जे सत्य सुंदर सर्वथा....: (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव) ४. पंढरपूर ते बार्शी

Submitted by मार्गी on 6 December, 2018 - 08:34

जे सत्य सुंदर सर्वथा....: ४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

१५ नोव्हेंबर. काल सलग दोन दिवस पंक्चर झाल्यामुळे अजूनही अस्वस्थ वाटत आहे. पंक्चर तर मी नीट केलं आहे, पण परत होण्याची भिती‌ आहे. काल रात्री उशीरा झोपूनही सकाळी छान वाटतंय. मुलांचा व पालवीतल्या मंगल ताईंचा निरोप घेऊन निघालो. थंडी अगदी जाणवते आहे. पंढरपूर! गावातून शेटफळचा रस्ता विचारत पुढे निघालो. ह्या प्रवासाचा रूट प्लॅन केला होता तेव्हा दररोज ८०- ८५ किलोमीटर सायकल चालवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. असा रूट बनवताना अनेकदा अगदी अंतर्भागातून जाणारे रस्ते घ्यावे लागले. आजही मला अशाच रस्त्यावरून जायचं आहे. चंद्रभागा नदीचा पूल ओलांडल्यावर लगेचच असा रस्ता आला! जणू दिव्याखाली अंधार! अगदी उखडलेला रस्ता! नवीन रस्ता बनवण्याच्या आधी जुना रस्ता उखडावाच लागतो का? निदान थोडं पुढे जाऊन तरी नीट रस्ता यावा!


चन्द्रभागा आणि पंढरपूर!

पण पुढे जात राहिलो तसा दूरवर असाच रस्ता दिसतोय! रस्ता म्हणजे अगदी गिट्टी (खडी) व माती! जर फक्त माती असती, तरी चाललं असतं. इथे तर जणू खडकावर ऑफ रोड सायकलिंग करावं लागत आहे. थोड्या वेळाने एक गाव आलं. इथे लोकांनी सांगितलं की, पुढे शेटफळपर्यंत असाच रस्ता (?) आहे! जवळ जवळ एका तासात फक्त बारा किलोमीटर झाले आहेत. पण चहा- बिस्कीटाचं हॉटेलही पुढेच मिळेल. इथून शेटफळ किमान बावीस किलोमीटर दूर असेल. पंक्चरची फारच भिती वाटतेय. अगदी भयावह खडकाळ वाट! काल व परवा तर सायकल हायवेवरही पंक्चर झाली होती! इथे पंक्चर होणं‌ तर शब्दश: काळ्या दगडावरची रेघ आहे! भीत भीतच पुढे जातोय. मध्ये मध्ये काही जागी रस्त्याचं‌ प्लॅस्टर काम झालेलं आहे. काही दुचाकीवाल्यांना बघून सायकल उचलून तिथे नेली व सुरू केली. पण परत थोड्या वेळाने रस्त्यावर उतरावं लागतंय. पण रस्ताही असा की परत प्लॅस्टर आलं की तिकडे सायकल नेतोय. थोड्या वेळाने एक छोटं गाव आलं. इथे चहा- बिस्कीट मिळालं. हॉटेलवाल्याने माझ्या सायकलवरचा बोर्ड बघितला- 'आपण स्वत:च्या व सर्वांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात का?' आणि तो म्हणाला की, ह्या बोर्डची एक कॉपी असेल तर मला द्या, मी हॉटेलवर लावतो! इथे दोन बिस्कीट पुडे व दोन चहा घेऊन निघालो. रस्त्याविषयी विचारलं. पुढेही असाच रस्ता आहे. मध्ये मध्ये प्लॅस्टर मिळेल. कुठे कुठे जुना रस्ताही शाबूत आहे असं कळालं.

रस्त्याची दशा बघून जवळ जवळ दर पाच मिनिटांनी टायर चेक करतोय. एकदा तर भितीने टायर पंक्चर झालं आहे, असंही वाटलं. पण हा शुद्ध भास होता. मनात जर भिती असेल तर प्रत्येक गोष्ट भितीदायक वाटते! सायकल पंक्चर होणार नाही, हा आशावाद तर कधीच सोडून दिला आहे. आज जर सलग तिस-या दिवशी सायकल पंक्चर झाली तर कदाचित मला माझ्या प्रवासाची योजना बदलावी लागेल. कदाचित काही अंतर गाडीने जावं लागेल व काही जुगाड करून पुण्यातून ह्या सायकलचं टायर मागवावं लागेल. काहीही होऊ शकतं. अशा अस्वस्थ मनस्थितीतून जाताना ट्रॅक्टर्सनी खूपच मस्त सोबत केली. पहिल्या दिवसापासून ट्रॅक्टर्स सतत दिसत आहेत. पुण्यापासून इथपर्यंत ऊसाचे ट्रॅक्टर्स सारखे भेटत आहेत. आणि नेहमीच ते बरोबर माझ्या आवडीचं गाणंच लावतात! इथे एक अतिशय गमतीदार दृश्य दिसलं! दूरवरून आलेल्या एका ट्रॅक्टरवाल्याने तर प्लॅस्टरवरच ट्रॅक्टर नेला आहे! व्वा! फक्त मनात प्रश्न आला- त्याला नीट उतरता येईल ना? आणि दुसरीकडूनही ट्रॅक्टर आला तर क्रॉसिंग कसं होईल!! असो! जेव्हा कच्च्या दगडी रस्त्याने मी निराश झालो होतो, तेव्हा सायकलने मात्र खूपच सोबत दिली. ती चालतच राहिली. दगडांना व धक्क्यांना झेलत राहिली. शेटफळ जसं जवळ येतंय, तसा रस्ता काहीसा बरा लागतोय. मध्ये मध्ये जुना शिल्लक रस्ता लागतोय. एकदा वाटलं की, शेटफळ आलंच. पण ते आधीचं एक गाव होतं. मन अस्वस्थ झाल्यावर असं होतं! हळु हळु शेटफळला पोहचलो. दूरवर हायवे बघून फारच अपूर्व वाटलं! हा पुणे- सोलापूर हायवेच आहे जो मी काल इंदापूरात सोडला होता. आत्ता हायवे क्रॉस करून माढाच्या रस्त्याकडे जायचं आहे.

शेटफळमध्ये हायवेजवळ थांबलो नाही आणि नंतर हॉटेलच नाहीय. आत्तापर्यंत फक्त ३५ किलोमीटर झाले आहेत आणि पन्नासहून अधिक बाकी आहेत. हॉटेल नसल्यामुळे किंचित त्रास वाटला. इथून पुढे रस्ता शक्यतो ठीकच आहे. पुढे छोटा पण चांगला रस्ता लागला आणि अगदीच इंटेरिअरमधला भाग लागला. पण पहिल्या दगडी वाटेपेक्षा फारच चांगला रस्ता आहे! आणि हा अगदी आतला ग्रामीण भाग बघायला मिळतोय. माढा जसं जवळ येत गेलं, छोटी छोटी गावं लागत गेली. एका जागी चहा- बिस्कीट, चिप्स व चिक्कीही मिळाली. आता चांगल्या रस्त्यामुळे वेगही मिळतोय. काही चढ व काही उतार लागत आहेत. सोलापूर जिल्ह्यात ह्या भागात पहिल्यांदाच येतोय. त्यामुळे अडचणी असल्या तरी तितकंच एंजॉयही करतोय. चांगला रस्ता मिळाल्याने मानसिक विरोध दूर झाला. पुढे हायवेही लागणार आहे. त्यामुळे नंतरचा प्रवास सोपा होत गेला. माढा मतदारसंघात एक गुंड वस्ती नावाचं गाव लागलं!! माढापासून पुढे सुमारे दहा किलोमीटरवर हायवे लागला. आता बार्शी फक्त २२ किमी. इथे दोन ग्लास ऊसाचा रस घेतला व निघालो. वाटेत थोडा चढ व हेड विंड असल्यामुळे किंचित उशीर झाला. तरी वेळेत म्हणजे दोन वाजायच्या आधी बार्शीला पोहचलो. आज चौथ्या दिवशी ८८ किमी झाले. पण रस्त्याची दशा बघता हे ८८ किमी चांगल्या रस्त्यावरील शतकापेक्षा मोठे आहेत असं वाटलं.

पोहचल्यावर आधी बार्शी गावात रेड लाईट एरियामध्ये काम करणा-या क्रांती महिला संघाच्या कार्यालयात गेलो. इथे छोटा कार्यक्रम झाला. संस्थेतले कार्यकर्ते, आयसीटीसी काउंसिलर लोंढे सर आणि काही महिला सेक्स वर्करही कार्यक्रमात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाची माहिती दिली. मी माझे अनुभवही सांगितले. अशा रेड लाईट एरियात काम करणं कोणत्याही संस्थेसाठी अतिशय आव्हानात्मक असतं. इथे संस्थेचा सेक्स वर्कर्ससोबत रॅपो चांगला दिसला. वीस- पंचवीस महिला आल्या होत्या. पण आज बिकट रस्त्यामुळे जास्त थकलो, त्यामुळे कार्यक्रमात तितका सक्रिय सहभाग घेता आला नाही. लोंढे सरांच्या एका मित्रांकडे मुक्कामाची व्यवस्था केली गेली. ते इथे बार्शीतल्या एचआयव्ही पॉझिटीव्ह नेटवर्कचं काम बघतात. त्यानंतर रोजचा क्रम केला- आराम, जेवण व मग लॅपटॉपवर काम.

ज्यांच्याकडे राहतोय, तेही ह्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्याशी पुढेही गप्पा होत गेल्या. चर्चेत मी त्यांना एकदा विचारलं, आपण ह्या कामात कसे आलात? तेव्हा कळालं की, ते अनेक वर्षांपासून पॉझिटीव्ह आहेत. लोंढे सरांनी त्यांना ह्या कामात येण्याची प्रेरणा दिली. एचआयव्ही क्षेत्रात अशा पीअर एज्युकेटर्सना फार महत्त्व आहे. जेव्हा एखादी एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्ती दुस-या पॉझिटीव्ह व्यक्तीला भेटते, त्याला सकारात्मक दृष्टीने जगताना व सर्व काम करताना बघते, ह्या इन्फेक्शनसोबतच पण नॉर्मल प्रकारे जगताना बघते, तेव्हा त्याला फारच प्रेरणा मिळते. पॉझिटीव्ह नेटवर्क अशा पॉझिटीव्ह सदस्यांचं असतं. ज्योत से ज्योत लगाते चलो पद्धतीने सगळे एकमेकांना मदत करतात आणि पुढे वाटचाल सुरू राहते. हे नेटवर्क एचआयव्ही असलेल्या व्यक्तींना सर्व प्रकारे मदत करते- उपचारासाठी सल्ला, पोषणासाठी सेवा, रेफरल सेवा, सरकारी सेवांसाठी मार्गदर्शनही करते. त्यांचे स्वयं सहाय्य गटही आहेत. पूर्वी मी अनेकदा एचआयव्ही पॉझिटीव्ह लोकांना भेटलो होतो, पण कधीच एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीसोबत राहिलो नव्हतो. आज ती उणीव दूर झाली. आणि आता मी माझ्या अनुभवाने म्हणू शकतो की कोणी एचआयव्ही पॉझिटीव्ह असलं तरी पूर्ण नॉर्मल व निरोगी जीवन जगू शकतात; जगताना दिसतात. त्यांचं चांगलं कुटुंब आहे. सगळे आनंदी व सुखी आहेत. माझी त्यांनी खूप प्रेमाने काळजी घेतली. त्यांच्या मुलाला म्युझिक मिक्सिंगमध्ये खूप आवड दिसली. संध्याकाळपर्यंत ह्यांच्यासोबत व लोंढे सरांसोबत गप्पा होत राहिल्या. बार्शीमध्ये एक फेरफटकाही झाला. आज खरंच वाटतंय की, मी जे सायकलवर फिरतोय, जो आटापीटा करतोय तो खरंच सार्थक आहे आणि मला त्यात खूप काही शिकायलाही मिळतंय.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ५. बार्शी ते बीड

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults