतःला मूल होऊ न देणे हा त्यांच्या पत्नीवर अन्याय होताच.
४.बालकवी ठोंबरे हेहळुवार मनाचे कवी होते.पण बायकोला मारहाण करीत.

काल पहिला,
आवडला

आनंदी गोपाळराव जोशी यांच्याबद्दल मुख्य घटना सोडता विशेष माहिती नव्हती,
एक 17 18 वर्षाची मुलगी, जिद्दीने भारतात-लग्नानंतर शिकते आणि एकटी अमेरिकेला जाते हीच गोष्ट इतकी वेगळी होती की ती बाकीची कुतूहले व्यापून उरली होती.

मी त्यांच्याबद्दल पुस्तक वाचले नव्हते, त्यामुळे इतर चरित्रपट पाहताना सतत डोक्यात नकळत होणारी तुलना टळली, त्यामुळे चित्रपटाचा पूर्ण आनंद घेता आला.

चित्रपटात जुना काळ छान उभा केला आहे, एखाद्या प्रसंगात जुन्या वस्तूंची नवनिर्मिती खटकते, (हॅन्ड रिक्षा चे नावे कोरे हूड, किंवा एक प्रसंगात लाकडी कपाट) पण ओव्हर ऑल चांगले काम. कलकत्त्यात असताना सासूबाई धूप घालण्यासाठी बंगाली पद्धतीचे धूपपात्र वापरतात वगैरे छोटे डिटेल्स छान टिपले आहेत. कलकत्ता चे सेटिंग खूप छान नाही वाटले पण.

कास्टिंग सुद्धा आवडले,
आनंदी बाई झालेल्या मुलीने सुरेख काम केले आहे, ललित प्रभाकर सुद्धा खटकत नाही. मात्र एकंदरीत गोपालरावांच्या व्यक्तिमत्वावर रोमॅंटिक-ध्येययवादी रंगसफेदी केली आहे असे वाटत राहते, (त्यांच्याबद्दल जे ऐकले आहे त्या वरून) सगळे युरोपियन लोक खरे खुरे फिरंगी घेतल्याबद्दल विशेष कौतुक Wink गोपालरावांच्या सासूबाई (वर कळले ms. कुलकर्णी) या सुद्धा छान वाटल्या.

बायोग्राफिक पिक्चर असून कथानक केवळ घटनांची जंत्री वाटत नाही. मात्र नंतर आनंदीच्या माहेरचा काहीच उल्लेख नसणे खटकले. सामाजिक असंतोष सुद्धा थोडक्यात येऊन गेला असे वाटले.

वाटा वाटा वाटा आणि तू आहेस ना, दोन्ही गाणी छान आणि मन लावून ऐकण्यासारखी. शेवटचे गाणे थिएटर मध्ये नीट कळले नव्हते, कोलाज पाहण्यात लक्ष होते, घरी ऐकल्यावर छान अंगावर येते. सुरू होण्याच्या वेळ बद्दल वर स्मिता-श्रीपाद यांच्या म्हणण्याशी सहमत.
वाटा वाटा वाटा ग टीपीकल गोष्ट पुढे नेणारे, प्रयत्न गीत, त्यातले बॅकपायपर (बहुतेक) ची सुरावट युद्ध जिंकले असे फीलिंग देते.

शेवटचे पदविदानाचे भाषण थोडे जास्त effective करता आले असते ( ब्लॅक मधले राणी मुखर्जी चे भाषण आठवले)

ओव्हर ऑल छान परिणाम होतो, भारावलेपण येते.
मुलांना घेऊन जरूर पहा

पुस्तकातला तो प्रसंग आठवला तरी अंगावर अजूनही काटा येतो ज्यात आधी अकरा वर्षाच्या मुलीवर नवरेपणाचा हक्क गाजवला जातो. नंतर तिची दया येऊन मग वासनेची जागा वात्सल्य घेते व मग स्वतः केलेल्या कृत्याची लाज वाटते. ह्यात गोपाळरावांची तरी काय चूक म्हणा..त्या काळी ते संमतच होतं पण आता तो रेफरन्स वाचवत नाही हे ही खरेच. सिनेमात मात्र ती घटना बदलली आहे.

अवांतरः
मी चित्रपट पाहिलेला नाही. श्री. ज.जोशी यांचे पुस्तक अनेकदा वाचले होते. अंजली कीर्तने यांचे पुस्तकसुद्धा वाचले होते. जोशींचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर वर्तमानपत्रांतून त्या काळची अनेक माहिती, आठवणी, अ‍ॅनेक्डोट्स आले होते. शिवाय एकोणिसाव्या शतकासंबंधी वाचताना अनेक संदर्भ वाचले होते. पण जेव्हा डॉ. रखमाबाई आणि त्यांच्या खटल्याविषयी वाचले,(यावर विकीवर भरपूर माहिती आहे.) तेव्हा डोके चक्रावून गेले. एक बाई तिच्या लहान, नकळत्या वयात एका अशिक्षित, असंस्कृत वराबरोबर झालेले लग्न ठाम नाकारते, नवर्‍याला शिक्षणाची संधी देऊनही तो उडाणटप्पूपणा पसंत करतो हे न पटून (तोपर्यंत ती डॉक्टर झालेली असते.) सरळ त्याला कॉन्जुगल राइट्स नाकारते, समाजात गदारोळ झाला, अगदी टिळकांसारख्यांनी यावर सडकून टीका केली तरी, आणि खालच्या कोर्टात निर्णय विरुद्ध गेला तरी धैर्याने शेवटपर्यंत खटला लढवून जिंकते आणि भारतातली पहिली 'प्रॅक्टिसिंग लेडी डॉक्टर' म्हणून इतिहासात नाव नोंदवते हे सगळे मला विलक्षण वाटले. 'आनंदीगोपाळ'पेक्षाही थ्रिलिंग, रोमांचक.
डॉ. रखमाबाई यांच्यावर मोहिनी वर्दे यांनी 'रखमाबाई-एक आर्त' या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
असो. हे सगळे खूपच अवांतर आहे, आणि आनंदीगोपाळ या चित्रपटाच्या बर्‍यावाईटपणाशी जराही संबंधित नाही, तरी लिहावेसे वाटले.

रखमाबाई वाज नॉट अलोन. तिचे वडील खमके होते.
रखमाबाई विषयी सुद्धा खुप पुर्वी वाचुन अचाट झालेले.
आजच्या काळात , डिवोर्स झालेल्यां मुलींविष्यी सुद्धा लोकं अतिशय नीच गॉसिप करतात आणि त्यावेळी तरव्कसे असेल?

छान लेख. हेमाताई यांनीपण छान लिहीलं आहे.

मला पुस्तक वाचल्यावर गोपाळ जोशी मुळीच आवडला नाही. आनंदीची अतीव दया आली. >>> अगदी अगदी. सातवीत असताना पुस्तक वाचलं होतं. रडू आलेलं काही ठीकाणी, अंगावर काटाही आलेला. पिक्चर बघितला नाहीये अजून.

पण अशी लग्नं पुर्वी व्ह्यायची, ह्याचं वैषम्य वाटायचं. हे ऐकून माहीती होतं कारण आई सांगायची माझी, तिची आजी नऊ वर्षाची होती आणि आजोबा तीस वर्षाचे, तेही पहील्या लग्नातली एक सहा महीन्यांची मुलगी होती आणि पहीली बायको गेलेली. मला एकदम वाईट वाटलेलं ऐकून Sad .

> Submitted by हीरा on 19 February, 2019 - 18:52 > हा धागा वाचताना रख्माबाईच सतत आठवतायत.

कदाचीत अवांतर: आता परवाच तुंबाड बघितला. आता हा धागा वाचतेय. मिपावर काही प्रतिसादात वाचलंय कि 'त्या काळच्या सर्व स्त्रियांची परिस्थिती वाईटच होती पण ब्राह्मण स्त्रियांची अवस्था अजून जास्त वाईट होती; कारण त्यांना शेती, व्यवसाय करायचं, घराबाहेर पडायचं, पुनर्विवाह करायचं स्वातंत्र्य नव्हतं. इतर जातीतल्या स्त्रिया हे सर्व करू शकायच्या.'
आता ब्राह्मण पुरुषच जास्त खविस असतील, इतर पुरुष अजिबात तसे नसतील यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.
पण भारतातील, खासकरून महाराष्ट्रातील स्त्रियांच्या अवस्थेचा गेल्या दोनतीनशे वर्षातला जातीनिहाय आढावा घेतला आहे का कोणी?

एक गोष्ट ऐकली होती. एका नदीत खूप सुसरी-मगरी असतात. तरी पलीकडच्या काठावर पोचणार्यास मोठे बक्षीस ठेवलेले असते. एक तरुण उडी मारतो व धाडसानं सर्व संकटांचा सामना करत पैलतीरावर पोहोचतो. त्याला बक्षीस देताना, ह्या यशाचे श्रेय कोणाला देशील असे विचारले असता तो म्हणतो की आधी मला आत कोणी ढकलले ते सांगा. असंच काहीसं वाटतं आनंदीबाईंची गोष्ट ऐकताना.
त्या खूप हुशार, चिवट व कर्तृत्ववान होत्याच पण गोपाळाच्या चक्रमपणामुळेच हे सगळं करण्याचं बळ त्यांना प्राप्त झालं.

डॉ. रखमाबाई यांच्यावर मोहिनी वर्दे यांनी 'रखमाबाई-एक आर्त' या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
असो. हे सगळे खूपच अवांतर आहे, >>>>>>> अजिबात नाही.यामुळे पुस्तकाचे नाव कळले.रखमाबाईंवर लेख वाचला होता.त्या काळात त्यांनी हे करणे धैर्याचे होते.

रखमाबाईंचे वडील सावत्र होते. आईचा पुनर्विवाह झाला होता, असं आठवतंय.
रमाबाई रानड्यांनाही नवऱ्याच्या शिक्षणाच्या आग्रहामुळे सासरी छळ सहन करावा लागला.
त्यांचा स्वभाव म्रुदू होता हा फरक.

हीरा, रखमाबाई यांच्याबद्दल तुम्ही छान लिहीलंत. मीही कुठेतरी हे वाचलंय पण एक लेख वाचलाय बहुतेक आणि दुरदर्शनवर का कुठेतरी थोडीशी डॉक्युमेंट्री का काही बघितल्यासारखं पुसटसं आठवतंय पण तो लेख वाचून मी इंप्रेस्ड झालेले. फार कौतुक वाटलेलं त्या काळात दिलेल्या लढ्याचं.

Pages