आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
पहायचाच आहे, पण इकडे लिमिटेड शोज असल्यामुळे कधी पाहता येईल माहित नाही.
नवोदित भाग्यश्री मिलिंद >>> बहुतेक बालक पालक मधे पण होती ना ती ?

आज जाणार आहोत ,
लहान मुलीला (८ वर्षे) दाखवण्यासारखा आहे का?

आजच मैत्रीणीने reco दिला.
तिच्या 16 वर्षाच्या मुलीला फार आवडला.
आज आजीसोबत परत जाते म्हणाली

लहान मुलीला (८ वर्षे) दाखवण्यासारखा आहे का?>>>>> नक्कीच असे सिनेमे दाखवा.आधी तिला थोडीशी कल्पना द्या(गोष्ट सांगा) म्हणजे कदाचित ती कंटाळणार नाही.
प्रकाश आमटेंवरच्या सिनेमाला आमच्या पाठी एक ५-६ वर्षांची मुलगी मस्त तो सिनेमा पहात होती,मधूनच वडील अगदी हळू तिला सांगत होते.आईवडलांचे कौतुक वाटले.

लहान मुलीला (८ वर्षे) दाखवण्यासारखा आहे का? >> नक्की घेऊन जा सिम्बा, she will love it. फक्त थोडीशी बेसिक गोष्ट तिला सांगून ठेवा सो तिला आणखी इंटरेस्ट येईल.

छान परीक्षण.
अशा चांगल्या विषयावर चित्रपट निघत आहेत व त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे हे खूप छान वाटते.

एकोणिसाव्या शतकातला सुधारक पुरुष म्हटले की विक्रम गायकवाड हेच एक नाव समोर येते इतका impact उंच माझा झोका मधल्या न्यायमूर्ती रानडेंची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा आहे. मध्यन्तरी राधा प्रेमरंगी रंगली मध्ये विक्रम दिसला होता. ललित प्रभाकरने ही ऐतिहासिक भूमिका कशी केली असेल पाहण्याची उत्सुकता आहे.

आम्ही पाहिला परवा. माझ्या टीनेज मुलीला (अमेरिकेत वाढल्यामुळे मराठी भाषासंपदा अत्यन्त मर्यादित) घेऊन गेले होते. सबटायटल्स होती.
आम्हाला दोघींनाही आवडला. गोष्ट भिडते मनाला. भाषा अगदी १८८० ची न वापरता साधी सोपी मराठी वापरली आहे असे वाचले पण सिनेमातली भाषा मला तरी खटकली नाही एवढे नक्की, तसंच कपड्यांचं आणि त्या काळच्या वातावरणाचं. सफाईदार वाटला लूक एकूण. शेवट अगदी हळहळ लावून जातो. त्याच्या नंतर तो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशस्वी भारतीय स्त्रियांचा कोलाज दाखवला आहे तोही अगदी शेवटपर्यन्त पाहिला.
सर्व कलाकारांची कामे मस्त आहेत. ललित प्रभाकर, गीतांजली कुलकर्णी ( ही अतुल कुलकर्णीची बायको असे कळले!! इतके दिवस कुठे होती असे वाटले! ) विशेष आवडल्या. गाणी छान आहेत, शब्द आणि संगीत दोन्ही आवडले!
हो, आणि जरी २५ चा वर आणि वय १० ची मुलगी असे सुरुवातीचा काळ दाखवला असला तरी त्यांच्यात काहीही "क्रिन्जी" सीन्स दाखवलेले नाहीत. एकूण, सिनेमा जरूर पहा असे रेकमेन्ड करेन!

Maitreyee +1
गीतांजली कुलकर्णी गातेही सुरेख, वेगळाच आवाज आहे, एकदम लोकसंगीत/पहाडी पठडीतला.
अतुल- गीतांजली आले होते , तो खुपते तिथे गुप्तेचा पूर्ण एपिसोड सापडत नाहीये युट्युबवर पण ती हिन्दी- इंग्लिश नाटकात काम करायची असं म्हंटल्याचं आठवतय.
असो, तर आनंदी गोपाळ बद्दल !
आनंदीबाईंचा खडतर प्रवास, जिद्द , टिबी सारखा आजार झाला असताना परीक्षा देऊन डॉक्टर होणे हे जितक भाराऊन टाकते तितकच किंवा त्याही पेक्षा जास्तं गोपाळरावांची त्याकाळात असणारी अतिशय प्रगत शेकडो वर्षे पुढचा विचार करणारी उच्च विचारसरणी, बायकोला शिकवायचा ठाम निश्चय ( अ‍ॅक्चुअली ऑब्सेशन) , त्यासाठी समाजाविरुध्द जाऊन वाट्टेल त्या संकटांना तोंड द्यायची तयारी, आनंदी अमेरीकेला जाऊन डॉक्टर बनणारच हा विश्वास हे भारावून टाकतं !
ललित प्रभाकरने मिळालेल्या संधीचं खरच सोनं केलय आणि दिसलाय पण फार मस्तं गोपाळराव म्हणून
, feel so proud and happy for LP Happy
भाग्यश्री सुध्दा शोभली आहे आनंदी म्हणून.
गीतांजली कुलकर्णीनी उत्तम अभिनय केलाय, मुळात कॉन्झर्वेटिव विचारांची विधवा आणि नंतर आनंदीला भक्कम सपोर्ट करतानाचे तिचे प्रसंग फार छान आहेत !
नक्की बघा संधी मिळाली तर सिनेमा!

@सान्वी
छान ओळख करून दिलीत. चित्रपट नक्की बघणार.

धन्यवाद सनव, आणि मैत्रेयी यांचेही सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटचा कोलाज खरंच भारावून टाकणारा आहे, एरव्ही प्रेक्षक चित्रपट संपण्याआधीच गर्दी होईल म्हणून निघतात परंतु तसे कोणीही उठले नाही इतके खिळवून ठेवणारे आहे.

छान लेख.
ललित च्या तोंडावरची माशी उडत नाही, त्यामुळे पास.

काल पाहिला . चित्रपट आवडला . पुस्तक वाचले आहे . त्याला चान्गला न्याय दिला असे वाटले .
सगळ्यांची कामे छान झाली आहेत . काळनिर्मिती ( वेशभूषा , art direction ) हेही चांगले जमले आहे

BTW गीतांजली कुलकर्णी "असंभव" मालिके मध्ये होती. नीलम शिर्केच्या बहिणीचा ( जुन्या काळातील बयोच्या बहिणीचा ) रोल होता तिचा .

मी दाखवले म्हणायच्या एवजी मुलीणा उत्सुक्ता होती बेसिक गोष्ट एकुन माझ्याकडुन.
>>>>ललित च्या तोंडावरची माशी उडत नाही, त्यामुळे पास.<<<<
+ ११११११

त्याची संवाद्फेक बेकार आहे.

> हो, आणि जरी २५ चा वर आणि वय १० ची मुलगी असे सुरुवातीचा काळ दाखवला असला तरी त्यांच्यात काहीही "क्रिन्जी" सीन्स दाखवलेले नाहीत. > सीन दाखवले नाहीत हे बरोबरच आहे. पण त्याकाळी संमतीवय १०च होतं. आणि इंग्रजांनी ते १२ करायचा प्रयत्न केल्यावर बोंबाबोंब झाली होती.
https://en.m.wikipedia.org/wiki/Age_of_Consent_Act,_1891

https://www.thehindu.com/opinion/op-ed/The-wait-for-another-day/article1... हा अजूनेक चांगला लेख.

मी पुस्तक वाचले तेव्हा शाळेत होते. आधीच्या काळातील स्त्रीयांच्या स्थितीची कहाणी इतकी माहित नसल्यने खूप परीणाम झाला. बरेच प्रश्ण विचारले आईला.
मला ती कल्पनाच धक्कादायक वाटलेली, ९ वर्षाची मुलीचे लग्न वगैरे.
तेव्हाही आणि आजही एकच गोष्ट सतावते/सतावली, आनंदीचे विचार बदलले नाही काह्री बाबतीत, खानपान, वेषभुषाब्वगैरे थंडीत तेच ठेवून शारीरीक नुकसान केले.

मला स्वतःला एक गोष्ट नाही कळली, आनंदी बाई स्वतः डॉक्टर होत होत्या. जवळपास अमेरिकेतली सगळी तज्ञ मंडळी होती. मग त्यांच्यावर तेथे इलाज का नाही झाले? की भारताप्रमाणेच अमेरिकेतही त्या काळात TB वर इलाज नव्हते?

खानपान, वेषभुषाब्वगैरे थंडीत तेच ठेवून शारीरीक नुकसान केले.>>>>>>>> गोपाळराव जोशी यांची आनंदीबाईंना याबाबत टोमणे मारणारी पत्रे असत.संदर्भ...श्री.ज.जोशींची कादंबरी आणि इतरत्र वाचलेले लेख.

मला पुस्तक वाचल्यावर गोपाळ जोशी मुळीच आवडला नाही. आनंदीची अतीव दया आली. सिनेमात तो विक्षिप्त असला तरी कनवाळू असेल असं वाटतं.

मला पुस्तक वाचल्यावर गोपाळ जोशी मुळीच आवडला नाही. आनंदीची अतीव दया आली. सिनेमात तो विक्षिप्त असला तरी कनवाळू असेल असं वाटतं.>>>> exactly. गाणी पाहून तरी सिनेमात त्याचे glorification केले असावेसे वाटते.

टि.बी त्याच काळात डिसकव्हर झाला असं म्हंटलय इथे, त्यामुळे अर्थातच उपाय नसतील.
https://www.cdc.gov/tb/worldtbday/history.htm

असो, गोपाळ जोशी पुस्तकात /पत्रात काही वेगळे आहेत का सिनेमापेक्षा?

गोपाळ जोशींबाबत एक अजून गोष्ट वाचली होती.एके दिवशी त्यांनी सकाळी रेव्हरंडबरचा,चहा बिस्कीटे खाल्ली,बाप्तिस्मा घेतला(याबाबत जरा शंका आहे.) आणि संध्याकाळी घरी येऊन संध्या केली.ज्या काळात चहा बिस्कीटे खाल्ली तरी धर्म बाटायचा,त्यावेळी हे कृत्य खरंच प्रशंसनीय होते.

मी सिनेमा पाहिलेला नाही पण आनंदीबाईंना भारतात परत आल्यावर TB चं निदान झालं असं वाचल्यासारखं वाटतंय..
पुस्तक शाळेत असताना वाचलं होतं त्यामुळे नीट आठवत नाहीये.

गोपाळ जोशी पुस्तकात /पत्रात काही वेगळे आहेत का सिनेमापेक्षा?>>> आनंदीबाई तिकडून गोपाळरावांना पत्र / फोटो पाठवत.. त्यातल्या एका फोटोमध्ये आनंदीबाईंनी गुजराती साडी नेसलेली दिसल्याने गोपाळरावांनी अत्यंत वाईट भाषेत पत्रोत्तर पाठवलं असा उल्लेख कादंबरीत आहे.

मी ही पहिल्या दिवशीच पाहिला कारण आनंदी बाई आणि गोपाळराव ह्या जोडप्याने मला गेली अनेक वर्षे भुरळ घातली आहे. मी ही review लिहायला घेतला आहे पण आता इथेच लिहिते.

सिनेमा खूप आवडला. एवढया मोठ्या व्यक्तींना चित्रपटात न्याय देणं हे खरोखर शिवधनुष्य उचलण्यासारखं असत आणि त्यात ही टीम खुपशो यशस्वी झाली आहे. दोघांनी ही अभिनय छान केला आहे त्यामुळे ही फिल्म documentary वाटत नाही. त्यांचं सगळं जीवनच इतकं नाट्यमय आहे की काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे खरंच खूप कठीण असणार. पण निवडक प्रसंग , उत्तम लोकेशन, अनुरूप कपडे, चांगले संवाद आणि मुख्य म्हणजे सगळ्यांचा उत्तम अभिनय ह्या मुळे ह्या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली आहे. भाग्यश्री मिलिंद ने एकाच वेळी दबलेली ही आणि कणखर ही असा अभिनय खूप सुंदर केला आहे. फक्त चेहराच नाही तर तिचा सम्पूर्ण देह अभिनय करतो.

गोपाळरावांच्या विक्षिप्तपणा बद्दल नेहमीच खूप बोललं जातं. पण काळाच्या इतकं पुढे बघणारा , इतका समाजविरोध सोसणार माणूस हा सणक्या, विक्षिप्त असणे नैसर्गिक आहे. सामान्य माणसाला हे अशक्य आहे. त्यानी आंनदीच्या मनात शिक्षणाची ज्योत लावली आणि ती सतत प्रकाशित ठेवली हे मोठं योगदान आहे त्यांचं. अक्षरशः आयुष्याचा होम केला ह्या एका स्वप्नपूर्ती साठी.

Pages