कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी
आनंदी गोपाळ
Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आ. गोपाळ पुस्तकात लिहीलंय की
आ. गोपाळ पुस्तकात लिहीलंय की स्त्री शिक्षण ह्या ध्येयानं गोपाळराव इतके पछाडलेले होते की त्यांना प्रौढ वयाच्या एखाद्या वेश्येशी किंवा विधवेशी लग्न करून तिला शिकवण्याचा त्यांचा विचार होता. पण वेश्या मिळू शकली नाही. एका विधवेचं स्थळ सांगून आलं होतं तिचंही अचानकच एका श्रीमंत बिजवराशी लग्न ठरल्यामुळे नाईलाजानं त्यांना ह्या नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न करावं लागलं. लग्नापूर्वीच्या वधूपरिक्षेत ती हुशार व चुणचुणीत आहे व अक्षर ओळख आहे हे पाहून मगच त्यांनी होकार दिला होता. आनंदीबाईंना दिवस गेले तेव्हा आता अभ्यासावर परिणाम होणार म्हणून गोपाळ नाखूष होते. तसंच मुलगी झाली नाही म्हणूनही ते खट्टू झाले कारण मग घरच्याच मुलीला शिक्षण देता आले असते.
मेधावि +१
मेधावि +१
मला वाटते की चित्रपटात असे दाखवणे त्यांना शक्य नव्हते आणि जोडीदाराच्या पाठबळावर स्त्री कशी प्रगती करू शकते यावर त्यांचा फोकस असेल कदाचित..
Vt220, मला वाटतं की त्या
Vt220, मला वाटतं की त्या काळच्या महान कार्य केलेल्या स्त्रियांची किंवा त्यांच्या कार्याची तुलना च होऊ शकत नाही कारण प्रत्यकीच्या आयुष्यात वेगवेगळी परिस्थिती होती, महत्वाचं हे आहे की त्या परिस्थितीशी झगडून त्यांनी आपलं इप्सित साध्य केलं. आणि स्वतःची इच्छा नसताना कुणी फक्त दुसऱ्याच्या जबरदस्तीमुळे त्या काळात एवढं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही.
चित्रपटाच्या शेवटी त्यांची कोल्हापूर मेडिकल कॉलेज मधील नियुक्ती बद्दल उल्लेख केलेला आहे. हो त्या जगायला हव्याच होत्या परंतु गोपाळराव म्हणतात तसे त्यांनी पुढच्या पिढीला एक पायवाट करून दिली. जिद्द व मेहनत अंगी असेल तर काय करता येते हे दाखवून दिले , मला वाटते हेही खूप महत्वाचे होते त्या काळात.
सान्वी छान प्रतिसाद.
सान्वी छान प्रतिसाद.
इथे एकंदरीत छान चर्चा होतेय, वेगवेगळ्या प्रतिसादातून.
ज्यांना त्या सर्व स्त्रियाचे
ज्यांना त्या सर्व स्त्रियाचे कार्य समसमान महान आहे असे वाटते त्यांनी आपले 'याबाबतीतले डावे' विचार तसेच ठेवावेत.
मलामात्र त्यांनी किती इतर आयुष्यांवर, कशा पद्धतीने परिणाम केला यावरून त्यांची तुलना करणे आणि त्यातले 'माझे' आवडते कोणते, कोणत्या क्रमाने हे ठरवणे योग्य वाटते.
>>मलामात्र त्यांनी किती इतर
>>मलामात्र त्यांनी किती इतर आयुष्यांवर, कशा पद्धतीने परिणाम केला यावरून त्यांची तुलना करणे ...<<
नाहि पटलं, इन्फॅक्ट आयॅम अपॉल्ड! आनंदिबाईंना दीर्घायुष्य लाभलं नाहि आणि त्या प्रॅक्टिस करु शकल्या नाहित यावरुन त्यांच्या कर्तुत्वाचं मुल्यमापन करणं हे दुर्दैवी आहे. त्यांची जिद्द आणि पर्सवेरंस पुढच्या पिढीला नेहेमीच स्फुरणिय ठरलेला आहे...
धैर्याने शेवटपर्यंत खटला
धैर्याने शेवटपर्यंत खटला लढवून जिंकते आणि भारतातली पहिली 'प्रॅक्टिसिंग लेडी डॉक्टर' म्हणून इतिहासात नाव नोंदवते हे सगळे मला विलक्षण वाटले.
हे हीरा यांनी रखमाबाईंबद्दल लिहिलं आहे. पहिल्या practicing lady doctor डॉ कादंबिनी बसू-गांगुली होत्या असं नेटवर सगळीकडे आहे. महाराष्ट्रातील पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर रखमाबाई असू शकतील का?
अनेक क्षेत्रातील पहिल्या
अनेक क्षेत्रातील पहिल्या पदाचा क्लेम हा जगात नेहमीच संशयाच्या आणि वादाच्या गर्तेत सापडलेला आहे.
दुसरी बाब म्हणजे आनंदीबाई धर्माच्या पगड्याखाली इतक्या होत्या कि अमेरिकेत गेल्यानंतर आहार आणि पेहरावाच्या तेथील रूढींशी त्यांना जुळवून घेता आले नाही. चित्रपटात त्यांच्या तोंडी एक ओझरता उल्लेख आहे कि केवळ बटाट्याची भाजी खाऊनच किती दिवस काढणार. हे खूप बोलके आहे. याच तर्हेने त्यांनी तेथील अनेक पद्धती नक्कीच नाकारल्या असणार. अशा मानसिकतेत जर त्यांनी तिथे दिवस काढले असतील तर रोगप्रतिकार शक्तीची वाट लागली ह्यात विशेष काहीच नाही. परिणामी टीबीच्या संसर्गाला पट्कन बळी पडल्या. डॉक्टर असूनही अतिधार्मिक मानसिकतेने त्यावर मात केली आणि त्या जीवास मुकल्या.
>>>>सरी बाब म्हणजे आनंदीबाई
>>>>सरी बाब म्हणजे आनंदीबाई धर्माच्या पगड्याखाली इतक्या होत्या कि अमेरिकेत गेल्यानंतर आहार आणि पेहरावाच्या तेथील रूढींशी त्यांना जुळवून घेता आले नाही. चित्रपटात त्यांच्या तोंडी एक ओझरता उल्लेख आहे कि केवळ बटाट्याची भाजी खाऊनच किती दिवस काढणार. हे <<<
मी आधीच्या पोस्टमध्ये हेच म्हटले, कितीही शिकले किंवा देश फिरले तरी बळजबरीने किंवा एका प्रसंगाने स्विकारलेला विचार( त्या काळात शिक्षण घेणे) ह्यात व संस्कृती/रुढीचा प्रभावा खाली रहाणे ह्यात बराच विरोधाभास होता आनंदीबाई ह्यांच्या जीवनाबद्दल. म्हणजे त्यांच्या विचारात बदल हा झालाच न्हवता.
कांदबरीत हेच लिहले होते की, त्यांनी अमेरीकेत चक्क वेगळी चुल मांडली होती असे अंधुकसे आठवते. त्यांनी प्राण्यांपसून बनलेले स्वेटर सुस्धा नाकारले. पेन्सिलवनियाच्या थंडीत कसा बचाव केला असेल देव जाणे.
ती परिस्थिती आज नाही,
ती परिस्थिती आज नाही, त्यामुळे आज ती मानसिकता समजून घेणे कठीण आहे.
गोपाळरावांनी जबरदस्ती केली नसती तर आनंदी कधीही शिकली नसती हे सत्य आहे. पण म्हणून केवळ गोपाळरावांनी जबरदस्ती केली म्हणून मराठीचीही अक्षरओळख नसलेली एक मुलगी इंग्रजी सारखी परकीय भाषा शिकते, त्या भाषेतून दुसऱ्या अवघड विषयाची पदवी मिळवते हे त्या काळात प्रत्येक मुलगी करु शकली असती असे नाही. आनंदीही टॅलेंटेड होती.
मी फक्त नाटक पाहिलेय, पुस्तक वाचायला आवडेल. निदान नाटकात तरी असे दाखवलेय की तिथे गेल्यावर आनंदीच्या हातून धर्मविरोधी वर्तन घडेल या भीतीने गोपाळराव तिला पत्रातून इतकी जली कटी सूनवायचे की हवामान पाहून आहार घ्यावा असे एक डॉकटर म्हणून तिला कदाचित पटले असते तरी प्रत्यक्षात ते करण्याचे धाडस तिला झाले नसते.
>>Submitted by चिनूक्स on 23
>>Submitted by चिनूक्स on 23 February, 2019 - 08:08
धन्यवाद चिनूक्स. श्रीरामपूरचे भाषण चित्रपटात नाही आहे. त्याऐवजी पेनिसिल्वानियामध्ये कॉलेजच्या पहिल्या दिवशी वर्गाला स्वत:ची ओळख करुन देताना जुजबी उल्लेख केला आहे.
तुम्ही म्हणता आणि विकीवर लिहिल्याप्रमाणे त्या भाषणानंतर त्यांना आर्थिक मदत मिळाली. परंतु आर्थिक मदत वगैरे सोडा, चित्रपटात एत्तदेशियांशी त्या कुटुंबाचा कुठलाही चांगला व्यवहार दाखवलेला नाहीय. त्यांना केवळ वाईट माणसेच भेटलेली दाखवली आहेत.
>>Vt220, मला वाटतं की त्या काळच्या महान कार्य केलेल्या स्त्रियांची किंवा त्यांच्या कार्याची तुलना च होऊ शकत नाही कारण प्रत्यकीच्या आयुष्यात वेगवेगळी परिस्थिती होती
सान्वी हो त्यांच्या कार्याची तुलना नाही होऊ शकत. मी देखील केली नाही. फक्त एका सुशिक्षित दाम्पत्यामध्ये समाजात घडणाऱ्या घटनांची चर्चा-संवाद होईल असे मला वाटते. तसा काही संवाद त्या दोघांमधे चित्रपटात दिसला नाही.
>> त्यांनी प्राण्यांपसून बनलेले स्वेटर सुस्धा नाकारले.
हो. आम्ही खरतर आश्चर्यचकित झालेलो.
>> एक मुलगी इंग्रजी सारखी परकीय भाषा शिकते, त्या भाषेतून दुसऱ्या अवघड विषयाची पदवी मिळवते हे त्या काळात प्रत्येक मुलगी करु शकली असती असे नाही. आनंदीही टॅलेंटेड होती.
Yes. Hats of to her for that! १८७६ ते १८८३ - ७ वर्षात अक्षरओळख ते वैद्यकीय पदवी काही खाऊ काम नाही.
>>तिथे गेल्यावर आनंदीच्या हातून धर्मविरोधी वर्तन घडेल या भीतीने गोपाळराव तिला पत्रातून इतकी जली कटी सूनवायचे की हवामान पाहून आहार ...
अग बाई! किती contradiction एकाच माणसात?! एका क्षणाला बायकोला शिकायला मिळावे म्हणून धर्म बदलायला निघालेला माणूस, परदेशात धर्मविरोधी वर्तन घडेल म्हणून जलीकटी सुनावत होता असेल असे मला तरी वाटत नाही. कदाचित त्यांचे भारतात असताना असलेले धर्मधार्जिणे वर्तन त्यांना चेष्टेत आठवून देत होते असतील आणि चेष्टा समजून योग्य वागण्याऐवजी आनंदीबाईनी स्वत:ची हेळसांड केली असेल.
मला वाटते गोपाळरावांचे कुणीतरी मानसिक विश्लेषण करायला हवे.
>>>>अग बाई! किती
>>>>अग बाई! किती contradiction एकाच माणसात?! एका क्षणाला बायकोला शिकायला मिळावे म्हणून धर्म बदलायला निघालेला माणूस, परदेशात धर्मविरोधी वर्तन घडेल म्हणून जलीकटी सुनावत होता असेल असे मला तरी वाटत नाही. <<<<
अगदी + १११११
लोकांचा गोंधळ झाला वाटतं. पण गोपाळराव मिशनरी लोकांच्या विचार्॑सरणीने प्रभावित होते. तिथून शिक्षणासाठी स्पॉनसर्॑शिप मिळेल अशी आशा होती.
पुस्तकात अगदी लिहलय की, गोपाळराव अगदी टोकाच्या धमक्या देत की, मी खिर्स्त धर्म स्विकारणार. मूवीत तर ते बायबल वाचताना दाखवलेय सुद्धा.
पुर्वीचे सर्व नवरे अश्या प्रकारच्या. धमक्या का देत कळत नाही?
लक्ष्मि टिळकांची गोष्त आठवली.
मला तर, गोपाळराव माणूस एकदम्च
मला तर, गोपाळराव माणूस एकदम्च लहरी असेल असे वाटते.
त्याला हे स्त्री शिक्षणाचे वेड कशाने लागले असेल ह्याची उत्सुक्ता नेहमीच वाटलीय.
वॉट वाज दी ट्रिगर पाँईट?
आनंदीच्या केसमधे, १) नवरा हा ड्रायविंग फोर्स होता आणि २)मुल गेल्याची घटना. आनंदीबाईंना सॅलुट ह्याच्यासाठी की, तिची बुद्धीमत्ता आणि कष्टाळु वृत्ती मुळात होती ती ह्या दोन गोष्टमुळें पुरक होती स्वप्न पुरे करायला.
Gopalrao's life post
Gopalrao's life post-Anandibai is VERY interesting. Actually that should be made into a movie.
गोपाळरावांबद्दलची ही माहीती
गोपाळरावांबद्दलची ही माहीती कुठे मिळेल?
कुठेही एकत्र नाही. जुनी
कुठेही एकत्र नाही. जुनी वर्तमानपत्रं, चरित्रं यात उल्लेख येतात.
मी पुढचा भाग लिहीन त्यात लिहायचा विचार आहे.
अनेक क्षेत्रातील पहिल्या
अनेक क्षेत्रातील पहिल्या पदाचा क्लेम हा जगात नेहमीच संशयाच्या आणि वादाच्या गर्तेत सापडलेला आहे.
इथे सर्व डिटेल्स नेटवर सहज उपलब्ध आहेत शिवाय अमेरिका uk येथिल लिखित पुरावे आहेत. आनंदी आणि कादंबिनी यांच्या क्लेमबद्दल काहीच वाद नाहीये.
मी पुढचा भाग लिहीन त्यात
मी पुढचा भाग लिहीन त्यात लिहायचा विचार आहे.>>> नक्की लिहा चिनूक्स
चित्रपट कधी बघायला मिळेल ते
चित्रपट कधी बघायला मिळेल ते माहिती नाही पण इथले परीक्षण आवडले. इथली चर्चाही आवडली.
अंजली किर्तनेंचे आनंदीबाईंवरचे पुस्तक वाचून मी भारावून गेले होते आणि खूप खिन्नही झाले होते.
माणूस हा विसंगतीने भरलेला असतो. त्यात गोपाळरावांसारखे झपाटलेपण असते तेव्हा ते अजुनच अधोरेखीत होते.
आजही इथे भारतातून येणारी मंडळी शाकाहारी असतील तर (म्हणजे पारंपारिक जात अमुक म्हणून नव्हे ) तर अगदी लेबल्स वाचून दही देखील जिलेटिन नसलेले आहे ना ते बघून घेतात. आनंदीबाई ज्या काळात अमेरीकेत आल्या तो काळ बघता, त्यांच्या मनावर पूर्वापर संस्कारांचा, स्वतःच्या धर्माचा असलेला पगडा हे सगळे विचारात घेतले तर त्यांना इथल्या आहाराशी वगैरे जुळवून घेणे शक्य न होणे हे मला स्वाभाविक वाटते. मात्र आनंदीबाईंवर अजून एक दडपण होते. रमाबाईंनी इंग्लंड मधे आल्यावर ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला साहाजिकच आनंदीबाईंवर सामाजाची अजूनच बारीक नजर/संशयाने बघणे झाले आणि त्या सगळ्याला तोंड देण्यासाठी, आनंदीबाई आपल्या बाजूने टोकाचे प्रयत्न करत राहिल्या. आनंदीबाईंना केवळ गोपाळरावांची पत्रं येत नव्हती तर इतरही रावबाहादूर वगैरे प्रकारातील लोकांची संशय व्यक्त करणारी पत्र येत असत.
आनंदीबाईसाठी अमेरीकेतले शिक्षण ही नुसती ज्ञानासाठी केलेली तपःश्चर्या नव्हती तर एक विवाहित हिंदू स्त्री म्हणून सत्वपरीक्षाही होती. एका पत्रात त्या या संशय घेण्याबद्द्ल व्यथित होवून कसोशीने धर्म, रुढी पाळण्याबाबत लिहितात - 'मेले तरी बेहत्तर..'
हा सिनेमा पहायचाच होता.
हा सिनेमा पहायचाच होता.
अन्जली किर्तनेन्चे पुस्तक मी कॉलेज मध्ये असताना वाचले होते. तेन्व्हा मी त्यन्ना भारावुन फोन ही केला होता. त्यन्नी आनन्दी वर एक लघुपट केला आहे. त्याचे खाजगी शो त्या त्यावेळेस करत असत. त्यन्नी दादर भगीनी समाजात केलेल्य शो चे आमन्त्रण त्यन्नी मला दिले होते. मी पाहिला ही होता तो लघुपट.
सिनेमा मला आवडला. या गोश्टीत गोपाळ राव किती आततायी होता, तिरसट होता, हे दाखवण्या पेक्षा त्याची बायकोला शिकवायची आस जास्त प्रोजेक्ट होते. मला वाटतं तेच जास्त महत्वाचे आहे. एका बाईने नवर्यच्या धाकाने शिक्षण घेतलं, नंतर तिला त्याची गोडी लागली. ती भुक वाढत जाउन एक स्वप्न तयार झालं. मुलाच्या म्रुत्यु मुळे त्याचा ध्यास बनला. मग मात्र तिरसट नवर्याने पुर्ण साथ दिली. नोकरी गेलेली असतानाही साथ दिली. अमेरिकेस पाठवली. पण आपली भाउली दुर तर जाणार नाही ना!!! ह्या असुर्क्षित भावनेने सतत तिला धाकात ठेवले. तिने नौवारीत पाय उघडे पडतात म्हणुन गुजराथी साडी नेसायला सुरुवात केली ( सन्दर्भ किर्तने पुस्तक), तर नवर्यने तिला सतत टोमणे मारले. पण तिच्या ध्येया पासुन ढळु दिलं नाही.
आनन्दी गेल्या नंतर गोपाळ रावाने पुण्यात बस्तान ठोकुन खुप विक्षिप्त चाळे केले. भर चौकात गाढवीणीशी लग्न केलं !!! ( सन्दर्भ गन्गाधर गाडगीळ लिखित लो. टिळकान्चे चरित्र "दुर्दम्य") केसरीत तशी बातमी ही होती.
तरीही तो कसाही असला तरी किंग मेकर होता. त्यावेळच्या समाजात काळाच्या पुढचा विचार करणारा होता. त्याला शिक्षित विधवेशीच लग्न करायचे होते. म्हणजे त्याच्या मना प्रमाणे तिला पुढे शिकवता आले असते. पण त्याकाळी विधवा विवाह फारसे प्रचलित नव्हते. परत जे करत ते आर्थीक व सामाजिक वजन असणारे लोक. ते ह्या फाटक्या "पोश्ट्याला" कशाला देतिल आपली मुलगी !!!! त्यामुळे त्यन्ना विधवा विवाह करता आला नाही. म्हणुन मग दरिद्री ब्राम्हणाची देवीचे व्रण चेहेर्यावर असलेली ( आनन्दी बाईना लहान पणी देवी आल्या होत्या), जीला लौकरात लौकर उजवणे हेच वडिल व सावत्र आईचे मुख्य काम होते, अशी मुलगी बायको म्हणुन स्वीकारावी लागली. त्या मातीच्या गोळ्याला त्याने त्याच्या मना प्रमाणे आकार द्यायचा प्रयत्न केला. सिनेमातही आनन्दीच्या शिक्षणात ला हा बद्ल टिपला आहे. मुल व्हाय्च्या आधी ती फक्त नवर्याला घाबरुन शिकत असते. पण नंतर मात्र ती स्वतः साठी शिकते. स्वतः स्वप्न बघते. पण ते पुर्ण करण्यास मात्र नवरा मदत करतो. "मी त्यांना शिकुनच दाखवीन" यातले "ते" म्हणजे तिला त्रास देणारे तथाकथीत समाजातले प्रतिष्ठीत !!! ज्यानी सावित्री बाईंवर शेण फेकलं होतं, आणि पंडिता रमाबाईंना वाइट चालीची ठरवुन टाकलं होत, ते लोक. इकडेच आनंदीचं स्वप्न हे तिचं एकटीचं न रहाता सगळ्या शिक्षणाची आस असणार्या बायकांचं होतं.
श्री . ज. जोशींनी ही हा फरक त्यान्च्या कादंबरीत सुरेख दाखवला आहे. अलीबाग चे दिवस हे त्यान्च्या सहजीवनातले खुप सुरेख दिवस होते.
आता त्यावेळचे नवरा बायको मधले एकान्ताचे क्षण किन्वा बायकांवर होत असलेली जबरदस्ती. हा विषय खुप व्यापक आहे. फक्त गोपाळ राव नव्हे, तर सगळा समाज तसाच होता.
आज त्या बायका १३६ वर्षान्पुर्वीच्या आहेत. त्यान्नी तेन्व्हा येवढी शिकण्याची हिम्मत दाखवली, म्हणुनच इतर बायकान्ना पुढे शिकण्याची हिम्मत मिळाली. काशीबाई कानीट्करान्ना "आनंदी" चं चरित्र लिहाव वाटलं. त्या निमित्ताने एक नवी लेखिका उदयाला आली. अनेक बायकाना नवी वाट दिसली.
मला ललित प्रभाकर कधीच आवडला नव्हता आधी. पण या सिनेमात त्याला १०० मार्क. बी. पी. नंतर "चीउ" ला मस्त भुमिका मिळाली. गीतांजली कुलकर्णी बद्द्ल काय बोलणार.... अप्रतिम.
नव्या पिढीला नक्की दाखवावा असा सिनेमा.
चित्रपट पाहायला कधी जमेल
चित्रपट पाहायला कधी जमेल माहीत नाही, पण सर्व प्रतिसादातली चर्चा खूप आवडली.
इथे न्यूजर्सीत हा विकेंड
इथे न्यूजर्सीत हा विकेंड असणार आहे हे माहित नव्हतं पण पटकन ठरुन बघायलाही मिळाला. मस्त आहे. वादच नाही. ललित प्रभाकर आधी कधी आवडला नव्हता पण ह्यात त्याचं काम चांगलं झालं आहे. किती दुर्दैवी आहे की आनंदीबाईंनी ध्यास घेऊन आपलं स्वप्नं पूर्ण केलं पण ते प्रत्यक्षात उतरवायची संधी त्यांना मिळाली नाही.
चिनूक्स लेख लिहिल तेव्हा वाचायला आवडेल.
मी पुढचा भाग लिहीन त्यात
मी पुढचा भाग लिहीन त्यात लिहायचा विचार आहे.
Submitted by चिनूक्स on 24 February, 2019 - 19:09 >>>>
कशाचा पुढचा भाग? पहिला / आधीचे कुठे मिळतील?
त्याला हे स्त्री शिक्षणाचे
त्याला हे स्त्री शिक्षणाचे वेड कशाने लागले असेल ह्याची उत्सुक्ता नेहमीच वाटलीय.
वॉट वाज दी ट्रिगर पाँईट? >>> Same here. मलाया माणसाबद्दल त्यांच्या मानसिकतेबद्दल फार कुतूहल आहे. गोपालरावांबद्दल अजून कुठे वाचायला मिळेल तर आवडेल. म्हणूनच चिनूक्स लिहिणार आहेत त्या लेखाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
आनंदीबाई शेवटच्या आजारपणात
आनंदीबाई शेवटच्या आजारपणात हट्ट धरून पुण्यात आल्या कारण पुण्यातील एका प्रसिद्ध वैद्यांच्या मात्रेने बरे वाटेल अशी आशा होती पण त्यांनी धर्म न सांभाळणारी स्त्री अशा भावनेनी औषध देण्यास नकार दिल्याचं लिहीलंय पुस्तकात. अतिशय अतिशय वाईट वाटलं होतं ते वाचून.
गोपालरावांची
गोपालरावांची स्त्रीशिक्षणाबद्दलची आस्था आनंदीपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या भावाच्या निधनानंतर भावजय खानावळ चालवीत होती. या भावजाईला त्यांनी शिकवलं. नर्स केलं. पुतणीचं शिक्षणही केलं. सगीकधान अर्धवट असताना तिला लग्नाची मागणी आली. मागणी घालणारे होते रेंग्लर परांजपे. जोशी- कर्वे कुटुंबाचं लांबचं नातं होतं. शिवाय परांजपे एकदम एलिजीबाल ब्याचलर होते. भावजय आणि पुतणी ताबडतोब तयार झाल्या. गोपालरावांनी साक्षात परांजपयांना नकार कळवला. भरपूर भांडणं झाली. पुतणी हटून बसली आणि लग्न झालं. गोपाळराव पुढे अनेक वर्षं राग धरून होते.
1892नन्तर काही पुणेकर मोकळेपणाने चहा पिऊ लागले त्यालाही गोपाळराव कारणीभूत आहेत.
ते चीन, जपान, अमेरिका, इंग्लड असे देश फिरून आले, तिथे मांसाहार केला नाही, पुण्यात विद्यार्थी वसतिगृह चालवलं. ते बुडवलं.
आगरकरांना त्यांनी त्रास दिला आणि नंतर पाया पडून माफी मागितली, ती सगळी गोष्टच हृदय आहे.
आणि त्यांनी गाढविनिशी अजिबात लग्न केलं नाही. गाढवागाढवीचं लग्न लावलं, पण तेही खोटया सुधारकांना अद्दल घडवायला.
मोबाईलवरून लिहायचा कंटाळा आला. लेखात सविस्तर लिहीन.
ते आनंदीबाईंना भेटायला गेले
ते आनंदीबाईंना भेटायला गेले तेही सरळ नाही गेले. रंगून जपान वगैरे मार्गे गेले. वाटेत मिळतील ती हरकामी कामे केली व पैसे मिळवले. वाटेतच कधीतरी त्यांना ताप आला व डाॅ. वगैरे कुठे व कसे मिळणार, तर कुठल्याशा पुस्तकात त्यांनी वाचलं होतं की राॅकेल प्यायल्यावर ताप जातो म्हणून त्यांनी राॅकेल प्यायलं. त्यातून पोटाचं दुखणं उद्भवलं....हा मनुष्य खरंच अचाट अवलिया असणार...
मलाही गोपालरावांविषयी वाचायला
मलाही गोपालरावांविषयी वाचायला आवडेल. आनंदी नंतर त्यांचं पुढे काय झालं असेल हा विचार चित्रपट संपल्या संपल्या लगेच माझ्या मनात आला. तसेच त्यांच्या लहानग्या मुलाचं पुढे काय झालं? चिनूक्स तुमचा लेख वाचण्यास उत्सुक आहे
मालिका आली होती पूर्वी बहुतेक
मालिका आली होती पूर्वी बहुतेक सह्याद्रीवर ज्यात अजित भुरे आणि भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत होते. बघितला नाही अजून, पुढच्या विकांतापर्यंत राहिला पाहिजे.
> हे हीरा यांनी रखमाबाईंबद्दल
> हे हीरा यांनी रखमाबाईंबद्दल लिहिलं आहे. पहिल्या practicing lady doctor डॉ कादंबिनी बसू-गांगुली होत्या असं नेटवर सगळीकडे आहे. महाराष्ट्रातील पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर रखमाबाई असू शकतील का? > मी जेवढे वाचले आहे त्यानुसार डॉक्टर बनण्यासाठी पहिली ऍडमिशन पंडिता रमाबाई १८८३, मग आनंदीबाई. त्यानंतर जवळपास लगेच कादंबिनी. आणि मग रखमाबाई. रखमाबाई त्याकाळच्या भारतातील दुसऱ्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर होत्या.
===
> परंतु आर्थिक मदत वगैरे सोडा, चित्रपटात एत्तदेशियांशी त्या कुटुंबाचा कुठलाही चांगला व्यवहार दाखवलेला नाहीय. त्यांना केवळ वाईट माणसेच भेटलेली दाखवली आहेत. > रोचक!
===
> मी पुढचा भाग लिहीन त्यात लिहायचा विचार आहे. > प्रतीक्षेत.
===
वरती काही प्रतिसादात गोपालरावना शिकलेल्या विधवाशीच लग्न करायचे होते वगैरे वाचून https://en.m.wikipedia.org/wiki/Ishwar_Chandra_Vidyasagar हे आठवलं.
Pages