आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हीरा on 19 February, 2019 - 18:52>>
कालपासून याबाबत इथं लिहावे असे वाटत होते पण अवांतर होईल आणि विषय भटकला जाईल म्हणून टाळलं.
धन्यवाद हीरा.

अतरंगी गोपाळरावांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ !!!

Dzv1nZZX4AANbfw.jpg

खानपान, वेषभुषाब्वगैरे थंडीत तेच ठेवून शारीरीक नुकसान केले.>>>>>>>> गोपाळराव जोशी यांची आनंदीबाईंना याबाबत टोमणे मारणारी पत्रे असत.संदर्भ...श्री.ज.जोशींची कादंबरी आणि इतरत्र वाचलेले लेख.

>>> Right
गोपाळरावांचे उदात्तीकरण केले आहे

अवांतर :
मृणालिनी जोगळेकरांचे "स्त्री मुक्तीच्या उदगात्या "हे पुस्तक मिळाले तर नक्की वाचा आनंदीबाईंच्या समकालीन किंव्हा थोड्या वर्षानंतरच्या काळातील शिकलेल्या ११ स्त्रियांची चरित्रे संक्षिप्तरूपात मांडली आहेत .

१) पंडिता रमाबाई
२) रमाबाई रानडे
३) ताराबाई शिंदे
४) मनोरमा मेधावी
५) काशीबाई कानिटकर
६) रखमाबाई राऊत
७) आनंदीबाई कर्वे
८) पार्वतीबाई आठवले
९) लक्ष्मीबाई टिळक
१०) जनाक्का शिंदे
११) कमलाबाई होस्पेट

माझ्यासाठी हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे . मी पुन्हा पुन्हा ते वाचत असते . संग्रही ठेवावं असच पुस्तक आहे हे !

===
manila,

मृणालिनी जोगळेकरांचे "स्त्री मुक्तीच्या उदगात्या "हे पुस्तक चांगले वाटते आहे. त्यातल्या स्त्रियांची नावे दिलीस हे बरं केलं. धन्यवाद. आता त्या सगळ्यांचे विकीपेज वाचते.

मृणालिनी जोगळेकरांचे "स्त्री मुक्तीच्या उदगात्या "हे पुस्तक मिळाले तर नक्की वाचा आनंदीबाईंच्या समकालीन किंव्हा थोड्या वर्षानंतरच्या काळातील शिकलेल्या ११ स्त्रियांची चरित्रे संक्षिप्तरूपात मांडली आहेत . >>> वाचायला हवं हे पुस्तक. Thank u ह्या माहितीसाठी.

मॄणालिनी जोगळेकर माझ्या माझ्या मराठीच्या प्राध्यापिका Happy
यातली रमाबाई रानडे, पार्वतीबाई आठवले यांची आत्माकथने* आणि लक्ष्मीबाईंचं आत्मचरित्र वाचलीत.
* आत्मकथन म्हटलंय कारण आयुष्याच्या काहीच भागाबद्दल लिहिलंय.

काल पाहिला आणि खूप आवडला सिनेमा.
ललित प्रभाकर चे काम खूप आवडले.
गाणी सुद्धा समयोचित आणि समर्पक वाटली.
पदवीदान समारंभाचा संपूर्ण प्रसंग आणि शेवटी संजीव अभ्यंकरांच्या आवाजातलं 'तू आहेस ना' गाणं आणि त्याबरोबर स्क्रीन वर येणारा कर्तुत्ववान महिलांचा कोलाज हेलावून जातो !

घरातल्यांचा विरोध मोडून काढत, तत्कालिन कर्मठ रुढी-परंपरावादी समाजाशी दोन हात करुन गोपाळरावांनी ज्या जिद्दीने आपल्या पत्नीस शिकवण्यास हर तर्‍हेने मदत केली. आणि त्यांची सुरुवातीला हवी तशी साथ न देता, पण आपले मूल गमावल्यानंतर, शिक्षणाचे महत्व पटून, तितक्याच जिद्दीने त्या काळात परदेशी एकटी जाऊन कठीण परिस्थितीत भारतातली पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावण्याचा पराक्रम करणार्‍या आनंदीबाईंचे देखील कौतुक वाटते.
दोन्हीही विलक्षण असामान्य व्यक्तिमत्व होती !

जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून "बघंच" म्हणून गळ घातली गेली आहे. पाठोपाठ इथली परीक्षणे वाचली. आता खूपच उत्सुकता आहे हा चित्रपट पाहण्याची. आजच पाहून येतो.

बाय द वे...

>> Submitted by हीरा on 19 February, 2019 - 18:52

डॉ. रखुमाबाई यांच्यावर सुद्धा चित्रपट येऊ घातलाय आणि त्याचा ट्रेलर तर जवळपास दोन वर्षांपूर्वीच रिलीज झालाय अशी माहिती कळली.

https://www.youtube.com/watch?v=JxUpy0fNzh4

आणि या लेखानुसार तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय म्हणे. खखोमाना.

फेसबुकवर नुकतीच खालील एक पोस्ट पहिली, आवडली म्हणून share करत आहे. यात त्यांनी गाण्यांचे lyrics ही दिले आहेत. प्रभावी शब्द , मोहक चाल आणि तितकीच सुंदर साथ करणारं म्युझिक...

आनंदी गोपाळ...

खरंतर मी आज सिनेमावर नाही लिहणार.यू ट्यूबवर या सिनेमाच्या गाण्यांचा जो अल्बम आहे त्याबद्दल लिहणार आहे. ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका करतोय म्हटल्यावर हा सिनेमा must see या कॅटेगरीत लगेचच दाखल झाला,अगदी झोया-रणवीरचा 'गली बाॅय' competition मध्ये असूनही.

त्यानंतर आला त्याचा ट्रेलर. तो असंख्य वेळा पाहिला,इतका जमून आला होता. ट्रेलरमध्येच गोपाळराव या माणसाने मनावर गारूड केले. 132 वर्षापूर्वी बायकोच्या शिक्षणासाठी इतक्या ठामपणे आग्रही असलेले गोपाळराव जाणून घ्यायचेच होते.

झी टिव्हीने सिनेमाचे प्रमोशन ज्या पध्दतीने केले तेही कौतुक करण्यासारखे. हा सिनेमा करण्यामागची त्यांची भूमिका, त्यांचे टीम सिलेक्शन, प्रमोशन करताना म्युझिक टीमला दिलेले महत्व (कारण ते खूप मोठे बलस्थान आहे सिनेमाचे, याची अर्थात त्यांना जाणीव असणारच).या सिनेमासाठी दिग्दर्शकाला दिलेले पुर्ण स्वातंत्र्य आणि हवा तेवढा वेळ.

त्यानंतर आली एकामागोमाग एक यू ट्यूब वर या सिनेमाची गाणी. पाच गाणी आहेत पण एकापेक्षा एक अप्रतिम. वैभव जोशींचे शब्द म्हणजे जादूच. कित्येक वर्षानंतर मी इतक्या तन्मतेने एकाच सिनेमातील सगळी गाणी लूपवर लावून ऐकली. नाहीतर एखाद,दुसरं गाणं लोकप्रिय होते तेव्हा त्याच सिनेमातील इतर गाणी कधी माहितही होत नाहीत.

या सगळ्यामुळे पूर्ण अभ्यास झालेला दहावी/बारावीचा हुशार मुलगा ज्या आत्मविश्वासाने परीक्षेला जातो त्याच आत्मविश्वासाने मी हा सिनेमा पाहायला गेले. तो सुंदरच असणार ही खात्री होती आणि तो तसाच होता. डोळ्यावर 3Dचा गाॅगल न घालताही तो अनुभव हा 3D नसलेला सिनेमा तुम्हाला देवू शकतो. आनंदी-गोपाळ या जोडीचा तो 12 वर्षाचा प्रवास तुम्हीही त्यांच्या बरोबर करता. सिनेमा संपल्यावर लगेच बाहेर न पडता थोडा वेळ तिथूच बसून मनातल्या मनात परत त्यांचा तो प्रवास परत अनुभवासा वाटत राहते पण शक्य नसते.

पण यू ट्यूबवरील या गाण्यांचा जो अल्बम आहे तो पाहताना ते शक्य होते. अगदी ओळीने असलेली ही गाणी आणि प्रत्येक गाण्याच्या आधी, मध्ये असलेल्या संवादामुळे हा सिनेमा परत अनुभवता येतो.

पहिलेच गाणे , ज्या गाण्याने आनंदी-गोपाळचा सहप्रवास सुरू होतो ते ,
रंग माळियेला श्रीरंग माळियेला...
गंध भारीयेला आनंद भारीयेला..
गोपाळरावांसारख्या तर्हेवाईक माणसाशी लग्न होणार आहे हे कळून चुकलेल्या अल्लड दहा वर्षाच्या आनंदीच्या प्रवासाची ही सुरूवात आपल्याला त्या जगात घेवून जाते.

त्यांच्या मधला संघर्ष, शिक्षण देण्यासाठी गोपाळरावांची चाललेली तगमग बघून या विक्षिप्त माणसांबद्दल कुतूहल निर्माण होते. त्या काळात कुठून हे वेड आले असेल या माणसात याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्या तळमळीतून निर्माण झालेले त्यांचे नाते एका नव्या वळणावर येते ते वळण..

तुझिया नयनांनी प्रिये
मी माझे स्वप्न हे पहिले
तू माझे मी पण जणू
आपुल्या हातानी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता
तुझवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू
मजला पुरे हि सार्थता
तुझ्यासवे तुझ्यामुळे
तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना
मम पाऊली
तव चाहुली
प्राणास ये
सय कान्हुली
आनंद मन येई भरा
आनंद मन येई भरा
रे नंदना मनमोहना…..
आनंदघना
सारख्या अप्रतिम शब्दरचनेने तुमच्या पर्यत पोहचते.

गोपाळरावांचे आनंदीला शिक्षण देण्याचे स्वप्न पुरे होईपर्यंत आनंदीचा डाॅक्टर होण्याचा ध्यास सुरू होतो. 132 वर्षापूर्वी हा ध्यास म्हणजे अशक्यप्राय गोष्टच जणू. पण वाटेत आलेली प्रत्येक अडचण दूर करत गोपाळराव ज्या पध्दतीने आनंदीला साथ देतात त्यात सुरूवातीच्या तर्हेवाईक गोपाळरावांचा मागमूसही दिसत नाही. उलट आनंदीचा हेवा वाटत राहतो.वटपौर्णिमेला सात जन्म हाच नवरा मागण्या-या बायका हा सिनेमा पाहिल्यावर नक्कीच गोपाळरावांसारखा नवरा मागतील.

वाटा वाटा वाटा गं
चालिन तितक्या वाटा गं..
माथी छाया पायी ऊन..
यातील 'माथी छाया' म्हणजेच गोपाळराव. त्यांच्या साथीने समाजाच्या आणि परिस्थितीच्या विरोधात लढत आनंदीला डाॅक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करणे शक्य होते.

त्यानंतर येतो तो आदर्श शिंदेनी गायलेला आईचा गोंधळ..

हे जग किर्र काळी रात
जप डोळ्यातील वात...
ये झुंजूमुंजू होत आलं जी..
झुंजूमुंजू होत आलं जी..
उजाडेल उजाडेल जरा धीर धर बये
लोळण घेतील सुर्याची किरणं तुझ्या पायावर गं...
पुढच्या वळणावर पहाट तुझी वाट बघतीया गं...
कर उंबर्याला पार मागं पडो घरदार
बये माझे..
आता पाऊलांना चढू दे ग चालण्याचा ज्वर..
उजाडेल उजाडेल जरा धीर धर ग..
बये माझे माय माऊली माझे माय माऊली...
तुला खुणावतो आहे आता तुझा पैलतीर..
तुला कसली भिती ,रिती ना भाती तुझ्या लेखी गैर..
नको कोंदट गाभारा, नको धुपाचा उबारा..
सोड आरती नमाज, रमलं समाज
तुझा तूच स्वर..
ये भवसागर लांघून बये.. देवपणाचा वल्हकर..
गाठशील पैलतीर जरा धीर धर गं
बये माझे माय माऊली माझे माय माऊली...
झळाळेल चाहुलीने उभं चराचर..
बये सोन्याला रूप्याला हि-याला मोत्याला नाही तुझी सर..
असा बुध्दीचा शृंगार त्यात डोळ्यात अंगार..
माझ्या बयेला बघूनी बघती थांबून अवनी अंबर..
तिन्ही लोक झालं एक मुखाने गजर..
आणि उघडलं उघडलं गंजलेले दार..
माझे माय माऊली, माझे माय माऊली..

किती अर्थपूर्ण शब्द आहेत. आज उच्च शिक्षण घेण्यासाठी हवेत झेपावणा-या प्रत्येक मुलीने आनंदीचे ॠणी असायला हवे.
खरंच हे दोन तास तुम्ही hypnotise होवून आनंदीचा भारतातील पहिली स्त्री डाॅक्टर होण्याचा प्रवास पाहत असता.गोपाळराव जोशी हे किती काळाच्या पुढचा विचार करणारे व्यक्तिमत्व होते हे पाहून थक्क व्हायला होते. आनंदीचे स्वप्न पुर्ण होईल तेव्हा ती आपल्या खूप पुढे निघून गेलेली असेल हे माहित असूनही ते पुर्ण करण्यासाठी लढणारे गोपाळराव , आनंदीला म्हणतात तुम्ही अमेरिकेला जावून डाॅक्टर व्हाल तेव्हा तिथून तुम्हाला आम्ही इवलेसे दिसू तेव्हा आपल्याला मात्र आभाळाएवढे उंच दिसतात.

हे असे काहीतरी अशक्य स्वप्न पुर्ण करणा-याच्या आजूबाजूला त्याला साथ देणारे जे असतात त्यांचे मला नेहमी कौतुक वाटत राहते. सुरूवातीला, या चालीरीतीच्या विरोधात चाललेल्या गोष्टीं पटत नसलेली गोपाळरावांच्या पहिल्या बायकोची आई नंतर खंबीरपणे या दोघांना साथ देते.गीतांजली कुलकर्णींनी केली आहे ही भूमिका.

झीने 14 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज करून खर्या अर्थाने valentine साजरा केला. गुलाबाचे फुल किंवा चाॅकलेट्स देवून valetine साजरा करण्यार्या आजच्या पिढीपेक्षा गोपाळरावांचे बायकोला शिक्षण देण्याचे स्वप्न पुर्ण करणारी आनंदी आणि आनंदीचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याकरता वाटेल ते करायची तयारी असलेले गोपाळराव, ही खरी रोमॅण्टीक जोडी वाटत राहते.

आणि सगळ्यात शेवटी येते ते ' तू आहेस ना 'हे अन्थेम. ज्याला आइसिंग ऑन द केक म्हणतात ते म्हणजे हे गाणे.
स्त्रीचा आदर, सन्मान करणारे हे गाणे आणि ते गाणारे कलाकार ज्या पध्दतीने ते गातात ते अगदी खोलवर पोहचते.हे गाणे ऐकताना स्त्री असल्याचा खूप अभिमान वाटत राहतो.

तू आहेस ना…..२
नभाचा भरोसा जसा
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना
आहेस ना….
कधी शारदा तू
कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा
कधी रागिणी
सहस्त्रावधी
सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी
दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य
अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी
तुझी चेतना
तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना…..२
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता……२
तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी
वांझ पुरुषार्थ व्हा…….२
तू आहेस ना…..
आहेस ना

समीर विद्वंस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे संगीत हृषिकेश-सौरभ-जसराज या तिघांचे आहे. गाणारे कलाकार आहेत केतकी माटेगावकर,शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, जसराज, रोहित, राहुल देशपांडे, अवधेत गुप्ते आणि संजीव अभ्यंकर.

ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद हे दोघे आनंदी-गोपाळचे जगणे अक्षरशः परत जगलेत. गीतांजली कुलकर्णींनी केलेली गोपाळरावांच्या पहिल्या बायकोच्या आईची भूमिका..हा सिनेमा न वाटता तुमच्यासमोर घडत असलेली गोष्ट वाटत राहते.

Thank you झी आणि 'आनंदी गोपाळ ' टीम.

गाण्यांच्या अल्बमची लिंक..

कादंबरीत रंगवले ल्या व्यक्तिरेखेला लेखकानेही रंग चढवले असतील का?> हो मलाही असच वाटतं.
'The life of Dr. Ananabai Joshee, a kinswoman of the Pundita' या `CAROLINE HEALEY DALL' यांनी लिहिलेल्या पुस्तकात आनंदीबाईंनी " MENTAL PHOTOGRAPH" मधे हे लिहिलय.
Capture1.PNG

सान्वी मनापासून धन्यवाद,
गोंधळाचे शब्द मी परवापासून शोधत होतो,
सिनेमात ते गाणे पार्श्वभूमीला येते त्यामुळे थोडे शब्दांकडे दुर्लक्ष झाले होते,
यु टयूब वर ऐकताना गाणे खूपच आवडले, पण शब्द मीटर मध्ये नाहीयेत , टिपिकल गोंधळ पद्धतीने शब्द लांबवून , ह्रस्व करून मीटर मध्य एबसावले आहेत पण ते ऐकताना मजा वाटते. आणि लक्षात ठेवायला तितकेच कठीण

जरा धीर धर बये माझे माउली, म्हणताना अक्षरश: कुणीतरी पाठीवर हात ठेऊन धीर देतय असे वाटते.

आणि सगळ्यात शेवटी

तिन्ही लोक झालं एक मुखाने गजर..
आणि उघडलं उघडलं गंजलेले दार.....>>>>
मध्ये त्यांना ब्रेक थ्रू ठरणारे पत्र येते त्याच्या पुढच्या "गंजलेले दार " शब्दावर त्याने लिटरली आनंदाने उडी मारल्यासारखे वाटते.

प्राजक्ता_शिरीन ,
लिंक बदल धन्यवाद . पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.

आनंदी गोपाळ या दोघांबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल अधिक सखोल जाणून घ्यायचं तर " विश्रब्ध शारदा" खंड 1 मधील त्यांचा पत्रव्यवहार आवर्जून वाचावा. अतिशय कॉंप्लेक्स व्यक्तित्व आणि परिस्थिती होती ती. कोणताही व्यक्ती पूर्ण काळी वा पूर्ण पांढरी नसते. तिच्या ग्रे पणाची कारणे त्या त्या व्यक्तीला मोठी ठरवून जातात..
विश्रब्ध शारदा एकूणातच वाचनीय. एकोणिसाव्या शतकाचा खरा अंदाज देणारेे. त्या काळाला घडवलेल्या अनेकांची पत्र आपल्या समोर खरा काळ उभा करतात.

कालच चित्रपट पाहिला. मी पुस्तक वाचलेले नाही. त्यांच्याविषयी खूप ऐकून मात्र होतो. खरोखर थक्क करणारा प्रवास आहे. खूप काही शिकण्यासारखे आहे. शालेय वयातील मुलांना तर आवर्जून दाखवण्यासारखा आहे हा चित्रपट. सव्वाशे वर्षांपूर्वी धार्मिक रूढीरीतींचा जबरदस्त पगडा असलेल्या भारतातील महिलेने वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी अमेरिकतील कॉलेजमधून डॉक्टर होणे. किती आव्हाने त्यांनी पार केली आहेत याची कल्पना येते. सलाम त्या जिद्दीला. मला त्याकाळातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दल जराही प्रेम नाही. नवऱ्याच्या इच्छेखातर बायकांनी आयुष्य पणाला लावायचे. लग्न झाले कि तिला स्वत:चे असे आयुष्य उरतच नव्हते. पती हाच परमेश्वर वगैरे. त्या दृष्टीने विचार करता हे सगळे खरोखर "ग्रेट" आहे का असा विचार मनात येतो. पण हि अचिव्हमेंट त्या व्यवस्थेमुळेच झाली हे सुद्धा कटूसत्यच आहे आणि त्यासाठी त्यांना अखेर प्राणाची किंमत मोजावी लागली हे सुद्धा तितकेच क्रूर सत्य आहे. (काही देशांत गन पॉइंटवर खेळाडूंचा सराव करून घेऊन त्यांच्याकडून ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवले जाते, काही मुले आईवडिलांच्या इच्छेखातर लहानपणी अतीव जुलूम सहन करत केवळ जबरदस्तीने एखाद्या क्षेत्रात करीयर करतात. वगैरे उदाहरणे आठवली. योग्यायोग्य हा वादविवादाचा विषय आहे). असो. पण आनंदीबाई इंग्लंडला गेल्या होत्या अशी अगदी कालपरवापर्यंत माझी समजूत होती. पण या चित्रपटामुळे तो गैरसमज दूर झाला.

चित्रपटाविषयी:
सकारात्मक:
तत्कालीन काळ उभा करण्यात चित्रपट खूपच यशस्वी झालाय. वरच्या अनेक प्रतिक्रियांमध्येसुद्धा हा मुद्दा आला आहेच. छोट्या छोट्या तपशिलांची काळजी घेतली आहे. अंगावर शहारे आणणारे, धक्कादायक, दु:ख दायक प्रसंग खूप प्रभावी चित्रण केले आहे. अमेरिकेला जातानाचे दृश्य आणि तेंव्हाची गोपाळरावांची आर्त हाक! फारच परिणामकारक. तिकीट काढून जहाजातून जाणे बस्स इतकेच. बघताना कसे अगदी अगदी होते. सेक्युरिटी नाही, चेक इन नाही, ब्यागेज नाही, गर्दी नाही, वेटिंग नाही, क्यू नाही, अनौंसमेन्ट नाहीत. आजच्या काळात अपरिहार्य वाटणाऱ्या गोष्टी. पण नंतर लक्षात येते कि अरे या सगळ्याची वास्तविक पाहता तशी मुलभूत गरज नाहीच. कित्ती साधे सोपे सरळ होते सगळे Happy आजकाल तळ्यात बोटिंग करणे सुद्धा इतके साधे राहिले नाही.

नकारात्मक:
डॉक्युमेंटरी स्टाईलकडे झुकला आहे. त्यामुळे मुलांसाठी नाही म्हटले तरी थोडा कंटाळवाणा होतोच.
शेवटच्या प्रसंगातला विद्यापीठातला गोपाळरावांचा प्रवेश मला व्यक्तीश: फारच फिल्मी वाटला. अगदीच "बच्चन स्टाईल एन्ट्री" असे वाटले.

एकंदर: सर्वांनी एकदातरी नक्की पहावा असा चित्रपट.

@अतुलजी.-अगदी योग्य विश्लेषण केले आहे.. मी चित्रपट पाहिला नाही पण तत्संबंधी वाचनात ज्या गोष्टी कळल्या त्यायोगे गन पॉईंट इ. गोष्टी पटल्या..
तरीही आजच्या तरुणाईला आनंदी चं मोठेपण समजण्यासाठी हा चित्रपट एक चांगले माध्यम ठरेल ही आशा

अतुल पाटील,
पोस्ट आवडली !>>>> +१.

या चित्रपटामुळे नवीन पिढीला आनंदीबाईंची ओळख होतेय ते चांगले आहे.
अवांतर....कॉलेजच्या दिवसात जनरल नॉलेज म्हणून प्रोफेसर जे काही विचारत होते,ते ते सगले कॉन्वेंटवाली मुलं सटासट उत्तरं देत होती.त्यातले सर्व प्रश्न परदेशाशी संबधित होते. एकच प्रश्न त्यानी विचारला तो भारतात कुटुंबनियोजनाची प्रथम सुरुवात कोणी केली त्यावेळी मात्र ही मंडळी गप्प झाली.र.धो.कर्वे हे नाव त्यांना माहित नव्हते.

खूप इंटरेस्टिंग माहिती मिळतेय.
पार्वतीबाई आठवले हिंगणे शिक्षण संस्थेसाठी पैसा गोळा करायला अमेरिकेत गेल्या. तिथे त्यांचेही खाण्यापिण्याचे कसे हाल झाले ते लिहिले आहे त्यांनी.

या सगळ्या काळाबद्दल अधिक माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण आज किती गोष्टी गृहित धरतो ते लक्षात येतं आणि या लोकांबद्दल अधिक कृतज्ञ वाटू लागतं.
वरच्या यादीत सावित्रीबाईंचं नाव अग्रक्रमाने घालायला हवं.

आता लवकरच महिलादिन येतोय तर वर मनिलाने दिलेली यादी+ सावित्रीबाई फुले यांची माहिती माबोवर लिहू शकेल का कोणीतरी (ज्यांनी त्यांच्याबद्दल पुस्तक वाचली आहेत). जमलंच तर इंग्रजी फॉर्मल भाषेत त्यांची विकीपानदेखील अपडेट करता येतील; सध्या फारच त्रोटक माहिती आहे तिथे किंवा विकिपानच नाहीय.

सावित्रीबाई फुले https://en.m.wikipedia.org/wiki/Savitribai_Phule

आनंदी जोशी https://en.m.wikipedia.org/wiki/Anandi_Gopal_Joshi

१) पंडिता रमाबाई https://en.m.wikipedia.org/wiki/Pandita_Ramabai

२) रमाबाई रानडे https://en.m.wikipedia.org/wiki/Ramabai_Ranade

३) ताराबाई शिंदे https://en.m.wikipedia.org/wiki/Tarabai_Shinde

४) मनोरमा मेधावी

५) काशीबाई कानिटकर https://en.m.wikipedia.org/wiki/Kashibai_Kanitkar

६) रखमाबाई राऊत https://en.m.wikipedia.org/wiki/Rukhmabai

७) आनंदीबाई कर्वे https://mr.m.wikipedia.org/wiki/आनंदीबाई_धोंडो_कर्वे

८) पार्वतीबाई आठवले https://en.m.wikipedia.org/wiki/Parvatibai_Athavale

९) लक्ष्मीबाई टिळक https://en.m.wikipedia.org/wiki/Lakshmibai_Tilak

१०) जनाक्का शिंदे

११) कमलाबाई होस्पेट https://en.m.wikipedia.org/wiki/Kamalabai_Hospet

आनंदी गोपाळ चित्रपट मी गेल्या शनिवारीच बघितला. पण त्याबद्दल काही बोलावेसे वाटले नाही. पण इथे इतक्या लोकांनी हा चित्रपट आवडला लिहिले की राहवले नाही. मला नाही आवडला.
चित्रपट पाहण्याआधी डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्यांच्याबद्दल फारच जुजबी माहिती होती. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. बायकांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई त्या काळात त्या एकटीने अमेरिकेत जाऊन डॉक्टर बनल्या. त्यांच्या ध्येयपूर्तीच्या खडतर प्रवासात त्यांचे पती गोपाळराव जोशींनी त्यांना साथ दिली होती. दुर्दैवाने त्यांचे कमी वयात निधन झाले. तशी दुखी कहानी. मी दु:खान्त चित्रपटांच्या वाट्याला जात नाही. परंतु ट्रेलरमधील सुंदर गाणी, ललित सारखा चॉकलेट हिरोला दिलेली गोपाळरावांची भूमिका आणि उंच माझा झोका मधल्या न्यायमूर्ती रानडे यांच्या व्यक्तिरेखेमुळे त्याकाळातल्या सुधारकी विचारांच्या पुरुषांबद्दल झालेली चांगली प्रतिमा यामुळे चित्रपट पाहायला गेले. पण बाहेर पडताना आदर आणि अभिमान वाटण्या ऐवजी दया आणि दु:ख वाटले.
पूर्ण चित्रपटभर आनंदी ज्या एका ध्येयासाठी समाजाची कुचेष्टा सहन करताना आणि तरीही ध्येयपूर्तीसाठी कष्ट घेताना दिसली ते ध्येय तिचे वाटलेच नाही. दोन तासामध्ये फक्त एकदाच मध्यंतरापुर्वी ते ध्येय तिचे वाटले तर तेव्हा संवादांनी घात केला. 'मी डॉक्टर बनून दाखवीनच"... दाखवीन??!! कुणाला?
बऱ्याच प्रसंगात आनंदीबाई वेगवेळ्या पुस्तकांचे वाचन करताना किवा वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलताना दाखवले आहे. पण ते वाचन स्वान्तसुखाय न वाटता नवरा ओरडू नये यासाठी केल्यासारखेच वाटले. संपूर्ण चित्रपटात त्यांच्यात संवाद होताना जाणवलाच नाही. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले या समकालीन शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांबद्दल काही बोलणे नाहीच पण स्त्री शिक्षण, सती प्रथा विरोध, अस्पृश्यता विरोध वगैरे सामाजिक चळवळीची चर्चा असले काहीच नाही. चित्रपट संपल्यावर हे वाटलेले पण इथले काही प्रतिसाद बघता चित्रपटातील गोपाळराव बरेच बरे होते.
आणि एक कुतूहल आहे. इथेच वाचून डॉक्टर कादंबिनी गांगुली यांच्याबद्दल कळले. त्या समकालीनच होत्या आणि कोलकात्यातच वैद्यकीय शिक्षण घेतले. जोशी दाम्पत्य त्याच काळात कोलकत्याला होते. त्यांनी हया पर्यायाचा विचार केला नव्हता का?
गोपाळरावांनी त्यांना प्रोत्साहन दिले, साथ दिली की त्यांची स्वत:ची इच्छा त्यांच्यावर लादली? माझ्या मैत्रिणीला मी उगीच समर्थन देत राहिले की जेव्हा आपण पिडीत आहोत हेच माहित नसते तेव्हा कुणीतरी अशी जबरदस्ती करावी लागू शकते. तो काळ बघता कदाचित ते आवश्यक होते. पण इथल्या काही प्रतिसादानंतर ते समर्थन लटकेच वाटते. त्यापेक्षा गोपाळरावांच्या पहिल्या सासूबाई, त्यांनी साथ दिली असे म्हणता येऊ शकेल. केवळ स्वत:च्या मुलीला जे दु:ख वाट्याला आले ते आणखी एका मुलीच्या वाट्याला आलेले पाहता, होईल तितके ते हलके करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मानसिक क्षमता मला जास्त वाटली. एरवी आपल्या सख्ख्या नातवावर असा प्रसंग बेतल्यावर (जर तो प्रसंग खरेच झाला असेल तर) त्या काळच्या समजुतीनुसार त्यांनी आनंदीला त्रास देणे अगदीच स्वाभाविक वाटले असते. पण त्यांनी कधीच कटुता बाळगलेली दिसली नाही. उलट आधारच दिला.
सरतेशेवटी मी आणि माझी मैत्रीण दोघीना प्रश्न पडला, त्यांच्या आयुष्यात व्यक्तिश: आणि जोडप्याने काहीच सुखाचे क्षण आलेच नाहीत का? पूर्ण चित्रपटावर दु:खद छाया दाटून राहिली आहे. wikiच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे भारतात पाहिली महिला डॉक्टर म्हणून स्वागत झाले. कोल्हापूर संस्थानच्या इस्पितळात त्यांची physician-in-charge म्हणून नियुक्ती झाली. हे जरी दाखवले असते तरी त्यांच्या कष्टाचे नाही म्हटले तरी थोडे चीझ झाल्यासारखे वाटले असते.
जाऊ दे... एरवी गाणी आणि इतर निर्मितीमुल्ये यांत चित्रपट कमी पडत नाही.
आता माझी बहिण, वहिनी आणि १३ वर्षाची भाची गेल्यात. मी त्यांना नका बघू म्हणूनच सांगितलेले. पण भाचीला ट्रेलर बघून खूप उत्सुकता आहे. बघू काय म्हणते आल्यावर.

Vt220,
आनंदीबाई जून 1883 मध्ये अमेरिकेस पोहोचल्या. कलकत्त्याच्या कॉलेजाने 29 जून 1883 रोजी स्त्रियांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे आंनदी अमेरिकेस गेली तेव्हा तिने कलकत्त्यात शिकावं अशी परिस्थिती नव्हती.

आनंदीवर विष्णुशास्त्री चिपळूणकारांचा विलक्षण प्रभाव होता. तिनं निबंधमालेचे अंक बरोबर नेले होते. त्यामुळे स्त्रीशिक्षण, सती यांबद्दल तिचे विचार प्रागतिक कधीच नव्हते. धर्म तिच्यालेखी सर्वांत महत्त्वाचा होता.

आपल्याला डॉक्टर का व्हायचं आहे, हे तिने श्रीरामपूरच्या भाषणात सांगितलं होतं. ते नाहीये का चित्रपटात?

प्रतिसाद आवडला vt220. आनंदीचे कौतुक आहेच पण प्रॅक्टिसिंग डॉक्टर व्हायच्या आधीच निधन झाल्याने कितीही नाही म्हणले तरी त्यांच्या अचिव्हमेंट वैयक्तिकच राहतायत. सावित्रीबाई-रमाबाई-रखमाबाई यांच्यासारखा सामाजिक परिणाम नाहीय त्यात.

एकंदरच मराठीत किंवा हिंदीतही ज्या बायोग्राफी येतायत त्या कोणावर करायच्या हे कसे ठरवत असतील विचार करतेय....

vt220 छान प्रतिसाद, एक वेगळी बाजू समजली. पिक्चर अजूनही बघितला नाहीये. बघताना आता हे ही डोक्यात ठेऊन बघेन.

चिनूक्स यांचा त्यावरचा प्रतिसाद पण मस्त, विविध विषयावर त्यांचा अभ्यासू प्रतिसाद बघून नेहेमी आदर वाटतो.

आनंदीचे कौतुक आहेच पण प्रॅक्टिसिंग डॉक्टर व्हायच्या आधीच निधन झाल्याने कितीही नाही म्हणले तरी त्यांच्या अचिव्हमेंट वैयक्तिकच राहतायत.

आनंदीबाई जगायला हव्या होत्याच. पण तरी या ग्रेट महिलांची एकमेकींशी तुलना करण्यात काही पॉईंट नाही. या काही आज निवडणुकीला उभ्या नाहीयेत की मोदी विरुद्ध रागा असे पॉइंट्स काढावे.
आनंदी विरुद्ध रखमाबाई कोणी जास्त काळ practice केली किंवा सावित्रिबाईंच्या शाळा आज कुठे आहेत विरुद्ध रमाबाई रानडेंच्या सेवासदनसमोर आजही पालकांच्या रांगा लागणं हे meaningless आहे. या महिला एकाच मिशनचा भाग होत्या स्पर्धक नव्हत्या.

आपल्याला डॉक्टर का व्हायचं आहे, हे तिने श्रीरामपूरच्या भाषणात सांगितलं होतं. ते नाहीये का चित्रपटात?>> नाहीये.

Pages