जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ११. कळमनुरी ते वाशिम

Submitted by मार्गी on 21 December, 2018 - 08:03

जे सत्य सुंदर सर्वथा....: ११. कळमनुरी ते वाशिम

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१०. नांदेड ते कळमनुरी

२१ नोव्हेंबरचा कळमनुरीतला कार्यक्रम मस्तच झाला, शिवाय अनेकांना भेटता आलं. संध्याकाळीही कार्यक्रमात भेटलेले डॉ. धांडे सर भेटून गेले. आज २२ नोव्हेंबरला हिंगोलीतही काही जण भेटतील. कळमनुरीतून सकाळी निघताना थोडा उशीर झाला. काल पौष्टिक लाडू जरा जास्त खाल्ले व पोटाला त्रास झाला! शिवाय कळमनुरीत जिथे थांबलो होतो, ते विश्राम गृह अगदी हायवेवर आहे. त्यामुळे पूर्ण उजाडल्यावरच बाहेर पडलो. इथला परिसर खूप मस्त वाटतोय. अगदी डोंगराळ. कदाचित काही जणांना वाटत असेल की, रोजच्या सायकलिंगमध्ये विशेष असा अनुभव काय येत असणार, काय वेगळं असणार. माझा तरी हाच अनुभव आहे की, प्रत्येक दिवस व प्रत्येक राईड वेगळी असते. प्रत्येक दिवसाची‌ दृश्य वेगळी असतात. तसंच प्रत्येक दिवशी आपलं मन व मनासमोरची दृश्यही तीच नसतात. आणि ह्या प्रवासात तर दररोज नवीन लोकांशी भेट होते आहे. आणि इतर वेळच्या रोजच्या सायकलिंग किंवा रनिंगबद्दल माझा हाच अनुभव आहे की, प्रत्येक राईड किंवा रन अगदी वेगळा असतो. रूट एकच असेल, वेळ एकच असेल, वातावरणही सारखं असेल, प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा असतो. फक्त तो बघता आला पाहिजे. वरवर बोअरिंगसारखा वाटणारा हा क्रम अजिबात बोअरिंग नसतो. फक्त त्यामध्ये दडलेल्या गोष्टी आपल्याला बघता आल्या पाहिजेत.

आजचा पहिला टप्पा अठरा किलोमीटर अंतरावरचं‌ हिंगोली आहे. इथे काही जणांची भेट होईल. आठ वर्षांपूर्वी हिंगोलीत ज्यांच्या घरी‌ काही महिने भाडेकरू म्हणून राहिलो होतो तेव्हाचे घर मालक व इतर काही परिचित ह्यांच्यासोबत थोडा वेळ भेट झाली. त्यांना तर असं वाटत होतं की, ते ज्याला ओळखत होते तो मी नाहीच आहे! आणि खरंही आहे! म्हणतात ना एकाच नदीमध्ये दोनदा डुबकी घेता येत नाही! नदी तर पळतच असते, पण आपणही पुढे जात असतो. थोडा वेळ पण खूप उत्साह देणारी ही भेट झाली. आज तसंही थोडीच सायकल चालवायची आहे. फक्त ६६ किलोमीटर. हिंगोलीतून बाहेर पडल्यावर थोडं अंतर सलग चढ आहे. हळु हळु काही डोंगरांच्या बाजूने रस्ता वर चढत जातोय. आणि बराच सलग असा निर्जन परिसरही आहे. ह्या चढावरही मी मस्त वेगाने जाऊ शकतोय! हायर गेअर्सही वापरता येत आहेत! काल जसं डोंगरकडा गाव लागलं होतं, तसं आज आणखी एक गावाचा बोर्ड दिसला- सिरसम. शाळेत सिरसमकर नावाचा मित्र होता! इथे हा बराच डोंगराळ भाग आहे. हिंगोलीच्या पुढे २१ किलोमीटरवर कण्हेरगांवपर्यंत मोठं गाव आलंच नाही. इथे दूसरा ब्रेक घेतला. इथून एक रस्ता येलदरीकडे जातो. तिकडे मी ह्या मोहीमेच्या शेवटच्या दिवशी जाईन.

कण्हेरगांवच्या पुढे नदी ओलांडल्यावर विदर्भात येऊन रायलो ना मी! चार वर्षांपूर्वी ह्याच रस्त्याने गाडीतून शेगांवला गेलो होतो, तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा तर कण्हेरगांवच्या आधी कण्हावं लागेल असा भयाण रस्ता होता! पण ह्यावेळी अगदी मस्त रस्ता! आता ऊन पडतंय. पण वाशिम जास्त लांब नाहीय. आणि खरंच पुन: ब्रेक घेण्याची गरज न पडता वाशिमला पोहचलो. जिल्ह्यात एचआयव्हीवर काम करणारी टीम, विहान प्रोजेक्ट, लिंक वर्कर प्रोजेक्ट हे सगळे मला रिसीव्ह करायला हिंगोली नाक्यावर आले. इथे मला एक गोष्ट फारच आवडली- मला भिसे सरांनी इलेक्ट्रॉल दिलं! इथून जिल्हा रुग्णालयाकडे जात असतानाच वाशिमच्या सायकलिस्ट अलकाताई गि-हे मला भेटायला आल्या. त्या इथल्या दिग्गज सायकलिस्ट आहेत. त्या सायकल स्टुडिओही चालवतात. माझी त्यांच्याशी ओळख कशी झाली, हे सांगण्यासारखं आहे. जेव्हा योग प्रसारासाठी सायकल मोहीम केली होती, तेव्हा सिंदखेड राजामध्ये एकांकडे राहिलो होतो. तेव्हा त्या काकांनी सांगितलं होतं की, त्यांच्या नातेवाईक असलेल्या अलकाताईही सायकलिस्ट आहेत. तेव्हा त्यांच्याशी संपर्क झाला होता. आणि आता त्या मला भेटायला आवर्जून आल्या.

इथला कार्यक्रमही छान झाला. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. एचआयव्ही असलेल्या लोकांना ट्रीटमेंटपर्यंत आणण्यातल्या अडचणी, त्यांना सरकारी लाभ मिळवून देताना येणा-या अडचणी ह्यावर लोकांनी अनुभव सांगितले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम करणा-यांनी अनुभव सांगितले. ह्या जिल्ह्यात मायग्रंट वर्कर्सही ब-याच प्रमाणात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांपर्यंत जाऊन त्यांना एचआयव्ही टेस्टसाठी तयार करणं, पॉझिटीव्ह आढळल्यावर परत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना ट्रीटमेंटपर्यंत आणणं कठीण असतं. असंच काम रिलीफ फाउंडेशन पुण्यात भोसरीमध्ये करतं. त्याशिवाय विहान सपोर्ट ग्रूपही वेगळ्या प्रकारे एचआयव्ही असलेल्या व्यक्तींसोबत काम करतो. त्यांना मदत देणं, त्यांची हिंमत बांधणं, सरकारी मदत मिळवून देणं हे तर असतंच. पण हे करताना एक शब्द फार मोठा अडथळा बनतो- कलंक. तोही दूर ठेवावा लागतो. त्यामुळे लोकांना सेवा देताना गोपनीयताही ठेवावी लागते. आणि जे लोक रिस्क झोनमध्ये असतात, जसे सेक्स वर्कर्स किंवा त्यांचे क्लाएंटस, त्यांना सुरक्षित पद्धतीही सांगाव्या लागतात. अनेकदा कार्यकर्त्यांना एचआयव्ही असलेल्या व्यक्तीच्या घरी जाताना लोकांना सांगावं लागतं की, त्या तिथे कामवाली बाई हवी का, हे विचारण्यासाठी गेल्या होत्या. अशी स्थिती‌ असते! ह्या क्षेत्रात काम करणारे लोक एका अर्थाने unsung heros आणि heroines सारखेच आहेत! चर्चेत हे सगळं ऐकून अलकाताईही प्रभावित झाल्या. त्यांचे पती डॉक्टर आहेत, पण तरीही त्यांना ह्या बाबींची अशी माहिती नव्हती. मलाही ह्या प्रवासापूर्वी अनेक गोष्टी माहिती नव्हत्या. एका अर्थाने हे क्षेत्र एका अस्पृश्य व वाळीत टाकलेल्या जगात नेणारं आहे. असो.

वाशिममध्ये माझ्या मुक्कामाची व्यवस्था विहान प्रोजेक्टच्या कार्यालयातच केली होती. चर्चेनंतर अलकाताईंनी सगळ्यांना सांगितलं की, ह्यावेळी १ डिसेंबरच्या जागतिक एड्स निर्मूलन दिवशी सायकल फेरी काढू. दर वर्षी इथे साधी रॅली निघते; जी गावाच्या थोड्याच भागात जाते. पूर्ण शहर कव्हरही होत नाही. अलकाताईंनी अलीकडेच २०० पेक्षा जास्त सायकलिस्टसची एक ईव्हेंट केली होती. त्यांनी म्हंटलं की, १ डिसेंबरच्या कार्यक्रमात त्या ह्या २०० सायकलिस्टना बोलातील. अलकाताईंनी सायकलिंग कसं सुरू केलं, हेही विशेष आहे. काही वर्षांपूर्वी त्या त्यांचे मित्र नारायणजी व्यास ह्यांच्यामुळे सायकलिंगकडे वळल्या. हळु हळु त्यांच्या मार्गदर्शनात पुढे गेल्या. आणि मग २०० किमी, ३०० किमी असं एंड्युरंस सायकलिंगही त्यांनी केलं! ह्याबाबतीत त्या नारायणजींना गुरू मानतात. नारायणजीही थोडा वेळ कार्यक्रमात आले होते. मला हे आणखी विशेष वाटलं की, त्या फक्त स्वत: सायकल चालवून थांबल्या नाहीत, तर स्वत: सायकलिंग ईव्हेंटसही आयोजित करतात. तसंच गृहिणी होत्या, पण आता नारायणजींसोबत मिळून सायकल स्टुडिओही चालवतात. खरंच ही साधी गोष्ट नाही. त्यांनी स्टुडिओ बघायलाही बोलावलं होतं. पण नंतर आराम व कामामुळे जाता आलं नाही. संध्याकाळीही काही कार्यकर्त्यांशी गप्पा होत राहिल्या. आता उद्या अकोला! ह्या मोहीमेचं एका प्रकारचं शिखर. तिथे चौथ्या बालगृहाला भेट देईन.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १२. वाशिम ते अकोला

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults